सगरस्य प्रजानामुत्पत्तिस्तेन यज्ञस्यायोजनं च -
|
राजा सगराच्या पुत्रांची उत्पत्ति आणि यज्ञाची तयारी -
|
तां कथां कौशिको रामे निवेद्य मधुराक्षराम् ।
पुनरेवापरं वाक्यं काकुत्स्थमिदमब्रवीत् ॥ १ ॥
|
विश्वामित्रांनी मधुर शब्दांत श्रीरामास कथा ऐकवून नंतर त्यांना दुसरा प्रसंग या प्रमाणे सांगितला - ॥ १ ॥
|
अयोध्याधिपतिर्वीर पूर्वमासीन्नराधिपः ।
सगरो नाम धर्मात्मा प्रजाकामः स चाप्रजः ॥ २ ॥
|
'हे वीरा ! फार पूर्वीची गोष्ट आहे. अयोध्येमध्ये सगर नावाने प्रसिद्ध एक धर्मात्मा राजा राज्य करीत होता. त्याला एकही पुत्र नव्हता म्हणून तो पुत्र प्राप्तीसाठी सदा उत्सुक असे. ॥ २ ॥
|
वैदर्भदुहिता राम केशिनी नाम नामतः ।
ज्येष्ठा सगरपत्नी सा धर्मिष्ठा सत्यवादिनी ॥ ३ ॥
|
'श्रीरामा ! विदर्भ राजकुमारी केशिनी राजा सगराची ज्येष्ठ पत्नी होती. ती अत्यंत धर्मनिष्ठ आणि सत्यवादिनी होती. ॥ ३ ॥
|
अरिष्टनेमेर्दुहिता सुपर्णभगिनी तु सा ।
द्वितीया सगरस्यासीत् पत्नी सुमतिसंज्ञिता ॥ ४ ॥
|
सगराच्या दुसर्या पत्नीचे नाव होते सुमति. ती अरिष्टनेमी काश्यपाची कन्या आणि गरुडाची बहिण होती. ॥ ४ ॥
|
ताभ्यां सह महाराजः पत्नीभ्यां तप्तवांस्तपः ।
हिमवन्तं समासाद्य भृगुप्रस्रवणे गिरौ ॥ ५ ॥
|
महाराज सगर आपल्या दोन्ही पत्नींना बरोबर घेऊन हिमालय पर्वतावर जाऊन भृगुप्रस्रवण नामक शिखरावर तपस्या करू लागले. ॥ ५ ॥
|
अथ वर्षशते पूर्णे तपसाऽऽराधितो मुनिः ।
सगराय वरं प्रादाद् भृगुः सत्यवतां वरः ॥ ६ ॥
|
शंभर वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांच्या तपस्ये प्रभावाने प्रसन्न झालेले, सत्यवादी लोकात श्रेष्ठ महर्षि भृगुंनी सगर राजाला वर दिला. ॥ ६ ॥
|
अपत्यलाभः सुमहान् भविष्यति तवानघ ।
कीर्तिं चाप्रतिमां लोके प्राप्स्यसे पुरुषर्षभ ॥ ७ ॥
|
'निष्पाप नरेश ! तुला अनेक पुत्रांची प्राप्ति होईल. पुरुषप्रवर ! तू या संसारात अनुपम कीर्ति प्राप्त करशील. ॥ ७ ॥
|
एका जनयिता तात पुत्रं वंशकरं तव ।
षष्टिं पुत्रसहस्राणि अपरा जनयिष्यति ॥ ८ ॥
|
तात ! तुझी एक पत्नी तर एकाच पुत्रास जन्म देईल. जो वंशपरंपरेचा विस्तार करणारा होईल तथा दुसरी पत्नी साठ हजार पुत्रांची जननी होईल. ॥ ८ ॥
|
भाषमाणं महात्मानं राजपुत्र्यौ प्रसाद्य तम् ।
ऊचतुः परमप्रीते कृताञ्जलिपुटे तदा ॥ ९ ॥
|
'महात्मा भृगु ज्यावेळी अशा प्रकारे सांगत होते त्यावेळी त्या दोन्ही राण्यांनी त्यांना प्रसन्न करून स्वतःही आनन्दित होऊन दोन्ही हात जोडून त्यांना विचारले - ॥ ९ ॥
|
एकः कस्याः सुतो ब्रह्मन् का बहूञ्जनयिष्यति ।
श्रोतुमिच्छामहे ब्रह्मन् सत्यमस्तु वचस्तव ॥ १० ॥
|
'ब्रह्मन् ! कुठल्या राणीला एकपुत्र होईल आणि कोण अनेक पुत्रांची जननी होईल ? आम्ही दोघी हे ऐकण्यास उत्सुक आहोत. आपली वाणी सत्य होवो. ॥ १० ॥
|
तयोस्तद् वचनं श्रुत्वा भृगुः परमधार्मिकः ।
उवाच परमां वाणीं स्वच्छन्दोऽत्र विधीयताम् ॥ ११ ॥
एको वंशकरो वाऽस्तु बहवो वा महाबलाः ।
कीर्तिमन्तो महोत्साहाः का वा कं वरमिच्छति ॥ १२ ॥
|
'त्या दोघींचे हे बोलणे ऐकून परम धर्मात्मा भृगुंनी उत्तम वाणीत म्हटले, "देविंनो ! तुम्ही येथे आपली इच्छा प्रकट करा. तुम्हाला वंश चालविणारा एकच पुत्र हवा आहे की महान्, बलवान, यशस्वी आणि अत्यंत उत्साही अनेक पुत्र हवे आहेत ? या वरांपैकी कुठल्या वराला कुठली राणी ग्रहण करू इच्छित आहे ?' ॥ ११-१२ ॥
|
मुनेस्तु वचनं श्रुत्वा केशिनी रघुनन्दन ।
पुत्रं वंशकरं राम जग्राह नृपसंनिधौ ॥ १३ ॥
|
'रघुकुलनन्दन श्रीरामा ! मुनिंचे हे वचन ऐकून केशिनीने राजा सगराच्या समीप वंश चालविणारा एकाच पुत्राचा वर ग्रहण केला. ॥ १३ ॥
|
षष्टिं पुत्रसहस्राणि सुपर्णभगिनी तदा ।
महोत्साहान् कीर्तिमतो जग्राह सुमतिः सुतान् ॥ १४ ॥
|
तेव्हां गरुडाची भगिनी सुमति हिने महान् उत्साही आणि यशस्वी साठ हजार पुत्रांना जन्म देण्याचा वर प्राप्त केला. ॥ १४ ॥
|
प्रदक्षिणमृषिं कृत्वा शिरसाभिप्रणम्य तं ।
जगाम स्वपुरं राजा सभार्यो रघुनन्दन ॥ १५ ॥
|
'रघुनन्दना ! त्यानंतर राण्यांसहित राजा सगराने महर्षिंची परिक्रमा करून त्यांच्या चरणी मस्तक नमविले आणि आपल्या नगराला प्रस्थान केले. ॥ १५ ॥
|
अथ काले गते तस्य ज्येष्ठा पुत्रं व्यजायत ।
असमञ्ज इति ख्यातं केशिनी सगरात्मजम् ॥ १६ ॥
|
काही काळ गेल्यानंतर ज्येष्ठ राणी केशिनीने सगराचा औरस पुत्र 'असमञ्ज' याला जन्म दिला. ॥ १६ ॥
|
सुमतिस्तु नरव्याघ्र गर्भतुम्बं व्यजायत ।
षष्टिः पुत्रसहस्राणि तुम्बभेदाद् विनिःसृताः ॥ १७ ॥
|
'पुरुषसिंहा ! कनिष्ठ राणी सुमतिने तुंबीच्या आकाराचा एक गर्भपिण्ड उत्पन्न केला. तो फोडल्यानंतर साठ हजार बालके निघाली. ॥ १७ ॥
|
घृतपूर्णेषु कुम्भेषु धात्र्यस्तान् समवर्धयन् ।
कालेन महता सर्वे यौवनं प्रतिपेदिरे ॥ १८ ॥
|
त्यांना तुपाने भरलेल्या घड्यांत ठेवले गेले आणि दाई त्यांचे पालन पोषण करू लागल्या. बरेच दिवस लोटल्यावर ती सर्व बालके युवावस्थेला प्राप्त झाली. ॥ १८ ॥
|
अथ दीर्घेण कालेन रूपयौवनशालिनः ।
षष्टिः पुत्रसहस्राणि सगरस्याभवंस्तदा ॥ १९ ॥
|
याप्रमाणे योग्य काळानंतर राजा सगराचे रूप आणि यौवन यांनी शोभणारे साठ हजार पुत्र तयार झाले. ॥ १९ ॥
|
स च ज्येष्ठो नरश्रेष्ठः सगरस्यात्मसम्भवः ।
बालान् गृहीत्वा तु जले सरय्वा रघुनन्दन ॥ २० ॥
प्रक्षिप्य प्रहसन्नित्यं मज्जतस्तान् निरीक्ष्य वै ।
|
'नरश्रेष्ठ रघुनन्दना ! सगराचा ज्येष्ठ पुत्र असमञ्ज नगरांतील बालकांना पकडून शरयूच्या जलात फेकून देत असे आणि जेव्हा ती गटांगळ्या खाऊ लागत तेव्हा त्यांच्याकडे पाहून तो हंसू लागे. ॥ २० १/२ ॥
|
एवं पापसमाचारः सज्जनप्रतिबाधकः ॥ २१ ॥
पौराणामहिते युक्तः पुत्रो निर्वासितः पुरात् ।
|
या प्रकारे पापाचरणात प्रवृत्त होऊन जेव्हां तो सत्पुरुषांनाही पीडा देऊ लागला आणि नगर निवासी लोकांचे अहित करू लागला, तेव्हां पित्याने त्याला नगरा बाहेर हाकलून लावले. ॥ २१ १/२ ॥
|
तस्य पुत्रोंऽशुमान् नाम असमञ्जस्य वीर्यवान् ॥ २२ ॥
सम्मतः सर्वलोकस्य सर्वस्यापि प्रियंवदः ।
|
असमञ्जच्या पुत्राचे नाव होते अंशुमान्. तो फार पराक्रमी, सर्वांशी मधुर वचन बोलणारा आणि सर्व लोकांना प्रिय होता. ॥ २२ १/२ ॥
|
ततः कालेन महता मतिः समभिजायत ॥ २३ ॥
सगरस्य नरश्रेष्ठ यजेयमिति निश्चिता ।
|
'नरश्रेष्ठ ! काही कालानंतर महाराज सगरांच्या मनांत असा निश्चित विचार उत्पन्न झाला की 'मी यज्ञ करीन'. ॥ २३ १/२ ॥
|
स कृत्वा निश्चयं राजा सोपाध्यायगणस्तदा ।
यज्ञकर्मणि वेदज्ञो यष्टुं समुपचक्रमे ॥ २४ ॥
|
हा दृढ निश्चय करून तो वेदवेत्ता नरेश आपल्या उपाध्यायांसह यज्ञ करण्याच्या तयारीस लागला.' ॥ २४ ॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे अष्टात्रिंशः सर्गः ॥ ३८ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा अडतीसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ३८ ॥
|