॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥ ॥ अयोध्याकाण्ड ॥ ॥ सप्तमः सर्ग: ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] सुमंत्राचे प्रत्यागमन, राजा दशरथाचे स्वर्गगमन, तसेच मातुलगृहातून भरताचे आगमन आणि वसिष्ठांच्या आदेशाने त्याने पित्याचे अंत्येष्टी संस्कार करणे - श्रीमहादेव उवाच - सुमंत्रोऽपि तदायोध्यां दिनान्ते प्रविवेश ह । वस्त्रेण मुखमाच्छाद्य बाष्पाकुलितलोचनः ॥ १ ॥ श्रीमहादेव म्हणाले - त्या वेळी इकडे संध्याकाळच्या वेळी, आपले तोंड वस्त्राने झाकून, अश्रूंनी डोळे डबडबलेल्या सुमंत्राने अयोध्येत प्रवेश केला. (१) बहिरेव रथं स्थाप्य राजानं द्रष्टुमाययौ । जय शब्देन राजानं स्तुत्वा तं प्रणनाम ह ॥ २ ॥ बाहेरच रथ ठेवून राजांना भेटण्यासाठी तो अंत पुरात गेला आणि 'जय' शब्दाच्या उच्चाराने राजांची स्तुती केली व त्यांना त्याला प्रणाम केला. (२) ततो राजा नमन्तं तं सुमंत्रं विह्वलोऽब्रवीत् । सुमंत्र रामः कुत्रास्ते सीतया लक्ष्मणेन च ॥ ३ ॥ त्यानंतर शोकाने विव्हळ झालेले राजा दशरथ नमस्कार करणार्या सुमंत्राला म्हणाले, "अरे सुमंत्रा, सीता व लक्ष्मण यांच्यासह राम कुठे आहे ? (३) कुत्र त्यक्तस्त्वया रामः किं मां पापिनमब्रवीत् । सीता वा लक्ष्मणो वापि निर्दयं मां किमब्रवीत् ॥ ४ ॥ तू रामाला कुठे सोडलेस ? त्याने मज पाप्याला काय निरोप दिला आहे ? तसेच सीता व लक्ष्मण हेसुद्धा मज निर्दयाला काय म्हणाले ? (४) हा राम हा गुणनिधे हा सीते प्रियवादिनि । दुःखार्णवे निमग्नं मां म्रियमाणं न पश्यसि ॥ ५ ॥ हाय रामा ! हाय गुणनिधे ! हाय प्रियवादिनी सीते ! दुःखरूपी सागरात बुडून मरणारा मी तुम्हाला दिसत काय ? " (५) विलप्यैवं चिरं राजा निमग्नो दुःखसागरे । एवं मंत्री रुदन्तं तं प्राञ्जलिर्वाक्यमब्रवीत् ॥ ६ ॥ दुःखसमुद्रात निमग्र असणार्या राजांनी पुष्कळ वेळपर्यत अशा प्रकारे विलाप केला. रडणार्या राजांना मंत्री सुमंत्र हात जोडून बोलला. (६) रामः सीता च सौमित्रिर्मया नीता रथेन ते । शृङ्गवेरपुराभ्याशे गङ्गाकूले व्यवस्थिताः ॥ ७ ॥ "महाराज, राम, सीता व लक्ष्मण यांना तुमच्या रथात बसवून मी त्यांना शृंगवेर नगराजवळ नेले; तेथे ते गंगा नदीच्या तीरावर थांबले. (७) गुहेन किञ्चिदानीतं फलमूलादिकं च यत् । स्पृष्ट्वा हस्तेन सम्प्रीत्या नाग्रहीद्विससर्ज तत् ॥ ८ ॥ तेथे निषाद राजाने जी काही फळे, मुळे इत्यादी आणले होते, त्यांना रामांनी प्रीतिपूर्वक हाताने स्पर्श केला, पण ती घेतली नाहीत, ती परत केली. (८) वटक्षीरः समानाय्य गुहेन रघुनन्दनः । जटामुकुटमाबद्ध्य मामाह नृपते स्वयम् ॥ ९ ॥ महाराज, त्यानंतर गुहाकडून वटवृक्षाचा चीक आणवून घेऊन, जटारूपी छळ श्रीरामांनी बांधला आणि ते स्वतः मला म्हणाले. (९) सुमंत्र ब्रूहि राजानं शोकस्तेऽस्तु न मत्कृते । साकेतादधिकं सौख्यं विपिने नो भविष्यति ॥ १० ॥ 'हे सुमंत्रा, राजांना माझा निरोप सांग की तुम्ही माझ्यासाठी शोक करू नका. अयोध्या नगरीपेक्षा अधिक सौख्य आम्हांला येथे अरण्यात मिळेल. (१०) मातुर्मे वन्दनं ब्रूहि शोकं त्यजतु मत्कृते । आश्वासयतु राजानं वृद्धं शोकपरिप्लुतम् ॥ ११ ॥ आईला माझा प्रणाम सांग. तिने माझ्यासाठी शोक करणे सोडून शोकाकुल वृद्ध राजांचे सांत्वन करावे. (११) सीता चाश्रुपरीताक्षी मामाह नृपसत्तम । दुःखगद्गदया वाचा रामं किञ्चिदवेक्षती ॥ १२ ॥ त्यानंतर हे कृपश्रेष्ठा, अश्रूंनी डोळे भरलेली सीता रामांकडे किंचित पाहात दुःखाने दाटलेल्या वाणीने मला म्हणाली. (१२) साष्टाङ्ग प्रणिपातं मे ब्रूहि श्वश्र्वो पदाम्बुजे । इति प्ररुदती सीता गता किञ्चिदवाङ्मुखी ॥ १३ ॥ 'कौसल्या आणि सुमित्रा या दोघी सास्वांच्या चरणकमळांना माझा प्रणिपात सांग.' असे काहीसे बोलून, तोंडखाली करून, सीता रडत तेथून निघून गेली. (१३) ततस्तेऽश्रुपरीताक्षा नावमारुरुहुस्तदा । यावद्गङ्गां समुत्तीर्य गतास्तावदहं स्थितः ॥ १४ ॥ त्यानंतर त्या वेळी सजल नेत्रांनी ते तिघे नावेत चढले. ते गंगा पार करून जात होते तोपर्यंत मी तेथे थांबलो. (१४) ततो दुःखेन महता पुनरेवाहमागतः । ततो रुदन्ती कौसल्या राजनमिदमब्रवीत् ॥ १५ ॥ त्यानंतर मोठ्या दुःखाने परत आलो." तेव्हा रडत रडत कौसल्या राजांना म्हणाली. (१५) कैकेय्यै प्रियभार्यायै प्रसन्नो दत्तवान्वरम् । त्वं राज्यं देहि तस्यैव मत्पुत्रः किं विवासितः ॥ १६ ॥ "कैकेयी या आवडत्या भार्येला तुम्ही प्रसन्न होऊन वर दिलात. ठीक आहे. तुम्ही खुशाल तिच्या पुत्राला राज्य द्या. माझे काही म्हणणे नाही. परंतु तुम्ही माझ्या पुत्राला राज्यातून का घालवले ? (१६) कृत्वा त्वमेव तत्सर्वमिदानीं किं नु रोदिषि । कौसल्यावचनं श्रुत्वा क्षते स्पृष्ट इवाग्निना ॥ १७ ॥ हे सर्व करून आता तुम्हीच का बरे रडत आहात ?" कौसल्येचे हे वचन ऐकल्यावर महाराजांना अशी वेदना झाली की जणू जखमेला अग्नीचा स्पर्श झाला. (१७) पुनः शोकाश्रुपूर्णाक्षः कौसल्यामिदमब्रवीत् । दुःखेन म्रियमाणं मां किं पुनर्दुःखयस्यलम् ॥ १८ ॥ तेव्हा पुनः शोकाश्रूंनी डोळे भरलेले दशरथ कौसल्येला म्हणाले, "दुःखाने मरत असताना मला तू पुनः का बरे आणखी दुःख देत आहेस ? (१८) इदानीमेव मे प्राणा उत्क्रमिष्यन्ति निश्चयः । शप्तोऽहं बाल्यभावेन केनचिन्मुनिना पुरा ॥ १९ ॥ आताच माझे प्राण जाणार आहेत हे निश्चित आहे. कारण फार पूर्वी माझ्या मूर्खपणामुळे एका मुनीने मला शाप दिला होता. (१९) पुराहं यौवने दृप्तश्चापबाणधरो निशि । अचरं मृगयासक्तो नद्यास्तीरे महावने ॥ २० ॥ (त्या वेळची गोष्ट अशी आहे की) पूर्वी तरुणपणी घमेंडीत मृगयेमध्ये आसक्त होऊन, धनुष्य- बाण घेऊन, रात्रीच्या वेळी मी एका घोर वनात नदीच्या तीरावर फिरत होतो. (२०) तत्रार्धरात्रसमये मुनिः कश्चित्तृषार्दितः । पिपासार्दितयोः पित्रोर्जलमानेतुमुद्यतः । अपूरयज्जले कुम्भं तदा शब्दोऽभवन्महान् ॥ २१ ॥ तेथे मध्यरात्रीच्या वेळी तहानेने व्याकूळ झालेला मुनी तहानलेल्या आपल्या आई-बापासाठी पाणी आणण्यास आला होता. त्याने पाण्यात घागर बुडविली. तेव्हा फार मोठा आवाज झाला. (२१) गजः पिबति पानीयमिति मत्वा महानिशि । बाणं धनुषि सन्धाय शब्दवेधिनमक्षिपम् ॥ २२ ॥ त्या घोर रात्री 'एखादा हत्ती पाणी पीत आहे' असे वाटून मी एक शब्दवेधी बाण धनुष्यावर चढवून सोडला. (२२) हा हतोऽस्मीति तत्राभूच्छब्दो मानुषसूचकः । कस्यापि न कृतो दोषो मया केन हतो विधे ॥ २३ ॥ तेव्हा एका माणसाचे शब्द तेथून ऐकू आले- 'हाय ! मी मेलो. हे विधे, मी कुणाचाही अपराध केलेला नाही. मग मला कुणी का मारले ? (२३) प्रतीक्षते मां माता च पिता च जलकाङ्क्षया । तत्श्रुत्वा भयसंत्रस्तस्ततोऽहं पौरुषं वचः ॥ २४ ॥ पाण्यासाठी माता-पिता माझी वाट पाहात असतील.' त्या वेळी ते पुरुषाचे शब्द ऐकल्यावर मी भयाने अतिशय त्रस्त झालो. (२४) शनैर्गत्वाथ तत्पार्श्वं स्वामिन् दशरथोऽस्म्यहम् । अजानता मया विद्धस्त्रातुमर्हसि मां मुने ॥ २५ ॥ मग सावकाश त्याचेजवळ जाऊन मी म्हटले, 'अहो, स्वामी, मी दशरथ आहे. अजाणता माझ्याकडून तुम्ही बाणाने विद्ध केला गेला आहात. हे मुने, माझे रक्षण करा.' (२५) इत्युक्त्वा पादयोस्तस्य पतिता गद्गदाक्षरः । तदा मामाह स मुनिर्मा भैषीर्नृपसत्तम ॥ २६ ॥ गद्गद कंठाने असे शब्द उचारून मी त्यांच्या पाया पडलो. तेव्हा ते मुनिवर मला म्हणाले, 'हे नृपश्रेष्ठा, तू भिऊ नकोस. (२६) ब्रह्महत्या स्पृशेन्न त्वां वैश्योऽहं तपसि स्थितः । पितरौ मां प्रतीक्षेते क्षुत्तृड्भ्यां परिपीडितौ ॥ २७ ॥ तुला ब्रह्महत्या लागणार नाही. कारण मी तपस्या करणारा एक वैश्य आहे. तहान-भुकेने अतिशय व्याकूळ झालेले माझे आईबाप माझी वाट पाहात आहेत. (२७) तयोस्त्वमुदकं देहि शीघ्रमेवाविचारयन् । न चेत्त्वां भस्मसात्कुर्यात्पिता मे यदि कुप्यति ॥ २८ ॥ तेव्हा कसलाही विचार न करता तू त्यांना चटूदिशी पाणी नेऊन दे. तसे झाले नाही तर मात्र माझा पिता रागावेल व तो तुला भस्मसात करून टाकील. (२८) जलं दत्वा तु तौ नत्वा कृतं सर्वं निवेदय । शल्यमुद्धर मे देहात्प्राणांस्त्यक्ष्यामि पीडितः ॥ २९ ॥ त्यांना पाणी देऊन आणि नमरकार करून, तू स्वतः केलेले सर्व कृत्य त्यांना सांगून टाक. मला अत्यंत पीडा होत आहे. तेव्हा तू माझ्या शरीरातून बाण काढून टाक. मी प्राण सोडतो' (२९) इत्युक्तो मुनिना शीघ्रं बाणमुत्पाट्य देहतः । सजलं कलशं धृत्वा गतोऽहं यत्र दम्पती ॥ ३० ॥ मुनींनी असे सांगितल्यावर मी त्यांच्या शरीरातून झट्दिशी बाण उपसून काढला आणि मग पाण्याने भरलेला घडा घेऊन, जेथे ते जोडपे होते तेथे मी गेलो. (३०) अतिवृद्धावन्धदृशौ क्षुत्पिपासार्दितौ निशि । नायाति सलिलं गृह्य पुत्रः किं वात्र कारणम् ॥ ३१ ॥ अनन्यगतिकौ वृद्धौ शोच्यौ तृट्परिपीडितौ । आवामुपेक्षते किं वा भक्तिमानावयोः सुतः ॥ ३२ ॥ इति चिन्ताव्याकुलौ तौ मत्पादन्यासजं ध्वनिम् । श्रुत्वा प्राह पिता पुत्र किं विलम्बः कृतस्त्वया ॥ ३३ ॥ त्या वेळी ते दोघे चिंतेने व्याकूळ झाले होते. 'आम्ही दोघे अत्यंत वृद्ध आहोत आणि दोन्ही डोळ्यांनी आंधळे आहोत. आम्ही तहान-भुकेने त्रस्त आहोत. या रात्रीच्या वेळी आमचा पुत्र पाणी घेऊन अजुनी आलेला नाही. याचे काय कारण असावे बरे ? पुत्राखेरीज आम्हांला दुसरा कोणताही आधार नाही. आम्ही दोघे वृद्ध, शोकाकुल आणि तहानेने फार त्रस्त झालेले आहोत. आमच्यावर भक्ती असणारा आमचा पुत्र आमची उपेक्षा करीत आहे, याचे काय कारण असावे बरे ?' ते अशी चिंता करीत असतानाच, त्यांनी माझ्या पावलांचा आवाज ऐकला. तो ऐकून पिता म्हणाला, 'बाळा, या वेळी तू का उशीर केलास बरे ? (३१-३३) देह्यावयोः सुपानीयं पिब त्वमपि पुत्रक । इत्येवं लपतोर्भीत्या सकाशमगमं शनैः ॥ ३४ ॥ आम्हाला पाणी दे आणि बाळा, तूसुद्धा थोडे पाणी पी.' अशा प्रकारे ते दोघे बोलत असताना, मी भीतभीत हळूहळू त्यांच्याजवळ गेलो. (३४) पादयोः प्रणिपत्याहमब्रवं विनयान्वितः । नाहं पुत्रस्त्वयोध्याया राजा दशरथोऽस्म्यहम् ॥ ३५ ॥ त्यांच्या चरणांना प्रणाम करून मी अतिशय विनयाने त्यांना म्हणालो, 'मी तुमचा पुत्र नव्हे. तर मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. (३५) पापोऽहं मृगयासक्तो रात्रौ मृगविहिंसकः । जलावताराद्दूरेऽहं स्थित्वा जलगतं ध्वनिम् ॥ ३६ ॥ श्रुत्वाहं शब्दवेधित्वादेकं बाणमथात्यजम् । हतोऽस्मीति ध्वनिं श्रुत्वा भयात्तत्राहमागतः ॥ ३७ ॥ मी पापी आहे. शिकार करण्याच्या नादात रात्रीच्या वेळी पशूचा वध करीत मी फिरत होतो. पाण्याच्या घाटापासून दूर उभा होतो. त्या वेळी पाण्यात झालेला शब्द ऐकून मी तिकडे एक शब्दवेधी बाण सोडला. तेव्हा 'मी मेलो !' असे शब्द ऐकल्यावर मी भयभीत होऊन गेलो. (३६-३७) जटां विकीर्य पतितं दृष्ट्वाहं मुनिदारकम् । भीतो गृहीत्वा तत्पादौ रक्ष रक्षेति चाब्रवम् ॥ ३८ ॥ तेथे गेल्यावर जटा सुटलेल्या अवस्थेत पडलेला मुनिकुमार पाहून मी भ्यालो आणि त्याचे पाय पकडून, 'रक्षण कर, रक्षण कर' असे त्याला म्हणालो. (३८) मा भैषीरिति मां प्राह ब्रह्महत्याभयं न ते । मत्पित्रोः सलिलं दत्त्वा नत्वा प्रार्थय जीवितम् ॥ ३९ ॥ तेव्हा तो मला म्हणाला, 'भिऊ नकोस. तुला ब्रह्महत्येचे भय नाही. माझ्या माता-पित्यांना पाणी देऊन तू त्यांना प्रणाम कर आणि जीवनदान देण्यासाठी त्यांची प्रार्थना कर.' (३९) इत्युक्तो मुनिना तेन ह्यागतो मुनिहिंसकः । रक्षेतां मां दयायुक्तौ युवां हि शरणागतम् ॥ ४० ॥ मुनिकुमाराने मला असे सांगितल्यावर, मुनीची हिंसा करणारा मी तुम्हांला शरण आलो आहे. तुम्ही दोघांनी दयायुक्त होऊन माझे रक्षण करा.' (४०) इति श्रुत्वा तु दुःखार्तौ विलप्य बहु शोच्य तम् । पतितौ नौ सुतो यत्र नय तत्राविलम्बयन् ॥ ४१ ॥ हे ऐकल्यावर दुःखाने पीडित झालेल्या त्या दोघांनी पुत्रासाठी फार शोक केला आणि रडत रडत ते जमिनीवर पडले आणि म्हणू लागले ' मचा पुत्र जेथे पडला आहे तेथे आम्हांला ताबडतोब ने. (४१) ततो नीतौ सुतो यत्र मया तौ वृद्धदम्पती । स्पृष्ट्वा सुतं तौ हस्ताभ्यां बहुशोऽथ विलेपतुः ॥ ४२ ॥ मग त्यांचा पुत्र जेथे होता तेथे मी त्या वृद्ध दांपत्याला नेले. आपल्या दोन्ही हातांनी पुत्राला स्पर्श करून ते दोघे फारच विलाप करू लागले. (४२) हाहेति क्रन्दमानौ तौ पुत्रपुत्रेत्यवोचताम् । जलं देहीति पुत्रेति किमर्थं न ददास्यलम् ॥ ४३ ॥ 'हा ! हा ! अरे मुला ! अरे पोरा !' अशा प्रकारे आक्रंदन करीत ते बोलू लागले 'मुला, आम्हांला पाणी दे. आम्हांला भरपूर पाणी तू का बरे देत नाहीस ?' (४३) ततो मामूचतुः शीघ्रं चितिं रचय भूपते । मया तदैव रचिता चितिस्तत्र निवेशिताः । त्रयस्तत्राग्निरुत्सृष्टो दग्धास्ते त्रिदिवं ययुः ॥ ४४ ॥ नंतर ते दोघे मला म्हणाले, 'हे राजा, ताबडतोब एक चिता तयार कर.' त्या वेळी लगेच मी एक चिता रचली. मग त्या तिघांनाही चितेवर ठेवले. चितेला अग्नी दिला. जळून ते स्वर्गलोकी गेले. (४४) तत्र वृद्धः पिता प्राह त्वमप्येवं भविष्यसि । पुत्रशोकेन मरणं प्राप्स्यसे वचनान्मम ॥ ४५ ॥ मरणापूर्वी तो वृद्ध पिता मला म्हणाला, 'तुझ्या बाबतीतसुद्धा असेच होईल. माझ्या वचनानुसार तूसुद्धा पुत्रशोकाने मरण पावशील.' (४५) स इदानीं मम प्राप्तः शापकालोऽनिवारितः । इत्युक्त्वा विललापाथ राजा शोकसमाकुलः ॥ ४६ ॥ तो अनिवार्य असा शापकाल आता माझ्या बाबतीत प्राप्त झाला आहे." असे बोलून नंतर अत्यंत शोकाकुल झालेले राजा दशरथ विलाप करू लागले. (४६) हा राम पुत्र हा सीते इति लक्ष्मण गुणाकर । त्वद्वियोगादहं प्राप्तो मृत्युं कैकेयिसम्भवम् ॥ ४७ ॥ "हाय पुत्रा रामा ! हाय सीते ! हाय गुणांची खाण असणार्या लक्ष्मणा ! तुमच्या वियोगामुळे कैकेयीने निर्माण केलेल्या मृत्यूप्रत मी आता पोहोचलो आहे." (४७) वदन्नेवं दशरथः प्राणांस्त्यक्त्वा दिवं गतः । कौसल्या च सुमित्रा च तथान्या राजयोषितः ॥ ४८ ॥ चुक्रुशुश्च विलेपुश्च उरस्ताडनपूर्वकम् । वसिष्ठः प्रययौ तत्र प्रातर्मंत्रिभिरावृतः ॥ ४९ ॥ असे बोलत असतानाच प्राणत्याग करून महाराज दशरथ स्वर्गलोकी गेले. तेव्हा कौसल्या, सुमित्रा आणि इतर राजस्त्रिया छाती बडवून घेत आक्रोश आणि विलाप करू लागल्या. सकाळ होताच मंत्र्यासह मुनिवर वसिष्ठ तेथे गेले. (४८-४९) तैलद्रोण्यां दशरथं क्षित्वा दूतानथाब्रवीत् । गच्छत त्वरितं साश्वा युधाजिन्नगरं प्रति ॥ ५० ॥ नंतर तेलाने भरलेल्या एका डोणीत दशरथ महाराजांचे शव ठेवून, वसिष्ठ दूतांना म्हणाले, 'घोड्यांवर बसून तुम्ही ताबडतोब युधाजिताच्या राजधानीला जा. (५०) तत्रास्ते भरतः श्रीमाञ्छत्रुघ्नसहितः प्रभुः । उच्यतां भरतः शीघ्रमागच्छेति ममाज्ञया ॥ ५१ ॥ अयोध्यां प्रति राजानं कैकेयीं चापि पश्यतु । इत्युक्त्वास्त्वरितं दूता गत्वा भरतमातुलम् ॥ ५२ ॥ युधाजितं प्रणम्योचुर्भरतं सानुजं प्रति । वसिष्ठस्त्वब्रवीद्राजन् भरतः सानुजः प्रभुः ॥ ५३ ॥ शीघ्रमागच्छतु पुरीमयोध्यामविचारयन् । इत्याज्ञप्तोऽथ भरतस्त्वरितं भयविह्वलः ॥ ५४ ॥ आययौ गुरुणादिष्ठः सह दूतैस्तु सानुजः । राज्ञो वा राघवस्यापि दुःखं किञ्चिदुपस्थितम् ॥ ५५ ॥ इति चिन्तापरो मार्गे चिन्तयन्नगरं ययौ । नगरं भ्रष्टलक्ष्मीकं जनसम्बाधवर्जितम् ॥ ५६ ॥ उत्सवैश्च परित्यक्तं दृष्ट्वा चिन्तापरोऽभवत् । प्रविश्य राजभवनं राजलक्ष्मीविवर्जितम् ॥ ५७ ॥ अपश्यत्कैकेयीं तत्र एकामेवासने स्थितम् । ननाम शिरसा पादौ मातुर्भक्तिसमन्वितः ॥ ५८ ॥ तेथे शत्रुघ्नासहित श्रीमान प्रभू भरत आहे. माझी आज्ञा म्हणून तुम्ही भरताला सांगा-' अयोध्येला शीघ्र निघून ये आणि येथे आल्यावर राजा दशरथ व कैकेयी यांचे दर्शन घे. ' वसिष्ठांनी दूतांना असे सांगितल्यावर ते दूत त्वरित तिकडे गेले आणि भरताचा मामा युधाजित आणि शत्रुघ्न या धाकट्या भावासह भरताला प्रणाम करून ते युधाजिताला म्हणाले-'हे राजन, वसिष्ठांनी तुम्हांला सांगितले आहे की शत्रुघ्नासह महाराज भरताने कोणताही विचार न करता ताबडतोब अयोध्या नगरीला यावे. 'तेव्हा अशी आज्ञा ऐकून लगेच भरत भीतीने विव्हल झाला आणि गुरूंच्या आदेशानुसार, लहान भाऊ शत्रुघ्न आणि दूत यांच्यासह तो निघाला. "महाराज दशरथ अथवा रघुनाथ यांच्यावर कोणते तरी घोर संकट आले असावे का ?" असा वाटेत मनातल्या मनात विचार करीत, तो अयोध्या नगरीत पोचला. ती नगरी कळाहीन वाटत होती. लोकांची वर्दळ नाही, तसेच उत्सव दिसत नाहीत, असे पाहून भरत चिंताक्रांत झाला. राजलक्ष्मीने रहित अशा राजवाड्यात प्रवेश केल्यावर तेथे त्याला दिसले की एकाकी कैकेयी एका आसनावर बसलेली आहे. भक्तीने युक्त होऊन त्याने मातेच्या चरणावर मस्तक ठेवून तिला प्रणाम केला. (५१-५८) आगतं भरतं दृष्ट्वा कैकेयी प्रेमसम्भ्रमात् । उत्थायालिङ्ग्य रभसा स्वाङ्कमारोप्य संस्थिता ॥ ५९ ॥ भरत आला आहे, हे पाहून कैकयीने मोठ्या प्रेमाने तत्काळ उठून त्याला आलिंगन दिले आणि त्याला मांडीवर घेऊन ती बसली. (५९) मूर्ध्न्यवघ्राय पप्रच्छ कुशलं स्वकुलस्य सा । पिता मे कुशलो भ्राता माता च शुभलक्षणा ॥ ६० ॥ दिष्ट्या त्वमद्य कुशली मया दृष्टोऽसि पुत्रक । इति पृष्टः स भरतो मात्रा चिन्ताकुलेन्द्रियः ॥ ६१ ॥ नंतर त्याच्या मस्तकाचे अवघ्राण करून, तिने आपल्या स्वतःच्या कुळाचे कुशल त्याला विचारले, "माझी सुलक्षणा आई, बाबा व भाऊ सर्व खुशाल आहेत ना ? (६०) दूयमानेन मनसा मातरं समपृच्छत । मातः पिता मे कुत्रास्ते एका त्वमिह संस्थिता ॥ ६२ ॥ हे बाळा, तुला आज खुशाल पाहून मला बरे वाटले." मातेने असे म्हटल्यावर, काळजीने व्याकूळ झालेल्या भरताने दुःखी मनाने तिला विचारले, "आई, माझे तात कुठे आहेत ? कारण तू एकटीच येथे बसलेली आहेस. (६१-६२) त्वया विना न मे तातः कदाचिद्रहसि स्थितः । इदानीं दृश्यते नैव कुत्र तिष्ठति मे वद ॥ ६३ ॥ तुझ्याविना तर माझे तात एकांतात कधीही राहात नसतात. परंतु आता मात्र ते कुठे दिसत नाहीत. ते कुठे आहेत, ते मला सांग. (६३) अदृष्ट्वा पितरं मेऽद्य भयं दुःखं च जायते । अथाह कैकेयी पुत्र किं दुःखेन तवानघ ॥ ६४ ॥ पिताजी न दिसल्यामुळे आज मला दुःख होत आहे आणि भयही वाटत आहे," तेव्हा कैकेयी पुत्राला म्हणाली, "हे पुण्यशील भरता, तुला दुःख का होत आहे ? (६४) या गतिर्धर्मशीलानामश्वमेधादियाजिनाम् । तां गतिं गतवानद्य पिता ते पितृवत्सल ॥ ६५ ॥ हे पितृवत्सल भरता, अश्वमेध इत्यादी यज्ञ करणार्या धर्मपरायण पुरुषांची जी गत होते, तीच गत आज तुझ्या पित्याचीसुद्धा झाली आहे." (६५) तत्श्रुत्वा निपपातोर्व्यां भरतः शोकविह्वलः । हा तात क्व गतोऽसि त्वं त्यक्त्वा मां वृजिनार्णवे ॥ ६६ ॥ असमर्प्यैव रामाय राज्ञे मां क्व गतोऽसि भोः । इति विलपितं पुत्रं पतितं मुक्तमूर्धजम् ॥ ६७ ॥ उत्थाप्यामृज्य नयने कैकेयी पुत्रमब्रवीत् । समाश्वसिहि भद्रं ते सर्वं सम्पादितं मया ॥ ६८ ॥ ते ऐकताच शोकाने विव्हल झालेला भरत धरणीवर पडला आणि म्हणू लागला, "अहो बाबा, मला दुःखसागरात लोटून तुम्ही कुठे गेलात ? अहो, महाराज, श्रीरामांकडे मला सोपविल्याशिवाय तुम्ही कुठे गेलात ?" विस्कटलेल्या केसांच्या स्थितीत भरत धरणीवर पडून विलाप करू लागला. त्याला उठवून, त्याचे डोळे पुसून, कैकेयी म्हणाली, "मुला, शांत हो, तुझे कल्याण असो. तुझ्यासाठी पुत्राला आवश्यक ते सर्व मी प्राप्त करून घेतले आहे." (६६-६८) तामाह भरतस्तातो म्रियमाणः किमब्रवीत् । तमाह कैकेयी देवी भरतं भयवर्जिता ॥ ६९ ॥ हा राम राम सीतेति लक्ष्मणेति पुनः पुनः । विलपन्नेव सुचिरं देहं त्यक्त्वा दिवं ययौ ॥ ७० ॥ तेव्हा भरताने तिला विचारले, "मरताना पिताजी काय म्हणाले ? " तेव्हा राणी कैकेयीने निर्भयपणे भरताला सांगितले. "हा राम ! हा राम ! हा सीते ! हा लक्ष्मण !" अशा प्रकारे पुष्कळ काळपर्यंत वारंवार विलाप करीत, देहाचा त्याग करून तुझे वडील स्वर्गात गेले. " (६९-७०) तामाह भरतो हेऽम्ब रामः सन्निहितो न किम् । तदानीं लक्ष्मणो वापि सीता वा कुत्र ते गताः ॥ ७१ ॥ तेव्हा भरताने तिला विचारले, "अग आई, त्या वेळी श्रीराम जवळ नव्हता काय ? त्या वेळी लक्ष्मण तसेच सीता हे कुठे गेले होते ?" (७१) कैकेय्युवाच - रामस्य यौवराज्यार्थं पित्रा ते सम्भ्रमः कृतः । तव राज्यप्रदानाय तदाहं विघ्नमाचरम् ॥ ७२ ॥ कैकेयी म्हणाली- "तुझ्या पित्याने रामाच्या यौवराज्याच्या अभिषेकासाठी तयारी केली होती. तेव्हा त्यांनी तुला राज्य द्यावे, म्हणून मी त्यात विघ्न निर्माण केले. ७२ राज्ञा दत्तं हि मे पूर्वं वरदेन वरद्वयम् । याचितं तदिदानीं मे तयोरेकेन तेऽखिलम् ॥ ७३ ॥ राज्यं रामस्य चैकेन वनवासो मुनिव्रतम् । ततः सत्यपरो राजा राज्यं दत्त्वा तदैव हि ॥ ७४ ॥ रामं सम्प्रेषयामास वनमेव पिता तव । सीताप्यनुगता रामं पातिव्रत्यमुपाश्रिता ॥ ७५ ॥ पूर्वी राजांनी मला दोन वर दिले होते. आता त्यांतील एका वराने मी तुझ्यासाठी संपूर्ण राज्य मागून घेतले आणि दुसर्या वराने रामासाठी मुनिव्रतपूर्वक वनवास मागून घेतला. तेव्हा सत्यपरायण अशा महाराज दशरथांनी तुला राज्य दिले आणि रामाला वनवासात पाठविले. पातिव्रत्याचे पालन करीत सीता हीसुद्धा रामाच्या मागोमाग वनात गेली. (७३-७५) सौभ्रात्रं दर्शयन्रामं अनुयातोऽपि लक्ष्मणः । वनं गतेषु सर्वेषु राजा तानेव चिन्तयन् ॥ ७६ ॥ प्रलपन् राम रामेति ममार नृपसत्तमः । इति मातुर्वचः श्रुत्वा वज्राहत इव द्रुमः ॥ ७७ ॥ पपात भूमौ निःसंज्ञस्तं दृष्ट्वा दुःखिता तदा । कैकेयी पुनरप्याह वत्स शोकेन किं तव ॥ ७८ ॥ त्या वेळी भ्रातृप्रेमामुळे लक्ष्मण हासुद्धा रामाच्या मागोमाग वनात गेला. ते सगळे वनात गेल्यावर, त्यांचेच स्मरण करीत आणि 'राम ! राम !' असे पुटपु त महाराजही मृत्यू पावले." आईचे हे वचन ऐकल्यावर वज्राचा तडाखा बसलेल्या वृक्षाप्रमाणे भरत बेशुद्ध होऊन धरणीवर पडला. तेव्हा त्याला पाहून दुःखी झालेली कैकेयी पुन्हा त्याला म्हणाली, " बाळा, तू कशासाठी शोक करीत आहेस ? (७६-७८) राज्ये महति सम्प्राप्ते दुःखस्यावसरः कुतः । इति ब्रुवन्तीमालोक्य मातरं प्रदहन्निव ॥ ७९ ॥ असम्भाष्यासि पापे मे घोरे त्वं भर्तृघातिनी । पापे त्वद्गर्भजातोऽहं पापवानस्मि साम्प्रतम् । अहमग्निं प्रवक्ष्यामि विषं वा भक्षयाम्यहम् ॥ ८० ॥ एवढे मोठे राज्य प्राप्त झाल्यावर दुःख करण्याचे कारण काय ?" असे बोलणार्या आईकडे पाहून रागाने जणू जाळीत भरत म्हणाला, "अग पापिणी, मी तुझ्याशी बोलणेसुद्धा योग्य नाही. अग भयंकर स्त्रिये, तू आपल्या पतीची हत्या केली आहेस. अग पापिणी, तुझ्या पोटी जन्मलेला मीसुद्धा आता पापी झालो आहे. मी आता अग्नीत प्रवेश करतो अथवा विष खातो. (७९-८०) खड्गेन वाथ चात्मानं हत्वा यामि यमक्षयम् । भर्तृघातिनि दुष्टे त्वं कुम्भीपाकं गमिष्यसि ॥ ८१ ॥ अथवा तरवारीने स्वतःला ठार करून मी यमसदनास जातो. नवर्याला मारणार्या हे दुष्टे, तू कुंभीपाक नरकात जाशील. " (८१) इति निर्भर्त्स्य कैकेयीं कौसल्याभवनं ययौ । सापि तं भरतं दृष्ट्वा मुक्तकण्ठा रुरोद ह ॥ ८२ ॥ अशा रीतीने कैकेयीची निर्भर्त्सना करून भरत कौसल्येच्या महालात गेला. भरताला पाहाताच तीसुद्धा धाय मोकलून रडू लागली. (८२) पादयोः पतितस्तस्या भरतोऽपि तदारुदत् । आलिङ्ग्य भरतं साध्वी राममाता यशस्विनी । कृशातिदीनवदना साश्रुनेत्रेदमब्रवीत् ॥ ८३ ॥ तेव्हा तिच्या पाया पडून भरतसुद्धा रडू लागला. भरताला आलिंगन देऊन दुःखाने कृश झालेली, अतिशय दीन-वदन असणारी, साध्वी, यशस्विनी अशी रामाची माता डोळ्यांत अश्रू आणून त्याला म्हणाली. (८३) पुत्र त्वयि गते दूरमेवं सर्वमभूदिदम् । उक्तं मात्रा श्रुतं सर्वं त्वया ते मातृचेष्टितम् ॥ ८४ ॥ "बाळा तू दूर गेला असतान हे सर्व घडले. तुझ्या आईनेजे काही केले ते सर्व तिने तुला सांगितले असेल व ते सर्व तू ऐकलेच असशील" (८४) पुत्रः सभार्यो वनमेव यातः सलक्ष्मणो मे रघुरामचन्द्रः । चीराम्बरो बद्धजटाकलापः सन्त्यज्य मां दुःखसमुद्रमग्नाम् ॥ ८५ ॥ दुःखसागरात बुडालेल्या माझा त्याग करून, माझा पुत्र रघुश्रेष्ठ श्रीरामचंद्र आपली भार्या व लक्ष्मण यांच्यासह वल्कले धारण करून आणि मस्तकावर जटाजूट बांधून वनामध्ये निघून गेला. (८५) हा राम हा मे रघुवंशनाथ जातोऽसि मे त्वं परतः परात्मा । तथापि दुःखं न जहाति मां वै विधिर्बलीयानिति मे मनीषा ॥ ८६ ॥ हाय रामा ! हाय माझ्या रघुवंशाच्या शिरोमणी ! अरे, सर्वश्रेष्ठ असा परमात्मा असून माझा पुत्र म्हणून जन्माला आलास. तथापि दुःख काही मला सोडीत नाही. म्हणून मला वाटते की दैव हेच बलवान होय." (८६) स एवं भरतो वीक्ष्य विलपन्तीं भृशं शुचा । पादौ गृहीत्वा प्राहेदं शृणु मातर्वचोमम ॥ ८७ ॥ अतिशय शोकाने अशा प्रकारे विलाप करणार्या कौसल्येला पाहून भरताने तिचे पाय धरले आणि तो म्हणाला, "हे माते, माझे वचन ऐक. (८७) कैकेय्या यत्कृतं कर्म रामराज्याभिषेचने । अन्यद्वा यदि जानामि सा मया नोदिता यदि ॥ ८८ ॥ पापं मेऽस्तु तदा मातर्ब्रह्महत्याशतोद्भवम् । हत्वा वसिष्ठं खड्गेन अरुन्धत्या समन्वितम् ॥ ८९ ॥ भूयात्तत्पापमखिलं मम जानामि यद्यहम् । इत्येवं शपथं कृत्वा रुरोद भरतस्तदा ॥ ९० ॥ श्रीरामांच्या राज्याभिषेकाच्या वेळी कैकयीने जे काही कृत्य केले किंवा आणखी जे काही केले असेल, ते जर मला ठाऊक असेल किंवा मी जर तिला प्रेरणा दिली असेल तर हे माते, शंभर ब्रह्महत्यांमुळे उद्भवणारे महापाप मला लागू दे. किंवा याला माझी संमती असेल तर अरुंधती सह वसिष्ठांना तरवारीने ठार केल्यावर जे पाप लागेल ते सर्व पाप मला लागो." अशा प्रकारे शपथ घेऊन भरत त्या वेळी रडू लागला. (८८-९०) कौसल्या तमथालिङ्ग्य पुत्र जानामि मा शुचः । एतस्मिन्नन्तरे श्रुत्वा भरतस्य समागमम् ॥ ९१ ॥ वसिष्ठो मंत्रिभिः सार्धं प्रययौ राजमन्दिरम् । रुदन्तं भरतं दृष्ट्वा वसिष्ठः प्राह सादरम् ॥ ९२ ॥ तेव्हा त्याला आलिंगन देऊन कोसल्या म्हणाली, "बाळा, मला सर्व काही माहीत आहे. तू मुळीच शोक करू नकोस." दरम्यानच्या काळात भरताचे आगमन झाले आहे हे ऐकून, मंत्र्यांसह वसिष्ठ राजमंदिरात आले आणि शोक करणार्या भरताला पाहून आदरपूर्वक म्हणाले. (९१-९२) वृद्धो राजा दशरथो ज्ञानी सत्यपराक्रमः । भुक्त्वा मर्त्यसुखं सर्वमिष्ट्वा विपुलदक्षिणैः ॥ ९३ ॥ अश्वमेधादिभिर्यज्ञैर्लब्ध्वा रामं सुतं हरिम् । अन्ते जगाम त्रिदिवं देवेन्द्रार्द्धासनं प्रभुः ॥ ९४ ॥ "महाराज दशरथ हे वृद्ध, ज्ञानी व सत्यपराक्रमी होते. मर्त्यलोकातील सर्व सुखे भोगून, भरपूर दक्षिणा देत अश्वमेध इत्यादी यज्ञांचे द्वारा भगवंतांची आराधना करून आणि रामचंद्राच्या रूपात साक्षात विष्णूला पुत्र म्हणून प्राप्त करून घेऊन, शेवटी ते स्वर्गाला गेले आणि तेथे ते देवराज इंद्राच्या अर्ध्या आसनावर विराजमान झाले आहेत. (९३-९४) तं शोचसि वृथैव त्वमशोच्यं मोक्षभाजनम् । आत्मा नित्योऽव्ययः शुद्धो जन्मनाशादिवर्जितः ॥ ९५ ॥ म्हणून संपूर्णपणे अशोचनीय आणि मोक्षाचे अधिकारी अशा राजांच्याविषयी तू उगीचच शोक करीत आहेस. लक्षात ठेव की आत्मा हा नित्य, अव्यय, शुद्ध. आणि जन्म-नाश इत्यादी विकारांनी रहित असतो. (९५) शरीरं जडमत्यर्थमपवित्रं विनश्वरम् । विचार्यमाणे शोकस्य नावकाशः कथञ्चन ॥ ९६ ॥ याउलट शरीर हे जड, अतिशय अपवित्र आणि नाशवंत आहे. अशा प्रकारे विचार केला असता एखाद्या माणसाच्या मृत्यूसाठी शोक करण्यास मुळीच जागा उरत नाही. (९६) पिता वा तनयो वापि यदि मृत्युवशं गतः । मूढास्तमनुशोचन्ति स्वात्मताडनपूर्वकम् ॥ ९७ ॥ पिता अगर पुत्र जर मरण पावला असेल तर स्वतःची छाती बडवून घेत अज्ञानी माणसे त्याच्यासाठी शोक करतात. (९७) निःसारे खलु संसारे वियोगो ज्ञानिनां यदा । भवेद्वैराग्यहेतुः स शान्तिसौख्यं तनोति च ॥ ९८ ॥ परंतु अशा असार संसारात ज्ञानी माणसांना जेव्हा एखाद्याचा वियोग होतो, तेव्हा तो त्यांच्या वैराग्याचे कारण बनतो आणि तो शांती व सुखच वाढवितो. (९८) जन्मवान्यदिलोकेऽस्मिंस्तर्हि तं मृत्युरन्वगात् । तस्मादपरिहार्योऽयं मृत्युर्जन्मवतां सदा ॥ ९९ ॥ या जगात जर कुणी जन्माला आला असेल तर मृत्यू हा अवश्य त्याच्या मागोमाग येतच असतो. म्हणून जन्माला आलेल्या माणसांच्या बाबतीत मृत्यू हा अपरिहार्य आहे. (९९) स्वकर्मवशतः सर्वजन्तूनां प्रभवाप्ययौ । विजानन्नप्यविद्वान्यः कथं शोचति बान्धवान् ॥ १०० ॥ स्वतःच्या कर्मानुसारच सर्व प्राण्यांना जन्म आणि मरण येत असते, हे जाणत असूनसुद्धा अज्ञानी माणूस आपल्या बांधवांच्या मरणाबद्दल का बरे शोक करतो ? (१००) ब्रह्माण्डकोटयो नष्टाः सृष्टयो बहुशो गताः । शुष्यन्ति सागराः सर्वे कैवास्था क्षणजीविते ॥ १०१ ॥ कोट्यवधी ब्रह्मांडे नष्ट होऊन गेली आहेत. अनेक सृष्टी होऊन गेल्या आहेत. सर्व सागर हे केव्हाना केव्हा तरी शुष्क होऊन जातात. अशा स्थितीत क्षणभर टिकणार्या जीवनाच्या बाबतीत कसली आस्था ठेवायची ? (१०१) चलपत्रान्तलग्नाम्बुबिन्दुवत्क्षणभङ्गुरम् । आयुस्त्यजत्यवेलायां कस्तत्र प्रत्ययस्तव ॥ १०२ ॥ झाडाच्याच्या हलणार्या पानाच्या टोकावर चिकटलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आयुष्य हे क्षणभंगुर आहे. ते अवेळी निघून जाते. त्याचेबद्दल तू कसला विश्वास धरतोस ? (१०२) देही प्राक्तनदेहोत्थकर्मणा देहवान् पुनः । तद्देहोत्थेन च पुनरेवं देहः सदात्मनः ॥ १०३ ॥ पूर्व जन्मातील देहाकडून निर्माण झालेल्या कर्मांमुळे देहधारी जीवाला पुन्हा नवीन देह प्राप्त होतो. नंतर त्या नवीन देहाकडून केल्या जाणार्या कर्मामुळे पुन्हा त्याला नवीन देह प्राप्त होतो. अशा प्रकारे जीवात्म्याला पुन्हा पुन्हा नवीन देहांची प्राप्ती होत राहाते. (१०३) यथा त्यजति वै जीर्णं वासो गृह्णाति नूतनम् । तथा जीर्णं परित्यज्य देही देहं पुनर्नवम् ॥ १०४ ॥ भजत्येव सदा तत्र शोकस्यावसरः कुतः । आत्मा न म्रियते जातु जायते न च वर्धते ॥ १०५ ॥ षड्भावरहितोऽनन्तः सत्यप्रज्ञानविग्रहः । आनन्दरूपो बुद्ध्यादिसाक्षी लयविवर्जितः ॥ १०६ ॥ एक एव परो ह्यात्मा ह्यद्वितीयः समः स्थितः । इत्यात्मानं दृढं ज्ञात्वा त्यक्त्वा शोकं कुरु क्रियाम् ॥ १०७ ॥ ज्या प्रमाणे माणूस हा जीर्ण वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र ग्रहण करतो, त्या प्रमाणे देहधारी जीव जीर्ण शरीर टाकून देऊन पुनः नवीन देह नेहमी धारण करीत असतो. अशा स्थितीत त्या संदर्भात शोक करण्याला संधी तरी कुठे आहे ? कारण आत्मा हा कधीही मरत नाही, कधीही जन्माला येत नाही, आणि तो कधीही वाढत नाही. अर्थात आत्मा हा सहा विकारांनी रहित, अनंत सच्चिदनंद स्चरूप बुद्दि इत्यादींचा साक्षी आणि नाशरहित आहे. तो परमात्मा एकच आहे, अद्वितीय आहे आणि सर्व ठिकाणी समरूपाने स्थित आहे. अशा प्रकारे आत्मा आहे, हे ज्ञान पक्के जाणून घेऊन आणि शोक टाकून देऊन, तू सर्व कामे कर. (१०४-१०७) तैलद्रोण्याः पितुर्देहमुद्धृत्य सचिवैः सह । कृत्यं कुरु यथान्यायमस्माभिः कुलनन्दन ॥ १०८ ॥ हे कुलनंदन भरता, तेलाच्या डोणीतून पित्याचे शव बाहेर काढून, मंत्री आणि आम्हा ऋषींच्याबरोबर त्याचा यथाविधी अंत्येष्टि-संस्कार कर." (१०८) इति सम्बोधितः साक्षाद्गुरुणा भरतस्तदा । विसृज्याज्ञानजं शोकं चक्रे स विधिवत्क्रियाम् ॥ १०९ ॥ अशा प्रकारे प्रत्यक्ष गुरूंनी सांगितल्यावर, अज्ञान-जन्य शोक सोडून देऊन, भरताने त्या वेळी यथाविधी अंत्य संस्काराच्या क्रिया केल्या. (१०९) गुरुणोक्तप्रकारेण आहिताग्नेर्यथाविधि । संस्कृत्य स पितुर्देहं विधिदृष्टेन कर्मणा ॥ ११० ॥ एकादशेऽहनि प्राप्ते ब्राह्मणान्वेदपारगान् । भोजयामास विधिवच्छतशोऽथ सहस्रशः ॥ १११ ॥ ज्या प्रमाणे एखाद्या आहिताग्नी पुरुषाचे अंतिम संस्कार केले जातात, त्या प्रमाणे गुरूंनी सांगितलेल्या प्रकाराने, शास्त्रोक्त विधीप्रमाणे, पित्याच्या देहावर संस्कार करून, मग अकराव्या दिवशी वेदात पारंगत असणार्या शेकडो-हजारो ब्राह्मणांना भरताने यथाविधी भोजन घातले. (११०-१११) उद्दिश्य पितरं तत्र ब्राह्मणेभ्यो धनं बहु । ददौ गवां सहस्राणि ग्रामान् रत्नाम्बराणि च ॥ ११२ ॥ तसेच पित्यासाठी तेव्हा त्याने ब्राह्मणांना पुष्कळ धन, हजारो गाई, अनेक गावे, पुष्कळ रत्ने आणि वस्त्रे इत्यादी दान दिली. (११२) अवसत्स्वगृहे यत्र राममेवानुचिन्तयन् । वसिष्ठेन सह भ्रात्रा मंत्रिभिः परिवारितः ॥ ११३ ॥ त्यानंतर वसिष्ठ, शत्रुघ्न आणि मंत्री यांच्य समवेत तो श्रीरामांचेच स्मरण करीत स्वतःच्या महालात राहू लागला. (११३) रामेऽरण्यं प्रयाते सह जनकसुता- लक्ष्मणाभ्यां सुघोरं माता मे राक्षसीव प्रदहति हृदयं दर्शनादेव सद्यः । गच्छाम्यारण्यमद्य स्थिरमतिरखिलं दूरतोऽपास्य राज्यं रामं सीतासमेतं स्मितरुचिरमुखं नित्यमेवानुसेवे ॥ ११४ ॥ (महालात राहात असताना) भरत मनातल्या मनात विचार करीत असे की जनकनंदिनी महाराणी सीता व लक्ष्मण यांच्यासह श्रीरामचंद्र अतिशय घोर अरण्यात गेले असताना, माझी माता केवळ आपल्या दर्शनाने एखाद्या राक्षसिणीप्रमाणे माझे हृदय जाळीत आहे. म्हणून हे संपूर्ण राज्य दूर सारून मी आजच अरण्यात जातो आणि मधुर स्मिताने ज्यांचे मुख अतिशय शोभित असते, अशा सीतेसहित श्रीरामांची मी नित्य सेवा करीत राहतो, असा माझा निश्चय आहे. (११४) इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे अयोध्याकाण्डे सप्तमः सर्गः ॥ ७ ॥ अयोध्याकाण्डातील सातवा सर्गः समाप्त ॥ ७ ॥ |