श्रीरामं प्रति भूयो भरतस्यायोध्यागमनाय राज्यग्रहणाय च प्रार्थना -
|
भरतांनी पुन्हा श्रीरामांना अयोध्येस परत येण्यासाठी आणि राज्य ग्रहण करण्यासाठी प्रार्थना -
|
एवमुक्त्वा तु विरते रामे वचनमर्थवत् ।
ततो मन्दाकिनीतीरे रामं प्रकृतिवत्सलम् ॥ १ ॥
उवाच भरतश्चित्रं धार्मिको धार्मिकं वचः ।
को हि स्यादीदृशो लोके यादृशस्त्वमरिंदम ॥ २ ॥
|
असे अर्थयुक्त वचन बोलून जेव्हा श्रीराम गप्प झाले तेव्हां धर्मात्मा भरतांनी मंदाकिनीच्या तटावर प्रजावत्सल धर्मात्मा श्रीरामांना ही विचित्र गोष्ट सांगितली - ’शत्रुदमन रघुवीर ! या जगात जसे आपण आहात तसा दुसरा कोण असू शकेल ? ॥ १-२ ॥
|
न त्वां प्रव्यथयेद् दुखं प्रीतिर्वा न प्रहर्षयेत् ।
सम्मताश्चापि वृद्धानां तांश्च पृच्छसि संशयान् ॥ ३ ॥
|
’कुठलेही दुःख आपल्याला व्यथित करू शकत नाही. कितीही प्रिय गोष्ट का असेना ती आपल्याला हर्षोत्स्फुल्ल करून शकत नाही. वृद्ध पुरुषांकडून सन्मानित होऊनही आपण त्यांना संदेहाच्या गोष्टीबद्दल विचारता. ॥ ३ ॥
|
यथा मृतस्तथा जीवन् यथासति तथा सति ।
यस्यैष बुद्धिलाभः स्यात् परितप्येत केन सः ॥ ४ ॥
|
ज्याप्रमाणे मेलेल्या जीवाचा आपल्या शरीर आदिशी काही संबंध राहात नाही, त्याचप्रमाणे तो जिवंत असतानाही शरीराच्या संबंधापासून रहित आहे. ज्याप्रमाणे वस्तुच्या अभावात तिच्याप्रति राग-द्वेष होत नाही, त्याचप्रकारे ती असतांनाही मनुष्याने राग-द्वेषापासून शून्य व्हावयास पाहिजे. ज्याला अशी विवेकयुक्त बुद्धि प्राप्त झालेली आहे त्याला संताप का बरे होईल ? ॥ ४ ॥
|
परावरज्ञो यश्च स्यात् यथा त्वं मनुजाधिप ।
स एवं व्यसनं प्राप्य न विषीदितुमर्हति ॥ ५ ॥
|
’नरेश्वर ! ज्याला आपल्या प्रमाणेच आत्मा आणि अनात्मा यांचे ज्ञान आहे, तोच संकटात पडल्यावरही विषाद करू शकत नाही. ॥ ५ ॥
|
अमरोपमसत्त्वस्त्वं महात्मा सत्यसङ्गरः ।
सर्वज्ञः सर्वदर्शी च बुद्धिमांश्चासि राघव ॥ ६ ॥
|
राघव ! आपण देवतांप्रमाणे सत्त्वगुणांनी संपन्न, महात्मा, सत्यप्रतिज्ञ, सर्वज्ञ, सर्वांचे साक्षी आणि बुद्धिमान आहात. ॥ ६ ॥
|
न त्वामेवंगुणैर्युक्तं प्रभवाभवकोविदम् ।
अविषह्यतमं दुःखमासादयितुमर्हति ॥ ७ ॥
|
’अशा उत्तम गुणांनी युक्त आणि जन्म-मरणाचे रहस्य जाणणार्या आपल्या जवळ असह्य दुःख येऊच शकत नाही. ॥ ७ ॥
|
प्रोषिते मयि यत् पापं मात्रा मत्कारणात् कृतम् ।
क्षुद्रया तदनिष्टं मे प्रसीदतु भवान् मम ॥ ८ ॥
|
जेव्हां मी परदेशात होतो, त्या समयी नीच विचार ठेवणार्या माझ्या मातेने माझ्यासाठी जे पाप करून ठेवले, ते मला अभीष्ट नाही. म्हणून आपण तिला क्षमा करून माझ्यावर प्रसन्न व्हावे. ॥ ८ ॥
|
धर्मबन्धेन बद्धोऽस्मि तेनेमां नेह मातरम् ।
हन्मि तीव्रेण दण्डेन दण्डार्हां पापकारिणीम् ॥ ९ ॥
|
’मी धर्माच्या बंधनात बांधला गेलो आहे, म्हणून त्या पाप करणार्या आणि दंडनीय मातेला कठोर दण्ड देऊन मारून टाकू शकत नाही. ॥ ९ ॥
|
कथं दशरथाज्जातः शुद्धाभिजनकर्मणः ।
जानन् धर्ममधर्मं च कुर्यां कर्म जुगुप्सितम् ॥ १० ॥
|
ज्यांचे कुल आणि कर्म दोन्ही शुभ होते, त्या महाराज दशरथांपासून उत्पन्न होऊन धर्म आणि अधर्म जाणत असूनही मी मातृवधरूपी लोकनिंदित कर्म कसे करू ? ॥ १० ॥
|
गुरुः क्रियावान् वृद्धश्च राजा प्रेतः पितेति च ।
तातं न परिगर्हेऽहं दैवतं चेति संसदि ॥ ११ ॥
|
’महाराज ! माझे गुरु, श्रेष्ठ यज्ञकर्म करणारे, वयोवृद्ध राजा, पिता आणि देवताही राहात आले आहेत आणि या समयी परलोकवासी होऊन चुकले आहेत. म्हणून या भर सभेत मी त्यांची निंदा करीत नाही. ॥ ११ ॥
|
को हि धर्मार्थयोर्हीनमीदृशं कर्म किल्बिषम् ।
स्त्रियाः प्रियचिकीर्षुः सन् कुर्याद् धर्मज्ञ धर्मवित् ॥ १२ ॥
|
धर्मज्ञ रघुनंदन ! कोण असा मनुष्य आहे, जो धर्मास जाणत असूनही स्त्रीचे प्रिय करण्याच्या इच्छेने असे धर्म आणि अर्थहीन कुत्सित कर्म करू शकेल ? ॥ १२ ॥
|
अन्तकाले हि भूतानि मुह्यन्तीति पुराश्रुतिः ।
राज्ञैवं कुर्वता लोके प्रत्यक्षा सा श्रुतिः कृता ॥ १३ ॥
|
लोकात एक प्राचीन म्हण आहे, की अंतकाली सर्व प्राणी मोहित होऊन जातात. त्यांची बुद्धि नष्ट होते. राजा दशरथांनी असे कठोर कर्म करून ती समजूत सत्य करून (समजुतीची सत्यता) प्रत्यक्ष करून दाखविली आहे. ॥ १३ ॥
|
साध्वर्थमभिसंधाय क्रोधान्मोहाच्च साहसात् ।
तातस्य यदतिक्रान्तं प्रत्याहरतु तद् भवान् ॥ १४ ॥
|
पित्याने क्रोध, मोह आणि साहसामुळे नीट समजूनही जे धर्माचे उल्लंघन केले आहे, ते आपण पालटून टाका; त्याचे संशोधन करून टाका. ॥ १४ ॥
|
पितुर्हि समतिक्रान्तं पुत्रो यः साधु मन्यते ।
तदपत्यं मतं लोके विपरीतमतोऽन्यथा ॥ १५ ॥
|
’जो पुत्र पित्याने केलेली चूक सुधारतो, त्यालाच लोकात उत्तम संतान मानले जाते. जो याच्या विपरीत आचरण करतो तो पित्याची श्रेष्ठ संतति नव्हे. ॥ १५ ॥
|
तदपत्यं भवानस्तु मा भवान् दुष्कृतं पितुः ।
अति यत् तत् कृतं कर्म लोके धीरविगर्हितम् ॥ १६ ॥
|
’म्हणून आपण पित्याचे योग्य संतानच बनून राहावे. त्यांच्या अनुचित कर्माचे समर्थन करू नये. त्यांनी या वेळी जे काही केले आहे ते धर्माच्या सीमेच्या बाहेर आहे. संसारात धीर पुरुष त्याची निंदा करीत असतात. ॥ १६ ॥
|
कैकेयीं मां च तातं च सुहृदो बान्धवांश्च नः ।
पौरजानपदान् सर्वांस्त्रातुं सर्वमिदं भवान् ॥ १७ ॥
|
’कैकेयी, मी, पिता, सुहृदगण, बंधु-बांधव, पुरवासी तसेच राष्ट्रातील प्रजा या सर्वांच्या रक्षणसाठी आपण माझी प्रार्थना स्वीकारावी. ॥ १७ ॥
|
क्व चारण्यं क्व च क्षात्रं क्व जटाः क्व च पालनम् ।
ईदृशं व्याहतं कर्म न भवान् कर्तुमर्हति ॥ १८ ॥
|
’कोठे वनवास आणि कोठे क्षात्रधर्म ? कोठे जटाधारण आणि कोठे प्रजापालन ? अशी परस्परविरोधी कर्मे आपण करता कामा नयेत. ॥ १८ ॥
|
एष हि प्रथमो धर्मः क्षत्रियस्याभिषेचनम् ।
येन शक्यं महाप्राज्ञ प्रजानां परिपालनम् ॥ १९ ॥
|
महाप्राज्ञ ! क्षत्रियासाठी पहिला धर्म हाच आहे की त्याचा राज्यावर अभिषेक व्हावा, ज्यायोगे तो प्रजेचे उत्तम प्रकारे पालन करू शकेल. ॥ १९ ॥
|
कश्च प्रत्यक्षमुत्सृज्य संशयस्थमलक्षणम् ।
आयतिस्थं चरेद् धर्मं क्षत्रबन्धुरनिश्चितम् ॥ २० ॥
|
’भले असा कोण क्षत्रिय असेल की जो प्रत्यक्ष सुखाच्या साधनभूत प्रजापालनरूपी धर्माचा परित्याग करून संशयात स्थित, सुखाच्या लक्षणांनी रहित, भविष्यात फळ देणार्या अनिश्चित धर्माचे आचरेण करेल ? ॥ २० ॥
|
अथ क्लेशजमेव त्वं धर्मं चरितुमिच्छसि ।
धर्मेण चतुरो वर्णान् पालयन् क्लेशमाप्नुहि ॥ २१ ॥
|
’जर आपण क्लेशसाध्य धर्माचेच आचरण करू इच्छित असाल तर धर्मानुसार चार्ही वर्णांची पालन करीतच कष्ट सोसावेत. ॥ २१ ॥
|
चतुर्णामाश्रमाणां हि गार्हस्थ्यं श्रेष्ठमुत्तमम् ।
आहुर्धर्मज्ञ धर्मज्ञास्तं कथं त्यक्तुमर्हसि ॥ २२ ॥
|
’धर्मज्ञ ! धर्माचे ज्ञाते पुरुष चार्ही आश्रमात गार्हस्थालाच श्रेष्ठ मानतात, मग आपण त्याचा परित्याग का करू इच्छित आहात ? ॥ २२ ॥
|
श्रुतेन बालः स्थानेन जन्मना भवतो ह्यहम् ।
स कथं पालयिष्यामि भूमिं भवति तिष्ठति ॥ २३ ॥
|
’मी शास्त्रज्ञान आणि जन्मजात अवस्था, दोन्ही दृष्टीनी आपल्यापेक्षा बालक आहे. मग आपण असताना मी वसुधेचे पालन कसे करू ? ॥ २३ ॥
|
हीनबुद्धिगुणो बालो हीनस्थानेन चाप्यहम् ।
भवता च विनाभूतो न वर्तयितुमुत्सहे ॥ २४ ॥
|
’मी बुद्धि आणि गुण दोन्ही दृष्टीने हीन आहे, बालक आहे. तसेच माझे स्थानही आपल्यापेक्षा फारच लहान आहे म्हणून मी आपल्याशिवाय जीवन धारणही करू शकत नाही, राज्याचे पालन तर फारची दूरची गोष्ट आहे. ॥ २४ ॥
|
इदं निखिलमप्यग्रं राज्यं पित्र्यमकण्टकम् ।
अनुशाधि स्वधर्मेण धर्मज्ञ सह बान्धवैः ॥ २५ ॥
|
धर्मज्ञ रघुनंदन ! पित्याचे हे सारे राज्य श्रेष्ठ आणि निष्कण्टक आहे, म्हणून आपण बंधु बांधवांसहित स्वधर्मानुसार याचे पालन करावे. ॥ २५ ॥
|
इहैव त्वाऽभिषिञ्चन्तु सर्वाः प्रकृतयः सह ।
ऋत्विजः सवसिष्ठाश्च मन्त्रवन्मन्त्रकोविदाः ॥ २६ ॥
|
मंत्रज्ञ रघुवीर ! मंत्रांचे ज्ञाता महर्षि वसिष्ठ आदि सर्व ऋत्विज, तसेच मंत्री, सेनापति आणि प्रजा आदि सर्व प्रकृति येथे उपस्थित आहेत. हे सर्व लोक येथेच आपला राज्याभिषेक करोत. ॥ २६ ॥
|
अभिषिक्तस्त्वमस्माभिरयोध्यां पालने व्रज ।
विजित्य तरसा लोकान् मरुद्भिरिव वासवः ॥ २७ ॥
|
आम्हां सर्वांकडून अभिषिक्त होऊन आपण मरुद्गणांकडून अभिषिक्त झालेल्या इंद्राप्रमाणे प्रेमपूर्वक सर्व लोकांना जिंकून प्रजेचे पालन करण्यासाठी अयोध्येला चलावे. ॥ २७ ॥
|
ऋणानि त्रीण्यपाकुर्वन् दुर्हृदः साधु निर्दहन् ।
सुहृदस्तर्पयन् कामैस्त्वमेवात्रानुशाधि माम् ॥ २८ ॥
|
’तेथे सर्व देवता, ऋषि आणि पितरांचे ऋण चुकते करावे. दुष्ट शत्रूंचे उत्तम प्रकारे दमन करून तसेच मित्रांना त्यांच्या इच्छेनुसार वस्तुंच्या द्वारा संतुष्ट करीत आपणच अयोध्येत मला धर्माचे शिक्षण देत राहावे. ॥ २८ ॥
|
अद्यार्य मुदिताः संतु सुहृदस्तेऽभिषेचने ।
अद्य भीताः पलायन्तु दुष्प्रदास्ते दिशो दश ॥ २९ ॥
|
’आर्य ! आपला अभिषेक संपन्न झाल्यावर सुहृद्गण प्रसन्न होवोत, आणि दुःख देणारे आपले शत्रु भयभीत होऊन दाही दिशांमध्ये पळून जावोत. ॥ २९ ॥
|
आक्रोशं मम मातुश्च प्रमृज्य पुरुषर्षभ ।
अद्य तत्रभवन्तं च पितरं रक्ष किल्बिषात् ॥ ३० ॥
|
पुरुषप्रवर ! आज आपण माझ्या मातेच्या कलंकाला धुवून पुसून टाका, आणि पूज्य पित्यालाही निंदेपासून वाचवा. ॥ ३० ॥
|
शिरसा त्वाऽभियाचेऽहं कुरुष्व करुणां मयि ।
बान्धवेषु च सर्वेषु भूतेष्विव महेश्वरः ॥ ३१ ॥
|
’मी आपल्या चरणी मस्तक ठेवून याचना करीत आहे. आपण माझ्यावर दया करावी. ज्याप्रमाणे महादेव सर्व प्राण्यांवर अनुग्रह करतात, त्याचप्रकारे आपणही आपल्या बंधु बांधवांवर कृपा करावी. ॥ ३१ ॥
|
अथवा पृष्ठतः कृत्वा वनमेव भवानितः ।
गमिष्यति गमिष्यामि भवता सार्धमप्यहम् ॥ ३२ ॥
|
’अथवा जर आपण माझी प्रार्थना लाथाडून येथून वनातच जाल तर मीही आपल्या बरोबर जाईन.’ ॥ ३२ ॥
|
तथाहि रामो भरतेन ताम्यता
प्रसाद्यमानः शिरसा महीपतिः ।
न चैव चक्रे गमनाय सत्त्ववान्
मतिं पितुस्तद्वचने प्रतिष्ठितः ॥ ३३ ॥
|
ग्लानीत पडलेल्या भरतांनी मनोभिराम राजा श्रीरामांना त्यांच्या चरणी मस्तक ठेवून प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला; तथापि त्या सर्वगुणसंपन्न रघुनाथांनी पित्याच्या आज्ञेतच दृढतापूर्वक स्थित राहून, अयोध्येस जाण्याचा विचार केला नाही. ॥ ३३ ॥
|
तदद्भुतं स्थैर्यमवेक्ष्य राघवे
समं जनो हर्षमवाप दुःखितः ।
न यात्ययोध्यामिति दुःखितोऽभवत्
स्थिरप्रतिज्ञत्वमवेक्ष्य हर्षितः ॥ ३४ ॥
|
श्रीरामचंद्रांची ही अद्भूत दृढता पाहून सर्व लोक एकाचवेळी दुःखी झाले आणि हर्षितही झाले. हे अयोध्येस जात नाहीत हे ऐकून ते दुःखी झाले आणि प्रतिज्ञा पालनांतील त्यांची दृढता पाहून त्यांना हर्ष झाला. ॥ ३४ ॥
|
तमृत्विजो नैगमयूथवल्लभा-
स्तथा विसंज्ञाश्रुकलाश्च मातरः ।
तथा ब्रुवाणं भरतं प्रतुष्टुवुः
प्रणम्य रामं च ययाचिरे सह ॥ ३५ ॥
|
त्या समयी ऋत्विज, पुरवासी, भिन्न भिन्न समुदायांचे नेते आणि माता अचेत झाल्यासारखी होऊन अश्रु ढाळीत पूर्वोक्त वचने बोलणार्या भरताची भूरि भूरि प्रशंसा करू लागले आणि सर्वांनी त्यांच्या बरोबरच योग्यतेस अनुसरून श्रीरामांसमोर विनीत होऊन त्यांनी अयोध्येस येण्याविषयी याचना केली. ॥ ३५ ॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे षडुत्तरशततमः सर्गः ॥ १०६ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकशे सहावा सर्ग पूरा झाला ॥ १०६ ॥
|