पितुश्चिन्तायाः किं कारणमिति कैकेयीं प्रति श्रीरामस्यानुयोगः कैकेय्या स्वप्रार्थितवरयोरितिवृत्तं श्रावयित्वा श्रीरामस्य वनवासाय प्रेरणम् -
|
श्रीरामांनी कैकेयीला पित्याच्या चिंतित होण्याचे कारण विचारणे आणि कैकेयीने कठोरता पूर्वक आपण मागितलेल्या वरांचा वृत्तांत सांगून श्रीरामास वनवासासाठी प्रेरीत करणे -
|
स ददर्शासने रामो निषण्णं पितरं शुभे ।
कैकेयीसहितं दीनं मुखेन परिशुष्यता ॥ १ ॥
|
महालात जाऊन रामांनी पित्याला कैकेयीसह एका सुंदर आसनावर बसलेले पाहिले- ते विषादात बुडलेले होते, त्यांचे मुख सुकून गेले होते आणि ते अत्यंत दयनीय दिसत होते. ॥१॥
|
स पितुश्चरणौ पूर्वमभिवाद्य विनीतवत् ।
ततो ववन्दे चरणौ कैकेय्याः सुसमाहितः ॥ २ ॥
|
जवळ पोहोचल्यावर रामांनी विनीतभावाने प्रथम आपल्य पित्याच्या चरणी प्रणाम केला, त्यानंतर अत्यंत सावधपणे त्यांनी कैकेयीच्या चरणीही मस्तक नमविले. ॥२॥
|
रामेत्युक्त्वा च वचनं बाष्पपर्याकुलेक्षणः ।
शशाक नृपतिर्दीनो नेक्षितुं नाभिभाषितुम् ॥ ३ ॥
|
त्या समयी दीनदशेत पडलेले राजे दशरथ एक वेळ 'राम !' असे म्हणून गप्प झाले. (याच्या पुढे त्यांच्याने बोलणे शक्य झाले नाही.) त्यांच्या डोळ्यात अश्रु दाटले होते म्हणून ते रामाकडे पाहूही शकले नाहीत आणि त्यांच्याशी काही बोलूही शकले नाहीत. ॥३॥
|
तदपूर्वं नरपतेर्दृष्ट्वा रूपं भयावहम् ।
रामोऽपि भयमापन्नः पदा स्पृष्ट्वेव पन्नगम् ॥ ४ ॥
|
राजांचे ते अभूतपूर्व भयंकर रूप पाहून रामही भयभीत झाले, जणुं त्यांनी पायांनी एखाद्या सर्पालाच स्पर्श केला होता (डिबचले होते) ॥४॥
|
इन्द्रियैरप्रहृष्टैस्तं शोकसन्तापकर्शितम् ।
निश्वसन्तं महाराजं व्यथिताकुलचेतसम् ॥ ५ ॥
ऊर्मिमालिनमक्षोभ्यं क्षुभ्यन्तमिव सागरम् ।
उपप्लुतमिवादित्यमुक्तानृतमृषिं यथा ॥ ६ ॥
|
राजांच्या इंद्रियांच्या ठिकाणी प्रसन्नता नव्हती, ते शोक आणि संतापाने दुर्बल होत होते, वारंवार दीर्घ श्वास घेत होते तथा त्यांच्या चित्तात अत्यंत व्यथा आणि व्याकुळता होती. ते, तरंगमालांनी उपलक्षित अक्षोभ्य समुद्र क्षुब्ध व्हावा, अथवा सूर्याला राहूने ग्रासावे अथवा एखाद्या महर्षिने असत्य भाषण करावे त्याप्रमाणे दिसत होते. ॥५ -६॥
|
अचिन्त्यकल्पं नृपतेस्तं शोकमुपधारयन् ।
बभूव संरब्धतरः समुद्र इव पर्वणि ॥ ७ ॥
|
राजांचा तो शोक असंभवनीय (अचिंत्यं) असा होता. या शोकाचे काय कारण आहे - असा विचार करीत असता श्रीरामचंद्र पौर्णिमेच्या समुद्राप्रमाणे अत्यंत विक्षुब्ध झाले. ॥७॥
|
चिन्तयामास चतुरो रामः पितृहिते रतः ।
किंस्विदद्यैव नृपतिर्न मां प्रत्यभिनन्दति ॥ ८ ॥
|
पित्याच्या हितात तत्पर असणारे परमचतुर राम विचार करू लागले- की 'आज हे असे काय झाले आहे' की ज्यायोगे महाराज माझ्याशी प्रसन्न होऊन बोलत नाहीत. ॥८॥
|
अन्यदा मां पिता दृष्ट्वा कुपितोऽपि प्रसीदति ।
तस्य मामद्य सम्प्रेक्ष्य किमायासः प्रवर्तते ॥ ९ ॥
|
इतर दिवशी तर बाबा (पिता) कुपित झालेले असले तरीही मला पहाताच प्रसन्न होतात; आज माझ्याकडे दृष्टिपात करून त्यांना क्लेष का बरे होत आहेत ? ॥९॥
|
स दीन इव शोकार्तो विषण्णवदनद्युतिः ।
कैकेयीमभिवाद्यैव रामो वचनमब्रवीत् ॥ १० ॥
|
हा सर्व विचार करून राम दीनासारखे झाले, शोकाने कातर झाले, विषादामुळे त्यांच्या मुखाची कांति फिकी पडली होती. ते कैकेयीला प्रणाम करून तिला विचारू लागले- ॥१०॥
|
कच्चिन्मया नापराद्धमज्ञानाद् येन मे पिता ।
कुपितस्तन्ममाचक्ष्व त्वमेवैनं प्रसादय ॥ ११ ॥
|
'माते ! माझ्याकडून अजाणता काही अपराध तर झाला नाहीं ना की ज्यामुळे पिता माझ्यावर नाराज झाले आहेत. तू मला हे सांग आणि तू यांना समजाव. ॥११॥
|
अप्रसन्नमनाः किं नु सदा मां प्रति वत्सलः ।
विषण्णवदनो दीनः न हि मां प्रति भाषते ॥ १२ ॥
|
हे तर सदा माझ्यावर प्रेम करीत असत, आज यांचे मन अप्रसन्न कां झाले आहे ? मी पहात आहे की आज ते माझ्याशी बोलतही नाहीत, त्यांच्या मुखावर विषाद पसरला आहे आणि ते अत्यंत दुःखी होत आहेत. ॥१२॥
|
शारीरो मानसो वापि कच्चिदेनं न बाधते ।
सन्तापो वाभितापो वा दुर्लभं हि सदा सुखम् ॥ १३ ॥
|
काही शारिरीक व्याधिजनित संताप अथवा मानसिक अभिताप (चिंता) तर यांनी पीडित करत नाही ना ? कारण की मनुष्याला सदा सुखच सुख मिळेल - असा सुयोग प्रायः दुर्लभच असतो. ॥१३॥
|
कच्चिन्न किञ्चिद् भरते कुमारे प्रियदर्शने ।
शत्रुघ्ने वा महासत्त्वे मातॄणां वा ममाशुभम् ॥ १४ ॥
|
प्रियदर्शन भरत, महाबली शत्रुघ्न अथवा माझ्या मातांचे काही अमंगल तर झाले नाही ना ? ॥१४॥
|
अतोषयन् महाराजमकुर्वन् वा पितुर्वचः ।
मुहूर्तमपि नेच्छेयं जीवितुं कुपिते नृपे ॥ १५ ॥
|
महाराजांना असंतुष्ट करून अथवा त्यांची आज्ञा न मानून त्यांना कुपित केले तर मी दोन घटकाही (एक मुहूर्तही ) जीवित राहू इच्छिणार नाही. ॥१५॥
|
यतोमूलं नरः पश्येत् प्रादुर्भावमिहात्मनः ।
कथं तस्मिन् न वर्तेत प्रत्यक्षे सति दैवते ॥ १६ ॥
|
मनुष्य ज्याच्यामुळे या जगात आपला प्रादुर्भाव (जन्म) पाहातो, त्या प्रत्यक्ष देवतास्वरूप पित्याच्या हयातीत तो त्यांच्या अनुकूल वर्तन कां बरे करणार नाही ? ॥१६॥
|
कच्चिते परुषं किञ्चिदभिमानात् पिता मम ।
उक्तो भवत्या रोषेण यत्रास्य लुलितं मनः ॥ १७ ॥
|
किंवा तूंच अभिमान अथवा रोषामुळे माझ्या पित्याला काही कठोर वचने तर बोलली नाहीस ना ? की ज्यामुळे यांचे मन दुःखी झाले आहे ? ॥१७॥
|
एतदाचक्ष्व मे देवि तत्त्वेन परिपृच्छतः ।
किन्निमित्तमपूर्वोऽयं विकारो मनुजाधिपे ॥ १८ ॥
|
'देवि, मी खरे खरे विचारत आहे, सांग तरी, कुठल्या कारणाने महाराजांच्या मनात आज इतका क्षोभ आहे? त्यांची अशी अवस्था पूर्वी तर कधी पाहण्यात आली नव्हती.' ॥१८॥
|
एवमुक्ता तु कैकेयी राघवेण महात्मना ।
उवाचेदं सुनिर्लज्जा धृष्टमात्महितं वचः ॥ १९ ॥
|
महात्मा राघवाने याप्रकारे विचारल्यावर अत्यंत निर्लज्ज कैकेयीने मोठ्या धीटाईने आपल्या आत्महिताची गोष्ट या प्रकारे बोलली - ॥१९॥
|
न राजा कुपितो राम व्यसनं नास्य किञ्चन ।
किञ्चिन्मनोगतं त्वस्य त्वद्भयान्नानुभाषते ॥ २० ॥
|
'राम ! महाराज कुपित झालेले नाहीत अथवा त्यांना काही कष्टही झालेले नाहीत. त्याच्या मनांत काही गोष्ट आहे जी तुझ्या भयाने ते बोलू शकत नाहीत. ॥२०॥
|
प्रियं त्वामप्रियं वक्तुं वाणी नास्य पवर्तते ।
तदवश्यं त्वया कार्यं यदनेनाश्रुतं मम ॥ २१ ॥
|
तू त्यांना प्रिय आहेस त्यामुळे तुला कुठली अप्रिय गोष्ट सांगण्यास त्यांचे तोंड उघडू शकत नाही. परंतु त्यांनी ज्या कार्यासाठी प्रतिज्ञा केली आहे, त्याचे तू अवश्य पालन केले पाहिजेस. ॥२१॥
|
एष मह्यं वरं दत्त्वा पुरा मामभिपूज्य च ।
स पश्चात् तप्यते राजा यथान्यः प्राकृतस्तथा ॥ २२ ॥
|
यांनी प्रथम तर माझा सत्कार करून मी जे मागीन ते वरदान देऊन टाकले आणि आता हे दुसर्या एखाद्या सामान्य (अडाणी) माणसाप्रमाणे त्यासाठी पश्चाताप करीत आहेत. ॥२२॥
|
अतिसृज्य ददानीति वरं मम विशाम्पतिः ।
स निरर्थं गतजले सेतुं बन्धितुमिच्छति ॥ २३ ॥
|
हे प्रजानाथ ! प्रथम 'मी देईन' अशी प्रतिज्ञा करून मला वर देऊन चुकले आहेत आणि आता त्याच्या निवारणासाठी व्यर्थ प्रयत्न करीत आहेत, पाणी निघून गेल्यावर त्याला अडविण्यासाठी बांध बांधण्यासाठी निरर्थक प्रयास करीत आहेत. ॥२३॥
|
धर्ममूलमिदं राम विदितं च सतामपि ।
तत्सत्यं न त्यजेद् राजा कुपितस्त्वत्कृते यथा ॥ २४ ॥
|
'रामा ! सत्य हे धर्माचे मूळ आहे असा सत्पुरुषांचाही निश्चय आहे. चुकून असे न होवो की महारज तुझ्या कारणाने माझ्यावर कुपित होऊन आपल्या त्या सत्यालाच सोडून बसतील. कसेही करून त्यांच्या सत्याचे पालन होईल असे तुला केले पाहिजे. ॥२४॥
|
यदि तद् वक्ष्यते राजा शुभं वा यदि वाशुभम् ।
करिष्यसि ततः सर्वमाख्यास्यामि पुनस्त्वहम् ॥ २५ ॥
|
जर राजे जी गोष्ट इच्छितात, ती शुभ असो वा अशुभ असो, तू सर्वथा तिचे पालन करणार असशील तर मी ती सारी गोष्ट पुन्हा तुला सांगेन. ॥२५॥
|
यदि त्वभिहितं राज्ञा त्वयि तन्न विपत्स्यते ।
ततोऽहमभिधास्यामि न ह्येष त्वयि वक्ष्यति ॥ २६ ॥
|
जर राजांनी सांगितलेली गोष्ट तुमच्यावर कानावर पडून तेथेच नष्ट होणार नसेल- जर तुम्ही त्यांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करू शकणार असाल तर मी तुम्हांला सर्व काही स्पष्ट करून सांगेन. हे स्वतः तुम्हांला काही एक सांगणार नाहीत.' ॥२६॥
|
एतत् तु वचनं श्रुत्वा कैकेय्या समुदाहृतम् ।
उवाच व्यथितो रामस्तां देवीं नृपसन्निधौ ॥ २७ ॥
|
कैकेयीचे हे म्हणणे ऐकून श्रीरामांच्या मनात फार व्यथा झाली. त्यांनी राजांच्या समीपच देवी कैकेयीला याप्रमाणे म्हटले - ॥२७॥
|
अहो धिङ् नार्हसे देवि वक्तुं मामीदृशं वचः ।
अहं हि वचनाद् राज्ञः पतेयमपि पावके ॥ २८ ॥
भक्षयेयं विषं तीक्ष्णं पतेयमपि चार्णवे ।
नियुक्तो गुरुणा पित्रा नृपेण च हितेन च ॥ २९ ॥
तद् ब्रूहि वचनं देवि राज्ञो यदभिकाङ्क्षितम् ।
करिष्ये प्रतिजाने च रामो द्विर्नाभिभाषते ॥ ३० ॥
|
'अहो ! धिक्कार असो ! देवी ! तुम्ही माझ्या बद्दल अशी गोष्ट तोंडातून काढता कामा नये. मी महाराजांच्या सांगण्यावरून आगीतही उडी घेऊ शकतो, तीव्र विषही भक्षण करू शकतो आणि समुद्रात देखील पडू शकतो. महाराज माझे गुरू, पिता आणि हितैषी आहेत. मी त्यांची आज्ञा मिळाली असता काय करू शकणार नाही ? म्हणून देवी ! राजांना जी गोष्ट अभीष्ट आहे ती मला आपण सांगावी. मी प्रतिज्ञा करतो की मी ती पूर्ण करीन. राम दोन मुखाने कधी बोलत नाही'. ॥२८- ३०॥
|
तमार्जवसमायुक्तमनार्या सत्यवादिनम् ।
उवाच रामं कैकेयी वचनं भृशदारुणम् ॥ ३१ ॥
|
श्रीराम सरळ स्वभावाने युक्त आणि सत्यवादी होते, त्यांचे बोलणे ऐकून अनार्या कैकेयीने अत्यंत दारूण वचन सांगण्यास आरंभ केला. ॥३१॥
|
पुरा देवासुरे युद्धे पित्रा ते मम राघव ।
रक्षितेन वरौ दत्तौ सशल्येन महारणे ॥ ३२ ॥
|
'हे राघव, पूर्वीची गोष्ट आहे- देवासुरसंग्रामात तुझे पिता शत्रूंच्या बाणांनी विंध झाले होते, त्या महासमरात मी त्यांचे रक्षण केले होते, त्यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी मला दोन वर दिले होते. ॥३२॥
|
तत्र मे याचितो राजा भरतस्याभिषेचनम् ।
गमनं दण्डकारण्ये तव चाद्यैव राघव ॥ ३३ ॥
|
'राजन ! त्यापैकीं एका वराच्या द्वारा तर मी महाराजांकडे अशी याचना केली आहे की - भरताला राज्याभिषेक व्हावा आणि दुसरा वर हा मागितला आहे की तुम्हांला आजच दण्डकारण्यात पाठवले जावे. ॥३३॥
|
यदि सत्यप्रतिज्ञं त्वं पितरं कर्तुमिच्छसि ।
आत्मानं च नरश्रेष्ठ मम वाक्यमिदं शृणु ॥ ३४ ॥
|
'नरश्रेष्ठ ! जर तुम्ही आपल्या पित्याला सत्यप्रतिज्ञ बनवू इच्छित असाल आणि आपणां स्वतःलाही सत्यवादी सिद्ध करण्याची इच्छा असेल तर माझी ही गोष्ट ऐका. ॥३४॥
|
संनिदेशे पितुस्तिष्ठ यथाऽनेन प्रतिश्रुतम् ।
त्वयारण्यं प्रवेष्टव्यं नव वर्षाणि पंच च ॥ ३५ ॥
|
'तू पित्याच्या आज्ञेच्या अधीन राहा. त्यांनी जशी प्रतिज्ञा केली आहे ती अनुसरून तुला चौदा वर्षासाठी वनात प्रवेश केला पाहिजे. ॥३५॥
|
भरतश्चाभिषिच्येत यदेतदभिषेचनम् ।
त्वदर्थे विहितं राज्ञा तेन सर्वेण राघव ॥ ३६ ॥
|
'राघव ! राजाने तुझ्या साठी जे हे अभिषेकाचा सामान एकत्रित केले आहे त्या सर्वांच्या द्वारा भरताचा अभिषेक केला जावा. ॥३६॥
|
सप्त सप्त च वर्षाणि दण्डकारण्यमाश्रितः ।
अभिषेकमिदं त्यक्त्वा जटाचीरधरो भव ॥ ३७ ॥
|
आणि तू ह्या अभिषेकाचा त्याग करून चौदा वर्षेपर्यंत दण्डकारण्यात राहून जटा आणि चीर धारण कर. ॥३७॥
|
भरतः कोसलपतेः प्रशास्तु वसुधामिमाम् ।
नानारत्नसमाकीर्णां सवाजिरथसंकुलाम् ॥ ३८ ॥
|
कोसल नरेशांच्या या वसुधेचे, जी नाना प्रकारच्या रत्नांनी भरलेली आणि घोडे तथा रथांनी व्याप्त आहे, भरत शासन करील. ॥३८॥
|
एतेन त्वां नरेन्द्रोऽयं कारुण्येन समाप्लुतः ।
शोक संक्लिष्टवदनो न शक्नोति निरीक्षितुम् ॥ ३९ ॥
|
'बस, एवढीशीच गोष्ट आहे, असे करण्याने तुझ्या वियोगाचे कष्ट सहन करावे लागतील असा विचार करुन महाराज करूणेत बुडून गेले आहेत. या शोकाने त्यांचे मुख सुकून गेले आहे आणि त्यांना तुझ्याकडे पहाण्याचे साहस होत नाही. ॥३९॥
|
एतत् कुरु नरेन्द्रस्य वचनं रघुनन्दन ।
सत्येन महता राम तारयस्व नरेश्वरम् ॥ ४० ॥
|
'रघुनंदन रामा ! तू राजांच्या या आज्ञेचे पालन कर आणि यांच्या महान सत्याचे रक्षण करून या नरेशांना संकटातून वाचव.' ॥४०॥
|
इतीव तस्यां परुषं वदन्त्यां
न चैव रामः प्रविवेश शोकम् ।
प्रविव्यथे चापि महानुभावो
राजा तु पुत्रव्यसनाभितप्तः ॥ ४१ ॥
|
कैकेयीने अशी कठोर वचने बोलल्यावरही रामांच्या हृदयांत शोक उत्पन्न झाला नाही. परंतु महानुभाव राजा दशरथ पुत्राच्या भावी वियोगजनित दुःखाने संतप्त आणि व्यथित होऊन गेले. ॥४१॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे अष्टादशः सर्गः ॥ १८ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा अठरावा सर्ग पूरा झाला. ॥१८॥
|
|