श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ द्वाधिशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामस्य आज्ञया भरतलक्ष्मणाभ्यां कारुपथदेशे पृथक् पृथक् राज्ये अङ्‌गदचन्द्रकेत्वोर्नियोजनम् -
श्रीरामांच्या आज्ञेने भरत आणि लक्ष्मण द्वारा कुमार अंगद आणि चंद्रकेतु यांची कारूपथ देशांतील विभिन्न राज्यांवर नियुक्ति -
तच्छ्रुत्वा हर्षमापेदे राघवो भ्रातृभिः सह ।
वाक्यं चाद्‌भुतसङ्‌काशं तदा प्रोवाच राघव ॥ १ ॥
भरतांच्या मुखाने गंधर्व देशाचा समाचार ऐकून भावांसहित राघवांना फार प्रसन्नता झाली. त्यानंतर श्रीराघवेन्द्र आपल्या भावांना हे अद्‌भुत वचन बोलले - ॥१॥
इमौ कुमारौ सौमित्रे तव धर्मविशारदौ ।
अङ्‌गदश्चन्द्रकेतुश्च राज्यार्थे दृढविक्रमौ ॥ २ ॥
सौमित्रा ! तुझे हे दोन्ही कुमार अंगद आणि चंद्रकेतु धर्माचे ज्ञाते आहेत. यांच्यामध्ये राज्याच्या रक्षणासाठी उपयुक्त असणारी दृढता आणि पराक्रम आहे. ॥२॥
इमौ राज्येऽभिषेक्ष्यामि देशः साधु विधीयताम् ।
रमणीयो ह्यसम्बाधो रमेतां यत्र धन्विनौ ॥ ३ ॥
म्हणून मी यांचाही राज्याभिषेक करीन. तुम्ही यांच्यासाठी कुठल्या चांगल्या देशाची निवड करा जो रमणीय असूनही त्याच बरोबर विघ्न-बाधा रहितही असेल आणि जेथे हे दोघे धनुर्धर वीर आनंदपूर्वक राहू शकतील. ॥३॥
न राज्ञो यत्र पीडा स्यात् नाश्रमाणां विनाशनम् ।
स देशो दृश्यतां सौम्य नापराध्यामहे यथा ॥ ४ ॥
सौम्य ! असा देश पहा जेथे निवास करण्याने दुसर्‍या राजांना पीडा अथवा उद्वेग होणार नाही. आश्रमांचाही नाश करावा लागणार नाही आणि आम्हा लोकांना कुणाच्याही दृष्टिमध्ये अपराधी बनावे लागणार नाही. ॥४॥
तथोक्तवति रामे तु भरतः प्रत्युवाच ह ।
अयं कारुपथो देशो रमणीयो निरामयः ॥ ५ ॥
श्रीरामांनी असे सांगितल्यावर भरतांनी उत्तर दिले - आर्य ! हा कारूपथ नामक देश फार सुंदर आहे. तेथे कुठल्याही प्रकारचा रोग-व्याधिंचे भय नाही. ॥५॥
निवेश्यतां तत्र पुरं अङ्‌गदस्य महात्मनः ।
चन्द्रकेतोः सुरुचिरं चन्द्रकान्तं निरामयम् ॥ ६ ॥
तेथे महात्मा अंगदासाठी नवीन राजधानी वसविली जावी तसेच चंद्रकेतु (अथवा चंद्रकान्त)ला राहाण्यासाठीही चंद्रकान्त नामक नगराची निर्मिति केली जावी; जे सुंदर आणि आरोग्यवर्धक असेल. ॥६॥
तद्वाक्यं भरतेनोक्तं प्रतिजग्राह राघवः ।
तं च कृत्वा वशे देशं अङ्‌गदस्य न्यवेशयत् ॥ ७ ॥
भरतांनी सांगितलेल्या या गोष्टीचा राघवांनी स्वीकार केला आणि कारूपथ देशाला आपल्या अधिकारात घेऊन अंगदाला तेथील राजा बनविले. ॥७॥
अङ्‌गदीया पुरी रम्यापि अङ्‌गदस्य निवेशिता ।
रमणीया सुगुप्ता च रामेणाक्लिष्टकर्मणा ॥ ८ ॥
क्लेशरहित कर्म करणार्‍या भगवान्‌ श्रीरामांनी अंगदासाठी अंगदिया नामक रमणीय पुरी वसविली, जी परम सुंदर त्याच बरोबर सर्व बाजुनी सुरक्षितही होती. ॥८॥
चन्द्रकेतोश्च मल्लस्य मल्लभूम्यां निवेशिता ।
चन्द्रकान्तेति विख्याता दिव्या स्वर्गपुरी यथा ॥ ९ ॥
चंद्रकेतु आपल्या शरीराने मल्लासमान हृष्ट-पुष्ट होते, त्यांच्यासाठी मल्लदेशात चंद्रकान्ता नामाने विख्यात दिव्यपुरी वसविली गेली, जी स्वर्गातील अमरावती नगरी समान सुंदर होती. ॥९॥
ततो रामः परां प्रीतिं लक्ष्मणो भरतस्तथा ।
ययुर्युद्धे दुराधर्षा अभिषेकं च चक्रिरे ॥ १० ॥
यामुळे श्रीराम, लक्ष्मण आणि भरत तिघांनाही फार प्रसन्नता वाटली. त्या सर्व रणदुर्जय वीरांनी स्वतः त्या कुमारांचा अभिषेक केला. ॥१०॥
अभिषिच्य कुमारौ द्वौ प्रस्थाप्य सुसमाहितौ ।
अङ्‌गदं पश्चिमां भूमिं चन्द्रकेतुं उदङ्‌मुखम् ॥ ११ ॥
एकाग्रचित्त तसेच सावधान राहाणार्‍या त्या दोन्ही कुमारांचा अभिषेक करून अंगदाला पश्चिम तसेच चंद्रकेतुला उत्तर दिशेमध्ये धाडले गेले. ॥११॥
अङ्‌गदं चापि सौमित्रिः र्लक्ष्मणोऽनुजगाम ह ।
चन्द्रकेतोस्तु भरतः पार्ष्णिग्राहो बभूव ह ॥ १२ ॥
अंगदाच्या बरोबर स्वयं सौमित्र लक्ष्मण गेले आणि चंद्रकेतुचे सहाय्यक अथवा पार्श्वक भरत झाले. ॥१२॥
लक्ष्मणस्त्वङ्‌गदीयायां संवत्सरमथोषितः ।
पुत्रे स्थिते दुराधर्षे अयोध्यां पुनरागमत् ॥ १३ ॥
लक्ष्मण अंगदीया पुरीमध्ये एक वर्ष राहिले आणि त्यांचा दुर्धर्ष पुत्र अंगद जेव्हा दृढतापूर्वक राज्य संभाळू लागला, तेव्हा ते पुन्हा अयोध्येला परत आले. ॥१३॥
भरतोऽपि तथैवोष्य संवत्सरमतोऽधिकम् ।
अयोध्यां पुनरागम्य रामपादावुपास्त सः ॥ १४ ॥
याचप्रकारे भरत ही चंद्रकान्त नगरीत एका वर्षाहून काही अधिक काळपर्यंत राहिले आणि चंद्रकेतुचे राज्य जेव्हा दृढ झाले तेव्हा ते पुन्हा अयोध्येत येऊन रामांच्या चरणांची सेवा करू लागले. ॥१४॥
उभौ सौमित्रिभरतौ रामपादावनुव्रतौ ।
कालं गतमपि स्नेहात् न जज्ञातेऽतिधार्मिकौ ॥ १५ ॥
लक्ष्मण आणि भरत दोघांचाही श्रीरामांच्या चरणी अनन्य अनुराग होता. दोघेही अत्यंत धर्मात्मा होते. श्रीरामांच्या सेवेत राहून त्यांचा बराच काळ निघून गेला होता परंतु स्नेहाचे आधिक्य असल्याने त्यांना तो कळलाच नाही. ॥१५॥
एवं वर्षसहस्राणि दश तेषां ययुस्तदा ।
धर्मे प्रयतमानानां पौरकार्येषु नित्यदा ॥ १६ ॥
ते तीन्ही भाऊ पुरवासी लोकांच्या कार्यात सदा संलग्न राहात असत आणि धर्मपालनासाठी प्रयत्‍नशील राहात असत. याप्रकारे त्यांची दहा हजार वर्षे निघून गेली. ॥१६॥
विहृत्य कालं परिपूर्णमानसाः
श्रिया वृता धर्मपुरे च संस्थिताः ।
त्रयः समिद्धाहुतिदीप्ततेजसो
हुताग्नयः साधुमहेश्वरे त्रयः ॥ १७ ॥
धर्म साधनाच्या स्थानभूत अयोध्यापुरीत वैभवसंपन्न होऊन रहात असणारे ते तिन्ही भाऊ यथासमय हिंडून फिरून प्रजेची काळजी घेत होते. त्यांचे सारे मनोरथ पूर्ण झाले होते तसेच ते महायज्ञात आहुति मिळून प्रज्वलित झालेल्या दीप्त तेजस्वी गार्हपत्य, आहवनीय आणि दक्षिण नामक त्रिविध अग्निंच्या प्रमाणे प्रकाशित होत होते. ॥१७॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे व्द्युत्तरशततमः सर्गः ॥ १०२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा एकशे दुसरा सर्ग पूरा झाला. ॥१०२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP