[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ अष्टाविंशः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
विलपन्त्याः सीतायाः प्राणत्यागायोद्यमः -
विलाप करणार्‍या सीतेने प्राणत्याग करण्यासाठी उद्यत होणे -
सा राक्षसेन्द्रस्य वचो निशम्य
तद् रावणस्य प्रियमप्रियार्ता ।
सीता वितत्रास यथा वनान्ते
सिंहाभिपन्ना गजराजकन्या ॥ १ ॥
पतिच्या विरहदुःखाने व्याकुळ झालेली सीता राक्षसराज रावणाच्या त्या अप्रिय वचनांची आठवण येऊन, वनात सिंहाच्या तडाख्यात सापडलेल्या एखाद्या गजराजकन्ये प्रमाणे अत्यन्त भयभीत झाली. ॥१॥
सा राक्षसीमध्यगता च भीरु-
र्वाग्भिर्भृशं रावणतर्जिता च ।
कान्तारमध्ये विजने विसृष्टा
बालेव कन्या विललाप सीता ॥ २ ॥
त्या राक्षसीणींच्या मध्ये बसून त्यांच्या कठोर वचनांनी धमकावली गेलेली आणि रावणाकडून निर्भत्सना केली गेलेली ती भीरू स्वभावाची सीता निर्जन आणि निबीड अरण्यात एकटी सोडली गेलेल्या अत्यन्त अल्पवयी बालिकेप्रमाणे विलाप करू लागली. ॥२॥
सत्यं बतेदं प्रवदन्ति लोके
नाकालमृत्युर्भवतीति सन्तः ।
यत्राहमेवं परिभर्त्स्यमाना
जीवामि यस्मात् क्षणमप्यपुण्या ॥ ३ ॥
ती म्हणाली - सन्त नेहमी लोकांना जी गोष्ट सांगत असतात की मृत्युची वेळ आल्याशिवाय कोणाचाही मृत्यु होत नाही, ते अगदी खरी आहे, म्हणून तर याप्रकारे धमकावली जाऊनही मी अभागी स्त्री अजूनपर्यन्त जिवन्त राहू शकत आहे. ॥३॥
सुखाद् विहीनं बहुदुःखपूर्ण-
मिदं तु नूनं हृदयं स्थिरं मे ।
विशीर्यते यन्न सहस्रधाद्य
वज्राहतं शृङ्‌गमिवाचलस्य ॥ ४ ॥
माझे हे हृदय सुखरहित आणि अनेक प्रकारच्या दुःखांनी भरलेले असूनही निश्चितच अत्यन्त घट्ट आहे. म्हणून वज्राघात झालेल्या पर्वतशिखराप्रमाणे आज याचे हजारो तुकडे होत नाही आहेत. ॥४॥
नैवास्ति नूनं मम दोषमत्र
वध्याहमस्याप्रियदर्शनस्य ।
भावं न चास्याहमनुप्रदातु-
मलं द्विजो मन्त्रमिवाद्विजाय ॥ ५ ॥
या दुष्ट रावणाच्या हाताने मी मारली जाणार आहे म्हणून येथे मी आत्मघात केला तरी मला काहीही दोष लागू शकत नाही. काहीही होवो ज्याप्रमाणे द्विज शूद्राला वेदमन्त्राचा उपदेश देत नाही त्याप्रमाणेच मीही या निशाचराला माझा अनुराग-प्रेम देऊ शकत नाही. ॥५॥
तस्मिन्ननागच्छति लोकनाथे
गर्भस्थजन्तोरिव शल्यकृन्तः ।
नूनं ममाङ्‌गान्यचिरादनार्यः
शस्त्रैः शितैश्छेत्स्यति राक्षसेन्द्रः ॥ ६ ॥
हाय ! लोकनाथ भगवान श्रीरामचन्द्र येण्यापूर्वीच हा दुष्ट राक्षसराज निश्चितच आपल्या तीक्ष्ण शस्त्रांच्या द्वारे शीघ्र माझ्या अंगाचे, शरीराचे तुकडे तुकडे करून टाकील. ज्याप्रमाणे शल्य चिकित्सक काही विशिष्ट परिस्थिती मध्ये गर्भस्थ शिशुचे तुकडे तुकडे करतो अथवा ज्याप्रमाणे इन्द्राने दितीच्या गर्भस्थ शिशुचे पन्नास तुकडे करून टाकले होते, त्याप्रमाणे तो रावण माझे तुकडे तुकडे करील. ॥६॥
दुःखं बतेदं मम दुःखिताया
मासौ चिरायाभिगमिष्यतो द्वौ ।
बद्धस्य वध्यस्य यथा निशान्ते
राजोपरोधादिव तस्करस्य ॥ ७ ॥
मी फार दुःखात आहे. मुख्य दुःखाची गोष्ट अशी आहे की रावणाने मला दिलेल्या अवधिचे हे दोन महिनेही लवकरच समाप्त होतील. राजाच्या कारागारात कैदेत असलेल्या आणि रात्रीच्या अन्तीम काळात फाशीची सजा मिळालेल्या अपराधी चोराची जी दशा होते तशीच आज माझी दशा झाली आहे. ॥७॥
हा राम हा लक्ष्मण हा सुमित्रे
हा राममातः सह मे जनन्यः ।
एषा विपद्याम्यहमल्पभाग्या
महार्णवे नौरिव मूढवाता ॥ ८ ॥
हे रामा ! हे लक्ष्मणा ! हे सुमित्रे ! हे श्रीराम जननी कौसल्ये ! आणि हे माझ्या मातांनो ! ज्याप्रमाणे झंझावातात सापडलेली नौका महासागरात बुडून जाते, त्याप्रमाणे आज मी मन्दभागी सीता प्राणसंकटाच्या स्थितीत सापडले आहे. ॥८॥
तरस्विनौ धारयता मृगस्य
सत्त्वेन रूपं मनुजेन्द्रपुत्रौ ।
नूनं विशस्तौ मम कारणात् तौ
सिंहर्षभौ द्वाविव वैद्युतेन ॥ ९ ॥
मला वाटते की त्या मृगरूपधारी जीवाने माझ्या कारणास्तव निश्चितच त्या दोन्ही वेगवान राजकुमारांना मारून टाकले असावे. ज्याप्रमाणे अंगावर वीज कोसळली असता श्रेष्ठ सिंह मारले जावेत तशीच दशा त्या दोन्ही बन्धूंची झाली असावी. ॥९॥
नूनं स कालो मृगरूपधारी
मामल्पभाग्यां लुलुभे तदानीम् ।
यत्रार्यपुत्रं विससर्ज मूढा
रामानुजं लक्ष्मणपूर्वजं च ॥ १० ॥
त्यावेळी काळानेच मृगाचे रूप घेऊन मला मन्दभागिनीला भुलविले, मोहित केले असावे असेच निश्चितपणे वाटते आहे, म्हणून मी मूढ स्त्रीने त्या दोन्ही आर्यपुत्रांना, श्रीराम आणि लक्ष्मणाला- त्याच्या पाठीमागे धाडून दिले. ॥१०॥
हा राम सत्यव्रत दीर्घबाहो
हा पूर्णचन्द्रप्रतिमानवक्त्र ।
हा जीवलोकस्य हितः प्रियश्च
वध्यां न मां वेत्सि हि राक्षसानाम् ॥ ११ ॥
हे सत्यव्रतधारी महाबाहु श्रीराम ! पूर्णचन्द्रासारखे मनोहर मुख असणार्‍या हे रघुनन्दना ! हे जीव जगताचे हित इच्छिणार्‍या प्रियतमा ! मी येथे राक्षसांच्या हाताने मारली जाणार आहे याचा आपल्याला पत्ता नाही का ? ॥११॥
अनन्यदेवत्वमियं क्षमा च
भूमौ च शय्या नियमश्च धर्मे ।
पतिव्रतात्वं विफलं ममेदं
कृतं कृतघ्नेष्विव मानुषाणाम् ॥ १२ ॥
माझी ही अनन्योपासना, क्षमा, भूमीशयन, धर्मसंबन्धी नियमांचे पालन आणि पातिव्रत्य (पतिव्रतपरायणता) ही सर्वच्या सर्व ज्याप्रमाणे कृतघ्न मनुष्यावर केलेले उपकार निष्फळ होतात, त्याप्रमाणे निष्फळ झाली की काय ? ॥१२॥
मोघो हि धर्मश्चरितो मयायं
तथैकपत्‍नीत्वमिदं निरर्थकम् ।
या त्वां न पश्यामि कृशा विवर्णा
हीना त्वया सङ्‌गमने निराशा ॥ १३ ॥
हे प्रभो ! जर मी अत्यन्त कृश आणि निस्तेज होऊन आपणापासून दुरावलेलीच राहिले आणि आपल्या भेटीची आशा जर मी सोडून दिली तर जीवनभर ज्या धर्माचे आचरण मी केले तो धर्म माझ्यासाठी व्यर्थच होईल आणि हे एकपत्‍नीव्रतही काही उपयुक्त ठरले नाही. ॥१३॥
पितुर्निदेशं नियमेन कृत्वा
वनान्निवृत्तश्चरितव्रतश्च ।
स्त्रीभिस्तु मन्ये विपुलेक्षणाभिः
संरंस्यसे वीतभयः कृतार्थः ॥ १४ ॥
मला तर असे वाटते आहे की आपण नियमानुसार पित्याच्या आज्ञेचे पालन करून आपले व्रत पूर्ण केल्यानन्तर ज्या वेळी वनातून परत जाल तेव्हा निर्भय आणि सफळ मनोरथ होऊन विशालनयन असलेल्या अनेक सुन्दर स्त्रियांशी विवाह करून त्यांच्यामध्ये रममाण व्हाल. ॥१४॥
अहं तु राम त्वयि जातकामा
चिरं विनाशाय निबद्धभावा ।
मोघं चरित्वाथ तपोव्रतं च
त्यक्ष्यामि धिग्जीवितमल्पभाग्याम् ॥ १५ ॥
परन्तु श्रीरामा ! मी मात्र केवळ आपल्या ठिकाणीच अनुरक्त आहे- फक्त आपल्यावरच प्रेम करते. माझे हृदय चिरकाळपर्यन्त आपल्याच ठिकाणी जडून राहील. मी माझ्या विनाशासाठीच आपल्यावर प्रेम करीत आहे. आत्तापर्यत मी जे काही तप आणि व्रत आदि केले आहे ते माझ्यासाठी व्यर्थच सिद्ध झाले आहे. अभीष्ट फळ न देणार्‍या त्या धर्माचे आचरण करून आता मला माझ्या प्राणांचाही परित्याग करावा लागणार आहे. म्हणून माझा, मन्दभागिनीचा धिक्कार असो. ॥१५॥
सञ्जीवितं क्षिप्रमहं त्यजेयं
विषेण शस्त्रेण शितेन वापि ।
विषस्य दाता नहि मेऽस्ति कश्चि-
श्च्छस्त्रस्य वा वेश्मनि राक्षसस्य ॥ १६ ॥
मी लवकरच एखाद्या तीक्ष्ण शस्त्राने अथवा विषाने आपला प्राणत्याग करीन पण येथे राक्षसांमध्ये मला विष अथवा शस्त्र देणाराही कोणी दिसत नाही. ॥१६॥
शोकाभितप्ता बहुधा विचिन्त्य
सीताथ वेणीग्रथनं गृहीत्वा ।
उद्बध्य वेण्युद्‌ग्रथनेन शीघ्रं
अहं गमिष्यामि यमस्य मूलम् ॥ १७ ॥
शोकाने सन्तप्त झालेल्या सीतेने याप्रकारे पुष्कळ विचार केला आणि आपली वेणी हातात धरून निश्चय केला की मी लवकरच या वेणीने गळफास लावून घेऊन यमलोकात पोहोचीन. ॥१७॥
उपस्थिता सा मृदुसर्वगात्री
शाखां गृहीत्वा च नगस्य तस्य ।
तस्यास्तु रामं परिचिन्तयन्त्या
रामानुजं स्वं च कुलं शुभाङ्‌ग्याः ॥ १८ ॥

तस्या विशोकानि तदा बहूनि
धैर्यार्जितानि प्रवराणि लोके ।
प्रादुर्निमित्तानि तदा बभूवुः
पुरापि सिद्धान्युपलक्षितानि । ॥ १९ ॥
सीतेचे सर्व अवयव, सर्व अंग अत्यन्त कोमल होते. ती त्या अशोक वृक्षाच्या जवळ जाऊन त्याच्या शाखेस धरून उभी राहिली. अशा प्रकारे प्राणत्यागास उद्यत होऊन ती जेव्हा श्रीराम, लक्ष्मण आणि आपल्या कुळासंबन्धी विचार करू लागली तेव्हां त्या समयी शुभांगी सीतेच्या समक्ष असे अनेक लोकप्रसिद्ध श्रेष्ठ शकुन प्रकट झाले की जे शोकाची निवृत्ती करणारे आणि धैर्याची उत्पत्ति करणारे होते. त्या शकुनांचे दर्शन आणि त्यांच्या शुभ परिणामांचा अनुभव तिला पूर्वीही येऊन चुकला होता. ॥१८-१९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे अष्टाविंशः सर्गः ॥ २८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा अठ्ठाविसावा सर्ग पूर्ण झाला. ॥२८॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP