कैकेयीभवने प्रविश्य भरतेन तस्याः समक्षे प्रणमनं तन्मुखादेव पितुः परलोकवासवृत्तं विज्ञाय दुःखितस्य तस्य विलापः क्व तदानीं श्रीराम इति प्रश्ने कैकेयीमुखादेव श्रुत्वा तेन श्रीरामवनगमनविषयकवृत्तस्य ज्ञानम् -
|
भरतांनी कैकेयीच्या भवनात जाऊन तिला प्रणाम करणे, तिच्याकडून पित्याच्या परलोकवासाचा समाचार ऐकून दुःखी होऊन विलाप करणे तसेच श्रीरामाच्या विषयी विचारल्यावर कैकेयीद्वारा त्यांना श्रीरामांच्या वनगमनाचा वृतांत अवगत होणे -
|
अपश्यन्स्तु ततस्तत्र पितरं पितुरालये ।
जगाम भरतो द्रष्टुं मातरं मातुरालये ॥ १ ॥
|
त्यानंतर पित्याच्या घरात पिता न दिसल्याने भरत मातेचे दर्शन करण्यासाठी आपल्या मातेच्या महालात गेले. ॥ १॥
|
अनुप्राप्तं तु तं दृष्ट्वा कैकेयी प्रोषितं सुतम् ।
उत्पपात तदा हृष्टा त्यक्त्वा सौवर्णमासनम् ॥ २ ॥
|
आपल्या परदेशी गेलेल्या पुत्राला घरी आलेला पाहून त्या समयी कैकेयी हर्षाने भरून गेली आणि आपले सुवर्णमय आसन सोडून उडी मारून उभी राहिली. ॥ २ ॥
|
स प्रविश्यैव धर्मात्मा स्वगृहं श्रीविवर्जितम् ।
भरतः प्रेक्ष जग्राह जनन्याश्चरणौ शुभौ ॥ ३ ॥
|
धर्मात्मा भरतांनी आपल्या त्या घरात प्रवेश करून पाहिले की सारे घर श्रीहीन झाले आहे. नंतर त्यांनी मातेच्या शुभ चरणांना स्पर्श केला. ॥ ३ ॥
|
तं मूर्ध्नि समुपाघ्राया परिष्वज्य यशस्विनम् ।
अङ्के भरतमारोप्य प्रष्टुं समुपचक्रमे ॥ ४ ॥
|
आपला यशस्वी पुत्र भरत यांना हृदयाशी धरून कैकेयीने त्यांचे मस्तक हुंगले आणि त्यांना मांडीवर बसवून विचारवयास आरम्भ केला- ॥ ४ ॥
|
अद्य ते कतिचिद् रात्र्यश्च्युतस्यार्यकवेश्मनः ।
अपि नाध्वश्रमः शीघ्रं रथेनापततस्तव ॥ ५ ॥
|
’मुला ! तुला आपल्या आजोबांच्या घरातून निघून आज किती रात्री व्यतीत झाल्या ? तू रथाच्या द्वारे अत्यंत घाईने आला आहेस ? रस्त्यात तुला अधिक थकवा तर आला नाही ना ? ॥ ५ ॥
|
आर्यकस्ते सुकुशली युधाजिन्मातुलस्तव ।
प्रवासाच्च सुखं पुत्र सर्वं मे वक्तुमर्हसि ॥ ६ ॥
|
’तुझे आजोबा सकुशल तर आहेत ना ? तुझे मामा युधाजित तर कुशल आहेत ना ? मुला, जेव्हा तू येथून गेलास त्या वेळेपासून आजपर्यत तू सुखात राहात होतास ना ? या सार्या गोष्टी मला सांग. ॥ ६ ॥
|
एवं पृष्टस्तु कैकेय्या प्रियं पार्थिवनन्दनः ।
आचष्ट भरतः सर्वं मात्रे राजीवलोचनः ॥ ७ ॥
|
कैकेयीने या प्रकारे प्रिय वाणीमध्ये विचारल्यावर दशरथनन्दन कमलनयन भरतांनी मातेला सर्व गोष्टी सांगीतल्या. ॥ ७ ॥
|
अद्य मे सप्तमी रात्रिश्च्युतस्यार्यकवेश्मनः ।
अम्बायाः कुशली तातो युधाजिन्मातुलश्च मे ॥ ८ ॥
|
(ते म्हणाले-) माते ! (आई !) मामाच्या घरातून निघाल्यापासून माझी ही सातवी रात्र गेली आहे. माझे आजोबा आणि मामा युधाजीत ही सकुशल आहेत. ॥ ८ ॥
|
यन्मे धनं च रत्नं च ददौ राजा परंतपः ।
परिश्रान्तं पथ्यभवत् ततोऽहं पूर्वमागतः ॥ ९ ॥
राजवाक्यहरैर्दूतैस्त्वर्यमाणोऽहमागतः ।
यदहं प्रष्टुमिच्छामि तदम्बा वक्तुमर्हति ॥ १० ॥
|
’परंतप केकय नरेशांनी मला जी धनरत्ने आदि प्रदान केली आहेत, त्याच्या भाराने मार्गात सर्व वाहने थकली होती म्हणून मी राजकीय संदेश घेऊन गेलेल्या दूतांनी घाई केल्यामुळे येथे पुढेच निघून आलो आहे. ठीक आहे, आई ! आता मी जे काही विचारतो ते तू मला सांग.’ ॥ ९-१० ॥
|
शून्योऽयं शयनीयस्ते पर्यङ्को हेमभूषितः ।
न चायमिक्ष्वाकुजनः प्रहृष्टः प्रतिभाति मा ॥ ११ ॥
|
’ही तुझी शय्या सुवर्णभूषित पलंग यावेळी सुना आहे याचे काय कारण आहे ? आज महाराज येथे उपस्थित का बरे नाहीत ? हे महाराजांचे परिजन आज प्रसन्न कां दिसून येत नाहीत ? ॥ ११ ॥
|
राजा भवति भूयिष्ठमिहाम्बाया निवेशने ।
तमहं नाद्य पश्यामि द्रष्टुमिच्छन्निहागतः ॥ १२ ॥
|
’महाराज (वडिल) बहुतेक करून मातेच्या महालात राहात असत परंतु आज ते मला येथे कां बरे दिसत नाहीत ? मी त्यांच्या दर्शनाच्या इच्छेनेच येथे आलो आहे. ॥ १२ ॥
|
पितुर्ग्रहीष्ये पादौ तं ममाख्याहि पृच्छतः ।
आहोस्विदम्बाज्येष्ठायाः कौसल्याया निवेशने ॥ १३ ॥
|
’मी विचारतो आहे, सांग पिता कोठे आहेत ? मी त्यांचे पाय धरीन अथवा मोठी आई कौसल्या हिच्या घरात तर ते नाहीत ना ? ॥ १३ ॥
|
तं प्रत्युवाच कैकेयी प्रियवद् घोरमप्रियम् ।
अजानन्तं प्रजानन्ती राज्यलोभेन मोहिता ॥ १४ ॥
|
कैकेयी राज्याच्या लोभाने मोहित होत होती. ती राजांचा वृत्तांत न जाणणार्या भरताला त्या घोर अप्रिय समाचाराला प्रिय असल्याप्रमाणे समजून याप्रकारे सांगू लागली- ॥ १४ ॥
|
या गतिः सर्वभूतानां तां गतिं ते पिता गतः ।
राजा महात्मा तेजस्वी यायजूकः सतां गतिः ॥ १५ ॥
|
’मुला ! तुझे पिता महाराज दशरथ, मोठे महात्मा, तेजस्वी, यज्ञशील आणि सत्पुरूषांचे आश्रयदाते होते. एक दिवस समस्त प्राण्यांची जी गती होत असते, त्याच गतिला ते ही प्राप्त झाले आहेत.’ ॥१५॥
|
तच्छ्रुत्वा भरतो वाक्यं धर्माभिजनवाञ्छुचिः ।
पपात सहसा भूमौ पितृशोकबलार्दितः ॥ १६ ॥
हा हतोस्मीति कृपणां दीनां वाचमुदीरयन् ।
निपपात महाबाहुर्बाहू विक्षिप्य वीर्यवान् ॥ १७ ॥
|
भरत धार्मिक कुळात उत्पन्न झालेले होते आणि त्यांचे हृदय शुद्ध होते. मातेचे बोलणे ऐकून ते पितृशोकाने अत्यंत पीडित होऊन एकाएकी पृथ्वीवर कोसळले. आणि ’हाय ! मी मारला गेलो’ याप्रकारे अत्यंत दीन आणि दुःखमय वचन बोलून रडू लागले. पराक्रमी महाबाहु भरत आपल्या भुजा वारंवार पृथ्वीवर आपटून पडू आणि लोळू लागले. ॥ १६-१७ ॥
|
ततः शोकेन संवीतः पितुर्मरणदुःखितः ।
विललाप महातेजा भ्रान्ताकुलितचेतनः ॥ १८ ॥
|
त्या महातेजस्वी राजकुमाराची चेतना भ्रांत आणि शोकाने व्याकुळ होऊन गेली. ते पित्याच्या मृत्युने दुःखी आणि शोकाने व्याकुळचित्त होऊन विलाप करू लागले - ॥ १८ ॥
|
एतत् सुरुचिरं भाति पितुर्मे शयनं पुरा ।
शशिनेवामलं रात्रौ गगनं तोयदात्यये ॥ १९ ॥
तदिदं न विभात्यद्य विहीनं तेन धीमता ।
व्योमेव शशिना हीनमप्शुष्क इव सागरः ॥ २० ॥
|
’हाय ! माझ्या पित्याची जी ही अत्यंत सुंदर शय्या पूर्वी शरत्कालच्या रात्री चन्द्रम्याने सुशोभित होणार्या निर्मल आकाशाप्रमाणे शोभत होती, तीच ही शय्या आज त्या बुद्धिमान महाराजांच्या विरहित झाल्याने चन्द्रम्याच्या विरहित आकाशाप्रमाणे आणि सुकून गेलेल्या समुद्राप्रमाणे श्रीहीन प्रतीत होत आहे.’ ॥ १९-२० ॥
|
बाष्पमुत्सृज्य कण्ठेन स्वात्मना परिपीडितः ।
प्रच्छाद्य वदनं श्रीमद् वस्त्रेण जयतां वरः ॥ २१ ॥
|
विजयी वीरात श्रेष्ठ भरत आपले सुंदर मुख वस्त्राने झाकून आपल्या कण्ठस्वरा बरोबर अश्रु ढाळीत मनातल्या मनात अत्यंत पीडित होऊन पृथ्वीवर पडून विलाप करू लागले. ॥ २१ ॥
|
तमार्तं देवसङ्काशं समीक्ष्य पतितं भुवि ।
निकृत्तमिव सालस्य स्कन्धं परशुना वने ॥ २२ ॥
माता मातङ्गसङ्काशं चंद्रार्कसदृशं सुतम् ।
उत्थापयित्वा शोकार्तं वचनं चेदमब्रवीत् ॥ २३ ॥
|
देवतुल्य भरत शोकाने व्याकुल होऊन वनात कुर्हाडीने कापलेल्या शालवृक्षाच्या फांदीप्रमाणे पृथ्वीवर पडलेले होते. मत्त हत्तीप्रमाणे पुष्ट आणि चन्द्रमा अथवा सूर्यासमान तेजस्वी आपल्या शोकाकुल पुत्राला याप्रमाणे भूमीवर पडलेला पाहून माता कैकेयीने त्याला उठविले आणि याप्रमाणे म्हणाली- ॥ २२-२३ ॥
|
उत्तिष्ठोत्तिष्ठ किं शेषे राजन्नत्र महायशः ।
त्वद्विधा नहि शोचन्ति सन्तः सदसि सम्मताः ॥ २४ ॥
|
’राजन ! उठा, उठा ! महायशस्वी कुमारा ! तु याप्रमाणे येथे जमिनीवर का पडला आहेस ? तुमच्या सारखे सभांमध्ये सन्मानित होणारे सत्पुरूष शोक करीत नाहीत. ॥ २४ ॥
|
दानयज्ञाधिकारा हि शीलश्रुतितपोनुगा ।
बुद्धिस्ते बुद्धिसम्पन्न प्रभेवार्कस्य मन्दिरे ॥ २५ ॥
|
’बुद्धिमान पुत्रा ! ज्याप्रमाणे सूर्यमण्डलात प्रभा निश्चल रूपाने राहात असते त्याप्रमाणे तुमची बुद्धि स्थीर आहे. ती दान आणि यज्ञात लावण्यास अधिकारीणी आहे. कारण ती सदाचार आणि वेदवाक्यांचे अनुसरण करणारी आहे. ॥ २५ ॥
|
स रुदित्वा चिरं कालं भूमौ परिविवृत्य च ।
जननीं प्रत्युवाचेदं शोकैर्बहुभिरावृतः ॥ २६ ॥
|
’भरत पृथ्वीवर लोळत-पडत बराच वेळ पर्यत रडत राहिले. त्यानंतर अधिकाधिक शोकाने व्याकुळ होऊन ते मातेला याप्रकारे म्हणाले- ॥ २६ ॥
|
अभिषेक्ष्यति रामं तु राजा यज्ञं नु यक्ष्यते ।
इत्यहं कृतसङ्कल्पो हृष्टो यात्रामयासिषम् ॥ २७ ॥
|
’मी तर असा विचार करीत होतो की महाराज श्रीरामांचा राज्याभिषेक करतील आणि स्वतः यज्ञाचे अनुष्ठान करतील- हा विचार करून मी मोठ्या आनंदाने तेथून यात्रा (प्रवास) केली होती. ॥ २७ ॥
|
तदिदं ह्यन्यथाभूतं व्यवदीर्णं मनो मम ।
पितरं यो न पश्यामि नित्यं प्रियहिते रतम् ॥ २८ ॥
|
’परंतु येथे आल्यावर तर सर्व गोष्टी माझ्या आशेच्या विपरीत झालेल्या आहेत. माझे हृदय फाटून जात आहे, कारण की सदा माझेप्रिय आणि हित करणार्या पित्याला मी पाहू शकत नाही. ॥ २८ ॥
|
अम्ब केनात्यगाद् राजा व्याधिना मय्यनागते ।
धन्या रामादयः सर्वे यैः पिता संस्कृतः स्वयम् ॥ २९ ॥
|
’आई ! महाराजांना असा कोणता रोग झाला की ज्यामुळे ते मी येण्यापूर्वी निघून गेले ? श्रीराम आणि सर्व भाऊ धन्य आहेत, ज्यांनी स्वतः उपस्थित राहून पित्याचा अंत्येष्टि संस्कार केला. ।२९ ॥
|
न नूनं मां महाराजः प्राप्तं जानाति कीर्तिमान् ।
उपजिघ्रेत् तु मां मूर्ध्नि तातः संनाम्य सत्वरम् ॥ ३० ॥
|
’माझे पूज्य पिता यशस्वी महाराजांना निश्चितच मी येथे आल्याचा काही पत्ताच नाही, नाहीतर त्यांनी त्वरितच माझे मस्तक हुंगले असते. ॥ ३० ॥
|
क्व स पाणिः सुखस्पर्शस्तातस्याक्लिष्टकर्मणः ।
येन मां रजसा ध्वस्तमभीक्ष्णं परिमार्जति ॥ ३१ ॥
|
’हा ! अनायास ही महान कर्म करणार्या माझ्या पित्याचा तो कोमल हात कोठे आहे ? ज्याचा स्पर्श माझ्यासाठी अत्यंत सुखदायक होता ? ते त्याच हातानी माझ्या धुलिधूसर शरीरास वारंवार पुसत असत. ॥ ३१ ॥
|
यो मे भ्राता पिता बंधुर्यस्य दासोऽस्मि सम्मतः ।
तस्य मां शीघ्रमाख्याहि रामस्याक्लिष्टकर्मणः ॥ ३२ ॥
|
’आता जे माझे भाऊ माझे पिता आणि बंधु आहेत आणि ज्यांचा मी परम प्रिय दास आहे, त्या अनायासे महान पराक्रम करणार्या श्रीरामचंद्रांना तू त्वरित माझ्या येण्याची सूचना दे. ॥ ३२ ॥
|
पिता हि भवति ज्येष्ठो धर्ममार्यस्य जानतः ।
तस्य पादौ ग्रहीष्यामि स हीदानीं गतिर्मम ॥ ३३ ॥
|
’धर्माचा ज्ञाता असलेल्या श्रेष्ठ पुरूषांसाठी मोठा भाऊ पित्यासमान असतो. मी त्यांच्या चरणी प्रणाम करीन, आता तेच माझे आश्रय आहेत. ॥ ३३ ॥
|
धर्मविद् धर्मशीलश्च महाभागो दृढव्रतः ।
आर्ये किमब्रवीद् राजा पिता मे सत्यविक्रमः ॥ ३४ ॥
पश्चिमं साधुसन्देशमिच्छामि श्रोतुमात्मनः ।
|
’आर्ये ! धर्माचे आचरण ज्यांचा स्वभाव बनलेला आहे तसेच जे अत्यंत दृढतेने उत्तम व्रताचे पालन करीत होते ते, माझे सत्यपराक्रमी आणि धर्मज्ञ पिता महाराज दशरथ अंतिम समयी काय सांगत होते ? माझ्यासाठी त्यांचा जो अंतिम संदेश आहे तो मी ऐकू इच्छितो.’ ॥ ३४-१/२ ॥
|
इति पृष्टा यथातत्त्वं कैकेयी वाक्यमब्रवीत् ॥ ३५ ॥
रामेति राजा विलपन् हा सीते लक्ष्मणेति च ।
स महात्मा परं लोकं गतो मतिमतां वरः ॥ ३६ ॥
|
भरतांनी या प्रकारे विचारल्यावर कैकेयीने सर्व गोष्टी ठीक ठीक (जशा घडल्या तशा) सांगितल्या. ती सांगू लागली- ’मुला ! बुद्धिमंतामध्ये श्रेष्ठ तुझे महात्मा पिता महाराजांनी ’हा राम ! हा सीते ! हा लक्ष्मण !’ अशा प्रकारे विलाप करीत परलोकची यात्रा केली. ॥ ३५-३६ ॥
|
इतिमां पश्चिमां वाचं व्याजहार पिता तव ।
कालधर्मं परिक्षिप्तः पाशैरिव महागजः ॥ ३७ ॥
|
"ज्याप्रमाणे पाशात बांधलेला महान गज विवश होऊन जातो त्या प्रमाणेच कालधर्माच्या वशीभूत झालेल्या तुझ्या पित्याने अंतिम वचन याप्रकारे सांगितले होते - ॥ ३७ ॥
|
सिद्धार्थास्ते नरा राममागतं सीतया सह ।
लक्ष्मणं च महाबाहुं द्रक्ष्यन्ति पुनरागतम् ॥ ३८ ॥
|
’जे लोक सीतेसह पुन्हा परत आलेल्या श्रीराम आणि महाबाहु लक्ष्मणास पाहातील तेच कृतार्थ होतील.’ ॥ ३८ ॥
|
तच्छ्रुत्वा विषसादैव द्वितीयाप्रियशंसनात् ।
विषण्णवदनो भूत्वा भूयः पप्रच्छ मातरम् ॥ ३९ ॥
|
मातेच्या द्वारा ही दुसरी अप्रिय गोष्ट सांगितली गेल्यावर भरत आणखीनच दुःखी झाले. त्यांच्या मुखावर विषाद पसरला आणि त्यांनी पुन्हा मातेला विचारले - ॥ ३९ ॥
|
क्व चेदानीं स धर्मात्मा कौसल्यानन्दवर्धनः ।
लक्ष्मणेन सह भ्रात्रा सीतया च समागतः ॥ ४० ॥
|
’माते ! माता कौसल्येचा आनंद वाढविणारे धर्मात्मा राम त्यावेळी बंधु लक्ष्मण आणि सीतेसह कोठे निघून गेले होते ?’ ॥ ४० ॥
|
तथा पृष्टा यथान्यायमाख्यातुमुपचक्रमे ।
मातास्य युगपद्वाक्यं विप्रियं प्रियशंसया ॥ ४१ ॥
|
याप्रकारे विचारल्यावर त्यांची माता कैकेयीने एकदमच प्रिय बुद्धीने तो अप्रिय संवाद यथोचित रीतीने ऐकवायला आरम्भ केला - ॥ ४१ ॥
|
स हि राजसुतः पुत्र चीरवासा महावनम् ।
दण्डकान् सह वैदेह्या लक्ष्मणानुचरो गतः ॥ ४२ ॥
|
’मुला ! राजकुमार श्रीराम वत्कल- वस्त्र धारण करून सीतेसह दण्डकवनात गेले. लक्ष्मणांनी ही त्यांचे अनुसरण केले आहे’. ॥ ४२ ॥
|
तच्छ्रुत्वा भरतस्त्रस्तो भ्रातुश्चारित्रशङ्कया ।
स्वस्य वंशस्य माहात्म्यात् प्रष्टुं समुपचक्रमे ॥ ४३ ॥
|
हे ऐकून भरत घाबरले, त्यांना आपल्या भावाच्या चरित्राबद्धल शंका आली. (ते विचार करू लागले- श्रीराम धर्मापासून च्युत तर झाले नाहीत ना ? आपल्या वंशाच्या महत्तेचे (धर्मपरायणता) स्मरण करून ते कैकेयीला याप्रकारे विचारू लागले- ॥ ४३ ॥
|
कश्चिन्न ब्राह्मण धनं हृतं रामेण कस्यचित् ।
कच्चिनाढ्यो दरिद्रो वा तेनापापो विहिंसितः ॥ ४४ ॥
|
’माते ! श्रीरामांनी कुठल्या कारणाने ब्राह्मणाचे धन तर हरण केले नाही ना ? कुणा निष्पाप धनिकाची अथवा दरिद्र माणसाची हत्या तर केली नाही ना ? ॥ ४४ ॥
|
कच्चिन्न परदारान् वा राजपुत्रोऽभिमन्यते ।
कस्मात् स दण्डकारण्ये भ्राता रामो विवासितः ॥ ४५ ॥
|
’ राजकुमार श्रीरामाचे मन कुण्या परक्या स्त्रीकडे तर गेले नाही ना ? कुठल्या अपराधामुळे श्रीराम दादाला दण्डकारण्यात जाण्यासाठी निर्वासित केले गेले आहे ? ॥ ४५ ॥ "
|
अथास्य चपला माता तत् स्वकर्म यथातथम् ।
तेनैव स्त्रीस्वभावेन व्याहर्तुमुपचक्रमे ॥ ४६ ॥
|
तेव्हा चपल (चञ्चल) स्वभावाची भरताची माता कैकेयी हिने आपल्या विवेकशून्य चञ्चल नारीस्वभावामुळेच आपल्या कर्तृत्वाचे यथायोग्य वर्णन करण्यास आरम्भ केला. ॥ ४६ ॥
|
एवमुक्ता तु कैकेयी भरतेन महात्मना ।
उवाच वचनं हृष्टा वृथापण्डितमानिनी ॥ ४७ ॥
|
महात्मा भरतानी याप्रकारे विचारल्यावर व्यर्थच स्वतःला मोठी विदुषी मानणार्या कैकेयीने अत्यंत आनंदाने हुरळून जाऊन म्हटले - ॥ ४७ ॥
|
न ब्राह्मणधनं किञ्चितद्धृतं रामेण कस्यचित् ।
कच्चिन्नाढ्यो दरिद्रो वा तेनापापो विहिंसितः ।
न रामः परदारान् सश्च चक्षुर्भ्यामपि पश्यति ॥ ४८ ॥
|
’पुत्रा ! श्रीरामांनी कुठल्याही कारणाने किञ्चिन्मात्र ही ब्राह्मणाच्या धनाचे अपहरण केलेले नाही. कुणा निरपराध धनिकाची अथवा दरिद्री माणसाची हत्या त्यांनी केलेली नाही. श्रीराम कुणा परस्त्रीकडे कधी दृष्टीही टाकत नाहीत. ॥ ४८ ॥
|
मया तु पुत्र श्रुत्वैव रामस्येहाभिषेचनम् ।
याचितस्ते पिता राज्यं रामस्य च विवासनम् ॥ ४९ ॥
|
’मुला ! त्यांच्या वनात जाण्याचे कारण याप्रमाणे आहे - मी ऐकले होते की अयोध्येत श्रीरामास राज्याभिषेक केला जाणार आहे तेव्हा मी तुझ्या पित्याकडून तुझ्यासाठी राज्य आणि श्रीरामासाठी वनवासाची प्रार्थना केली. ॥ ४९ ॥
|
स स्ववृत्तिं समास्थाय पिता ते तत् तथाकरोत् ।
रामश्च सहसौमित्रिः प्रेषितः सीतया सह ॥ ५० ॥
तमपश्यन् प्रियं पुत्रं महीपालो महायशाः ।
पुत्रशोकपरिद्यूनः पञ्चत्वमुपपेदिवान् ॥ ५१ ॥
|
’त्यांनी आपल्या सत्यप्रतिज्ञ स्वभावास अनुसरून माझी मागणी पूर्ण केली. श्रीरामांना लक्ष्मण आणि सीतेसह वनात घालवून दिले गेले, आणि नंतर आपला प्रिय पुत्र श्रीराम न दिसल्याने ते महायशस्वी महाराज पुत्रशोकाने पीडीत होऊन परलोकवासी झाले. ॥ ५०-५१ ॥
|
त्वया त्विदानीं धर्मज्ञ राजत्वमवलम्ब्यताम् ।
त्वत्कृते हि मया सर्वमिदमेवंविधं कृतम् ॥ ५२ ॥
|
’धर्मज्ञा ! आता तू राज्यपद स्वीकार कर. तुझ्यासाठीच मी याप्रकारे हे सर्व काही केले आहे. ॥ ५२ ॥
|
मा शोकं मा च संतापं धैर्यमाश्रय पुत्रक ।
त्वदधीना हि नगरी राज्यं चैतदनामयम् ॥ ५३ ॥
|
’मुला ! शोक आणि संताप करू नको. धैर्याचा आश्रय घे. आता हे नगर आणि निष्कण्टक राज्य तुझ्याच आधीन आहे. ॥ ५३ ॥
|
तत्पुत्र शीघ्रं विधिना विधिज्ञै-
र्वसिष्ठमुख्यैः सहितो द्विजेन्द्रैः ।
सङ्काल्य राजानमदीनसत्त्व-
मात्मानमुर्व्यामभिषेचयस्व ॥ ५४ ॥
|
’म्हणून वत्सा ! आता विधि-विधानाचे ज्ञाते वसिष्ठ आदि प्रमुख ब्राह्मणांसह तू उदार हृदयी महाराजांचा अंत्येष्टि संस्कार करून या पृथ्वीच्या राज्यावर आपला अभिषेक करवून घे.’ ॥ ५४ ॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे द्विसप्ततितमः सर्गः ॥ ७२ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा बहात्तरावा सर्ग पूरा झाला ॥ ७२ ॥
|