श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ एकोनशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामरावणयोर्युद्धम् -
श्रीराम आणि रावणाचे युद्ध -
महोदरमहापार्शो हतौ दृष्ट्‍वा तु राक्षसौ ।
तस्मिंश्च निहते वीरे विरूपाक्षे महाबले ॥ १ ॥

आविवेश महान् क्रोधो रावणं तं महामृधे ।
सूतं सञ्चोदयामास वाक्यं चेदमुवाच ह ॥ २ ॥
महाबली वीर विरूपाक्ष तर मारला गेलाच होता, महोदर आणि महापार्श्वही मारले गेले हे पाहून त्या महासमरामध्ये रावणाच्या हृदयात महान्‌ क्रोधाचा आवेश उत्पन्न झाला. त्याने सारथ्याला रथ पुढे नेण्याची आज्ञा दिली आणि याप्रकारे म्हटले - ॥१-२॥
निहतानाममात्यानां रुद्धस्य नगरस्य च ।
दुःखमेवापनेष्यामि हत्वा तौ रामलक्ष्मणौ ॥ ३ ॥
सूता ! माझे अमात्य मारले गेले आणि लंकापुरीला चोहोबाजुंनी वेढा घातला गेला आहे, यामुळे मला फार दुःख होत आहे. आज रामलक्ष्मणांचा वध करूनच मी आपले हे दुःख दूर करीन. ॥३॥
रामवृक्षं रणे हन्मि सीतापुष्पफलप्रदम् ।
प्रशाखा यस्य सुग्रीवो जाम्बवान् कुमुदो नलः ॥ ४ ॥

द्विविदश्चैव मैन्दश्च अङ्‌गदो गन्धमादनः ।
हमूमांश्च सुषेणश्च सर्वे च हरियूथपाः ॥ ५ ॥
रणभूमीमध्ये त्या रामरूपी वृक्षाला मी उपटून फेकून देईन, जो सीतारूपी फुलाच्या द्वारा फळ देणारा आहे तसेच सुग्रीव, जाम्बवान्‌, कुमुद, नल, द्विविद, मैंद, अंगद, गंधमादन, हनुमान आणि सुषेण समस्त वानर यूथपति ज्याच्या शाखा-प्रशाखा आहेत. ॥४-५॥
स दिशो दश धोषेण रथस्यातिरथो महान् ।
नादयन् प्रययौ तूर्णं राघवं चाभ्यधावत ॥ ६ ॥
असे म्हणून महान्‌ अतिरथी वीर रावण आपल्या रथाच्या घडघडाटाने दाही दिशांना निनादित करीत अत्यंत वेगाने राघवांकडे धावला. ॥६॥
पूरिता तेन शब्देन सनदीगिरिकानना ।
सञ्चचाल मही सर्वा सवराहमृगद्विजा ॥ ७ ॥
रथाच्या आवाजाने नदी, पर्वत, जंगलांसहित तेथील सारी भूमी निनादून गेली, पृथ्वी डोलू लागली आणि तेथील सारे पशु-पक्षी यांचा भयाने थरकाप उडाला. ॥७॥
तामसं सु महाघोरं चकारास्त्रं सुदारुणम् ।
निर्ददाह कपीन् सर्वान् ते प्रपेतुः समन्ततः ॥ ८ ॥
त्यासमयी रावणाने तामस नावाचे अत्यंत भयंकर महघोर अस्त्र प्रकट करून समस्त वानरांना भस्म करण्यास आरंभ केला. सर्वत्र त्यांची प्रेते पडू लागली. ॥८॥
उत्पपात रजो भूमौ तैर्भग्नैः सम्प्रधावितैः ।
न हि तत्सहितुं शेकुः ब्रह्मणा निर्मितं स्वयम् ॥ ९ ॥
त्यांचे पायच उखडले गेले आणि ते इकडे-तिकडे पळू लागले, यामुळे रणभूमीत खूपच धूळ उडू लागली. ते तामस अस्त्र साक्षात्‌ ब्रह्मदेवांनी बनविलेले होते. म्हणून वानर-योद्धे त्याचा वेग सहन करू शकले नाहीत. ॥९॥
तान्यनीकान्यनेकानि रावणस्य शरोत्तमैः ।
दृष्ट्‍वा भग्नानि शतशो राघवः पर्यवस्थितः ॥ १० ॥
रावणाच्या उत्तम बाणांनी आहत होऊन वानरांच्या शेकडो सेना उध्वस्त झाल्या - हे पाहून भगवान्‌ राघव युद्धासाठी उद्यत होऊन सुस्थिर भावाने उभे राहिले. ॥१०॥
ततो राक्षसशार्दूलो विद्राव्य हरिवाहिनीम् ।
स ददर्श ततो रामं तिष्ठन्तमपारजितम् ॥ ११ ॥

लक्ष्मणेन सह भ्रात्रा विष्णुना वासवं यथा ।
तिकडे वानर सेनेला पिटाळून राक्षससिंह रावणाने पाहिले की कुणाकडून पराजित न होणारे श्रीराम आपले भाऊ लक्ष्मण यांच्यासह इंद्र जसे आपले लहान भाऊ भगवान्‌ विष्णु (उपेन्द्र) सह उभे राहावे तसे उभे आहेत. ॥११ १/२॥
आलिखन्तमिवाकाशं अवष्टभ्य महद् धनुः ॥ १२ ॥

पद्मपत्रविशालाक्षं दीर्घबाहुमरिन्दमम् ।
ते आपले विशाल धनुष्य उचलून आकाशात रेखा खेचत असल्याप्रमाणे प्रतीत होत होते. त्यांचे नेत्र विकसित कमलदलासमान विशाल होते, भुजा मोठ मोठ्‍या होत्या आणि ते शत्रुंचे दमन करण्यास पूर्णतः समर्थ होते. ॥१२ १/२॥
ततो रामो महातेजाः सौमित्रिसहितो बली ॥ १३ ॥

वानरांश्च रणे भग्नान् आपतन्तं च रावणम् ।
समीक्ष्य राघवो हृष्टो मध्ये जग्राह कार्मुकम् ॥ १४ ॥
नंतर लक्ष्मणांसहित उभे असलेल्या महातेजस्वी, महाबली श्रीरामांनी रणभूमीमध्ये वानरांना पळत असलेले आणि रावणाला येत असलेला पाहून मनात फार हर्षाचा अनुभव केला आणि धनुष्याच्या मध्यभागाला दृढतेने पकडले. ॥१३-१४॥
विस्फारयितुमारेभे ततः स धनुरुत्तमम् ।
महावेगं महानादं निर्भिन्दन्निव मेदिनीम् ॥ १५ ॥
त्यांनी आपल्या महान्‌ वेगशाली आणि महानाद प्रकट करणार्‍या उत्तम धनुष्यास याप्रकारे खेचण्यास आणि त्याचा टणत्कार करण्यास आरंभ केला की जणु ते पृथ्वीलाच विदीर्ण करून टाकतील. ॥१५॥
रावणस्य च बाणौघै रामविस्फारितेन च ।
शब्देन राक्षसास्ते च पेतुश्च शतशस्तदा ॥ १६ ॥
रावणाच्या बाणसमूहांनी तसेच रामांच्या धनुष्याच्या टणत्काराने जो भयंकर शब्द प्रकट झाला, त्याने आतंकित होऊन शेकडो राक्षस तात्काळ धराशायी झाले. ॥१६॥
तयोः शरपथं प्राप्तो रावणो राजपुत्रयोः ।
स बभौ च यथा राहुः समीपे शशिसूर्ययोः ॥ १७ ॥
त्या दोन्ही राजकुमारांच्या बाणांच्या मार्गात येऊन रावण चंद्रमा आणि सूर्याच्या समीप स्थित राहूप्रमाणे शोभू लागला. ॥१७॥
तमिच्छन् प्रथमं योद्धुं लक्ष्मणो निशितैः शरैः ।
मुमोच धनुरायम्य शरान् अग्निशिखोपमान् ॥ १८ ॥
लक्ष्मण आपल्या तीक्ष्ण बाणांच्या द्वारा रावणाबरोबर प्रथम स्वतःच युद्ध करू इच्छित होते, म्हणून धनुष्य ताणून ते अग्निशिखे प्रमाणे तेजस्वी बाण सोडू लागले. ॥१८॥
तान् मुक्तमात्रानाकाशे लक्ष्मणेन धनुष्मता ।
बाणान् बाणैर्महातेजा रावणः प्रत्यवारयत् ॥ १९ ॥
धनुर्धर लक्ष्मणांच्या धनुष्यातून सुटताच त्या बाणांना महातेजस्वी रावणाने आपल्या सायकांच्या द्वारा आकाशांतच छेदून टाकले. ॥१९॥
एकमेकेन बाणेन त्रिभिस्त्रीन् दशभिर्दश ।
लक्ष्मणस्य प्रचिच्छेद दर्शयन् पाणिलाघवम् ॥ २० ॥
तो आपल्या हातांचे लाघव दाखवीत लक्ष्मणांच्या एका बाणाला एका बाणाने, तीन बाणांना तीन बाणांनी आणि दहा बाणांना तितक्याच बाणांनी छेदून टाकत होता. ॥२०॥
अभ्यतिक्रम्य सौमित्रिं रावणः समितिञ्जयः ।
आससाद ततो रामं स्थितं शैलमिवापरम् ॥ २१ ॥
समरविजयी रावण सौमित्राला ओलांडून रणभूमीमध्ये दुसर्‍या पर्वताप्रमाणे अविचल भावाने उभे असलेल्या रामांच्या जवळ येऊन पोहोचला. ॥२१॥
स राघवं समासाद्य क्रोधसंरक्तलोचनः ।
व्यसृजच्छरवर्षाणि रावणो राघवोपरि ॥ २२ ॥
राघवांच्या जवळ जाऊन क्रोधाने डोळे लाल करून राक्षसराज रावण त्यांच्यावर बाणांची वृष्टि करू लागला. ॥२२॥
शरधारास्ततो रामो रावणस्य धनुश्च्युताः ।
दृष्ट्‍वैवापतितः शीघ्रं भल्लान् जग्राह सत्वरम् ॥ २३ ॥
रावणाच्या धनुष्यांतून बाहेर पडणार्‍या त्या बाणांच्या धारांवर दृष्टिपात करून श्रीरामांनी उतावळीने शीघ्रच काही भल्ल हातात घेतले. ॥२३॥
तान् शरौघांस्ततो भल्लैः तीक्ष्णैश्चिच्छेद राघवः ।
दीप्यमानान् महाघोरान् शरानाशीविषोपमम् २४ ॥
राघवांनी रावणाच्या विषधर सर्पांप्रमाणे महाभयंकर आणि दीप्तिमान्‌ बाण समूहाला त्या तीक्ष्ण भल्लांनी छेदून टाकले. ॥२४॥
राघवो रावणं तूर्णं रावणो राघवं तदा ।
अन्योन्यं विविधैस्तीक्ष्णैः शरवर्षैर्ववर्ततुः ॥ २५ ॥
नंतर राघवांनी रावणाला आणि रावणाने राघवांना आपले लक्ष्य बनविले आणि दोघेही शीघ्रतापूर्वक एक दुसर्‍यावर निरनिराळ्या प्रकारच्या तीक्ष्ण बाणांची वृष्टि करू लागले. ॥२५॥
चेरतुश्च चिरं चित्रं मण्डलं सव्यदक्षिणम् ।
बाणवेगान् समुत्क्षिप्तौ अन्योन्यं अपराजितौ ॥ २६ ॥
ते दोघे चिरकालपर्यंत तेथे विचित्र उजवे-डावे पवित्रे घेत विचरत राहिले. बाणांच्या वेगाने एक दुसर्‍याला घायाळ करीत असता ते दोघे वीर पराजित होत नव्हते. ॥२६॥
तयोर्भूतानि वित्रेसुः युगपत् सम्प्रयुध्यतोः ।
रौद्रयोः सायकमुचोः यमान्तकनिकाशयोः ॥ २७ ॥
एकाच वेळी लढत आणि सायकांची वृष्टि करत असता राम आणि रावण, यमराज आणि अंतकासमान भयंकर भासत होते. त्यांच्या युद्धाने समस्त प्राण्यांचा थरकाप उडाला. ॥२७॥
सन्ततं विविधैर्बाणैः बभूव गगनं तदा ।
घनैरिवातपापाये विद्युन्मालासमाकुलैः ॥ २८ ॥
जसे वर्षा ऋतुत विद्युत् समूहांनी व्याप्त मेघांच्या समुदायांनी आकाश आच्छादित होऊन जाते, त्याच प्रकारे त्यासमयी नाना प्रकारच्या बाणांनी ते झाकून गेले होते. ॥२८॥
गवाक्षितमिवाकाशं बभूव शरवृष्टिभिः ।
महावेगैः सुतीक्ष्णाग्रैः गृध्रपत्रैः सुवाजितैः ॥ २९ ॥
गिधाडाच्या पंखाच्या सुंदर पिसांनी सुशोभित आणि तीक्ष्ण धार असणारे महान्‌ वेगशाली बाणांची अनवरत वृष्टि होण्यामुळे आकाश जणु त्यात बरेचसे झरोके लावले गेले आहेत की काय असे दिसत होते. ॥२९॥
शरान्धकारमाकाशं चक्रुतुः समरं तदा ।
गतेऽस्तं तपने चापि महामेघाविवोत्थितौ ॥ ३० ॥
दोन मोठ मोठ्‍या मेघांप्रमाणे उभे असलेल्या राम आणि रावणांनी सूर्याचा अस्त आणि उदय झाल्यावरही बाणांच्या गहन अंधःकाराने आकाशाला झाकून ठेवलेले होते. ॥३०॥
तयोरभून् महायुद्धं अन्योन्य वधकाङ्‌क्षिणोः ।
अनासाद्यमचिन्त्यं च वृत्रवासवयोरिव ॥ ३१ ॥
दोघेही एक दुसर्‍याचा वध करू इच्छित होते म्हणून वृत्रासुर आणि इंद्राप्रमाणे त्या दोघांमध्ये महान्‌ युद्ध होऊ लागले, जे दुर्लभ तसेच अचिंत्य होते. ॥३१॥
उभौ हि परमेष्वासौ उभौ युद्धविशारदौ ।
उभावस्त्रविदां मुख्यौ उभौ युद्धे विचेरतुः ॥ ३२ ॥
दोघेही महान्‌ धनुर्धर आणि दोघेही युद्धाच्या कलेत निपुण होते. दोघेही अस्त्रवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ होते म्हणून दोघेही मोठ्‍या उत्साहाने रणभूमीत विचरण करू लागले. ॥३२॥
उभौ हि येन व्रजतः तेन तेन शरोर्मयः ।
ऊर्मयो वायुना विद्धा जग्मुः सागरयोरिव ॥ ३३ ॥
ते ज्या ज्या मार्गाने जात तेथून तेथून बाणांची जणु लहर उठत होती, जसे वायुच्या थपडा खाऊन दोन समुद्रांच्या जलात उत्ताल तरंगे उठत आहेत की काय. ॥३३॥
ततः संसक्तहस्तस्तु रावणो लोकरावणः ।
नाराचमालां रामस्य ललाटे प्रत्यमुञ्चत ॥ ३४ ॥
त्यानंतर ज्याचे हात बाण सोडण्यातच लागलेले होते त्या समस्त लोकांना रडविणार्‍या रावणाने श्रीरामांच्या ललटावर नारांच्यांची जणु माळच घातली. ॥३४॥
रौद्रचापप्रयुक्तां तां नीलोत्पलदलप्रभाम् ।
शिरसा धारयद् रामो न व्यथां अभ्यपद्यत ॥ ३५ ॥
भयंकर धनुष्यातून सुटलेली आणि नील कमलदलासमान श्याम कान्तिने प्रकाशित होत असलेली ती नाराचांची माळा श्रीरामांनी आपल्या शिरावर धारण केली परंतु ते व्यथित झाले नाहीत. ॥३५॥
अथ मन्त्रानपि जपन् रौद्रमस्त्रमुदीरयन् ।
शरान् भूयः समादाय रामः क्रोधसमन्वितः ॥ ३६ ॥
त्यानंतर क्रोधाविष्ट झालेल्या श्रीरामांनी पुन्हा बरेचसे बाण घेऊन मंत्रजपपूर्वक रौद्रास्त्राचा प्रयोग केला. ॥३६॥
मुमोच च महातेजाः चापमायम्य वीर्यवान् ।
तान् शरान् राक्षसेन्द्राय चिक्षेपाच्छिन्नसायकः ॥ ३७ ॥
नंतर त्या महातेजस्वी, महापराक्रमी आणि अविच्छिन्नरूपाने बाणवृष्टि करणार्‍या श्रीरघुवीराने धनुष्यास कानापर्यंत खेचून ते सर्व बाण राक्षसराज रावणावर सोडून दिले. ॥३७॥
ते महामेघसङ्‌काशे कवचे पतिताः शराः ।
अवध्ये राक्षसेन्द्रस्य न व्यथां जनयंस्तदा ॥ ३८ ॥
ते बाण राक्षसराज रावणाच्या महामेघासमान काळ्या रंगाच्या अभेद्य कवचावर पडले होते, म्हणून त्यासमयी त्याला व्यथित करू शकले नाहीत. ॥३८॥
पुनरेवाथ तं रामो रथस्थं राक्षसाधिपम् ।
ललाटे परमास्त्रेण सर्वास्त्रकुशलोऽभिनत् ॥ ३९ ॥
संपूर्ण अस्त्रांच्या संचलनात कुशल भगवान्‌ श्रीरामांनी पुन्हा रथावर बसलेल्या राक्षसराज रावणाच्या ललाटावर उत्तम अस्त्रांचा प्रहार करून त्याला घायाळ केले. ॥३९॥
ते भित्त्वा बाणरूपाणि पञ्चशीर्षा इवोरगाः ।
श्वसन्तो विविशुर्भूमिं रावणप्रतिकूलिताः ॥ ४० ॥
श्रीरामांचे ते उत्तम बाण रावणाला घायाळ करून त्याने निवारण केल्यावर फुसकारणार्‍या पांच शिरे असणार्‍या सर्पांप्रमाणे भूमिमध्ये सामावून गेले. ॥४०॥
निहत्य राघवस्यास्त्रं रावणः क्रोधमूर्च्छितः ।
आसुरं सुमहाघोरं अस्त्रं प्रादुश्चकार ह ॥ ४१ ॥
राघवांच्या अस्त्राचे निवारण करून क्रोधाने बेभान झालेल्या रावणाने आसुर नामक दुसरे महाभयंकर अस्त्र प्रकट केले. ॥४१॥
सिंहव्याघ्रमुखाश्चान्यान् कङ्‌ककाकमुखानपि ।
गृध्रश्येनमुखांश्चापि शृगालवदनांस्तथा ॥ ४२ ॥

ईहामृगमुखांश्चापि व्यादितास्यान् भयानकान् ।
पञ्चास्यान् लेलिहानांश्च ससर्ज निशितान् शरान् ॥ ४३ ॥

शरान् खरमुखांश्चान्यान् वराहमुखसंश्रितान् ।
श्वानकुक्कुटवक्त्रांश्च मकराशीविषाननान् ॥ ४४ ॥

एतांश्चान्यांश्च मायाभिः ससर्ज निशितान् शरान् ।
रामं प्रति महातेजाः क्रुद्धः सर्प इव श्वसन् ॥ ४५ ॥
त्याच्यापासून सिंह, वाघ, कंक, चक्रवाक, गिधाड, ससाणा, कोल्हा, लांडगे, गाढवे, डुकरे, कुत्रे, कोंबडे, मगरी आणि विषारी सापांसारखी मुखे असलेल्या बाणांची वृष्टि होऊ लागली. ते बाण तोंड पसरून जबडे चाटत असलेल्या पंचमुखी भयंकर सर्पांच्या प्रमाणे भासत होते. फुस्कारणार्‍या सर्पाप्रमाणे कुपित झालेल्या महातेजस्वी रावणाने यांचा तसेच अन्य प्रकारच्या तीक्ष्ण बाणांचाही श्रीरामांच्यावर प्रयोग केला. ॥४२-४५॥
आसुरेण समाविष्टः सोऽस्त्रेण रघुपुंगवः ।
ससर्जास्त्रं महोत्साहः पावकं पावकोपमः ॥ ४६ ॥
त्या आसुरास्त्राने आवृत्त झालेल्या अग्नितुल्य तेजस्वी महान्‌ उत्साही रघुकुलतिलक श्रीरामांनी अग्नेयास्त्राचा प्रयोग केला. ॥४६॥
अग्निदीप्तमुखान् बाणान् तत्र सूर्यमुखानपि ।
चन्द्रार्धचन्द्रवक्त्रांश्च धूमकेतुमुखानपि ।
ग्रहनक्षत्रवर्णांश्च महोल्कामुखसंस्थितान् ॥ ४७ ॥

विद्युज्जिह्वोपमांश्चापि ससर्ज विविधान् शरान् ।
त्याच्या द्वारा त्यांनी अग्नि, सूर्य, चंद्र, अर्धचंद्र, धूमकेतु, ग्रह, नक्षत्र, उल्का तसेच वीजेच्या प्रभेसमान प्रज्वलित मुखाचे नानाप्रकारचे बाण प्रकट केले. ॥४७ १/२॥
ते रावणशरा घोरा राघवास्त्रसमाहताः ॥ ४८ ॥

विलयं जग्मुराकाशे जग्मुश्चैव सहस्रशः ।
राघवांच्या आग्नेयास्त्राने आहत होऊन रावणाचे ते भयंकर बाण आकाशातच विलीन झाले, तथापि त्यांच्यामुळे हजारो वानर मारले गेले. ॥४८ १/२॥
तदस्त्रं निहतं दृष्ट्‍वा रामेणाक्लिष्टकर्मणा ॥ ४९ ॥

हृष्टा नेदुस्ततः सर्वे कपयः कामरूपिणः ।
सुग्रीवप्रमुखा वीराः सम्परिक्षिप्य राघवम् ॥ ५० ॥
अनायासेच महान्‌ कर्म करणार्‍या श्रीरामांनी त्या आसुरास्त्राला नष्ट करून टाकले हे पाहून इच्छेनुसार रूप धारण करणारे सुग्रीव आदि सर्व वीर वानर राघवांना चारी बाजूंनी घेरून हर्षनाद करू लागले. ॥४९-५०॥
ततस्तदस्त्रं विनिहत्य राघवः
प्रसह्य तद्रावणबाहुनिःसृतम् ।
मुदाऽन्वितो दाशरथिर्महात्मा
विनेदुरुच्चैर्मुदिताः कपीश्वराः ॥ ५१ ॥
दशरथनंदन महात्मा श्रीराम रावणाच्या हातून सुटलेल्या त्या आसुरास्त्राचा बलपूर्वक विनाश करून फार प्रसन्न झाले आणि वानर यूथपति आनंदमग्न होऊन उच्च स्वराने सिंहनाद करू लागले. ॥५१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे एकोनशततमः सर्गः ॥ ९९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा नव्व्याणवावा सर्ग पूरा झाला. ॥९९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP