श्रीरामस्य समुद्रतटे कुशानास्तीर्य दिनत्रयं यावदुपवेशनं ततोऽपि स्वात्मानं अदर्शयतः समुद्रस्योपरि कुपितेन श्रीरामेण बाणप्रहारेण तस्य विक्षोभणम् -
|
श्रीरामांनी समुद्रतटावर दर्भ पसरून तीन दिवस पर्यंत धरणे धरल्यावरही समुद्राने दर्शन न दिल्याने कुपित होऊन त्याला बाण मारून विक्षुब्ध करणे -
|
ततः सागरवेलायां दर्भानास्तीर्य राघवः । अञ्जलिं प्राङ्मुखः कृत्वा प्रतिशिश्ये महोदधेः । ॥ १ ॥
|
त्यानंतर राघव समुद्राच्या तटावर दर्भ पसरून महासागराच्या समक्ष हात जोडून पूर्वाभिमुख होऊन तेथे झोपले. ॥१॥
|
बाहुं भुजंगभोगाभं उपधायारिसूदनः । जातरूपमयैश्चैव भूषणैर्भूषितं पुरा ॥ २ ॥
|
त्यासमयी शत्रुसूदन श्रीरामांनी सर्पाच्या शरीराप्रमाणे कोमल आणि वनवासापूर्वी सोन्याच्या बनविलेल्या सुंदर आभूषणांनी सदा विभूषित राहणार्या आपल्या एका (उजव्या) बाहूला उशी बनवून ठेवले होते. ॥२॥
|
मणिकाञ्चनकेयूर मुक्ताप्रवरभूषणैः । भुजैः परमनारीणां अभिमृष्टमनेकधा ॥ ३ ॥
|
अयोध्येत राहाते वेळी मातृकोटिच्या अनेक उत्तम नारी मणि आणि सुवर्णानी बनविलेल्या केयूर तसेच मोत्यांच्या श्रेष्ठ आभूषणांनी विभूषित आपल्या कर-कमलांच्या द्वारा न्हाऊ-माखू घालणे आदि करते वेळी अनेक वेळा श्रीरामांच्या या बाहुला गोंजारत, कुरवाळत असत. ॥३॥
|
चन्दनागरुभिश्चैव पुरस्तादभिसेवितम् । बालसूर्यप्रकाशैश्च चन्दनैरुपशोभितम् ॥ ४ ॥
|
पूर्वी चंदन आणि अगुरूनी या बाहुची सेवा होत असे. प्रात:काळच्या सूर्यासारखी कांति असलेले लाल चंदन त्याची शोभा वाढवीत होते. ॥४॥
|
शयने चोत्तमाङ्गेन सीतायाः शोभितं पुरा । तक्षकस्येव सम्भोगं गङ्गाजलनिषेवितम् ॥ ५ ॥
|
सीताहरणापूर्वी शयनकाळी सीतेचे शिर त्या बाहुची शोभा वाढवीत होते आणि श्वेत शय्येवर स्थित आणि लाल चंदनाने चर्चित झालेला तो बाहू गंगाजलात निवास करणार्या तक्षकाच्या (*) शरीराप्रमाणे सुशोभित होत होता. ॥५॥
|
संयुगे युगसंकाशं शत्रूणां शोकवर्धनम् । सुहृदां नन्दनं दीर्घं सागरान्तव्यपाश्रयम् ॥ ६ ॥
|
युद्धस्थळावर जोखडाप्रमाणे ती विशाल भुजा शत्रूंचा शोक वाढविणारी आणि सुहृदांना दीर्घकाळ पर्यंत आनंदित करणारी होती. समुद्र पर्यंत अखंड भूमंडलाच्या रक्षणाचा भार त्यांच्या त्याच भुजेवर प्रतिष्ठित होता. ॥६॥
|
अस्यता च पुनः सव्यं ज्याघातविहतत्वचम् । दक्षिणो दक्षिणं बाहुं महापरिघसन्निभम् ॥ ७ ॥
गोसहस्रप्रदातारं ह्युपधाय भुजं महत् । अद्य मे तरणं वाथ मरणं सागरस्य वा ॥ ८ ॥
इति रामो धृतिं कृत्वा महाबाहुर्महोदधिम् । अधिशिश्ये स विधिवत् प्रयतो नियतो मुनिः ॥ ९ ॥
|
डाव्या बाजूकडे वारंवार बाण सोडल्यामुळे प्रत्यञ्चेच्या आघातांनी जिच्या त्वचेवर घर्षणाने खूण पडली होती, जी विशाल परिघासमान सुदृढ आणि बलिष्ठ होती तसेच जिच्या द्वारा त्यांनी हजारो गायी दान दिल्या होत्या, त्या विशाल उजव्या भुजेला उशी बनवून उदारता आदि गुणांनी युक्त महाबाहु श्रीराम आज एक तर मी समुद्राच्या पार जाईन अथवा माझ्या द्वारे समुद्राचा संहार होईल असा निश्चय करून मौन होऊन मन, वाणी आणि शरीराला संयमित करून महासागरास अनुकूल करून घेण्याच्या उद्देशाने विधिपूर्वक धरणे धरून त्या कुशासनावर झोपले होते. ॥७-९॥
|
तस्य रामस्य सुप्तस्य कुशास्तीर्णे महीतले । नियमादप्रमत्तस्य निशास्तिस्रोऽभिजग्मतुः ॥ १० ॥
|
दर्भ पसरलेल्या भूमिवर नियमपूर्वक असावधान न राहून श्रीरामांच्या तीन रात्री तेथे व्यतीत झाल्या. ॥१०॥
|
स त्रिरात्रोषितस्तत्र नयज्ञो धर्मवत्सलः । उपासत तदा रामः सागरं सरितां पतिम् ॥ ११ ॥
न च दर्शयते रूपं मन्दो रामस्य सागरः । प्रयतेनापि रामेण यथार्हमभिपूजितः ॥ १२ ॥
|
याप्रकारे त्या समयी तेथे तीन रात्री झोपून राहून नीतिचे ज्ञाते, धर्मवत्सल श्रीरामांनी सरितांचे स्वामी समुद्राची उपासना केली परंतु नियमपूर्वक राहून श्रीरामांच्या द्वारा यथोचित पूजा आणि सत्कार प्राप्त होऊनही त्या मंदमति महासागराने त्यांना आपल्या आधिदैविक रूपाचे दर्शन करविले नाही - तो त्यांच्या समक्ष प्रकट झाला नाही. ॥११-१२॥
|
समुद्रस्य ततः क्रुद्धो रामो रक्तान्तलोचनः । समीपस्थमुवाचेदं लक्ष्मणं शुभलक्षणम् ॥ १३ ॥
|
तेव्हा अरूण नेत्रप्रांत असणार्या भगवान् श्रीरामांनी समुद्रावर कुपित होऊन जवळच उभ्या असलेल्या शुभलक्षणयुक्त लक्ष्मणास याप्रकारे म्हटले- ॥१३॥
|
अवलेपः समुद्रस्य न दर्शयति यः स्वयम् । प्रशमश्च क्षमा चैव आर्जवं प्रियवादिता ॥ १४ ॥
असामर्थ्यफला ह्येते निर्गुणेषु सतां गुणाः ।
|
समुद्राला स्वत:विषयी फार अहंकार आहे, ज्यायोगे तो स्वत: माझ्या समोर प्रकट होत नाही आहे. शांति क्षमा, सरलता आणि मधुर-भाषण - हे जे सत्पुरूषांचे गुण आहेत; यांचा गुणहीनांच्यावर प्रयोग केल्यावर हाच परिणाम होतो की ते त्या गुणवान् पुरूषालाही असमर्थ समजतात. ॥१४ १/२॥
|
आत्मप्रशंसिनं दुष्टं धृष्टं विपरिधावकम् ॥ १५ ॥
सर्वत्रोत्सृष्टदण्डं च लोकः सत्कुरुते नरम् ।
|
जो आपली प्रशंसा करणारा, दुष्ट, धृष्ट, सर्वत्र धावा करणारा आणि चांगल्या-वाईट सर्व लोकांवर कठोर दंडाचा प्रयोग करणारा असतो, त्या मनुष्याचा सर्व लोक सत्कार करतात. ॥१५ १/२॥
|
न साम्ना शक्यते कीर्तिः न साम्ना शक्यते यशः ॥ १६ ॥
प्राप्तुं लक्ष्मण लोकेऽस्मिन् जयो वा रणमूर्धनि ।
|
लक्ष्मणा ! सामनीति (शांति) द्वारा या लोकात ना कीर्तीची प्राप्ती होऊ शकते, ना यशाचा प्रसार होऊ शकतो आणि ना संग्रामात विजयही प्राप्त होऊ शकतो. ॥१६ १/२॥
|
अद्य मद्बाणनिर्भग्नैः मकरैर्मकरालयम् ॥ १७ ॥
निरुद्धतोयं सौमित्रे प्लवद्भिः पश्य सर्वतः ।
|
सौमित्रा ! आज माझ्या बाणांनी खंड खंड होऊन मगर आणि मत्स्य सर्व बाजूस वाहून जाऊ लागतील आणि त्यांच्या प्रेतांनी या मकरालयाचे (समुद्राचे) जल आच्छादित होऊन जाईल. तू हे दृश्य आज आपल्या डोळ्यांनी पहा. ॥१७ १/२॥
|
भोगिनां पश्य भोगानि पया भिन्नाति लक्ष्मण ॥ १८ ॥
महाभोगानि मत्स्यानां करिणां च करानिह ।
|
लक्ष्मणा ! तू पहा कि मी येथे जलात राहाणार्या सर्पांचे शरीर, मत्स्यांची विशाल कलेवरे आणि जलहत्तींच्या शुण्डदंडाचे कशा प्रकारे तुकडे तुकडे करून टाकतो. ॥१८ १/२॥
|
सशङ्खशुक्तिकाजालं समीनमकरं तथा ॥ १९ ॥
अद्य युद्धेन महता समुद्रं परिशोषये ।
|
आज महान् युद्ध आरंभून शंख आणि शिंपल्यांचे समुदाय तसेच मत्स्य आणि मकरांसहित समुद्राला मी आत्ता सुकवून टाकतो. ॥१९ १/२॥
|
क्षमया हि समायुक्तं मामयं मकरालयः ॥ २० ॥
असमर्थं विजानाति धिक् क्षमामीदृशे जने ।
|
मकरांचा निवासभूत हा समुद्र मला क्षमेने युक्त पाहून असमर्थ समजू लागला आहे. अशा मूर्खांच्या प्रति केल्या गेलेल्या क्षमेचा धिक्कार आहे. ॥२० १/२॥
|
न दर्शयति साम्ना मे सागरो रूपमात्मनः ॥ २१ ॥
चापमानय सौमित्रे शरांश्चाशीविषोपमान् । सागरं शोषयिष्यामि पद्भ्यां यान्तु प्लवंगमाः ॥ २२ ॥
|
सौमित्रा ! सामनीतिचा आश्रय घेण्याने हा समुद्र माझ्या समोर आपले रूप प्रकट करीत नाही आहे म्हणून धनुष्य आणि विषधर सर्पांसमान भयंकर बाण घेऊन ये. मी समुद्राला सुकवून टाकतो मग वानरलोक पायी चालतच लंकापुरीला जातील. ॥२१-२२॥
|
अद्याक्षोभ्यमपि क्रुद्धः क्षोभयिष्यामि सागरम् । वेलासु कृतमर्यादं सहस्रोर्मिसमाकुलम् ॥ २३ ॥
निर्मर्यादं करिष्यामि सायकैर्वरुणालयम् । महार्णवं क्षोभयिष्ये महादानवसंकुलम् ॥ २४ ॥
|
जरी समुद्राला अक्षोभ्य म्हटले गेले आहे तरीही आज कुपित होऊन मी याला विक्षुब्ध करून टाकीन. या मध्ये हजारो तरंग (मर्यादेतच) उठत राहातात तरीही हा सदा आपल्या तटाच्या मर्यादेतच रहातो. मोठ मोठ्या दानवांनी भरलेल्या या महासागरात मी खळबळ उडवून देईन, वादळ निर्माण करीन. ॥२३-२४॥
|
एवमुक्त्वा धनुष्पाणिः क्रोधविस्फारितेक्षणः । बभूव रामो दुर्धर्षो युगान्ताग्निरिव ज्वलन् ॥ २५ ॥
|
असे म्हणून दुर्धर्ष वीर भगवान् श्रीरामांनी हातात धनुष्य घेतले. ते क्रोधाने डोळे फाडफाडून पाहू लागले आणि प्रलयाग्नि प्रमाणे प्रज्वलित होऊन उठले. ॥२५॥
|
संपीड्य च धनुर्घोरं कंपयित्वा शरैर्जगत् । मुमोच विशिखानुग्रान् वज्रानिव शतक्रतुः ॥ २६ ॥
|
त्यांनी आपल्या भयंकर धनुष्याला हळूच दाबून धरून त्यावर प्रत्यञ्चा चढवली आणि तिच्या टणत्काराने सार्या जगताला कंपित करत अत्यंत भयंकर बाण सोडले, जणु इंद्रांनी बर्याचशा वज्रांचा प्रहार केला असावा. ॥२६॥
|
ते ज्वलन्तो महावेगाः तेजसा सायकोत्तमाः । प्रविशन्ति समुद्रस्य जलं वित्रस्तपन्नगम् ॥ २७ ॥
|
तेजाने प्रज्वलित होऊन ते महान् श्रेष्ठ बाण समुद्राच्या जलात घुसले. तेथे राहाणारे सर्प भयाने कापू लागले. ॥२७॥
|
तोयवेगः समुद्रस्य सनक्रमकरो महान् । स बभूव महाघोरः समारुतरवस्तथा ॥ २८ ॥
|
मत्स्य आणि मगरांसहित महासागराच्या जलाचा महान् वेग एकएकी अत्यंत भयंकर झाला, तेथे वादळाचा कोलाहल माजला. ॥२८॥
|
महोर्मिमालाविततः शङ्खशुक्तिसमावृतः । सधूमः परिवृत्तोर्मिः सहसासीन्महोदधिः ॥ २९ ॥
|
मोठ मोठ्या तरंगमालांनी सारा समुद्र व्याप्त होऊन गेला. शंख आणि शिंपले पाण्यावर सर्वत्र पसरले गेले. तेथून धूर निघू लागला आणि सार्या महासागरात एकाएकी मोठ मोठ्या लाटा गोल गोल फिरू लागल्या. ॥२९॥
|
व्यथिताः पन्नगाश्चासन् दीप्तास्या दीप्तलोचनाः । दानवाश्च महावीर्याः पातालतलवासिनः ॥ ३० ॥
|
चमकणार्या फडा असणारे आणि दीप्तिशाली नेत्र असणारे सर्प व्यथित झाले तसेच पाताळात रहाणारे महापराक्रमी दानव ही व्याकुळ झाले. ॥३०॥
|
ऊर्मयः सिन्धुराजस्य सनक्रमकरास्तथा । विंध्यमंदरसंकाशाः समुत्पेतुः सहस्रशः ॥ ३१ ॥
|
सिंधुराजाच्या हजारो लाटा ज्या विंध्याचल आणि मंदराचला समान विशाल आणि विस्तृत होत्या, नक्र आणि मकरांसहित उंच उंच उठू लागल्या. ॥३१॥
|
आघूर्णिततरङ्गौघः सम्भ्रान्तोरगराक्षसः । उद्वर्तितमहाग्राहः सघोषो वरुणालयः ॥ ३२ ॥
|
सागराच्या उत्ताल तरंगमाला झोके खाऊ लागल्या, गोल चक्राकार फिरू लागल्या. तेथे निवास करणारे नाग आणि राक्षस घाबरून गेले. मोठे मोठे ग्राह वरवर उड्या मारू लागले तसेच वरुणाच्या निवासभूत त्या समुद्रात सर्व बाजूस भारी कोलाहल माजला. ॥३२॥
|
ततस्तु तं राघवमुग्रवेगं प्रकर्षमाणं धनुरप्रमेयम् । सौमित्रिरुत्पत्य विनिःश्वसन्तं मामेति चोक्त्वा धनुराललम्बे ॥ ३३ ॥
|
त्यानंतर राघवांनी रोषाने दीर्घ श्वास घेऊन आपले भयंकर वेगवान् अनुपम धनुष्य परत खेचण्यास सुरूवात केली. हे पाहून सौमित्र उडी मारून त्यांच्याजवळ जाऊन पोहोचले आणि बस, बस (पुरे, पुरे) आता नको असे म्हणत त्यांनी त्यांचे धनुष्य पकडून धरले. ॥३३॥
|
एतद्विनापि ह्युदधेस्तवाद्य संपत्स्यते वीरतमस्य कार्यम् । भवद्विधाः क्रोधवशं न यांति दीर्घं भवान् पश्यतु साधुवृत्तम् ॥ ३४ ॥
|
(नंतर ते म्हणाले-) बंधो ! आपण वीर-शिरोमणी आहात. या समुद्रास नष्ट न करताही आपले कार्य संपन्न होऊ शकेल. आपल्या सारखे महापुरूष क्रोधाच्या अधीन होत नाहीत. आता आपण सुदीर्घकाल पर्यंत उपयोगात आणता येईल अशा एखाद्या चांगल्या उपायाकडे दृष्टि वळवा - कुठली दुसरी उत्तम युक्ति विचारात घ्या. ॥३४॥
|
अन्तर्हितैश्चापि तथांतरिक्षे ब्रह्मर्षिभिश्चैव सुरर्षिभिश्च । शब्दः कृतः कष्टमिति ब्रुवद्भिः मामेति चोक्त्वा महता स्वरेण ॥ ३५ ॥
|
त्यासमयी अंतरिक्षात अव्यक्त रूपाने स्थित असलेल्या महर्षि आणि देवर्षिनी ही हाय ! ही तर फार दु:खाची गोष्ट आहे असे म्हणून आता नको, आता नको असे म्हणून मोठ्या जोराने कोलाहल माजविला. ॥३५॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे एकविंशः सर्गः ॥ २१ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा एकविसावा सर्ग पूर्ण झाला. ॥२१॥
|