श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ त्रयोदशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामादीनां मार्गे वृक्षान् विविधजंतून् जलाशयांश्च सप्तजनाश्रमं च दूरतः पश्यतां पुनः किष्किंधायां प्रवेशः - श्रीराम आदिंचे मार्गात वृक्ष, विविध जंतु, जलाशय तसेच सप्तजन आश्रमाचे दुरून दर्शन घेऊन पुन्हा किष्किंधापुरीमध्ये पोहोंचणे -
ऋश्यमूकात्स धर्मात्मा किष्किंधां लक्ष्मणाग्रजः ।
जगाम सहसुग्रीवो वालिविक्रमपालिताम् ॥ १ ॥
लक्ष्मणांचे मोठे भाऊ धर्मात्मा श्रीराम सुग्रीवास बरोबर घेऊन पुन्हा ऋष्यमूकाकडून किष्किंधापुरीकडे निघाले; जी वालीच्या पराक्रमाने सुरक्षित होती. ॥१॥
समुद्यम्य महच्चापं रामः काञ्चनभूषितम् ।
शरांश्चादित्यसंकाशान् गृहीत्वा रणसाधकान् ॥ २ ॥
आपल्या सुवर्णभूषित विशाल धनुष्याला उचलून आणि युद्धात सफलता देणार्‍या सूर्यतुल्य तेजस्वी बाणांना घेऊन राम तेथून प्रस्थित झाले. ॥२॥
अग्रतस्तु ययौ तस्य राघवस्य महात्मनः ।
सुग्रीवः संहतग्रीवो लक्ष्मणश्च महाबलः ॥ ३ ॥
महात्मा राघवांच्या पुढे पुढे सुगठित ग्रीवा असलेले सुग्रीव आणि महाबली लक्ष्मण चालत होते. ॥३॥
पृष्ठतो हनुमान् वीरो नलो नीलश्च वानरः ।
तारश्चैव महातेजा हरियूथपयूथपः ॥ ४ ॥
आणि त्यांच्या मागे वीर हनुमान्, नल, पराक्रमी नील तसेच वानर- यूथपांचेही यूथपति महातेजस्वी चालत होते. ॥४॥
ते वीक्षमाणा वृक्षांश्च पुष्पभारावलंबिनः ।
प्रसन्नांबुवहाश्चैव सरितः सागरङ्‌ग्माः ॥ ५ ॥

कंदराणि च शैलांश्च निर्दराणि गुहास्तथा ।
शिखराणि च मुख्यानि दरीश्च प्रियदर्शनाः ॥ ६ ॥
ते सर्व लोक, फुलांच्या भाराने वाकलेले वृक्ष, स्वच्छ जलांनी भरलेल्या समुद्रगामिनी नद्या, कंदरा, पर्वत, शिखरे, विवरे, गुफा, मुख्य मुख्य शिखरे आणि सुंदर दिसणार्‍या गहन गुफांना बघत बघत पुढे जात होते. ॥५-६॥
वैडूर्यविमलैः पर्णैः पद्मैश्चाकोशकुङ्‌मभलैः ।
शोभितान् सजलान् मार्गे तटाकांश्च व्यलोकयन् ॥ ७ ॥
त्यांनी जाताना मार्गात वैडूर्य मण्याप्रमाणे रंगीत, निर्मल जल आणि कमी फुललेल्या मुकुलयुक्त कमलांनी सुशोभित असलेल्या सजल सरोवरांना पाहिले. ॥७॥
कारण्डैः सारसैर्हंसैर्वञ्जुलैर्जलकुक्कुटैः ।
चक्रवाकैस्तथा चान्यैः शकुनैरुपनादितान् ॥ ८ ॥
कारण्डव, सारस, हंस, वञ्जुल, जलकोंबडे, चक्रवाक तसेच अन्यपक्षी त्या सरोवराच्या ठिकाणी किलबिलतांना पाहिले. त्या सर्वांचा प्रतिध्वनी तेथे निनादत होता. ॥८॥
मृदुशष्पाङ्‌कुीराहारान्निर्भयान् वनगोचरान् ।
चरतः सर्वतो ऽपश्यन् स्थलीषु हरिणान् स्थितान् ॥ ९ ॥
त्या स्थळी सर्वबाजूस हिरव्यागार कोमल गवताच्या अंकुराचा आहार करणारी वनचारी हरीणे काही ठिकाणी निर्भय होऊन चरत होती आणि काही ठिकाणी नुसती उभी असलेली दिसत होती. (हे सर्व पाहांत श्रीरामादि किष्किंधेकडे जात होते.) ॥९॥
तटाकवैरिणश्चापि शुक्लदंतविभूषितान् ।
घोरानेकचरान् वन्यान् द्विरदान् कूलघातिनः ॥ १० ॥

मत्तान् गिरितटोत्कृष्टान् पर्वतानिव जङ्‌गbमान् ।
वारणान् वारिदप्रख्यान् महीरेणुसमुक्षितान् ॥ ११ ॥

वने वनचरांश्चान्यान् खेचरांश्च विहङ्‌ग्मान् ।
पश्यंतस्त्वरिता जग्मुः सुग्रीववशवर्तिनः ॥ १२ ॥
जे पांढरे दांतांनी सुशोभित होते, दिसण्यात भयंकर होते आणि एकटे विचरत होते आणि किनार्‍यांना उकरून टाकण्यामुळे सरोवरांचे शत्रु समजले जात होते असे दोन दांतांचे मदमत्त जंगली हत्ती चालत्या फिरत्या पर्वतासमान जाताना दिसून येत होते. त्यांनी आपल्या दातांनी पर्वताच्या तटप्रांताला विदिर्ण करून टाकले होते. काही ठिकाणी हत्तींसारखे विशालकाय वानर दृष्टिगोचर होत होते. जे जमिनीवरील धुळीत न्हाऊन निघाले होते. त्यांच्या शिवाय त्या वनात आणखीही बरेचसे जंगली जीवजंतु तसेच आकाशचारी पक्षी विचरतांना दिसून येत होते. या सगळ्यांना पहात श्रीराम आदि सर्व लोक सुग्रीवाच्या वशवर्ती होऊन तीव्र गतीने पुढे जाऊ लागले. ॥१०-१२॥
तेषां तु गच्छतां तत्र त्वरितं रघुनंदनः ।
द्रुमषण्ड वनं दृष्ट्‍वा रामः सुग्रीवमब्रवीत् ॥ १३ ॥
त्या यात्रा करणार्‍या लोकामध्ये रघुनंदन रामांनी वृक्षसमूहांनी सघन असलेल्या वनांना पाहून सुग्रीवास विचारले - ॥१३॥
एष मेघ इवाकाशे वृक्षषण्डः प्रकाशते ।
मेघसङ्‌घादतविपुलः पर्यंतकदलीवृतः ॥ १४ ॥
’वानरराज ! आकाशांतील मेघांप्रमाणे हा जो वृक्षांचा समूह प्रकाशित होत आहे, काय आहे ? हा इतका विस्तृत आहे की मेघांच्या समूहाप्रमाणे पसरला आहे. याच्या कडेकडेने केळीचे वृक्ष लागलेले आहेत; ज्यामुळे हा सर्व वृक्ष समूह घेरला गेला आहे. ॥१४॥
किमेतज्ज्ञातुमिच्छामि सखे कौतूहलं हि मे ।
कौतूहलापनयनं कर्तुमिच्छाम्यहं त्वया ॥ १५ ॥
’सख्या ! हे कोठले वन आहे हे मी जाणू इच्छितो. म्हणून माझ्या मनात फार कुतूहल आहे. तुझ्याद्वारे माझ्या या कुतुहलाचे निवारण व्हावे असे मी इच्छितो.’ ॥१५॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा राघवस्य महात्मनः ।
गच्छन्नेवाचचक्षे ऽथ सुग्रीवस्तन्महद्वनम् ॥ १६ ॥
महात्मा राघवांचे हे बोलणे ऐकून सुग्रीवांनी चालता चालताच त्या विशाल वनाविषयी सांगण्यास आरंभ केला. ॥१६॥
एतद्राघव विस्तीर्णमाश्रमं श्रमनाशनम् ।
उद्यानवनसंपन्नं स्वादुमूलफलोदकम् ॥ १७ ॥
’राघवा ! हा एक विस्तृत आश्रम आहे, जो सर्वांच्या श्रमाचे निवारण करणारा आहे. हा उद्याने आणि उपवनांनी युक्त आहे. येथे स्वादिष्ट फळे-मुळे आणि जल सुलभ असते. ॥१७॥
अत्र सप्तजना नाम मुनयः संशितव्रताः ।
सप्तैवासन्नधःशीर्षा नियतं जलशायिनः ॥ १८ ॥
’या आश्रमात सप्तजन नावानी प्रसिद्ध सातच मुनि राहात होते, जे कठोर व्रताचे पालन करण्यात तत्पर होते. ते खाली डोके घालून तपस्या करीत असत. नियमपूर्वक राहून जलात शयन करणारे होते. ॥१८॥
सप्तरात्रकृताहारा वायुना वनवासिनाः ।
दिवं वर्षशतैर्याताः सप्तभिः सकलेवराः ॥ १९ ॥
’सात दिवस आणि सात रात्री व्यतीत करून ते केवळ वायुचा आहार करीत असत. तसेच एकाच स्थानावर निश्चळ भावाने राहात असत. या प्रकारे सातशे वर्षपर्यत तपस्या करून ते सशरीर स्वर्गलोकास निघून गेले. ॥१९॥
तेषामेवंप्रभावानां द्रुमप्राकारसंवृतम् ।
आश्रमं सुदुराधर्षमपि सेंद्रैः सुरासुरैः ॥ २० ॥
 ’त्यांच्याच प्रभावाने सघन वृक्षांच्या तटबंदीने घेरलेला हा आश्रम इंद्रासहित सर्व देवता आणि असुरांसाठीही अत्यंत दुर्धर्ष बनलेला आहे. ॥२०॥
पक्षिणो वर्जयंत्येतत्तथान्ये वनचारिणः ।
विशंति मोहाद्ये तत्र निवर्तंते न ते पुनः ॥ २१ ॥
’पक्षी तसेच दुसरे वनचर जीव याचा दुरूनच त्याग करतात. जे मोहवश याच्या आत प्रवेश करतात ते कधी परत येत नाहीत. ॥२१॥
विभूषणरवास्तत्र श्रूयंते सकलाक्षराः ।
तूर्यगीतस्वनाश्चात्र गंधो दिव्यश्च राघव ॥ २२ ॥
’राघवा ! येथे मधुर अक्षराच्या वाणीबरोबरच आभूषणांचा झणत्कारही ऐकू येत असतो. वाद्य आणि गीतांचा मधुर ध्वनिही कानावर पडत असतो आणि दिव्य सुगंधाचाही अनुभव येतो. ॥२२॥
त्रेताग्नयो ऽपि दीप्यंते धूमो ह्यत्र प्रकाशते ।
वेष्टयन्निव वृक्षाग्रान् कपोताङ्‌गाुरुणो घनः ॥ २३ ॥
’येथे आहवनीय आदि त्रिविध अग्निही प्रज्वलित होतात. हा कबूतराच्या अंगाप्रमाणे धूसर रंगाचा धूर उठतांना दिसून येत आहे, जो वृक्षांच्या शेंड्यांना आवेष्टित करीत असल्यासारखा दिसत आहे. ॥२३॥
एते वृक्षाः प्रकाशंते धूमसंसक्तमस्तकाः ।
मेघजालप्रतिच्छन्ना वैडूर्यगिरयो यथा ॥ २४ ॥
ज्यांच्या शिखांवर होमाचा धूर पसरलेला आहे ते वृक्ष मेघसमूहांनी आच्छादित असलेल्या नीलमच्या पर्वताप्रमाणे प्रकाशित होत आहेत. ॥२४॥
कुरु प्रणामं धर्मात्मन् तान् समुद्दिश्य राघव ।
लक्ष्णणेन सह भ्रात्रा प्रयतः संयताञ्जलिः ॥ २५ ॥
धर्मात्मा राघवा ! आपण मनाला एकाग्र करून दोन्ही हात जोडून भाऊ लक्ष्मणासह त्या मुनिंना स्मरून प्रणाम करावा. ॥२५॥
प्रणमंति हि ये तेषां मुनीनां भावितात्मनाम् ।
न तेषामशुभं किञ्चिच्छरीरे राम दृश्यते ॥ २६ ॥
’श्रीरामा ! जे या पवित्र अंतःकरणाच्या ऋषिंना प्रणाम करतात, त्यांच्या शरीरात किंचित्मात्रही अशुभ राहात नाही. ॥२६॥
ततो रामः सह भ्रात्रा लक्ष्मणेन कृताञ्जलिः ।
समुद्दिस्य महात्मानः तान् ऋषीनभ्यवादयत् ॥ २७ ॥
तेव्हा भाऊ लक्ष्मणासहित श्रीरामांनी हात जोडून त्या महात्मा ऋषिंना उद्देशून प्रणाम केला. ॥२७॥
अभिवाद्य तु धर्मात्मा रामो भ्राता च लक्ष्मणः ।
सुग्रीवो वानराश्चैव जग्मुः संहृष्टमानसाः ॥ २८ ॥
धर्मात्मा श्रीराम, त्यांचे लहान भाऊ लक्ष्मण, सुग्रीव तसेच अन्य सर्व वानर त्या ऋषिंना प्रणाम करून प्रसन्नचित्त होऊन पुढे निघाले. ॥२८॥
ते गत्वा दूरमध्वानं तस्मात् सप्तजनाश्रमात् ।
ददृशुस्तां दुराधर्षां किष्किंधां वालिपालिताम् ॥ २९ ॥
त्या सप्तजनाश्रमापासून दूरपर्यतचा मार्ग आक्रमण करून झाल्यावर त्या सर्वांनी वालीद्वारा सुरक्षित किष्किंधापुरीला पाहिले. ॥२९॥
ततस्तु रामानुजरामवानराः
प्रगृह्य शस्त्राण्युदिताग्र्यतेजसः ।
पुरीं सुरेशात्मजवीर्यपालितां
वधाय शत्रोः पुनरागताः सह ॥ ३० ॥
त्यानंतर श्रीरामांचे लहान भाऊ लक्ष्मण, श्रीराम तसेच वानर ज्याचे उग्रतेज उदित झालेले होते, हातात अस्त्र-शस्त्र घेऊन इंद्रकुमार वालीच्या पराक्रमाने पालित किष्किंधापुरीत शत्रुवधाच्या निमित्ताने पुन्हां येऊन पोहोंचले. ॥३०॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे त्रयोदशः सर्गः ॥ १३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा तेरावा सर्ग पूरा झाला. ॥१३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP