श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ तृतीयः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
हनुमता श्रीरामलक्ष्मणयोर्वने आगमनस्य किं कारणं इति जिज्ञासाकरणं आत्मनः सुग्रीवस्य च परिचयदानं श्रीरामेण तद्वचनानां प्रशंसनं कृत्वा लक्ष्मणस्य स्वपक्षतो वार्ताकरणे नियोजनं, लक्ष्मणेन स्वीयेऽभ्यर्थने स्वीकृते हनुमतो हर्षश्च - हनुमंतानी श्रीराम आणि लक्ष्मणास वनात येण्याचे कारण विचारणे आणि आपला तसेच सुग्रीवाचा परिचय देणे, श्रीरामांनी त्यांच्या वचनांची प्रशंसा करून लक्ष्मणाला आपल्या वतीने बोलण्याची आज्ञा देणे तसेच लक्ष्मण द्वारा आपली प्रार्थना स्वीकृत झाल्याने हनुमंताचे प्रसन्न होणे -
वचो विज्ञाय हनुमान् सुग्रीवस्य महात्मनः ।
पर्वतादृश्यमूकात्तु पुप्लुवे यत्र राघवौ ॥ १ ॥
महात्मा सुग्रीवाच्या कथनाचे तात्पर्य समजून हनुमान् ऋष्यमूक पर्वतावरून ज्या स्थानी ते दोघे रघुवंशी बंधु विराजमान झालेले होते त्या स्थानी उड्या मारीत निघाले. ॥१॥
कपिरूपं परित्यज्य हनुमान् मारुतात्मजः ।
भिक्षुरूपं ततो भेजे शठबुद्धितया कपिः ॥ २ ॥
पवनकुमार वानरवीर हनुमंतानी असा विचार केला की माझ्या ह्या कपिरूपावर कुणाचा विश्वास बसू शकत नाही, म्हणून आपल्या त्या रूपाचा परित्याग करून त्यांनी भिक्षुचे (सामान्य तपस्व्याचे) रूप धारण केले. ॥२॥
ततः स हनुमान् वाचा श्लक्ष्णया सुमनोज्ञया ।
विनीतवदुपागम्य राघवौ प्रणिपत्य च ॥ ३ ॥

आबभाषे तदा वीरौ यथावत् प्रशशंस च ।
संपूज्य विधिवद्वीरो हनुमान् वानरोत्तमः ॥ ४ ॥

उवाच कामतो वाक्यं मृदु सत्यपराक्रमौ ।
राजर्षिदेवप्रतिमौ तापसौ संशितव्रतौ ॥ ५ ॥
त्यानंतर हनुमंतानी विनीतभावांनी त्या दोघा रघुवंशी वीरांच्या जवळ जाऊन त्यांना प्रणाम केला आणि मनाला अत्यंत प्रिय वाटणार्‍या मधुर वाणीमध्ये त्यांच्याशी वार्तालाप करण्यास आरंभ केला. वानरश्रेष्ठ हनुमानांनी प्रथम तर त्या दोन्ही वीरांची यथोचित प्रशंसा केली. नंतर विधिवत् त्यांचे पूजन (आदर- सत्कार) करून स्वच्छंदरूपाने मधुर वाणीमध्ये म्हणाले - ’वीरांनो ! आपण दोघे सत्यपराक्रमी, राजर्षि आणि देवताप्रमाणे प्रभावशाली, तपस्वी, तसेच कठोर व्रताचे पालन करणारे आहात असे कळून येत आहे. ॥३-५॥
देशं कथमिमं प्राप्तौ भवंतौ वरवर्णिनौ ।
त्रासयंतौ मृगगणानन्यांश्च वनचारिणः ॥ ६ ॥

पंपातीररुहान् वृक्षान् वीक्षमाणौ समंततः ।
इमां नदीं शुभजलां शोभयंतौ तपस्विनौ ॥ ७ ॥

धैर्यवंतौ सुवर्णाभौ कौ युवां चीरवाससौ ।
निःश्वसंतौ वरभुजौ पीडयंताविमाः प्रजाः ॥ ८ ॥
’आपल्या शरीराची कांति फारच सुंदर आहे. आपण दोघे या वन्य प्रदेशात कशासाठी आला आहात ? वनात विचरणार्‍या मृगसमूह तसेच अन्य जीवांनाही त्रास देत पंपासरोवराच्या तटवर्ती वृक्षांना सर्व बाजूंनी पहात आणि या सुंदर जलाने संपन्न नदी सारखी असणार्‍या पंपेला सुशोभित करीत असणारे आपण दोघे वेगवान् वीर कोण आहांत ? आपल्या अंगाची कांति सुवर्णासमान प्रकाशित होत आहे. आपण दोघे फार धैर्यशाली दिसून येत आहात. आपल्या दोघांच्या अंगावर चीर वस्त्र शोभा देत आहे. आपण दोघे दिर्घ श्वास घेत आहात. आपल्या भुजा विशाल आहेत. आपण आपल्या प्रभावाने या वनांतील प्राण्यांना पीडा देत आहात. सांगा तर खरे आपला परिचय काय आहे ? ’॥६-८॥
सिंहविप्रेक्षितौ वीरौ सिंहातिबलविक्रमौ ।
शक्रचापनिभे चापे गृहीत्वा शत्रुसूदनौ ॥ ९ ॥
’आपणा दोघा वीरांची दृष्टी सिंहासमान आहे. आपले बल आणि पराक्रम महान् आहे. इंद्र-धनुष्यासमान महान् धनुष्ये धारण करून आपण शत्रुंना नष्ट करण्याची शक्ति बाळगत आहात. ॥९॥
श्रीमंतौ रूपसंपन्नौ वृषभश्रेष्ठविक्रमौ ।
हस्तिहस्तोपमभुजौ द्युतिमंतौ नरर्षभौ ॥ १० ॥
आपण कांतिमान् तसेच रूपवान् आहात. आपण विशालकाय वळूप्रमाणे मंदगतिने चालत आहात. आपल्या भुजा हत्तीच्या सोंडेसमान वाटत आहेत. आपण मनुष्यांत श्रेष्ठ आणि परम तेजस्वी आहात. ॥१०॥
प्रभया पर्वतेंद्रो ऽयं युवयोरवभासितः ।
राज्यार्हावमरप्रख्यौ कथं देशमिहागतौ ॥ ११ ॥
आपल्या दोघांच्या प्रभावाने गिरिराज ऋष्यमूक झगमगत आहे. आपण देवतांप्रमाणे पराक्रमी आणि राज्य भोगण्यास योग्य आहात. मग या दुर्गम वनप्रदेशात आपले आगमन कसे संभव झाले ? ॥११॥
पद्मपत्रेक्षणौ वीरौ जटामण्डलधारिणौ ।
अन्योन्यसदृशौ वीरौ देवलोकादिवागतौ ॥ १२ ॥
’आपले नेत्र प्रफुल्ल कमलदलाप्रमाणे शोभा प्राप्त करीत आहेत. आपल्यात वीरता भरलेली आहे. आपण दोघे मस्तकावर जटामण्डल धारण करीत आहात आणि दोघेही एक दुसर्‍या प्रमाणेच आहात. वीरांनो ! आपण देवलोकातून येथे आला आहात कां ?’ ॥१२॥
यदृच्छयेव संप्राप्तौ चंद्रसूर्यौ वसुंधराम् ।
विशालवक्षसौ वीरौ मानुषौ देवरूपिणौ ॥ १३ ॥
’आपणा दोघांना पाहून असे वाटत आहे की जणु चंद्रमा आणि सूर्य स्वेच्छेनेच या भूतलावर उतरून आले आहेत. आपले वक्षःस्थल विशाल आहे. मनुष्य असूनही आपले रूप देवतातुल्य आहे. ॥१३॥
सिंहस्कंधौ महोत्साहौ समदाविव गोवृषौ ।
आयताश्च सुवृत्ताश्च बाहवः परिघोपमाः ॥ १४ ॥

सर्वभूषणभूषार्हाः किमर्थं न विभूषिताः ।
उभौ योग्यावहं मन्ये रक्षितुं पृथिवीमिमाम् ॥ १५ ॥

ससागरवनां कृत्स्नां विंध्यमेरुविभूषिताम् ।
’आपले खांदे सिंहासमान आहेत. आपल्या मध्ये महान् उत्साह भरलेला आहे. आपण दोघे मदमत्त वळूप्रमाणे प्रतीत होत आहात. आपल्या भुजा विशाल, सुंदर, गोल-गोल आणि परिघासमान सुदृढ आहेत; सर्व आभूषणांना धारण करण्यायोग्य आहेत आणि तरीही आपण यांना विभूषित केले नाहीत ? मी तर समजतो की आपण दोघे समुद्र आणि वनांनी युक्त तसेच विंध्य आणि मेरू आदि पर्वतांनी विभूषित या सर्व पृथ्वीचे रक्षण करण्या योग्य आहात. ॥१४- १५ १/२॥
इमे च धनुषी चित्रे श्लक्ष्णे चित्रानुलेपने ॥ १६ ॥
प्रकाशेते यथेंद्रस्य वज्रे हेमविभूषिते ।
आपली ही दोन्ही धनुष्ये विचित्र, स्निग्ध आणि अद्‌भुत अनुलेपाने चित्रित आहेत. यांना सुवर्णाने विभूषित केले गेले आहे; म्हणून ही इंद्राच्या वज्रासमान प्रकाशित होत आहेत. ॥१६ १/२॥
संपूर्णा निशितैर्बाणैस्तूणाश्च शुभदर्शनाः ॥ १७ ॥
जीवितांतकरैर्घोरैः श्वसद्‌भिरिव पन्नगैः ।
’प्राणांचा अंत करणार्‍या सर्पांसमान भयंकर तसेच प्रकाशमान् तीक्ष्ण बाणांनी भरलेले आपणा दोघांचे तूणीर फार सुंदर दिसून येत आहेत.’ ॥१७ १/२॥
महाप्रमाणौ विपुलौ तप्तहाटकभूषितौ ॥ १८ ॥
खड्गावैतौ विराजेते निर्मुक्ताविव पन्नागौ ।
’आपली ही दोन्ही खड्‌गे फारच मोठी आणि विस्तृत आहेत. ही चोख सोन्यांनी विभूषित केली गेलेली आहेत. ती दोन्ही कात टाकलेल्या सर्पाप्रमाणे शोभा प्राप्त करीत आहेत. ॥१८ १/२॥
एवं मां परिभाषंतं कस्माद्वै नाभिभाषथः ॥ १९ ॥

सुग्रीवो नाम धर्मात्मा कश्चिद्वानरयूथपः ।
वीरो विनिकृतो भ्रात्रा जगद्‌भ्रमति दुःखितः ॥ २० ॥
’वीरांनो ! या प्रकारे मी वारंवार आपला परिचय विचारीत आहे तरी आपण मला उत्तर का देत नाही ? येथे सुग्रीव नामक एक श्रेष्ठ वानर राहात आहेत. ते अत्यंत धर्मात्मा आणि वीर आहेत. त्यांचे भाऊ वाली यांनी त्यांना घरातून घालवून दिले आहे, म्हणून ते अत्यंत दुःखी होऊन सर्वत्र भटकत राहिले आहेत. ॥१९-२०॥
प्राप्तो ऽहं प्रेषितस्तेन सुग्रीवेण महात्मना ।
राज्ञा वानरमुख्यानां हनूमान्नाम वानरः ॥ २१ ॥
’त्याच वानरमुख्य राजा महात्मा सुग्रीवांनी धाडल्यावरून मी येथे आलो आहे. माझे नाव हनुमान् आहे. मी वानर जातीचा आहे.’ ॥२१॥
युवाभ्यां सह धर्मात्मा सुग्रीवः सख्यमिच्छति ।
तस्य मां सचिवं वित्तं वानरं पवनात्मजम् ॥ २२ ॥

भिक्षुरूपप्रतिच्छन्नं सुग्रीवप्रियकाम्यया ।
ऋश्यमूकादिह प्राप्तं कामगं कामरूपिणम् ॥ २३ ॥
’धर्मात्मा सुग्रीव आपणा दोघांशी मैत्री करू इच्छितात. आपण मला त्यांच्याच मंत्री समजावे. मी वायुदेवतेचा वानरजातीय पुत्र आहे. मी माझी जेथे इच्छा असेल तेथे जाऊ शकतो आणि जशी इच्छा असेल तसे रूप धारण करू शकतो. या समयी सुग्रीवांचे प्रिय करण्यासाठी भिक्षु रूपात स्वतःस लपवून मी ऋष्यमूक पर्वतावरून येथे आलो आहे.’ ॥२२-२३॥
एवमुक्त्वा तु हनुमांस्तौ वीरौ रामलक्ष्मणौ ।
वाक्यज्ञौ वाक्यकुशलः पुनर्नोवाच किञ्चन ॥ २४ ॥
त्या दोघा भावांना, वीरवर रामलक्ष्मणांना याप्रमाणे सांगून वाक्यज्ञ आणि वाक्यकुशल हनुमान् गप्प झाले, नंतर काही बोलले नाहीत. ॥२४॥
एतच्छ्रुत्वा वचस्तस्य रामो लक्ष्मणमब्रवीत् ।
प्रहृष्टवदनः श्रीमान् भ्रातरं पार्श्वतः स्थितम् ॥ २५ ॥
त्यांचे हे बोलणे ऐकून श्रीरामांचे मुख प्रसन्नतेने खुलले. ते आपल्या बाजूला उभे असलेल्या आपला भाऊ लक्ष्मणास या प्रकारे सांगू लागले. ॥२५॥
सचिवो ऽयं कपींद्रस्य सुग्रीवस्य महात्मनः ।
तमेव कांक्षमाणस्य ममांतिकमुपागतः ॥ २६ ॥
’सौमित्रा ! हे महामनस्वी वानरराज सुग्रीवांचे सचिव आहेत आणि त्यांच्या हिताच्या इच्छेनेच येथे मजजवळ आले आहेत. ॥२६॥
तमभ्यभाष सौमित्रे सुग्रीवसचिवं कपिम् ।
वाक्यज्ञं मधुरैर्वाक्यैः स्नेहयुक्तमरिंदम ॥ २७ ॥
 ’लक्ष्मणा ! या शत्रुदमन सुग्रीव सचिव कपिवर हनुमानांशी, जे वाक्यज्ञ आहेत, तू स्नेहपूर्वक मधुर वाणीमध्ये संभाषण कर. ॥२७॥
नानृग्वेदविनीतस्य नायजुर्वेदधारिणः ।
नासामवेदविदुषः शक्यमेवं प्रभाषितुम् ॥ २८ ॥
ज्याने ऋग्वेदाचे शिक्षण प्राप्त केले नसेल, ज्याने यजुर्वेदाचा अभ्यास केला नसेल तसेच जो सामवेदाचा विद्वान नसेल तो या प्रकारे सुंदर भाषेमध्ये वार्तालाप करू शकत नाही. ॥२८॥
नूनं व्याकरणं कृत्स्नमनेन बहुधा श्रुतम् ।
बहु व्याहरता ऽनेन न किञ्चिदपशब्दितम् ॥ २९ ॥
’निश्चितच यांनी संपूर्ण व्याकरणाचा कित्येक वेळा स्वाध्याय केला आहे कारण की बर्‍याच गोष्टी बोलल्या गेल्यावर ही यांच्या मुखातून काही अशुद्ध बोलले गेले नाही. ॥२९॥
न मुखे नेत्रयोर्वापि ललाटे च भ्रुवोस्तथा ।
अन्येष्वपि च गात्रेषु दोषः संविदितः क्वचित् ॥ ३० ॥
’संभाषणाच्या वेळी यांचे मुख, नेत्र, ललाट, भुवया तसेच अन्य सर्व अङ्‌गातून कुठलाही दोष प्रकट झाला आहे असे कोठेही दिसून आले नाही. ॥३०॥
अविस्तरमसंदिग्धमविलंबितमद्रुतम् ।
उरःस्थं कण्ठगं वाक्यं वर्तते मध्यमस्वरम् ॥ ३१ ॥
’यांनी थोडक्यात अत्यंत स्पष्टपणे आपला अभिप्राय निवेदन केला आहे. तो समजण्यात कोठेही संदेह उत्पन्न झालेला नाही. थांबून थांबून अथवा शब्दांची वा अक्षरांची तोडमोड करून कुठल्याही अशा वाक्याचे उच्चारण केलेले नाही की जे ऐकतांना कर्णकटु होईल. त्यांची वाणी हृदयात मध्यमारूपाने स्थित आहे आणि कण्ठातून वैखरी रूपात प्रकट होत आहे म्हणून बोलते वेळी यांचा आवाज फार हळूही असत नाही किंवा फार उंच उच्च ही असत नाही. मध्यम स्वरांतच त्यांनी सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. ॥३१॥
संस्कारक्रमसंपन्नामद्रुतामविलंबिताम् ।
उञ्चारययति कल्यार्णीं वाचं हृदयहारिणीम् ॥ ३२ ॥
’हे संस्कार(*) आणि क्रमाने (**) संपन्न, अद्‌भुत, अविलंबित(***) तसेच हृदयाला आनंद प्रदान करणार्‍या कल्याणमय वाणीचे उच्चारण करीत आहेत. ॥३२॥
(* व्याकरणाच्या नियमानुकूल शुद्ध वाणीला संस्कारसमान (संस्कृत) म्हटले जाते)
(** शब्दोच्चारणाच्या शास्त्रीय परिपाठीचे नाव क्रम आहे.)
(*** न थांबता धाराप्रवाह रूपाने बोलणे अविलंबित म्हटले जाते.)
अनया चित्रया वाचा त्रिस्थानव्यञ्चनस्थया ।
कस्य नाराध्यते चित्तमुद्यतासेररेरपि ॥ ३३ ॥
’हृदय, कण्ठ आणि मूर्धा- या तीन्ही स्थानांच्या द्वारा स्पष्टरूपाने अभिव्यक्त होणार्‍या यांच्या या विचित्र वाणीला ऐकून कुणाचे चित्त प्रसन्न होणार नाही. वध करण्यासाठी तलवार उगारलेल्या शत्रूचे हृदयही या अद्‌भुत वाणीने बदलू शकते. ॥३३॥
एवंविधो यस्य दूतो न भवेत्पार्थिवस्य तु ।
सिध्यंति हि कथं तस्य कार्याणां गतयोऽनघ ॥ ३४ ॥
’निष्पाप लक्ष्मणा ! ज्या राजाजवळ यांच्या समान दूत नसेल त्याच्या कार्यांची सिद्धि कशी होऊ शकेल ?’ ॥३४॥
एवं गुणगणैर्युक्ता यस्य स्युः कार्यसाधकाः ।
तस्य सिद्ध्यंति सर्वार्था दूतवाक्यप्रचोदिताः ॥ ३५ ॥
’ज्यांचे कार्यसाधक दूत अशा उत्तम गुणांनी युक्त असतील त्या राजांचे सर्व मनोरथ दूताच्या वार्तालापानेच सिद्ध होऊन जातात.’ ॥३५॥
एवमुक्तस्तु सौमित्रिः सुग्रीवसचिवं कपिम् ।
अभ्यभाषत वाक्यज्ञो वाक्यज्ञं पवनात्मजम् ॥ ३६ ॥
श्रीरामांनी असे म्हटल्यावर वाक्यज्ञ सौमित्र वाक्यज्ञ कपिवर पवनपुत्र सुग्रीव सचिव हनुमानास या प्रकारे बोलले- ॥३६॥
विदिता नौ गुणा विद्वन् सुग्रीवस्य महात्मनः ।
तमेवं चावां मार्गावः सुग्रीवं प्लवगेश्वरम् ॥ ३७ ॥
’विद्वन् ! महामना सुग्रीवांचे गुण आम्हांला ज्ञात होऊन चुकले आहेत. आम्ही दोघे भाऊ वानरराज सुग्रीवांच्या शोधातच येथे आलो आहोत. ॥३७॥
यथा ब्रवीषि हनुमन् सुग्रीववचनादिह ।
तत्तथा हि करिष्यावो वचनात्तव सत्तम ॥ ३८ ॥
’साधुशिरोमणी हनुमान् ! आपण सुग्रीवांच्या सांगण्यावरून येथे येऊन जी मैत्रीची गोष्ट बोलत आहात, ती आम्हांला मान्य आहे. आम्ही आपल्या सांगण्यावरून असे करू शकतो.’ ॥३८॥
तत्तस्य वाक्यं निपुणं निशम्य
प्रहृष्टरूपः पवनात्मजः कपिः ।
मनः समाधाय जयोपपत्तौ
सख्यं तदा कर्तुमियेष ताभ्याम् ॥ ३९ ॥
लक्ष्मणांचे हे स्वीकृतीसूचक निपुणतायुक्त वचन ऐकून पवनपुत्र कपिवर हनुमान् फार प्रसन्न झाले. त्यांनी सुग्रीवांच्या विजयसिद्धिमध्ये मन लावून त्या समयी त्या दोघा भावांच्या बरोबर मैत्री करण्याची इच्छा केली. ॥३९॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे तृतीयः सर्गः ॥ ३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा तिसरा सर्ग पूरा झाला. ॥३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP