श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ षष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
संपातेः आत्मकथा - संपातिची आत्मकथा -
ततः कृतोदकं स्नातं तं गृध्रं हरियूथपाः ।
उपविष्टा गिरौ दुर्गे परिवार्य समंततः ॥ १ ॥
गृध्रराज संपाति आपल्या भावाला जलांजली देऊन जेव्हा स्नान करून चुकले तेव्हा त्या रमणीय पर्वतावर ते समस्त वानरयूथपति त्यांना चारी बाजूने घेरून बसले. ॥१॥
तमङ्‌ग्दमुपासीनं तैः सर्वैर्हरिभिर्वृतम् ।
जनितप्रत्ययो हर्षात् संपातिः पुनरब्रवीत् ॥ २ ॥
त्या समस्त वानरांनी घेरलेले अंगद त्यांच्या जवळच बसले होते. संपातिंनी सर्वांच्या हृदयात आपल्या विषयी विश्वास उत्पन्न केला होता. ते हर्षोत्फुल्ल होऊन नंतर या प्रकारे सांगू लागले- ॥२॥
कृत्वा निःशब्दमेकाग्राः शृण्वंतु हरयो मम ।
तत्त्वं सङ्‌की्र्तयिष्यामि यथा जानामि मैथिलीम् ॥ ३ ॥
 ’सर्व वानरांनी एकाग्रचित्त आणि मौन राहून माझे बोलणे ऐकावे. मी मैथिलीला ज्या प्रकारे जाणतो, तो सर्व प्रसंग चांगल्या प्रकारे (यथावत्) सांगतो. ॥३॥
अस्य विंध्यस्य शिखरे पतितोऽस्मि पुरानघ ।
सूर्यातप परीताङ्‌गोक निर्दग्धः सूर्यरश्मिभिः ॥ ४ ॥
’निष्पाप अंगदा ! प्राचीन काळी मी सूर्याच्या किरणांनी भाजून या विंध्य पर्वताच्या शिखरावर पडलो होतो. त्या समयी माझे सारे अंग सूर्याच्या प्रचंड तापाने संतप्त झाले होते. ॥४॥
लब्धसंज्ञस्तु षड्रात्राद् विवशो विह्वलन्निव ।
वीक्षमाणो दिशः सर्वा नाभिजानामि किञ्चन ॥ ५ ॥
’सहा रात्री गेल्यावर जेव्हा मला शुद्ध आली आणि मी विवश आणि विव्हळ झाल्यप्रमाणे संपूर्ण दिशांकडे पाहू लागलो तेव्हा एकाएकी मी कुठल्याही वस्तुला ओळखू शकलो नाही. ॥५॥
ततस्तु सागरान् शैलान् नदीः सर्वाः सरांसि च ।
वनानि च प्रदेशांश्च निरीक्ष्य मतिरागता ॥ ६ ॥
’त्यानंतर हळू हळू समुद्र, पर्वत, समस्त नदी, सरोवर, वन आणि येथील विभिन्न प्रदेशावर दृष्टि टाकली, तेव्हा माझी स्मरणशक्ती परत आली. ॥६॥
हृष्टपक्षिगणाकीर्णः कंदरांतरकूटवान् ।
दक्षिणस्योदधेस्तीरे विंध्योऽयमिति निश्चयः ॥ ७ ॥
’नंतर मी निश्चय केला की हा दक्षिण समुद्राच्या तटावर स्थित विंध्यपर्वत आहे, जो हर्षोत्फुल्ल विहंगमांच्या समुदायांनी व्याप्त आहे. येथे बर्‍याचशा कंदरा, गुहा आणि शिखरे आहेत. ॥७॥
आसीच्चात्राश्रमं पुण्यं सुरैरपि सुपूजितम् ।
ऋषिर्निशाकरो नाम यस्मिन्नुग्रतपाऽभवत् ॥ ८ ॥
’पूर्वकाळी येथे एक पवित्र आश्रम होता, ज्याचा देवताही मोठा सन्मान करीत असत. त्या आश्रमात निशाकर (चंद्रमा) नावाचे एक ऋषि राहात होते, जे फारच उग्र तपस्वी होते. ॥८॥
अष्टौ वर्षसहस्राणि तेनास्मिन्नृषिणा गिरौ ।
वसतो मम धर्मज्ञे स्वर्गते तु निशाकरे ॥ ९ ॥
’ते धर्मज्ञ निशाकर मुनि आता स्वर्गवासी झाले आहेत. त्या महर्षि शिवाय या पर्वतावर राहात असता माझी आठ हजार वर्षे निघून गेली. ॥९॥
अवतीर्य च विंध्याग्रात् कृच्छ्रेण विषमाच्छनैः ।
तीक्ष्णदर्भां वसुमतीं दुःखेन पुनरागतः ॥ १० ॥
’भानावर आल्यानंतर मी या पर्वताच्या उच्चनीच शिखरांवरून हळू हळू मोठ्या कष्टाने जमिनीवर उतरलो, त्या समयी अशा स्थानावर येऊन पोहोचलो, जेथे तीक्ष्ण कुश (दर्भ) उगवलेले होते. नंतर तेथून ही कष्ट सहन करीत मी पुढे निघालो. ॥१०॥
तमृषिं द्रष्टुकामोऽस्मि दुःखेनाभ्यागतो भृशम् ।
जटायुषा मया चैव बहुशोऽधिगतो हि सः ॥ ११ ॥
’मी त्या महर्षिंचे दर्शनाची इच्छा करत होतो, म्हणून अत्यंत कष्ट सहन करून तेथे गेलो होतो. या पूर्वी मी आणि जटायु कित्येक वेळा त्यांना भेटलो होतो. ॥११॥
तस्याश्रमपदाभ्याशे ववुर्वाताः सुगंधिनः ।
वृक्षो नापुष्पितः कश्चिद् अफलो वा न दृश्यते ॥ १२ ॥
’त्यांच्या आश्रमाच्या समीप सदा सुगंधित वारा वहात होता. तेथील कोठलाही वृक्ष, फल अथवा फूलरहित दिसून येत नव्हता. ॥१२॥
उपेत्य चाश्रमं पुण्यं वृक्षमूलमुपाश्रितः ।
द्रष्टुकामः प्रतीक्षे च भगवंतं निशाकरम् ॥ १३ ॥
’त्या पवित्र आश्रमावर पोहोचून मी एका वृक्षाखाली थांबलो आणि भगवान् निशाकरांच्या दर्शनाच्या इच्छेने त्यांच्या येण्याची प्रतीक्षा करू लागलो. ॥१३॥
अथ पश्यामि दूरस्थं ऋषिं ज्वलिततेजसम् ।
कृताभिषेकं दुर्धर्षं उपावृत्तमुदङ्‌मु्खम् ॥ १४ ॥
’थोड्याच वेळात महर्षि मला दुरूनच दिसले. ते आपल्या तेजाने प्रकाशित होत होते आणि स्नान करून उत्तरेकडे परत येत होते. त्यांचा अपमान (तिरस्कार) करणे कुणाला ही कठीण होते. ॥१४॥
तमृक्षाः सृमरा व्याघ्राः सिंहा नानासरीसृपाः ।
परिवार्योपगच्छंति धातारं प्राणिनो यथा ॥ १५ ॥
’अनेकानेक अस्वले, हरणे, सिंह, वाघ आणि नाना प्रकारचे सर्प त्यांना, याचना करणारे प्राणी ज्याप्रमाणे दात्याला घेरून चालतात त्याप्रमाणे घेरून येत होते. ॥१५॥
ततः प्राप्तमृषिं ज्ञात्वा तानि सत्त्वानि वै ययुः ।
प्रविष्टे राजनि यथा सर्वं सामात्यकं बलम् ॥ १६ ॥
’ऋषिंना आश्रमात आलेले जाणून ते सर्व प्राणी परत गेले, ज्याप्रमाणे राजा आपल्या महालात निघून गेला की मंत्र्यांसहित सर्व सेना आपल्या आपल्या विश्रामस्थळी परत जाते अगदी त्याप्रमाणेच. ॥१६॥
ऋषिस्तु दृष्ट्‍वा मां तुष्टः प्रविष्टश्चाश्रमं पुनः ।
मुहूर्तमात्रान्निर्गम्य ततः कार्यमपृच्छत ॥ १७ ॥
’ऋषि मला पाहून फार प्रसन्न झाले आणि आपल्या आश्रमांत प्रवेश करून पुन्हा एका मुहूर्ताने बाहेर आले. नंतर जवळ येऊन त्यांनी माझ्या येण्याचे प्रयोजन विचारले- ॥१७॥
सौम्य वैकल्यतां दृष्ट्‍वा रोम्णां ते नावगम्यते ।
अग्निदग्धाविमौ पक्षौ प्राणाश्चापि शरीरके ॥ १८ ॥
’ते म्हणाले- ’सौम्य ! तुमचे केस गळून गेले आहेत आणि दोन्ही पंख जळून गेले आहेत. याचे कारण कळून येत नाही. इतके असूनही तुझ्या शरीरात प्राण टिकून राहिले आहेत. ॥१८॥
गृध्रौ द्वौ दृष्टपूर्वौ मे मातरिश्वसमौ जवे ।
गृध्राणां चैव राजानौ भ्रातरौ कामरूपिणौ ॥ १९ ॥
’मी पूर्वी वायुसमान वेगवान् दोन गृध्रांना (गिधाडांना) पाहिलेले आहे. ते दोघे परस्परांचे भाऊ आणि इच्छानुसार रूप धारण करणारे होते. त्याच बरोबर ते गृध्रांचे राजे ही होते. ॥१९॥
ज्येष्ठोऽवितस्त्वं संपाते जटायुरनुजस्तव ।
मानुषं रूपमास्थाय गृह्णीतां चरणौ मम ॥ २० ॥
’संपाति ! मी तुला ओळखले आहे. तू दोन्ही भावांमध्ये मोठा आहेस. जटायु तुझा लहान भाऊ होता. तुम्ही दोघे मनुष्य रूप धारण करून माझा चरण-स्पर्श करीत होता. ॥२०॥
किं ते व्याधिसमुत्थानं पक्षयोः पतनं कथम् ।
दण्डो वायं कृतः केन सर्वमाख्याहि पृच्छतः ॥ २१ ॥
’हा तुला कुठला रोग लागला आहे ? तुझे दोन्ही पंख कसे गळून पडले ? कुणी दण्ड तर केला नाही ना ? मी जे काही विचारतो, ते सर्व तू स्पष्टपणे सांग.’ ॥२१॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे षष्टितमः सर्गः ॥ ६० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा साठावा सर्ग पूरा झाला. ॥६०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP