कौसल्यायाः समक्षे भरतस्य शपथः -
|
कौसल्येसमोर भरताचे शपथ घेणे -
|
दीर्घकालात् समुत्थाय संज्ञां लब्ध्वा च वीर्यवान् ।
नेत्राभ्यामश्रुपूर्णाभ्यां दीनामुद्वीक्ष्व मातरम् ॥ १ ॥
सोऽमात्यमध्ये भरतो जननीमभ्यकुत्सयत् ।
|
बर्याच वेळाने शुद्धीवर आल्यावर जेव्हा पराक्रमी भरत उठले तेव्हा डोळ्यात अश्रु आलेल्या आणि दीन होऊन बसलेल्या मातेकडे पाहून मंत्र्यांच्या समक्ष तिची निंदा करीत म्हणाले - ॥ १-१/२ ॥
|
राज्यं न कामये जातु मन्त्रये नापि मातरम् ॥ २ ॥
अभिषेकं न जानामि योऽभूद् राज्ञा समीक्षितः ।
विप्रकृष्टे ह्यहं देशे शत्रुघ्नसहितोऽभवम् ॥ ३ ॥
|
मंत्रिवर हो ! मी राज्य इच्छित नाही आणि मी मातेशी याविषयी कधी चर्चाही केली नव्हती. महाराजांनी ज्या अभिषेकाचा निश्चय केला होता त्याचा मला पत्ता नव्हता, कारण त्यासमयी मी शत्रुघ्नासह दूरदेशात होतो. ॥ २-३ ॥
|
वनवासं न जानामि रामस्याहं महात्मनः ।
विवासनं वा सौमित्रेः सीतायाश्च यथाभवत् ॥ ४ ॥
|
’महात्मा श्रीरामांचा वनवास आणि सीता तसेच लक्ष्मणाच्या निर्वासनाचे ही मला ज्ञान नाही की ते केव्हा आणि कसे झाले ?" ॥ ४ ॥
|
तथैव क्रोशतस्तस्य भरतस्य महात्मनः ।
कौसल्या शब्दमाज्ञाय सुमित्रां चेदमब्रवीत् ॥ ५ ॥
|
महात्मा भरत ज्यावेळी याप्रकारे आपल्या मातेला दोष देत होते, त्यावेळी त्यांचा आवाज ओळखून कौसल्येने सुमित्रेला या प्रकारे म्हटले-- ॥ ५ ॥
|
आगतः क्रूरकार्यायाः कैकेय्या भरतः सुतः ।
तमहं द्रष्टुमिच्छामि भरतं दीर्घदर्शिनम् ॥ ६ ॥
|
’क्रूर कर्म करणार्या कैकेयीचा पुत्र भरत आलेला आहे. तो फार दूरदर्शी आहे म्हणून मी त्याला पाहू इच्छिते. ॥ ६ ॥
|
एवमुक्त्वा सुमित्रां तां विवर्णवदना कृशा ।
प्रतस्थे भरतो यत्र वेपमाना विचेतना ॥ ७ ॥
|
सुमित्रेला असे म्हणून उदास मुख असलेली, दुर्बळ आणि अचेत झाल्यासारखी कौसल्या जेथे भरत होते त्या स्थानी जाण्यासाठी कापत कापत निघाली. ॥ ७ ॥
|
स तु रामात्मजश्चापि शत्रुघ्नसहिस्तदा ।
प्रतस्थे भरतो यत्र कौसल्याया निवेशनम् ॥ ८ ॥
|
त्याचवेळी तिकडून राजकुमार भरतही शत्रुघ्नासह त्याच मार्गाने येतच होते, ज्या मार्गाने कौसल्येच्या महालात ये जा होत असे. ॥ ८ ॥
|
ततः शत्रुघ्नभरतौ कौसल्यां प्रेक्ष्य दुःखितौ ।
पर्यष्वजेतां दुःखार्तां पतितां नष्टचेतनाम् ॥ ९ ॥
रुदन्तौ रुदती दुःखात् समेत्यार्या मनस्विनीम् ।
भरतं प्रत्युवाचेदं कौसल्या भृशदुःखिता ॥ १० ॥
|
त्यानंतर शत्रुघ्न आणि भरतांनी दुरूनच पाहिले की माता कौसल्या दुःखाने व्याकुळ आणि अचेत होऊन पृथ्वीवर पडलेली आहे. हे पाहून त्यांना फार दुःख झाले आणि ते धावत जाऊन तिच्या कुशीत शिरले आणि हमसा-हमशी रडू लागले. आर्या मनस्विनी कौसल्याही दुःखाने रडू लागली आणि त्यांना छातीशी कवळून अत्यंत दुःखित होऊन भरताला याप्रकारे बोलली - ॥ ९-१० ॥
|
इदं ते राज्यकामस्य राज्यं प्राप्तमकण्टकम् ।
सम्प्राप्तं बत कैकेय्या शीघ्रं क्रूरेण कर्मणा ॥ ११ ॥
|
’मुला ! तुला राज्य हवे होते ना ? म्हणून हे निष्कण्टक राज्य तुला प्राप्त झाले आहे. परंतु खेद याचा वाटतो की कैकेयीने उतावळेपणा मुळे अत्यंत क्रूर कर्माच्या द्वारे हे मिळवले आहे. ॥ ११ ॥
|
प्रस्थाप्य चीरवसनं पुत्रं मे वनवासिनम् ।
कैकेयी कं गुणं तत्र पश्यति क्रूरदर्शिनी ॥ १२ ॥
|
’क्रूरतापूर्ण दृष्टी ठेवणार्या कैकेयीने न जाणो यात काय लाभ पाहिला की तिने माझ्या मुलाला चीर-वस्त्र नेसवून वनात धाडून दिले आणि त्याला वनवासी बनविले. ॥ १२ ॥
|
क्षिप्रं मामपि कैकेयी प्रस्थापयितुमर्हति ।
हिरण्यनाभो यत्रास्ते सुतो मे सुमहायशाः ॥ १३ ॥
|
’आता कैकेयीने तात्काळ जेथे यावेळी सुवर्णमय नाभिने सुशोभित माझे महायशस्वी पुत्र श्रीराम आहेत त्या स्थानी मलाही धाडून दिले पाहिजे. ॥ १३ ॥
|
अथवा स्वयमेवाहं सुमित्रानुचरा सुखम् ।
अग्निहोत्रं पुरस्कृत्य प्रस्थास्ये यत्र राघवः ॥ १४ ॥
|
’अथवा सुमित्रेला बरोबर घेऊन आणि अग्निहोत्र पुढे ठेवून मी स्वतःच सुखपूर्वक जेथे श्रीराम निवास करीत आहेत त्या स्थानी प्रस्थान करीन. ॥ १४ ॥
|
कामं वा स्वयमेवाद्य तत्र मां नेतुमर्हसि ।
यत्रासौ पुरुषव्याघ्रस्तप्यते मे सुतस्तपः ॥ १५ ॥
|
’अथवा तू स्वतःच आपल्या इच्छेस अनुसरून आता मला जेथे माझे पुत्र पुरूषसिंह श्रीराम तप करीत आहेत तेथे पोहोचते कर. ॥ १५ ॥
|
इदं हि तव विस्तीर्णं धनधान्यसमाचितम् ।
हस्त्यश्वरथसम्पूर्णं राज्यं निर्यातितं तया ॥ १६ ॥
|
’हे धन-धान्यानी सम्पन्न आणि हत्ती, घोडे, रथ आदिंनी परिपूर्ण विस्तृत राज्य कैकेयीने (श्रीरामापासून हिरावून घेऊन) तुला देवविले आहे. ॥ १६ ॥
|
इत्यादिबहुभिर्वाक्यैः क्रूरैः संभर्त्सितोऽनघः ।
विव्यथे भरतोऽतीव व्रणे तुद्येव सूचिना ॥ १७ ॥
|
या प्रकारे बरीचसी कठोर वचने बोलून जेव्हा कौसल्येने निरपराध भरतांची निर्भत्सना केली तेव्हा त्यांना फार पीडा झाली; जणु काही कुणी घावात सुई खुपसली असावी. ॥ १७ ॥
|
पपात चरणौ तस्यास्तदा सम्भ्रान्तचेतनः ।
विलप्य बहुधासंज्ञो लब्धसंज्ञस्तदाभवत् ॥ १८ ॥
|
ते कौसल्येच्या चरणावर पडले, त्यावेळी त्यांच्या चित्तात फारच भिती उत्पन्न झाली होती. ते वारंवार विलाप करून अचेत (निश्चेष्ट) झाल्यासारखे झाले. थोड्या वेळाने त्यांना परत शुद्धी आली. ॥ १८ ॥
|
एवं विलपमानां तां भरतः प्राञ्जलिस्तदा ।
कौसल्यां प्रत्युवाचेदं शोकैर्बहुभिरावृताम् ॥ १९ ॥
|
तेव्ह भरत अनेक प्रकारच्या शोकांनी घेरलेल्या आणि पूर्वोक्त रूपाने विलाप करणार्या कौसल्येला हात जोडून याप्रमाणे म्हणाले- ॥ १९ ॥
|
आर्ये कस्मादजानन्तं गर्हसे मामकल्मषम् ।
विपुलां च मम प्रीतिं स्थिरां जानासि राघवे ॥ २० ॥
|
’आर्ये ! येथे जे काही झाले आहे, त्याची मला बिलकुल माहिती नव्हती. मी सर्वथा निरपराध आहे तरीही आपण मला का दोष देत आहात ? आपण तर जाणता की राघवाच्या ठिकाणी माझे किती प्रगाढ प्रेम आहे. ॥ २० ॥
|
कृतशास्त्रानुगा बुद्धिर्मा भूत् तस्य कदाचन ।
सत्यसंधः सतां श्रेष्ठो यस्यार्योऽनुमते गतः ॥ २१ ॥
|
’ज्याच्या अनुमतीने सत्पुरूषांमध्ये श्रेष्ठ, सत्यप्रतिज्ञ आर्य श्रीराम वनात गेले असतील त्या पाप्याची बुद्धी कधी गुरूपासून शिकलेल्या शास्त्रात सांगितले गेलेल्या मार्गाचे अनुसरण करणारी न होवो. ॥ २१ ॥
|
प्रैष्यं पापीयसां यातु सूर्यं च प्रति मेहतु ।
हन्तु पादेन गां सुप्ता यस्यार्योऽनुमते गतः ॥ २२ ॥
|
’ज्याच्या सल्याने मोठे बंधु श्रीरामांना वनात जावे लागले असेल, तो अत्यंत पापीलोकांचा- हीन जातीचा सेवक होवो. सूर्याकडे तोंड करून मळमूत्राचा त्याग करो आणि झोपलेल्या गायींना लाथांनी मारो. (अर्थात तो या पापकर्माच्या दुष्परिणामांना भोगो. ) ॥ २२ ॥
|
कारयित्वा महत् कर्म भर्त्ता भृत्यमनर्थकम् ।
अधर्मो योऽस्य सोऽस्यास्तु यस्यार्योऽनुमते गतः ॥ २३ ॥
|
’ज्याच्या सम्मतिने बंधु श्रीरामांना वनास प्रस्थान करावे लागले असेल, त्याला सेवका कडून भारी काम करून घेऊन त्यांस समुचित वेतन न देणार्या (त्याच्या) स्वामीला जे पाप लागते ते लागो. ॥ २३ ॥
|
परिपालयमानस्य राज्ञो भूतानि पुत्रवत् ।
ततस्तु द्रुह्यतां पापं यस्यार्योऽनुमते गतः ॥ २४ ॥
|
’ज्याच्या सांगण्यावरून आर्य श्रीरामांना वनात पाठवले गेले असेल त्याला समस्त प्राण्यांचे पुत्राप्रमाणे पालन करणार्या राजाशी द्रोह करणार्या लोकांना जे पाप लागते ते लागो. ॥ २४ ॥
|
बलिषड्भागमुद्धृत्य नृपस्यारक्षितुः प्रजाः ।
अधर्मो योऽस्य सोऽस्यास्तु यस्यार्योऽनुमते गतः ॥ २५ ॥
|
’ज्यांच्या अनुमतीने आर्य श्रीराम वनात गेले असतील तो, प्रजेकडून तिच्या जमेच्या सहावा भाग घेऊनही प्रजावर्गाचे रक्षण न करणार्या राजाला जो अधर्म प्राप्त होते त्या अधर्माचा भागी होवो. ॥ २५ ॥
|
संश्रुत्य च तपस्विभ्यः सत्रे वै यज्ञदक्षिणाम् ।
तां चापलतां पापं यस्यार्योऽनुमते गतः ॥ २६ ॥
|
’ज्याच्या सल्याने बंधु श्रीरामांना वनात जावे लागले असेल त्याला, यज्ञात कष्ट सहन करणार्या ऋत्विजांना दक्षिणा देण्याची प्रतिज्ञा करून नंतर ती नाकारणार्या लोकांना जे पाप लागते, ते लागो. ॥ २६ ॥
|
हस्त्यश्वरथसम्बाधे युद्धे शस्त्रसमाकुले ।
मा स्म कार्षीत् सतां धर्मं यस्यार्योऽनुमते गतः ॥ २७ ॥
|
’हत्ती, घोडे आणि रथानी भरलेल्या आणि अस्त्रशस्त्रांनी व्याप्त संग्रामात सत्पुरुषांच्या धर्माचे पालन न करणार्या योद्धांना जे पाप लागते, तेच पाप ज्याच्या सम्मतिने आर्य श्रीरामांना वनात पाठवले गेले असेल त्या मनुष्यास लागो. ॥ २७ ॥
|
उपदिष्टं सुसूक्ष्मार्थं शास्त्रं यत्नेन धीमता ।
स नाशयतु दुष्टात्मा यस्यार्योऽनुमते गतः ॥ २८ ॥
|
ज्याच्या सल्ल्याचे निमित्त होऊन आर्यपुत्र श्रीरामांना वनागमन करणे भाग झाले आहे त्या दुष्टात्म्याचे, त्याला बुद्धिमान गुरूंकडून प्राप्त झालेले, आणि त्याने प्रयत्नपूर्वक, कष्ट घेऊन संपादन केलेले श्स्त्रांचे सूक्ष्म ज्ञान व गुरुपदेश तत्काळ नष्ट होवो. ॥ २८ ॥
|
मा च तं व्यूढबाह्वं सं चन्द्रभास्कतेजसम् ।
द्राक्षीद् राज्यस्थमासीनं यस्यार्योऽनुमते गतः ॥ २९ ॥
|
’ज्याच्या सल्ल्याने ज्येष्ठ भ्राता श्रीरामांना वनात पाठवले गेले असेल, तो मनुष्य, चंद्र-सूर्यासमान तेजस्वी तसेच विशाल भुजा आणि खाद्यांनी सुशोभित श्रीरामचंद्रांना राज्यसिंहासनावर विराजमान झालेले पाहू न शको- तो राजा श्रीरामांच्या दर्शनापासून वञ्चित राहो. ॥ २९ ॥
|
पायसं कृसरं छागं वृथा सोऽश्नातु निर्घृणः ।
गुरूंश्चाप्यवजानातु यस्यार्योऽनुमते गतः ॥ ३० ॥
|
ज्याच्या सल्ल्याचे निमित्त होऊन आर्यपुत्र श्रीरामांना वनागमन करणे भाग झाले आहे त्या निर्दयी पुरुषाने खीर, खिचडी वा बकरीचे दूध इत्यादि भोज्य पदार्थ देवतांना वा पितरांना निवेदन न करता उपभोगात आणल्या गेलेल्या पदार्थांप्रमाणे व्यर्थ जावो. अर्थात् देवता/पितरांना अर्पण करून मिळणार्या श्रेयापासून वंचित राहो. ॥ ३० ॥
|
गाश्च स्पृशतु पादेन गुरून् परिवदेत च ।
मित्रे द्रुह्येत सोऽत्यर्थं यस्यार्योऽनुमते गतः ॥ ३१ ॥
|
’ज्याच्या सम्मतिने श्रीरामांना वनात जावे लागले तो पापी मनुष्य गायींच्या शरीरास पायानीं स्पर्श, गुरूजनांची निंदा आणि मित्राप्रति अत्यंत द्रोह करो. ॥ ३१ ॥
|
विश्वासात् कथितं किञ्चित् परिवादं मिथः क्वचित् ।
विवृणोतु स दुष्टात्मा यस्यार्योऽनुमते गतः ॥ ३२ ॥
|
’ज्याच्या सांगण्यावरून ज्येष्ठ भ्राता श्रीराम वनात गेले आहेत, तो दुष्टात्मा गुप्त ठेवण्याच्या विश्वासावर एकांतात सांगितला गेलेला कुणाचा दोष दुसर्यांसमोर प्रकट करो. (अर्थात त्याला विश्वासघात करण्याचे पाप लागो. ) ॥ ३२ ॥
|
अकर्ता चाकृतज्ञश्च त्यक्तात्मा निरपत्रपः ।
लोके भवतु विद्विष्टो यस्यार्योऽनुमते गतः ॥ ३३ ॥
|
’ज्याच्या अनुमतिने आर्य श्रीराम वनात गेले असतील तो मनुष्य उपकार न करणारा कृतज्ञ, सत्पुरूषांच्या द्वारा परित्यक्त, निर्लज्ज आणि जगांत सर्वांच्या द्वेषास पात्र होवो. ॥ ३३ ॥
|
पुत्रैदासैश्च भृत्यैश्च स्वगृहे परिवारितः ।
स एको मृष्टमश्नातु यस्यार्योऽनुमते गतः ॥ ३४ ॥
|
’ज्याच्या सल्याने आर्य श्रीराम वनात गेले असतील, तो आपल्या घरांत पुत्र, दास आणि भृत्यांनी घेरलेला राहून एकट्याने मिष्टांन्न भोजन केल्याच्या पापाचा भागी होवो. ॥ ३४ ॥
|
अप्राप्य सदृशान् दाराननपत्यः प्रमीयताम् ।
अनवाप्य क्रियां धर्म्यां यस्यार्योऽनुमते गतः ॥ ३५ ॥
|
’ज्याच्या अनुमतीने आर्य श्रीरामाचे वनगमन झाले असेल, तो आपल्याला अनुरूप पत्नी न मिळाल्याने अग्निहोत्र आदि धार्मिक कर्मांचे अनुष्ठान केल्या शिवायच संतानहीन अवस्थेतच मरून जावो. ॥ ३५ ॥
|
माऽऽत्मनः संततिं द्राक्षीत् स्वेषु दारेषु दुःखितः ।
आयुः समग्रमप्राप्य यस्यार्योऽनुमते गतः ॥ ३६ ॥
|
’ज्याच्या सम्मतिने माझे मोठे बंधु श्रीराम वनात गेले, तो सदा दुःखी राहून आपल्या धर्मपत्नीपासून होणार्या संततीचे मुख न पाहो तसेच संपूर्ण आयुष्याचा उपभोग न करताच मरून जावो. ॥ ३६ ॥
|
राजस्त्रीबालवृद्धानां वधे यत् पापमुच्यते ।
भृत्यत्यागे च यत्पापं तत् पापं प्रतिपद्यताम् ॥ ३७ ॥
|
’राजा, स्त्री, बालक आणि वृद्धांचा वध करण्यामुळे तसेच भृत्यांचा त्याग करण्याने जे पाप होते तेच पाप त्यालाही लागो. ॥ ३७ ॥
|
लाक्षया मधुमांसेन लोहेन च विषेण च ।
सदैव बिभृयाद् भृत्यान् यस्यार्योऽनुमते गतः ॥ ३८ ॥
|
’ज्याच्या सम्मतिने श्रीरामांचे वनगमन झाले असेल तो सदैव लाख, मधु, मांस, लोह आणि विष आदि निषिद्ध वस्तुंची विक्री करून कमावलेल्या, त्या धनाचे आपल्या भरण-पोषण योग्य कुटुंबी जनांचे पालन करो. ॥ ३८ ॥
|
सङ्ग्रामे समुपोढे स्म शत्रुपक्षभयंकरे ।
पलायमानो वध्येत यस्यार्योऽनुमते गतः ॥ ३९ ॥
|
’ज्याच्या मताने श्रीराम वनात जाण्यास विवश झाले असतील तो शत्रुपक्षाला भय देणारे युद्ध प्राप्त झाले असता त्यात पाठ दाखवून पळून जात असता मारला जावो. ॥ ३९ ॥
|
कपालपाणिः पृथिवीमटतां चीरसंवृतः ।
भिक्षमाणो यथोन्मत्तो यस्यार्योऽनुमते गतः ॥ ४० ॥
|
’ज्याच्या सम्मतिने आर्य श्रीराम वनात गेले असतील तो जुन्या- पुराण्या, फाटक्या, मळलेल्या, चिंध्या झालेल्या वस्त्रानी आपले शरीर झाकून हातात खापर घेऊन भीक मागत उन्मत्ता प्रमाणे पृथ्वीवर फिरत राहील. ॥ ४० ॥
|
मद्य प्रसक्तो भवतु स्त्रीष्वक्षेषु च नित्यशः ।
कामक्रोधाभिभूतश्च यस्यार्योऽनुमते गतः ॥ ४१ ॥
|
’ज्याच्या सल्यामुळे श्रीरामांना वनात जावे लागले, तो कामक्रोधाला वश होऊन सदा मद्यपान, स्त्री समागम आणि द्यूतक्रीडेत आसक्त राहील. ॥ ४१ ॥
|
मास्य धर्मे मनो भूयाद् अधर्मं स निषेवताम् ।
अपात्रवर्षी भवतु यस्यार्योऽनुमते गतः ॥ ४२ ॥
|
’ज्याचे अनुमतिने आर्य श्रीराम वनात गेले असतील त्याचे मन कधी धर्मात लागणार नाही, तो अधर्माचेच सेवन करील आणि अपात्रालाच धन दान करील. ॥ ४२ ॥
|
सञ्चितान्यस्य वित्तानि विविधानि सहस्रशः ।
दस्युभिर्विप्रलुप्यन्तां यस्यार्योऽनुमते गतः ॥ ४३ ॥
|
’ज्याच्या सल्ल्याने आर्य श्रीरामांचे वनगमन झाले असेल त्याच्या द्वारा हजारोंच्या संख्येत संचित केल्या गेलेल्या नाना प्रकारच्या धन-वैभवास दरोडेखोर लुटुन नेवोत. ॥ ४३ ॥
|
उभे संध्ये शयानस्य यत् पापं परिकल्प्यते ।
तच्च पापं भवेत् तस्य यस्यार्योऽनुमते गतः ॥ ४४ ॥
यदग्निदायके पापं यत् पापं गुरुतल्पगे ।
मित्रद्रोहे च यत् पापं तत् पापं प्रतिपद्यताम् ॥ ४५ ॥
|
’ज्याच्या सांगण्यावरून श्रीरामास वनात पाठवले गेले असेल, त्याला दोन्ही संध्या समयांना झोपून राहाणार्या पुरुषांना जे पाप लागते ते लागो. आग लावणार्या मनुष्याला जे पाप लागते, गुरूपत्नीशी गमन करणार्याला जे पाप लागते अथवा मित्रद्रोह करणार्याला जे पाप लागते, ते त्याला लागो. ॥ ४४-४५ ॥
|
देवतानां पितॄणां च मातापित्रोस्तथैव च ।
मा स्म कार्षीत् स शुश्रूषां यस्यार्योऽनुमते गतः ॥ ४६ ॥
|
’ज्यांच्या अनुमतीने आर्य श्रीराम वनात गेले आहेत, तो देवतांची, पितरांची आणि माता-पिता यांची सेवा कधी न करो. ( अर्थात त्यांच्या सेवेच्या पुण्यापासून वंचित राहो.) ॥ ४६ ॥
|
सतां लोकात् सतां कीर्त्याः सज्जुष्टात् कर्मणस्तथा ।
भ्रश्यतु क्षिप्रमद्यैव यस्यार्योऽनुमते गतः ॥ ४७ ॥
|
’ज्याच्या अनुमतीमुळे विवश होऊन बंधु रामांनी वनात पदार्पण केले आहे, तो पापी आजच सत्पुरूषांच्या लोकापासून, सत्पुरूषांच्या कीर्तीपासून तसेच सत्पुरूषांच्या द्वारे सेवित कर्मांपासून त्वरितच भ्रष्ट होऊन जाईल. ॥ ४७ ॥
|
अपास्य मातृशुश्रूषामनर्थे सोऽवतिष्ठताम् ।
दीर्घबाहुर्महावक्षा यस्यार्योऽनुमते गतः ॥ ४८ ॥
|
’ज्याच्या संमतिने मोठमोठे बाहु आणि विशाल वक्षःस्थल असणार्या श्रीरामांना वनात जावे लागले, तो मातेची सेवा सोडून अनर्थाच्या मार्गात स्थित राहो. ॥ ४८ ॥
|
बहुभृत्यो दरिद्रश्च ज्वररोगसमन्वितः ।
समायात् सततं क्लेशं यस्यार्योऽनुमते गतः ॥ ४९ ॥
|
’ज्याच्या संमतिने श्रीरामांचे वनगमन झाले आहे तो त्वरितच दरिद्री होऊन जावो, त्यांच्या घरी ज्यांचे भरण-पोषण करायला हवे अशा योग्य पुत्र आदिंची संख्या अति अधिक होवो आणि तो ज्वर-रोगाने पीडीत होऊन सदा क्लेश भोगत राहो. ॥ ४९ ॥
|
आशामाशंसमानानां दीनानामूर्ध्वचक्षुषाम् ।
अर्थिनां वितथां कुर्याद् यस्यार्योऽनुमते गतः ॥ ५० ॥
|
’ज्याच्या अनुमतिने आर्य श्रीराम वनात गेले असतील तो मनुष्य, आशा धरून वरदात्याच्या मुखाकडे डोळे लावून पाहाणार्या दीन याचकांच्या आशेला निष्फल करो. ॥ ५० ॥
|
मायया रमतां नित्यं पुरुषः पिशुनोऽशुचिः ।
राज्ञो भीतस्त्वधर्मात्मा यस्यार्योऽनुमते गतः ॥ ५१ ॥
|
’ज्याच्या सांगण्यावरून बंधु श्रीरामांनी वनात प्रस्थान केले तो पापात्मा पुरूष चहाडखोर, अपवित्र तसेच राजापासून भयभीत राहून सदा छलकपटांतच रमत राहो. ॥ ५१ ॥
|
ऋतुस्नातां सतीं भार्यामृतुकालानुरोधिनीम् ।
अतिवर्तेत दुष्टात्मा यस्यार्योऽनुमते गतः ॥ ५२ ॥
|
’ ज्याच्या अनुमतीमुळे आर्य श्रीरामांचे वनगमन झाले आहे तो दुष्टात्मा ऋतु-स्नानकाल प्राप्त झाल्याने आपल्याजवळ आलेल्या सती- साध्वी ऋतुस्नाता पत्नीला घालवून देवो. (तिची इच्छा पूर्ण न करण्याच्या पापाचा भागी होवो). ॥ ५२ ॥
|
विप्रलुप्तप्रजातस्य दुष्कृतं ब्राह्मणस्य यत् ।
तदेतत् प्रतिपद्येत यस्यार्योऽनुमते गतः ॥ ५३ ॥
|
’ज्याच्या सल्ल्यामुळे माझ्या मोठ्या भावाला वनात जावे लागले आहे त्याला, अन्न आदिचे दान न दिल्याने ( किंवा स्त्रीचा द्वेष केल्याने) ज्याची संतती नष्ट झाली आहे त्या ब्राह्मणाला जे पाप लागते, ते पाप लागो. ॥ ५३ ॥
|
ब्राह्मणायोद्यतां पूजां विहन्तु कलुषेन्द्रियः ।
बालवत्सां च गां दोग्धु यस्यार्योऽनुमते गतः ॥ ५४ ॥
|
’ज्याच्या अनुमतीमुळे आर्यांनी वनात पदार्पण केले तो मलीन इंद्रिये असणारा पुरुष ब्राह्मणासाठी केल्या जाणार्या पूजेत विघ्न उत्पन्न करो, आणि अगदी लहान वासरू असलेल्या (दहा दिवसाच्या आंतील व्यायलेल्या) गायीचे दूध दुहून काढो. ॥ ५४ ॥
|
धर्मदारान् परित्यज्य परदारान् विषेवताम् ।
त्यक्तधर्मरतिर्मूढो यस्यार्योऽनुमते गतः ॥ ५५ ॥
|
’ज्याने आर्य श्रीरामांच्या वनगमनास अनुमती दिली असेल तो मूढ धर्मपत्नीला सोडून परस्त्रीचे सेवन करो आणि धर्मविषयक अनुरागाचा त्याग करो. ॥ ५५ ॥
|
पानीयदूषके पापं तथैव विषदायके ।
यत्तदेकः स लभतां यस्यार्योऽनुमते गतः ॥ ५६ ॥
|
’पाणी दूषित करून टाकणाराला तसेच दुसर्याला विष देणाराला जे पाप लागते तेच पाप ज्याच्या अनुमतिने विवश होऊन आर्य श्रीरामांना वनात जावे लागले त्याला एकट्याला प्राप्त होवो. ॥ ५६ ॥
|
तृष्णार्तं सति पानीये विप्रलम्भेन योजयन् ।
यत् पापं लभते तत् स्याद् यस्यार्योऽनुमते गतः ॥ ५७ ॥
|
’ज्याच्या सम्मतिने आर्याचे वनगमन झाले असेल त्याला पाणी असूनही तहानलेल्या माणसाला त्यापासून वञ्चित करणार्या माणसाला जे पाप लागते ते लागो. ॥ ५७ ॥
|
भक्त्या विवदमानेषु मार्गमाश्रित्य पश्यतः ।
तस्य पापेन युज्येत यस्यार्योऽनुमते गतः ॥ ५८ ॥
|
’ज्याच्या अनुमतिने आर्य राम वनात गेले असतील तो, परस्परात भांडणार्या मनुष्यांपैकी कुणा एकाची बाजू घेऊन मार्गात उभे राहून त्यांचे भांडण पहात राहाणार्या कलहप्रिय माणसाला जे पाप लागते त्याचा भागी बनो. ॥ ५८ ॥
|
एवमाश्वासयन्नेव दुःखार्त्तोऽनुपपात ह ।
विहीनां पतिपुत्राभ्यां कौसल्यां पार्थिवात्मजः ॥ ५९ ॥
|
याप्रकारे पति आणि पुत्राचा वियोग झालेल्या कौसल्येला शपथांच्या द्वारे आश्वासन देत असतांच राजकुमार भरत दुःखाने व्याकुळ होऊन जमिनीवर पडले. ॥ ५९ ॥
|
तथा तं शपथैः कष्टैः शपमानमचेतनम् ।
भरतं शोकसंतप्तं कौसल्या वाक्यमब्रवीत् ॥ ६० ॥
|
त्या समयी दुष्कर शपथांच्या द्वारे आपली सफाई देणार्या शोकसंतप्त आणि अचेत भरतास कौसल्या या प्रकारे म्हणाली- ॥ ६० ॥
|
मम दुःखमिदं पुत्र भूयः समुपजायते ।
शपथैः शपमानो हि प्राणानुपरुणत्सि मे ॥ ६१ ॥
|
’मुला ! तू अनेकानेक शपथा घेऊन जो माझ्या प्राणांना पीडा देत आहेस, त्यामुळे माझे हे दुःख अधिकच वाढत जात आहे. ॥ ६१ ॥
|
दिष्ट्या न चलितो धर्मादात्मा ते सहलक्षणः ।
वत्स सत्यप्रतिज्ञो मे सतां लोकानवाप्स्यसि ॥ ६२ ॥
|
’वत्सा ! सौभाग्याची गोष्ट आहे की शुभ लक्षणांनी संपन्न तुझे चित्त धर्मापासून विचलित झालेले नाही. तू सत्यप्रतिज्ञ आहेस म्हणून तुला सत्पुरूषांच्या लोकाची प्राप्ती होईल. ॥ ६२ ॥
|
इत्युक्त्वा चाङ्कमानीय भरतं भ्रातृवत्सलम् ।
परिष्वज्य महाबाहुं रुरोद भृशदुःखिता ॥ ६३ ॥
|
असे म्हणून कौसल्येने भ्रातृवत्सल महाबाहु भरताला ओढून आपल्या मांडीवर बसविले आणि अत्यंत दुःखी होऊन त्याला गळ्याशी लावून ती हमशा-हमशी रडू लागली. ॥ ६३ ॥
|
एवं विलपमानस्य दुःखार्तस्य महात्मनः ।
मोहाच्च शोकसंरम्भाद् बभूव लुलितं मनः ॥ ६४ ॥
|
महात्मा भरतही दुःखाने आर्त होऊन विलाप करीत होते. त्यांचे मन मोह आणि शोकाच्या आवेगाने व्याकुळ होऊन गेले होते. ॥ ६४ ॥
|
लालप्यमानस्य विचेतनस्य
प्रणष्टबुद्धेः पतितस्य भूमौ ।
मुहुर्मुहुर्निश्वसतश्च दीर्घं
सा तस्य शोकेन जगाम रात्रिः ॥ ६५ ॥
|
पृथ्वीवर पडलेल्या भरतांची विवेकशक्ती नष्ट झाली होती. ते अचेतसे होऊन विलाप करीत होते आणि वारंवार दीर्घश्वास घेत होते. याप्रकारे शोकातच त्यांची ती रात्र निघून गेली. ॥ ६५ ॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे पञ्चसप्ततितमः सर्गः ॥ ७५ ॥ ।
|
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्या काण्डाचा पंचाहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥ ७५ ॥
|