श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ द्वादशाधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

विभीषणस्य राज्याभिषेकः श्रीरामेण हनुमद् द्वारा सीतां प्रति संदेशस्य प्रेरणम् -
विभीषणाचा राज्याभिषेक आणि श्रीरघुनाथांनी हनुमान्‌द्वारा सीते जवळ संदेश धाडणे -
ते रावणवधं दृष्ट्‍वा देवगन्धर्वदानवाः ।
जग्मुः स्वै स्वैर्विमानैस्ते कथयन्तः शुभाः कथाः ।। १ ।।
देवता, गंधर्व आणि दानवगण रावण वधाचे दृश्य पाहून त्याचीच शुभ चर्चा करीत आपापल्या विमानाने यथास्थान परत गेले. ॥१॥
रावणस्य वधं घोरं राघवस्य पराक्रमम् ।
सुयुद्धं वानराणां च सुग्रीवस्य च मन्त्रितम् ।। २ ।।

अनुरागं च वीर्यं च मारुतेर्लक्ष्मणस्य च ।
पतिव्रतात्वं सीताया हनूमति पराक्रमम् ॥ ३ ॥

कथयन्तो महाभागा जग्मुर्हृष्टा यथागतम् ।
रावणाचा भयंकर वध, राघवांचा पराक्रम, वानरांचे उत्तम युद्ध, सुग्रीवांची मंत्रणा, लक्ष्मण आणि हनुमान्‌ यांची श्रीरामांवरील भक्ति, तसेच त्या दोघांचा पराक्रम, सीतेचे पातिव्रत तसेच हनुमानांच्या पुरुषार्थाच्या गोष्टी बोलत बोलत त्या महाभाग देवता आदि जसे आले होते, त्याच प्रकारे प्रसन्नतापूर्वक निघून गेले. ॥२-३ १/२॥
राघवस्तु रथं दिव्यं इन्द्रदत्तं शिखिप्रभम् ।। ४ ।।

अनुज्ञाय महाबाहु मातलिं प्रत्यपूजयत् ।
त्यानंतर महाबाहु भगवान्‌ राघवांनी इंद्रांनी दिलेल्या अग्निसमान देदीप्यमान दिव्य रथास परत घेऊन जाण्याची आज्ञा मातलिला देऊन त्यांचा फार मोठा सन्मान केला. ॥४ १/२॥
राघवेणाभ्यनुज्ञातो मातलिः शक्रसारथिः ।। ५ ।।

दिव्यं तं रथमास्थाय दिवमेवोत्पपात ह ।
तेव्हा इंद्रसारथि मातलि राघवांच्या आज्ञेने त्या दिव्य रथावर बसून पुनः दिव्य लोकालाच निघून गेले. ॥५ १/२॥
तस्मिंस्तु दिवमारूढे सुरथे रथिनां वरः ।। ६ ।।

राघवः परमप्रीतः सुग्रीवं परिषस्वजे ।
मातलि रथसहित देवलोकाला निघून गेल्यावर रथिंमध्ये श्रेष्ठ श्रीरामांनी अत्यंत प्रसन्नतेने सुग्रीवाला हृदयाशी धरले. ॥६ १/२॥
परिष्वज्य च सुग्रीवं लक्ष्मणेनाभिवादितः ।। ७ ।।

पूज्यमानो हरिगणैः आजगाम बलालयम् ।
सुग्रीवांना आलिंगन दिल्यानंतर जेव्हा त्यांनी लक्ष्मणांकडे दृष्टि टाकली तेव्हा लक्ष्मणांनी त्यांच्या चरणी प्रणाम केला. नंतर वानर सैनिकांच्या कडून सन्मानित होऊन ते सेनेच्या छावणीवर परत आले. ॥७ १/२॥
अथोवाच स काकुत्स्थः समीप परिवर्तिनम् ।। ८ ।।

सौमित्रिं सत्यसम्पन्नं लक्ष्मणं दीप्ततेजसम् ।
विभीषणमिमं सौम्य लङ्‌कायामभिषेचय ।। ९ ।।

अनुरक्तं च भक्तं च मम चैवोपकारिणम् ।
तेथे आल्यावर काकुत्स्थ श्रीरामांनी आपल्या जवळ उभे असलेल्या बल आणि उद्दीप्त तेजाने संपन्न सौमित्र लक्ष्मणांना सांगितले - सौम्य ! आतां तुम्ही लंकेत जाऊन या विभीषणांचा राज्याभिषेक करा, कारण की हे माझे प्रेमी, भक्त तसेच प्रथम उपकार करणारे आहेत. ॥८-९ १/२॥
एष मे परमः कामो यदीमं रावणानुजम् ।। १० ।।

लङ्‌कायां सौम्य पश्येयं अभिषिक्तं विभीषणम् ।
सौम्य ! ही माझी फार मोठी इच्छा आहे की रावणाचे लहान भाऊ या विभीषणास मी लंकेच्या राज्यावर अभिषिक्त झालेले पहावे. ॥१० १/२॥
एवमुक्तस्तु सौमित्री राघवेण महात्मना ।। ११ ।।

तथेत्युक्त्वा सुसंहृष्टः सौवर्णं घटमाददे ।
तं घटं वानरेन्द्राणां हस्ते दत्त्वा मनोजवान् ।। १२ ।।

आदिदेश महासत्त्वान् समुद्रसलिलं तदा ।
इति शीघ्रं ततो गत्वा वानरास्ते मनोजवाः ।। १३ ।।

आगतास्तु जलं गृह्य समुद्राद् वानरोत्तमाः ।
महात्मा राघवांनी असे म्हटल्यावर सौमित्र लक्ष्मणांना फार प्रसन्नता वाटली. त्यांनी 'फार चांगले' असे म्हणून सोन्याचा घडा हातात घेतला आणि तो वानरयूथपतिंच्या हातात देऊन त्या महान्‌ शक्तिशाली तसेच मनासमान वेग असणार्‍या वानरांना त्याने जल आणण्याची आज्ञा दिली. ते मनाप्रमाणे वेगवान असलेले श्रेष्ठ वानर लगेच गेले आणि समुद्रातून पाणी घेऊन आले. ॥ ११-१३ १/२ ॥
ततस्त्वेकं घटं गृह्य संस्थाप्य परमासने ।। १४ ।।

घटेन तेन सौमित्रिः अभ्यषिञ्चद् विभीषणम् ।
लङ्‌कायां रक्षसां मध्ये राजानं रामशासनात् ।। १५ ।।

विधिना मन्त्रदृष्टेन सुहृद् गणसमावृतम् ।
अभ्यषिञ्चस्तदा सर्वे राक्षसा वानरास्तथा ।। १६ ।।
त्यानंतर लक्ष्मणाने एक घट घेऊन तो एका उत्तम आसनावर स्थापित केला आणि त्यातील जलाने विभीषणाला विधिवत् लंकेच्या राज्यपदी अभिषिक्त केले. हा अभिषेक प्रभु रामचंद्रांच्या आज्ञेने झाला होता. त्यावेळी राक्षसांमध्ये सुहृदांनी घेरलेला विभीषण राजसिंहासनावर विराजमान झाला. लक्ष्मणानंतर सर्व राक्षसांनी आणि वानरांनीदेखील त्याला अभिषेक केला. ॥ १४-१६ ॥
पहर्षमतुलं गत्वा तुष्टुवू राममेव हि ।
तस्यामात्या जहृषिरे भक्ता ये चास्य राक्षसाः ।। १७ ।।

दृष्ट्‍वाभिषिक्तं लङ्‌कायां राक्षसेन्द्रं विभीषणम् ।
राघवः परमां प्रीतिं जगाम सहलक्षमणः ॥ १८ ॥
मग ते अत्यंत प्रसन्न होऊम श्रीरामचंद्रांची स्तुति करू लागले. राक्षसराज विभीषण लंकेच्या राज्यावर अभिषिक्त झालेले पाहून त्याचे राक्षस मंत्री फार प्रसन्न झाले. तसेच लक्ष्मणासह श्रीरामांनाही फार प्रसन्नता वाटली. ॥ १७-१८ ॥
स तद् राज्यं महत् प्राप्य रामदत्तं विभीषणः ।
सान्त्वयित्वा प्रकृतयः ततो राममुपागमत् ।। १९ ।।
श्रीरामचंद्रांनी दिलेले ते विशाल राज्य प्राप्त झाल्यावर विभीषण आपल्या प्रजेला सांत्वना देऊन श्रीरामापाशी आला. ॥ १९ ॥
दध्यक्षतान् मोदकांश्च लाजाः सुमनसस्तथा ।
आजह्रुरथ संहृष्टाः पौरास्तस्मै निशाचराः ।। २० ।।
त्यावेळी हर्षभरित झालेल्या नगरनिवासी निशाचरांनी विभीषणाला अर्पण करण्यासाठी दही, अक्षत, मिठाई, लाह्या आणि फुले आणली. ॥ २० ॥
स तान् गृहीत्वा दुर्धर्षो राघवाय न्यवेदयत् ।
मङ्‌गल्यं मङ्‌गलं सर्वं लक्ष्मणाय च वीर्यवान् ।। २१ ।।
दुर्धर्ष पराक्रमी विभीषणाने त्या सर्व मंगलकारक व मंगलसूचक वस्तू श्रीरामांना आणि लक्ष्मणाला भेट म्हणून दिल्या. ॥ २१ ॥
कृतकार्यं समृद्धार्थं दृष्ट्‍वा रामो विभीषणम् ।
प्रतिजग्राह तत् सर्वं तस्यैव प्रतिकाम्यया ।। २२ ।।
श्रीराघवांनी विभीषण कृतकार्य आणि सफलमनोरथ झालेला पाहून त्याच्या आनंदासाठीच त्या सर्व मंगलवस्तूंचा स्वीकार केला. ॥ २२ ॥
ततः शैलोपमं वीरं प्राञ्जलिं पार्श्वतः स्थितम् ।
अब्रवीद्राघवो वाक्यं हनुमन्तं प्लवङ्‌गमम् ।। २३ ।।

अनुन्याप्य महाराजं इमं सौम्य विभीषणम् ।
प्रविश्य नगरीं लङ्‌कां कौशलं ब्रूहि मैथिलीम् ॥ २४ ॥

वैदेह्यै मां च कुशलं सुग्रीवं च सलक्ष्मणम् ।
त्यानंतर त्यांनी हात जोडून अत्यंत विनीतभावाने उभ्या असलेल्या पर्वताकार वीर वानर हनुमंतास जवळ बोलावून म्हणाले, "सौम्य ! तू विभीषण महाराजांची आज्ञा घेऊन लंकानगरीत प्रवेश कर आणि मिथिलेशकुमारी सीतेला तिची खुशाली विचार. त्याचबरोबर त्य् विदेहराजकुमारीला सुग्रीव आणि लक्ष्मणासह मी कुशल असल्याचें वृत्त कळव. ॥ २३-२४ १/२ ॥
आचक्ष्व वदतां श्रेष्ठ रावणं च हतं रणे ।। २५ ।।

प्रियमेतद् इहख्याहि वैदेह्तास्त्वं हरीश्वर ।
प्रतिगृह्य तु सन्देशं उपावर्तितुमर्हसि ।। २६ ।।
वक्त्यांमध्ये श्रेष्ठ हरीश्वरा, तू वैदेहीला हा प्रिय समाचार अकव की, रावण युद्धात मारला गेला आहे, आणि तिचा संदेश त्वरित परत ये. ॥ २५-२६ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे द्वादधाधिकशततमः सर्गः ।। ११२ ।।
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशे बारावा सर्ग पूरा झाला. ॥११२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP