श्रीरामकैकेयीसंवादौ वनगमनमङ्गीकृत्य श्रीरामस्य मातुराज्ञां ग्रहीतुं तत्सन्निधौ गमनम् -
|
श्रीरामांचे कैकेयीशी संभाषण आणि वनात जाणे स्वीकारून त्यांचे माता कौसल्येपाशी आज्ञा घेण्यासाठी जाणे -
|
तदप्रियममित्रघ्नो वचनं मरणोपमम् ।
श्रुत्वा न विव्यथे रामः कैकेयीं चेदमब्रवीत् ॥ १ ॥
|
ते अप्रिय आणि मृत्युसमान कष्टदायक वचन ऐकूनही शत्रुसूदन राम व्यथित झाले नाहीत. त्यांनी कैकेयीला याप्रकारे म्हटले - ॥१॥
|
एवमस्तु गमिष्यामि वनं वस्तुमहं त्वितः ।
जटाचीरधरो राज्ञः प्रतिज्ञामनुपालयन् ॥ २ ॥
|
'माते ! फार चांगले ! असेच होवो. मी महाराजांच्या प्रतिज्ञेचे पालन करण्यासाठी जटा आणि चीर धारण करून वनांत राहाण्याच्या निमित्ताने अवश्य येथून निघून जाईन. ॥२॥
|
इदं तु ज्ञातुमिच्छामि किमर्थं मां महीपतिः ।
नाभिनन्दति दुर्धर्षो यथापूर्वमरिन्दमः ॥ ३ ॥
|
परंतु मी हे जाणू इच्छितो की आज दुर्जय तथा शत्रुंचे दमन करणारे महाराज पूर्वीप्रमाणे माझ्याशी प्रसन्नतापूर्वक बोलत कां नाहीत ? ॥३॥
|
मन्युर्न च त्वया कार्यो देवि ब्रूमि तवाग्रतः ।
यास्यामि भव सुप्रीता वनं चीरजटाधरः ॥ ४ ॥
|
'देवी ! मी तुझ्या समोर असे विचारत आहे म्हणून तू क्रोध करता कामा नये. निश्चितच चीर आणि जटा धारण करून मी वनात निघून जाईन. तु प्रसन्न रहा. ॥४॥
|
हितेन गुरुणा पित्रा कृतज्ञेन नृपेण च ।
नियुज्यमानो विस्रब्धः किं न कुर्यामहं प्रियम् ॥ ५ ॥
|
राजे माझे हितैषी, गुरू, पिता आणि कृतज्ञ आहेत. त्यांची आज्ञा झाली तर मी त्यांचे कोणते असे प्रिय कार्य आहे की जे मी निशंक होऊन करू शकणार नाही ? ॥५॥
|
अलीकं मानसं त्वेकं हृदयं दहते मम ।
स्वयं यन्नाह मां राजा भरतस्याभिषेचनम् ॥ ६ ॥
|
परंतु माझ्या मनाला एकच हार्दिक दुःख अधिक जाळत आहे की स्वयं महाराजांनी मला भरताच्या अभिषेकाची गोष्ट सांगितली नाही. ॥६॥
|
अहं हि सीतां राज्यं च प्राणानिष्टान् धनानि च ।
हृष्टो भ्रात्रे स्वयं दद्यां भरताय प्रचोदितः ॥ ७ ॥
|
मी केवळ तुझ्या सांगण्यावरूनही आपला भाऊ भरत याच्यासाठी राज्याला, सीतेला, प्रिय प्राणांना तथा सार्या संपत्तिलाही प्रसन्नतापूर्वक स्वयंही देऊ शकतो. ॥७॥
|
किं पुनर्मनुजेन्द्रेण स्वयं पित्रा प्रचोदितः ।
तव च प्रियकामार्थं प्रतिज्ञामनुपालयन् ॥ ८ ॥
|
मग जर स्वयं महाराजांनी - माझ्या पित्यानी आज्ञा दिली आणि तीही तुझे प्रिय कार्य करण्यासाठी, तर मी प्रतिज्ञेचे पालन करीत हे कार्य का बरे करणार नाही ? ॥८॥
|
तथाश्वासय ह्रीमन्तं किंत्विदं यन्महीपतिः ।
वसुधासक्तनयनो मन्दमश्रूणि मुञ्चति ॥ ९ ॥
|
तू माझ्या वतीने विश्वास देऊन या लज्जाशील महाराजांना आश्वासन दे; हे पृथ्वीनाथ पृथ्वीकडे दृष्टी करून हळू हळू अश्रू का ढाळीत आहेत ? ॥९॥
|
गच्छन्तु चैवानयितुं दूताः शीघ्रजवैर्हयैः ।
भरतं मातुलकुलादद्यैव नृपशासनात् ॥ १० ॥
|
आजच महाराजांच्या आज्ञेने शीघ्रगामी घोड्यावर स्वार होऊन दूत भरताला मामाच्या येथून बोलावून आणण्यासाठी निघून जावोत. ॥१०॥
|
दण्डकारण्यमेषोऽहं गच्छामेव हि सत्वरः ।
अविचार्य पितुर्वाक्यं समा वस्तुं चतुर्दश ॥ ११ ॥
|
मी आत्ता वडीलांच्या कुठल्याहि गोष्टीवर विचार न करता चौदा बर्षेपर्यंत वनात राहाण्यासाठी तात्काळ दण्डकारण्यात निघून जातो. ॥११॥
|
सा हृष्टा तस्य तद् वाक्यं श्रुत्वा रामस्य कैकयी ।
प्रस्थानं श्रद्दधाना हि त्वरयामास राघवम् ॥ १२ ॥
|
श्रीरामाचे हे बोलणे ऐकून कैकेयी खूप प्रसन्न झाली. तिला विश्वास वाटला की हे वनात निघून जातील म्हणून राघवाला लवकर जाण्याची प्रेरणा देत ती बोलली - ॥१२॥
|
एवं भवतु यास्यन्ति दूताः शीघ्रजवैर्हयैः ।
भरतं मातुलकुलादिहावर्तयितुं नराः ॥ १३ ॥
|
'तू ठीक सांगत आहेस. असेच झाले पाहिजे. भरताला मामाच्या येथून बोलावून आणण्यासाठी दूतलोक शीघ्रगामी घोड्यांवर स्वार होऊन अवश्य जातील. ॥१३॥
|
तव त्वहं क्षमं मन्ये नोत्सुकस्य विलम्बनम् ।
राम तस्मादितः शीघ्रं वनं त्वं गंतुमर्हसि ॥ १४ ॥
|
'परंतु रामा ! तू वनात जाण्यासाठी स्वयंही उत्सुक आहेस असे कळून येत आहे म्हणून तुला विलंब करणे मी ठीक समजत नाही. जितके शीघ्र जाणे शक्य असेल तितके तू येथून वनात निघून गेले पाहिजेस. ॥१४॥
|
व्रीडान्वितः स्वयं यच्च नृपस्त्वां नाभिभाषते ।
नैतत् किञ्चिन्नरश्रेष्ठ मन्युरेषोऽपनीयताम् ॥ १५ ॥
|
'नरश्रेष्ठ ! राजा लज्जित होण्यामुळे स्वतः तुम्हांला सांगत नाहीत, ही काही विचारणीय गोष्ट नाही. म्हणून याचे दुःख तू आपल्या मनांतून काढून टाक. ॥१५॥
|
यावत्त्वं न वनं यातः पुरादस्मादतित्वरम् ।
पिता तावन्न ते राम स्नास्यते भोक्ष्यतेऽपि वा ॥ १६ ॥
|
'रामा ! तू जोपर्यत अत्यंत घाईने या नगरांतून वनाकडे निघून जात नाही तो पर्यंत तुझे पिता स्नान अथवा भोजन करणार नाहीत. ॥१६॥
|
धिक्कष्टमिति निःश्वस्य राजा शोकपरिप्लुतः ।
मूर्च्छितो न्यपतत् तस्मिन् पर्यङ्के हेमभूषिते ॥ १७ ॥
|
कैकेयीचे हे बोलणे ऐकून शोकात बुडालेल्या राजा दशरथांनी दिर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, 'धिक्कार आहे ! हाय ! फार कष्ट झाले !' इतके म्हणून ते मूर्छित होऊन त्या सुवर्णभूषित पलंगावर पडले. ॥१७॥
|
रामोऽप्युत्थाप्य राजानं कैकेय्याभिप्रचोदितः ।
कशयेव हतो वाजी वनं गन्तुं कृतत्वरः ॥ १८ ॥
|
त्या समयी रामांनी राजांना उठून बसविले आणि कैकेयीच्या द्वारा प्रेरीत होवून ते चाबकाचे फटकारे बसलेल्या घोड्याप्रमाणे शीघ्रतापूर्वक वनात जाण्यासाठी उतावीळ झाले. ॥१८॥
|
तदप्रियमनार्याया वचनं दारुणोदयम् ।
श्रुत्वा गतव्यथो रामः कैकेयीं वाक्यमब्रवीत् ॥ १९ ॥
|
अनार्या कैकेयीचे ते अप्रिय आणि दारूण वचन ऐकूनही रामाच्या मनात व्यथा उत्पन्न झाली नाही. ते कैकेयीला म्हणाले - ॥१९॥
|
नाहमर्थपरो देवि लोकमावस्तुमुत्सुहे ।
विद्धि मामृषिभिस्तुल्यं केवलं धर्ममास्थितम् ॥ २० ॥
|
'देवी ! मी धनाचा उपासक होऊन संसारात राहू इच्छित नाही. तू विश्वास ठेव मीही ऋषिंच्या प्रमाणेच निर्मल धर्माचा आश्रय केलेला आहे. ॥२०॥
|
यद् तत्रभवतः किञ्चिच्छक्यं कर्तुं प्रियं मया ।
प्राणानपि परित्यज्य सर्वथा कृतमेव तत् ॥ २१ ॥
|
पूज्य पित्याचे जे काही प्रिय कार्य असेल ते मी करू शकतो, त्यासाठी प्राण देऊनही मी ते करीन. तू त्याला सर्वथा माझ्या द्वारा झालेलेच समज. ॥२१॥
|
न ह्यतो धर्मचरणं किञ्चिदस्ति महत्तरम् ।
यथा पितरि शुश्रूषा तस्य वा वचनक्रिया ॥ २२ ॥
|
पित्याची सेवा करणे अथवा त्यांच्या आज्ञेचे पालन करणे जसा महत्वपूर्ण धर्म आहे, त्याहून या संसारात दुसरे कोठलेही धर्माचरण नाही. ॥२२॥
|
अनुक्तोऽप्यत्रभवता भवत्या वचनादहम् ।
वने वत्स्यामि विजने वर्षाणीह चतुर्दश ॥ २३ ॥
|
यद्यपि पूज्य पित्याने स्वयं मला सांगितलेले नाही तथापि मी तुझ्याच सांगण्या वरून चौदा वर्षेपर्यत या भूतलावर निर्जन वनात निवास करीन. ॥२३॥
|
न नूनं मयि कैकेयि किञ्चिदाशंससे गुणान् ।
यद् राजानमवोचस्त्वं ममेश्वरतरा सती ॥ २४ ॥
|
'कैकेयी ! तुझा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. मी तुझ्या प्रत्येक आज्ञेचे पालन करू शकतो. तरीही तू स्वतः मला न सांगता या कार्यासाठी महाराजांना सांगितलेस- त्यांना कष्ट दिलेस. यावरून असे कळून येत आहे की तू माझ्या ठिकाणी काहीही गुण पहात नाहीस. ॥२४॥
|
यावन्मातरमापृच्छे सीतां चानुनयाम्यहम् ।
ततोऽद्यैव गमिष्यामि दण्डकानां महद् वनम् ॥ २५ ॥
|
'ठीक आहे' आता मी कौसल्ये मातेची आज्ञा घेऊन येतो आणि सीतेचीही समजूत घालतो, यानंतर आजच विशाल दण्डकवनाची यात्रा करीन.' ॥२५॥
|
भरतः पालयेद् राज्यं शुश्रूषेच्च पितुर्यथा ।
तथा भवत्या कर्त्तव्यं स हि धर्मः सनातनः ॥ २६ ॥
|
तू असा प्रयत्न कर की ज्यायोगे भरत या राज्याचे पालन आणि पित्याची सेवा करीत राहील, कारण हाच सनातन धर्म आहे.' ॥२६॥
|
रामस्य तु वचः श्रुत्वा भृशं दुःखगतः पिता ।
शोकादशक्नुवन् वक्तुं प्ररुरोद महास्वनम् ॥ २७ ॥
|
रामांचे हे वचन ऐकून पित्याला फार दुःख झाले. ते शोकाच्या आवेगाने काही बोलू शकले नाहीत. केवळ ओक्साबोक्शी रडू लागले. ॥२७॥
|
वन्दित्वा चरणौ रामो विसंज्ञस्य पितुस्तथा ।
कैकेय्याश्चाप्यनार्याया निष्पपात महाद्युतिः ॥ २८ ॥
|
महातेजस्वी राम त्या समयी निश्चेष्ट पडलेल्या पित्याच्या महाराज दशरथांच्या तथा अनार्या कैकेयीच्याही चरणांना प्रणाम करून त्या भवनांतून बाहेर पडले. ॥२८॥
|
स रामः पितरं कृत्वा कैकेयीं च प्रदक्षिणम् ।
निष्क्रम्यान्तःपुरात् तस्मात् स्वं ददर्श सुहृज्जनम् ॥ २९ ॥
|
पिता दशरथ आणि माता कैकेयीची परिक्रमा करून त्या अंतःपुरांतून बाहेर पडून राम आपल्या सुहृदांना भेटले. ॥२९॥
|
तं बाष्पपरिपूर्णाक्षः पृष्ठतोऽनुजगाम ह ।
लक्ष्मणः परमक्रुद्धः सुमित्रानन्दवर्धनः ॥ ३० ॥
|
सुमित्रानंदवर्धन लक्ष्मण तो अन्याय पाहून फार कुपित झाले. तथापि दोन्ही डोळ्यांत अश्रु भरून आले असता ते गुपचुप श्रीरामांचा मागोमाग चालू लागले. ॥३०॥
|
आभिषेचनिकं भाण्डं कृत्वा रामः प्रदक्षिणम् ।
शनैर्जगाम सापेक्षो दृष्टिं तत्राविचालयन् ॥ ३१ ॥
|
श्रीरामचंद्राच्या मनात आता वनात जाण्याच्या आकांक्षेचा उदय झाला होता म्हणून अभिषेकासाठी एकत्र केल्या गेलेल्या सामग्रीची प्रदक्षिणा करून ते हळू हळू पुढे चालू लागले. त्याकडे त्यांनी दृष्टिपातही केला नाही. ॥३१॥
|
न चास्य महतीं लक्ष्मीं राज्यनाशोऽपकर्षति ।
लोककान्तस्य कान्तत्वाच्छीतरश्मेरिव क्षयः ॥ ३२ ॥
|
श्रीराम अविनाशी कांतिने युक्त होते म्हणून त्या समयी राज्य न मिळाल्यामुळे त्या लोककमनीय श्रीरामांच्या महान शोभेत काही अंतर पाडू शकले नाही. ज्याप्रमाणे चंद्रम्याचे क्षीण होणे त्याच्या सहज शोभेचा अपकर्ष करू शकत नाही. ॥३२॥
|
न वनं गन्तुकामस्य त्यजतश्च वसुंधराम् ।
सर्वलोकातिगस्येव लक्ष्यते चित्तविक्रिया ॥ ३३ ॥
|
ते वनात जाण्यास उत्सुक होते आणि सार्या पृथ्वीचे राज्य सोडत होते तरीही त्यांच्या चित्तात सर्वलोकातीत जीवन्मुक्त महात्म्याप्रमाणे कुठलाही विकार दिसून आला नाही. ॥३३॥
|
प्रतिषिध्य शुभं छत्रं व्यजने च स्वलङ्कृते ।
विसर्जयित्वा स्वजनं रथं पौरांस्तथा जनान् ॥ ३४ ॥
धारयन् मनसा दुःखमिन्द्रियाणि निगृह्य च ।
प्रविवेशात्मवान् वेश्म मातुरप्रियशंसिवान् ॥ ३५ ॥
|
श्रीरामांनी आपल्यावर सुंदर छ्त्र धरण्यास मनाई केली. ढळल्या जाणार्या सुसाज्जित चवर्याही रोखल्या. ते रथ परत धाडून स्वजन आणि पुरवासी मनुष्यांनाही निरोप दिला (आत्मीय जनांच्या दुःखाने होणार्या) दुःखाला मनांतल्या मनांतच दाबून इंद्रियांना काबूत ठेवून हा अप्रिय समाचार ऐकविण्यासाठी कौसल्या मातेच्या महालात गेले. त्यावेळी त्यांनी मनाला पूर्णपणे वश केलेले होते. ॥३४-३५॥
|
सर्वोऽप्यभिजनः श्रीमाञ्श्रीमतः सत्यवादिनः ।
नालक्षयत रामस्य कञ्चिदाकारमानने ॥ ३६ ॥
|
जी शोभाशाली माणसे सदा सत्यवादी श्रीमान रामाच्या निकट राहात असत त्यांनाही रामांच्या मुखावर कुठलाही विकार दिसून आला नाही. ॥३६॥
|
उचितं च महाबाहुर्न जहौ हर्षमात्मवान् ।
शारदः समुदीर्णांशुश्चन्द्रस्तेज इवात्मजम् ॥ ३७ ॥
|
ज्याप्रमाणे शरद-कालातील उद्दीप्त किरणयुक्त चंद्रमा आपल्या सहज तेजाचा परित्याग करीत नाही त्याप्रमाणेच मनाला वश ठेवणार्या महाबाहु श्रीरामांनी आपली स्वाभाविक प्रसन्नता सोडली नव्हती. ॥३७॥
|
वाचा मधुरया रामः सर्वं सम्मानयञ्जनम् ।
मातुः समीपं धर्मात्मा प्रविवेश महायशाः ॥ ३८ ॥
|
महायशस्वी धर्मात्मा राम मधुर वाणीने सर्व लोकांचा सन्मान करीत आपल्या मातेच्या समीप गेले. ॥३८॥
|
तं गुणैः समतां प्राप्तो भ्राता विपुलविक्रमः ।
सौमित्रिरनुवव्राज धारयन् दुःखमात्मजम् ॥ ३९ ॥
|
त्यासमयी गुणांमध्ये श्रीरामांची बरोबरी करणारे महापराक्रमी भ्राता सुमित्राकुमार लक्ष्मणही आपल्या मानसिक दुःखाला मनांतच धारण करीत श्रीरामांच्या पाठोपाठ गेले. ॥३९॥
|
प्रविश्य वेश्मातिभृशं मुदा युतं
समीक्ष्य तां चार्थविपत्तिमागताम् ।
न चैव रामोऽत्र जगाम विक्रियां
सुहृज्जनस्यात्मविपत्तिशङ्कया ॥ ४० ॥
|
अत्यंत आनंदाने भरलेल्या त्या भवनात प्रवेश करून लौकिक दृष्टिने आपल्या अभीष्ट अर्थाचा विनाश झालेला पाहूनही हितैषी सुहृदांच्या प्राणांवर संकट येण्याच्या आशंकेने श्रीरामांनी येथेही आपल्या मुखावर कोणताही विकार प्रकट होऊ दिला नाही. ॥४०॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे एकोनविंशःसर्गः ॥ १९ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा एकोणविसावा सर्ग पूरा झाला. ॥१९॥
|