श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। पञ्चसप्ततितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
दशरथ वाक्यमनाकर्ण्य परशुरामेण श्रीरामस्य वैष्णवधनुषि बाणं संधातुं प्रेरणम् - राजा दशरथाच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून परशुरामांनी श्रीरामाला वैष्णव धनुष्यावर बाण चढविण्यास ललकारणे -
राम दाशरथे वीर वीर्यं ते श्रूयतेऽद्‍भुतम् ।
धनुषो भेदनं चैव निखिलेन मया श्रुतम् ॥ १ ॥
"दशरथनन्दन रामा ! वीरा ! असे ऐकिवात आहे की तुझा पराक्रम अद्‌भुत आहे. तुझ्या द्वारा शिव धनुष्य तोडले गेल्याचा सर्व समाचारही माझ्या कानी आला आहे. ॥ १ ॥
तदद्‍भुतमचिन्त्यं च भेदनं धनुषस्तथा ।
तच्छ्रुत्वाहमनुप्राप्तो धनुर्गृह्यापरं शुभम् ॥ २ ॥
ते धनुष्य तोडणे अद्‌भुत आणि अचिंत्य आहे. ते तुटल्याची गोष्ट ऐकून मी एक दुसरे धनुष्य घेऊन आलो आहे. ॥ २ ॥
तदिदं घोरसं‍काशं जामदग्न्यं महद्धनुः ।
पूरयस्व शरेणैव स्वबलं दर्शयस्व च ॥ ३ ॥
हे आहे जमदग्निकुमार परशुरामाचे भयंकर आणि विशाल धनुष्य ! तू याला खेचून याच्यावर बाण चढव आणि आपले बल दाखव. ॥ ३ ॥
तदहं ते बलं दृष्ट्‍वा धनुषोऽप्यस्य पूरणे ।
द्वंद्वयुद्धं प्रदास्यामि वीर्यश्लाघ्यमहं तव ॥ ४ ॥
हे धनुष्य चढविण्यात तुझे बल कसे आहे हे पाहून मी तुला असे द्वंद्वयुद्ध प्रदान करीन की जे तुझ्या पराक्रमासाठी स्पृहणीय असेल." ॥ ४ ॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा राजा दशरथस्तदा ।
विषण्णवदनो दीनः प्राञ्जलिर्वाक्यमब्रवीत् ॥ ५ ॥
परशुरामाचे हे वचन ऐकून त्या समयी राजा दशरथांच्या मुखावर विषाद पसरला. ते दीनभावाने हात जोडून म्हणाले - ॥ ५ ॥
क्षत्ररोषात् प्रशान्तस्त्वं ब्राह्मणश्च महातपाः ।
बालानां मम पुत्राणामभयं दातुमर्हसि ॥ ६ ॥

भार्गवाणां कुले जातः स्वाध्यायव्रतशालिनाम् ।
सहस्राक्षे प्रतिज्ञाय शस्त्रं प्रक्षिप्तवानसि ॥ ७ ॥
"ब्रह्मन् ! आपण स्वाध्याय आणि व्रताने शोभा प्राप्त करणार्‍या भृगुवंशी ब्राह्मण कुळात उत्पन्न झाला आहात आणि स्वयंही महान् तपस्वी व ब्रह्मज्ञानी आहात. क्षत्रियांच्यावर आपला रोष प्रकट करून आपण शांत होऊन चुकला आहात. म्हणून माझ्या बालक पुत्रांना आपण अभयदान देण्याची कृपा करावी. कारण आपण इंद्राच्या समीप प्रतिज्ञा करून शस्त्राचा परित्याग केलेला आहे. ॥ ६-७ ॥
स त्वं धर्मपरो भूत्वा कश्यपाय वसुंधराम् ।
दत्त्वा वनमुपागम्य महेन्द्रकृतकेतनः ॥ ८ ॥
'या तर्‍हेने आपण धर्मात तत्पर होऊन कश्यपांना पृथ्वीचे दान करून वनात जाऊन महेंद्र पर्वतावर आश्रम बनवून राहात आहात. ॥ ८ ॥
मम सर्वविनाशाय सम्प्राप्तस्त्वं महामुने ।
न चैकस्मिन् हते रामे सर्वे जीवामहे वयम् ॥ ९ ॥
'महामुने ! (या प्रकारे शस्त्र त्यागाची प्रतिज्ञा करूनही) आपण माझा सर्वनाश करण्यासाठी कसे आला आहात ? (जर असे म्हणत असाल की माझा रोष केवळ रामावर आहे तर) एकमात्र राम मारला गेला तर आम्ही सर्व लोकही आपल्या जीवनाचा परित्याग करून टाकू" ॥ ९ ॥
ब्रुवत्येवं दशरथे जामदग्न्यः प्रतापवान् ।
अनादृत्य तु तद्वाक्यं राममेवाभ्यभाषत ॥ १० ॥
राजा दशरथ या प्रकारे बोलतच राहिले होते परंतु प्रतापी परशुरामांनी त्यांच्या वचनांची अवहेलना करून रामाशीच बोलणे चालू ठेवले. ॥ १० ॥
इमे द्वे धनुषी श्रेष्ठे दिव्ये लोकाभिपूजिते ।
दृढे बलवती मुख्ये सुकृते विश्वकर्मणा ॥ ११ ॥
ते म्हणाले - "रघुनन्दन ! ही दोन्ही धनुष्ये सर्वांत श्रेष्ठ आणि दिव्य होती. सर्व संसार यांना सन्मानाच्या दृष्टीने पहात होता. साक्षात् विश्वकर्म्याने त्यांना बनविलेले होते. ती मोठी प्रबळ आणि दृढ होती. ॥ ११ ॥
अनुसृष्टं सुरैरेकं त्र्यम्बकाय युयुत्सवे ।
त्रिपुरघ्नं नरश्रेष्ठ भग्नं काकुत्स्थ यत्त्वया ॥ १२ ॥
'नरश्रेष्ठ ! त्यांपैकी एक देवतांनी त्रिपुरासुरांशी युद्ध करण्यासाठी भगवान् शंकरांना दिले होते. ककुत्स्थनन्दन ! ज्याने त्रिपुराचा नाश झाला होता तेच ते धनुष्य होते, जे तू तोडून टाकले आहेस. ॥ १२ ॥
इदं द्वितीयं दुर्धर्षं विष्णोर्दत्तं सुरोत्तमैः ।
तदिदं वैष्णवं राम धनुः परपुरंजयम् ॥ १३ ॥
'आणि दुसरे दुर्धर्ष धनुष्य हे आहे, जे माझ्या हातात आहे. हे श्रेष्ठ देवतांनी भगवान् विष्णुंना दिले होते. श्रीरामा ! शत्रू नगरीवर विजय मिळविणारे ते हे वैष्णव धनुष्य आहे. ॥ १३ ॥
समानसारं काकुत्स्थ रौद्रेण धनुषा त्विदम् ।
तदा तु देवताः सर्वाः पृच्छन्ति स्म पितामहम् ॥ १४ ॥

शितिकण्ठस्य विष्णोश्च बलाबलनिरीक्षया ।
'ककुत्स्थ ! हेही शिवांच्या धनुष्याप्रमाणेच प्रबल आहे. त्या समयी समस्त देवतांनी भगवान् शिव आणि विष्णु यांच्या बलाबलाची परीक्षा करण्यासाठी पितामह ब्रह्मदेवांना विचारले होते की 'या दोन देवतांमध्ये कोण अधिक बलशाली आहे.' ॥ १४ १/२ ॥
अभिप्रायं तु विज्ञाय देवतानां पितामहः ॥ १५ ॥

विरोधं जनयामास तयोः सत्यवतां वरः ।
'देवतांचा हा अभिप्राय जाणून सत्यवादिंमध्ये श्रेष्ठ पितामह ब्रह्मदेवांनी त्या दोन देवतांमध्ये (शिव व विष्णु) विरोध उत्पन्न केला. ॥ १५ १/२ ॥
विरोधे च महद् युद्धमभवद् रोमहर्षणम् ॥ १६ ॥

शितिकण्ठस्य विष्णोश्च परस्परजयैषिणोः ।
'विरोध उत्पन्न झाल्यावर एक दुसर्‍याला जिंकण्याची इच्छा करण्यार्‍या शिव आणि विष्णुमध्ये फार मोठे युद्ध झाले, जे शरीरावर रोमांच उभे करणारे होते. ॥ १६ १/२ ॥
तदा तु जृम्भितं शैवं धनुर्भीमपराक्रमम् ॥ १७ ॥

हुं‍कारेण महादेवः स्तम्भितोऽथ त्रिलोचनः ।
'त्या समयी भगवान् विष्णुंच्या हुंकारमात्रे शिवाचे भयंकर बलशाली धनुष्य शिथिल झाले आणि त्रिनेत्रधारी महादेवही स्तम्भित झाले. ॥ १७ १/२ ॥
देवैस्तदा समागम्य सर्षिसङ्‍घः सचारणैः ॥ १८ ॥

याचितौ प्रशमं तत्र जग्मतुस्तौ सुरोत्तमौ ।
'तेव्हां ऋषिसमूह आणि चारणांसहित देवांनी येऊन त्या दोन्ही श्रेष्ठ देवतांना शांतीसाठी याचना केली, नंतर ते दोघे तेथे शांत झाले. ॥ १८ १/२ ॥
जृम्भितं तद् धनुर्दृष्ट्‍वा शैवं विष्णुपराक्रमैः ॥ १९ ॥

अधिकं मेनिरे विष्णुं देवाः सर्षिगणास्तथा ।
'भगवान् विष्णुच्या पराक्रमाने शिवाच्या त्या धनुष्यास शिथिल झालेले पाहून ऋषिंसहित देवतांनी भगवान् विष्णुंना श्रेष्ठ मानले. ॥ १९ १/२ ॥
धनू रुद्रस्तु संक्रुद्धो विदेहेषु महायशाः ॥ २० ॥
'त्यानंतर कुपित झालेल्या महायशस्वी रुद्रांनी बाणांसहित आपले धनुष्य राजर्षि देवराताच्या हातीं देऊन टाकले. ॥ २० ॥
देवरातस्य राजर्षेः ददौ हस्ते ससायकम् ।
इदं च वैष्णवं राम धनुः परपुरंजयम् ॥ २१ ॥

ऋचीके भार्गवे प्रादाद् विष्णुः स न्यासमुत्तमम् ।
ऋचीकस्तु महातेजाः पुत्रस्याप्रतिकर्मणः ॥ २२ ॥

पितुर्मम ददौ दिव्यं जमदग्नेर्महात्मनः ।
'रामा ! शत्रू नगरीवर विजय मिळविणारे या वैष्णव धनुष्याला भगवान् विष्णुने भृगुवंशी ऋचीकांनी प्रतिशोधाच्या भावनेने रहित आपला पुत्र आणि माझे पिता महात्मा जमदग्नि यांच्या अधिकारात हे दिव्य धनुष्य दिले. ॥ २२ १/२ ॥
न्यस्तशस्त्रे पितरि मे तपोबलसमन्विते ॥ २३ ॥

अर्जुनो विदधे मृत्युं प्राकृतां बुद्धिमास्थितः ।
'तपोबलाने संपन्न माझे पिता जमदग्नि अस्त्र-शस्त्रांचा परित्याग करून जेव्हां ध्यानस्थ बसले होते त्या समयी प्राकृत बुद्धिचा आश्रय घेणार्‍या कृतवीर्यकुमार अर्जुनाने त्यांना मारून टाकले. ॥ २३ १/२ ॥
वधमप्रतिरूपं तु पितुः श्रुत्वा सुदारुणम् ।
क्षत्रमुत्सादयं रोषाज्जातं जातमनेकशः ॥ २४ ॥
'पित्याच्या या भयंकर वधाचा, जो त्यांच्यासाठी योग्य नव्हता, समाचार ऐकून मी रोषपूर्वक वारंवार उत्पन्न झालेल्या क्षत्रियांचा अनेक वेळा संहार केला. ॥ २४ ॥
पृथिवीं चाखिलां प्राप्य कश्यपाय महात्मने ।
यज्ञस्यान्ते तदा राम दक्षिणां पुण्यकर्मणे ॥ २५ ॥
'रामा ! नंतर सार्‍या पृथ्वीवर अधिकार करून मी एक यज्ञ केला आणि त्या यज्ञाची समाप्ति झाल्यावर पुण्यकर्मा महात्मा कश्यपांना दक्षिणारूपाने ही सारी पृथ्वी देऊन टाकली. ॥ २५ ॥
दत्त्वा महेंद्रनिलयस्तपोबलसमन्वितः ।
श्रुत्वा तु धनुषो भेदं ततोऽहं द्रुतमागतः ॥ २६ ॥
'पृथ्वीचे दान करून मी महेंद्र पर्वतावर राहू लागलो आणि तेथे तपस्या करून तपोबलाने संपन्न झालो. शिवाचे धनुष्य तोडल्या गेल्याचा समाचार ऐकुन तेथून मी शीघ्रतापूर्वक येथे आलो आहे. ॥ २६ ॥
तदेवं वैष्णवं राम पितृपैतामहं महत् ।
क्षत्रधर्मं पुरस्कृत्य गृह्णीष्व धनुरुत्तमम् ॥ २७ ॥

योजयस्व धनुःश्रेष्ठे शरं परपुरंजयम् ।
यदि शक्नोषि काकुत्स्थ द्वंद्वं दास्यामि ते ततः ॥ २८ ॥
'रामा ! या प्रकारे हे महान् वैष्णव धनुष्य माझ्या पित्याच्या पितामहांच्या अधिकारात राहात आलेले आहे. आता तू क्षत्रिय धर्म समोर ठेऊन हे उत्तम धनुष्य हातात घे आणि या श्रेष्ठ धनुष्यावर असा एक बाण चढव, जो शत्रू नगरीवर विजय मिळविण्यास समर्थ होईल. जर तू असे करू शकलास तर मी तुला द्वंद्व युद्धाचा अवसर देईन. ॥ २७-२८ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे पञ्चसप्ततितमः सर्गः ॥ ७५ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा पंचाहत्तरावा सर्ग समाप्त झाला. ॥ ७५ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP