श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ चतुर्दशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
मंत्रिभिः सहितस्य रावणस्य यक्षाणां उपरि आक्रमणं, तेषां पराजयश्च -
मंत्र्यांसहित रावणाचे यक्षांवर आक्रमण आणि त्यांचा पराजय -
ततस्तु सचिवैः सार्धं षड्‌भिर्नित्यं बलोद्धतः ।
महोदरप्रहस्ताभ्यां मारीचशुकसारणैः ॥ १ ॥

धूम्राक्षेण च वीरेण नित्यं समरगर्द्धिना ।
वृतः संप्रययौ श्रीमान् क्रोन्क्रोधाल्लोकान् दहन्निव ॥ २ ॥
(अगस्त्य म्हणतात - रघुनंदना !) त्यानंतर बलाच्या अभिमानाने सदा उन्मत्त राहाणारा रावण महोदर, प्रहस्त, मारीच, शुक, सारण तसेच सदाच युद्धाची अभिलाषा बाळगणारा वीर धूम्राक्ष - या सहा मंत्र्यांच्या सह लंकेहून प्रस्थित झाला. त्यासमयी असे वाटत होते की जणु आपल्या क्रोधाने संपूर्ण लोकांना भस्म करून टाकील. ॥१-२॥
पुराणि स नदीः शैलान् वनान्युपवनानि च ।
अतिक्रम्य मुहूर्तेन कैलासं गिरिमागमत् ॥ ३ ॥
बरीचशी नगरे, नद्या, पर्वत, वने, उपवने ओलांडून तो एका मुहूर्तातच कैलास पर्वतावर जाऊन पोहोचला. ॥३॥
संनिविष्टं गिरौ तस्मिन् राक्षसेन्द्रं निशम्य तु ।
युद्धेप्सुं तु कृतोत्साहं दुरात्मानं समन्त्रिणम् ॥ ४ ॥

यक्षा न शेकुः संस्थातुं प्रमुखे तस्य रक्षसः ।
राज्ञो भ्रातेति विज्ञाय गता यत्र धनेश्वरः ॥ ५ ॥
यक्षांनी जेव्हा ऐकले की दुरात्मा राक्षसराज रावणाने युद्धासाठी उत्साहित होऊन आपल्या मंत्र्यांसह कैलास पर्वतावर तळ ठोकला आहे, तेव्हा ते त्या राक्षसाच्या समोर उभे राहू शकले नाहीत. हा राजाचा भाऊ आहे, हे जाणून यक्षलोक जेथे धनाचे स्वामी कुबेर विद्यमान होते त्या स्थानावर गेले. ॥४-५॥
ते गत्वा सर्वमाचख्युः भ्रातुस्तस्य चिकीर्षितम् ।
अनुज्ञाता ययुर्हृष्टा युद्धाय धनदेन ते ॥ ६ ॥
तेथे जाऊन त्या सर्वांनी त्यांच्या भावाचा सारा अभिप्राय कुबेरांना ऐकविला. तेव्हा त्यांनी युद्धासाठी यक्षांना आज्ञा दिली. नंतर तर यक्ष अत्यंत हर्षाने तेथून निघाले. ॥६॥
ततो बलानां संक्षोभो व्यवर्धत इवोदधेः ।
तस्य नैर्‌ऋतराजस्य शैलं सञ्चालयन् इव ॥ ७ ॥
त्यासमयी यक्षराजाची सेना समुद्रासमान क्षुब्ध झाली. त्यांच्या वेगाने तो पर्वत जणु हलत असल्यासारखा वाटू लागला. ॥७॥
ततो युद्धं समभवद् यक्षराक्षससंकुलम् ।
व्यथिताश्चाभवंस्तत्र सचिवा राक्षसस्य ते ॥ ८ ॥
त्यानंतर यक्ष आणि राक्षसांमध्ये घनघोर युद्धास आरंभ झाला. तेथे रावणाचे सचिव व्यथित झाले. ॥८॥
स दृष्ट्‍वा तादृशं सैन्यं दशग्रीवो निशाचरः ।
हर्षनादान् बहून् कृत्वा स क्रोधादभ्यधावत ॥ ९ ॥
आपल्या सेनेची तशी ती दुर्दशा पाहून निशाचर दशग्रीव वारंवार हर्षवर्धक सिंहनाद करून रोषपूर्वक यक्ष्यांकडे धावला. ॥९॥
ये तु ते राक्षसेन्द्रस्य सचिवा घोरविक्रमाः ।
तेषां सहस्रमेकैको यक्षाणां समयोधयत् ॥ १० ॥
राक्षसराजाचे जे सचिव होते ते फार भयंकर पराक्रमी होते. त्यांतील एकेक सचिव हजार-हजार यक्ष्यांशी युद्ध करू लागला. ॥१०॥
ततो गदाभिर्मुसलैः असिभिः शक्तितोमरैः ।
हन्यमानो दशग्रीवः तत्सैन्यं समगाहत ॥ ११ ॥

स निरुच्छ्वासवत् तत्र वध्यमानो दशाननः ।
वर्षद्‌भिरिव जीमूतैः धाराभिरवरुध्यत ॥ १२ ॥
त्यासमयी जलाची वृष्टि करणार्‍या मेघांप्रमाणे यक्ष गदा, मुसळे, तलवारी, शक्ति आणि तोमरांचा वर्षाव करू लागले. त्यांचे प्रहार सहन करीत दशग्रीव शत्रुसैन्यात घुसला. तेथे त्याच्यावर इतका मार पडू लागला की त्याला श्वास घ्यावयासही सवड मिळाली नाही. यक्षांनी त्याचा वेग रोखून धरला. ॥११-१२॥
न चकार व्यथां चैव यक्षशस्त्रैः समाहतः ।
महीधर इवाम्भोदैः धाराशतसमुक्षितः ॥ १३ ॥
यक्षांच्या शस्त्रांनी आहत झाल्यावरही त्याने आपल्या मनांत दुःख मानले नाही, ज्याप्रमाणे मेघांच्या द्वारे वर्षाव केल्या गेलेल्या शेकडो जलधारांनी अभिषिक्त होऊन पर्वत ज्याप्रमाणे विचलित होत नाही. ॥१३॥
स महात्मा समुद्यम्य कालदण्डोपमां गदाम् ।
प्रविवेश ततः सैन्यं नयन् यक्षान् यमक्षयम् ॥ १४ ॥
त्या महाकाय निशाचराने कालदंडासमान भयंकर गदा उचलून यक्षांच्या सेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांना यमलोकी पोहोचविण्यास आरंभ केला. ॥१४॥
स कक्षमिव विस्तीर्णं शुष्केन्धनमिवाकुलम् ।
वातेनाग्निरिवादीप्तो यक्षसैन्यं ददाह तत् ॥ १५ ॥
वायुने प्रज्वलित झालेल्या अग्निसमान रावणाने गवताप्रमाणे पसरलेल्या आणि वाळलेल्या इंधनाप्रमाणे व्याकुळ झालेल्या यक्षांच्या सेनेला जाळण्यास आरंभ केला. ॥१५॥
तैस्तु तत्र महामात्यैः महोदरशुकादिभिः ।
अल्पावशेषास्ते यक्षाः कृता वातैरिवाम्बुदाः ॥ १६ ॥
जसा वारा ढगांना उडवून लावतो त्याप्रमाणे त्या महोदर आणि शुक आदि महामंत्र्यांनी तेथे यक्षांचा संहार करून टाकला. आता ते फार थोड्‍या संख्येमध्ये वाचले होते. ॥१६॥
केचित् समाहता भग्नाः पतिताः समरक्षितौ ।
ओष्ठांश्च दशनैस्तीक्ष्णैः अदशन् कुपिता रणे ॥ १७ ॥
कित्येक यक्ष शस्त्रांच्या आघाताने अंग-भंग जाल्यामुळे समरांगणात धराशायी झाले. कित्येक तर रणभूमीमध्ये कुपित होऊन आपल्या तीक्ष्ण दातांनी ओठ चावीत राहिले होते. ॥१७॥
श्रान्ताश्चान्योन्यमालिङ्‌ग्य भ्रष्टशस्त्रा रणाजिरे ।
सीदन्ति च तदा यक्षाः कूला इव जलेन ह ॥ १८ ॥
कुणी थकून एक दुसर्‍यास जाऊन चिकटले, त्यांची अस्त्रे-शस्त्रे गळून पडली होती आणि समरांगणात ते जलाच्या वेगाने नदीचे किनारे जसे तुटून पडतात तसे शिथिल होऊन गळून पडले होते. ॥१८॥
हतानां गच्छतां स्वर्गं युध्यतामथ धावताम् ।
प्रेक्षतां ऋषिसङ्‌घानां न बभूवान्तरं दिवि ॥ १९ ॥
मरमरून स्वर्गात जाणारे, झुंजत असलेले आणि धावणार्‍या यक्षांची तसेच आकाशात उभे राहून युद्ध पहाणार्‍या ऋषिसमूहांची संख्या इतकी वाढली होती की आकाशात त्या सर्वासाठी जागाच उरली नव्हती. ॥१९॥
भग्नांस्तु तान् समालक्ष्य यक्षेन्द्रांस्तु महाबलान् ।
धनाध्यक्षो महाबाहुः प्रेषयामास यक्षकान् ॥ २० ॥
महाबाहू धनाध्यक्षाने त्या यक्षांना पळतांना पाहून दुसर्‍या महाबली यक्षराजांना युद्धासाठी धाडले. ॥२०॥
एतस्मिन्नन्तरे राम विस्तीर्णबलवाहनः ।
प्रेषितो न्यपतद् यक्षो नाम्ना संयोधकण्टकः ॥ २१ ॥
श्रीरामा ! इतक्यांत कुबेराने धाडलेला संयोधकंतक नामक यक्ष तेथे येऊन पोहोचला. त्याच्या बरोबर बरीचशी सेना आणि वाहने होती. ॥२१॥
तेन चक्रेण मारीचो विष्णुनेव रणे हतः ।
पतितो भूतले शैलात् क्षीणपुण्य इव ग्रहः ॥ २२ ॥
त्याने येताच भगवान्‌ विष्णुंप्रमाणे चक्राने मारीचावर प्रहार केला. त्यामुळे घायाळ होऊन तो राक्षस कैलासावरून खाली, पृथ्वीवर जसा पुण्य क्षीण झाल्यावर स्वर्गवासी ग्रह तेथून भूतलावर कोसळून पडतो, त्याप्रमाणे कोसळला. ॥२२॥
ससंज्ञस्तु मुहूर्तेन स विश्रम्य निशाचरः ।
तं यक्षं योधयामास स च भग्नः प्रदुद्रुवे ॥ २३ ॥
एका मुहूर्तानंतर भानावर आल्यावर निशाचर मारीच विश्रांती घेऊन परत आला आणि त्या यक्षाबरोबर युद्ध करू लागला, तेव्हा तो यक्ष पळून गेला. ॥२३॥
ततः काञ्चनचित्राङ्‌गं वैदूर्यरजसोक्षितम् ।
मर्यादां प्रतिहाराणां तोरणान्तरमाविशत् ॥ २४ ॥
त्यानंतर रावणाने कुबेरपुरीच्या फाटकामध्ये ज्याच्या प्रत्येक अंगांत सुवर्ण जडविलेले होते आणि जे वैडूर्य आणि चांदीने विभूषित होते, प्रवेश केला. तेथे द्वारपालांचा पहरा ठेवलेला होता. ते फाटक हीच सीमा होती. त्याच्या पुढे दुसरे लोक जाऊ शकत नव्हते. ॥२४॥
तं तु राजन् दशग्रीवं प्रविशन्तं निशाचरम् ।
सूर्यभानुरिति ख्यातो द्वारपालो न्यवारयत् ॥ २५ ॥
राजन्‌ ! जेव्हा निशाचर दशग्रीव फाटकाच्या आत प्रवेश करू लागला तेव्हा सूर्यभानु नावाच्या द्वारपालाने त्याला अडविले. ॥२५॥
स वार्यमाणो यक्षेण प्रविवेश निशाचरः ।
यदा तु वारितो राम न व्यतिष्ठत् स राक्षसः ॥ २६ ॥

ततस्तोरणमुत्पाट्य तेन यक्षेण ताडितः ।
रुधिरं प्रस्रवन् भाति शैलो धातुस्रवैरिव ॥ २७ ॥
जरी यक्षाने अडवले तरीही तो निशाचर थांबला नाही आणि आत प्रविष्ट झाला. तेव्हा द्वारपालाने फाटकांतील एक खांब उखडला आणि तो दशग्रीवावर फेकून मारला. त्याच्या शरीरातून रक्ताची धारा जणु एखाद्या पर्वतातून गेरूमिश्रित जलाचा प्रवाह खाली पडत असावा तशी वाहू लागली. ॥२६-२७॥
स शैलशिखराभेण तोरणेन समाहतः ।
जगाम न क्षतिं वीरो वरदानात्स्वयम्भुवः ॥ २८ ॥
पर्वत शिखरासमान प्रतीत होणार्‍या त्या खांबाचा आघात सोसूनही वीर दशग्रीवाला काही क्षति वाटली नाही. तो ब्रह्मदेवांच्या वरदानाच्या प्रभावाने त्या यक्षाच्या द्वारा मारला जाऊ शकला नाही. ॥२८॥
तेनैव तोरणेनाथ यक्षस्तेनाभिताडितः ।
नादृश्यत तदा यक्षो भस्मीकृततनुस्तदा ॥ २९ ॥
तेव्हा त्यानेही तो खांब उचलून त्याच्या द्वारा यक्षावर प्रहार केला, त्यायोगे यक्षाच्या शरीराचा चुराडा झाला. नंतर परत तो दृष्टीस पडला नाही. ॥२९॥
ततः प्रदुद्रुवुः सर्वे दृष्ट्‍वा रक्षःपराक्रमम् ।
ततो नदीर्गुहाश्चैव विविशुर्भयपीडिताः ।
त्यक्तप्रहरणाः श्रान्ता विवर्णवदनास्तदा ॥ ३० ॥
त्या राक्षसाचा हा पराक्रम पाहून सर्व यक्ष पळून गेले. कोणी नदीत उडी मारली आणि कोणी भयाने पीडित होऊन गुफांमध्ये घुसून गेले. सर्वांनी आपली हत्यारे टाकून दिली. सर्व थकून गेले होते आणि सर्वांच्या मुखांची कांति फिकी पडली होती. ॥३०॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे चतुर्दशः सर्गः ॥ १४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा चौदावा सर्ग पूरा झाला. ॥१४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP