मार्गे सुमन्त्रेण दुर्वाससो मुखाद् आकर्णितां भृगुशापकथां किञ्चिद् भाववृत्तं च वर्णयित्वा दुःखन्विताय लक्ष्मणाय सान्त्वनादानम् -
|
मार्गामध्ये सुमंत्रांनी दुर्वासाच्या मुखाने ऐकलेली भृगुऋषिंच्या शापाची कथा सांगून तसेच भविष्यात होणार्या काही गोष्टी सांगून दुःखी लक्ष्मणाला शांत करणे -
|
तथा सञ्चोदितः सूतो लक्ष्मणेन महात्मना । तद्वाक्यं ऋषिणा प्रोक्तं व्याहर्तुमुपचक्रमे ॥ १ ॥
|
तेव्हा महात्मा लक्ष्मणांच्या प्रेरणेने सुमंत्रानी दुर्वासांनी सांगितलेली गोष्ट त्यांना ऐकविण्यास सुरूवात केली - ॥१॥
|
पुरा नाम्ना हि दुर्वासा अत्रेः पुत्रो महामुनिः । वसिष्ठस्याश्रमे पुण्ये वार्षिक्यं समुवास ह ॥ २ ॥
|
लक्ष्मणा ! पूर्वीची गोष्ट आहे, अत्रिंचे पुत्र महामुनि दुर्वासा वसिष्ठांच्या पवित्र आश्रमावर राहून वर्षाकालाचे चार महिने घालवत होते. ॥२॥
|
तमाश्रमं महातेजाः पिता ते सुमहायशाः । पुरोहितं महात्मानं दिदृक्षुरगमत् स्वयम् ॥ ३ ॥
|
एक दिवस आपले महातेजस्वी आणि महान् यशस्वी पिता त्या आश्रमात आपले पुरोहित महात्मा वसिष्ठांचे दर्शन घेण्यासाठी स्वतःच गेले. ॥३॥
|
स दृष्ट्वा सूर्यसंकाशं ज्वलन्तमिव तेजसा । उपविष्टं वसिष्ठस्य सव्यपार्श्वे महामुनिम् ॥ ४ ॥
|
तेथे त्यांनी वसिष्ठांच्या वामभागी बसलेल्या एका महामुनिंना पाहिले, जे आपल्या तेजाने जणु सूर्यासमान देदीप्यमान दिसत होते. ॥४॥
|
तौ मुनी तापसश्रेष्ठौ विनीतो ह्यभिवादयत् । स ताभ्यां पूजितो राजा स्वागतेनासनेन च ॥ ५ ॥
पाद्येन फलमूलैश्च उवास मुनिभिः सह ।
|
तेव्हा राजांनी त्या दोन्ही तापस शिरोमणी महर्षिंना विनयपूर्वक अभिवादन केले. त्या दोघांनीही स्वागतपूर्वक आसन देऊन पाद्य एवं फल-मूल समर्पित करून राजांचा सत्कार केला. नंतर ते तेथे मुनिंच्या जवळ बसले. ॥५ १/२॥
|
तेषां तत्रोपविष्टानां तास्ताः सुमधुराः कथाः ॥ ६ ॥
बभूवुः परमर्षीणां मध्यादित्यगतेऽहनि ।
|
तेथे बसलेल्या महर्षिंमध्ये दुपारच्या वेळी विविध प्रकारच्या अत्यंत मधुर कथा झाल्या. ॥६ १/२॥
|
ततः कथायां कस्याञ्चित् प्राञ्जलिः प्रग्रहो नृपः ॥ ७ ॥
उवाच तं महात्मानं अत्रेः पुत्रं तपोधनम् ।
|
त्यानंतर कुठल्यातरी कथेच्या प्रसंगी महाराजांनी हात जोडून अत्रिंचे तपोधन पुत्र महात्मा दुर्वास यांना विनयपूर्वक विचारले- ॥७ १/२॥
|
भगवन् किं प्रमाणेन मम वंशो भविष्यति ॥ ८ ॥
किमायुश्च हि मे रामः पुत्राश्चान्ये किमायुषः । रामस्य च सुता ये स्युः तेषामायुः कियद्भवेत् ॥ ९ ॥
काम्यया भगवन् ब्रूहि वंशस्यास्य गतिं मम ।
|
भगवन् ! माझा वंश किती काळपर्यंत चालेल ? माझ्या रामाचे आयुष्य किती असेल तसेच अन्य सर्व पुत्रांचेही आयुष्य किती असेल ? भगवन् ! आपण इच्छेनुसार माझ्या वंशाची स्थिति सांगावी. ॥८-९ १/२॥
|
तच्छ्रुत्वा व्याहृतं वाक्यं राज्ञो दशरथस्य च ॥ १० ॥
दुर्वासाः सुमहातेजा व्याहर्तुमुपचक्रमे ।
|
राजा दशरथांचे हे वचन ऐकून महातेजस्वी दुर्वासामुनि सांगू लागले - ॥१० १/२॥
|
शृणु राजन् पुरावृत्तं तदा देवासुरे युधि ॥ ११ ॥
दैत्याः सुरैर्भर्त्स्यमाना भृगुपत्नीं समाश्रिताः । तया दत्ताभयास्तत्र न्यवसन्नभयास्तदा ॥ १२ ॥
|
राजन् ! ऐका. प्राचीन कालची गोष्ट आहे. एक वेळ देवासुर संग्रामात देवतांकडून पीडित झालेल्या दैत्यांनी महर्षि भृगुंच्या पत्नीचा आश्रय घेतला. (तिला शरण गेले.) भृगुपत्नीने त्या समयी दैत्यांना अभय दिले आणि ते त्यांच्या आश्रमावर निर्भय होऊन राहू लागले. ॥११-१२॥
|
तया परिगृहीतांस्तान् दृष्ट्वा क्रुद्धः सुरेश्वरः । चक्रेण शितधारेण भृगुपत्न्याः शिरोऽहरत् ॥ १३ ॥
|
भृगुपत्नीने दैत्यांना आश्रय दिला आहे, हे पाहून कुपित झालेल्या देवेश्वर भगवान् विष्णुनी तीक्ष्णधार असणार्या चक्राने तिचे मस्तक कापून टाकले. ॥१३॥
|
ततस्तां निहतां दृष्ट्वा पत्नीं भृगुकुलोद्वहः । शशाप सहसा क्रुद्धो विष्णुं रिपुकुलार्दनम् ॥ १४ ॥
|
आपल्या पत्नीचा वध झालेला पाहून भार्गववंशाचे प्रवर्तक भृगुंनी एकाएकी कुपित होऊन शत्रुकुलनाशन भगवान् विष्णुंना शाप दिला. ॥१४॥
|
यस्मादवध्यां मे पत्नीं अवधीः क्रोधमूर्च्छितः । तस्मात्त्वं मानुषे लोके जनिष्यसि जनार्दन ॥ १५ ॥
तत्र पत्नीवियोगं त्वं प्राप्स्यसे बहुवार्षिकम् ।
|
जनार्दन ! माझी पत्नी वधास योग्य नव्हती. परंतु आपण क्रोधाने मूर्च्छित होऊन तिचा वध केला आहे, म्हणून आपल्यालाही मनुष्यलोकात जन्म घ्यावा लागेल आणि तेथे फार वर्षेपर्यंत आपल्याला पत्नी वियोगाचे कष्ट सहन करावे लागतील. ॥१५ १/२॥
|
शापाभिहतचेतास्तु स्वात्मना भावितोऽभवत् ॥ १६ ॥
अर्चयामास तं देवं भृगुः शापेन पीडितः ।
|
परंतु याप्रकारे शाप दिल्या गेल्याचे पाहून त्यांच्या चित्तात फार पश्चात्ताप झाला. त्यांच्या अंतरात्म्याने भगवंतांनी त्या शापाचा स्वीकार करावा म्हणून त्यांचीच आराधना करण्यास प्रेरित केले. याप्रकारे शापाच्या विफलतेच्या भयाने पीडित झालेल्या भृगुनी तपस्येद्वारा भगवान् विष्णुंची आराधना केली. ॥१६ १/२॥
|
तपसाराधितो देवो ह्यब्रवीद् भक्तवत्सलः ॥ १७ ॥
लोकानां संम्प्रियार्थं तु तं शापं ग्राह्यमुक्तवान् ।
|
तपस्याद्वारे त्यांनी आराधना केल्यावर भक्तवत्सल भगवान् विष्णुंनी संतुष्ट होऊन म्हटले - महर्षे ! संपूर्ण जगताचे प्रिय करण्यासाठी मी तो शाप ग्रहण करीन. ॥१७ १/२॥
|
इति शप्तो महातेजा भृगुणा पूर्वजन्मनि ॥ १८ ॥
इहागतो हि पुत्रत्वं तव पार्थिवसत्तम । राम इत्यभिविख्यातः त्रिषु लोकेषु मानद ॥ १९ ॥
|
याप्रकारे पूर्वजन्मात (विष्णु- नामधारी वामन अवताराच्या समयी) महातेजस्वी भगवान् विष्णुंना भृगु ऋषिंचा शाप प्राप्त झाला होता. दुसर्यांना मान देणार्या नृपश्रेष्ठा ! तेच या भूतलावर येऊन तीन्ही लोकात राम-नावाने विख्यात आपले पुत्र झाले आहेत. ॥१८-१९॥
|
तत्फलं प्राप्स्यते चापि भृगुशापकृतं महत् । अयोध्यायाः पती रामो दीर्घकालं भविष्यति ॥ २० ॥
|
भृगुंच्या शापाने होणारे पत्नी-वियोगरूप जे महान् फल आहे ते त्यांना अवश्य प्राप्त होईल. श्रीराम दीर्घकाल पर्यंत अयोध्येचे राजे बनून राहातील. ॥२०॥
|
सुखिनश्च समृद्धाश्च भविष्यन्त्यस्य येऽनुगाः । दश वर्षसहस्राणि दश वर्षशतानि च ॥ २१ ॥
रामो राज्यमुपासित्वा ब्रह्मलोकं गमिष्यति ।
|
त्यांचे अनुयायीही फार सुखी आणि धन-धान्याने संपन्न होतील. श्रीराम अकरा हजार वर्षेपर्यंत राज्य करून अंती ब्रह्मलोकास (वैकुण्ठ अथवा साकेतधाम) जातील. ॥२१ १/२॥
|
समृद्धैश्चाश्वमेधैश्च इष्ट्वा परमदुर्जयः ॥ २२ ॥
राजवंशांश्च बहुशो बहून् संस्थापयिष्यति । द्वौ पुत्रौ तु भविष्येते सीतायां राघवस्य तु ॥ २३ ॥
|
परम दुर्जय वीर श्रीराम समृद्धशाली अश्वमेध यज्ञांचे वारंवार अनुष्ठान करून बर्याचशा राजवंशांची स्थापना करतील. श्रीराघवांनाही सीतेच्या गर्भापासून दोन पुत्र प्राप्त होतील. ॥२२-२३॥
|
स सर्वमखिलं राज्ञो वंशस्याह गतागतम् । आख्याय सुमहातेजाः तूष्णीमासीन् महामुनिः ॥ २४ ॥
|
या सर्व गोष्टी सांगून त्या महातेजस्वी महामुनिनी राजवंशाच्या विषयी भूत आणि भविष्याच्या सर्व गोष्टी सांगितल्या. यानंतर ते गप्प झाले. ॥२४॥
|
तूष्णीम्भूते तदा तस्मिन् राजा दशरथो मुनौ । अभिवाद्य महात्मानौ पुनरायात् पुरोत्तमम् ॥ २५ ॥
|
दुर्वासा मुनिंच्या गप्प होण्यानंतर महाराज दशरथही दोन्ही महात्म्यांना प्रणाम करून नंतर आपल्या उत्तम नगरात परत आले. ॥२५॥
|
एतद्वचो मया तत्र मुनिना व्याहृतं पुरा । श्रुतं हृदि च निक्षिप्तं नान्यथा तद् भविष्यति ॥ २६ ॥
|
या प्रकारे पूर्वकाळी दुर्वासा मुनिनी सांगितलेल्या या सर्व गोष्टी मी तेथे ऐकल्या होत्या आणि आपल्या हृदयात धारण केल्या होत्या. (त्या कोणाजवळ प्रकट केल्या नव्हत्या) या गोष्टी असत्य होणार नाहीत. ॥२६॥
|
सीतायाश्च ततः पुत्रौ अभिषेक्ष्यति राघवः । अन्यत्र न त्वयोद्यायां मुनेस्तु वचनं यथा ॥ २७ ॥
|
जसे दुर्वास मुनिंचे वचन आहे, त्यानुसार राघव सीतेच्या दोन्ही पुत्रांचा अयोध्येच्या बाहेर अभिषेक करतील, अयोध्येत नाही. ॥२७॥
|
एवं गते न सन्तापं कर्तुमर्हसि राघव । सीतार्थे राघवार्थे वा दृढो भव नरोत्तम ॥ २८ ॥
|
नरश्रेष्ठ ! रघुनंदना ! विधात्याचे असेच विधान असल्यामुळे आपण सीता आणि राघवांसाठी संताप करून घेऊ नये. आपण धैर्य धारण करावे. ॥२८॥
|
श्रुत्वा तु व्याहृतं वाक्यं सूतस्य परमाद्भुतम् । प्रहर्षमतुलं लेभे साधु साध्विति चाब्रवीत् ॥ २९ ॥
|
सूत सुमंत्रांच्या मुखाने ही अत्यंत अद्भुत गोष्ट ऐकून लक्ष्मणांना अनुपम हर्ष प्राप्त झाला. ते म्हणाले - फार चांगले, फार चांगले. ॥२९॥
|
ततः संवदतोरेवं सूतलक्ष्मणयोः पथि । अस्तमर्के गते वासं केशिन्यां तावथोषतुः ॥ ३० ॥
|
मार्गात सुमंत्र आणि लक्ष्मण याप्रकारच्या गोष्टी करतच होते की सूर्य अस्तचलास गेले. तेव्हा त्या दोघांनी केशिनी नदीच्या तटावर रात्र घालविली. ॥३०॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे एकपञ्चाशः सर्गः ॥ ५१ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा एकावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५१॥
|