दशरथं परिक्रम्य ससीतालक्ष्मणस्य श्रीरामस्य कौसल्याप्रभृतिमातॄः प्रति प्रणामः, सुमित्राया लक्ष्मणं प्रत्युपदेशः, रथ उपविश्य रामादीनां वनं प्रति प्रस्थानं पौरै राज्ञीभिश्च सह दशरथस्य सशोकावस्था -
|
सीता, राम आणि लक्ष्मण यांनी दशरथांची परिक्रमा करून कौसल्या आदिंना प्रणाम करणे, सुमित्रेचा लक्ष्मणास उपदेश, सीतेसहित श्रीराम आणि लक्ष्मण यांचे रथात बसून वनाकडे प्रस्थान, पुरवासी तथा राण्यांसहित महाराज दशरथांची शोकाकुल अवस्था -
|
अथ रामश्च सीता च लक्ष्मणश्च कृताञ्जलिः ।
उपसङ्गृह्य राजानं चक्रुर्दीनाः प्रदक्षिणम् ॥ १ ॥
|
त्यानंतर राम, लक्ष्मण आणि सीतेने हात जोडून दीनभावाने राजा दशरथांच्या चरणांना स्पर्श करून त्यांची दक्षिणावर्त परिक्रमा केली. ॥१॥
|
तं चापि समनुज्ञाप्य धर्मज्ञ सह सीतया ।
राघवः शोकसम्मूढो जननीमभ्यवादयत् ॥ २ ॥
|
त्याचा निरोप घेऊन सीतेसहित धर्मज्ञ राघवांनी मातेचे कष्ट पाहून शोकाने व्याकुळ होऊन तिच्या चरणांना प्रणाम केला. ॥२॥
|
अन्वक्षं लक्ष्मणो भ्रातुः कौसल्यामभ्यवादयत् ।
अथ मातुः सुमित्राया जग्राह चरणौ पुनः ॥ ३ ॥
|
श्रीरामानंतर लक्ष्मणांनीही प्रथम माता कौसल्येला प्रणाम केला, आणि नंतर आपली माता सुमित्रा हिचेही दोन्ही पाय धरले. ॥३॥
|
तं वन्दमानं रुदती माता सौमित्रिमब्रवीत् ।
हितकामा महाबाहुं मूर्ध्न्युपाघ्राय लक्ष्मणम् ॥ ४ ॥
|
आपला पुत्र महाबाहु लक्ष्मण यास प्रणाम करतांना पाहून त्यांचे हित इच्छिणारी माता सुमित्रा हिने पुत्राचे मस्तक हुंगले आणि म्हणाली - ॥४॥
|
सृष्टस्त्वं वनवासाय स्वनुरक्तः सुहृज्जने ।
रामे प्रमादं मा कार्षीः पुत्र भ्रातरि गच्छति ॥ ५ ॥
|
'वत्स ! तू आपल्या सुहृद रामाचा परम अनुरागी आहेस; म्हणून मी तुला वनवासात जाण्यासाठी निरोप देत आहे. आपल्या मोठ्या भावाबरोबर वनांत इकडे तिकडे भ्रमण करते समयी तू त्यांच्या सेवेत कधी प्रमाद करू नको. ॥५॥
|
व्यसनी वा समृद्धो वा गतिरेष तवानघ ।
एष लोके सतां धर्मो यज्ज्येष्ठवशगो भवेत् ॥ ६ ॥
|
'ते संकटात असोत वा समृद्धित असोत, तेच तुझी परम गती आहेत. निष्पाप लक्ष्मणा ! संसारात सत्पुरुषांचा हाच धर्म आहे की सर्वदा आपल्या वडील भावाच्या आज्ञेच्या अधीन राहावे. ॥६॥
|
इदं हि वृत्तमुचितं कुलस्यास्य सनातनम् ।
दानं दीक्षा च यज्ञेषु तनुत्यागो मृधेषु च ॥ ७ ॥
|
'दान देणे, यज्ञात दीक्षा ग्रहण करणे आणि युद्धात शरीर त्यागणे'- हाच या कुळाचा उचित आणि सनातन आचार आहे.' ॥७॥
|
लक्ष्मणं त्वेवमुक्त्वासौ संसिद्धं प्रियराघवम् ।
सुमित्रा गच्छ गच्छेति पुनः पुनरुवाच तम् ॥ ८ ॥
|
आपला पुत्र लक्ष्मण यास असे सांगून सुमित्रेने वनवासासंबंधी निश्चित विचार ठेवणार्या सर्वप्रिय राघवास म्हटले- 'मुला ! जा, जा ! तुझा मार्ग मंगलमय होवो. यानंतर परत ती लक्ष्मणास म्हणाली - ॥८॥
|
रामं दशरथं विद्धि मां विद्धि जनकात्मजाम् ।
अयोध्यामटवीं विद्धि गच्छ तात यथासुखम् ॥ ९ ॥
|
'मुला ! तू श्रीरामांनाच आपले पिता महाराज दशरथ समज आणि जनकनंदिनी सीतेलाच आपली माता सुमित्रा मान आणि वनालाच अयोध्या जाण. आता सुखपूर्वक येथून प्रस्थान कर.' ॥९॥
|
ततः सुमन्त्रः काकुत्स्थं प्राञ्चलिर्वाक्यमब्रवीत् ।
विनीतो विनयज्ञश्च मातलिर्वासवं यथा ॥ १० ॥
|
त्यानंतर ज्याप्रमाणे मातलीने इंद्रास काही सांगावे त्याप्रमाणे विनयाचे ज्ञाते सुमंत्र यांनी काकुत्स्थ रामांना विनयपूर्वक हात जोडून म्हटले- ॥१०॥
|
रथमारोह भद्रं ते राजपुत्र महायशः ।
क्षिप्रं त्वां प्रापयिष्यामि यत्र मां राम वक्ष्यसे ॥ ११ ॥
|
'महायशस्वी राजकुमार श्रीराम ! आपले कल्याण होवो ! आपण या रथावर बसावे. आपण मला जेथे नेण्यास सांगाल त्या स्थानी मी शीघ्र आपणास पोहोचवून देईन. ॥११॥
|
चतुर्दश हि वर्षाणि वस्तव्यानि वने त्वया ।
तान्युपक्रमितव्यानि यानि देव्या प्रचोदितः ॥ १२ ॥
|
'आपल्याला जी चौदा वर्षे वनात राहावयाचे आहे त्यांची गणना आजपासूनच आरंभ झाली पाहिजे कारण देवी कैकेयीने आजच आपणास वनात जाण्यासाठी प्रेरित केले आहे.' ॥१२॥
|
तं रथं सूर्यसङ्काशं सीता हृष्टेन चेतसा ।
आरुरोह वरारोहा कृत्वालङ्कारमात्मनः ॥ १३ ॥
|
तेव्हा सुंदरी सीता आपल्या अंगांवर उत्तम अलंकार धारण करून प्रसन्न चित्ताने त्या सूर्यासमान तेजस्वी रथावर आरूढ झाली. ॥१३॥
|
वनवासं हि सङ्ख्याय वासांस्याभरणानि च ।
भर्तारमनुगच्छन्त्यै सीतायै श्वशुरो ददौ ॥ १४ ॥
|
पतिबरोबर वनात जाणार्या सीतेसाठी तिच्या श्वशुरांनी वनवासाची वर्षसंख्या मोजून त्यास अनुसरून वस्त्रे आणि आभूषणे दिली होती. ॥१४॥
|
तथैवायुधजातानि भ्रातृभ्यां कवचानि च ।
रथोपस्थे प्रतिन्यस्य सचर्म कठिनं च यत् ॥ १५ ॥
|
याप्रकारे महाराजांनी दोन्ही भाऊ श्रीराम आणि लक्ष्मणासाठी ही जी बरीचशी अस्त्रे-शस्त्रे आणि कवचे प्रदान केली होती, त्यांना रथांतील मागील भागात ठेवून त्यांनी चामड्यांनी मढविलेला पेटारा आणि खोरे अथवा कुदळही त्याच्यावर ठेवून दिली. ॥१५॥
|
अथो ज्वलनसङ्काशं चामीकरविभूषितम् ।
तमारुरुहतुस्तूर्णं भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ १६ ॥
|
त्यानंतर ते दोघे भाऊ श्रीराम आणि लक्ष्मण त्या अग्निसमान दीप्तिमान सुवर्णभूषित रथावर शीघ्रच आरूढ झाले. ॥१६॥
|
सीतातृतीयानारूढान् दृष्ट्वा रथमचोदयत् ।
सुमन्त्रः सम्मतानश्वान् वायुवेगसमाञ्जवे ॥ १७ ॥
|
ज्यांच्यात सीतेची संख्या तिसरी होती त्या श्रीराम आदिंना रथावर आरूढ झालेले पाहून सारथी सुमंत्रांनी रथ पुढे चालविला. त्याला जोडलेले वायुसमान वेगवान उत्तम घोड्यांना हाकलले. ॥१७॥
|
प्रयाते तु महारण्यं चिररात्राय राघवे ।
बभूव नगरे मूर्च्छा बलमूर्च्छा जनस्य च ॥ १८ ॥
|
ज्यावेळी सुदीर्घ कालपर्यंत महान वनात जाण्यासाठी राघव निघाले त्या समयी समस्त पुरवासी, सैनिक तसेच (दर्शक) प्रेक्षक म्हणून बाहेरून आलेले लोक सर्वांनाच मूर्च्छा आली. ॥१८॥
|
तत् समाकुलसम्भ्रान्तं मत्तसङ्कुपितद्विपम् ।
हयशिञ्जितनिर्घोषं पुरमासीन्महास्वनम् ॥ १९ ॥
|
त्या समयी सार्या अयोध्येत महान कोलाहल माजला. सर्व लोक व्याकुळ होऊन भयभीत झाले. मदोन्मत्त हत्ती श्रीरामाच्या वियोगाने कुपित झाले ( खवळले) आणि इकडे तिकडे धावणार्या घोड्यांच्या खिंकाळण्याच्या आणि त्यांच्या आभूषणांच्या खणखणाटाचा आवाज सर्व बाजूस निनादू लागला. ॥१९॥
|
ततः सबालवृद्धा सा पुरी परमपीडिता ।
राममेवाभिदुद्राव घर्मार्तः सलिलं यथा ॥ २० ॥
|
अयोध्यापुरीतील सर्व आबालवृद्ध लोक अत्यंत पीडित होऊन उन्हामुळे पीडित झालेले प्राणी ज्याप्रमाणे पाण्याकडे धाव घेऊ लागतात त्याप्रमाणे श्रीरामांच्या मागे घावू लागले. ॥२०॥
|
पार्श्वतः पृष्ठतश्चापि लम्बमानास्तदुन्मुखाः ।
बाष्पपूर्णमुखाः सर्वे तमूचुर्भृशनिःस्वनाः ॥ २१ ॥
|
त्यांतील काही लोक रथाच्या पाठीमागील बाजूस आणि ( अगल-बगल मध्ये) रथाच्या दोन्ही बाजूस लोंबकळू लागले. सर्वच श्रीरामासाठी उत्कंठित होते आणि सर्वांच्या मुखांवरून अश्रूधारा वहात होत्या. ते सर्वच्या सर्व उच्चस्वराने म्हणू लागले- ॥२१॥
|
संयच्छ वाजिनां रश्मीन् सूत याहि शनैः शनैः ।
मुखं द्रक्ष्याम रामस्य दुर्दर्शं नो भविष्यति ॥ २२ ॥
|
'सूत ! घोड्यांचा लगाम खेचा. रथाला हळू हळू घेऊन चला. आम्हांला रामाचे मुख पाहूं दे, कारण आता या मुखाचे दर्शन आमच्यासाठी दुर्लभ होऊन जाईल. ॥२२॥
|
आयसं हृदयं नूनं राममातुरसंशयम् ।
यद् देवगर्भप्रतिमे वनं याति न भिद्यते ॥ २३ ॥
|
'श्रीरामाच्या मातेचे हृदय निश्चितच लोखंडाचे बनलेले आहे यात जराही शंका नाही. म्हणून तर देवकुमारासारख्या तेजस्वी पुत्राला वनात जातांना पाहूनही ते फाटून जात नाही. ॥२३॥
|
कृतकृत्या हि वैदेही छायेवानुगता पतिम् ।
न जहाति रता धर्मे मेरुमर्कप्रभा यथा ॥ २४ ॥
|
'वैदेही सीता कृतार्थ झाली आहे कारण ती पतिव्रता धर्मात तत्पर राहून छायेप्रमाणे आपल्या पतिच्या पाठोपाठ निघून जात आहे. ज्याप्रमाणे सूर्याची प्रभा मेरूपर्वताचा त्याग करीत नाही त्याप्रमाणेच ती (सीता) श्रीरामाची साथ सोडत नाही आहे. ॥२४॥
|
अहो लक्ष्मण सिद्धार्थः सततं प्रियवादिनम् ।
भ्रातरं देवसङ्काशं यस्त्वं परिचरिष्यसि ॥ २५ ॥
|
'अहो लक्ष्मणा ! तुम्हीही कृतार्थ झाला आहात कारण तुम्हीही सदा प्रिय वचन बोलणार्या आपल्या देवतुल्य भावाची वनात राहून सेवा कराल.' ॥२५॥
|
महत्येषा हि ते बुद्धिरेष चाभ्युदयो महान् ।
एष स्वर्गस्य मार्गश्च यदेनमनुगच्छसि ॥ २६ ॥
|
'तुमची बुद्धि विशाल आहे. तुमचा हा फार मोठा अभ्युदय आहे आणि तुमच्यासाठी हा स्वर्गाचाच मार्ग मिळाला आहे; कारण की तुम्ही श्रीरामाचे अनुसरण करत आहात. ॥२६॥
|
एवं वदन्तस्ते सोढुं न शेकुर्बाष्पमागतम् ।
नरास्तमनुगच्छन्ति प्रियमिक्ष्वाकुनन्दनम् ॥ २७ ॥
|
अशा प्रकारच्या गोष्टी करीत असता त्या पुरवासी लोकांना त्यांच्या अनावर अश्रूंचा वेग आवरणे अशक्य झाले होते. ते लोक सर्वांच्या प्रेमपात्र असलेल्या इक्ष्वाकुकुलनंदन श्रीरामांच्या मागे मागे चालत राहिले होते. ॥२७॥
|
अथ राजा वृतः स्त्रीभिर्दीनाभिर्दीनचेतनः ।
निर्जगाम प्रियं पुत्रं द्रक्ष्यामीति ब्रुवन् गृहात् ॥ २८ ॥
|
याच वेळी दयनीय अवस्थेला प्राप्त झालेल्या आपल्या स्त्रियांनी घेरलेले राजा दशरथ अत्यंत दीन होऊन "मी आपल्या प्रिय पुत्र श्रीरामास पाहीन" असे म्हणत महालातून बाहेर निघून आले. ॥२८॥
|
शुश्रुवे चाग्रतः स्त्रीणां रुदन्तीनां महास्वनः ।
यथा नादः करेणूनां बद्धे महति कुञ्जरे ॥ २९ ॥
|
ज्याप्रमाणे मोठ्या हत्तीला, यूथपतिला बद्ध केले असतां हत्तीणींचा चित्कार ऐकू यावा त्याप्रमाणे महाराज दशरथांना आपल्या पुढेच रडणार्या स्त्रियांचा महान आर्तनाद ऐकू आला. ॥२९॥
|
पिता हि राजा काकुत्स्थः श्रीमान् सन्नस्तदा बभौ ।
परिपूर्णः शशी काले ग्रहेणोपप्लुतो यथा ॥ ३० ॥
|
ज्याप्रमाणे पर्वसमयी राहूने ग्रस्त झाल्यावर पूर्ण चंद्रमा श्रीहीन प्रतीत होतो त्याप्रमाणेच त्या समयी श्रीरामांचे पिता काकुत्स्थवंशी श्रीमान राजा दशरथ अत्यंत खिन्न दिसत होते. ॥३०॥
|
स च श्रीमानचिन्त्यात्मा रामो दशरथात्मजः ।
सूतं सञ्चोदयामास त्वरितं वाह्यतामिति ॥ ३१ ॥
|
हे पाहून अचिंत्यस्वरूप दशरथनंदन श्रीमान भगवान रामांनी सुमंत्रास प्रेरणा देत म्हटले - "आपण रथ वेगाने हाकावा." ॥३१॥
|
रामो याहीति तं सूतं तिष्ठेति च जनस्तथा ।
उभयं नाशकत् सूतं कर्तुमध्वनि चोदितः ॥ ३२ ॥
|
एकीकडे श्रीराम सारथ्यांना रथ हाकण्यासाठी सांगत होते तर दुसरी कडे सारा जनसमुदाय त्यांना थांबण्यास सांगत होता त्याप्रकारे द्विधा मनःस्थितीमध्ये सांपडल्याने सारथि सुमंत्र त्या मार्गावर दोन्हीपैकी काहीच करू शकले नाहीत- रथाला वेगाने पुढे ही नेऊ शकले नाहीत अथवा सर्वथा रोखूंही शकले नाहीत. ॥३२॥
|
निर्गच्छति महाबाहौ रामे पौरजनाश्रुभिः ।
पतितैरभ्यवहितं प्रणनाश महीरजः ॥ ३३ ॥
|
महाबाहु श्रीराम जेव्हा नगरांतून बाहेर पडले त्यासमयी पुरवासी लोकांच्या नेत्रांतून गळणार्या अश्रूंच्या द्वारा भिजल्यामुळे धरतीवरील उडणारी धूळ शांत होऊन गेली. ॥३३॥
|
रुदिताश्रुपरिद्यूनं हाहाकृतमचेतनम् ।
प्रयाणे राघवस्यासीत् पुरं परमपीडितम् ॥ ३४ ॥
|
राघवांनी ज्यावेळी प्रस्थान केले त्यावेळी सर्व नगर अत्यंत पीडित होऊन गेले. सर्वच रडू लागले आणि अश्रू ढाळू लागले, तथा सर्व जण हाहाकार करता करता निश्चेष्ट झाले. ॥३४॥
|
सुस्राव नयनैः स्त्रीणामस्रमायाससम्भवम् ।
मीनसङ्क्षोभचलितैः सलिलं पङ्कजैरिव ॥ ३५ ॥
|
ज्याप्रमाणे तलावांतील उमललेल्या कमलांच्या द्वारे माशांच्या उड्या मारण्या मुळे हलले जाऊन जलकणांची वृष्टी होऊ लागते त्याप्रमाणे (पुरवासी) स्त्रियांचा नेत्रांतून खेदामुळे अश्रू झरत होते. ॥३५॥
|
दृष्ट्वा तु नृपतिः श्रीमानेकचित्तगतं पुरम् ।
निपपातैव दुःखेन कृत्तमूल इव द्रुमः ॥ ३६ ॥
|
श्रीमान् राजा दशरथ सार्या अयोध्यापुरीतील लोकांना एकसारखेच व्याकुळचित्त पाहून अत्यंत दुःखामुळे मूळापासून उखडून टाकलेल्या वृक्षाप्रमाणे (धाडकन) जमिनीवर कोसळले. ॥३६॥
|
ततो हलहलाशब्दो जज्ञे रामस्य पृष्ठतः ।
नराणां प्रेक्ष्य राजानं सीदन्तं भृशदुःखितम् ॥ ३७ ॥
|
त्यासमयी राजांना अत्यंत दुःखात मग्न होऊन कष्ट सोसतांना पाहून श्रीरामांच्या पाठोपाठ जाणार्या मनुष्यांमध्ये महान कोलाहल प्रकट झाला. ॥३७॥
|
हा रामेति जनाः केचिद् राममातेति चापरे ।
अन्तःपुरसमृद्धं च क्रोशन्तः पर्यदेवयन् ॥ ३८ ॥
|
अंतःपुरातील राण्यांसह राजा दशरथांना उच्च स्वरात विलाप करतांना पाहून कोणी 'हा राम !' असे म्हणून तर कोणी ' हा राममाता !' असा आक्रोश करून करूण क्रंदन करू लागले. ॥३८॥
|
अन्वीक्षमाणो रामस्तु विषण्णं भ्रान्तचेतसम् ।
राजानं मातरं चैव ददर्शानुगतौ पथि ॥ ३९ ॥
|
त्या समयी श्रीरामांनी मागे वळून पाहिले तेव्हा त्यांना विषादग्रस्त आणि भ्रांतचित्त पिता राजा दशरथ आणि दुखात बुडलेली माता कौसल्या दोघे ही मार्गावर आपल्या पाठोपाठ येतांना दिसले. ॥३९॥
|
स बद्ध इव पाशेन किशोरो मातरं यथा ।
धर्मपाशेन संयुक्तः प्रकाशं नाभ्युदैक्षत ॥ ४० ॥
|
ज्याप्रमाणे दोरीने बांधून घातलेले घोड्यांचे शिंगरू आपल्या मातेला पाहू शकत नाही त्याप्रमाणे धर्मपाशाने बांधले गेलेले राम आपल्या मातेला स्पष्ट रूपाने पाहू शकले नाहीत. ॥४०॥
|
पदातिनौ च यानार्हावदुःखार्हौ सुखोचितौ ।
दृष्ट्वा सञ्चोदयामास शीघ्रं याहीति सारथिम् ॥ ४१ ॥
|
जे वाहनांवर स्वार होण्यासच योग्य होते, दुःख भोगण्यास अयोग्य आणि सुख भोगण्यासच योग्य होते अशा माता-पित्यांना पायीच आपल्या मागोमाग येतांना पाहून श्रीरामांनी सारथ्याला शीघ्र रथ हाकण्याविषयी प्रेरित केले. ॥४१॥
|
न हि तत् पुरुषव्याघ्रो दुःखजं दर्शनं पितुः ।
मातुश्च सहितुं शक्तस्तोत्त्रैर्नुन्न इव द्विपः ॥ ४२ ॥
|
ज्या प्रमाणे अंकुशाने पीडीत केला गेलेला गजराज ते कष्ट सहन करू शकत नाही, त्याप्रकारे पुरुषसिंह श्रीरामांना माता-पित्याला अशा दुःखी अवस्थेत पहाणे असह्य होऊन गेले. ॥४२॥
|
प्रत्यगारमिवायान्ती वत्सला वत्सकारणात् ।
बद्धवत्सा यथा धेनू राममाताभ्यधावत ॥ ४३ ॥
|
जशी बांधून घातलेल्या वासराची सवत्सा गाय संध्याकाळी घरी परतताना वासराच्या स्नेहामुळे धावत त्याच्याजवळ येते त्याप्रमाणे राममाता कौसल्या त्यांच्याकडे जणु धावत येऊ पहात होती. ॥४२॥
|
तथा रुदन्तीं कौसल्यां रथं तमनुधावतीम् ।
क्रोशन्तीं राम रामेति हा सीते लक्ष्मणेति च ॥ ४४ ॥
रामलक्ष्मणसीतार्थं स्रवन्तीं वारि नेत्रजम् ।
असकृत् प्रैक्षत स तां नृत्यन्तीमिव मातरम् ॥ ४५ ॥
|
'हा राम ! हा राम ! हा सीते ! हा लक्ष्मण ! असा घोष करीत असलेली आणि रडत असलेली कौसल्या त्या रथाच्या मागे धावत येत होती. ती राम, लक्ष्मण, सीतेसाठी नेत्रातून अश्रू ढाळीत होती आणि इकडे तिकडे चकरा मारीत जणू डोलत राहिली होती. या अवस्थेत माता कौसल्येला श्रीरामांनी वारंवार पाहिले. ॥४४-४५॥
|
तिष्ठेति राजा चुक्रोश याहि याहीति राघवः ।
सुमन्त्रस्य बभूवात्मा चक्रयोरिव चान्तरा ॥ ४६ ॥
|
राजा दशरथ ओरडून म्हणत होते की - 'सुमंत्र ! थांब !' परंतु राघव म्हणत होते -' पुढे चला ! लवकर पुढे चला !' या दोन प्रकारच्या आदेशांमध्ये सांपडलेले बिचारे सुमंत्रांचे मन त्या समयी दोन चाकांच्या मध्ये फसलेल्या मनुष्यासारखे झाले होते. ॥४६॥
|
नाश्रौषमिति राजानमुपालब्धोऽपि वक्ष्यसि ।
चिरं दुःखस्य पापिष्ठमिति रामस्तमब्रवीत् ॥ ४७ ॥
|
त्या समयी श्रीरामांनी सुमंत्रांस म्हटले - 'येथे अधिक विलंब करणे माझ्यासाठी आणि पित्यासाठी ही दुःखाचेच नव्हे तर महान दुःखाचे कारण ठरेल, म्हणून रथ पुढे न्यावा. परत गेल्यावर राजांनी तक्रार केली तर सांगा की मी आपले म्हणणे ऐकले नाही.' ॥४७॥
|
रामस्य स वचः कुर्वन्ननुज्ञाप्य च तं जनम् ।
व्रजतोऽपि हयाञ्शीघ्रं चोदयामास सारथिः ॥ ४८ ॥
|
शेवटी श्रीरामांच्याच आदेशाचे पालन करीत सारथ्यांनी मागून येण्यार्या लोकांकडून जाण्याची आज्ञा घेतली आणि स्वतः ही चालणार्या घोड्यांनाही तीव्र गतिने चलण्यासाठी हांकलले. ॥४८॥
|
न्यवर्तत जनो राज्ञो रामं कृत्वा प्रदक्षिणम् ।
मनसाप्याशुवेगेन न न्यवर्तत मानुषम् ॥ ४९ ॥
|
राजा दशरथांच्या बरोबर येणारे लोक मनातल्या मनात श्रीरामाची परिक्रमा करून केवळ शरीराने परतले. (मनाने नाही.) कारण ते मन त्या रथापेक्षाही तीव्रगामी होते. दुसर्या मनुष्यांचा समुदाय मन आणि शरीर दोन्हीनी ही परतला नाही. ( ते सर्व लोक श्रीरामांच्या पाठोपाठ धावत निघून गेले. ॥४९॥
|
यमिच्छेत् पुनरायातं नैनं दूरमनुव्रजेत् ।
इत्यमात्या महाराजमूचुर्दशरथं वचः ॥ ५० ॥
|
इकडे मंत्र्यांनी महाराज दशरथांना म्हटले - 'राजन ! ज्याच्यासाठी अशी इच्छा केली जाते की त्याने शीघ्र परतून यावे त्याच्या पाठोपाठ दूरपर्यंत जाता कामा नये.' ॥५०॥
|
तेषां वचः सर्वगुणोपपन्नः
प्रस्विन्नगात्रः प्रविषण्णरूपः ।
निशम्य राजा कृपणः सभार्यो
व्यवस्थितस्तं सुतमीक्षमाणः ॥ ५१ ॥
|
सर्वगुण संपन्न दशरथांचे शरीर घामांनी चिंब भिजून गेले होते ( घाम निथळत होता.) ते विषादाचे मूर्तिमंत स्वरूप भासत होते. आपल्या मंत्र्यांची उपर्युक्त गोष्ट ऐकून ते तेथल्या तेथेच उभे राहिले आणि राण्यांसहित अत्यंत दीनभावाने पुत्राकडे पाहू लागले. ॥५१॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे चत्वारिंशस्सर्गः ॥ ४० ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा चाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४०॥
|