॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥ ॥ उत्तरकाण्ड ॥ ॥ चतुर्थः सर्गः ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] रामराज्याचे वर्णन आणि सीतेचा वनवास श्रीमहादेव उवाच एकदा ब्रह्मणो लोकात् आयान्तं नारदं मुनिम् । पर्यटन् रावणो लोकान् दृष्ट्वा नत्वाब्रवीद्वचः ॥ १ ॥ श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, निरनिराळ्या लोकांत फिरत असताना रावणाने एकदा ब्रह्मलोकातून येणाऱ्या नारद मुनींना पाहिले आणि मग त्यांना नमन करून तो म्हणाला. (१) भगवन् ब्रूहि मे योद्धुं कुत्र सन्ति महाबलाः । योद्धुमिच्छामि बलिभिः त्वं ज्ञातासि जगत्त्रयम् ॥ २ ॥ "हे भगवन, बलवान लोकांबरोबर युद्ध करण्याची माझी इच्छा आहे. तुम्हांला तिन्ही लोकांची ओळख आहे. तेव्हा माझ्याबरोबर लढू शकतील, असे महाबलवान वीर कोठे आहेत, ते मला सांगा." (२) मुनिर्ध्यात्वाह सुचिरं श्वेतद्वीपनिवासिनः । महाबला महाकायाः तत्र याहि महामते ॥ ३ ॥ पुष्कळ वेळ विचार करून मुनी म्हणाले, " हे महाबुद्धिमंता, श्वेतद्वीपात राहाणारे प्राणी महाबलवान आणि प्रचंड शरीराचे आहेत. तेथे तू जा. (३) विष्णुपूजारता ये वै विष्णुना निहताश्च ये । त एव तत्र सञ्जाता अजेयाश्च सुरासुरैः ॥ ४ ॥ जे लोक विष्णूच्या पूजेत रत आहेत किंवा जे विष्णूकडून ठार केले गेले आहेत, ते प्राणीच तेथे उत्पन्न झालेले आहेत. देव आणि असुर त्यांना जिंकू शकत नाहीत." (४) श्रुत्वा तद् रावणो वेगात् मन्त्रिभिः पुष्पकेण तान् । योद्धुकामः समागत्य श्वेतद्वीपासमीपतः ॥ ५ ॥ ते ऐकून रावण आपल्या मंत्र्यांसह पुष्पक विमानाने त्यांच्याशी युद्ध करण्याच्या इच्छेने सत्वर श्वेत द्वीपाजवळ गेला. (५) तत्प्रभाहततेजस्कं पुष्पकं नाचलत् ततः । त्यक्त्वा विमानं प्रययौ मन्त्रिणश्च दशाननः ॥ ६ ॥ त्या द्वीपाच्या प्रभेने तेजरहित झालेले ते पुष्पक विमान तेधून पुढे जाऊ शकले नाही. तेव्हा विमान आणि मंत्री यांना तेथेच सोडून देऊन रावण स्वतःच पुढे गेला. (६) प्रविशन्नेव तद्द्वीपं धृतो हस्तेन योषिता । पृष्टश्च त्वं कुतः कोऽसि प्रेषितः केन वा वद ॥ ७ ॥ त्या द्वीपात प्रवेश करताच एका स्त्रीने रावणाला हाताने धरले आणि त्याला विचारले, "तू कोण आहेस ? आणि तुला येथे कोणी पाठविले आहे ? सांग." (७) इत्युक्तो लीलया स्त्रीभिः हसन्तीभिः पुनः पुनः । कृच्छ्राद् हस्ताद् विनिर्मुक्तः तासां स्त्रीणां दशाननः ॥ ८ ॥ अशा प्रकारे अन्य अनेक स्त्रियांनी सहजपणे हसत हसत तीच गोष्ट त्याला पुनः पुनः विचारली. तेव्हा रावण मोठ्या कष्टाने त्या स्त्रियांच्या हातांतून निसटला. (८) आश्चर्यमतुलं लब्ध्वा चिन्तयामास दुर्मतिः । विष्णुना निहतो यामि वैकुण्ठमिति निश्चितः ॥ ९ ॥ त्याला अतिशय आश्चर्य वाटले. दुष्ट बुद्धीचा रावण विचार करू लागला. विष्णूकडून मारला गेल्यास मी निश्चितपणे वैकुंठाला जाईन. (९) मयि विष्णुर्यथा कुप्येत् तथा कार्यं करोम्यहम् । इति निश्चित्य वैदेहीं जहार विपिनेऽसुरः ॥ १० ॥ तेव्हा ज्यामुळे विष्णू माझ्यावर रागावतील, असे काही कार्य मी करेन. असा निश्चय करून त्यासाठी त्या असुर रावणाने वनातून वैदेहीचे अपहरण केले. (१०) जानन्नेव परात्मानं स जहार अवनीसुताम् । मातृवत्पालयामास त्वत्तः काङ्क्षन्वधं स्वकम् ॥ ११ ॥ हे रामा, तुमच्या हातून आपला वध व्हावा या इच्छेने, तुम्ही परमात्मा आहात, हे माहीत असूनसुद्धा रावणाने भूमिकन्या सीतेचे अपहरण केले, आणि तिचे आपल्या मातेप्रमाणे पालन केले. (११) राम त्वं परमेश्वरोऽसि सकलं जानासि विज्ञानदृग् भूतं भव्यमिदं त्रिकालकलना साक्षी विकल्पोज्झितः । भक्तानां अनुवर्तनाय सकलां कुर्वन् क्रियासंहतिं त्वं शृण्वन्मनुजाकृतिर्मुनिवचो भासीश लोकार्चितः ॥ १२ ॥ हे रामा, तुम्ही परमेश्वर आहात. तुम्ही विकल्पांनी रहित आणि तिन्ही काळांत घडणाऱ्या गोष्टींचे साक्षी आहात. तुम्ही आपल्या विज्ञानदृष्टीने भूत, भविष्य आणि वर्तमान कालातील सर्व काही जाणता. हे ईश्वरा, भक्तांना मार्ग दाखविण्यासाठी तुम्ही सर्व लीला करता, तसेच सर्व लोकांकडून पूजिले जाणारे तुम्ही मनुष्यरूपात माझ्यासारख्या मुनीचे वचन ऐकता, असे वाटते." (१२) स्तुत्वैवं राघवं तेन पूजितः कुम्भसम्भवः । स्वाश्रमं मुनिभिः सार्धं प्रययौ हृष्टमानसः ॥ १३ ॥ अशा प्रकारे राघवांची स्तुती केली. श्रीरामांनी त्यांचा सत्कार केला. मग अगस्त्य आनंदित मनाने इतर मुनींसह स्वतःच्या आश्रमाकडे निघून गेले. (१३) रामस्तु सीतया सार्धं भ्रातृभिः सह मन्त्रिभिः । संसारीव रमानाथो रममाणोऽवसद्गृहे ॥ १४ ॥ त्यानंतर सीता, बंधू आणि मंत्री यांच्यासह ते लक्ष्मीपती राम एखाद्या संसारी माणसाप्रमाणे घरात रममाण होत राहू लागले. (१४) अनासक्तोऽपि विषयान् बुभुजे प्रियया सह । हनुमत्प्रमुखैः सद्भिः वानरैः परिवेष्टितः ॥ १५ ॥ जरी ते अनासक्त होते, तरी आपल्या प्रिय पत्नीबरोबर ते विषयांचा भोग घेत असत. ते नेहमी हनुमानादी वानरांसमवेत असत. (१५) पुष्पकं चागमद्रामं एकदा पूर्ववत्प्रभुम् । प्राह देव कुबेरेण प्रेषितं त्वामहं ततः ॥ १६ ॥ एकदा पुष्पक विमान पूर्वीप्रमाणे प्रभू रामांजवळ आले आणि त्यांना म्हणाले, "हे देवा, कुबेराने मला पुनः तुमच्या सेवेसाठी पाठविले आहे. (१६) जितं त्वं रावणेनादौ पश्चाद्रामेण निर्जितम् । अतस्त्वं राघवं नित्यं वह यावद्वसेद्भुवि ॥ १७ ॥ कुबेराने मला सांगितले आहे की प्रथम तुला रावणाने जिंकले होते. नंतर तुला रामांनी जिंकले. म्हणून जोपर्यंत श्रीराम भूलोकावर असतील, तोपर्यंत तू नित्य त्यांना वाहून नेत जा. (१७) यदा गच्छेत् रघुश्रेष्ठो वैकुण्ठं याहि मां तदा । तच्छ्रुत्वा राघवः प्राह पुष्पकं सूर्यसन्निभम् ॥ १८ ॥ रघुश्रेष्ठ जेव्हा वैकुंठाला परत जातील, तेव्हा तू माझ्याकडे परत ये." ते ऐकल्यावर सूर्याप्रमाणे देदीप्यमान असणाऱ्या पुष्पकाला राघव म्हणाले. (१८) यद स्मरामि भद्रं ते तदागच्छ ममान्तिकम् । तिष्ठान्तर्धाय सर्वत्र गच्छेदानीं ममाज्ञया ॥ १९ ॥ "तुझे कल्याण असो. जेव्हा तुझे स्मरण करीन, तेव्हा तू माझ्याजवळ ये. आता तू जा आणि माझ्या आज्ञेने गुप्तरूपाने सर्वत्र राहा." (१९) इत्युक्त्वा रामचन्द्रोऽपि पौरकार्याणि सर्वशः । भ्रातृभिर्मन्त्रिभिः सार्थं यथान्यायं चकार सः ॥ २० ॥ अशा प्रकारे पुष्पकाला सांगून श्रीरामचंद्र आपले भाऊ आणि मंत्री यांच्यासह नगरवासियांची सर्व कार्ये योग्य रीतीने करू लागले. (२०) राघवे शासति भुवं लोकनाथे रमापतौ । वसुधा सस्यसम्पन्ना फलवन्तश्च भूरुहाः ॥ २१ ॥ तीन लोकांचे स्वामी असे लक्ष्मीपती राघव पृथ्वीचे पालन करीत असताना, वसुधा धनधान्याने संपन्न झाली आणि वृक्ष फळांनी लगडून गेले. (२१) जना धर्मपराः सर्वे पतिभक्तिपराः स्त्रियः । नापश्यत्पुत्रमरणं कश्चित् राजनि राघवे ॥ २२ ॥ राघव राज्य करीत होते, तेव्हा सर्व लोक धर्म-परायण झाले, स्त्रिया पति- भक्ति- परायण बनल्या आणि कुणालाही आपल्या पुत्राचे मरण पाहावे लागले नाही. (२२) समारुह्य विमानाग्र्यं राघवः सीतया सह । वानरैर्भ्रातृभिः सार्धं सञ्चचारावनिं प्रभुः ॥ २३ ॥ कधी प्रभू राघव सीता, वानर आणि बंधू यांच्या सह श्रेष्ठ पुष्पक विमानात आरोहण करून पृथ्वीवर संचार करीत. (२३) अमानुषाणि कार्याणि चकार बहुशो भुवि । ब्राह्मणस्य सुतं दृष्ट्वा बालं मृतमकालतः ॥ २४ ॥ शोचन्तं ब्राह्मणं चापि ज्ञात्वा रामो महापतिः । तपस्यन्तं वने शूद्रं हत्वा ब्राह्मणबालकम् ॥ २५ ॥ जीवयामास शूद्रस्य ददौ स्वर्गमनुत्तमम् । लोकानां उपदेशार्थं परमात्मा रघूत्तमः ॥ २६ ॥ कोटिशः स्थापयामास शिवलिङ्गानि सर्वशः । सीतां च रमयामास सर्वभोगैरमानुषैः ॥ २७ ॥ या पृथ्वीवर त्यांनी पुष्कळ अमानवी लीला केल्या. एका ब्राह्मणाचा लहान पुत्र अकाली मरण पावला. तो ब्राह्मण फार शोक करीत आहे, हे जाणून महाबुद्धिमान रामांनी वनात तप करणाऱ्या शूद्राला ठार केले आणि त्या ब्राह्मण बालकाला जिवंत केले. त्या शूद्राला अतिशय उत्तम स्वर्ग दिला. लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी परमात्मा रघूत्तमांनी सर्वत्र कोट्यवधी शिवलिंगांची स्थापना केली. तसेच सर्व अलौकिक भोगांनी ते सीतेला सर्व प्रकारे रमवीत असत. (२४-२७) शशास रामो धर्मेण राज्यं परमधर्मवित् । कथां संस्थापयामास सर्वलोकमलापहाम् ॥ २८ ॥ श्रेष्ठ धर्म जाणणाऱ्या रामांनी धर्मानुसार शासन केले. सर्व लोकांचे पाप दूर करणारी आपली कथा त्यांनी जगात स्थापन केली. (२८) दशवर्षसहस्राणि मायामानुषविग्रहः । चकार राज्यं विधिवत् लोकवन्द्यपदाम्बुजः ॥ २९ ॥ ज्यांच्या पदकमळांना तिन्ही लोक वंदन करीत होते, अशा त्या माया-मानव- रूपधारी रामांनी दहा हजार वर्ष न्यायाने राज्य केले. (२९) एकपत्नीव्रतो रामो राजर्षिः सर्वदा शुचिः । गृहमेधीयमखिलं आचरन् शिक्षयन् जनान् ॥ ३० ॥ सर्वदा शुद्ध असणारे राजर्षी व एकपत्नीव्रत पाळणारे श्रीराम हे लोकशिक्षणासाठी गृहस्थाश्रमातील सर्व धर्मांचे पालन करीत होते. (३०) सीता प्रेम्णानुवृत्त्या च प्रश्रयेण दमेन च । भर्तुर्मनोहरा साध्वी भावज्ञा सा ह्रिया भिया ॥ ३१ ॥ पतीच्या मनाचा कल जाणणाऱ्या पतिव्रता सीतेने आपल्या प्रेमाने, आज्ञापालनाने, नम्रतेने, इंद्रियसंयमाने, ज्जेने आणि भीतीने पतीचे मन हरण करून घेतले होते. (३१) एकदाक्रीडविपिने सर्वभोगसमन्विते । एकान्ते दिव्यभवने सुखासिनं रघुत्तमम् ॥ ३२ ॥ नीलमाणिक्यसंकाशं दिव्याभरणभूषितम् । प्रसन्नवदनं शान्तं विद्युत्पुञ्जनिभाम्बरम् ॥ ३३ ॥ सीता कमलपत्राक्षी सर्वाभरणभूषिता । राममाह कराभ्यां सा लालयन्ती पदाम्बुजे ॥ ३४ ॥ एकदा क्रीडावनातील एकांत स्थानी असणाऱ्या, सर्व भोग-साधनांनी संपन्न असणाऱ्या, दिव्य मंदिरात श्रीराम सुखाने बसले होते. त्यांची कांती नीलमण्याच्या वर्णाची होती. ते दिव्य अलंकारांनी विभूषित होते. त्यांचे मुख प्रसन्न होते. ते भाव गंभीर होते. विजेप्रमाणे त्यांचा पीतांबर तेजस्वी होता. त्या वेळी कमलपत्रनयना, सर्व अलंकारांनी विभूषित आणि आपल्या दोन्ही हातांनी श्रीरामांची चरणकमळे चेपणारी सीता श्रीरामांना म्हणाली. (३२-३४) देवदेव जगन्नाथ परमात्मन् सनातन । चिदानन्दादिमध्यान्त रहिताशेषकारण ॥ ३५ ॥ देव देवाः समासाद्य मामेकान्तेऽब्रुवन्वचः । बहुशोऽर्थयमानास्ते वैकुण्ठागमनं प्रति ॥ ३६ ॥ "हे देवाधिदेवा, हे जगन्नाथा, हे सनातन परमात्मा, हे चिदानंद स्वरूपा, हे आदि-मध्य-अंत यांनी रहित असणाऱ्या, हे सर्वांचे कारण असणाऱ्या देवा, काही काळा पूर्वी देवांनी माझ्याजवळ येऊन, एकांतात पुष्कळ प्रकारे माझी प्रार्थना क रून तु मच्या वैकुठ-गमनाबाबत विचारले. (३५-३६) त्वया समेतश्चिच्छक्त्या रामस्तिष्ठति भूतले । विसृज्यास्मान् स्वकं धाम वैकुण्ठं च सनातनम् ॥ ३७ ॥ ते म्हणाले, ' चित- शक्ती असलेल्या तुमच्यासह राम आम्हांला सोडून आणि वैकुंठ हे स्वतःचे निवासस्थान सोडून पृथ्वीतलावर राहात आहेत. (३७) आस्ते त्वया जगद्धात्रि रामः कमललोचनः । अग्रतो याहि वैकुण्ठं त्वं तथा चेत् रघुत्तमः ॥ ३८ ॥ आगमिष्यति वैकुण्ठं सनाथान्नः करिष्यति । इति विज्ञापिताहं तैः मया विज्ञापितो भवान् ॥ ३९ ॥ हे जगद्धात्री, तुमच्यामुळे कमललोचन राम भूतलावर राहात आहेत. तेव्हा जर तुम्ही प्रथम वैकुंठाला निघून याल तर रघूत्तम तुमच्याप्रमाणेच वैकुंठात परत येतील आणि आम्हांला सनाथ करतील.' अशा प्रकारे देवांनी माझी प्रार्थना केली. ते मी आत्ता तुम्हांला सांगत आहे. (३८-३९) यद्युक्तं तत्कुरुष्वाद्य नाहमाज्ञापये प्रभो । सीतायास्तद्वचः श्रुत्वा रामो ध्यात्वाब्रवीत्क्षणम् ॥ ४० ॥ हे प्रभो, मी काही आज्ञा करीत नाही. पण जे युक्त असेल ते तुम्ही आता करा. " सीतेचे वचन ऐकल्यावर, क्षणभर विचार करून राम म्हणाले. (४०) देवि जानामि सकलं तत्रोपायं वदामि ते । कल्पयित्वा मिषं देवि लोकवादं त्वदाशयम् ॥ ४१ ॥ त्यजामि त्वां वने लोक-वादाद्भीत इवापरः । भविष्यतः कुमारौ द्वौ वाल्मीकेराश्रमान्तिके ॥ ४२ ॥ "हे देवी, मला हे सर्व माहीत आहे. त्या संदर्भात मी आता तुला एक उपाय सांगतो. हे देवी, तुझ्याविषयी लोकापवाद निर्माण झाला आहे असे निमित्त करून, लोकापवादाला भिणाऱ्या एकाद्या सामान्य माणसाप्रमाणे, मी तुला वनात वाल्मीकींच्या आश्रमाजवळ सोडतो. तेथे तुला दोन पुत्र होतील. (४१-४२) इदानीं दृश्यते गर्भः पुनरागत्य मेऽन्तिकम् । लोकानां प्रत्ययार्थं त्वं कृत्वा शपथमादरात् ॥ ४३ ॥ भूमेर्विवरमात्रेण वैकुण्ठं यास्यसि द्रुतम् । पश्चादहं गमिष्यामि एष एव सुनिश्चयः ॥ ४४ ॥ आत्ता तुझ्या ठिकाणी गर्भावस्थेची लक्षणे दिसून येत आहेत. (मग पुत्र जन्माला आल्यानंतर) तू पुनः माझ्याजवळ ये आणि लोकांची खात्री पटावी म्हणून आदरपूर्वक शपथ घेऊन, मग दुभंगलेल्या धरणीच्या विवरातून तू लगेच वैकुंठाला जा. त्यानंतर मीसुद्धा वैकुंठात येईन. असे मी पक्के ठरविले आहे." (४३-४४) इत्युक्त्वा तां विसृज्याथ रामो ज्ञानैकलक्षणः । मन्त्रिभिः मन्त्रतत्त्वज्ञैः बलमुख्यैश्च संवृतः ॥ ४५ ॥ तत्रोपविष्टं श्रीरामं सुहृदः पर्युपासत । हास्यप्रौढकथासुज्ञा हासयन्तः स्थिता हरिम् ॥ ४६ ॥ तिला असे सांगून, ज्ञान हेच स्वरूप असणाऱ्या श्रीरामांनी तिला अंतःपुरात पाठवून दिले. नीतिशास्त्राचे तत्त्व जाणणारे मंत्री आणि मुख्य सेनापतींच्या समवेत श्रीराम एकदा राजसभेत बसले होते. सुहृद्गण त्यांची सेवा करीत होते. भरपूर हास्य निर्माण करणाऱ्या कथा जाणणारे विदूषक श्रीरामांना हसवीत होते. (४५-४६) कथाप्रसङ्गात् पप्रच्छ रामो विजयनामकम् । पौरा जानपदा मे किं वन्दतीह शुभाशुभम् ॥ ४७ ॥ सीतां वा मातरं वा मे भ्रातृन्वा कैकयीमथ । न भेतव्यं त्वया ब्रूहि शपितोऽसि ममोपरि ॥ ४८ ॥ बोलता बोलता रामांनी विजय नावाच्या एका दूताला विचारले, 'मी, सीता, माझी माता, माझे भाऊ तसेच कैकेयी यांच्या बाबतीत नगरवासी तसेच ग्रामवासी लोक बरेवाईट काय बोलत असतात ? तुला माझी शपथ आहे. तू सत्य सांग. मुळीच घाबरू नकोस. " (४७-४८) इत्युक्तः प्राह विजयो देव सर्वे वदन्ति ते । कृतं सुदुष्करं सर्वं रामेण विदितात्मना ॥ ४९ ॥ रामांनी असे विचारल्यावर विजय म्हणाला, "महाराज, सर्व लोक असे म्हणतात की आत्मज्ञानसंपन्न अशा रामांनी अतिशय दुष्कर असे कार्य केले आहे. (४९) किन्तु हत्वा दशग्रीवं सीतामाहृत्य राघवः । अमर्षं पृष्ठतः कृत्वा स्वं वेश्म प्रत्यपादयत् ॥ ५० ॥ तथापि रावणाला मारल्यावर, सीतेविषयी काही शंका न घेता तिला परत आणले व त्यांनी आपल्या घरी ठेवले (हे मात्र योग्य केले नाही). (५०) कीदृशं हृदये तस्य सीतासम्भोगजं सुखम् । या हृता विजनेऽरण्ये रावणेन दुरात्मना ॥ ५१ ॥ निर्जन अरण्यात दुरात्म्या रावणाने जिचे अपहरण केले होते त्या सीतेच्या सहवासात रामांना कसले बरे सुख मिळत असणार ? (५१) अस्माकमपि दुष्कर्म योषितां मर्षणं भवेत् । यादृग् भवति वै राजा ताद्उश्यो नियतं प्रजाः ॥ ५२ ॥ अशा स्थितीत आम्हांला आमच्या बायकांचे दुष्कर्म सहन करावे लागेल. कारण जसा राजा असतो, तशा प्रकारची प्रजा निश्चितपणे असते." (५२) श्रुत्वा तद्वचनं रामः स्वजनान् पर्यपृच्छत । तेऽपि नत्वाब्रुवन् रामं एवमेतन्न संशयः ॥ ५३ ॥ त्याचे ते वचन ऐकल्यावर रामांनी आपल्या स्वजनांकडे त्या बाबतीत पृच्छा केली. रामांना नमस्कार करून तेसुद्धा म्हणाले, "रामा, हे असेच आहे खरे, यात संशय नाही." (५३) ततो विसृज्य सचिवान् विजयं सुहृदस्तथा । आहूय लक्ष्मणं रामो वचनं चेदमब्रवीत् ॥ ५४ ॥ तेव्हा सचिव, विजय आणि आपले सुहृद यांना श्रीरामांनी निरोप दिला आणि लक्ष्मणाला बोलावून घेऊन राम त्याला म्हणाले. (५४) लोकापवादस्तु महान् सीतामाश्रित्य मेऽभवत् । सीतां प्रातः समानीय वाल्मीकेराश्रमान्तिके ॥ ५५ ॥ त्यक्त्वा शीघ्रं रथेन त्वं पुनरायाहि लक्ष्मण । वक्ष्यसे यदि वा किञ्चित् तदा मां हतवानसि ॥ ५६ ॥ "अरे लक्ष्मणा, सीतेमुळे माझ्यावर फार मोठा लोकापवाद आला आहे. तेव्हा उद्या सकाळी सीतेला रथात बसवून लगेच तिला वाल्मीकी-आश्रमाजवळ सोडून परत ये. या बाबतीत जर काही बोलशील तर मला मरणप्राय दुःख होईल." (५५-५६) इत्युक्त्वा लक्ष्मणो भीत्या प्रातरुत्थाय जानकीम् । सुमन्त्रेण रथे कृत्वा जगाम सहसा वनम् ॥ ५७ ॥ श्रीरामांनी असे सांगितल्यावर, लक्ष्मणाला भीती वाटली. सकाळी उठल्यावर सुमंत्राने सज्ज केलेल्या रथात जानकीला बसवून लक्ष्मण त्वरित वनाकडे निघून गेला. (५७) वाल्मीकेराश्रमस्यान्ते त्यक्त्वा सीतां उवाच सः । लोकापवादभीत्या त्वां त्यक्तवान् राघवो वने ॥ ५८ ॥ वाल्मीकींच्या आश्रमाजवळ सीतेला सोडून तो तिला म्हणाला, "लोकापवादाच्या भीतीमुळे राघवांनी तुला वनात सोडून दिले आहे. (५८) दोषो न कश्चिन्मे मातः गच्छाश्रमपदं मुनेः । इत्युक्त्वा लक्ष्मणः शीघ्रं गतवान् रामसन्निधिम् ॥ ५९ ॥ हे माते, यात माझा काही दोष नाही. तू वालीकीच्या आश्रमस्थानी जा." असे सीतेला सांगून लक्ष्मण रामांजवळ शीघ्र परत आला. (५९) सीतापि दुःखसन्तप्ता विललापाति मुग्धवत् । शिष्यैः श्रुत्वा च वाल्मीकिः सीतां ज्ञात्वा स दिव्यदृक् ॥ ६० ॥ दुःखाने संत्रस्त होऊन सीतासुद्धा एखाद्या अतिशय भोळ्या स्त्रीप्रमाणे विलाप करू लागली. एक स्त्री रडत आहे, असे शिष्यांच्या कडून ऐकल्यावर, ती स्त्री सीता आहे असे वाल्मीकींनी दिव्य दृष्टीने जाणले. भविष्यात काय होणार आहे, हे सर्व त्यांना माहीत होते. त्यांनी अर्घ्य इत्यादींनी जानकीचा सत्कार केला आणि तिचे सांत्वन केले आणि त्यांनी तिला मुनि-पत्नींच्या स्वाधीन केले. (६०-६१) अर्घ्यादिभिः पूजयित्वा समाश्वास्य च जानकीम् । ज्ञात्वा भविष्यं सकलां अर्पयन् मुनियोषिताम् ॥ ६१ ॥ तास्तां सम्पूजयन्ति स्म सीतां भक्त्या दिने दिने । ज्ञात्वा परात्मनो लक्ष्मीं मुनिवाक्येन योषितः । सेवा चक्रुः सदा तस्या विनयादिभिरादरात् ॥ ६२ ॥ वाल्मीकी मुनींच्या सांगण्यावरून सीता ही साक्षात परमात्म्याची लक्ष्मी आहे, असे कळल्यावर, त्या मुनिस्त्रिया दररोज भक्तीने सीतेची पूजा करीत. तसेच आदरपूर्वक विनय इत्यादी दाखवून सतत तिची सेवा करीत. (६२) रामोऽपि सीतारहितः परात्मा विज्ञानदृक् केवल आदिदेवः । सन्त्यज्य भोगानखिलान्विरक्तो मुनिव्रतोऽभून् मुनिसेविताङ्घ्रिः ॥ ६३ ॥ खरे म्हणजे राम हे परमात्मा, विज्ञानदृष्टी असणारे, केवळ एकमेवाद्वितीय, आदिदेव होते. मुनिजन त्यांच्या चरणांची सेवा करीत. पण सीतारहित झालेल्या श्रीरामांनी सर्व भोग सोडून दिले. ते विरक्त झाले आणि मुनिव्रताचे आचरण करून राहू लागले. (६३) इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे चतुर्थः सर्गः ॥ ४ ॥ इति श्रीमद्अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे चतुर्थः सर्गः ॥ ४ ॥ |