श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। चत्वारिंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सगरपुत्राणां भाविनं विनाशं सूचयित्वा ब्रह्मणा देवानां शमनं भुवं खनतां सगरात्मजानां कपिलपार्श्वे गमनं तस्य रोषाग्निना तेषां भस्मीभावश्च - सगर पुत्रांच्या भावी विनाशाची सूचना देऊन ब्रह्मदेवांनी देवतांना शांत करणे, सगराच्या पुत्रांचे पृथ्वीला खणत खणत कपिलांच्या जवळ पोहोचणे आणि त्यांच्या रोषाने जळून भस्म होणे -
देवतानां वचः श्रुत्वा भगवान् वै पितामहः ।
प्रत्युवाच सुसन्त्रस्तान् कृतान्तबलमोहितान् ॥ १ ॥
देवतांचे म्हणणे ऐकून भगवान् ब्रह्मदेवांनी कित्येक प्राण्यांचा अंत करणार्‍या सगरपुत्रांच्या बलाने मोहित आणि भयभीत झालेल्या देवतांना असे म्हटले - ॥ १ ॥
यस्येयं वसुधा कृत्स्ना वासुदेवस्य धीमतः ।
महिषी माधवस्यैषा स एव भगवान् प्रभुः ॥ २ ॥

कापिलं रूपमास्थाय धारयत्यनिशं धराम् ।
तस्य कोपाग्निना दग्धा भविष्यन्ति नृपात्मजाः ॥ ३ ॥
देवगणांनो ! ही सारी पृथ्वी ज्या भगवान वासुदेवाची वस्तु आहे तसेच ज्या भगवान् लक्ष्मीपतिची ही राणी आहे तेच शर्वशक्तिमान भगवान् श्रीहरि कपिलमुनिंचे रूप धारण करून निरंतर या पृथ्वीला धारण करतात. त्यांच्या कोपाग्निने हे सर्व राजकुमार जळून भस्म होऊन जातील. ॥ २-३ ॥
पृथिव्याश्चापि निर्भेदो दृष्ट एव सनातनः ।
सगरस्य च पुत्राणां विनाशो दीर्घदर्शीनाम् ॥ ४ ॥
पृथ्वीचे हे भेदन सनातन आहे. प्रत्येक कल्पात अवश्यंभावी आहे. (श्रुति आणि स्मृतिमध्ये आलेल्या सागर आदि शब्दांवरून ही गोष्ट सुस्पष्ट ज्ञात होत आहे). या प्रकारे दूरदर्शी पुरुषांनी सगराच्या पुत्रांचा भावी विनाशही पाहिलेलाच आहे. म्हणून या विषयी शोक करणे अनुचित आहे. ॥ ४ ॥
पितामहवचः श्रुत्वा त्रयस्त्रिंशदरिन्दमाः ।
देवाः परमसंहृष्टाः पुनर्जग्मुर्यथागतम् ॥ ५ ॥
ब्रह्मदेवांचे हे कथन ऐकून शत्रूंचे दमन करणार्‍या तेहतीस देवता अत्यंत हर्षयुक्त होऊन आल्या तशा परत गेल्या. ॥ ५ ॥
सगरस्य च पुत्राणां प्रादुरासीन्महास्वनः ।
पृथिव्यां भिद्यमानायां निर्घातसमनिःस्वनः ॥ ६ ॥
सगरपुत्रांच्या हातून जेव्हां पृथ्वी खणली जात होती त्यावेळी वज्रपातासमान भयंकर आवाज होत होता. ॥ ६ ॥
ततो भित्त्वा महीं सर्वां कृत्वा चापि प्रदक्षिणम् ।
सहिताः सागराः सर्वे पितरं वाक्यमब्रुवन् ॥ ७ ॥
याप्रमाणे सारी पृथ्वी खोदून आणि तिची परिक्रमा करून ते सर्व सगर पुत्र मोकळ्या हाताने आपल्या पित्यापाशी परत आले आणि म्हणाले - ॥ ७ ॥
परिक्रान्ता मही सर्वा सत्त्ववन्तश्च सूदिताः ।
देवदानवरक्षांसि पिशाचोरगपन्नगाः ॥ ८ ॥

न च पश्यामहेऽश्वं ते अश्वहर्तारमेव च ।
किं करिष्याम भद्रं ते बुद्धिरत्र विचार्यताम् ॥ ९ ॥
"पिताश्री ! आम्ही सर्व पृथ्वी धुंडाळली. देवता, दानव, राक्षस, पिशाच्च आणि नाग आदि मोठमोठ्या बलवान प्राण्यांना मारून टाकले. आणि तरीही आम्हाला तो अश्व कुठेही दिसला नाही आणि त्याला चोरणाराही कुठे दिसला नाही. आपले कल्याण असो ! आता आम्ही काय करावे याविषयी आपणच विचार करून काही उपाय सांगा." ॥ ८-९ ॥
तेषां तद् वचनं श्रुत्वा पुत्राणां राजसत्तमः ।
समन्युरब्रवीद् वाक्यं सगरो रघुनन्दन ॥ १० ॥
'रघुनन्दना ! पुत्रांचे हे वचन ऐकून राजांमध्ये श्रेष्ठ सगराने रागावून त्यांना म्हटले - ॥ १० ॥
भूयः खनत भद्रं वो विभेद्य वसुधातलम् ।
अश्वहर्तारमासाद्य कृतार्थाश्च निवर्तत ॥ ११ ॥
'जा, परत सर्व पृथ्वी खणा आणि तिला विदीर्ण करून अश्वाच्या चोराचा पत्ता लावा. चोरापर्यंत पोहोचून काम पूर्ण झाल्यावरच परत या. ॥ ११ ॥
पितुर्वचनमासाद्य सगरस्य महात्मनः ।
षष्टिः पुत्रसहस्राणि रसातलमभिद्रवन् ॥ १२ ॥
आपल्या महात्मा पिता सगराची आज्ञा शिरोधार्य मानून ते साठ हजार राजकुमार रसातलाकडे सरसावले (आणि रागाने परत पृथ्वी खणू लागले). ॥ १२ ॥
खन्यमाने ततस्तस्मिन् ददृशुः पर्वतोपमम् ।
दिशागजं विरूपाक्षं धारयन्तं महीतलम् ॥ १३ ॥
हे खोदण्याचे काम चालू असतानाच त्यांना एक पर्वताकार दिग्गज दिसून आला. त्याचे नाव विरूपाक्ष होते. त्याने त्या भूतलास धारण केले होते. ॥ १३ ॥
सपर्वतवनां कृत्स्नां पृथिवीं रघुनन्दन ।
धारयामास शिरसा विरूपाक्षो महागजः ॥ १४ ॥
'रघुनन्दना ! महान गजराज विरूपाक्षाने पर्वत आणि वनांसहित या संपूर्ण पृथ्वीला आपल्या मस्क्तकावर धारण केलेले होते. ॥ १४ ॥
यदा पर्वणि काकुत्स्थ विश्रमार्थं महागजः ।
खेदाच्चालयते शीर्षं भूमिकम्पस्तदा भवेत् ॥ १५ ॥
'काकुत्स्थ ! तो महान दिग्गज ज्यावेळी थकून विश्रांतिमासाठी आपले मस्तक इकडे तिकडे हलवित असे त्यावेळी भूकंप होऊ लागे. ॥ १५ ॥
ते तं प्रदक्षिणं कृत्वा दिशापालं महागजम् ।
मानयन्तो हि ते राम जग्मुर्भित्त्वा रसातलम् ॥ १६ ॥
'श्रीरामा ! पूर्व दिशेचे रक्षण करणार्‍या विशाल गजराज विरूपाक्षाची परिक्रमा करून त्याचा सन्मान करून, ते सगरपुत्र रसातलाचे भेदन करीत पुढे चालले. ॥ १६ ॥
ततः पूर्वां दिशं भित्त्वा दक्षिणां बिभिदुः पुनः ।
दक्षिणस्यामपि दिशि ददृशुस्ते महागजम् ॥ १७ ॥
पूर्व दिशेचे भेदन करून ते पुन्हा दक्षिण दिशेची जमीन खोदू लागले. दक्षिण दिशेलाही त्यांना एक महान दिग्गज दिसून आला. ॥ १७ ॥
महापद्मं महात्मानं सुमहत्पर्वतोपमम् ।
शिरसा धारयन्तं गां विस्मयं जग्मुरुत्तमम् ॥ १८ ॥
त्याचे नाव होते महापद्म. महान पर्वतासारखा उंच तो विशालकाय गजराज आपल्या मस्तकावर पृथ्वीला धारण करीत होता. त्याला पाहून त्या राजकुमारांना फार विस्मय वाटला. ॥ १८ ॥
तं ते प्रदक्षिणं कृत्वा सगरस्य महात्मनः ।
षष्टिः पुत्रसहस्राणि पश्चिमां बिभिदुर्दिशम् ॥ १९ ॥
महात्मा सगराचे ते साठ हजार पुत्र त्या दिग्गजाची परिक्रमा करून पश्चिम दिशेच्या भूमिचे भेदन करू लागले. ॥ १९ ॥
पश्चिमायामपि दिशि महान्तमचलोपमम् ।
दिशागजं सौमनसं ददृशुस्ते महाबलाः ॥ २० ॥
पश्चिम दिशेलाही त्या महाबली सगरपुत्रांनी महान पर्वताकार दिग्गज सौमनसाचे दर्शन केले. ॥ २० ॥
तं ते प्रदक्षिणं कृत्वा पृष्ट्‍वा चापि निरामयम् ।
खनन्तः समुपक्रान्ता दिशं सोमवतीं तदा ॥ २१ ॥
त्याचीही परिक्रमा करून, त्याचा कुशल समाचार विचारून ते सर्व राजकुमार भूमि खोदत खोदत उत्तर दिशेस जाऊन पोहोंचले. ॥ २१ ॥
उत्तरस्यां रघुश्रेष्ठ ददृशुर्हिमपाण्डुरम् ।
भद्रं भद्रेण वपुषा धारयन्तं महीमिमाम् ॥ २२ ॥
'रघुश्रेष्ट ! उत्तर दिशेमध्ये त्यांना हिमासमान श्वेतभद्र नामक दिग्गज दिसून आला. जो आपल्या कल्याणमय शरीराने या पृथ्वीला धारण करीत होता. ॥ २२ ॥
समालभ्य ततः सर्वे कृत्वा चैनं प्रदक्षिणम् ।
षष्टिः पुत्रसहस्राणि बिभिदुर्वसुधातलम् ॥ २३ ॥
त्याचा कुशल समाचार विचारून राजा सगराचे ते सर्व साठ हजार पुत्र त्याची परिक्रमा केल्यानंतर परत भूमि खणण्याचे कामास लागले. ॥ २३ ॥
ततः प्रागुत्तरां गत्वा सागराः प्रथितां दिशम् ।
रोषादभ्यखनन् सर्वे पृथिवीं सगरात्मजाः ॥ २४ ॥
तदनंतर सुविख्यात पूर्वोत्तर दिशेमध्ये जाऊन त्या सगरपुत्रांनी एकत्र येऊन रागारागाने पृथ्वी खोदण्यास आरंभ केला. ॥ २४ ॥
ते तु सर्वे महात्मानो भीमवेगा महाबलाः ।
ददृशुः कपिलं तत्र वासुदेवं सनातनम् ॥ २५ ॥
यावेळी त्या सर्व महामना, महाबली आणि भयानक वेगवान राजकुमारांनी तेथे सनातन वासुदेवस्वरूप भगवान कपिलास पाहिले. ॥ २५ ॥
हयं च तस्य देवस्य चरन्तमविदूरतः ।
प्रहर्षमतुलं प्राप्ताः सर्वे ते रघुनन्दन ॥ २६ ॥
राजा सगराच्या यज्ञाचा तो अश्वही भगवान कपिलांच्या जवळच चरत राहिला होता. रघुनन्दना ! त्याला पाहून त्या सर्वांना अनुपम हर्ष झाला. ॥ २६ ॥
ते तं यज्ञहनं ज्ञात्वा क्रोधपर्याकुलेक्षणाः ।
खनित्रलाङ्‍गलधरा नानावृक्षशिलाधराः ॥ २७ ॥
भगवान् कपिलांनाच आपल्या यज्ञात विघ्न आणणारे समजून त्या सर्वांचे डोळे क्रोधाने लाल झाले. त्यांनी आपल्या हातात कुदळ, नांगर, नाना प्रकारचे वृक्ष आणि दगड घेतलेले होते. ॥ २७ ॥
अभ्यधावन्त सङ्‍क्रुद्धास्तिष्ठ तिष्ठेति चाब्रुवन् ।
अस्माकं त्वं हि तुरगं यज्ञीयं हृतवानसि ॥ २८ ॥

दुर्मेधस्त्वं हि सम्प्राप्तान् विद्धि नः सगरात्मजान् ।
ते अत्यंत रोषाने त्यांच्याकडे धावले आणि म्हणाले, "अरे ! उभा रहा ! उभा रहा ! तूंच आमच्या यज्ञाचा अश्व येथे चोरून आणला आहेस. दुर्बुद्धे ! आता आम्ही आलो आहोत. तू समजून घे. आम्ही महाराजा सगराचे पुत्र आहोत. ॥ २८ १/२ ॥
श्रुत्वा तु वचनं तेषां कपिलो रघुनन्दन ॥ २९ ॥

रोषेण महताऽऽविष्टो हुङ्‍कारमकरोत् तदा ।
'रघुनन्दना ! त्यांचे ते बोलणे ऐकून भगवान कपिलांना फार रोष आला आणि त्या रोषाच्या आवेशांतच त्यांच्या मुखातून एक हुंकार बाहेर पडला. ॥ २९ १/२ ॥
ततः तेनाप्रमेयेण कपिलेन महात्मना ।
भस्मराशीकृताः सर्वे काकुत्स्थ सगरात्मजाः ॥ ३० ॥
'श्रीरामा ! त्या हुंकाराबरोबरच त्या अनंत प्रभावशाली महात्मा कपिलाने त्या सर्व सगरपुत्रांना जाळून राखेचा ढीग करून टाकले. ॥ ३० ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे चत्वारिंशः सर्गः ॥ ४० ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा चाळीसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ४० ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP