॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

अरण्यकाण्ड

॥ अध्याय सहावा ॥
कश्यपवंशवर्णन व अमृतहरणासाठी गरुडाचे प्रयाण

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

अथ पंचवटीं गच्छन्नंतरा रघुनंदनः ।
आससाद महाकायं गृघ्नं भीमपराक्रमम् ॥ १ ॥
तं दृष्टावा तौ महाभागौ वनस्थौ रामलक्ष्मणौ ।
मेनाते राक्षसं गृघ्नं ब्रुवाणौ को भवनिति ॥ २ ॥
ततो मधुरया वाचा सौम्यया प्रीणयन्निव ।
उवाच वत्स मां विद्धि वयस्यं पितुरात्मनः ॥ ३ ॥

पंचवटीत संगमावर आश्रमयोजना :

पंचवटीं परम प्रयाण । श्रीराम सीता सह्लक्ष्मण ।
अगस्तीसी करोनि नमन । शीघ्र गमन तिहीं केलें ॥ १ ॥
रम्य रमणीय गंगातटीं । पंचक्रोश पंचवटीं ।
उल्हास तिघांच्याही पोटीं । उठाउठीं निघालीं ॥ २ ॥
अरुणावारुणासंगमप्राप्ती । मीनली प्राची सरस्वती ।
तीर्थ पावन त्रिजगतीं । आवडे वस्ती श्रीरमा ॥ ३ ॥
सुंदर आणि कपाळेश्वर । दोहीं तीरीं मनोहर ।
तीर्थें पावन परिकर । श्रीरामचंद्ररहिवास ॥ ४ ॥
पद्मपुरीं निशाचर । वसताती अति दुर्धर ।
तेणें भये ओस नगर । तीर्थपरिचार खुंटला ॥ ५ ॥
त्रिशिरा आणि खर दुषण । ओस करोनियां जनस्थान ।
राक्षस वसताती दुर्जन । तीर्था कोणी जाऊं न शके ॥ ६ ॥
तेथें करावया वस्ती । पंचवटिके सीतापती ।
स्वयें धाडिला अगस्तीं । राक्षसघातकी श्रीराम ॥ ७ ॥
राक्षसांचे कुळनिर्दळण । समूळ करील रघुनंदन ।
यालागीं पंचवटीस्थान । दिधलें नेंमून अगस्तीनें ॥ ८ ॥

जटायूचे दर्शन व वृत्तांत समजला :

पंचवटीनंतर । श्रीराम चालिला सत्वर ।
पुढें जटायु गृध्र पर्वताकार । देखिला समोर श्रीरामें ॥ ९ ॥
डोळे आरक्त धगधगित । चांदुवडे समसमित ।
हा तंव राक्षस असे अदभुत । दोहीं निश्चित मानिला ॥ १० ॥
धनुष्य सज्जोनि मुष्टीं । दोगे चालिले जगजेठी ।
रामें हाकिला शौर्यदृष्टी । बाण मुष्टीं ओढी सज्जोनी ॥ ११ ॥
राहें साहें धरी धीर । गृध्ररुपिया तूं निशाचर ।
मार्ग रोधिसी अति दुर्धर । बाणीं सत्वर छेदीन ॥ १२ ॥
माझें सुटलिया कुर्‍हाडें । तुझें पक्षबळ बापुडें ।
केउता पळसील मजपुढें । रणीं रोकडें पाडीन ॥ १३ ॥
गृध्ररुपी तूं येथे कोण । मार्ग रोधावया काय कारण ।
समूळ सांगावें निजकथ्न । प्राण घेईन बोलतां ॥ १४ ॥
मी दाशरथी श्रीरघुनंदन । सीता कांता बंधु लक्ष्मण ।
पंचवटिके करितों गमन । मार्गरोधन कां केलें ॥ १५ ॥
ऐकोनि श्रीरामाचें वचन । जटायु घाली लोटांगण ।
दाशरथी रघुनंदन । तुझें महिमान मी जाणें ॥ १६ ॥
तुझें घ्यावया दर्शन । पंचवटिके वनसेवन ।
करुं येईल रघुनंदन । बहुकाळ जाण मी तिष्ठत ॥ १७ ॥
तुझा पिता जाण दशरथ । युद्धसखा माझा आप्त ।
स्वर्गा गेला इंद्रसाह्यार्थ । नमुचिघात जें केला ॥ १८ ॥
मी आकाशीं झडपोनि जाण । दैत्यांचें उडविलें शिरस्त्राण ।
दशरथें विंधोनियां बाण । दैत्य दारुण निर्दळिले ॥ १९ ॥
त्याचा तूं तंव ज्येष्ठ सुत । पूर्णब्रह्म श्रीरघुनाथ ।
तुझी सेवा करावया येथ । आलों निश्चित श्रीरामा ॥ २० ॥

कश्यपवंशोत्पत्ती :

तूं स्वामी मी तुझा दास । दृढ मानावा विश्वास ।
मज न म्हणावें राक्षस । माझा वंश कश्यपी ॥ २१ ॥
काश्यपवंशीं माझी उत्पत्ति । त्या कश्यपाची वंशस्थिती ।
मी सांगेन श्रीरघुपति । विश्वासार्थी माझिया ॥ २२ ॥
तूं मज म्हणसी राक्षस । मी राक्षस नव्हे गा कश्यपवंश ।
माझी वंशावळी बहुवस । सावकाश अवधारी ॥ २३ ॥
मनूपासाव उत्पत्ति जाण । क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मण ।
वरकड सृष्टि कश्यपी जाण । तेंही लक्षण ऐकें तूं ॥ २४ ॥
अदितीपासाव झाले देव । दितीचे दैत्य दनूचे दानव ।
मनूपासूनि झाले मानव । मानवी वैभव मनूचें ॥ २५ ॥
स्वसेपासाव रुद्रोत्पत्ती । जे कां रुद्रगण रुद्रानुवर्ती ।
भद्रेपासव गंधर्व जन्मती । जे गायन गाती अति मधुर ॥ २६ ॥
उभयसंध्यामैथुनस्थितीं । येथ राक्षसां जन्मप्राप्ती ।
यालागीं संध्येपासव उत्पत्ती । ज्ञाते बोलती राक्षसांची ॥ २७ ॥
जे वेदशास्त्रीं अति व्युत्पत्ती । वादीं ब्राह्मण निर्भर्त्सिती ।
ते ब्राह्मणद्वेषी ब्रह्मराक्ष होती । जाण निश्चितीं श्रीरामा ॥ २८ ॥
रावणा ब्रह्मराक्षसपण । व्हावया हेंचि कारण ।
तेणें शतसहस्र वेद विभागून । ऋषि सज्जन निभर्त्सिले॥ २९ ॥
ज्ञानगर्वाची अति गती । ब्रह्मद्वेषाच्या अति युक्ती ।
ब्रह्मराक्षसत्वाची प्राप्ती । जाण निश्चितीं श्रीरामा ॥ ३० ॥
क्रोधवशेपासाव देख । सिंधब्याघ्रवराहादिक ।
मृग ससे वृक जंबुक । गौरादि अनेक श्वापदें जालीं ॥ ३१ ॥
वारणीपासाव उत्पत्ती । जन्म पावला ऐरावती ।
गजदिग्गजांची प्रसूती । जाण निश्चितीं तिचेनि ॥ ३२ ॥
शरमेचें ज्येष्ठ सुत । श्याम शबल यमाचे दूत ।
श्वानमार्जारादि समस्त । तिचेनि होत श्रीरामा ॥ ३३ ॥
वृतेपासाव बहुवस । विद्याधर किन्नर किंपुरुष ।
तरस्वी दुर्धर असोस । बळें गहिस गरिष्ठ ॥ ३४ ॥
जागळेपासाव जाण । वनें उपवनें कंतकी विपिन ।
विरुंध वल्ली औषधी तृण । दुर्धर वन ते व्याली ॥ ३५ ॥
उत्पत्ति सुरभीपासोन । तेथें जन्मली कामधेन ।
गाई बैल आदिकरोन । उत्पत्तिस्थान पशूंचें ॥ ३६ ॥
वडवेपासाव अश्वसंभूती । उच्चैःश्रवा स्वर्गसंपत्ती ।
श्यामकर्णादि नाना जाती । अश्वोपत्ति तिचेनि ॥ ३७ ॥
तिचे ठायीं दुर्धर । भारवाहक खरोष्ट्र ।
जन्म पावले अपार । वेसर खराश्वयोगें ॥ ३८ ॥
गृध्री श्येन धृतराष्ट्री । शुकी कौंची ऐशा पंच नारी ।
पक्षी जन्मले यांच्या उदरीं । मत्स्यादि मगरी जळचरें ॥ ३९ ॥
गृध्रीपासाव गीध घार । उलूक वाघुळा अपार ।
गंडभैरवादि दुर्धर । अति क्रूर प्रसवली ॥ ४० ॥
श्येनीपासाव जन्मले देख । श्येन तित्तिर लावक ।
कपोता कोकिळ कुक्कुट काक । सरड बेडूक जन्मले ॥ ४१ ॥
जन्मला कौंचीच्या उदरीं । ढोंक टिटवी कांकणघारी ।
भोरड्या जन्मलिया घुमरी । अहोरात्री किळकिळती ॥ ४२ ॥
शक्रीपासाव शुक सारिका । चाप भारद्वाज मयूर देखा ।
चिड्या काळचिड्या अनेका । पिंगळा बोलला भविष्योत्तरीं ॥ ४३ ॥
धृतराष्टीचे पुत्र चोख । हंस बक कारंडक ।
चकोर आणि चक्रवाक । मत्स्यादि अनेक जळचरें व्याली ॥ ४४ ॥
कद्रू पासाव अनेक । काळ कर्कोट्क भुजंग ।
शेष वासुकि नाना नाग । पाताळपन्नग ते व्याली ॥ ४५ ॥
कश्यपापासाव नर किन्नर । कश्यपापासाव चराचर ।
सृष्टि समग्र कश्यपी ॥ ४६ ॥
अंडज स्वेद् जरायुज । जे कां जन्मले उद्भिज्ज ।
ते हे कश्यपाचें निजबीज । दुर्धर तेज कश्यपीं ॥ ४७ ॥
जळचर भूचर खेचर । जें जें भासे चराचर ।
तें ते कश्यपी चरित्र । परम पवित्र श्रीरामा ॥ ४८ ॥
ज्यांचें नाठवे कुळगोत्र । त्यां कश्यपांत लावित ।
ते तत्काळ होती पुनित । जगीं विख्यात कश्यप ॥ ४९ ॥
जो कश्यपीं लागला । तो मुक्तीच्या घरासी आला ।
भुक्तिमुक्तींचा दादुला । वाखाणिला कश्यप ॥ ५० ॥
सृष्टीचा कर्ता सृष्टीचा हर्ता । येव्हढी कश्यपाची सत्ता ।
यालागीं भुक्तिमुक्तींचा दाता । जाण तत्वतां कश्यप ॥ ५१ ॥
कश्यपी सृष्टी वर्णीं । ऐसा वक्ता नाहीं कोणी ।
मी बोलिलों संकळोनी । क्षमा सज्जनीं करावी ॥ ५२ ॥

जटायू हा कश्यपाचा नातू :

त्या कश्यपाचा मी नातू । जतायुनामे विख्यातू ।
ऐक माझा वृत्तांतू । समूळ साद्यंतू सांगेन ॥ ५३ ॥
कश्यपासी बहुत पत्‍नी । मुख्य अदिती दिती दनी ।
चौथी माझ्या पित्याची जननी । विनतानम्नी पतिव्रता ॥ ५४ ॥

कश्यपाची भार्या विनता, तिचे मुलगे अरुण व गरुड व अरुणाचे दोन पुत्र जटायू व संपाती :

विनतेचे दोघे कुमर । अरुण आणि गरुड सुपुत्र ।
भगवद्भजनीं अति पवित्र । त्यांचे चरित्र अवधारीं ॥ ५५ ॥
अरुण रविरथीं सावधान । गरुड श्रीविष्णूचें वाहन ।
गरुडाची ख्याति अति गहन । अमृत हिरोन आणितां ॥ ५६ ॥
गरुडें जाणोनि आपण । कां केले अमृतहरण ।
ऐसें पुसतां श्रीरघुनंदन । समूळ कथन जटायु वदे ॥ ५७ ॥

अमृतहरणाची पूर्वकथा, विनता व कद्रूमध्ये पैज :

विनता कद्रु दोगी सवती । सवतीमत्सराच्या छळणोक्तीं ।
कद्रु पुसे विनतेप्रती । सूर्याचे रथीं वारु कैसे ॥ ५८ ॥
विनता म्हणे वारु धवळ । कद्रु म्हणे वारु सुनीळ ।
बोलतां वाढलें सळ । पैजेचा प्रबळ पण केला ॥ ५९ ॥
कद्रु म्ह्णे श्वेत पारु जरी । तरी घडा घेवोनिया शिरीं ।
दिव्य सहस्त्र वर्षेंवरी । पाणी तुझ्या घरीं वाहीन ॥ ६० ॥
विनता बोले तये काळीं । जैं वारुवांची प्रभा निळी ।
तैं मी घेवोनि घागरी चुंबळी । दिव्याब्दमेळीं जळदासी तुझी ॥ ६१ ॥
दोघींचें परम प्रमाण । भाषाबंधें केला पण ।
कद्रुनें करावया छळण । कपट संपूर्ण मांडिलें ॥ ६२ ॥

कद्रूसाठी सूर्याच्या घोड्यांचा रंग विषप्रयोगाने निराळा करणे :

अरुणें सांगितलें विनतेसी । श्वेत वारु सूर्यरथासी ।
त्याचा अति विश्वास तिसी । विकल्प मानसीं असेना ॥ ६३ ॥
कद्रु सर्पांतें पुसे । सूर्यरथी वारु कैसे ।
ते सांगती शुभ्र वेषें । मग कद्रु मानसें अति दुःखी ॥ ६४ ॥
पुत्रांसी सांगे पणाची थोरी । दिव्य सहस्र वर्षेंवरी ।
मी दासी जालें विनतेघरीं । जळपरिचारी जळदासी ॥ ६५ ॥
नकळतां निजनिर्धारु । त्वां कां नेमिलें निळे वारु ।
करितां सवतीमत्सरु । मत्सरें दुस्तरु भोग आला ॥ ६६ ॥
विनता सती पतिव्रता । तू कां मत्सरु करिसी वृथा ।
मत्सरें दासीत्व बैसलें माथां । त्यासी काय आतां चालेल ॥ ६७ ॥
न करा मातेचा कैवार । पुत्र जन्मलेति तुम्ही पाथर ।
अवघे झोंबोनि विखार । निळे सत्वर करा वारु ॥ ६८ ॥
सर्प म्हणती करितां कपट । होईल अवघियांचें तळपट ।
वंश होईल सपाट । करितां कपट भलें नव्हे ॥ ६९ ॥
ऐकोनि पुत्रांचे वचन । कद्रु झाली कोपायमान ।
मग शाप दिधला दारुण । अग्निदहनें भस्म व्हाल पैं ॥ ७० ॥
तंव सर्प झोंबोनि सकळ । विषें वारु केले सुनीळ ।
मग मातेसी सांगती उतावेळ । दावीं तूं तत्काळ विनतेसी ॥ ७१ ॥
विलंब करितां या कार्यासी । सूर्य शोषील या विषासी ।
मग दाविल्या विनतेसी । जयो आहांसी पैं न ये ॥ ७२ ॥
कापट्याच्या कृतकार्यासी । तत्काळ साधावें वेगेंसीं ।
विलंब करितां कपटासी । जयो आम्हांसी पैं नाहीं ॥ ७३ ॥

कपटाचा उपयोग केल्यामुळे विनता पण हरते :

पुत्रवचनें उतावेळ । कद्रु विनता आणी तत्काळ ।
सूर्यरथींचे वारु सुनीळ । देख समूळ नीळवर्ण ॥ ७४ ॥
कद्रु म्हणे विनतेसी । म्यां जिंतलें निजपैजेसी ।
तू जालीस माझी दासी । अति उल्लासीं आली घरा ॥ ७५ ॥
आल्हाद देखोनि मातेसी । सर्प मागती उःशापासी ।
कद्रु हरिखली मानसीं । उःशापासी स्वयें वदे ॥ ७६ ॥
कन्या जरत्कारीचे उदरीं । जरत्कारवीर्येकरीं ।
आस्तीक जन्मेल ब्रह्मचारी । तो शापजोहरीं रक्षील ॥ ७७ ॥

कद्रूचा शाप व उःशाप :

दुर्धरशापाग्नीआंत । सर्प जळतां समस्त ।
आस्तीक पावोनियां तेथ । देह दहनांत रक्षील ॥ ७८ ॥
मातृपक्षाचें कुळ सकळ । शापाग्नींत जळतां मातुळ ।
आस्तीक रक्षील तत्काळ । तपोबळप्रतापें ॥ ७९ ॥
उःशापें तुष्टली माता । तेणें आल्हाद सर्पां समस्तां ।
कद्रूसी परम चिंता । सुख सर्वथा असेना ॥ ८० ॥

कद्रू सचिंत :

कपटे जिंतिली विनता । कपट करील पुत्रघाता ।
ते कद्रूसी दुस्तर चिंता । सुख सर्वथा असेना ॥ ८१ ॥
जरी कपटें जय पावला कपटी । तरी धाकें धुकधुकी पोटीं ।
कपटघातकी शेवटीं । कपटें कपटी अति दुःखी ॥ ८२ ॥
निजकपटाची अति चिंता । बैसली कद्रूचिया माथां ।
पुढें विनतेची कथा । बंधमोचनता अवधारा ॥ ८३ ॥
विनता पुसे अरुणाप्रती । श्वेत वारु सूर्याचे रथीं ।
त्वां कां सांगितलें मज निश्चितीं । नीळप्रतीति मज आली ॥ ८४ ॥
नीळिमा चढला आश्वांसी । तेणे मी जालें कद्रूची दासी ।
घडा घेवोनियां शिसीं । अहर्निशीं जळ वाहीं ॥ ८५ ॥
तंव अरुण म्हणे सर्पी देख । चढवोनियां निजविष ।
निळे वारु केलें निःशंक । परी कपटें दुःख पावती ॥ ८६ ॥

सूर्यकोपामुळे सर्पाचे पक्ष व पादच्छेदन :

सुनीळ देखोनि वारुसी । कोप आला सूर्यासी ।
मग उपटोनि सर्पांच्या पंखासी । आणि पायांसी निवटिलें ॥ ८७ ॥
पूर्वीं पक्ष होते सर्पांसी । गोमीच्या ऐसे पाय त्यांसी ।
सूर्य कोपोनि मानसीं । पक्षपायांसी छेदिलें ॥ ८८ ॥

उगर व श्यामकर्ण :

पाय निवटिल्या मग । उरें चलों लागले नाग ।
यालागीं त्यासी उरग । हा दुःखभोग कपटाचा ॥ ८९ ॥
सूर्ये शापिलें सर्पांसी । उदरीं धरिलें कपटासी ।
तोचि उदरशूळ तुम्हांसी । अहर्निशीं भोगाल ॥ ९० ॥
मुकले पक्षां आणि पायांसी । उदरीं शूळ अहर्निशीं ।
कपटाची दशा ऐसी । कपटापासीं अति दुःख ॥ ९१ ॥
इतुकें जालें उठाउठीं । तरी कपट न सोडी पाठी ।
आगीं घालील शेवटीं । कपतें कपटी अति दुःखी ॥ ९२ ॥
सूर्य अश्वविष आकशून । कर्णीं राखिलें निर्विष करुन ।
तेणें जाले शोभायमान । श्यामकर्ण जगद्वंद्य ॥ ९३ ॥
तैंपासोनियां जाण । वारु जाले श्यामकर्ण ।
जगीं यागीं अति पावन । शोभायमान तिहीं लोकीं ॥ ९४ ॥
अरुण सांगें मातेप्रती । मजअधीन सूर्याची गती ।
मी जेवोनियां बैसेन रथीं । बंधनिर्मुक्ती गरुडाधीन ॥ ९५ ॥
आकळावया त्रिजगती । गरुडापासीं सामर्थ्यशक्ती ।
त्यांचे अंगी सहिष्णुता शांती । बंधनिर्मुक्ती तो करील ॥ ९६ ॥
सूर्याची आज्ञा मज तत्वतां । उदयीं वंदावीं मातापिता ।
म्हणोनि आलो मी वंदनार्था । जाईन मागुती रथगती ॥ ९७ ॥
बंधमोचन गरुडाहातीं । बुद्धि सांगोन मातेप्रती ।
अरुण बैसला सूर्यरथीं । मातृभक्ति गरुडा गाढी ॥ ९८ ॥
विनता सांगें गरुडापासीं । कपटें जिंतोनि पैजेसीं ।
कद्रुनें मज केलें दासी । सहस्त्र वर्षी जळ वाहीं जळ वाहीं ॥ ९९ ॥
अरुणें सांगितलें मजप्रती । बंधमोचन गरुडाहातीं ।
तरी करिसील कैसी युक्ती । ते यथार्थ गती मज सांगें ॥ १०० ॥
तेव्हां गरुड क्षोभला उद्भट । तुज जिंतिलें करोनि कपट ।
कपटें कपटियाचें तळपट । करीन सपाट सर्पाचें ॥ १ ॥
मातेसी द्यावया समाान । कोप केला उपशमन ।
वंदोनि मातेचे चरण । काय वचन बोलत ॥ २ ॥

सुटका करण्यासाठी कद्रूकडून अमृताची मागणी :

तुझ्या बंधमोचनासी । पालत पुसें तूं कद्रूसी ।
जरी मागेल उत्तम पदार्थासी । तरी मी आणून तिसी देईन ॥ ३ ॥
मातृबंधमोचनार्थ । अति दुर्लभ मागेल अर्थ ।
तो तो देईन पदार्थ । मोचनार्थ पुसें वेगीं ॥ ४ ॥
मग विनता सांगे स्वयें कद्रूसी । गरुडें पाठविलें तुजपासीं ।
पालट बंधमोचनासी । जें मागसी तें देईन ॥ ५ ॥
निजमातेच्या बंधमोचनीं । कल्पतरु चिंतामणी ।
देईन कामधेनु आणोनी । आवडे मनीं तें मागें ॥ ६ ॥
मग कद्रु विचारी चित्तीं । परम सामर्थ्य गरुडापतिही ।
अति उद्भट याची शक्ती । अमृतप्राप्ती त्या मागूं ॥ ७ ॥
माझेनि माझ्या पुत्रां शापबंधन । तिहीं केलिया अमृतपान ।
मग न बाधी जरा जन्ममरण । निर्धारोन तेंचिं मागूं ॥ ८ ॥
कद्रु सांगे विनतेपासीं । निश्चयें पुसावें गरुडासी ।
परमामृत देवविसी । तैं तूं होसी बंधमुक्त ॥ ९ ॥
माझे पुत्र पाताळवासी । अखंड राखण अमृतासी ।
तरी प्राप्ति नाहीं त्यांसी । तें तू देसी तैं मुक्त ॥ १० ॥

पाच प्रकारचे अमृत :

स्वादामृत उन्मादामृत । सुप्तामृत तृप्तामृत ।
यें अमृतें प्रलोभार्थ । परमामृत पांचवें ॥ ११ ॥
स्वादामृत अप्सरांसी । तेणें त्या स्वादिष्ठ सर्वांसी ।
तृत्प्यमृत तें देवांसी । क्षुधा त्यांसी बाधेना ॥ १२ ॥
उन्मादामृत दैत्यांसी । तेणें ते उन्मत्त अहर्निशीं ।
सुष्त्प्यामृत तें दिग्गजांसी । तेणें सुखेंसी डुल्लत ॥ १३ ॥
डुकल्या येती निद्रिस्थांसी । तेंवी डुल्लणें दिग्गजांसी ।
ये तंव अमृतें वायसी । देवें सर्वांसी चाळविलें ॥ १४ ॥
समुद्र मंथिला समस्तीं । जाली अमृताची प्राप्ती ।
कललो करितां देवीं दैत्यीं । मोहिनीहातीं दीधलें ॥ १५ ॥
मोहिनीरुपे श्रीविष्णू जाण । तेणे अमृत विभागून ।
इतरां अमृत वाढोन । राखिलें आपण परमामृत ॥ १६ ॥
जेणे चुके जरा मरण । तें परमामृत विष्णुअधीन ।
तें जैं देसील आणून । बंधमोचन तैं तुज ॥ १७ ॥
ऐकोनि कद्रुची कथा । गरुडापासीं आलीं विनता ।
आणोनि द्यावें परमामृत । बंधमोचनता तैं मज ॥१८॥

अमृतहरणासाठी गरुडाचे प्रयाण, कश्यपांचा शुभाशीर्वाद :

परिसोनि मातेचें वचन । तिचें करावया बंधमोचन ।
वंदोनि मातेचें चरण । अमृतार्थी आपण उडों पाहे ॥ १९ ॥
तंव कृपा उपजली मातेसीं । मग हातीं धरिलें गरुडासी ।
आणिलासें कश्यपापासीं । वृत्तांत त्यासी सांगितला ॥ १२० ॥
मातृभक्ति गरुडासी । देखोनि सुख कश्यपासी ।
कृपें अभिषेकून त्यासी । धरी पोटीं स्वानंदें ॥ २१ ॥
हरिखें वर देत त्यासी । प्रतपें पावसी परमामृतासी ।
युद्धीं विष्णुभक्त होसी । मुक्त करिसी निजमाता ॥ २२ ॥
परमामृत विष्णूआधीन । त्याचें करावें नामस्मरण ।
नामापासीं विजय पूर्ण । निश्चयें जाण हरिभक्तां ॥ २३ ॥
अच्युतनामाच्या आवृत्ती । तयां प्रळयीं नव्हें च्युती ।
अच्युतपदाची निजप्राप्ती । युद्धसामर्थ्यी पावसी ॥ २४ ॥
ऐसी कश्यपे परम कृपा करुनी । अच्युतनाम उपदेशूनी ।
गरुड धाडिला अमृतहरणीं । नामस्मरणीं निजविजयो ॥ २५ ॥
मातापित्यासीं करोनि नमन । तीर्थ घेतलें प्रार्थून ।
हरिनामीं नित्य सावधान । क्रमावया गगन आल्हाद ॥ २६ ॥
नकुळा दासी विनतेघरीं । नकुळ जन्मला तिचे उदरीं ।
तो गरुडासी साहाकारी । होऊनि सर्पारि चालिला ॥ २७ ॥
आरंभूनि त्या दिवसासी । वर सर्पामुंगसांसीं ।
भेटी होतां येरयेरासी । निजप्राणांसी सर्प सांडी ॥ २८ ॥
मुखीं नामाची आवृत्ती । गरुड निघाला अमृतार्थीं ।
कश्यपउपदेशाची युक्ती । विष्णुप्राप्ती संग्रामीं ॥ २९ ॥
एकाजनार्दना शरण । करितां श्रीरामनामस्मरण ।
भगवत्प्राप्ति अलोट ज्ञान । हें महिमान नामाचें ॥ १३० ॥
नामापासीं भक्तिमुक्ति । नामापासीं यश कीर्ति ।
नामापासीं विजयप्राप्ति । कर्मनिर्मुक्ति हरिनामें ॥ ३१ ॥
नामापासीं नित्य निवृत्ती । नामापासीं नित्य शांती ।
नाम वंदिजे सर्वांग मतीं । ब्रह्मप्राप्ति हरिनामें ॥ ३२ ॥
एकाजनार्दना शरण । नामें पातकी परम पावन ।
नामें प्रपंच ब्रह्मपूर्ण । नाम तें जाण परब्रह्म ॥ ३३ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणें अरण्यकांडे एकाकारटीकायां
कश्यपवंशवर्णनगरुडपरमामृताभिगमनं नामा षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
॥ ओंव्या १३३ ॥ श्लोक ३ ॥ एवं १३६ ॥



GO TOP