॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय एकसष्टावा ॥
राम – रावण – युद्धवर्णन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
रावणाची गर्वोक्ती व गर्जना :
परिघें नमिलें रघुपतीं । तें न देखेच लंकापती ।
अति गर्वाची गर्वोन्मती । अंधवृत्ती होवोनि ठेली ॥ १ ॥
गर्वे गर्जत रावण । श्रीरामातें लक्षून ।
झणें करिसी पलायन । दशानन देखोनी ॥ २ ॥
वानरांचा आश्रय धरून । मजसीं करुं आलासि रण ।
त्यांसहित तुज निवटीन । अर्धक्षण न लागतां ॥ ३ ॥
आम्हां राक्षसांचें भक्ष । देखा मनुष्य प्रत्यक्ष ।
वानरभार सावकाश । कोशिंबिरीस न पुरती ॥ ४ ॥
ते तुम्ही आज मजसीं । रणीं भिडलां रणमारेंसीं ।
तैं उबगलेती जगासी । पाहूं आतां पुरुषार्था ॥ ५ ॥
स्त्रिये मारिलें ताटकेसी । मारिलें मारीच मृगासी ।
इतुक्यासाठीं आपणासीं । संभावितोसी वीरवृत्ती ॥ ६ ॥
जुनें कीडखादलें कांबिट । ओढितां मोडलें अवचट ।
तेणें बळें वीर उद्भट । तुज मर्कट मानिती ॥ ७ ॥
बापुडें परशुराम ब्राह्मण । त्यापुढें तुझी आंगवण ।
वनीं धाडिलें भेडसावून । तें विंदान येथें चालेना ॥ ८ ॥
युद्ध न करवेचि समरांगणीं । वाळी मारिला कपटेंकरोनी ।
तेणें निर्भात्सिले ते क्षणीं । लाज मनीं असेना ॥ ९ ॥
नळाच्या हातीं तरती शिळा । तो सेतु रामें बांधिला ।
मूर्ख बोलती या बोला । ताठा चढला तुज तेणें ॥ १० ॥
आतां जाणवेल बळ । करोनि दावीं रणकल्लोळ ।
म्हणोनि गर्जत तोंडाळ । पण मनीं प्रबळ धुकधुक ॥ ११ ॥
परिघ तुटल्यावर रामांनी जमिनीवरुन युद्ध सुरु केले :
जेंवी कां पुळियीचा कांटा । पुढें तिखट मागें पोंचटा ।
तेंवी रावण वीर लाठा । रणचौहटां गर्जत ॥ १२ ॥
येरीकडे रघुनंदन । ध्वज तुटला देखोन ।
तळीं उतरला आपण । रणकंदन करावया ॥ १३ ॥
म्हणोनियां स्यंदन । स्वयें सोडी रघुनंदन ।
रथाचें मज कार्य कोण । करीन रण निजांगीं ॥ १४ ॥
आरुढोनि रथासी । जरी निवटीन रावणासी ।
लौकिकीं प्रथा होईल ऐसी । सामर्थ्य रामासीं असेना ॥ १५ ॥
रथबळेंकरोनि जाण । रणीं निवटिला रावण ।
एवढी अपकीर्ति साहे कोण । म्हणोनि आपण उतरला ॥ १६ ॥
रावणाची गर्जना :
तें देखोनि रावण । अधिक गर्जे संतोषोन ।
राम विरधि केला जाण । हाक फोडून गर्जत ॥ १७ ॥
अहंरावण निजमदेंसीं । सज्जोनि निर्वाणशस्त्रासी ।
वेगीं चालिला क्रोधावेशीं । रणीं रामासीं भिडावया ॥ १८ ॥
निजाभिमानाची सामग्री । रावणें घेवोनि झडकरी ।
पतंग झेंपावे दीपावरी । तेंवी श्रीरामावरी चालिला ॥ १९ ॥
स्वर्गात प्रचंड खळबळ व श्रीविष्णूंची प्रार्थना :
देखोनि रावणाच्या बळा । स्वर्गी सुटला खळबळा ।
आकांत सुरसिद्धां सकळां । जगतीतळा आकांत ॥ २० ॥
दुर्धर देखोनि रावण । स्वर्गी सुरसिद्धगण ।
मिळोनियां सकळ जन । विष्णूचें स्तवन आरंभिलें ॥ २१ ॥
धांव पाव गा आच्युता । भक्तवत्सला अनाथनाथा ।
पावावें सुरकार्यार्था । लंकानाथा निवटावया ॥ २२ ॥
साह्य होवोनि श्रीरामासी । निवटोनियां लंकेशासी ।
संरक्षावें निजभक्तांसी । बंदिमोचनासी करवोनी ॥ २३ ॥
राम वधीना रावण । तैं बंदिमोचन करी कोण ।
कष्टताती सुरगण । त्यांचें स्थापन करावें ॥ २४ ॥
ऐसी भाकितां करुणा । कळों सरली रघुनंदना ।
देवांचा देव रामराणा । सुखी सुरगणा करीतसे ॥ २५ ॥
राम रणरंगधीर । सुखी करावया सुरवर ।
हातीं धरोनि धनुष्यशर । वधावया दशशिर तिष्ठत ॥ २६ ॥
आत्माराम व अहंरावण युद्ध, श्रीराम युद्धार्थ सिद्ध :
विचित्र शस्त्रें विदग्धें । रावण हाणी निजमदें ।
राम छेदील निमेषार्धे । श्रोते आनंदें परिसोत ॥ २७ ॥
आत्माराम अहंरावण । दोघांचें युद्ध अति दारुण ।
अंतरक्रियेचें विंदान । सावधान परिसावें ॥ २८ ॥
महामायेचें करोनि लाघव । बंदी घातले इंद्रादिदेव ।
सेवा घेतसे अपूर्व । नित्य विषय भरडणें ॥ २९ ॥
सेविलेंचि पुनःपुनःजाण । अहर्निशीं विषयसेवन ।
दळिलेंचि पिष्टपेषण । निजबळें जाण करवित ॥ ३० ॥
काल भोगिलें ज्या विषयासी । सवेंचि आज आणावी त्यासी ।
उसंत नाहीं अहर्निशीं । उबग चित्तासीं उपजेना ॥ ३१ ॥
दशेंद्रियें अलोलिक । तेंचि रावणाचें दशमुख ।
केव्हांही न पवे तृप्तिसुख । जरी त्रैलोक्य चघळिलें ॥ ३२ ॥
विचित्र वानसेचें जुंबाड । तेचि अनावर बाहुदंड ।
कवळितां सगळें ब्रह्मांड । न पुरे कोड दशमुखा ॥ ३३ ॥
उघडी ममतेची दांताळी । चाटीत लोभाची अवाळीं ।
विकल्पाचे चाकळे चघळी । सदा काळीं समसमित ॥ ३४ ॥
ओढोनि कामाचा मेढा । संकल्पबाण धडपुढा ।
विंधावया रावण गाढा । श्रीरामापुढां चालिला ॥ ३५ ॥
निजहितीं कळवळा पूर्ण । ज्यांसीं अत्यंत असेल जाण ।
त्यांहीं सर्वांगाचे कान । करुनि श्रवण करावें ॥ ३६ ॥
श्रीरामरावणांचें रण । वदावया मज कैंचे वदन ।
अंग पंगु मुकें दीन । अर्थज्ञान मज कैंचें ॥ ३७ ॥
ऐसिया मज अनाथासी । जनार्दनें निजावेशीं ।
आज्ञापिलें अति प्रीतीसीं निजगुणासी गावया ॥ ३८ ॥
मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम् ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ॥१॥
त्या अतुलनीय युद्धाचे वर्णन :
भगवंताची कृपा घडे । तैं पांगुळही पर्वत चढे ।
मुकियासी वाचा जोडे । बाले होडें बृहस्पतीसीं ॥ ३९ ॥
उपनिषदांचा मथितार्थ । त्याच्या जिव्हाग्रीं नित्य नाचत ।
वेद वोसंगा रिघत । सावचित्त वाचेसीं ॥ ४० ॥
राजांक लागे जियेसीं । राजपदीं चढे ते दासी ।
राजवर्गी मानिती तिसी । समर्थाची ऐसी निजकृपा ॥ ४१ ॥
जनार्दनें तैसें केलें । रंक रजपदीं बैसविलें ।
रामचरित्र बोलविलें । मधुर बोलें मजकरवीं ॥ ४२ ॥
मजमाजी प्रवेशोन । माझे वदनीं घालोनि वदन ।
वक्ता एक जनार्दन । रसाळ रामायण वदवीत ॥ ४३ ॥
माझें जें कां मीपण । साचार एका जनार्दन ।
तेणें निजसामर्थ्येकरोन । निजनिरुपण चालत ॥ ४४ ॥
चतुराची कळा ऐसी । केवळ कोरड्या काष्ठासी ।
जवळी घेवोनि प्रीतींसीं । युक्तिविशेषीं कमावित ॥ ४५ ॥
तंति लावोनि अद्भुत । रागोद्धार करी त्यांत ।
सज्जनांते रिझवित । ते कळा निश्चित कर्त्याची ॥ ४६ ॥
ऐकतां चतुर्विध जन । सकळ पावती समाधान ।
हें काष्ठसामर्थ्य नव्हे जाण । कळा संपूर्ण कर्त्याची ॥ ४७ ॥
त्या यंत्राचे परी जाण । माझेनि वदने स्वयें आपण ।
वक्ता एक जनार्दन । श्रीरामगुण गातसे ॥ ४८ ॥
निजवैभव प्रकाशावयासी । मजहातें लिहविलें ग्रंथासी ।
संबंध नाहीं मजसीं । जेंवी साईखड्यासी सूत्रधार ॥ ४९ ॥
असो आतां परिहारता । परिहार नावडे श्रीगुरुनाथा ।
स्वयेंचि कर्ता करविता । या बोलाचाही वक्ता श्रीगुरु ॥ ५० ॥
अतींद्रियता :
पुढें रामरावणवृत्तांत । विषयाचा मेढा लंकानाथ ।
ओढी काढोनि उपरमत । श्रीरघुनाथ विंधावया ॥ ५१ ॥
विचित्र संकल्पाचें अनुसंधान । परिसा त्याचेंही लक्षण ।
ममताभालीं अति दारुण । बळें रावण वर्षला ॥ ५२ ॥
तें देखोनि रघुपती । बाण सोडिला शूरवृत्ती ।
तेणें ममतेची केली शांती । तेही स्थिती अवधारा ॥ ५३ ॥
जरी असावें दुजेपण । ममता त्यासी करी कंदन ।
चरचरीं रघुनंदन । ममता पूर्ण निमाली ॥ ५४ ॥
ममतेच्या निजशरीरीं । राम व्यापक बाह्यांतरीं ।
तेणेंचि जाहली बोहरी । धनुष्य करीं छेदिलें ॥ ५५ ॥
दुजेपणाच्या निजनेटीं । सबळ रावणाची धनुर्वटी ।
विवेकाची आगी मोठी । धनुष्य मुष्टीचें जाळिलें ॥ ५६ ॥
भेटी होतां विवेकममतेसीं । वैराग्यभडका वेगेंसीं ।
उठिला तेणें आवेशीं । विषयधनुष्यासी जाळिलें ॥ ५७ ॥
निर्वाणींचें विषयधनुष्य । जळतां दुःख रावणास ।
घालोनियां श्वासोच्छवास । उद्विग्नमानस स्वयें झाला ॥ ५८ ॥
विशेष धनुष्याची सामग्री । संग्रहिली होती भारी ।
त्याची सांडी झाली पुरी । निःशेष करी श्रीराम ॥ ५९ ॥
आतां कायसी रथगती । म्हणोनि झाला पदाती ।
सक्रोध भाला घेवोनि हातीं । स्वयें रघुपती हाणों आला ॥ ६० ॥
निजरथा मागें सांडोन । पायीं धांवोनि रावण ।
लक्षोनियां रघुनंदन । हाणी दारुण धगधगित ॥ ६१ ॥
तें देखोनियां जाळ । डळमलीना रघुनंदन ।
सबाह्य शांतीचें कल्याण । क्रोधाचरण तेथें न चले ॥ ६२ ॥
आधीं सहजचि रघुनाथा । सबाह्य शांतिचा परिघ होता ।
तेणें क्रोधा प्राणांतव्यथा । निजसत्ता विसरला ॥ ६३ ॥
अप्राप्तकामें क्रोध उठी । श्रीरामातें पाहतां दृष्टीं ।
अप्राप्तीची कायसी गोष्टी । पूर्णकाम सृष्टीं राम ॥ ६४ ॥
श्रीरामाचें स्मरतां नाम । दृष्टी वोळंगती सकळ काम ।
भक्तकामकल्पद्रुम । तो क्रोधा श्रीराम केवि साधे ॥ ६५ ॥
देखतां श्रीरामाची मूर्ती । अप्राप्तता निमाली निश्चितीं ।
झाली क्रोधाची उपशांती । लंकापती थोंटावला ॥ ६६ ॥
तेणें आवेश दशशिरीं । मग प्रपंचकोशाभीतरीं ।
निजांगीं होती कामना सुरी । तिखट भारी आशाधार ॥ ६७ ॥
तेणें आवेश दशशिरीं जाण । रघुनंदन सोडी नैराश्याचा बाण ।
तेणें आशासुरी उठविली जाण । कामना संपूर्ण निवटिली ॥ ५८ ॥
सवेंचि रावण अत्युग्र । अविद्येचें निजशास्त्र ।
सोडिलें वासनेचें वज्र । श्रीरघुवीर दंडावया ॥ ६९ ॥
श्रीराम धनुर्धारी नेटक । वज्र निवटावया देख ।
निर्वासनेचा तोमर चोख । एकाएक सोडिला ॥ ७० ॥
राम धनुर्वाडा विचित्र । वज्रावरी योजिला तोमर ।
तेणें भेदोनि सत्वर । केला दशवक्त्र तटस्थ ॥ ७१ ॥
अंतर्बाह्य दोन्ही रणें । केली दारुण रावनें ।
तितुकीं निरसिली रघुनंदनें । अर्धक्षणें करोनियां ॥ ७२ ॥
बाह्यारण शस्त्रास्त्रीं । कामक्रोधादिक अंतरीं ।
सामर्थ्य होतें दशाशिरी । रामें क्षणमात्रें उडविलें ॥ ७३ ॥
द्वेषबुद्धि रावण । करितां श्रीरामाचें ध्यान ।
अंतर क्षाळलें संपूर्ण । झाली बोळवण कामक्रोधां ॥ ७४ ॥
शुद्धांतः करणें रावण । निंदेचे मिषें जाण ।
स्तविता झाला रघुनंदन । श्रोते सावधान परिसोत ॥ ७५ ॥
लौकिक योद्धे रणाप्रती । सरल्या शस्त्रास्त्रसंपत्ती ।
तोंडबळे बडबडती । वल्गैजती इतस्ततां ॥ ७६ ॥
रावणाची प्रतिक्रिया व त्या दृष्टीने रामास आव्हान :
साधावया मोक्षश्री । रावण अवस्था भारी ।
निंदेमाजी स्तवन करी । निजगजरीं अति वोजा ॥ ७७ ॥
रावण अत्यंत विचक्षण । वरी वेदशास्त्रसंपन्न ।
करिता झाला वर्णन । रघुनंदनस्वरुप ॥ ७८ ॥
सूक्ष्मयुक्तिकुशळतेसीं । सोडोनियां वाच्यांशासी ।
अंगीकारोनि लक्ष्यांशासी । श्रीरामासी बोलत ॥ ७९ ॥
आधीं त्वंपद तो रावण । तें शोधोनियां जाण ।
आतां तत्पद श्रीरामाचें पूर्ण । स्वरुपवर्णन करीतसे ॥ ८० ॥
तत्पद आत्मारामीं जाण । शुद्ध श्रीरामाचें वर्णन ।
सूक्ष्म सर्वगत सनातन । पावावया जाण गर्जत ॥ ८१ ॥
निंदेचेनि मिषें जाण । शुद्ध श्रीरामाचें वर्णन ।
सुक्ष्म सर्वगत सनातन । स्वयें रावण अनुवादे ॥ ८२ ॥
रावण म्हणे श्रीरामासी । किती आतां कपट करिसी ।
ठकोनि मारिलें वाळीसी । तैसें मजसीं चालेना ॥ ८३ ॥
आणिक किती सांगों आतां । तुवां पूर्वी ठकविलें बहुतां ।
कोण म्हणोनि होसी पुसता । तेंही तत्वतां सांगेन ॥ ८४ ॥
तुज धरोनियां मानसीं । बहुत निघालें साधावयासी ।
शेखीं ठकवोनि तयांसी । दृश्य नव्हेसी सर्वथा ॥ ८५ ॥
लपोनि त्यांचा सर्वांगीं । सर्वथा न दिससी जगीं ।
शिणतां साधनीं अनेगीं । तोंड वेगीं न दाविसी ॥ ८६ ॥
कपटविद्या करोनि गाढी । तीमाजी देसी बुडी ।
वेडा लाविलीं बापुडीं । वाळोनि कर्वडीं पैं केलीं ॥ ८७ ॥
चौघी देवोनि श्रीरामा । आपणा म्हणविसी आत्मा ।
छळून घेसी भजनधर्मा । अति दुर्गमा साधनीं ॥ ८८ ॥
तुजलागीं मंत्र घेती । असंख्य पुरश्चरणें करिती ।
शेखीं तेही छळिलें निश्चितीं । निजात्मप्राप्ती चुकविली ॥ ८९ ॥
तें मजसीं न चले मत । मी जाणतसें समस्त ।
मंत्रामाजी जो मंत्रार्थ । तो तूं निश्चित श्रीरामा ॥ ९० ॥
मंत्रमंत्रामाजी अक्षर । ॐनमो ईत्यादि उच्चार ।
अक्षरीं अक्षर तूं रघुवीर । हें मी साचार जाणत ॥ ९१ ॥
पाठकें छळोनियां जाण । साधनीं लाविलें वेदपठण ।
कोरडी वाचेची ठणठण । लावूनि पूर्ण गोंविलें ॥ ९२ ॥
करितां दशग्रंथपठण । तेथेंचि छळिले संपूर्ण ।
उदात्त अनुदान स्वरित जाण । वाद विचक्षण घालिती ॥ ९३ ॥
ऐसें ठकवोनियां तयांसी । बापुडीं वेडा लाविलीसी ।
तैसें न चले मजसीं । तुझे लपणीसी जाणत ॥ ९४ ॥
वेदंमूळ तो ॐकार । तेथें तुझी लपणी थोर ।
अकार उकार मकार । त्रिमात्रा स्वर त्रिगुणातीत ॥ ९५ ॥
ऐसे पाठक ठकविले । तैसेचि पंडित नाडिले ।
बापुडियां कांही न कळे । गोंवून घातले विवादीं ॥ ९६ ॥
शास्त्रश्रवण साधन शुद्ध । त्यासही छळिलें प्रसिद्ध ।
केले अभिमानाचे विरुद्ध । बहुविध बहुयुक्तीचे ॥ ९७ ॥
मजसीं न चले तें विंदान । मी जाणातसें संपूर्ण ।
शास्त्रांमाजील जाणपण । लपणी जाण तें तुझी ॥ ९८ ॥
तेही घातले आडवाटा । चढला जाणपणाचा ताठा ।
तेणें न मनीं पैं वरिष्ठा । फुगारा मोठा गर्वाचा ॥ ९९ ॥
पंडितां न कळे हे स्थिती । शास्त्रांमाजी जे जे युक्ती ।
जाणिवा तेथें तुझी वसती । हे सांगती आणिका ॥ १०० ॥
जेंवी गूळउंसाचा घाणा । मुखींचा रस भरे भाणा ।
शब्दसोपटीं आपण जाणा । रितेपणा करकरी ॥ १ ॥
शास्त्रांमाजी जे जे युक्ती । ते ते केवळ चैतन्यस्फूर्ती ।
तेही वंचोनि तयांप्रती । अहंमती भुलविलें ॥ २ ॥
भोळीं बापुडीं याज्ञिकें । यज्ञद्वारा भरलीं एकें ।
त्यांसी गोंविलें कौतुकें । स्वर्गसुखे दावोनियां ॥ ३ ॥
कुंड साधिती अति व्युत्पत्ती । मेखळा परिमित साधिती ।
वेदी साधिती अति निगुतीं । मंडपप्रीतिकरोनियां ॥ ४ ॥
इध्मा बर्हि त्रिसंधान । विचित्र दर्भांचे परिस्तरण ।
त्याहीवरी पात्रासादन । युक्ती करोन मंडित ॥ ५ ॥
आणिती ओषधिसंभार । होमद्रव्य अति विचित्र ।
मेषश्येनादि परिकर । आणिती सत्वर यागासीं ॥ ६ ॥
अति युक्ति साधूनि अरणी । मंथन करिती कष्टेंकरोनी ।
तेथें प्रकटला जो अग्नी । तो कुंडीं आणोनी स्थापिती ॥ ७ ॥
तथे ॐकार वषट्कार । मंत्रघोषाचे उच्चार ।
ऋत्विज करिती अपार । स्वाहास्वधाकारविनियोगें ॥ ८ ॥
होते पोते उद्वाते । सुस्नात सावधचित्ते ।
आज्ञा पुसोनि यजमानातें । अवदानातें अर्पिती ॥ ९ ॥
न मम म्हणतां यजमान । ऋत्विज सोडिती अवदान ।
तेणें बळें याज्ञिक जन । स्वर्गभुवन वांछिती ॥ ११० ॥
पुण्यक्षयें तेथून पडती । परी नैश्वर्य न मानिती ।
ऐसी ठकलीं नेणों किती । तें मजप्रती चालेना ॥ ११ ॥
अहंयज्ञ व रावणाची गर्जना :
तेथील लपणीचें सूत्र । मी जाणतसें ।
कर्माकर्मीं सूक्ष्म सार । स्वरुपें साचार लपतोसी ॥ १२ ॥
अग्नि आज्य समिधा समग्र । कर्माकर्मीं सुक्ष्म तूं साचार ।
याज्ञिकां न कळें हे सूत्र । कर्मठपणे फार व्यापिले ॥ १३ ॥
यजमानाच्या क्रियाशक्ती । तेचि तुझी निजस्थिती ।
संन्यासीही त्याच रीतीं छळणोक्तीं नाडिले ॥ १४ ॥
विरजाहोम करोनि एक । जाळिले म्हणती कामादिक ।
शेखीं तिळतांदूळ जाळिले देख । कामक्रोधादिक अनसूट ॥ १५ ॥
गुरुपासोनि महावाक्य । ज्याकारणें घेतलें देख ।
तें राहिलें सकळिक । पूज्यत्वें चोख भुलविलें ॥ १६ ॥
आम्ही पूज्य परमहंस । म्हणोनि भुलविले त्यांस ।
विरले महावाक्यास । पंचीकरणास विसरले ॥ १७ ॥
सांडोनि स्वानंदस्फूर्ती । पूज्यत्वें भुलविले यती ।
तैसेंचि केले योग्यांप्रती । सांगूं किती कपटकर्म ॥ १८ ॥
एक ते पैं बापुडीं । तुज पहावया लवडसवडी ।
निघाले अति तांतडीं । ते घातले कडादीं योगाचिये ॥ १९ ॥
वारियावरी गालिसी । नाना सिद्धींसीं गोंविसी ।
ऐसा ठकवोनियां लपसी । वेडा लाविसी योगियां ॥ २० ॥
मग काढितां कडाडी । चढसी वैकुंठीचिया पहाडीं ।
नातरी शेषफडेबुडीं । निद्रामीषें लपतोसी ॥ २१ ॥
तेथोनि काढितां निर्धारीं । भेणे लपसी दशावतारीं ।
रुप धरितां सिंहशूकरीं । लाज निर्धारीं तुज नाहीं ॥ २२ ॥
साधतां न साधसी बहुतां । तो मज सांपडलासी आतां ।
झणें होसी तूं दुश्चिता । तेथोनि आतां ढळों नेदीं ॥ २३ ॥
ऐसा सिंहनादें रावण । गर्जता झाला आपण ।
तंव सारथि अति विचक्षण । तेणें विंदान साधिलें ॥ २४ ॥
राम धनुष्य तोडितां जाण । सोहं भावाचा मेढा कठिण ।
ठेविला होता आच्छादून । तो आणोन दीधला ॥ २५ ॥
हातीं पडतां धनष्यबाण । निष्कपट रणांगण ।
साधावया वीर रावण । काय आपण बोलत ॥ २६ ॥
श्रीरामें रणख्याती । करोनि सकळां दिधली मुक्ती ।
उरले जे तयांप्रती । लंकापती । लंकापति अनुवादे ॥ २७ ॥
आजीवरी म्यां केलें कपट । रामें त्याचें केले सपाट ।
आतां झालों मी चोखट । दशकंठ अति शुद्ध ॥ २८ ॥
सकळ सैन्यासमवेत । युद्धीं नाटोपे रघुनाथ ।
तो मी एकांगी लंकानाथ । राम निश्चित साधीन ॥ २९ ॥
करोनि लोटांगण तुम्हांसी । विनवितों मी सकळांसी ।
जो खड्गातें हातवशी । तेणें शिव पूजेसीं भेदिलें ॥ १३० ॥
तुम्हांसी शंकराची आण । कोणी न करावें युद्धत्राण ।
साक्षी होवोनि आपण । आंगव्ण पहावी ॥ ३१ ॥
श्रीराम आणि रावण रणीं । युद्धीं भिडती निर्वाणबाणीं ।
जय अपजय दोन्ही । कोण कोणालागूनी पैं होतो ॥ ३२ ॥
ऐसी सकळां विनवण । करितां झाला रावण ।
तें ऐकोनि रघुनंदन । स्वसैन्यालागून विनवित ॥ ३३ ॥
रावणाच्या निजमानसीं । बहुत दिवसें आधी ऐसी ।
समरांगणीं श्रीरामासीं । निजांगेसीं भिडावें ॥ ३४ ॥
ते रावणाचे मनोरथ । आजि फळले समस्त ।
रणीं भेटलों मी रघुनाथ । तेणें बहुत हरिखेल ॥ ३५ ॥
माझ्याही हेंचि मानसीं । रावणाच्या मनोरथासी ।
सिद्धि पाववीन रणभूमीसीं । मुक्ति रावणासी देऊनी ॥ ३६ ॥
यालागीं तुम्हीं समस्त । युद्धीं व्हावें निवांत ।
राम आणि लंकानाथ । कैसे रणांत भिडतील ॥ ३७ ॥
साक्षी होवोनियां तुम्हीं । पहावी दोघांची रणभूमी ।
जाणोनि रिघे जो संग्रामी । आणि दुर्गमी तयासी ॥ ३८ ॥
जाणोनि निघेल युद्धासीं । अदंडें दंडीन मी त्यासी ।
ऐसें बोलतां राघवासी । कांप सकळांसी पैं आला ॥ ३९ ॥
वेदतुल्य तुझी आज्ञा । कोण करुं शके अवज्ञा ।
लागले श्रीरामचरणां । तुझी वंद्य आज्ञा आम्हांसी ॥ १४० ॥
तंव रावण अति कडाडीं । गर्जोनियां हाक फोडी ।
बाण काढोनियां तांतडी । राम निर्वडी विंधूं पाहे ॥ ४१ ॥
परम प्रीति लंकानाथा । रणीं श्रीरामासीं भिडतां ।
कोण बाणली अवस्था । सावध श्रोतां परिसावी ॥ ४२ ॥
भेदोनियां ब्रह्मांडासी । विश्वात्मक श्रीरामासी ।
देखतां रावण हर्षासीं । निजधर्मासी विसरला ॥ ४३ ॥
एका जनार्दना शरण । श्रीरामासीं करितां रण ।
स्वयें विसरोनि रावणण । श्रीराम आपण होईल ॥ १४४ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटिकायां रामरावणयुद्धप्रसंगो नाम एकषष्टितमोऽध्यायः ॥ ६१ ॥
ओंव्या ॥ १४४ ॥ श्लोक ॥ १ ॥ एवं ॥ १४५ ॥
GO TOP
|