कुम्भकर्णकर्तृकं घोरं युद्धं, श्रीरामेण तस्य वधश्च -
|
कुंभकर्णाचे भयंकर युद्ध आणि श्रीरामांच्या हाताने त्याचा वध -
|
ते निवृत्ता महाकायाः श्रुत्वाऽङ्गदवचस्तदा । नैष्ठिकीं बुद्धिमाद्थाय सर्वे संग्रामकाङ्क्षिणः ॥ १ ॥
|
अंगदाचे पूर्वोक्त वचन ऐकून ते सर्व विशालकाय वानर मरणे - मारण्याचा निश्चय करून युद्धाच्या इच्छेने परत फिरले होते. ॥१॥
|
समुदीरितवीर्यास्ते समारोपितविक्रमाः । पर्यवस्थापिता वाक्यैः अंगदेन बलीयसा ॥ २ ॥
|
महाबली अंगदांनी त्यांच्या पूर्व पराक्रमांचे वर्णन करून आपल्या वचनांच्या द्वारा त्यांना सुदृढ आणि बल-विक्रम संपन्न बनवून उभे केले होते. ॥२॥
|
प्रयाताश्च गता हर्षं मरणे कृतनिश्चयाः । चक्रुः सुतुमुलं युद्धं वानरास्त्यक्तजीविताः ॥ ३ ॥
|
आता ते मरण्याचा निश्चय करून मोठ्या हर्षाने पुढे निघाले आणि जीवनाचा मोह सोडून अत्यंत भयंकर युद्ध करू लागले. ॥३॥
|
अथ वृक्षान् महाकायाः सानूनि सुमहान्ति च । वानरास्तूर्णमुद्यम्य कुंभकर्णमभिद्रवन् ॥ ४ ॥
|
त्या विशालकाय वानर-वीरांनी वृक्ष तसेच मोठमोठी पर्वत शिखरे घेऊन तात्काळच कुंभकर्णावर हल्ला केला. ॥४॥
|
कुंभकर्णः सुसंक्रुद्धो गदामुद्यम्य वीर्यवान् । धर्षयन् सुमहाकायः समन्ताद् व्यक्षिपद् रिपून् ॥ ५ ॥
|
परंतु अत्यंत क्रोधाविष्ट झालेल्या विक्रमशाली महाकाय कुंभकर्णानी गदा उचलून शत्रूंना घायाळ करून त्यांना चोहोबाजूस विखरून टाकले. ॥५॥
|
शतानि सप्त चाष्टौ च सहस्राणि च वानराः । प्रकीर्णाः शेरते भूमौ कुंभकर्णेन ताडिताः ॥ ६ ॥
|
कुंभकर्णाचा मार खाऊन आठ हजार सातशे वानर तात्काळ धराशायी झाले. ॥६॥
|
षोडशाष्टौ च दश च विंशत् त्रिंशत् तथैव च । परिक्षिप्य च बाहुभ्यां खादन् स परिधावति । भक्षयन् भृशसंक्रुद्धो गरुडः पन्नगानिव ॥ ७ ॥
|
तो सोळा, आठ, दहा, वीस आणि तीस-तीस वानरांना आपल्या दोन्ही भुजात पकडून घेत होता आणि गरूड जसा सर्पांना खातो, त्याप्रकारे अत्यंत क्रोधपूर्वक त्यांना भक्षण करीत सर्वत्र धावत - फिरत होता. ॥७॥
|
कृच्छ्रेण च समाश्वस्ताः सङ्गम्य च ततस्ततः । वृक्षाद्रिहस्ता हरयः तस्थुः संग्राममूर्धनि ॥ ८ ॥
|
त्यासमयी वानर मोठ्या कष्टाने धैर्य धारण करून इकडून - तिकडून एकत्र झाले आणि वृक्ष तसेच पर्वत शिखरे हातात घेऊन संग्रामभूमी मध्ये खिळून राहिले. ॥८॥
|
ततः पर्वतमुत्पाट्य द्विविदः प्लवगर्षभः । दुद्राव गिरिशृङ्गाभं विलम्ब इव तोयदः ॥ ९ ॥
|
तत्पश्चात् मेघासमान विशाल शरीराच्या वानरश्रेष्ठ द्विविदाने एक पर्वत उपटून पर्वत शिखराप्रमाणे उंच कुंभकर्णावर आक्रमण केले. ॥९॥
|
तं समुत्पत्य चिक्षेप कुंभकर्णस्य वानरः । तमप्राप्तो महाकायं तस्य सैन्येऽपतत् ततः ॥ १० ॥
|
त्या पर्वताला उखडून द्विविदाने कुंभकर्णावर फेकला, परंतु तो त्या विशालकाय राक्षसापर्यंत न पोहोचता त्याच्या सेनेत जाऊन पडला. ॥१०॥
|
ममर्दाश्वान् गजांश्चापि रथांश्चापि गजोत्तमान् । तानि चान्यानि रक्षांसि एवं चान्यद्गिरेः शिरः ॥ ११ ॥
|
त्या पर्वतशिखराने राक्षससेनेतील कित्येक घोडे, हत्ती, रथ, गजराज आणि दुसर्या इतर राक्षसांनाही चिरडून टाकले. ॥११॥
|
तच्छैलवेगाभिहतं हताश्वं हतसारथिम् । रक्षसां रुधिरक्लिन्नं बभूवायोधनं महत् ॥ १२ ॥
|
त्या समयी ते महान् युद्धस्थळ, ज्यामध्ये शैल-शिखराच्या वेगाने कित्येक घोडे आणि सारथि चिरडून गेले होते, राक्षसांच्या रक्ताने भिजून गेले होते. ॥१२॥
|
रथिनो वानरेन्द्राणां शरैः कालान्तकोपमैः । शिरांसि नर्दतां जह्रुः सहसा भीमनिःस्वनाः ॥ १३ ॥
|
तेव्हा भयानक सिंहनाद करणार्या राक्षस सेनेच्या रथींनी प्रलयकालीन यमराजासमान भयंकर बाणांनी गर्जना करत वानर-यूथपतिंची मस्तके कापून टाकण्यास एकाएकी आरंभ केला. ॥१३॥
|
वानराश्च महात्मानः समुत्पाट्य महाद्रुमान् । रथानश्वान् गजानुष्ट्रान् राक्षसानभ्यसूदयन् ॥ १४ ॥
|
महामनस्वी वानरही मोठ मोठी झाडे उपटून शत्रुसैन्याच्या रथ, घोडे, हत्ती, ऊंट आणि राक्षसांचा संहार करू लागले. ॥१४॥
|
हनुमान् शैलशृङ्गाणि शिलाश्च विविधान् द्रुमान् । ववर्ष कुंभकर्णस्य शिरस्यम्बरमास्थितः ॥ १५ ॥
|
हनुमान आकाशात पोहोचून कुंभकर्णाच्या मस्तकावर पर्वत-शिखरे, शिला आणि नाना प्रकारच्या वृक्षांची वृष्टि करू लागले. ॥१५॥
|
तानि पर्वतशृङ्गाणि शूलेन स बिभेद ह । बभञ्ज वृक्षवर्षं च कुंभकर्णो महाबलः ॥ १६ ॥
|
परंतु महाबलाढ्य कुंभकर्णाने आपल्या शूलाने त्या पर्वतशिखरांना फोडून टाकले आणि फेकले जाणार्या वृक्षांचेही तुकडे तुकडे करून टाकले. ॥१६॥
|
ततो हरीणां तदनीकमुग्रं दुद्राव शूलं निशितं प्रगृह्य । तस्थौ ततोऽस्यापततः पुरस्तान् महीधराग्रं हनुमान् प्रगृह्य ॥ १७ ॥
|
तत्पश्चात् त्याने आपला तीक्ष्ण शूल हातात घेऊन वानरांच्या त्या भयंकर सेनेवर आक्रमण केले. हे पाहून हनुमान् एक पर्वत शिखर हातात घेऊन त्या आक्रमणकारी राक्षसाचा सामना करण्यासाठी उभे राहिले. ॥१७॥
|
स कुंभकर्णं कुपितो जघान वेगेन शैलोत्तमभीमकायम् । संचुक्षुभे तेन तदाभिभूतो मेदार्द्रगात्रो रुधिरावसिक्तः ॥ १८ ॥
|
त्यांनी कुपित होऊन श्रेष्ठ पर्वतासमान भयानक शरीराच्या कुंभकर्णावर मोठ्या वेगाने प्रहार केला. त्यांच्या त्या आघाताने कुंभकर्ण व्याकुळ झाला. त्याचे सारे शरीर चर्बीने ओले झाले आणि तो रक्ताने न्हाऊन निघाला. ॥१८॥
|
स शूलमाविध्य तडित्प्रकाशं गिरिं यथा प्रज्वलिताग्निशृंगम् । बाह्वन्तरे मारुतिमाजघान गुहोऽचलं क्रौञ्चमिवोग्रशक्त्या ॥ १९ ॥
|
मग तर त्याने वीजेप्रमाणे चमकणार्या शूलाला गोल फिरवून ज्याच्या शिखरावर आग जळत असावी अशा पर्वतासमान असलेल्या हनुमानाच्या छातीमध्ये, ज्याप्रमाणे स्वामी कार्तिकेयाने आपल्या भयानक शक्तीने क्रौंच पर्वतावर आघात केला होता, त्याप्रमाणे आघात केला. ॥१९॥
|
स शूलनिर्भिन्नमहाभूजान्तरः प्रविह्वलः शोणितमुद्वमन् मुखात् । ननाद भीमं हनुमान् महाहवे युगान्तमेघस्तनितस्वनोपमम् ॥ २० ॥
|
त्या महासमरात शूलाच्या आघाताने हनुमानाच्या दोन्ही भुजांच्या मधला भाग (वक्षः स्थळ) विदीर्ण झाले. ते व्याकुळ झाले आणि तोंडातून रक्त ओकू लागले. त्यासमयी पीडेमुळे त्यांनी फार भयानक आर्तनाद केला, जो प्रलयकाळच्या मेघांच्या गर्जनेप्रमाणे भासत होता. ॥२०॥
|
ततो विनेदुः सहसा प्रहृष्टा रक्षोगणास्तं व्यथितं समीक्ष्य । प्लवंगमास्तु व्यथिता भयार्ताः प्रदुद्रुवुः संयति कुंभकर्णात् ॥ २१ ॥
|
हनुमानांना आघाताने पीडित झालेले पाहून राक्षसांच्या हर्षाला सीमा राहिली नाही. ते एकाएकी जोरजोराने कोलाहल करू लागले. इकडे कुंभकर्णाच्या भयाने पीडित आणि व्यथित होऊन वानर युद्धभूमी सोडून पळू लागले. ॥२१॥
|
ततस्तु नीलो बलवान् पर्यवस्थापयन् बलम् । प्रविचिक्षेप शैलाग्रं कुंभकर्णाय धीमते ॥ २२ ॥
|
हे पाहून बलवान् नीलाने वानरसेनेला धीर देण्यासाठी आणि सुस्थिर ठेवण्यासाठी बुद्धिमान् कुंभकर्णावर एका पर्वताचे शिखर फेकले. ॥२२॥
|
तदापतन्तं संप्रेक्ष्य मुष्टिनाऽभिजघान ह । मुष्टिप्रहाराभिहतं तच्छैलाग्रं व्यशीर्यत । सविस्फुलिङ्गं सज्वालं निपपात महीतले ॥ २३ ॥
|
ते पर्वतशिखर आपल्याकडे येताना पाहून कुंभकर्णाने त्याच्यावर मुष्टिप्रहार केला. ती मूठ लागताच त्या शिखराचा चुराडा होऊन विखरून गेला आणि आगीच्या ठिणग्या तसेच ज्वाला निघत असताना पृथ्वीवर पडला. ॥२३॥
|
ऋषभः शरभो नीलो गवाक्षो गन्धमादनः । पञ्च वानरशार्दूलाः कुंभकर्णमुपाद्रवन् ॥ २४ ॥
|
यानंतर ऋषभ, शरभ, नील, गवाक्ष आणि गंधमादन - या पाच प्रमुख वानरवीरांनी कुंभकर्णावर हल्ला केला. ॥२४॥
|
शैलैर्वृक्षैस्तलैः पादैः मुष्टिभिश्च महाबलाः । कुंभकर्णं महाकायं निजघ्नुः सर्वतो युधि ॥ २५ ॥
|
त्या महाबलाढ्य वीरांनी चारी बाजूंनी घेरून युद्धस्थळावर महाकाय कुंभकर्णाला पर्वत, वृक्ष, थपडा, लाथा आणि बुक्क्यांनी मारू लागले. ॥२५॥
|
स्पर्शानिव प्रहारांस्तान् वेदयानो न विव्यथे । ऋषभं तु महावेगं बाहुभ्यां परिषस्वजे ॥ २६ ॥
|
जरी ते लोक फार जोरजोराने प्रहार करत होते, तरीही त्याला असे वाटत होते जणु कोणी हळूच स्पर्श करीत आहे. म्हणून त्यांच्या माराने त्याला जराही पीडा झाली नाही. त्याने महान् वेगवान् ऋषभाला आपल्या दोन्ही भुजांमध्ये पकडले. ॥२६॥
|
कुंभकर्णभुजाभ्यां तु पीडितो वानरर्षभः । निपपातर्षभो भीमः प्रमुखागतशोणितः ॥ २७ ॥
|
कुंभकर्णाच्या दोन्ही भुजांनी दबल्याने पीडित होऊन भयंकर वानरश्रेष्ठ ऋषभाच्या मुखातून रक्त निघू लागले आणि ते पृथ्वीवर पडले. ॥२७॥
|
मुष्टिना शरभं हत्वा जानुना नीलमाहवे । आजघान गवाक्षं तु तलेनेन्द्ररिपुस्तदा । पादेनाभ्यहनत् क्रुद्धः तरसा गन्धमादनम् ॥ २८ ॥
|
त्यानंतर त्या समरभूमीमध्ये इंद्रद्रोही कुंभकर्णाने शरभाला बुक्क्यांनी मारून, नीलाला गुडघ्यांनी रगडले आणि गवाक्षाला थपडांनी मारले. नंतर क्रोधाविष्ट होऊन त्याने गंधमादनाला मोठ्या वेगाने लाथ मारली. ॥२८॥
|
दत्तप्रहारव्यथिता मुमुहुः शोणितोक्षिताः । निपेतुस्ते तु मेदिन्यां निकृत्ता इव किंशुकाः ॥ २९ ॥
|
त्याच्या प्रहाराने व्यथित होऊन वानर मूर्छित झाले आणि रक्ताने न्हाऊन निघाले. नंतर तोडलेल्या पळसाच्या झाडाप्रमाणे पृथ्वीवर कोसळले. ॥२९॥
|
तेषु वानरमुख्येषु पतितेषु महात्मसु । वानराणां सहस्राणि कुंभकर्णं प्रदुद्रुवुः ॥ ३० ॥
|
ते महामनस्वी प्रमुख वानर धराशायी झाल्यावर हजारो वानर एकदमच कूंभकर्णावर तुटून पडले. ॥३०॥
|
तं शैलमिव शैलाभाः सर्वे ते प्लवगर्षभाः । समारुह्य समुत्पत्य ददंशुश्च महाबलाः ॥ ३१ ॥
|
पर्वतासमान प्रतीत होणारे समस्त महाबलाढ्य वानर-यूथपति त्या पर्वताकार राक्षसाच्या अंगावर चढून गेले आणि उड्या मारमारून त्याला दातांनी चावू लागले. ॥३१॥
|
तं नखैर्दशनैश्चापि मुष्टिभिर्बाहुभिस्तथा । कुंभकर्णं महाकायं निजघ्नुः प्लवगर्षभाः ॥ ३२ ॥
|
ते वानरशिरोमणी नखे, दात, बुक्के आणि हातांनी महाबाहु कुंभकर्णाला मारू लागले. ॥३२॥
|
स वानरसहस्रैद्तु विचितः पर्वतोपमः । रराज राक्षसव्याघ्रो गिरिरात्मरुहैरिव ॥ ३३ ॥
|
ज्याप्रमाणे पर्वत आपल्यावर उगविलेल्या वृक्षांनी सुशोभित होतो, त्याच प्रकारे हजारो वानरांनी व्याप्त झालेला तो पर्वताकार राक्षसवीर अद्भुत शोभा प्राप्त करू लागला. ॥३३॥
|
बाहुभ्यां वानरान् सर्वान् प्रगृह्य स महाबलः । भक्षयामास संक्रुद्धो गरुडः पन्नगानिव ॥ ३४ ॥
|
जसा गरूड सर्पांना आपला आहार बनवतात, त्याच प्रकारे अत्यंत कुपित झालेला तो महाबली राक्षस समस्त वानरांना दोन्ही हातांनी पकडून पकडून भक्षण करू लागला. ॥३४॥
|
प्रक्षिप्ताः कुंभकर्णेन वक्त्रे पातालसंनिभे । नासापुटाभ्यां संजग्मुः कर्णाभ्यां चैव वानराः ॥ ३५ ॥
|
कुंभकर्ण आपल्या पाताळासारख्या मुखात वानरांना टाकत होता आणि ते त्याच्या कानांतून आणि नाकांच्या रस्त्याने बाहेर निघून जात होते. ॥३५॥
|
भक्षयन् भृशसंक्रुद्धो हरीन् पर्वतसंनिभः । बभञ्ज वानरान् सर्वान् संक्रुद्धो राक्षसोत्तमः ॥ ३६ ॥
|
अत्यंत क्रोधाविष्ट होऊन वानरांना भक्षण करत असता पर्वताप्रमाणे विशालकाय त्या राक्षसराजाने समस्त वानरांची अंगे भंग करून टाकली. ॥३६॥
|
मांसशोणितसङ्क्लेदां कुर्वन् भूमिं स राक्षसः । चचार हरिसैन्येषु कालाग्निरिव मूर्च्छितः ॥ ३७ ॥
|
रणभूमीमध्ये रक्त आणि मांसाचा चिखल माजवीत तो राक्षस वाढलेल्या प्रलयाग्नी समान वानरसेनेमध्ये विचरण करू लागला. ॥३७॥
|
वज्रहस्तो यथा शक्रः पाशहस्त इवान्तकः । शूलहस्तो बभौ संख्ये कुंभकर्णो महाबलः ॥ ३८ ॥
|
शूल हातात घेऊन संग्रामभूमीत विचरणारा महाबली कुंभकर्ण वज्रधारी इंद्र आणि पाशधारी यमराजाप्रमाणे भासत होता. ॥३८॥
|
यथा शुष्काण्यरण्यानि ग्रीष्मे दहति पावकः । तथा वानरसैन्यानि कुंभकर्णो ददाह सः ॥ ३९ ॥
|
ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतुमध्ये दावानल वाढलेल्या जंगलांना जाळून टाकतो त्याच प्रकारे कुंभकर्ण वानरसेनेला दग्ध करू लागला. ॥३९॥
|
ततस्ते वध्यमानास्तु हतयूथा प्लवंगमाः ॥ वानरा भयसंविग्ना विनेदुर्विकृतैः स्वरैः ॥ ४० ॥
|
ज्यांचे यूथच्या यूथ नष्ट झालेले होते ते वानर कुंभकर्णाचा मार खाऊन भयाने उद्विग्न झाले आणि विकृत स्वरात चीत्कार करू लागले. ॥४०॥
|
अनेकशो वध्यमानाः कुंभकर्णेन वानराः । राघवं शरणं जग्मुः व्यथिताः खिन्नचेतसः ॥ ४१ ॥
|
कुंभकर्णाच्या हातून मार खाल्लेले बरेचसे वानर, ज्यांचे हृदय भग्न झालेले होते, व्यथित होऊन राघवांना शरण आले. ॥४१॥
|
प्रभग्नान् वानरान् दृष्ट्वा वज्रहस्तात्मजात्मजः । अभ्यधावत वेगेन कुंभकर्णं महाहवे ॥ ४२ ॥
|
वानरांना पळतांना पाहून वालिकुमार अंगद त्या महासमरात कुंभकर्णाकडे मोठ्या वेगाने धावले. ॥४२॥
|
शैलशृङ्गं महद् गृह्य विनदंश्च मुहुर्मुहुः । त्रासयन् राक्षसान् सर्वान् कुंभकर्णपदानुगान् ॥ ४३ ॥
चिक्षेप शैलशिखरं कुंभकर्णस्य मूर्धनि ।
|
त्यांनी वारंवार गर्जना करून एक विशाल शैल शिखर हातात घेतले आणि कुंभकर्णाच्या पाठीमागे चालणार्या समस्त राक्षसांना भयभीत करत त्या पर्वतशिखराला त्याच्या मस्तकावर मारले. ॥४३ १/२॥
|
स तेनाभिहतो मूर्ध्नि शैलेनेन्द्ररिपुस्तदा ॥ ४४ ॥
कुंभकर्णः प्रजज्वाल कोपेन महता तदा । सोऽभ्यधावत वेगेन वालिपुत्रममर्षणः ॥ ४५ ॥
|
मस्तकावर त्या पर्वत शिखराचा प्रहार खाऊन इंद्रद्रोही कुंभकर्ण त्या समयी महान् क्रोधाने जळू लागला आणि त्या प्रहाराला सहन न करू शकल्याने मोठ्या वेगाने वालिपुत्राकडे धावला. ॥४४-४५॥
|
कुंभकर्णो महानादः त्रासयन् सर्ववानरान् । शूलं ससर्ज वै रोषाद् अंगदे स महावलः ॥ ४६ ॥
|
फार मोठ्याने गर्जना करणार्या महाबली कुंभकर्णाने समस्त वानरांना संत्रस्त करत अंगदावर मोठ्या रोषाने शूलाचा प्रहार केला. ॥४६॥
|
तदापतन्तं बलवान् युद्धमार्गविशारदः । लाघवान्मोक्षयामास बलवान् वानरर्षभः ॥ ४७ ॥
|
परंतु युद्धमार्गाचा ज्ञाता बलवान् वानरश्रेष्ठ अंगदाने चपलतेने बाजूला सरकून आपल्याकडे येणार्या त्या शूलापासून स्वतःला वाचविले. ॥४७॥
|
उत्पत्य चैनं तरसा तलेनोरस्यताडयत् । स तेनाभिहतः कोपात् प्रमुमोहाचलोपमः ॥ ४८ ॥
|
त्याच बरोबर मोठ्या वेगाने उडी मारून त्यांनी त्याच्या छातीवर एक थप्पड मारली. क्रोधाविष्ट होऊन मारलेल्या त्या थपडेचा मार खाऊन तो पर्वताकार राक्षस मूर्छित झाला. ॥४८॥
|
स लब्धसंज्ञोऽतिबलो मुष्टिं संगृह्य राक्षसः । अपहस्तेन चिक्षेप विसंज्ञः स पपात ह ॥ ४९ ॥
|
थोड्या वेळाने जेव्हा तो शुद्धिवर आला तेव्हा त्या अत्यंत बलशाली राक्षसाने डाव्या हाताची मूठ वळून अंगदांवर प्रहार केला ज्यामुळे ते अचेत होऊन पृथ्वीवर पडले. ॥४९॥
|
तस्मिन् प्लवगशार्दूले विसंज्ञे पतिते भुवि । तच्छूलं समुपादाय सुग्रीवमभिदुद्रुवे ॥ ५० ॥
|
वानरप्रवर अंगद अचेत आणि धराशायी झाल्यावर कुंभकर्ण तोच शूल घेऊन सुग्रीवाकडे धावला. ॥५०॥
|
तमापतन्तं संप्रेक्ष्य कुंभकर्णं महाबलम् । उत्पपात तदा वीरः सुग्रीवो वानराधिपः ॥ ५१ ॥
|
महाबली कुंभकर्णाला आपल्याकडे येतांना पाहून वीर वानरराज सुग्रीवांनी तात्काळ वरच्या बाजूस उडी मारली. ॥५१॥
|
स पर्वताग्रमुत्क्षिप्य समाविध्य महाकपिः । अभिदुद्राव वेगेन कुंभकर्णं महाबलम् ॥ ५२ ॥
|
महाकपि सुग्रीवांनी एक पर्वत शिखर उचलले आणि ते गोलगोल फिरवून महाबली कुंभकर्णावर वेगपूर्वक हल्ला केला. ॥५२॥
|
तमापतन्तं संप्रेक्ष्य कुंभकर्णः प्लवंगमम् । तस्थौ विवृत्तसर्वाङ्गो वानरेन्द्रस्य सम्मुखः ॥ ५३ ॥
|
वानर सुग्रीवांना आक्रमण करताना पाहून कुंभकर्ण आपल्या सार्या अंगांना पसरवून त्या वानरराजाच्या समोर उभा राहिला. ॥५३॥
|
कपिशोणितदिग्धाङ्गं भक्षयन्तं महाकपीन् । कुंभकर्णं स्थितं दृष्ट्वा सुग्रीवो वाक्यमब्रवीत् ॥ ५४ ॥
|
कुंभकर्णाचे सारे शरीर वानरांच्या रक्ताने न्हाऊन निघाले होते. तो मोठ-मोठ्या वानरांना खात खात त्यांच्या समोर उभा होता. त्याला पाहून सुग्रीवाने म्हटले- ॥५४॥
|
पातिताश्च त्वया वीराः कृतं कर्म सुदुष्करम् । भक्षितानि च सैन्यानि प्राप्तं ते परमं यशः ॥ ५५ ॥
त्यज तद् वानरानीकं प्राकृतैः किं करिष्यसि । सहस्वैकं निपातं मे पर्वतस्यास्य राक्षस ॥ ५६ ॥
|
राक्षसा ! तू बर्याचशा वीरांना मारले आहेस, अत्यंत दुष्कर कर्म करून दाखविले आहेस आणि कित्येक सैनिकांना आपला आहार बनविले आहेस. यामुळे तुला शौर्याचे महान् यश प्राप्त झाले आहे. आता या वानरांच्या सेनेला सोडून दे. या साधारण वानरांशी लढून काय करशील ? जर शक्ति असेल तर मी फेकलेल्या या पर्वताचा एकच आघात सहन कर. ॥५५-५६॥
|
तद् वाक्यं हरिराजस्य सत्त्वधैर्यसमन्वितम् । श्रुत्वा राक्षसशार्दूलः कुंभकर्णोऽब्रवीद् वचः ॥ ५७ ॥
|
वानरराजाचे हे सत्त्व आणि धैर्याने युक्त बोलणे ऐकून राक्षसप्रवर कुंभकर्ण म्हणाला - ॥५७॥
|
प्रजापतेस्तु पौत्रस्त्वं तथैवर्क्षरजःसुतः । श्रुतपौरुषसंपन्नः तस्माद् गर्जसि वानर ॥ ५८ ॥
|
वानरा ! तू प्रजापतिचा पौत्र, ऋक्षराजाचा पुत्र तसेच धैर्य आणि पौरुषाने संपन्न आहेस. म्हणून याप्रकारे गर्जत आहेस. ॥५८॥
|
स कुंभकर्णस्य वचो निशम्य व्याविध्य शैलं सहसा मुमोच । तेनाजघानोरसि कुंभकर्णं शैलेन वज्राशनिसंनिभेन ॥ ५९ ॥
|
कुंभकर्णाचे हे बोलणे ऐकून सुग्रीवांनी त्या शैल शिखराला गोलाकार फिरवित एकाएकी त्याच्यावर सोडून दिले. ते वज्र आणि अशनि समान होते. त्याच्या द्वारा त्यांनी कुंभकर्णाच्या छातीवर जबरदस्त आघात केला. ॥५९॥
|
तच्छैलशृङ्गं सहसा विभिन्नं भुजान्तरे तस्य तदा विशाले । ततो विषेदुः सहसा प्लवंगा रक्षोगणाश्चापि मुदा विनेदुः ॥ ६० ॥
|
परंतु त्याच्या विशाल वक्षःस्थळावर धडकून त्या शैलशिखराचा एकाएकी चुराडा झाला. हे पाहून वानर तात्काळ विषादात बुडून गेले आणि राक्षस मोठ्या हर्षाने गर्जना करू लागले. ॥६०॥
|
स शैलशृङ्गाभिहतश्चुकोप ननाद रोषाच्च विवृत्य वक्त्रम् । व्याविध्य शूलं च तडित्प्रकाशं चिक्षेप हर्यृक्षपतेर्वधाय ॥ ६१ ॥
|
त्या पर्वत शिखराचा आघात सोसून कुंभकर्णाला फार क्रोध आला. तो रोषाने तोंड पसरून मोठ मोठ्याने गर्जना करू लागला. नंतर त्याने वीजेप्रमाणे चमकणारा तो शूल गरगर फिरवून सुग्रीवाच्या वधासाठी सोडला. ॥६१॥
|
तत् कुंभकर्णस्य भुजप्रणुन्नं शूलं शितं काञ्चनदामयष्टिम् । क्षिप्रं समुत्पत्य निगृह्य दोर्भ्यां बभञ्ज वेगेन सुतोऽनिलस्य ॥ ६२ ॥
|
कुंभकर्णाच्या हातून सुटलेल्या त्या तीक्ष्ण शूलाला ज्यांच्या काठीमध्ये सोन्याच्या लडी लावलेल्या होत्या, वायुपुत्र हनुमानाने शीघ्र उडी मारून दोन्ही हातांनी पकडले आणि त्यास वेगपूर्वक तोडून टाकले. ॥६२॥
|
कृतं भारसहस्रस्य शूलं कालायसं महत् । बभञ्ज जानुमारोप्य तदा हृष्टः प्लवंगमः ॥ ६३ ॥
|
तो महान् शूल हजार काळ्या लोखंडाचा बनविलेला होता ज्याला हनुमानांनी मोठ्या हर्षाने आपल्या गुडघ्यांवर लावून तात्काळ तोडून टाकले. ॥६३॥
|
शूलं भग्नं हनुमता दृष्ट्वा वानरवाहिनी । हृष्टा ननाद बहुशः सर्वतश्चापि दुद्रुवे ॥ ६४ ॥
|
हनुमान द्वारा शूल तोडला गेल्याचे पाहून वानरसेना मोठ्या हर्षाने भरून जाऊन वारंवार सिंहनाद करू लागली आणि चोहोबाजूस धावू लागली. ॥६४॥
|
बभुवाथ परित्रस्तो राक्षसो विमुखोऽभवत् । सिंहनादं च ते चक्रुः प्रहृष्टा वनगोचराः । मारुतिं पूजयाञ्चक्रुः दृष्ट्वा शूलं तथागतम् ॥ ६५ ॥
|
परंतु तो राक्षस भयाने थरारून गेला. त्याच्या मुखावर औदासीन्य पसरले आणि वनचारी वानर अत्यंत प्रसन्न होऊन सिंहनाद करू लागले. त्या सर्वांनी शूल खण्डित झालेला पाहून पवनकुमार हनुमानाची भूरि भूरि प्रशंसा केली. ॥६५॥
|
स तत् तथा भग्नमवेक्ष्य शूलं चुकोप रक्षोधिपतिर्महात्मा । उत्पाट्य लङ्कामलयात् स शृङ्गं जघान सुग्रीवमुपेत्य तेन ॥ ६६ ॥
|
याप्रकारे तो शूल भग्न झालेला पाहून महाकाय राक्षसराज कुंभकर्णाला फार क्रोध आला आणि त्याने लंकेच्या निकटवर्ती मलयपर्वताचे शिखर उचलून सुग्रीवाच्या जवळ जाऊन त्याच्यावर फेकले. ॥६६॥
|
स शैलशृङ्गाभिहतो विसंज्ञः पपात भूमौ युधि वानरेन्द्रः । तं वीक्ष्य भूमौ पतितं विसंज्ञं नेदुः प्रहृष्टा युधि यातुधानाः ॥ ६७ ॥
|
त्या शैलशिखराने आहत होऊन वानरराज सुग्रीव आपली शुद्ध गमावून बसले आणि युद्धभूमीवर कोसळले. त्यांना अचेत होऊन पृथ्वीवर पडलेले पाहून निशाचरांना फार प्रसन्नता वाटली आणि ते रणक्षेत्रावर सिंहनाद करू लागले. ॥६७॥
|
समभ्युपेत्याद्भुतघोरवीर्यं स कुंभकर्णो युधि वानरेन्द्रम् । जहार सुग्रीवमभिप्रगृह्य यथानिलो मेघमतिप्रचण्डः ॥ ६८ ॥
|
त्यानंतर कुंभकर्णाने युद्धथळी अद्भुत आणि भयानक पराक्रम प्रकट करणार्या वानरराज सुग्रीवांच्या जवळ जाऊन त्यांना उचलले आणि जसा प्रचण्ड वायु मेघांना उडवून घेऊन जातो त्याप्रमाणे तो त्यांचे हरण करून त्यांना घेऊन गेला. ॥६८॥
|
स तं महामेघनिकाशरूपं उत्पाट्य गच्छन् युधि कुंभकर्णः । रराज मेरुप्रतिमानरूपो मेरुर्यथा व्युच्छ्रितघोरशृङ्गः ॥ ६९ ॥
|
कुंभकर्णाचे स्वरूप मेरू पर्वतासमान भासत होते. तो महान् मेघासमान रूप असणार्या सुग्रीवांना उचलून जेव्हा युद्धस्थळावरून निघाला त्यासमयी उंच शिखरांच्या मेरूगिरिप्रमाणे शोभा प्राप्त करू लागला. ॥६९॥
|
ततस्तमादाय जगाम वीरः संस्तूयमानो युधि राक्षसेन्द्रः । शृण्वन् निनादं त्रिदवालयानां प्लवंगराजग्रहविस्मितानाम् ॥ ७० ॥
|
त्यांना घेऊन तो वीर राक्षसराज लंकेच्या दिशेने चालू लागला. त्यासमयी युधस्थळी सर्व राक्षस त्याची स्तुति करू लागले. वानरराज पकडले गेल्याने आश्चर्यचकित झालेल्या देवतांचा दुःखजनित शब्द त्याला स्पष्ट ऐकू येत होता. ॥७०॥
|
ततस्तमादाय तदा स मेने हरीन्द्रमिन्द्रोपममिन्द्रवीर्यः । अस्मिन् हते सर्वमिदं हतं स्यात् सराघवं सैन्यमितीन्द्रशत्रुः ॥ ७१ ॥
|
इंद्राप्रमाणे पराक्रमी इंद्रद्रोही कुंभकर्णाने त्यासमयी देवेन्द्रतुल्य तेजस्वी वानरराज सुग्रीवास पकडून मनातल्या मनात असे मानले की याच्या मारले जाण्याने राघवांसह ही सारी वानरसेना स्वतःच नष्ट होऊन जाईल. ॥७१॥
|
विद्रुतां वाहिनीं दृष्ट्वा वानराणां इतस्ततः । कुंभकर्णेन सुग्रीवं गृहीतं चापि वानरम् ॥ ७२ ॥
हनुमांश्चिन्तयामास मतिमान् मारुतात्मजः । एवं गृहीते सुग्रीवे किं कर्तव्यं मया भवेत् ॥ ७३ ॥
|
वानरांची सेना इकडे तिकडे पळून चालली आहे आणि वानरराज सुग्रीवांना कुंभकर्णाने पकडले आहे, हे पाहून बुद्धिमान् पवनकुमार हनुमंतांनी विचार केला - सुग्रीव याप्रकारे पकडले गेल्यानंतर मला आता काय केले पाहिजे ? ॥७२-७३॥
|
यद्वै न्याय्यं मया कर्तुं तत् करिष्याम्यसंशयम् । भूत्वा पर्वतसंकाशो नाशयिष्यामि राक्षसम् ॥ ७४ ॥
|
माझ्यासाठी जे काही करणे उचित असेल ते मी निःसंदेह करीन. पर्वताकार रूप धारण करून त्या राक्षसाचा नाश करून टाकीन. ॥७४॥
|
मया हते संयति कुंभकर्णे महाबले मुष्टिविकीर्णदेहे । विमोचिते वानरपार्थिवे च भवन्तु हृष्टाः प्लवगाः समग्राः ॥ ७५ ॥
|
युद्धस्थळी आपल्या बुक्क्यांनी मारमारून महाबली कुंभकर्णाच्या शरीराचा चुराडा करून टाकीन. याप्रकारे जेव्हा तो माझ्या हाताने मारला जाईल तसेच वानरराज सुग्रीवांना त्याच्या कैदेतून सोडविले जाईल तेव्हा सारे वानर हर्षाने प्रफुल्ल होतील, ठीक आहे असेच होवो. ॥७५॥
|
अथवा स्वयमप्येष मोक्षं प्राप्स्यति पार्थिवः । गृहीतोऽयं यदि भवेत् त्रिदशैः सासुरोरगैः ॥ ७६ ॥
|
अथवा हे सुग्रीव स्वतःच त्याच्या पकडीतून सुटून जातील. जर यांना देवता, असुर अथवा नागही पकडतील तरी हे आपल्याच प्रयत्नाने त्यांच्या कैदेतून ही सुटका करून घेतील. ॥७६॥
|
मन्ये न तावदात्मानं बुध्यते वानराधिपः । शैलप्रहाराभिहतः कुंभकर्णेन संयुगे ॥ ७७ ॥
|
मी समजतो की युद्धात कुंभकर्णाने शिळेच्या प्रहाराने सुग्रीवांवर जो गंभीर आघात केला आहे, यामुळे अचेत झालेल्या वानरराजांना अद्याप शुद्ध आलेली नाही. ॥७७॥
|
अयं मुहूर्तात् सुग्रीवो लब्धसंज्ञो महाहवे । आत्मनो वानराणां च यत् पथ्यं तत् करिष्यति ॥ ७८ ॥
|
एकाच मुहूर्तात जेव्हा सुग्रीव सचेत होतील तेव्हा महासमरात आपल्यासाठी आणि वानरांसाठी जे हितकारक कर्म असेल ते करतील. ॥७८॥
|
मया तु मोक्षितस्यास्य सुग्रीवस्य महात्मनः । अप्रीतिश्च भवेत् कष्टा कीर्तिनाशश्च शाश्वतः ॥ ७९ ॥
|
जर मी त्यांना सोडवीन तर महात्मा सुग्रीवांना प्रसन्नता वाटणार नाही. उलट त्यांच्या मनाला खेद होईल आणि त्यांच्या यशाचा कायमचाच नाश होऊन जाईल. ॥७९॥
|
तस्मान्मुहूर्तं काङ्क्षिष्ये विक्रमं मोक्षितस्य तु । भिन्नं च वानरानीकं तावदाश्वासयाम्यहम् ॥ ८० ॥
|
म्हणून मी एक मुहूर्तापर्यंत त्यांच्या सुटण्याची प्रतीक्षा करीन. नंतर ते सुटून जातील तर त्यांचा पराक्रम पाहीन. तो पर्यंत पळून गेलेल्या वानरसेनेला मी धीर देतो. ॥८०॥
|
इत्येवं चिन्तयित्वाथ हनुमान् मारुतात्मजः । भूयः संस्तम्भयामास वानराणां महाचमूम् ॥ ८१ ॥
|
असा विचार करून पवनकुमार हनुमानांनी वानरांच्या त्या विशाल वाहिनीला पुन्हा आश्वासन देऊन स्थिरतापूर्वक स्थापित केले. ॥८१॥
|
स कुंभकर्णोऽथ विवेश लङ्कां स्फुरन्तमादाय महाहरिं तम् । विमानचर्यागृहगोपुरस्थैः पुष्पाग्र्यवर्षैरभिपूज्यमानः ॥ ८२ ॥
|
तिकडे कुंभकर्ण हातपाय हलवीत महावानर सुग्रीवाला घेऊन लंकेमध्ये घुसला. त्यासमयी विमाने (सात मजली घरे) रस्त्यांच्या दोन्ही बाजूला बनविलेल्या गृहपंक्ति आणि गोपुरात राहाणारे स्त्री-पुरूष उत्तम फुलांची वृष्टि करून कुंभकर्णाचे स्वागत-सत्कार करत होते. ॥८२॥
|
लाजगन्धोदवर्षैस्तु सेच्यमानः शनैः शनैः । राजवीथ्यास्तु शीतत्वात् संज्ञां प्राप महाबलः ॥ ८३॥
|
लाह्या आणि गंधयुक्त जलांच्या वृष्टि द्वारा अभिषिक्त झालेल्या राजमार्गाच्या शीतलतेमुळे महाबली सुग्रीवांना हळूहळू शुद्ध आली. ॥८३॥
|
ततः स संज्ञामुपलभ्य कृच्छ्राद् बलीयसस्तस्य भुजान्तरस्थः । अवेक्षमाणः पुरराजमार्गं विचिन्तयामास मुहुर्महात्मा ॥ ८४ ॥
|
तेव्हा मोठ्या कष्टाने सचेत होऊन बलवान् कुंभकर्णाच्या भुजांमध्ये दबले गेलेले महात्मा सुग्रीव नगर आणि राजमार्गाकडे पाहून वारंवार याप्रकारे विचार करू लागले- ॥८४॥
|
एवं गृहीतेन कथं नु नाम शक्यं मया संप्रतिकर्तुमद्य । तथा करिष्यामि यथा हरीणां भविष्यतीष्टं च हितं च कार्यम् ॥ ८५ ॥
|
याप्रकारे या राक्षसाच्या पकडीत येऊन आता मी कोठल्याप्रकारे याचा भरपूर बदला घेऊ शकतो ? मी तेच करीन की ज्यायोगे वानरांचे अभीष्ट आणि हितकारक कार्य होईल. ॥८५॥
|
ततः कराग्रैः सहसा समेत्य राजा हरीणाममरेन्द्रशत्रुम् । खरैश्च कर्णौ दशनैश्च नासां ददंश पादैर्विददार पार्श्वौ ॥ ८६ ॥
|
असा निश्चय करून वानरांचे राजे सुग्रीव यांनी एकाएकी हातांच्या तीक्ष्ण नखांच्या द्वारा इंद्रशत्रु कुंभकर्णाचे दोन्ही कान विदीर्ण केले, दातांनी त्याचे नाक तोडले आणि आपल्या पायांच्या नखांनी दोन्ही पार्श्वभाग विदीर्ण केले आणि त्या राक्षसाच्या दोन्ही बरगड्या तोडून टाकल्या. ॥८६॥
|
स कुंभकर्णो हृतकर्णनासो विदारितस्तेन रदैर्नखैश्च । रोषाभिभूतः क्षतजार्द्रगात्रः सुग्रीवमाविध्य पिपेष भूमौ ॥ ८७॥
|
सुग्रीवाच्या दातांनी आणि नखांनी दोन्ही कानांच्या खालचा भाग आणि नाक कापले गेल्याने आणि पार्श्वभाग विदीर्ण होण्याने कुंभकर्णाचे सारे शरीर रक्तबंबाळ झाले. तेव्हा त्याला फार रोष आला आणि त्याने सुग्रीवाला फिरवून जमिनीवर आपटले - आपटून तो त्यांना भूमीवर रगडू लागला. ॥८७॥
|
स भूतले भीमबलाभिपिष्टः सुरारिभिस्तैरभिहन्यमानः । जगाम खं कन्दुकवज्जवेन पुनश्च रामेण समाजगाम ॥ ८८ ॥
|
भयानक बलशाली कुंभकर्ण जेव्हा त्यांना पृथ्वीवर रगडत होता आणि ते देवद्रोही राक्षस त्यांच्यावर सर्व बाजुनी प्रहार करत होते, त्यासमयी सुग्रीव एकाएकी चेंडूप्रमाणे वेगपूर्वक उसळून आकाशात उडाले आणि श्रीरामचंद्रांना येऊन भेटले. ॥८८॥
|
कर्णनासाविहीनस्तु कुंभकर्णो महाबलः । रराज शोणितोत्सिक्तो गिरिः प्रस्रवणैरिव ॥ ८९ ॥
|
महाबली कुंभकर्ण आपले नाक आणि कान गमावून बसला. त्याच्या अंगातून पर्वतातून पाण्याचे झरे वाहू लागतात त्याप्रमाणे रक्त वाहू लागले. तो रक्ताने न्हाऊन निघाला आणि झर्यांनी युक्त शैलशिखराप्रमाणे शोभू लागला. ॥८९॥
|
शोणितार्द्रो महाकायो राक्षसो भीमदर्शनः । युद्धायाभिमुखो भूयो मनश्चके निशाचरः ॥ ९० ॥
|
महाकाय राक्षस रक्ताने न्हाऊन अधिकच भयानक दिसू लागला. त्या निशाचराने पुन्हा शत्रूंच्या समोर जाऊन युद्ध करण्याचा विचार केला. ॥९०॥
|
अमर्षाच्छोणितोद्गारी शुशुभे रावणानुजः । नीलाञ्जनचयप्रख्यः ससन्ध्य इव तोयदः ॥ ९१ ॥
|
अमर्षपूर्वक रक्त ओकत रावणाचा लहान भाऊ कुंभकर्ण ज्याच्या शरीराचा रंग काळ्या मेघासमान होता, संध्याकाळच्या ढगाप्रमाणे सुशोभित होत होता. ॥९१॥
|
गते तु तस्मिन् सुरराजशत्रुः क्रोधात् प्रदुद्राव रणाय भूयः । अनायुधोऽस्मीति विचिन्त्य रौद्रो घोरं तदा मुद्गरमाससाद ॥ ९२ ॥
|
सुग्रीव सुटून गेल्यावर तो इंद्रद्रोही राक्षस परत युद्धासाठी धावला. यासमयी माझ्या जवळ कोठलेही हत्यार नाही आहे असा विचार करून त्याने एक मोठे भयंकर मुद्गर हातात घेतले. ॥९२॥
|
ततः स पुर्याः सहसा महौजा निष्क्रम्य तद् वानरसैन्यमुग्रम् । बभक्ष रक्षो युधि कुंभकर्णः प्रजा युगान्ताग्निरिव प्रवृद्धः ॥ ९३ ॥
|
त्यानंतर महाबलशाली राक्षस कुंभकर्ण एकाएकी लंकापुरीतून निघून प्रजेचे भक्षण करणार्या प्रलयकालच्या प्रज्वलित अग्निसमान त्या भयंकर वानरसेनेला युद्धस्थळी आपला आहार बनवू लागला. ॥९३॥
|
बुभुक्षितः शोणितमांसगृध्नुः प्रविश्य तद्वानरसैन्यमुग्रम् । चखाद रक्षांसि हरीन् पिशाचान् ऋक्षांश्च मोहाद् युधि कुंभकर्णः । यथैव मृत्युर्हरते युगान्ते स भक्षयामास हरींश्च मुख्यान् ॥ ९४ ॥
|
त्यासमयी कुंभकर्णाला भूक सतावीत होती, म्हणून तो रक्त आणि मांसासाठी लालायित झाला होता. त्याने त्या भयंकर वानरसेनेमध्ये प्रवेश करून मोहवश वानर आणि अस्वले यांच्याबरोबरच राक्षस आणि पिशाच्यांना ही खाण्यास आरंभ केला. जसे प्रलयकाली मृत्यु प्राण्यांच्या प्राणांचे अपहरण करतो, त्याच प्रकारे तो मुख्य मुख्य वानरांना आपला ग्रास बनवत होता. ॥९४॥
|
एकं द्वे त्रीन् बहून् क्रुद्धो वानरान् सह राक्षसैः । समादायैकहस्तेन प्रचिक्षेप त्वरन् मुखे ॥ ९५ ॥
|
तो उतावळेपणाने एका हाताने क्रोधपूर्वक दोन दोन, तीन तीन तसेच बर्याचशा राक्षसांना आणि वानरांना एकत्र गोळा करून आपल्या मुखात टाकत होता. ॥९५॥
|
संप्रस्रवंस्तदा मेदः शोणितं च महाबलः । वध्यमानो नगेन्द्राग्रैः भक्षयामास वानरान् ॥ ९६ ॥
|
त्या समयी तो महाबली निशाचर पर्वत शिखरांचा मार खात खात तोंडाने वानरांची चर्बी आणि रक्त सोडत त्या सर्वांचे भक्षण करत होता. ॥९६॥
|
ते भक्ष्यमाणा हरयो रामं जग्मुस्तदा गतिम् । कुंभकर्णो भृशं क्रुद्धः कपीन् खादन् प्रधावति ॥ ९७ ॥
|
त्याच्याकडून खाल्ले जाणारे वानर भयभीत होऊन त्यासमयी भगवान् श्रीरामांना शरण गेले. तिकडे कुंभकर्ण अत्यंत कुपित होऊन वानरांना आपला आहार बनवत सर्व बाजूने त्यांच्यावर हल्ला करू लागला. ॥९७॥
|
शतानि सप्त चाष्टौ च विंशत् त्रिंशत् तथैव च । संपरिष्वज्य बाहुभ्यां खादन् विपरिधावति ॥ ९८ ॥
|
तो सात, आठ, वीस, तीस आणि शंभर शंभर वानरांना आपल्या दोन्ही भुजांमध्ये पकडून धरत होता आणि त्यांना खात खात रणभूमीमध्ये धावत फिरत होता. ॥९८॥
|
मेदोवसाशोणितदिग्धगात्रः कर्णावस्क्तग्रथितांत्रमालः । ववर्ष शूलानि सुतीक्ष्णदंष्ट्रः कालो युगांतस्थ इव प्रवृद्धः ॥ ९९ ॥
|
त्याच्या शरीरावर मेद, चर्बी आणि रक्त चिकटले होते. त्याच्या कानामध्ये आंतड्यांच्या माळा गुंतून पडल्या होत्या. तसेच त्याच्या दाढा फारच तीक्ष्ण होत्या. तो प्रलयकाळ समयी प्राण्यांचा संहार करणार्या विशाल रूपधारी काळाप्रमाणे वानरांवर शूलांची वृष्टि करत होता. ॥९९॥
|
तस्मिन् काले सुमित्रायाः पुत्रः परबलार्दनः । चकार लक्ष्मणः क्रुद्धो युद्धं परपुरञ्जयः ॥ १०० ॥
|
त्यासमयी शत्रूनगरीवर विजय मिळविणारे आणि शत्रूंचा संहार करणारे सुमित्राकुमार लक्ष्मण कुपित होऊन त्या राक्षसाबरोबर युद्ध करू लागले. ॥१००॥
|
स कुंभकर्णस्य शरान् शरीरे सप्त वीर्यवान् । निचखानाददे बाणान् विससर्ज च लक्ष्मणः ॥ १०१ ॥
|
त्या पराक्रमी लक्ष्मणाने कुंभकर्णाच्या शरीरात सात बाण घुसविले. नंतर दुसरे बाण घेतले आणि तेही त्याच्यावर सोडले. ॥१०१॥
|
पीड्यमानस्तदस्त्रं तु विशेषं तत् स राक्षसः । ततश्चुकोप बलवान् सुमित्रानंदवर्धनः ॥ १०२ ॥
|
त्यांनी पीडित होऊन त्या राक्षसाने लक्ष्मणाच्या त्या अस्त्राला निःशेष करून टाकले. तेव्हा सुमित्रेचा आनंद वाढविणार्या बलवान् लक्ष्मणांना फार क्रोध आला. ॥१०२॥
|
अथास्य कवचं शुभ्रं जांबूनदमयं शुभम् । प्रच्छादयामास शरैः संध्याभ्रमिव मारुतः ॥ १०३ ॥
|
त्यांनी कुंभकर्णाच्या सुवर्णनिर्मित सुंदर आणि दीप्तिमान् कवचाला आपल्या बाणांनी झाकून, वार्याने ज्याप्रमाणे संध्याकालीन मेघांना उखडून अदृश्य करून टाकावे त्याप्रमाणे अदृश्य करून टाकले. ॥१०३॥
|
नीलांजनचयप्रख्यः शरैः कांचनभूषणैः । आपीड्यमानः शुशुभे मेघैः सूर्य इवांशुमान् ॥ १०४ ॥
|
काळ्या कोळशाच्या ढीगासारखी कांती असणारा कुंभकर्ण लक्ष्मणांच्या सुवर्णभूषित बाणांनी आच्छादित होऊन मेघांनी झाकलेल्या अंशुमाळी सूर्यासमान शोभा प्राप्त करीत होता. ॥१०४॥
|
ततः स राक्षसो भीमः सुमित्रानंदवर्धनम् । सावज्ञमेव प्रोवाच वाक्यं मेघौघनिःस्वनः ॥ १०५ ॥
|
तेव्हा त्या भयंकर राक्षसाने मेघाच्या गर्जनेसमान गंभीर स्वराने सुमित्रानंदन लक्ष्मणाचा तिरस्कार करत म्हटले- ॥१०५॥
|
अंतकस्यापकष्टेन युधि जेतारमाहवे । युध्यता मामभीतेन ख्यापिता वीरता त्वया ॥ १०६ ॥
|
लक्ष्मणा ! मी युद्धात यमराजाला कुठलेही कष्ट सहन न करताच जिंकून घेण्याची शक्ति बाळगून आहे. तू माझ्याशी निर्भय होऊन युद्ध करत आपल्या अद्भुत वीरतेचा परिचय करून दिला आहेस. ॥१०६॥
|
प्रगृहीतायुधस्येह मृत्योरिव महामृधे । तिष्ठन्नप्यग्रतः पूज्यः किमु युद्धप्रदायकः ॥ १०७ ॥
|
जेव्हा मी महासमरात मृत्यु समान हत्यार घेऊन युद्धासाठी उद्यत होतो त्यासमयी जो माझ्या समोर उभा राहातो, तोही प्रशंसेला पात्र आहे. मग जो मला युद्ध प्रदान करत आहे, त्याच्याबद्दल काय सांगावे ? ॥१०७॥
|
ऐरावतं समारूढो वृतः सर्वामरैः प्रभुः । नैव शक्रोऽपि समरे स्थितपूर्वः कदाचन ॥ १०८ ॥
|
ऐरावतावर आरूढ होऊन संपूर्ण देवतांनी घेरलेले शक्तीशाली इंद्रही पूर्वी माझ्या समोर युद्धात टिकू शकले नाहीत. ॥१०८॥
|
अद्य त्वयाहं सौमित्रे बालेनापि पराक्रमैः । तोषितो गन्तुमिच्छामि त्वामनुज्ञाप्य राघवम् ॥ १०९ ॥
|
सौमित्रा ! तू बालक असूनही आज आपल्या पराक्रमाने मला संतुष्ट केले आहेस; म्हणून मी तुझी अनुमति घेऊन युद्धासाठी राघवाजवळ जाऊ इच्छितो. ॥१०९॥
|
यत् तु वीर्यबलोत्साहैः तोषितोऽहं रणे त्वया । राममेवैकमिच्छामि हन्तुं यस्मिन् हते हतम् ॥ ११० ॥
|
तू आपले वीर्यबळ आणि उत्साहाने रणभूमीमध्ये मला संतोष प्रदान केला आहेस; म्हणून आता मी केवळ रामालाच मारू इच्छितो, जे मारले गेले तर सारी शत्रुसेना स्वतःच मरून जाईल. ॥११०॥
|
रामे मयात्र निहते येऽन्ये स्थास्यन्ति संयुगे । तानहं योधयिष्यामि स्वबलेन प्रमाथिना ॥ १११ ॥
|
माझ्या द्वारा राम मारले गेले की जे दुसरे लोक युद्धभूमीमध्ये उभे राहातील, त्या सर्वांच्या बरोबर मी आपल्या संहारकारी बळाच्या द्वारा युद्ध करीन. ॥१११॥
|
इत्युक्त्ववाक्यं तद् रक्षः प्रोवाच स्तुतिसंहितम् । मृधे घोरतरं वाक्यं सौमित्रिः प्रहसन्निव ॥ ११२ ॥
|
तो राक्षस जेव्हा पूर्वोक्त गोष्ट सांगून चुकला, तेव्हा सौमित्र लक्ष्मण रणभूमीत खदखदून हसले आणि त्याला प्रशंसामिश्रित कठोर वाणीमध्ये बोलले- ॥११२॥
|
यस्त्वं शक्रादिभिर्देवैः असह्यः प्राप्य पौरुषम् । तत् सत्यं नान्यथा वीर दृष्टस्तेऽद्य पराक्रमः ॥ ११३ ॥ एष दाशरथी रामः तिष्ठत्यद्रिरिवाचलः ।
|
वीर कुंभकर्णा ! तू महान् पौरूष प्राप्त करून जो इंद्र आदि देवता यांच्यासाठीही असह्य बनला आहेस, ते तुझे कथन बिलकुल ठीक आहे, खोटे नाही आहे. मी स्वतः आपल्या डोळ्यांनी आज तुझा पराक्रम पाहिला आहे. हे आहेत दशरथनंदन भगवान् श्रीराम, जे पर्वतसमान अविचल भावाने उभे आहेत. ॥११३ १/२॥
|
इति श्रुत्वा ह्यनादृत्य लक्ष्मणं स निशाचरः ॥ ११४ ॥ अतिक्रम्य च सौमित्रिं कुंभकर्णो महाबलः । राममेवाभिदुद्राव कंपयन्निव मेदिनीम् ॥ ११५ ॥
|
लक्ष्मणाचे हे बोलणे ऐकून त्याचा आदर न करता महाबली निशाचर कुंभकर्णाने सौमित्राला ओलांडून श्रीरामावर हल्ला केला. त्यासमयी तो आपल्या पायाच्या आघाताने पृथ्वीला जणु कंपित करत होता. ॥११४-११५॥
|
अथ दाशरथी रामो रौद्रमस्त्रं प्रयोजयन् । कुंभकर्णस्य हृदये ससर्ज निशितान् शरान् ॥ ११६ ॥
|
त्याला येतांना पाहून दाशरथी श्रीरामांनी रौद्रास्त्राचा प्रयोग करून कुंभकर्णाच्या हृदयात अनेक तीक्ष्ण बाण मारले. ॥११६॥
|
तस्य रामेण विद्धस्य सहसाभिप्रधावतः । अङ्गारमिश्राः क्रुद्धस्य मुखान्निश्चेरुरर्चिषः ॥ ११७ ॥
|
श्रीरामांच्या बाणांनी घायाळ होऊन तो एकाएकी त्यांच्यावर तुटून पडला. त्यासमयी क्रोधाविष्ट झालेल्या कुंभकर्णाच्या मुखांतून अंगारमिश्रित आगीच्या ज्वाळा निघत होत्या. ॥११७॥
|
रामास्त्रविद्धो घोरं वै नर्दन् राक्षसपुङ्गवः । अभ्यधावत संक्रुद्धो हरीन् विद्रावयन् रणे ॥ ११८ ॥
|
भगवान् श्रीरामांच्या अस्त्राने पीडित होऊन राक्षसप्रवर कुंभकर्ण घोर गर्जना करू लागला आणि रणभूमीमध्ये वानरांना पिटाळून लावत क्रोधपूर्वक त्यांच्याकडे धावला. ॥११८॥
|
तस्योरसि निमग्नास्ते शरा बर्हिणवाससः । हस्ताच्चापि परिभ्रष्टा गदा चोर्व्यां पपात ह ॥ ११९ ॥
|
श्रीरामांच्या बाणांमध्ये मोराची पिसे लावलेली होती. ते कुंभकर्णाच्या छातीत घुसले. म्हणून व्याकुळतेमुळे त्याच्या हातून गदा सुटून पृथ्वीवर पडली. ॥११९॥
|
आयुधानि च सर्वाणि विप्रकीर्यन्त भूतले । स निरायुधमात्मानं यदा मेने महाबलः ॥ १२० ॥
मुष्टिभ्यां च कराभ्यां च चकार कदनं महत् ।
|
एवढेच नाही तर त्याची अन्य सर्व आयुधेही भूमीवर विखुरली गेली. जेव्हा त्याला समजले की आता माझ्या जवळ काही हत्यार नाही, तेव्हा त्या महाबली निशाचराने दोन्ही मुठीने आणि हातांनी वानरांचा महान् संहार करण्यास आरंभ केला. ॥१२० १/२॥
|
स बाणैरतिविद्धाङ्गः क्षतजेन समुक्षितः । रुधिरं प्रतिसुस्राव गिरिः प्रस्रवणं यथा ॥ १२१ ॥
|
बाणांनी त्याचे सारे अंग अत्यंत घायाळ झाले होते; म्हणून तो रक्तांनी न्हाऊन निघाला आणि जसे पर्वतातून झरे वहातात त्याप्रमाणे त्याच्या अंगातून रक्ताची धार वाहू लागली. ॥१२१॥
|
स तीर्वेण च कोपेन रुधिरेण च मूर्च्छितः । वानरान् राक्षसानृक्षान् खादन् स परिधावति ॥ १२२ ॥
|
तो रक्ताने चिंब आणि दुःसह क्रोधाने व्याकुळ होऊन वानर, अस्वले आणि राक्षसांना खात चोहो बाजूस धावू लागला. ॥१२२॥
|
अथ शृङ्गं समाविध्य भीमं भीमपराक्रमः । चिक्षेप राममुद्दिश्य बलवानन्तकोपमः ॥ १२३ ॥
|
इतक्यातच यमराजासमान प्रतीत होणार्या त्या बलवान् आणि भयानक पराक्रमी निशाचराने एक भयंकर पर्वताचे शिखर उचलले आणि ते गरगर फिरवून श्रीरामांना लक्ष्य करून त्यांच्यावर सोडले. ॥१२३॥
|
अप्राप्तमन्तरा रामः सप्तभिस्तमजिह्मगैः । चिच्छेद गिरिशृंगं तं पुनः संधाय कार्मुकम् ॥ १२४ ॥
|
परंतु श्रीरामांनी पुन्हा धनुष्याचे संधान करून सरळ जाणारे सात बाण मारून त्या पर्वत शिखराचे हवेतच तुकडे तुकडे करून टाकले, आपल्या जवळही येऊ दिले नाही. ॥१२४॥
|
ततस्तु रामो धर्मात्मा तस्य शृंगं महत् तदा । शरैः काञ्चनचित्राङ्गैः चिच्छेद भरताग्रजः ॥ १२५ ॥
तन्मेरुशिखराकारं द्योतमानमिव श्रिया । द्वे शते वानरेन्द्राणां पतमानमपातयत् ॥ १२६ ॥
|
भरताचे मोठे भाऊ धर्मात्मा श्रीरामांनी सुवर्णभूषित विचित्र बाणांच्या द्वारा जेव्हा त्या महान् पर्वतशिखराला छाटून टाकले, त्यासमयी आपल्या प्रभेने प्रकाशित झाल्यासारखे होऊन त्या मेरूपर्वताच्या शृंगसदृश शिखरांनी भूमीवर पडता पडता दोनशे वानरांना धराशायी करून टाकले. ॥१२५-१२६॥
|
तस्मिन् काले स धर्मात्मा लक्ष्मणो राममब्रवीत् । कुंभकर्णवधे युक्तो योगान् परिमृशन् बहून् ॥ १२७ ॥
|
त्या समयी धर्मात्मा लक्ष्मणांनी, जे कुंभकर्णाच्या वधासाठी नियुक्त होते, त्याच्या वधाच्या अनेक युक्त्यांचा विचार करून श्रीरामांना म्हटले - ॥१२७॥
|
नैवायं वानरान् राजन् न विजानाति राक्षसान् । मत्तः शोणितगन्धेन स्वान् परांश्चैव खादति ॥ १२८ ॥
|
राजन् ! हा राक्षस शोणिताच्या गंधाने उन्मत्त झालेला आहे. म्हणून तो वानरांना ओळखत नाही आणि राक्षसांनाही ओळखत नाही. आपल्या आणि परक्यांच्या दोन्ही पक्षाच्या योद्धांना खाऊन टाकत आहे. ॥१२८॥
|
साध्वेनमधिरोहन्तु सर्वे ते वानरर्षभाः । यूथपाश्च यथा मुख्याः तिष्ठन्त्वस्मिन् समन्ततः ॥ १२९ ॥
|
म्हणून श्रेष्ठ वानर यूथपतिंच्या मध्ये जे मुख्य लोक आहेत, ते सर्व बाजुनी त्याच्यावर चढून जाऊन त्याच्या शरीरावरच बसून राहू दे. ॥१२९॥
|
अद्यायं दुर्मतिः काले गुरुभारप्रपीडितः । प्रचरन् राक्षसो भूमौ नान्यान् हन्यात् प्लवंगमान् ॥ १३० ॥
|
असे झाल्याने तो दुर्बुद्धि निशाचर या समयी भारी भाराने पीडित होऊन रणभूमीमध्ये विचरण करते समयी दुसर्या वानरांना मारू शकणार नाही. ॥१३०॥
|
तस्य तद् वचनं श्रुत्वा राजपुत्रस्य धीमतः । ते समारुरुहुर्हृष्टाः कुंभकर्णं महाबलाः ॥ १३१ ॥
|
बुद्धिमान् राजपुत्र लक्ष्मणाचे हे बोलणे ऐकून ते महाबली वानर-यूथपति मोठ्या आनंदाने कुंभकर्णावर चढून गेले. ॥१३१॥
|
कुंभकर्णस्तु संक्रुद्धः समारूढः प्लवंगमैः । व्यधूनयत् तान् वेगेन दुष्टहस्तीव हस्तिपान् ॥ १३२ ॥
|
वानर चढल्यावर कुंभकर्ण अत्यंत कुपित झाला आणि जसा पिसाळलेला हत्ती महावतांना खाली पाडून टाकतो, त्याच प्रमाणे त्यानेही आपला देह जोर जोराने हलवून वेगपूर्वक वानरांना खाली पाडले. ॥१३२॥
|
तान् दृष्ट्वा निर्धुतान् रामो दुष्टोऽयमिति राक्षसम् । सुमुत्पपात वेगेन धनुरुत्तममाददे ॥ १३३ ॥
|
त्या सर्वांना पाडून टाकलेले पाहून श्रीरामांनी जाणले की कुंभकर्ण रूष्ट झालेला आहे. मग तेही मोठ्या वेगाने उडी मारून त्या राक्षसाकडे धावले आणि त्यांनी एक उत्तम धनुष्य हातात घेतले. ॥१३३॥
|
क्रोधरक्तेक्षणो धीरो निर्दहन्निव चक्षुषा । राघवो राक्षसं वेगात् अभिदुद्राव वेगितः । यूथपान् हर्षयन् सर्वान् कुंभकर्णभयार्दितान् ॥ १३४ ॥
|
त्यावेळी त्यांचे नेत्र क्रोधाने लाल होत होते. ते धीर-वीर राघव त्याच्याकडे अशा प्रकारे पाहू लागले की जणु त्याला आपल्या दृष्टिने दग्ध करून टाकतील. त्यांनी कुंभकर्णाच्या बलाने पीडित समस्त वानर यूथपतिंचा हर्ष वाढवीत अत्यंत वेगाने त्या राक्षसावर हल्ला केला. ॥१३४॥
|
स चापमादाय भुजङ्गकल्पं दृढज्यमुग्रं तपनीयचित्रम् । हरीन् समाश्वास्य समुत्पपात रामो निबद्धोत्तमतूणबाणः ॥ १३५ ॥
|
सुदृढ प्रत्यञ्चेने संयुक्त, सर्पासमान भयंकर आणि सोन्याने मढविलेले असल्यामुळे विचित्र शोभेने संपन्न उग्र धनुष्याला हाती घेऊन रामांनी उत्तम तरकस आणि बाण बांधून घेतले आणि वानरांना आश्वासन देऊन त्यांनी कुंभकर्णावर फार वेगाने आक्रमण केले. ॥१३५॥
|
स वानरगणैस्तैस्तु वृतः परमदुर्जयः । लक्ष्मणानुचरो वीरः संप्रतस्थे महावलः ॥ १३६ ॥
|
त्यासमयी अत्यंत दुर्जय वानरसमूहांनी त्यांना चोहो बाजूनी घेरलेले होते. लक्ष्मण त्यांच्या पाठोपाठ चालत होते. याप्रकारे ते महाबली वीर राम पुढे निघाले. ॥१३६॥
|
स ददर्श महात्मानं किरीटिनमरिन्दमम् । शोणिताप्लुतरक्ताक्षं कुंभकर्णं महाबलः ॥ १३७ ॥
सर्वान् समभिधावन्तं यथा रुष्टं दिशागजम् । मार्गमाणं हरीन् क्रुद्धं राक्षसैः परिवारितम् ॥ १३८ ॥
|
त्या महान् बलशाली श्रीरामांनी पाहिले की महाकाय शत्रुदमन कुंभकर्ण मस्तकावर किरीट धारण करत सर्वत्र हल्ला चढवीत आहे. त्याचे सारे अंग रक्तबंबाळ होत आहे. तो रोषाने भरलेल्या दिग्गजाप्रमाणे क्रोधपूर्वक वानरांना शोधीत आहे आणि सर्वांवर आक्रमण करत आहे. बर्याचशा राक्षसांनी त्याला घेरलेले आहे. ॥१३७-१३८॥
|
विन्ध्यमन्दरसंकाशं काञ्चनाङ्गदभूषणम् । स्रवन्तं रुधिरं वक्त्राद् वर्षमेघमिवोत्थितम् ॥ १३९ ॥
|
तो विंध्य आणि मंदराचलासमान भासत आहे. सोन्याचे बाजूबंद त्याच्या भुजांना विभूषित करत आहेत तसेच तो वर्षाकाळातील भरून आलेल्या जलवर्षी मेघाप्रमाणे तोंडातून रक्ताचा वर्षाव करीत आहे. ॥१३९॥
|
जिह्वया परिलिह्यन्तं शोणितं शोणितोक्षिते । मृद्गन्तं वानरानीकं कालान्तकयमोपमम् ॥ १४० ॥
|
जिव्हेच्या द्वारा रक्तांनी भिजलेला जबडा चाटत आहे आणि प्रलयकाळच्या संहारकारी यमराजाप्रमाणे वानरांच्या सेनेला तुडावीत आहे. ॥१४०॥
|
तं दृष्ट्वा राक्षसश्रेष्ठं प्रदीप्तानलवर्चसम् । विस्फारयामास तदा कार्मुकं पुरुषर्षभः ॥ १४१ ॥
|
याप्रकारे प्रज्वलित अग्निसमान तेजस्वी राक्षसश्रेष्ठ कुंभकर्णाला पाहून पुरूषप्रवर श्रीरामांनी तात्काळ आपले धनुष्य खेंचले. ॥१४१॥
|
स तस्य चापनिर्घोषात् कुपितो राक्षसर्षभः । अमृष्यमाणस्तं घोषं अभिदुद्राव राघवम् ॥ १४२ ॥
|
त्यांच्या धनुष्याचा टणत्कार ऐकून राक्षसश्रेष्ठ कुंभकर्ण कुपित झाला आणि त्या टणत्कार ध्वनिला सहन न करू शकल्याने राघवाकडे धावला. ॥१४२॥
|
ततस्तु वातोद्धतमेघकल्पं भुजङ्गराजोत्तमभोगबाहुः । तमापतन्तं धरणीधराभं उवाच रामो युधि कुंभकर्णम् ॥ १४३ ॥
|
त्यानंतर ज्यांच्या भुजा नागराज वासुकीसमान विशाल आणि मोठ्या होत्या, त्या भगवान् श्रीरामांनी पवनाच्या प्रेरणेने दाटून आलेल्या मेघासारख्या काळ्या आणि पर्वतासमान उंच शरीर असणार्या कुंभकर्णाला आक्रमण करतांना पाहून रणभूमीमध्ये त्याला म्हटले- ॥१४३॥
|
आगच्छ रक्षोधिप मा विषादं अवस्थितोऽहं प्रगृहीतचापः । अवेहि मां राक्षसवंशनाशनं यस्त्वं मुहूर्ताद् भविता विचेताः ॥ १४४ ॥
|
राक्षसराज ! या, विषाद करू नका. मी धनुष्य घेऊन उभा आहे. मला राक्षसवंशाचा विनाश करणारा समजा. आता तू सुद्धा दोनच घटिकात आपली चेतना गमावून बसशील. (मरून जाशील) ॥१४४॥
|
रामोऽयमिति विज्ञाय जहास विकृतस्वनम् । अभ्यधावत संक्रुद्धो हरीन् विद्रावयन् रणे ॥ १४५ ॥
|
हाच राम आहे हे जाणून तो राक्षस विकृत स्वरात अट्टाहास करू लागला आणि अत्यंत कुपित होऊन रणक्षेत्रात वानरांना पळवून लावत त्यांच्याकडे धावला. ॥१४५॥
|
पातयन्निव सर्वेषां हृदयानि वनौकसाम् । प्रहस्य विकृतं भीमं स मेघस्तनितोपमम् ॥ १४६ ॥
कुंभकर्णो महातेजा राघवं वाक्यमब्रवीत् । नाहं विराधो विज्ञेयो न कबंधः खरो न च । न वाली न च मारीचः कुंभकर्णः समागतः ॥ १४७ ॥
|
महातेजस्वी कुंभकर्ण समस्त वानरांच्या हृदयाला विदीर्ण करत असल्याप्रमाणे विकृत स्वरात जोरजोराने हसून मेघगर्जनेसमान गंभीर आणि भयंकर वाणीमध्ये राघवास म्हणाला - रामा ! मला विराध, कबंध आणि खर समजता कामा नये. मी मारीच आणि वालीही नाही. हा कुंभकर्ण तुझ्याशी लढण्यासाठी आला आहे. ॥१४६-१४७॥
|
पश्य मे मुद्गरं भीमं सर्वं कालायसं महत् । अनेन निर्जिता देवा दानवाश्च पुरा मया ॥ १४८ ॥
|
माझ्या या भयंकर आणि विशाल मुद्गराकडे पहा. हे सर्वच्या सर्व काळ्या लोखंडाचे बनलेले आहे. मी पूर्वकाळी याच्या द्वारे समस्त देवता आणि दानवांना परास्त केले आहे. ॥१४८॥
|
विकर्णनास इति मां नावज्ञातुं त्वमर्हसि । स्वल्पाऽपि हि न मे पीडा कर्णनासाविनाशनात् ॥ १४९ ॥
|
माझे नाक- कान खालच्या बाजूने कापले गेले आहेत, असे समजून तू माझी अवहेलना करता कामा नये. ही दोन्ही अंगे नष्ट होण्याने मला थोडी सुद्धा पीडा होत नाही. ॥१४९॥
|
दर्शयेक्ष्वाकुशार्दूल वीर्यं गात्रेषु मेऽनघ । ततस्त्वां भक्षयिष्यामि दृष्टपौरुषविक्रमम् ॥ १५० ॥
|
निष्पाप रघुनंदना ! तू इक्ष्वाकुवंशातील वीर पुरूष आहेस म्हणून माझ्या गात्रांवर आपला पराक्रम दाखव. तुझे पौरूष आणि बल-पराक्रम पाहिल्यावरच मी तुला खाईन. ॥१५०॥
|
स कुंभकर्णस्य वचो निशम्य रामः सुपुङ्खान् विससर्ज बाणान् । तैराहतो वज्रसमप्रवेगैः न चुक्षुभे न व्यथते सुरारिः ॥ १५१ ॥
|
कुंभकर्णाचे हे बोलणे ऐकून श्रीरामांनी त्याच्यावर सुंदर पंख असणारे बरेचसे बाण मारले. वज्रासमान वेग असणार्या त्या बाणांचा जबरदस्त आघात होऊनही तो देवद्रोही राक्षस क्षुब्धही झाला नाही अथवा व्यथितही झाला नाही. ॥१५१॥
|
यैः सायकैः सालवरा निकृत्ता वाली हतो वानरपुङ्गवश्च । ते कुंभकर्णस्य तदा शरीरं वज्रोपमा न व्यथयाम्प्रचक्रुः ॥ १५२ ॥
|
ज्या बाणांनी श्रेष्ठ सालवृक्ष कापले गेले आणि वानरराजा वालीचा वध झाला, तेच वज्रोपम बाण त्यासमयी कुंभकर्णाच्या शरीराला व्यथा पोहोचवू शकले नाहीत. ॥१५२॥
|
स वारिधारा इव सायकांस्तान् पिबन् शरीरेण महेन्द्रशत्रुः । जघान रामस्य शरप्रवेगं व्याविध्य तं मुद्गरमुग्रवेगम् ॥ १५३ ॥
|
देवराज इंद्रांचा शत्रु कुंभकर्ण जलधारांसमान श्रीरामांच्या बाणांच्या वृष्टिला आपल्या शरीराने पिऊ लागला आणि भयंकर वेगशाली मुद्गराला चोहोबाजूला फिरवून फिरवून त्यांच्या बाणांच्या महान् वेगाला नष्ट करू लागला. ॥१५३॥
|
ततस्तु रक्षः क्षतजानुलिप्तं वित्रासनं देवमहाचमूनाम् । विव्याध तं मुद्गरमुग्रवेगं विद्रावयामास चमूं हरीणाम् ॥ १५४ ॥
|
त्यानंतर तो राक्षस देवतांच्या विशाल सेनेला भयभीत करणार्या आणि रक्तांनी लडबडलेल्या त्या उग्र वेगशाली मुद्गराला फिरवून फिरवून वानरांच्या सेनेला पिटाळून लावू लागला. ॥१५४॥
|
वायव्यमादाय ततोऽपरास्त्रं रामः प्रचिक्षेप निशाचराय । समुद्गरं तेन जघान बाहुं स कृत्तबाहुस्तुमुलं ननाद ॥ १५५ ॥
|
हे पाहून भगवान् श्रीरामांनी वायव्य नामक दुसर्या अस्त्राचे संधान करून ते कुंभकर्णावर सोडले आणि त्याच्या द्वारा त्या निशाचराचा मुद्गरसहित उजवा बाहु कापून टाकला. बाहु कापला गेल्यावर तो राक्षस भयानक आवाजात चीत्कार करू लागला. ॥१५५॥
|
स तस्य बाहुर्गिरिशृङ्गकल्पः समुद्गरो राघवबाणकृत्तः । पपात तस्मिन् हरिराजसैन्ये जघान तां वानरवाहिनीं च ॥ १५६ ॥
|
राघवांच्या बाणाने कापला गेलेला तो बाहु, जो पर्वतशिखरासमान भासत होता, मुद्गरासहितच वानर सेनेमध्ये पडला. त्याच्या खाली चिरडून कित्येक वानर सैनिक आपले प्राण गमावून बसले. ॥१५६॥
|
ते वानरा भग्नहतावशेषाः पर्यन्तमाश्रित्य तदा विषण्णाः । प्रवेपिताङ्गा ददृशुः सुघोरं नरेन्द्ररक्षोऽधिपसंनिपातम् ॥ १५७ ॥
|
जे अंग-भंग होण्यापासून अथवा मरण्यापासून वाचले ते खिन्नचित्त होऊन किनार्याला (अगदी कडेला) जाऊन उभे राहिले. त्यांच्या शरीरात फार पीडा होत होती आणि ते गुपचुप महाराज श्रीरामांचा आणि राक्षस कुंभकर्णाचा घोर संग्राम पाहू लागले. ॥१५७॥
|
स कुंभकर्णोऽस्त्रनिकृत्तबाहुः महासिकृत्ताग्र इवाचलेन्द्रः । उत्पाटयामास करेण वृक्षं ततोऽभिदुद्राव रणे नरेन्द्रम् ॥ १५८ ॥
|
वायव्यस्त्राने एक बाहु कापला गेल्यावर कुंभकर्ण शिखररहित पर्वतासमान प्रतीत होऊ लागला. त्याने एकाच हाताने एक ताडाचा वृक्ष उपटला आणि तो घेऊन रणभूमीमध्ये महाराज श्रीरामांवर हल्ला केला. ॥१५८॥
|
तं तस्य बाहुं सहतालवृक्षं समुद्यतं पन्नगभोगकल्पम् । ऐन्द्रास्त्रयुक्तेन जघान रामो बाणेन जाम्बूनदचित्रितेन ॥ १५९ ॥
|
तेव्हा श्रीरामांनी एक सुवर्णभूषित बाण काढला आणि त्याला ऐंद्रास्त्राने अभिमंत्रित केले आणि त्याच्या द्वारा सर्पासमान उचलेला राक्षसाचा दुसरा बाहू ही वृक्षासहित छाटून खाली पाडला. ॥१५९॥
|
स कुंभकर्णस्य भुजो निकृत्तः पपात भूमौ गिरिसंनिकाशः । विवेष्टमानो निजघान वृक्षान् शैलान् शिला वानरराक्षसांश्च ॥ १६० ॥
|
कुंभकर्णाचा तो छाटलेला बाहु पर्वतशिखरासमान पृथ्वीवर पडला आणि तडफडू लागला. त्याने कित्येक वृक्ष, पर्वतशिखरे, शिला, वानरांना आणि राक्षसांना ही चिरडून टाकले. ॥१६०॥
|
तं छिन्नबाहुं समवेक्ष्य रामः समापतन्तं सहसा नदन्तम् । द्वावर्धचन्द्रौ निशितौ प्रगृह्य चिच्छेद पादौ युधि राक्षसस्य ॥ १६१ ॥
|
त्या दोन्ही भुजा कापल्या गेल्यानंतर तो राक्षस एकाएकी आर्तनाद करत श्रीरामांवर तुटून पडला. त्याला आक्रमण करतांना पाहून श्रीरामांनी दोन तीक्ष्ण अर्धचंद्राकार बाण घेऊन त्याच्या द्वारा युद्धस्थळामध्ये त्या राक्षसाचे दोन्ही पायही उडवून दिले. ॥१६१॥
|
तौ तस्य पादौ प्रदिशो दिशश्च गिरेर्गुहाश्चैव महार्णवं च । लङ्कां च सेनां कपिराक्षसानां विनादयन्तौ विनिपेततुश्च ॥ १६२ ॥
|
त्याचे दोन्ही पाय दिशा - विदिशा, पर्वत-कंदरा, महासागर, लंकापुरी तसेच वानर आणि राक्षसांच्या सेनांना प्रतिध्वनित करत पृथ्वीवर कोसळले. ॥१६२॥
|
निकृत्तबाहुर्विनिकृत्तपादो विदार्य वक्त्रं वडवामुखाभम् । दुद्राव रामं सहसाऽभिगर्जन् राहुर्यथा चन्द्रमिवान्तरिक्षे ॥ १६३ ॥
|
दोन्ही बाहु आणि पाय कापले गेल्यावर त्याने आपले वडवानलासारखे विकराळ मुख पसरले आणि जसा राहु आकाशात चंद्रम्याचा ग्रास घेतो त्याप्रकारे तो राक्षस श्रीरामांना ग्रसण्यासाठी भयानक गर्जना करत एकाएकी त्यांच्यावर तुटून पडला. ॥१६३॥
|
अपूरयत् तस्य मुखं शिताग्रै रामः शरैर्हेमपिनद्धपुङ्खैः । स पूर्णवक्त्रो न शशाक वक्तुं चुकूज कृच्छ्रेण मुमूर्च्छ चापि ॥ १६४ ॥
|
तेव्हा श्रीरामचंद्रांनी सुवर्णजडित पंख असणार्या आपल्या तीक्ष्ण बाणांनी त्याचे तोंड भरून टाकले. तोंड भरून गेल्याने तो बोलण्यासही असमर्थ झाला आणि मोठ्या कष्टाने आर्तनाद करून तो मूर्च्छित झाला. ॥१६४॥
|
अथाददे सूर्यमरीचिकल्पं स ब्रह्मदण्डान्तककालकल्पम् । अरिष्टमैन्द्रं निशितं सुपुङ्खं रामः शरं मारुततुल्यवेगम् ॥ १६५ ॥
तं वज्रजाम्बूनदचारुपुङ्खं प्रदीप्तसूर्यज्वलनप्रकाशम् । महेन्द्रवज्राशनितुल्यवेगं रामः प्रचिक्षेप निशाचराय ॥ १६६ ॥
|
त्यानंतर भगवान् श्रीरामांनी ब्रह्मदण्ड तसेच विनाशकारी काळासमान भयंकर आणि तीक्ष्ण बाण, जो सूर्यकिरणांप्रमाणे उद्दीप्त, इंद्रास्त्रानी अभिमंत्रित , शत्रुनाशक, तेजस्वी, सूर्य आणि प्रज्वलित अग्निप्रमाणे देदिप्यमान, हिरे आणि सुवर्णाने विभूषित सुंदर पंखांनी युक्त, वायु तसेच इंद्राच्या वज्र आणि अशनिसमान वेगशाली होता, हातात घेतला आणि त्या निशाचराला लक्ष्य करून सोडून दिला. ॥१६५-१६६॥
|
स सायको राघवबाहुचोदितो दिशः स्वभासा दश संप्रकाशयन् । सधूमवैश्वानरभीमदर्शनो जगाम शक्राशनिभीमविक्रमः ॥ १६७ ॥
|
राघवांच्या भुजांनी प्रेरित होऊन तो बाण आपल्या प्रभेने दाही दिशांना प्रकाशित करत इंद्राच्या वज्राप्रमाणे भयंकर वेगाने निघाला. तो धूमरहित अग्निसमान भयानक दिसून येत होता. ॥१६७॥
|
स तन्महापर्वतकूटसंनिभं विवृत्तदंष्ट्रं चलचारुकुण्डलम् । चकर्त रक्षोऽधिपतेः शिरस्तथा यथैव वृत्रस्य पुरा पुरंदरः ॥ १६८ ॥
|
जसे पूर्वकाळी देवराज इंद्रांनी वृत्रासुराचे मस्तक कापून टाकले होते त्याच प्रकारे त्या बाणाने राक्षसराज कुंभकर्णाचे महान् पर्वतशिखरासमान उंच सुंदर गोलाकार दाढांनी युक्त तसेच हलणार्या मनोहर कुण्डलांनी अलंकृत मस्तकाला धडापासून वेगळे करून टाकले. ॥१६८॥
|
कुंभकर्णशिरो भाति कुण्डलालंकृतं महत् । आदित्येऽभ्युदिते रात्रौ मध्यस्थ इव चन्द्रमाः ॥ १६९ ॥
|
कुंभकर्णाचे ते कुंडालांनी अलंकृत विशाल मस्तक प्रातःकाळी सूर्योदय झाल्यावर आकाशाच्या मध्यभागी विराजमान चंद्रप्रमाणे निस्तेज प्रतीत होत होते. ॥१६९॥
|
तद् रामबाणाभिहतं पपात रक्षःशिरः पर्वतसंनिकाशम् । बभञ्ज चर्यागृहगोपुराणि प्राकारमुच्चं तमपातयच्च ॥ १७० ॥
|
श्रीरामांच्या बाणांनी तुटलेले राक्षसाचे ते पर्वताकार मस्तक लंकेमध्ये जाऊन पडले. त्याने आपल्या धक्क्याने रस्त्याच्या आसपासची कित्येक घरे, दरवाजे आणि उंच तटबंधांना धराशायी करून टाकले. ॥१७०॥
|
तच्चातिकायं हिमवत् प्रकाशं रक्षस्ततदा तोयनिधौ पपात । ग्राहान् परान् मीनवरान् भुजङ्गान् ममर्द भूमिं च तथा विवेश ॥ १७१ ॥
|
याच प्रकारे त्या राक्षसाचे विशाल धड, जे हिमालयासमान वाटत होते, तात्काळ समुद्राच्या जलात जाऊन पडले आणि मोठ मोठ्या ग्राहांना, मत्स्यांना आणि सापांना चिरडून टाकत पृथ्वीच्या आत सामावून गेले. ॥१७१॥
|
तस्मिन् हते ब्राह्मणदेवशत्रौ महाबले संयति कुंभकर्णे । चचाल भूर्भूमिधराश्च सर्वे हर्षाच्च देवास्तुमुलं प्रणेदुः ॥ १७२ ॥
|
ब्राह्मणांचे आणि देवतांचे शत्रु महाबली कुंभकर्ण युद्धात मारला गेल्यावर पृथ्वी डोलू लागली, पर्वत हलू लागले आणि संपूर्ण देवता हर्षाने भरून जाऊन तुमुल नाद करू लागल्या. ॥१७२॥
|
ततस्तु देवर्षिमहर्षिपन्नगाः सुराश्च भूतानि सुपर्णगुह्यकाः । सयक्षगन्धर्वगणा नभोगताः प्रहर्षिता रामपराक्रमेण ॥ १७३ ॥
|
त्यासमयी आकाशात उभे असलेले देवर्षि, महर्षि, सर्प, देवता, भूतगण, गरूड, गुह्यक, यक्ष आणि गंधर्वगण श्रीरामांचा पराक्रम पाहून फार प्रसन्न झाले. ॥१७३॥
|
ततस्तु ते तस्य वधेन भूरिणा मनस्विनो नैर्ऋतराजबान्धवाः । विनेदुरुच्चैर्व्यथिता रघूत्तमं हरिं समीक्ष्यैव यथा मतंगजाः ॥ १७४ ॥
|
कुंभकर्णाच्या महान् वधाने राक्षसराज रावणाच्या मनस्वी बंधुंना फार दुःख झाले. ते रघुकुलतिलक श्रीरामांकडे पाहून, जसे सिंहावर दृष्टि पडताच हत्ती चीत्कार करू लागतात त्याप्रकारे उच्चस्वरात रडू लागले, विलाप करू लागले. ॥१७४॥
|
स देवलोकस्य तमो निहत्य सूर्यो यथा राहुमुखाद् विमुक्तः । तथा व्यभासीद् हरिसैन्यमध्ये निहत्य रामो युधि कुंभकर्णम् ॥ १७५ ॥
|
देवसमूहाला दुःख देणार्या कुंभकर्णाचा युद्धात वध करून वानरसेनेमध्ये उभे असलेले भगवान् श्रीराम अंधकाराचा नाश करून राहुच्या मुखातून सुटलेल्या सूर्यदेवाप्रमाणे प्रकाशित होत होते. ॥१७५॥
|
प्रहर्षमीयुर्बहवश्च वानराः प्रबुद्धपद्मप्रतिमैरिवाननैः । अपूजयन् राघवमिष्टभागिनं हते रिपौ भीमबले नृपात्मजम् ॥ १७६ ॥
|
भयानक बलशाली शत्रु मारला गेल्याने बहुसंख्य वानरांना फार प्रसन्नता वाटली. त्यांची तोंडे विकसित कमलाप्रमाणे हर्षोल्हासाने फुलून गेली तसेच त्यांनी सफल मनोरथ झालेल्या राजकुमार भगवान् राघवांची भूरि भूरि प्रशंसा केली. ॥१७६॥
|
स कुंभकर्णं सुरसङ्घमर्दनं महत्सु युद्धेषु कदाचनाजितम् । ननन्द हत्वा भरताग्रजो रणे महासुरं वृत्रमिवामराधिपः ॥ १७७ ॥
|
जो मोठ मोठ्या युद्धातही कधी पराजित झाला नव्हता तसेच देवतांच्या सेनेलाही चिरडून टाकणारा होता त्या महान् राक्षस कुंभकर्णाला रणभूमीमध्ये मारून भरताग्रज श्रीरामांना, देवराज इंद्रांना वृत्तासुराचा वध करून जशी प्रसन्नता वाटली होती, तशी प्रसन्नता वाटली. ॥१७७॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे सप्तषष्टितमः सर्गः ॥ ६७ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा सदुसष्ठावा सर्ग पूरा झाला. ॥६७॥
|