[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। एकाशीतितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
प्रातर्मंगलवाद्यघोषमाकर्ण्य भरतस्य दुःखं, तत्सन्निवर्त्य विलपनं, राजसभामागतेन वसिष्ठेन मंत्रीप्रभृतीनानयितुं दूतानां प्रेषणम् -
प्रातःकालच्या मङ्‌‍गलवाद्यांचा घोष ऐकून भरतांचे दुःखी होणे आणि तो बंद करवून विलाप करणे, वसिष्ठांनी सभेमध्ये येऊन मंत्री आदिंना बोलावण्यासाठी दूत पाठवणे -
ततो नान्दीमुखीं रात्रिं भरतं सूतमागधाः ।
तुष्टुवुः सविशेषज्ञाः स्तवैर्मङ्‌गलसंस्तवैः ॥ १ ॥
इकडे अयोध्येत त्या अभ्युदयसूचक रात्रीचा थोडासाच भाग शिल्लक राहिलेला पाहून स्तुति-कलेचे विशेषज्ञ सूत आणि मागधांनी मङ्‌‍गलमयी स्तुतींच्या द्वारा भरताचे स्तवन करण्यास आरंभ केला. ॥१॥
सुवर्णकोणाभिहतः प्राणदद्यामदुन्दुभिः ।
दध्मुः शङ्‌खांश्च शतशो वाद्यांश्चोच्चावचस्वरान् ॥ २ ॥
प्रहर समाप्ती सूचित करणारी दुंदुभि सोन्याच्या दांड्याने आहत होऊन वाजू लागली. वाद्य वाजविण्यार्‍या (वादकांनी) शङ्‌‍ख तसेच दुसरीही नाना प्रकारची शेकडो वाद्ये वाजविली. ॥२॥
स तूर्यघोषः सुमहान् दिवमापूरयन्निव ।
भरतं शोकसंतप्तं भूयः शोकैररन्धयत् ॥ ३ ॥
वाद्यांचा तो महान तुमुल घोष समस्त आकाशाला व्याप्त करुन निनादत राहिला आणि शोकसंतप्त भरताला पुन्हा शोकाग्निच्या आंचेने जणु भाजून काढू लागला. ॥३॥
ततः प्रबुद्धो भरतस्तं घोषं संनिवर्त्य च ।
नाहं राजेति चोक्त्वा तं शत्रुघ्नमिदमब्रवीत् ॥ ४ ॥
वाद्यांच्या त्या ध्वनीने भरतांची झोप उडाली, ते जागे झाले आणि ’मी राजा नाही’ असे म्हणून त्यांनी ती वाद्ये वाजविणे बंद करविले, नंतर ते शत्रुघ्नाला म्हणाले - ॥४॥
पश्य शत्रुघ्न कैकेय्या लोकस्यापकृतं महत् ।
विसृज्य मयि दुःखानि राजा दशरथो गतः ॥ ५ ॥
’शत्रुघ्ना ! पहा तर खरे ! कैकेयीने जगताचा केवढा महान अपकार केला आहे. दशरथ महाराज माझ्यावर अनेक दुःखांचा भार घालून स्वर्गलोकी निघून गेले आहेत. ॥५॥
तस्यैषा धर्मराजस्य धर्ममूला महात्मनः ।
परिभ्रमति राजश्रीर्नौरिवाकर्णिका जले ॥ ६ ॥
’आज त्या धर्मराज महात्मा नरेशांची हि धर्ममूला राजलक्ष्मी, नाविकावाचून जलात पडलेल्या नौकेप्रमाणे इकडे-तिकडे डगमगत आहे. ॥६॥
यो हि नः सुमहान् नाथः सोपि प्रव्राजितो वने ।
अनया धर्ममुत्सृज्य मात्रा मे राघवः स्वयम् ॥ ७ ॥
’जे आमचे सर्वात मोठे स्वामी आणि संरक्षक आहेत, त्या राघवांनाही स्वतः माझ्या या मातेने धर्माला तिलाञ्जलि देऊन वनात पाठवून दिले. ॥७॥
इत्येवं भरतं वीक्ष्य विलपन्तमचेतनम् ।
कृपणा रुरुदुः सर्वाः सस्वरं योषितस्तदा ॥ ८ ॥
त्यासमयी भरताला याप्रकारे अचेत होऊन विलाप करतांना पाहून राणीवशातील सर्व स्त्रिया दीनभावाने व्याकुळ होऊन रडू लागल्या. ॥८॥
तथा तस्मिन् विलपति वसिष्ठो राजधर्मवित् ।
सभामिक्ष्वाकुनाथस्य प्रविवेश महायशाः ॥ ९ ॥
जेव्हा भरत याप्रकारे विलाप करीत होते त्यावेळी राजधर्माचे ज्ञाता महयशस्वी महर्षि वसिष्ठांनी इक्ष्वाकुनाथ राजा दशरथांच्या सभाभवनात प्रवेश केला. ॥९॥
शातकुम्भमयीं रम्यां मणिरत्‍नासमाकुलाम् ।
सुधर्मामिव धर्मात्मा सगणः प्रत्यपद्यत ॥ १० ॥

स काञ्चनमयं पीठं स्वस्त्यास्तरणसंवृतम् ।
अध्यास्त सर्ववेदज्ञो दूताननुशशास च ॥ ११ ॥
ते सभाभवन अधिकांश सुवर्णाचे बनविले होते. त्यांत सोन्याचे खांब लावलेले होते. ती रमणीय सभा देवतांच्या सुधर्मा सभेप्रमाणे शोभत होती. संपूर्ण वेदांचे ज्ञाता असलेल्या धर्मात्मा वसिष्ठांनी आपल्या शिष्यगणांसह त्या सभेत पदार्पण केले आणि स्वस्तिकाकार बिछायतीने जे झाकलेले होते त्या सुवर्णमय पीठावर ते विराजमान झाले. आसन ग्रहण केल्या नंतर त्यांनी दूतांना आज्ञा केली - ॥१०-११॥
ब्राह्मणान् क्षत्रियान् योधानमात्यान् गणवल्लभान् ।
क्षिप्रमानयताव्यग्राः कृत्यमात्ययिकं हि नः ॥ १२ ॥

सराजपुत्रं शत्रुघ्नं भरतं च यशस्विनम् ।
युधाजितं सुमन्त्रं च ये च तत्र हिता जनाः ॥ १३ ॥
तुम्ही लोक शांतभावाने जाऊन ब्राह्मण, क्षत्रिय, योध्ये, अमात्य आणि सेनापति यांना त्वरित बोलावून आणा. अन्य राजकुमारंच्या बरोबर यशस्वी भरत आणि शत्रुघ्नला, मंत्री युधाजित आणि सुमंत्राला तसेच आणखीही हितैषी पुरूष तेथे असतील त्या सर्वांना त्वरित बोलवा. आमचे त्याच्याशी अत्यंत आवश्यक कार्य आहे. ॥१२-१३॥
ततो हलहलाशब्दः सुमहान् समुदपद्यत ।
रथैरश्वैर्गजैश्चापि जनानामुपगच्छताम् ॥ १४ ॥
त्यानंतर घोडे, हत्ती आणि रथांनी येणार्‍या लोकांचा महान कोलाहल सुरू झाला. ॥१४॥
ततो भरतमायान्तं शतक्रतुमिवामराः ।
प्रत्यनन्दन् प्रकृतयो यथा दशरथं तथा ॥ १५ ॥
त्यानंतर ज्याप्रमाणे देवता इंद्राचे अभिवादन करतात त्याप्रमाणे समस्त प्रकृतिनी (मंत्री-प्रजा आदिनी) येणार्‍या भरतांचे राजा दशरथांप्रमाणेच अभिवादन केले. ॥१५॥
ह्रद इव तिमिनागसंवृतः
    स्तिमितजलो मणिशङ्‌खशर्करः ।
दशरथसुतशोभिता सभा
    सदशरथेव बभौ सा पुरा ॥ १६ ॥
तिमिनामक महान मत्स्य आणि जलहस्तीनी युक्त स्थिर जल असणार्‍या आणि मुक्ता आदि रत्‍नांनी युक्त, शङ्‌‍ख आणि वालुका युक्त समुद्राच्या जलाशयाप्रमाणे ती सभा दशरथ पुत्र भरतांच्या योगे सुशोभित होऊन, पूर्वी राजा दशरथांच्या उपस्थितीत ती जशी शोभत होती तशीच शोभू लागली. (येथे सभा उपमेय आणि ह्रद (जलाशय) उपमान आहे. जलाशयाची जी विशेषणे दिली आहेत ती सभेमध्ये याप्रकारे सुसंगत होतात- सभेमध्ये तिभि आणि जलहस्ती यांची चित्रे लावलेली आहेत. स्थिर जलाप्रमाणे तिच्यात स्थिर तेज आहे. खांबात रत्‍ने जडवलेली आहेत. शङ्‌‍खाचे चित्र आहे तसेच फर्शीवर सोन्याचे पाणी दिले आहे. (मुलामा दिला आहे) त्यामुळे ती स्वर्णवाळुके (वाळू) प्रमाणे प्रतीत होत आहेत.) ॥१६॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे एकाशीतितमः सर्गः ॥ ८१ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा एक्क्याऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP