श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ षट्षष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सीतागर्भतः पुत्रद्वयस्य जन्म वाल्मीकिना तयो रक्षाव्यवस्थाकरणं अमुना वृत्तेन प्रसन्नस्य शत्रुघ्नस्य ततः प्रस्थाय यमुनातटे गमनं च -
सीतेच्या दोन पुत्रांचा जन्म, वाल्मीकिंच्या द्वारा त्यांच्या रक्षणाची व्यवस्था आणि त्या समाचाराने प्रसन्न झालेल्या शत्रुघ्नांनी तेथून प्रस्थान करून यमुनातटावर पोहोचणे -
यामेव रात्रिं शत्रुघ्नः पर्णशालामुपाविशत् ।
तामेव रात्रिं सीतापि प्रसूता दारकद्वयम् ॥ १ ॥
ज्या रात्री शत्रुघ्नाने पर्णशाळेत प्रवेश केला होता. त्याच रात्री सीतेने दोन पुत्रांना जन्म दिला. ॥१॥
ततोऽर्धरात्रसमये बालका मुनिदारकाः ।
वाल्मीकेः प्रियमाचख्युः सीतायाः प्रसवं शुभम् ॥ २ ॥
तदनंतर अर्ध्या रात्रिच्या समयी काही मुनिकुमारांनी वाल्मीकिंच्या जवळ जाऊन त्यांना सीता प्रसूत झाल्याचा शुभ आणि प्रिय समाचार ऐकविला - ॥२॥
भगवन् रामपत्‍नील सा प्रसूता दारकद्वयम् ।
ततो रक्षां महातेजः कुरु भूतविनाशिनीम् ॥ ३ ॥
भगवन्‌ ! श्रीरामांच्या धर्मपत्‍नीने दोन पुत्रांना जन्म दिला आहे, म्हणून महातेजस्वी महर्षे ! आपण त्यांच्या बालग्रहजनित बाधा निवृत्त करण्यासाठी रक्षण करावे. ॥३॥
तेषां तद्वचनं श्रुत्वा महर्षिः समुपागमत् ।
बालचन्द्रप्रतीकाशौ देवपुत्रौ महौजसौ ॥ ४ ॥
त्या कुमारांचे ते वचन ऐकून महर्षि वाल्मीकि त्या स्थानावर गेले. सीतेचे ते दोन्ही पुत्र बालचंद्रम्या समान सुंदर तसेच देवकुमारांप्रमाणे महातेजस्वी होते. ॥४॥
जगाम तत्र हृष्टात्मा ददर्श च कुमारकौ ।
भूतघ्नीं चाकरोत् ताभ्यां रक्षां रक्षोविनाशिनीम् ॥ ५ ॥
वाल्मीकिनी प्रसन्नचित्त होवून सूतिकागारात प्रवेश केला आणि त्या दोन्ही कुमारांना पाहिले तसेच त्यांच्यासाठी भूते आणि राक्षसांचा विनाश करणार्‍या रक्षणाची व्यवस्था केली. ॥५॥
कुशमुष्टिमुपादाय लवं चैव तु स द्विजः ।
वाल्मीकिः प्रददौ ताभ्यां रक्षां भूतविनाशिनीम् ॥ ६ ॥
ब्रह्मर्षि वाल्मीकिनी एक कुशाची मुष्टि आणि त्याचे लव घेऊन त्यांच्या द्वारे दोन्ही बालकांच्या भूत-बाधेचे निवारण करण्यासाठी रक्षा-विधिचा उपदेश केला- ॥६॥
यस्तयोः पूर्वजो जातः स कुशैर्मन्त्रसत्कृतैः ।
निर्मार्जनीयस्तु तदा कुश इत्यस्य नाम तत् ॥ ७ ॥

यश्चावरो भवेत् ताभ्यां लवेन स समाहितः ।
निर्मार्जनीयो वृद्धाभिः लव इत्येव नामतः ॥ ८ ॥
वृद्ध स्त्रियांनो ! या दोन्ही बालकामध्ये जो प्रथम उत्पन्न झाला आहे त्याचे मंत्रांच्या द्वारे संस्कार केल्या गेलेल्या या कुशांनी मार्जन करावे. असे केल्यावर त्या बालकाचे नाव कुश होईल आणि यांच्यामध्ये जो लहान आहे त्याचे लवाने मार्जन करावे. यामुळे त्याचे नाव लव होईल. ॥७-८॥
एवं कुशलवौ नाम्ना तावुभौ यमजातकौ ।
मत्कृताभ्यां च नामभ्यां ख्यातियुक्तौ भविष्यतः ॥ ९ ॥
याप्रकारे जुळे उत्पन्न झालेले हे दोन्ही बालक क्रमशः कुश आणि लव नामे धारण करतील आणि माझ्या द्वारे निश्चित केल्या गेलेल्या याच नामांनी भूमण्डलात विख्यात होतील. ॥९॥
तां रक्षां जगृहुस्तां च मुनिहस्तात् समाहिताः ।
अकुर्वंश्च ततो रक्षां तयोर्विगतकल्मषाः ॥ १० ॥
हे ऐकून निष्पाप वृद्ध स्त्रियांनी एकाग्रचित्त होऊन मुनिंच्या हातातील रक्षेच्या त्या साधनभूत कुशांना घेतले आणि त्यांच्या द्वारे त्या दोन्ही बालकांचे मार्जन तसेच संरक्षण केले. ॥१०॥
तथा तां क्रियमाणां च वृद्धाभिर्गोत्रनाम च ।
संकीर्तनं च रामस्य सीतायाः प्रसवौ शुभौ ॥ ११ ॥

अर्धरात्रे तु शत्रुघ्नः शुश्राव सुमहत् प्रियम् ।
पर्णशालां ततो गत्वा मातर्दिष्ट्येति चाब्रवीत् ॥ १२ ॥
जेव्हा वृद्धा स्त्रिया याप्रकारे संरक्षण करू लागल्या, त्या समयी अर्ध्या रात्री श्रीराम आणि सीतेचे नाव, गोत्राच्या उच्चारणाचा ध्वनि शत्रुघ्नांच्या कानावर पडला. त्याच बरोबर त्यांना सीतेला दोन सुंदर पुत्र झाल्याचा संवादही प्राप्त झाला. तेव्हा ते सीतेच्या पर्णशाळेत गेले आणि म्हणाले -माते ! ही फार सौभाग्याची गोष्ट आहे. ॥११-१२॥
तदा तस्य प्रहृष्टस्य शत्रुघ्नस्य महात्मनः ।
व्यतीता वार्षिकी रात्रिः श्रावणी लघुविक्रमा ॥ १३ ॥
महात्मा शत्रुघ्न त्या समयी इतके प्रसन्न होते की त्यांची ती वर्षाकालीन श्रावणांतील रात्र बघता बघता संपून गेली. ॥१३॥
प्रभाते सुमहावीर्यः कृत्वा पौर्वाह्णिकीं क्रियाम् ।
मुनिं प्राञ्जलिरामन्त्र्य ययौ पश्चान्मुखः पुनः ॥ १४ ॥
प्रभात झाल्यावर पूर्वाह्नकालचे कार्य संध्या-वंदन आदि करून महापराक्रमी शत्रुघ्नांनी हात जोडून मुनिंचा निरोप घेतला आणि पश्चिम दिशेकडे निघून गेले. ॥१४॥
स गत्वा यमुनातीरं सप्तरात्रोषितः पथि ।
ऋषीणां पुण्यकीर्तीनां आश्रमे वासमभ्ययात् ॥ १५ ॥
मार्गात सात रात्री घालवून ते यमुना-तीरावर जाऊन पोहोंचले आणि तेथे पुण्यकीर्ती महर्षिंच्या आश्रमात राहू लागले. ॥१५॥
स तत्र मुनिभिः सार्धं भार्गवप्रमुखैर्नृपः ।
कथाभिरभिरूपाभिः वासं चक्रे महायशाः ॥ १६ ॥
महायशस्वी राजा शत्रुघ्नाने तेथे च्यवन आदि मुनिंच्या बरोबर सुंदर कथावार्ता द्वारे कालक्षेप करीत निवास केला. ॥१६॥
स काञ्चनाद्यैर्मुनिभिः समेतै
रघुप्रवीरो रजनीं तदानीम् ।
कथाप्रकारैर्बहुभिर्महात्मा
विरामयामास नरेन्द्रसूनुः ॥ १७ ॥
याप्रकारे रघुकुलातील प्रमुख वीर महात्मा राजकुमार शत्रुघ्न तेथे एकत्र जमलेल्या च्यवन आदि मुनींच्या बरोबर नाना प्रकारच्या कथा ऐकत त्या काळात यमुनेच्या तटावर रात्र घालवू लागले. ॥१७॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे षट्षष्टितमः सर्गः ॥ ६६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील उत्तरकाण्डाचा सहासष्ठावा सर्ग पूरा झाला. ॥६६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP