॥ श्रीरामविजय ॥
॥ अध्याय विसावा ॥
श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
जैसे दुर्बळाचिया गृहाप्रति ॥ समर्थ सोयरे येती ॥ त्यांसी पाहुणेर करावया निश्चिती ॥ नाहीं शक्ति तयातें ॥१॥ मग तो कंदमूळें आणून ॥ पुढें ठेवी प्रीतीकरून ॥ तैसे हे प्राकृत बोल पूर्ण ॥ संतांपुढें समर्पिले ॥२॥ पयोब्धीपुढें ठेविलें तक्र ॥ कीं सुरभीपुढें अजाक्षीर ॥ अमृतापुढें साखर ॥ नेऊनियां समर्पिली ॥३॥ कुबेरापुढें कवडी जाण ॥ रंकें ठेविली नेऊन ॥ शीतळ व्हावया रोहिणीरमण ॥ नवनीत पुढें ठेविलें ॥४॥ कल्पद्रुमापुढें बदरीफळ ॥ वैरागराचे कंठीं स्फटिकमाळ ॥ मलयगिरीसी गंध शीतळ ॥ निंबकाष्ठाचें चर्चिलें ॥५॥ जो ब्रह्मांडप्रकाशक गभस्ति ॥ त्यासी ओंवाळिजे एकारती ॥ परी तो घेत देखोन भक्ति ॥ ऐसेंचि येथें संतीं केलें ॥६॥ तैसे बोल हे हीन जाण ॥ परी संतांसी आवडी पूर्ण ॥ एकुणिसावे अध्यायीं कथन ॥ काय जाहलें तें परिसा हो ॥७॥ असुरांतें देखोनि हनुमंत ॥ सभा नागवूनि समस्त ॥ पुरुषार्थ करोनि अद्भुत ॥ गेला गुप्तरूपेंचि ॥८॥ लंकेचीं मंदिरें समस्त ॥ सीतेलागीं शोधी हनुमंत ॥ जैसा रत्नपरीक्षक निरीक्षित ॥ रत्न आपुलें हारपलें ॥९॥ धांडोळिली लंका नगरी ॥ कोठें नुमगे जनककुमरी ॥ जेथें होतीं रावण-मंदोदरी ॥ तेथें हनुमंत पातला ॥१०॥ तंव तो शक्रारिजनक ॥ हवन करी विघ्नाशक ॥ शेजेवरी निजली निःशंक ॥ पट्टराणी मंदोदरी ॥११॥ उपरमाडिया गोपुरें ॥ राणिवसाचीं दामोदरें ॥ ऐशीं सहस्र अंतःपुरें ॥ सीतेलागीं शोधिलीं ॥१२॥ सकळ स्त्रियांचे मंदिरांत ॥ रिघोन पाहे हनुमंत ॥ जो महाराज इंद्रियजित ॥ काम रुळत तोडरी ॥१३॥ रावणें आणिल्या नारी ॥ नागिणी पद्मिणी किन्नरी ॥ ज्यांचिया पदनखांवरी ॥ भ्रमर रुंजी घालिती ॥१४॥ ऐशा सुंदरी देखत ॥ परी काममोहित नव्हे हनुमंत ॥ तो राघवप्रिय अतिविरक्त ॥ ऊर्ध्वरेता वज्रदेही ॥१५॥ घटमठांमाजी व्यापून ॥ वेगळें असे जैसें गगन ॥ तैसाचि अंजनीनंदन ॥ लोकांत वर्तूनि वेगळा ॥१६॥ स्त्रिया शोधिल्या समस्त ॥ तव मंदोदरी जेथें निद्रिस्थ ॥ तेथें येऊन हनुमंत ॥ उभा राहिला क्षणभरी ॥१७॥ सुरूप देखोनि मंदोदरी ॥ म्हणे हेचि होय विदेहकुमरी ॥ निजेली पवित्रपणें शेजेवरी ॥ पतिव्रता म्हणोनियां ॥१८॥ सतियां शिरोरत्न सीता सती ॥ परमपुरुषाची चिच्छक्ति ॥ मज आजि भेटली निश्चितीं ॥ म्हणोन मारुती नाचत ॥१९॥ तों होमविधि संपादून ॥ तेथें आला द्विपंचवदन ॥ तों मंदोदरी उठोन ॥ पाय धूत पतीचे ॥२०॥ ऐसें देखोन हनुमंत ॥ क्षोभला जैसा प्रळयकृतांत ॥ म्हणे जानकी होय यथार्थ ॥ वश्य जाहली रावणातें ॥२१॥ रामवचन आठवी मारुति ॥ सीतेचे वदनीं कर्पूरदीप्ति ॥ मग मुखाजवळी त्वरितगति ॥ मंदोदरीच्या पातला ॥२२॥ मुख तिचे अवघ्राणिलें ॥ तों दुर्गंधीनें मन विटलें ॥ म्हणे मद्यपान आहे केलें ॥ उभयवर्गीं मिळोनियां ॥२३॥ भिंतीस लावतां कान ॥ होत नाहीं रामस्मरण ॥ हे रावणासी मानली पूर्ण ॥ तेथें स्मरण कायसें ॥२४॥ तों रावण आणि मंदोदरी ॥ दोघें निजलीं शेजेवरी ॥ सुषुप्तिअवस्थेमाझारी ॥ निमग्न जाहलीं ते वेळे ॥२५॥ मनी विचारी हनुमंत ॥ या दोघांसी उचलोनि त्वरित ॥ किष्किंधेसी न्यावीं यथार्थ ॥ पाहील रघुनाथ दोघांतें ॥२६॥ किंवा घालून चंड पाषाण ॥ दोघांचे येथेंच घेऊं प्राण ॥ ऐसें विचारी वायुनंदन ॥ तंव अपूर्व वर्तलें ॥२७॥ अकस्मात गजबजोनी ॥ मंदोदरी बैसली उठोनी ॥ आक्रोशें हांक फोडोनी ॥ वक्षःस्थळ बडवित ॥२८॥ सवेंचि महाशंख करित ॥ दशकंठ धरी तिचे हात ॥ मयजा म्हणे अतित्वरित ॥ सीता द्या हो रामाची ॥२९॥ आजि विलोकिलें दुष्ट स्वप्न ॥ माझी गळसरी गेली जळोन ॥ एक बळिया वानर येऊन अशोकवन विध्वंसिलें ॥३०॥ तेणें वधिला अखया सुत ॥ समरीं गांजिला इंद्रजित ॥ घेऊन आला जनकजामात ॥ हरिदळ अद्भुत न वर्णवे ॥३१॥ शिळीं बुजोनियां सरितानाथ ॥ सुवेळेसी आला अवनिजाकांत ॥ रावण कुंभकर्ण शक्रजित ॥ वधोनि विजयी जाहला असे ॥३२॥ स्वप्न नव्हे हें ब्रह्मवचन ॥ तरी मंगळभगिनी द्या नेऊन ॥ मंगळदायक रघुनंदन ॥ त्यासी शरण जावें जी ॥३३॥ करितां परदाराभिलाष ॥ कोण पावला मागें यश ॥ मानव नव्हे राघवेश ॥ पुराणपुरुष अवतरला ॥३४॥ उदरीं बांधोनि दृढ पाषाण ॥ केवीं तरेल अगाध जीवन ॥ बळेंचि केलें विषप्राशन ॥ त्यासी कल्याण मग कैचें ॥३५॥ खदिरांगाराचे शेजेवरी ॥ कैसा प्राणी निद्रा करी ॥ महासर्पाचे मुखाभीतरीं ॥ हस्त घालितां उरे कैसा ॥३६॥ शार्दूळ करूं गेला पलाटण ॥ त्याचे जाळीमाजी जाऊन ॥ नांदेन म्हणे क्षेम कल्याण ॥ तो प्राणी कैसा वांचेल ॥३७॥ तुम्ही जरी सर्वांसी जिंकिलें ॥ परी राघवेंद्रा तैसें न चले ॥ पूर्णब्रह्म अवतरलें ॥ भक्तजन रक्षावया ॥३८॥ यालागीं द्विपंचवदना ॥ मी शरण जात्यें रघुनंदना ॥ देवोनि तयाची अंगना ॥ चुडेदान मागेन ॥३९॥ मनीं विचारी लंकापति ॥ इचें वचन सर्व मानिती ॥ नेऊन देईल सीता अवचितीं ॥ भलत्यासी आज्ञा करूनियां ॥४०॥ रावण म्हणे मंदोदरी ॥ तूं सर्वथा चिंता न करीं ॥ उदयीक नेऊन जनककुमारी ॥ जनकजामाता देईन ॥४१॥ पांचकोटी राक्षसगण ॥ अशोकवनाभोंवतें रक्षण ॥ तयांसी सांगोन पाठवी रावण ॥ रात्रंदिवस सावध असावें ॥४२॥ बिभीषण कुंभकर्ण इंद्रजित ॥ हे मयजेसी मानिती बहुत ॥ यांचा विश्वास न धरावा यथार्थ ॥ नेऊन देतील जानकीतें ॥४३॥ ऐसें समस्त वर्तमान ॥ वायुसुतें केलें श्रवण ॥ म्हणे मंदोदरी सती धन्य ॥ इच्या स्मरणें दोष नुरे ॥४४॥ तो दूतीस म्हणे दशकंधर ॥ अशोकवना जाऊनि सत्वर ॥ जनकात्मजेचा समाचार ॥ घेऊन येईं त्वरेनें ॥४५॥ तात्काळ चालिली दूती ॥ तयेमागें जाय मारुति ॥ आला अशोकवनाप्रति ॥ आनंद चित्तीं न समाये ॥४६॥ तों अशोकवृक्षाचे तळीं ॥ ध्यानस्थ बैसली मैथिली ॥ दूती परतली तात्काळीं ॥ हनुमंत तेथे राहिला ॥४७॥ जय जय रघुवीर अयोध्यानाथ ॥ म्हणोनि नाचों लागला हनुमंत ॥ म्हणे धन्य मी आजि येथ ॥ जगन्माता देखिली ॥४८॥ पुच्छा नाचवी कडोविकडी ॥ तों विटावी डोळे मोडी ॥ चक्राकार मारी उडी ॥ रामनाम गर्जोनियां ॥४९॥ चहूंकडे पाहे मारुति ॥ तों रामनामें वृक्ष गर्जती ॥ पंचभूतें पक्षी घुमती ॥ रामस्मरणें करूनियां ॥५०॥ म्हणे हे होय सीता सती ॥ पुराणपुरुषाची चिच्छक्ति ॥ सुटली कर्पूराची दीप्ती ॥ पाषाण स्मरती रामनाम ॥५१॥ मृगमदाहूनि विशेष ॥ सीतेच्या अंगींचा सुवास ॥ अशोकवन आसपास ॥ दुमदुमिलें तेणेंचि ॥५२॥ तेथें रक्षण असे त्रिजटा ॥ तिनें राघवी धरिली निष्ठा ॥ सत्संगाचा महिमा मोठा ॥ दुष्ट पापिष्ठा सद्भाव उपजे ॥५३॥ यावरी अंजनीहृदयरत्न ॥ गुप्तरूपें जवळ येऊन ॥ जानकीचे वंदोनि चरण ॥ मुद्रिका पुढें ठेविली ॥५४॥ ध्यानस्थ बैसली सीता सती ॥ मानसीं चिंती रघुपति ॥ पुढें उभा असे मारुति ॥ बद्धांजलि करूनियां ॥५५॥ इंदिरेपाशीं खगेंद्र ॥ कीं अपर्णेंसमीप नंदिकेश्वर ॥ कीं शचीपुढें जयंत पुत्र ॥ उभा ठाके प्रीतीनें ॥५६॥ असो कनकदंड पडे पृथ्वीवरी ॥ तैसा जानकीसी नमस्कारी ॥ मग अशोकवृक्षावरी ॥ राघवप्रिय ओळंघला ॥५७॥ इकडे तमालनीळ सांवळा ॥ ध्यानीं विलोकित जनकबाळा ॥ तों अवतारमुद्रिका ते वेळां ॥ सव्यकरांगुळीं दिसेना ॥५८॥ मुद्रिका न दिसे म्हणोन ॥ श्रावणारिस्नुषा उघडी नयन ॥ तों मुद्रिका पुढेंचि जाण ॥ दैदीप्यमान पडली असे ॥५९॥ मुद्रिका देखतां ते वेळीं ॥ हृदयीं आलिंगी जनकबाळी ॥ विमलांबुधारा नेत्रकमळीं ॥ जानकीच्या सूटल्या ॥६०॥ म्हणे सांडोनि रघुत्तमातें ॥ माये कैशी आलीस येथें ॥ राम आणि सौमित्रांतें ॥ त्यजोनि कोठें आलीस ॥६१॥ जगद्वंद्य तो श्रीराम ॥ जो चराचरफलांकितद्रुम ॥ त्याची वार्ता स्वस्तिक्षेम ॥ सांग मुद्रिके मजपाशीं ॥६२॥ तों त्या वनीं निशाचरी ॥ तेथें होत्या दुराचारी ॥ विक्राळरूपें ते अवसरीं ॥ सीतेजवळी धांविन्नल्या ॥६३॥ कां गे रडतीस म्हणोन ॥ पसरोनि आल्या विक्राळ वदन ॥ तुज आम्हीं भक्षूं तोडून ॥ कुटके करोन तिळप्राय ॥६४॥ कैंचा राम तमालनीळ ॥ तूं रावणासी घाली माळ ॥ राक्षसीणी करिती कोल्हाळ ॥ सीते भोंवत्या मिळोनियां ॥६५॥ बाबरझोटी भयंकर ॥ कपाळीं चर्चिला शेंदूर ॥ लंबस्तनें विशाळ उदर ॥ पर्वत माजीं सांठवती ॥६६॥ असो ऐसें देखोनि हनुमंत ॥ पुच्छ सोडी अकस्मात ॥ राक्षसिणी झोडिल्या समस्त ॥ प्राणांसी बहुत मुकल्या ॥६७॥ राक्षसिणी फिरविती डोळे ॥ पुच्छें आंवळिले दृढ गळे ॥ एक म्हणती जनकबाळे ॥ रक्षीं माते आम्हांसी ॥६८॥ निमाल्या बहु राक्षसिणी ॥ उरल्या लागती सीतेच्या चरणीं ॥ कित्येक गेल्या पळोनी ॥ दशकंठातें सांगावया ॥६९॥ हृदयीं बोध प्रगटतां जाणा ॥ भ्रांती भुली इच्छा वासना ॥ आशा मनशा तृष्णा कल्पना ॥ पळती जैशा क्षणार्धें ॥७०॥ तैशा पळाल्या निशाचरी ॥ जानकी मुद्रिकेतें विचारी ॥ शरयूतीरविहारी ॥ कोठें सांग मुद्रिके ॥७१॥ मज आलिंगितां श्रीरामचंद्र ॥ तेव्हां कंठीं न सोसेचि हार ॥ आतां गिरि कानन समुद्र ॥ दोघांमध्यें पडियेले ॥७२॥ वाल्मिकानें भाष्य कथिलें ॥ तें काय सर्व व्यर्थ गेलें ॥ एक कपि बलिया येऊन बळें ॥ लंकानगर जाळील ॥७३॥ मज देऊनि समाधान ॥ सवेंचि आणील रघुनंदन ॥ पाषाणीं समुद्र बुजवोन ॥ दशवदनासी मारील पैं ॥७४॥ तों मुद्रिका नेदी प्रतिवचन ॥ म्हणे मज कळली खूण ॥ माझ्या विरहेंकरून ॥ देह राघवें त्यागिला ॥७५॥ कीं योगियांचें ध्यानीं गुंतला ॥ कीं भक्त धांवण्या धांवला ॥ कीं सौमित्रें माघारा नेला ॥ म्यां छळिलें म्हणोनियां ॥७६॥ कृपा न करवे मजवरी ॥ तरी येऊन माझा वध करीं ॥ मी बुडाल्यें चिंतासमुद्रीं ॥ काढी बाहेरी त्वरेनें ॥७७॥ अहा रामा राजीवनेत्रा ॥ दशकंठरिपु विषकंठमित्रा ॥ पुढें पाठविली कां हे मुद्रा ॥ कोण्या विचारेंकरूनियां ॥७८॥ मृगत्वचेची कंचुकी इच्छिली ॥ हाच अन्याय घडला मुळीं ॥ म्यां पापिणीनें ते वेळीं ॥ सौमित्र वीर छळियेला ॥७९॥ म्यां साधुछळण केलें ॥ म्हणोन राक्षसां हातीं सांपडलें ॥ मजला वियोगदुःख घडलें ॥ त्याच दोषें करूनियां ॥८०॥ जे साधुछळण करिती ॥ ते मज ऐसें दुःख पावती ॥ अंती जाती अधोगती ॥ महाअनर्थी पडती ते ॥८१॥ इत्यादि भाव तये क्षणीं ॥ दावी त्रिभुवनपतीची राणी ॥ म्हणे हा देह ठेवूनि ॥ काय कारण पैं असे ॥८२॥ सीता देखोन विव्हळ ॥ वृक्षगर्भी अंजनीबाळ ॥ गायन आरंभी रसाळ ॥ राघवलीला निर्मळ जे ॥८३॥ तो साक्षात रुद्रावतार ॥ रुद्रवीणा जैसा सुस्वर ॥ तैसा कंठ अति मधुर ॥ कंपस्वर गातसे ॥८४॥ कपीचे गायन रसाळ ॥ तटस्थ जाहलें रविमंडळ ॥ पाताळ सांडोन फणिपाळ ॥ येऊ भावी तेथें पैं ॥८५॥ तटस्थ जाहला प्रभंजन ॥ वेधला चंद्राचा हरिण ॥ अशोकवनीचे द्विजगण ॥ चारा घेऊं विसरले ॥८६॥ अयोध्यापतीची राणी ॥ तल्लीन होऊन ऐके श्रवणीं ॥ अशोकवृक्षामधोनि ॥ मंजुळ ध्वनि उमटत ॥८७॥ जो अजअजित निर्गुण ॥ कमलमित्रकुळभूषण ॥ भक्तहृदयमिलिंद पूर्ण ॥ जलदवर्ण जलजाक्ष ॥८८॥ जो मंगलधाम मंगळकारक ॥ जो मंगलभगिनीप्राणनायक ॥ मंगलजननीउद्धारक ॥ प्रतापार्क श्रीराम ॥८९॥ जो द्विपंचमुखदर्पहरण ॥ जो चंडीशकोदंडप्रभंजन ॥ भवगजविदारण पंचानन ॥ नरवीरांतक जो ॥९०॥ जानकी जयाची चित्कळा ॥ रची अनंत ब्रह्मांडमाळा ॥ तो रघुवीर परब्रह्मपुतळा ॥ अतर्क्य लीला जयाची ॥९१॥ सच्चिदानंदतनु निष्कलंक ॥ पितृआज्ञाप्रतिपालक ॥ जो मायाचक्रचालक ॥ जगद्वंद्य जगद्गुरु ॥९२॥ जो पंचमहाभूतां वेगळा साचार ॥ तो पंचवटीवासी रघुवीर ॥ तेथें द्विपंचवदन सत्वर ॥ कपटमृग घेवोनि गेला ॥९३॥ तो द्विपंचवदन दुराचार ॥ पर्णकुटींत प्रवेशला तस्कर ॥ भूगर्मींचे रत्न सुंदर ॥ हरोनि नेलें क्षण न लागतां ॥९४॥ त्या तस्कराचा मार्ग काढीत ॥ किष्किंधेसी आला जनकजामात ॥ शक्रसुत वधोनि अकस्मात ॥ अर्कज राज्यीं स्थापिला ॥९५॥ त्या सीतावल्लभाचा किंकर ॥ दासानुदास एक वानर ॥ तेणें गांजोनि लंकानगर ॥ अशोकवना आला असे ॥९६॥ ऐसें ऐकतां गायन ॥ आनंदमय भूतनयेचें मन ॥ मग वृक्षाजवळीं उभी राहून ॥ करी नमन तयातें ॥९७॥ म्हणे धन्य धन्य तूं तरुवरा पूर्ण ॥ कोण करी तुजमाजी कीर्तन ॥ त्याचें पाहीन मी वदन ॥ धरीन चरण आदरें ॥९८॥ जो करितो तुजमाजी कीर्तन ॥ त्याची जननी धन्य धन्य ॥ त्यासी सदा असो कल्याण ॥ नलगे विघ्न कल्पांतीं ॥९९॥ ज्यासी रामकीर्तन आवडे ॥ त्यासी सांकडें कदा न पडे ॥ चारी मुक्ति तयापुढें ॥ दासी होऊनि राबती ॥१००॥ ऐसें जगन्माता बोलत ॥ तों उगाचि राहिला हनुमंत ॥ न बोले कांहीच मात ॥ पाहे तटस्थ जानकी ॥१॥ म्हणे येथें कापट्य पूर्ण ॥ कोण करितो न कळे कीर्तन ॥ बाहेर न भेटे येऊन ॥ तरी आतां प्राण सांडीन मी ॥२॥ अत्यंत कृश जाहली गोरटी ॥ मुद्रिका घातली मनगटीं ॥ म्हणे अयोध्यापति जगजेठी ॥ नव्हे भेटी तुझी आतां ॥३॥ मग जनकात्मजेनें ते वेळां ॥ वेणीदंड वेगें काढिला ॥ त्याचा गळां पाश घातला प्राणत्यागाकारणें ॥४॥ म्हणे अयोध्यापति तुजविण ॥ मी क्षण एक न ठेवीं प्राण ॥ ऐसें बोलोनियां वचन ॥ जनकात्मजा सरसावली ॥५॥ वेणीदंड काढोनि ॥ वृक्षडाहळीये बांधी तये क्षणीं ॥ राघवप्रिय तें देखोनि ॥ बहुत मनीं गजबजिला ॥६॥ जानकी त्यागील प्राणा ॥ मग काय सांगों रघुनंदना ॥ भरताग्रजा जगन्मोहना ॥ धांवें लौकरी ये वेळे ॥७॥ अंतरीं आठविले रामचरण ॥ बुद्धिप्रर्वतक म्हणोन ॥ मग तैसेंचि केलें उड्डाण ॥ गगनपंथें ते वेळां ॥८॥ अंजनी आत्मज ते वेळां ॥ गर्जोनि म्हणे पैल श्रीराम आला ॥ ऐसें बोलतां जनकबाळा ॥ ऊर्ध्वपंथें विलोकी ॥९॥ मारुती खालीं उतरून ॥ करिता जाहला साष्टांग नमन ॥ जगन्माता बोले वचन ॥ हो कल्याण चंद्रार्कवरी ॥११०॥ जोडोनियां दोनी कर ॥ उभा राहिला समोर ॥ म्हणे कल्याणरूप रघुवीर ॥ किष्किंधेसी सुखी असे ॥११॥ मी श्रीरामाचा अनुचर ॥ हनुमंतनामा वायुकुमर ॥ माते तुजकारणें लंकानगर ॥ धांडोळिलें सर्वही ॥१२॥ सीतेसी आनंद जाहला थोर ॥ जैसा बहुत दिवस गेला कुमर ॥ तो भेटतां हर्ष अपार ॥ तैसी निर्भय जाहली ॥१३॥ अवृष्टीं वर्षे घन ॥ कीं मृत्युसमयीं सुधारसपान ॥ कीं दुष्काळिया दर्शन ॥ क्षीरसिंधूचें जाहलें ॥१४॥ असो पंचवटीपासोन वर्तमान ॥ रामें लीला केली जी पूर्ण ॥ ती सीतासतीस वायुनंदन ॥ कथिता जाहला ते वेळीं ॥१५॥ जटायु उद्धरोनि कबंध वधिला ॥ वाळी मारोनि सुग्रीव स्थापिला ॥ तो अपार मेळवून हरिमेळा ॥ साह्य जाहला श्रीरामा ॥१६॥ आठवोन तव गुण स्वरूप ॥ राम सर्वदा करी विलाप ॥ श्वापदें पाषाण पादप ॥ सीता म्हणोनि आलिंगी ॥१७॥ तुवां जे अलंकार टाकिले ॥ ते म्यां श्रीरामापुढें ठेविले ॥ रामें शोक केला ते वेळे ॥ तो मज सर्वथा न वर्णवे ॥१८॥ तुजकारणें सौमित्र ॥ दुःखभरित अहोरात्र ॥ जैशी मातेची वाट निरंतर ॥ बाळक पाहे प्रीतीनें ॥१९॥ ऐसा ऐकतां समाचार ॥ जानकीस दाटला गहिंवर ॥ म्हणे परम कृपाळू रघुवीर ॥ मजकारणें शिणतसे ॥१२०॥ अयोध्येहूनि येतां हनुमंता ॥ मी मागें राहें चालतां ॥ श्रीराम तरूखालीं तत्वतां ॥ उभे राहती मजकारणें ॥२१॥ बहु श्रमलीस म्हणोन ॥ राम कुरवाळी माझें वदन ॥ बोलतां सीतेसी आलें रुदन ॥ सद्रद होऊन स्फुदतसे ॥२२॥ जानकीस म्हणे हनुमंत ॥ आतां शोक करिसी किमर्थ ॥ सत्वर येईल रघुनाथ ॥ दखमुखासी वधावया ॥२३॥ तूं आदिपुरुषाची चिच्छक्ति ॥ प्रणवरूपिणी मूळप्रकृति ॥ तुझे आज्ञेनें वर्तती ॥ विरिंचि रुद्र इंद्रादि ॥२४॥ भक्त तारावया निर्धारीं ॥ दोघें अवतरलां पृथ्वीवरी ॥ आधीं वियोग दोघांभीतरीं ॥ जाहलाचि नाहीं तत्वतां ॥२५॥ यावरी भूमिजा बोले वचन ॥ तूं श्रीरामाचा विश्वासी पूर्ण ॥ तुजप्रति अंतरखूण ॥ राघवें काय सांगितली ॥२६॥ येरू म्हणे कैकयीगृहांतरीं ॥ ताटिकांतकें आपुले करीं ॥ तुज वल्कलें नेसविली निर्धारीं ॥ खूण साचार ओळखें ही ॥२७॥ ऐसें ऐकतां जनकदुहिता ॥ म्हणे सखया हनुमंता ॥ तूं श्रीरामाचा पूर्ण आवडता ॥ कोटिगुणें अससी कीं ॥२८॥ परी तूं दिससी सूक्ष्म ॥ ऐसेच असतील प्लवंगम ॥ तरी हें लंकानगर दुर्गम ॥ तुम्हां कैसें आटोपे ॥२९॥ ऐसें सीतेचें वचन ऐकिलें ॥ हनुमंतें भीमरूप प्रकट केलें ॥ मंदाराचळातुल्य देखिलें ॥ विशाळ रूप मारुतीचें ॥१३०॥ कीं महामेरुचि अद्भुत ॥ कीं राक्षस वधावया समस्त ॥ अवतरला प्रळयकृतांत ॥ वानरवेष धरोनियां ॥३१॥ ऐसा देखानि रुद्रावतार ॥ सीता म्हणे हा केवळ ईश्वर ॥ रामकार्यालागीं निर्धार ॥ अवतरला येणें रूपें ॥३२॥ हनुमंत म्हणे महासती ॥ हे लंका घालीन पालथी ॥ परी कोपेल त्रिभुवनपति ॥ आज्ञा दिधली नाहीं मज ॥३३॥ जगन्माते मंगळभगिनी ॥ मजहूनियां प्रतापतरणी ॥ ऐसे वानर किष्किंधाभुवनीं ॥ रामाजवळी आहेत ॥३४॥ जांबुवंत नळ नीळ रविकुमर ॥ रणपंडित प्रतापशूर ॥ काळासी शिक्षा करणार ॥ राघवासवें असती पैं ॥३५॥ सीता म्हणे हनुमंतासी ॥ एवढा सागर कैसा तरलासी ॥ येरू म्हणे मुद्रेनें अनायासीं ॥ आणिलें मज ऐलतीरा ॥३६॥ मार्गीं जाहले श्रम बहुत ॥ तुझे दर्शन हरले समस्त ॥ परी जाहलों असें क्षुधाक्रांत ॥ फळें येथें दिसती बहु ॥३७॥ परहस्त ज्यास स्पर्शित ॥ तें सर्वथा नेघें मी निश्चित ॥ आतां आज्ञा दीजे त्वरित ॥ निजहस्तें घेईन मी ॥३८॥ उपरी बोले श्रीरामललना ॥ समीर स्पर्शो न शके या वना ॥ साठी सहस्र राक्षस रक्षणा ॥ ठेविले येथें लंकेशें ॥३९॥ हनुमंत ऐकतां ते अवसरीं ॥ गडबडां लोळे धरणीवरी ॥ फळआहाराविण बाहेरी ॥ निघों पाहती प्राण माझे ॥१४०॥ अहा मध्येंच आलें मरण ॥ अंतरले रघुपतीचे चरण ॥ आतां सीताशुद्धि सांगेल कोण ॥ कौसल्यात्मजासी जाऊनियां ॥४१॥ सफळ वृक्ष देखोन दृष्टीं ॥ माझें चित्त होतसे कष्टीं ॥ ऐसें वाटतसे पोटीं ॥ वनचि अवघें सांठवावें ॥४२॥ ऐसें बोलतां हनुमंत ॥ क्षण एक पडला निचेष्टित ॥ नेत्र गरगरां भोवंडित ॥ मुख पसरी फळांलागीं ॥४३॥ ऐसें देखोनि ते वेळीं ॥ जगन्माता सद्गदित जाहली ॥ अहा म्हणोन धांविन्नली ॥ कुरवाळित कृपाकरें ॥४४॥ म्हणे कपींद्रा उठीं उठीं ॥ पडली फळें तरुतळवटीं ॥ तीं पाहोनि एक मुष्टी ॥ घेईं उदरतृप्तीपुरतींच ॥४५॥ बा रे वरी चढसी जाण ॥ तरी तुज माझी असे आण ॥ पडलीं फळें ती वेंचून ॥ उदरनिर्वाह करीं कां ॥४६॥ ऐसें सीता बोलतां वचन ॥ मारुति उठिला झडकरून ॥ चरण धरी धांवोन ॥ म्हणे प्रमाण आज्ञा तुझी ॥४७॥ मग जे वृक्ष करिती रामस्मरण ॥ सीतेवरी छाया केली सघन ॥ ते रामउपासक पूर्ण ॥ करी वंदन कपि त्यांतें ॥४८॥ जो रामउपासक निर्मळ ॥ त्यासी विघ्न करूं न शके काळ ॥ म्हणोनि अंजनीचा बाळ ॥ तरु ते सकळ रक्षीत ॥४९॥ जे तरु न करिती रामस्मरण ॥ तेच उपटिले मुळींहून ॥ भुजाबळें त्राहाटून ॥ उर्वीवरी झोडिले ॥१५०॥ मग पडलीं फळें एकवटोनी ॥ हस्तद्वयें टाकी वदनीं ॥ हनुवटी हाले तेक्षणीं ॥ फळे तांतडी चावितां ॥५१॥ चंचळ दृष्टी करून ॥ मागें पुढें पाहे अवलोकून ॥ तंव ते वनरक्षक संपूर्ण ॥ निद्रार्णवीं बुडाले ॥५२॥ राक्षसांनी मद्य प्राशिलें ॥ हनुमंतें वन विध्वंसिलें ॥ पुढें पुच्छें उपडोनि आणिले ॥ वृक्ष भोंवते सर्वही ॥५३॥ हनुमंत बैसे फलहारासी ॥ पुच्छ पाहुणेर करी तयासी ॥ न सोडी बैसल्या ठायासी ॥ आपोशन मोडे म्हणोनी ॥५४॥ पुच्छासी हनुमंत बोले ॥ गोड गोड आणीं कां फळें ॥ आजि त्वां तृप्त आम्हां केलें ॥ चिरंजीव राहे तूं ॥५५॥ नंदनवनाहून सुंदर ॥ अशोकवनींचे तरुवर ॥ फणस इक्षुदंड लवंग परिकर ॥ उपडी समग्र एकदांचि ॥५६॥ केळी नारळी देवदार ॥ जंबू कपित्थ अंजीर ॥ ज्याचें रस लागती मधुर ॥ हनुमंतवीर सेवितसे ॥५७॥ असो तरुवर लक्षकोडी ॥ भुजाबळें उर्वीवरी झोडी ॥ राघव स्मरणें तांतडी ॥ फळें वदनीं टाकीतसे ॥५८॥ हनुमंत करीत यजन ॥ रामनाममंत्रेंकरून ॥ वदनकुंडीं आहुती पूर्ण ॥ घालोनि जठराग्नि तृप्त करी ॥५९॥ सीतेनें घातली आपुली आण ॥ वृक्षावरी न चढावें पूर्ण ॥ यालागीं वृक्ष झोडोन ॥ फळें पाडी धरणीये ॥१६०॥ जैसी कां चपळा कडाडी ॥ तैसें पुच्छ वृक्ष मोडी ॥ तों राक्षस उठले तांतडी ॥ भीम कोल्हाळ करितचि ॥६१॥ चक्रें डांगा भिंडिमाळा ॥ घेऊन धांवले एकवेळां ॥ सीताशोकहरण कोंडिला ॥ सकळीं मिळोन एकदांचि ॥६२॥ वृषभीं कोंडिला महाव्याघ्र ॥ कीं बहुत विखारी खगेंद्र ॥ कीं शृगालीं वेढिला मृगेंद्र ॥ खद्योत दिनकरा धरूं म्हणती ॥६३॥ कीं मंथूनि सागर द्विज ॥ धरूं म्हणती प्रळयबीज ॥ कीं आर्द्रमृत्तिकेचे गज ॥ प्राशूं म्हणती जळसिंधु ॥६४॥ कर्पूरपुतळे म्हणती एकवेळां ॥ धरोनि आणूं वडवानळा ॥ मक्षिका मिळोनि सकळा ॥ भूगोल उचलूं भाविती ॥६५॥ उष्ट्रांनी ब्रीद बांधोन ॥ तुंबरापुढें मांडिलें गायन ॥ कीं वृश्चिक पुच्छेंकरून ॥ ताडीन म्हणे वज्रातें ॥६६॥ तैसे हनुमंतावरी वनरक्षक ॥ एकदांच धांवले सकळिक ॥ यावरी लोकप्राणेशबाळक ॥ काय करिता जाहला ॥६७॥ विशाळ वृक्ष उपडोनी ॥ सव्य करीं घेत तेच क्षणीं ॥ जैसा पावक शुष्कवनीं ॥ संहारी तैसा राक्षसां ॥६८॥ साठीं सहस्र वनपाळ ॥ पुच्छें भारे बांधिले सकळ ॥ फिरवूनियां तात्काळ ॥ भूमीवरी आपटिले ॥६९॥ जैसीं तुंबिनीचीं ओलीं फळें ॥ बळें आपटितां होतीं शकलें ॥ तैसे वनरक्षक ते वेळे ॥ चूर्ण जाहले सकळही ॥१७०॥ सवेंच समुद्रजीवनीं ॥ प्रेतें देत भिरकावूनी ॥ भुभुःकारें गर्जे तो ध्वनी ॥ गगनगर्भीं न समाये ॥७१॥ घायाळें उरलीं किंचित ॥ तीं रावणासमीप आलीं धांवत ॥ म्हणती एक वानर अद्भुत ॥ अशोकवनीं प्रगटला ॥७२॥ सकळ वन विध्वंसून ॥ वनरक्षक मारिले संपूर्ण ॥ ऐसें राक्षसेंद्रें परिसोन ॥ परम विषाद पावला ॥७३॥ तेव्हां ऐशीं सहस्र महावीर ॥ प्रेरिता झाला दशकंधर ॥ म्हणे धरोनि आणा रे वानर ॥ नानायत्नें करूनियां ॥७४॥ जरी नाटोपे तुम्हांलागून ॥ तरी मज दावूं नका वदन ॥ ऐशीं सहस्र पिशिताशन ॥ गर्जत वना पातले ॥७५॥ नानाशस्त्रें घेतलीं हातीं ॥ हांकें निराळ गाजविती ॥ ऐसें देखोन मारुति ॥ विशाळरूप जाहला ॥७६॥ जैसा मंदराचळ विशाळ ॥ तैसा दिसे अंजनीबाळ ॥ वासुकी ऐसें पुच्छा सबळ ॥ लंबायमान सोडिलें ॥७७॥ लंकेचे महाद्वारींची अर्गळा ॥ लोहबंदी वेष्टिला ते वेळां ॥ मारुति मारीत उठिला ॥ सिंहनादें गर्जत ॥७८॥ वृक्षावरी पक्षी उडोनी ॥ प्रातःकाळीं भरती गगनीं ॥ तैशीं अरिमस्तकें तुटोनि ॥ उसळोन धरणीं पडताती ॥७९॥ बांधोनी शत्रुसमुदायभार ॥ गगनीं फिरवी वायुकुमर ॥ आपटितां होती चूर ॥ करचरणादि अवयव ॥१८०॥ तों त्यांत मुख्य जंबुमाळी ॥ हांका देत पातला ते वेळीं ॥ म्हणे वानरा रणमंडळीं ॥ तुज आजि मारीन ॥८१॥ शूल घेवोनि ते वेळां ॥ बळें मारुतीवरी धांविन्नला ॥ तों हनुमंतें लत्ताप्रहार दिधला ॥ कोथळा फुटला तयाचा ॥८२॥ जैसें शस्त्र बैसतां प्रबळ ॥ चूर्ण होय फणसफळ ॥ कीं वज्रघातें महाशैल ॥ चूर्ण जैसा होय पैं ॥८३॥ ऐसा जंबुमाळी पडला ॥ चिरोन हनुमंतें भिरकाविला ॥ दशमुखास समाचार कळला ॥ अत्यंत कोपला ते काळीं ॥८४॥ मग पाठविले लक्ष वीर ॥ पांच सेनाधीश मुख्य थोर ॥ मल्ल प्रतिमल्लनामें असुर ॥ प्रचंड चंड जघन पैं ॥८५॥ रावणाची आज्ञा घेऊन ॥ वेगें पावला अशोकवना ॥ हें देखोन वायुनंदन ॥ अर्गळा हातीं तुळीतसे ॥८६॥ करोनि पुच्छाचें उखळ ॥ हातीं घेऊनि लोहमुसळ ॥ कांडीतसे लंकेशाचें दळ ॥ साळीऐसें तेधवां ॥८७॥ असुरदेह पडती अचेतन ॥ हाचि साळींचा कोंडा झाडून ॥ सूक्ष्मदेह तांदूळ पूर्ण ॥ जात उद्धरोनि कपिहस्तें ॥८८॥ करकरां कपि दाढा खात ॥ नेत्र गरगरां भोवंडित ॥ शस्त्रास्त्रें अवघे वर्षत ॥ पिशिताशन ऊठती ॥८९॥ मेरूऐसा सबळ ॥ जातां अंजनीचा बाळ ॥ तो तेथें देंखिलें देऊळ ॥ सहस्रस्तंभमंडित ॥१९०॥ तेथें रावणें देवी स्थापिली ॥ ब्राह्मणाचा देत नित्य बळी ॥ वायुसुतें ते वेळीं ॥ तें विदारिलें देवालय ॥९१॥ पायासकट उपडोन ॥ आकाशपंथें देत भिरकावून ॥ दशदिशांसी गेले पाषाण ॥ पक्ष्यांऐसे उडोनियां ॥९२॥ असो यावरी हनुमंतें ॥ लोहार्गळा घेवोनि हातें ॥ मांडिलें वीरकंदनातें ॥ गीत रामाचें गातसे ॥९३॥ अशोकवन तेचि खळें ॥ माजी वीरधान्य रगडिलें ॥ हनुमंत तिवडा मध्यें बळें ॥ पुच्छ फिरवीतसे ॥९४॥ तया खळियाजवळी ॥ खेचरदेवी जनकबाळी ॥ महावीरांचे दिधले बळी ॥ राशी केल्या शिरांच्या ॥९५॥ रेणुकेच्या कैवारें फरशधरें ॥ सर्व क्षत्रियांची छेदिलीं शिरें ॥ तैसें सीतेकारणें राघवकिंकरें ॥ संहारिले यामिनीचर ॥९६॥ असो हनुमंत ते वेळां ॥ असुर पुच्छें करूनि गोळा ॥ आपटोनि समुद्रजळा माजी निक्षेपी साक्षेपें ॥९७॥ लक्ष वीर संहारिले ॥ मग सात पुत्र पाठविले ॥ तेही हनुमंतें चूर्ण केले ॥ अर्गळाघातेंकरूनियां ॥९८॥ हांक गेली रावणापाशीं ॥ वानरें संहारिलें समस्तांसी ॥ मग पाठविलें अखयासी ॥ दळभारेंसी तेधवां ॥९९॥ अखया देखोनि हनुमंत ॥ लोहर्गळा घेऊन नाचत ॥ गदगदां हंसूनि बोलत ॥ लंकेशात्मजासी तेधवां ॥२००॥ अरे अखया तुझें नाम व्यर्थ ॥ जैसे अजागळींचे स्तन यथार्थ ॥ कीं मूर्खासी अलंकार घातले सत्य ॥ बधिराचे श्रोत्र जैसे कां ॥१॥ कीं गर्भांधाचे नयन ॥ व्यर्थ काय विशाळ दिसोन ॥ कीं नासिकाविण वदन ॥ नामकरण तैसें तुझें ॥२॥ रासभासी भद्रासन ॥ श्वानासी अग्रपूजामान ॥ कीं दिव्यांबर परिधान ॥ व्यर्थ प्रेतास करविलें ॥३॥ तैसें अखया नाम दशमुखें ॥ तुज ठेविलें व्यर्थ शतमुखें ॥ आतां अखया तुझा क्षणएकें ॥ क्षय करीन जाणपां ॥४॥ मग अखया धनुष्य घेऊन ॥ सोडी बाणापाठीं बाण ॥ क्षण एक वायुनंदन ॥ उगाच उभा राहिला ॥५॥ काडिया पाडतां बहुत ॥ बैसका न सांडी पर्वत ॥ कीं सुमनवृष्टीनें मदोन्मत्त ॥ खेद सहसा न मानी ॥६॥ तैसे अखयाचे बाण ॥ येतां न भंगे वायुनंदन ॥ मग लोहार्गळा घेऊन ॥ कृतांतवत धांविन्नला ॥७॥ बैसता लोहार्गळेचे घाय ॥ अखयाचा जाहला क्षय ॥ समीरात्मज पावला जय ॥ सुरसमुदाय आनंदला ॥८॥ ऐकोनि अखयाचा समाचार ॥ शोकार्णवीं पडला लंकेश्वर ॥ आसाळी राक्षस भयंकर ॥ अशोकवना धाडिली ॥९॥ दहा सहस्र गजांचें बळ ॥ उदरांत सांठवी अचळ ॥ एक योजन मुख विशाळ ॥ पसरोनियां धांविन्नली ॥२१०॥ कपाळीं चर्चिला शेंदूर ॥ बाबरझोटी भयंकर ॥ तिनें धांवोनि सत्वर ॥ वायुसुत धरियेला ॥११॥ उचलोनि घातला मुखांत ॥ दांतांसी दांत जो मेळवित ॥ तंव तों उतरला उदरांत ॥ क्षणमात्र न लागतां ॥१२॥ लंकेशासी सांगता हेर ॥ आसळीनें गिळिला वानर ॥ ऐकतां आनंदला दशशिर ॥ असुरसभेसहित पैं ॥१३॥ रावण शर्करा वांटित ॥ तों दूत आले शंख करित ॥ आसाळीचा जाहला अंत ॥ हनुमंतें पोट फोडिलें ॥१४॥ तिनं चाविला नसतां वानर ॥ सगळाचि गिळिला सत्वर ॥ यालागीं जितचि वीर ॥ उदर फोडोनि निघाला ॥१५॥ शोकाकुलित द्विपंचवदन ॥ म्हणे हें अद्भुत प्रगटलें विघ्न ॥ यावरी शक्रजित जाऊन ॥ युद्ध करील परिसा तें ॥१६॥ रामविजय ग्रंथ सुरस ॥ सुंदरकांड कौतुक विशेष ॥ श्रवण करोत सावकाश ॥ रघुवीर भक्त आदरें ॥१७॥ रविकुळमंडणा पुराणपुरुषा ॥ श्रीमद्भीमातटनिवासा ॥ ब्रह्मानंदा अविनाशा ॥ श्रीधरवरदा जगद्गुरो ॥१८॥ स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ विंशतितमोऽध्याय गोड हा ॥२१९॥ ॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥ |