श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ अष्टात्रिंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

प्रमुखवानरैः सह सुवेलपर्वतं अधिरूढस्य श्रीरामस्य तत्रैव रात्रौ निवासः - श्रीरामांचे प्रमुख वानरांसह सुवेल पर्वतावर चढून तेथे रात्री निवास करणे -
स तु कृत्वा सुवेलस्य मतिमारोहणं प्रति ।
लक्ष्मणानुगतो रामः सुग्रीवमिदमब्रवीत् ॥ १ ॥

विभीषणं च धर्मज्ञं अनुरक्तं निशाचरम् ।
मंत्रज्ञं च विधिज्ञं च श्लक्ष्णया परया गिरा ॥ २ ॥
सुवेल पर्वतावर चढण्याचा विचार करून, ज्यांच्या मागे लक्ष्मण चालत होते, ते भगवान्‌ श्रीराम सुग्रीवाला आणि धर्माचे ज्ञाते, मंत्रवेत्ता, विधिज्ञ आणि अनुरागी निशाचर विभीषणाला उत्तम आणि मधुर वाणीमध्ये म्हणाले- ॥१-२॥
सुवेलं साधुशैलेन्द्रं इमं धातुशतैश्चितम् ।
अध्यारोहामहे सर्वे वत्स्यामोऽत्र निशामिमाम् ॥ ३ ॥
मित्रांनो ! हा पर्वतराज सुवेल शेकडो धातुनी उत्तमप्रकारे परिपूर्ण आहे. आपण सर्वजण यावर चढू या आणि आजच्या या रात्री येथेच निवास करू या. ॥३॥
लङ्‌कां चालोकयिष्यामो निलयं तस्य रक्षसः ।
येन मे मरणान्ताय हृता भार्या दुरात्मना ॥ ४ ॥
येथून आपण या राक्षसाच्या निवासभूत लंकापुरीचे अवलोकन करू, ज्या दुरात्म्याने आपल्या मृत्युसाठीच माझ्या भार्येचे अपहरण केले आहे. ॥४॥
येन धर्मो न विज्ञातो न वृत्तं न कुलं तथा ।
राक्षस्या नीचया बुद्ध्या येन तद् गर्हितं कृतम् ॥ ५ ॥
ज्याने ना धर्माला जाणले आहे, ना सदाचाराला काही समजलेले नाही आणि ना कुळाचाही विचार केला आहे, केवळ राक्षसोचित नीच बुद्धिमुळेच ते निंदित कर्म केले आहे. ॥५॥
तस्मिन् मे वर्तते रोषः कीर्तिते राक्षसाधमे ।
यस्यापराधान् नीचस्य वधं द्रक्ष्यामि रक्षसाम् ॥ ६ ॥
त्या नीच राक्षसाचे नाव घेताच त्याच्यावरील माझा रोष जागा होतो. केवळ त्या अधम निशाचराच्या अपराधामुळे मी समस्त राक्षसांचा वध पाहीन. ॥६॥
एको हि कुरुते पापं कालपाशवशं गतः ।
नीचेनात्मापचारेण कुलं तेन विनश्यति ॥ ७ ॥
काळाच्या पाशात बद्ध झालेला एकच पुरूष पाप करतो, परंतु त्या नीचाच्या स्वत:च्याच दोषाने सारे कुळ नष्ट होऊन जाते. ॥७॥
एवं सम्मन्त्रयन्नेव सक्रोधो रावणं प्रति ।
रामः सुवेलं वासाय चित्रसानुमुपारुहत् ॥ ८ ॥
याप्रकारे चिंतन करतांनाच श्रीराम रावणाच्या प्रति कुपित होऊन विचित्र शिखरे असलेल्या सुवेल पर्वतावर निवास करण्यासाठी चढले. ॥८॥
पृष्ठतो लक्ष्मणश्चैनं अन्वगच्छत् समाहितः ।
सशरं चापमुद्यम्य सुमहद् विक्रमे रतः ॥ ९ ॥
त्यांच्या मागे लक्ष्मणही महान्‌ पराक्रमात तत्पर आणि एकाग्रचित्त होऊन धनुष्य-बाण घेऊन त्या पर्वतावर आरूढ झाले. ॥९॥
तमन्वारोहत् सुग्रीवः सामात्यः सविभीषणः ।
हनुमानङ्‌गदो नीलो मैन्दो द्विविद एव च ॥ १० ॥

गजो गवाक्षो गवयः शरभो गंधमादनः ।
पनसः कुमुदश्चैव हरो रम्भश्च यूथपः ॥ ११ ॥

जाम्बवांश्च सुषेणश्च ऋषभश्च महामतिः ।
दुर्मुखश्च महातेजाः तथा शतवलिः कपिः ॥ १२ ॥

एते चान्ये च बहवो वानराः शीघ्रगामिनः ।
ते वायुवेगप्रवणाः तं गिरिं गिरिचारिणः ॥ १३ ॥
तत्पश्चात्‌ सुग्रीव, मंत्र्यांसहित विभीषण, हनुमान्‌, अंगद, नील, मैंद, द्विविद, गज, गवाक्ष, गवय, शरभ, गंधमादन, पनस, कुमुद, हर, यूथपति रंभ, जांबवान्‌, सुषेण, महामति ऋषभ, महातेजस्वी दुर्मुख तसेच कपिवर शतवलि - हे आणि दुसरेही बरेचसे शीघ्रगामी वानर जे वायुच्या समान वेगाने चालणारे तसेच पर्वतावरच विचरण करणारे होते, त्या सुवेल पर्वतावर चढून गेले. ॥१०-१३॥
अध्यारोहन्त शतशः सुवेलं यत्र राघवः ।
ते त्वदीर्घेण कालेन गिरिमारुह्य सर्वतः ॥ १४ ॥
सुवेल पर्वतावर जेथे राघव विराजमान होते, तेथे ते शेकडो वानर थोड्‍याच वेळात चढून गेले आणि चढून सर्वत्र विचरण करू लागले. ॥१४॥
ददृशुः शिखरे तस्य विषक्तामिव खे पुरीम् ।
तां शुभां प्रवरद्वारां प्राकारवरशोभिताम् ॥ १५ ॥

लङ्‌कां राक्षससंपूर्णां ददृशुर्हरियूथपाः ।
त्या वानर-यूथपतिंनी सुवेल पर्वताच्या शिखरावर उभे राहून त्या सुंदर लंकापुरीचे निरिक्षण केले, जी जणु आकाशात बनविलेलीच वाटत होती. तीची द्वारे मनोहर होती. उत्तम तटबंदी त्या नगरीची शोभा वाढवत होती, तसेच ती पुरी राक्षसांनी पूर्ण भरलेली होती. ॥१५ १/२॥
प्राकारचयसंस्थैश्च तथा नीलैश्च राक्षसैः ॥ १६ ॥

ददृशुस्ते हरिश्रेष्ठाः प्राकारमपरं कृतम् ॥ १७ ॥
उत्तम तटबंदीवर (कोटावर) उभे असलेले नीलवर्णाचे राक्षस असे वाटत होते की जणु कोटावर (तटबंदीवर) दुसरा कोट (तटबंदीच) बनविला गेला आहे की काय. त्या श्रेष्ठ वानरांनी हे सर्व काही पाहिले. ॥१६-१७॥
ते दृष्ट्‍वा वानराः सर्वे राक्षसान् युद्धकांक्षिणः ।
मुमुचुर्विविधान् नादान् तस्य रामस्य पश्यतः ॥ १८ ॥
युद्धाची इच्छा बाळगणार्‍या राक्षसांना पाहून ते सर्व वानर श्रीराम पहात असतांनाच नाना प्रकारांनी सिंहनाद करू लागले. ॥१८॥
ततोऽस्तमगमत् सूर्यः संध्यया प्रतिरञ्जितः ।
पूर्णचन्द्रप्रदीप्ता च क्षपा समतिवर्तत ॥ १९ ॥
तदनंतर संध्येच्या लालीने रंगलेले सूर्यदेव अस्ताचलास गेले आणि पूर्ण चंद्रम्याने प्रकाशित उजळलेली रात्र तेथे सर्व बाजूस पसरली. ॥१९॥
ततः स रामो हरिवाहिनीपतिः
विभिषणेन प्रतिनन्द्य सत्कृतः ।
सलक्ष्मणो यूथपयूथसंवृतः
सुवेलपृष्ठे न्यवसद् यथासुखम् ॥ २० ॥
तत्पश्चात्‌ विभीषण द्वारा सादर सन्मानित होऊन वानरसेनेचे स्वामी श्रीराम यांनी आपला भाऊ लक्ष्मण आणि यूथपतिंच्या समुदायासह सुवेल पर्वताच्या पृष्ठभागावर सुखपूर्वक निवास केला. ॥२०॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे अष्टात्रिंशः सर्गः ॥ ३८ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धाकांडाचा अडतीसावा सर्ग पूरा झाला. ॥३८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP