स्वकीयस्त्रीभिः परिवृतस्य रावणस्य अशोकवनिकायां आगमनं हनुमता तस्य दर्शनं च -
|
आपल्या स्त्रियांनी घेरलेल्या रावणाचे अशोक वाटिकेत आगमन आणि हनुमन्तांनी त्याला पहाणे -
|
तथा विप्रेक्ष्यमाणस्य वनं पुष्पितपादपम् ।
विचिन्वतश्च वैदेहीं किंचिच्छेषा निशाभवत् ॥ १ ॥
|
या प्रकारे फुलांनी डंवरलेल्या वृक्षांनी सुशोभित त्या वनाची शोभा बघत असता, आणि विदेहनन्दिनीचे अनुसन्धान करीत असता हनुमन्ताची ती सर्व रात्र जवळ जवळ सरत आली. केवळ एक प्रहर रात्र शिल्लक राहिली होती. ॥१॥
|
षडङ्गवेदविदुषां क्रतुप्रवरयाजिनाम् ।
शुश्राव ब्रह्मघोषान् स विरात्रे ब्रह्मरक्षसाम् ॥ २ ॥
|
रात्रीच्या त्या शेवटच्या प्रहरात षडंगासहित संपूर्ण वेद जाणणारे विद्वान आणि श्रेष्ठ यज्ञांच्या द्वारे यजन करणारे ब्रह्मराक्षस यांच्या घरात वेदपाठाचा ध्वनी होऊ लागलेला, हनुमन्तास ऐकू आला. ॥२॥
|
अथ मङ्गलवादित्रैः शब्दैः श्रोत्रमनोहरैः ।
प्राबोध्यत महाबाहुर्दशग्रीवो महाबलः ॥ ३ ॥
|
त्यानन्तर मंगल वाद्ये आणि श्रवण-सुखद शब्दांच्या द्वारे महाबली महाबाहु दशमुख रावणास जाग आणविली गेली. ॥३॥
|
विबुध्य तु महाभागो राक्षसेन्द्रः प्रतापवान् ।
स्रस्तमाल्याम्बरधरो वैदेहीमन्वचिन्तयत् ॥ ४ ॥
|
जागे होतांच महान भाग्यशाली आणि प्रतापी राक्षसराज रावणाने सर्वप्रथम विदेहनन्दिनी सीतेचे चिन्तन केले. त्यासमयी निद्रेमुळे त्याचा पुष्पहार आणि वस्त्र आपल्या स्थानावरून ढळलेले होते. ॥४॥
|
भृशं नियुक्तस्तस्यां च मदनेन मदोत्कटः ।
न तु तं राक्षसः कामं शशाकात्मनि गूहितुम् ॥ ५ ॥
|
तो मदमत्त निशाचर कामवासनेने प्रेरित होऊन सीतेच्या प्रति अत्यन्त आसक्त झालेला होता. त्यामुळे त्या कामवासनेला आपल्या मनान्त लपवून ठेवण्यास तो असमर्थ झाला होता. ॥५॥
|
स सर्वाभरणैर्युक्तो बिभ्रच्छ्रियमनुत्तमाम् ।
तां नगैर्विविधैर्जुष्टां सर्वपुष्पफलोपगैः ॥ ६ ॥
वृतां पुष्करिणीभिश्च नानापुष्पोपशोभिताम् ।
सदा मदैश्च विहगैर्विचित्रां परमाद्भुतैः ॥ ७ ॥
ईहामृगैश्च विविधैर्वृतां दृष्टिमनोहरैः ।
वीथीः सम्प्रेक्षमाणश्च मणिकाञ्चनतोरणाम् ॥ ८ ॥
नानामृगगणाकीर्णां फलैः प्रपतितैर्वृताम् ।
अशोकवनिकामेव प्राविशत् सन्ततद्रुमाम् ॥ ९ ॥
|
त्याने सर्व प्रकारची आभूषणे धारण केली आणि उत्तम शोभेने संपन्न होऊन, त्या अशोकवाटिकेत प्रवेश केला. ती वाटिका सर्व प्रकारची फुले आणि फळे देणार्या विविध प्रकारच्या वृक्षांनी सुशोभित झालेली होती. अनेक पुष्करिणींनी ती वाटिका घेरलेली होती आणि नाना प्रकारची फुले तिची शोभा वाढवीत होती. सदा मत्त असणार्या परम अद्भुत पक्ष्यांच्या योगे तिला विचित्र शोभा प्राप्त झाली होती. पुष्पवाटिकेत मणि आणि कांचन यांची तोरणे लावलेली होती आणि तिच्यामध्ये पंक्तीबद्ध वृक्ष खूप दूरवर पसरलेले होते. अशा त्या वाटिकेतील गल्ल्यांना बघत बघत (छोट्या मार्गांना पहात पहात) रावण त्या वाटिकेत घुसला. ॥६-९॥
|
अङ्गनाः शतमात्रं तु तं व्रजन्तमनुव्रजन् ।
महेन्द्रमिव पौलस्त्यं देवगन्धर्वयोषितः ॥ १० ॥
|
ज्याप्रमाणे देवता आणि गन्धर्व यांच्या स्त्रिया देवराज इन्द्राच्या मागे मागे जात असतात त्याप्रमाणे अशोक वनामध्ये जाणार्या पुलस्त्यनन्दन रावणाच्या मागे मागे जवळ जवळ एकशे सुन्दर स्त्रिया चालत होत्या. ॥१०॥
|
दीपिकाः काञ्चनीः काश्चिज्जगृहुस्तत्र योषितः ।
वालव्यजनहस्ताश्च तालवृन्तानि चापराः ॥ ११ ॥
|
त्या युवतींच्या पैकी काहींनी सुवर्णमय दीपक हातान्त घेतले होते. काहींच्या हातात चवर्या होत्या तर काहींच्या हातात ताडपत्रीचे पंखे होते. ॥११॥
|
काञ्चनैश्चैव भृङ्गारैर्जह्रुः सलिलमग्रतः ।
मण्डलाग्रा बृसीश्चैव गृह्यान्याः पृष्ठतो ययुः ॥ १२ ॥
|
काही सुन्दर स्त्रिया सोन्याच्या झार्यान्तून जल घेऊन पुढे पुढे चालल्या होत्या तर आणखी काही दुसर्या स्त्रिया गोलाकार बृसी नामक आसने घेऊन त्यांच्या मागून चालल्या होत्या. ॥१२॥
|
काचिद् रत्नमयीं पात्रीं पूर्णां पानस्य भ्राजतीम् ।
दक्षिणा दक्षिणेनैव तदा जग्राह पाणिना ॥ १३ ॥
|
कुणी चतुर चलाख युवती उजव्या हातामध्ये पेयरसाने पूर्ण भरलेली रत्नजडित चमचम करणारी कळशी धारण केलेली अशी जात होती. ॥१३॥
|
राजहंसप्रतीकाशं छत्रं पूर्णशशिप्रभम् ।
सौवर्णदण्डमपरा गृहीत्वा पृष्ठतो ययौ ॥ १४ ॥
|
तर कुणी दुसरी स्त्री सोन्याच्या दंडाने युक्त आणि पूर्णचन्द्राप्रमाणे अथवा राजहंसाप्रमाणे भासणारे श्वेतछत्र घेऊन रावणाच्या मागे मागे जात होती. ॥१४॥
|
निद्रामदपरीताक्ष्यो रावणस्योत्तमस्त्रियः ।
अनुजग्मुः पतिं वीरं घनं विद्युल्लता इव ॥ १५ ॥
|
जशा मेघा पाठोपाठ विद्युल्लता जातात त्याप्रमाणे रावणाच्या सुन्दर स्त्रिया आपल्या वीर पतीच्या मागे मागे जात होत्या. त्यावेळी झोपेच्या नशेमुळे त्यांचे डोळे वरचेवर मिटत होते. ॥१५॥
|
व्याविद्धहारकेयूराः समामृदितवर्णकाः ।
समागलितकेशान्ताः सस्वेदवदनास्तथा ॥ १६ ॥
|
त्यांचे हार आणि बाजूबन्द त्यांच्या स्थानावरून बाजूस सरकले होते. अंगराग पुसला गेला होता आणि वेण्या मोकळ्या सुटून चेहर्यावर घामाचे बिन्दू उभे राहिले होते. ॥१६॥
|
घूर्णन्त्यो मदशेषेण निद्रया च शुभाननाः ।
स्वेदक्लिष्टाङ्गकुसुमाः समाल्याकुलमूर्धजाः ॥ १७ ॥
|
त्या सुमुखी स्त्रिया शिल्लक राहिलेला मद आणि झोप यांच्यामुळे डुलत डुलत चालल्या होत्या. विभिन्न अंगावर धारण केलेली फुले घामाने भिजून गेली होती आणि पुष्पमालांनी अलंकृत केस हळू हळू हलत होते. ॥१७॥
|
प्रयान्तं नैर्ऋतपतिं नार्यो मदिरलोचनाः ।
बहुमानाच्च कामाच्च प्रियभार्यास्तमन्वयुः ॥ १८ ॥
|
ज्यांचे नेत्र मदमस्त बनविणारे आहेत अशा त्या राक्षसराजाच्या प्रिय पत्नी अशोकवनात जाणार्या आपल्या पतिसमवेत अत्यन्त आदराने आणि अनुरागपूर्वक चालल्या होत्या. ॥१८॥
|
स च कामपराधीन: पतिस्तासां महाबलः ।
सीतासक्तमना मन्दो मन्दाञ्चितगतिर्बभौ ॥ १९ ॥
|
त्या सर्वांचा पति महाबली मन्दबुद्धि रावण कामाच्या आधीन होऊन राहिला होता. तो सीतेच्या ठिकाणी मन लावून मन्दगतीने पुढे जात असता अद्भुत शोभा प्राप्त करीत होता. ॥१९॥
|
ततः काञ्चीनिनादं च नूपुराणां च निस्वनम् ।
शुश्राव परमस्त्रीणां स कपिर्मारुतनन्दनः ॥ २० ॥
|
त्या समयी वायुनन्दन कपिवर हनुमानांनी त्या परम सुन्दर रावणपत्नींच्या कमरपट्यांचा कलनाद आणि नुपूरांचा झंकार ऐकला. ॥२०॥
|
तं चाप्रतिमकर्माणमचिन्त्यबलपौरुषम् ।
द्वारदेशमनुप्राप्तं ददर्श हनुमान् कपिः ॥ २१ ॥
|
त्याचवेळी अनुपम कर्म करणार्या आणि अचिन्त्य बल-पौरूषाने संपन्न रावणासही कपिवर हनुमन्तानी अशोकवाटिकाच्या द्वारापर्यन्त आलेले पाहिले. ॥२१॥
|
दीपिकाभिरनेकाभिः समन्तादवभासितम् ।
गन्धतैलावसिक्ताभिर्ध्रियमाणाभिरग्रतः ॥ २२ ॥
|
त्याच्या पुढे पुढे सुगन्धित तेलानी भिजलेले दीप होते आणि त्यांच्या द्वारे तो सर्व बाजूनी प्रकाशित झालेला होता. ॥२२॥
|
कामदर्पमदैर्युक्तं जिह्मताम्रायतेक्षणम् ।
समक्षमिव कन्दर्पमपविद्धशरासनम् ॥ २३ ॥
|
तो रावण काम, दर्प आणि मदाने युक्त होता. त्याचे डोळे वक्र, लाल आणि मोठमोठे होते. तो धनुष्यरहित साक्षात कामदेवाप्रमाणे दिसत होता. ॥२३॥
|
मथितामृतफेनाभमरजोवस्त्रमुत्तमम् ।
सपुष्पमवकर्षन्तं विमुक्तं सक्तमङ्गदे ॥ २४ ॥
|
त्याचे वस्त्र घुसळलेल्या दुधावरील फेसाप्रमाणे श्वेत, निर्मळ आणि उत्तम होते. त्यामध्ये मोत्यांचे दाणे आणि पुष्पे ओवलेली होती. ते वस्त्र त्याच्या बाजूबन्दात अडकलेले होते आणि रावण त्यास ओढून ते सोडविण्याचा प्रयत्न करीत होता. ॥२४॥
|
तं पत्रविटपे लीनः पत्रपुष्पशतावृतः ।
समीपमुपसंक्रान्तं विज्ञातुमुपचक्रमे ॥ २५ ॥
|
अशोक वृक्षाच्या पानामध्ये आणि डहाळ्यामध्ये लपून राहिलेले हनुमान शेकडो पाने आणि फुले यांनी झाकले गेले होते. त्याच अवस्थेत त्यांनी जवळ आलेल्या रावणास ओळखण्याचा प्रयत्न केला. ॥२५॥
|
अवेक्षमाणस्तु ततो ददर्श कपिकुञ्जरः ।
रूपयौवनसम्पन्ना रावणस्य वरस्त्रियः ॥ २६ ॥
|
त्याच्याकडे पहात असतांना कपिश्रेष्ठ हनुमन्ताचे त्याच्या रूपयौवन संपन्न सुन्दर स्त्रियांकडेही लक्ष गेले. ॥२६॥
|
ताभिः परिवृतो राजा सुरूपाभिर्महायशाः ।
तन्मृगद्विजसङ्घुष्टं प्रविष्टः प्रमदावनम् ॥ २७ ॥
|
त्या सुन्दर रूपसंपन्न युवतींनी वेढले गेलेल्या महायशस्वी राजा रावणाने, जेथे अनेक प्रकारचे पशु-पक्षी आपापल्या बोलीत बोलत होते, अशा त्या प्रमादवनात प्रवेश केला. ॥२७॥
|
क्षीबो विचित्राभरणः शङ्कुकर्णो महाबलः ।
तेन विश्रवसः पुत्रः स दृष्टो राक्षसाधिपः ॥ २८ ॥
|
तो मदमस्त दिसत होता. त्याची आभूषणे विचित्र होती आणि त्याचे कान त्यांच्यात जणु खूंट मारलेले असावेत असे भासत होते. या प्रकारे तो विश्रवा मुनिचा पुत्र महाबली राक्षसराज रावण हनुमन्तांच्या दृष्टिपथात आला. ॥२८॥
|
वृतः परमनारीभिर्ताराभिरिव चन्द्रमाः ।
तं ददर्श महातेजास्तेजोवन्तं महाकपिः ॥ २९ ॥
रावणोऽयं महाबाहुरिति सञ्चिन्त्य वानरः ।
सोऽयमेव पुरा शेते पुरमध्ये गृहोत्तमे ।
अवप्लुतो महातेजा हनुमान् मारुतात्मजः ॥ ३० ॥
|
तारकांनी घेरलेल्या चन्द्राप्रमाणे तो परम सुन्दर स्त्रियांनी वेढलेला होता. महातेजस्वी महाकपि हनुमानानी त्या तेजस्वी राक्षसास पाहिले आणि निश्चय केला की हाच महाबाहु रावण आहे. प्रथम हाच नगरात उत्तम महालान्त झोपलेला होता. असा निश्चय करून वानरवीर महातेजस्वी पवनकुमार हनुमान ज्या शाखेवर बसले होते तेथून थोडेसे खाली उतरून आले (म्हणजे रावण काय करतो हे जवळूण पहावे असे त्यांना वाटले ) ॥२९-३०॥
|
स तथाप्युग्रतेजाः स निर्धूतस्तस्य तेजसा ।
पत्रे गुह्यान्तरे सक्तो मतिमान् संवृतोऽभवत् ॥ ३१ ॥
|
जरी बुद्धिमान हनुमान अत्यन्त उग्र तेजस्वी होते तरी रावणाच्या तेजाने जणु तिरस्कृत होऊन सघन पर्णराजीत घुसून लपून राहिले. ॥३१॥
|
स तामसितकेशान्तां सुश्रोणीं संहतस्तनीम् ।
दिदृक्षुरसितापाङ्गीमुपावर्तत रावणः ॥ ३२ ॥
|
इकडे रावण काळे केस, काळेभोर डोळे, सुन्दर कटिभाग आणि परस्परास भिडलेले स्तन असलेल्या सुन्दर सीतेस पहाण्यासाठी तिच्या जवळ गेला. ॥३२॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये सुन्दरकाण्डे अष्टादशः सर्गः ।
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा अठरावा सर्ग पूरा झाला. ॥१८॥
|