श्रीमद् वाल्मीकि रामायण - सुन्दरकाण्ड - ॥ प्रथमः सर्गः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ प्रथमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
हनुमता समुद्रस्य लंघनं मैनाकेन तस्य सत्कारस्ततः सुरसायाः पराजयः सिंहिकाया वधं कृत्वा तस्य दक्षिणतटे गमनं तत्र तेन लङ्‌काशोभाया निरीक्षणम् - हनुमान्‌ द्वारा समुद्राचे उल्लंघन, मैनाक द्वारा त्यांचे स्वागत, सुरसेवर त्यांचा विजय तथा सिंहिकेचा वध करून त्यांचे समुद्राच्या पार पोहोचून लंकेची शोभा पहाणे -
ततो रावणनीतायाः सीतायाः शत्रुकर्षणः ।
इयेष पदमन्वेष्टुं चारणाचरिते पथि ॥ १ ॥
(या पूर्वीच्या काण्डात (किष्किन्धाकाण्डात) 'जगाम लङ्‌का मनसा मनस्वी' असे मनाने गमन सुचविले होते. आतां या काण्डात कायेने, शरीराने गमन करण्याची इच्छा हनुमन्ताची व्यक्त झाली आहे.)
त्यानन्तर शत्रूंचा संहार करणार्‍या हनुमन्ताने रावणाने चोरून नेलेल्या सीतेचे निवासस्थान शोधून काढण्यासाठी ज्या आकाश मार्गाने चारण* (देव जातिविशेष) संचार करीत असतात, त्या मार्गाने जाण्याचे मनान्त आणले. ॥१॥
*-चारयन्ति आचारयन्ति धर्मान इति चारणाः असा अर्थ श्रीगोविन्दराजीय टीकेत दिला असून पूर्वाचार्यांनी ज्या मार्गाचे आचरण केले तो 'महाजनो येन गतः स पन्थाः' म्हणजेच सदाचाराचा मार्ग असा अर्थ ही दिला आहे. तसेच 'रावयति असत्प्रलापान कारयतीति रावणः अविवेकः' म्हणजे रावण म्हणजेच अविवेक. त्याने सीतेचे हरण केले असा आध्यात्मिक अर्थ ही दिला आहे.
दुष्करं निष्प्रतिद्वन्द्वं चिकीर्षन् कर्म वानरः ।
समुदग्रशीरोग्रीवो गवां पतिरिवाबभौ ॥ २ ॥
कपिश्रेष्ठ हनुमान्‌, जे अत्यन्त दुष्कर होते आणि ज्यात दुसर्‍या कोणाचेही सहाय्य होण्याचा संभव नाही असे कार्य करण्याची इच्छा करीत होते. त्यांनी मस्तक आणि ग्रीवा उंच केली, त्यावेळी ते धिप्पाड अशा बैलाप्रमाणे शोभू लागले. ॥२॥
अथ वैडूर्यवर्णेषु शाद्वलेषु महाबलः ।
धीरः सलिलकल्पेषु विचचार यथासुखम् ॥ ३ ॥
नन्तर महाबलाढ्‍य आणि धैर्यवान्‌ हनुमान्‌, वैडूर्य मण्याप्रमाणे (नील मण्याप्रमाणे) ज्याचा रंग आहे अशा समुद्राच्या जलाप्रमाणे, जे हिरवेगार आहे अशा कोमल आणि म्हणूनच जलाप्रमाणे मृदु असलेल्या तृणयुक्त प्रदेशावरून सुखाने संचार करू लागले. ॥३॥
द्विजान् वित्रासयन् धीमानुरसा पादपान् हरन् ।
मृगांश्च सुबहून् निघ्नन् प्रवृद्ध इव केसरी ॥ ४ ॥
त्यावेळी बुद्धिमान्‌ हनुमान्‌ पक्ष्यांना भयभीत करीत, वक्षःस्थळाच्या आघाताने वृक्षांना धराशायी करीत, असंख्य मृगांचा वध करीत असतां पराक्रमाने पूर्ण वाढ झालेल्या सिंहाप्रमाणे शोभू लागले. ॥४॥
नीललोहितमाञ्जिष्ठपत्रवर्णैः सितासितैः ।
स्वभावसिद्धैर्विमलैर्धातुभिः समलंकृतम् ॥ ५ ॥
त्या पर्वतावर जो सपाट प्रदेश होता, तो पहाडी प्रदेशात स्वाभाविकरीत्या उत्पन्न होणार्‍या नील, आरक्त, गुलाबी वर्णांच्या पानांनी आणि शुभ्र, कृष्ण आणि स्वाभाविकरीत्या चित्रविचित्र रंगाच्या धातूच्या योगाने उत्तम प्रकारे अलंकृत झाला होता. ॥५॥
कामरूपिभिराविष्टमभीक्ष्णं सपरिच्छदैः ।
यक्षकिंनरगन्धर्वैर्देवकल्पैश्च पन्नगैः ॥ ६॥
त्यावर इच्छेप्रमाणे रूप धारण करणारे असे देवोपम यक्ष, किन्नर, गन्धर्व आणि नाग, निरन्तर परिवारासह निवास करीत होते. ॥६॥
स तस्य गिरिवर्यस्य तले नागवरायुते ।
तिष्ठते कपिवरस्तस्य ह्रदे नाग इवाबभौ ॥ ७ ॥
सर्वत्र उत्तमोत्तम गजांनी युक्त असलेल्या त्या श्रेष्ठ पर्वताच्या सपाट माथ्यावर उभे असलेले, ते वानरश्रेष्ठ हनुमान्‌ डोहामध्ये स्थित असलेल्या विशालकाय हत्तीप्रमाणे शोभू लागले. ॥७॥
स सूर्याय महेन्द्राय पवनाय स्वयम्भुवे ।
भूतेभ्यश्चाञ्जलिं कृत्वा चकार गमने मतिम् ॥ ८ ॥
(तेथे गेल्यावर) त्यांनी प्रथम सूर्य, इन्द्र, वायु, ब्रह्मदेव आणि इतर भूते (देवयोनिविशेष) यांना हात जोडून पुढे जाण्याचा विचार केला. ॥८॥
अञ्जलिं प्राङ्‌‍मुखं कुर्वन् पवनायात्मयोनये ।
ततो हि ववृधे गन्तुं दक्षिणो दक्षिणां दिशम् ॥ ९ ॥
पूर्वाभिमुख होऊन त्यांनी स्वतःचा जनक जो वायु, त्यास उद्देशून हात जोडले आणि नन्तर ते कार्यकुशल हनुमान दक्षिण दिशेस जाण्याकरिता वाढू लागले. (आपल्या शरीरास वाढवू लागले) ॥९॥
प्लवगप्रवरैर्दृष्टः प्लवने कृतनिश्चयः ।
ववृधे रामवृद्ध्यर्थं समुद्र इव पर्वसु ॥ १० ॥
मोठ मोठे वानर ज्याला पहात आहेत असे हनुमान्‌ पर्वदिवशी (अथवा पौर्णिमेस) वृद्धिगत होणार्‍या समुद्राप्रमाणे (दक्षिण दिशेस जाण्यासाठी) समुद्र उल्लंघून जाण्याचा दृढ निश्चय करून श्रीरामाच्या कार्यसिद्धिकरितां वाढू लागले. ॥१०॥
निष्प्रमाणशरीरः सन् लिलङ्‌‌घयिषुरर्णवम् ।
बाहुभ्यां पीडयामास चरणाभ्यां च पर्वतम् ॥ ११ ॥
समुद्र लांघण्याच्या इच्छेने त्यांनी आपले शरीर अमर्याद वाढविले आणि आपल्या दोन्ही भुजांनी आणि पायांनी ते त्या पर्वतास पीडा देऊ लागले. ॥११॥
स चचालाचलश्चाशु मुहूर्तं कपिपीडितः ।
तरूणां पुष्पिताग्राणां सर्वं पुष्पमशातयत् ॥ १२ ॥
कपिश्रेष्ठ हनुमन्ताकडून दाबला गेल्यामुळे त्वरित तो पर्वत एकाएकी हलू लागला आणि दोन घटिका पर्यन्त हलत राहिला. त्याच्यावर जे फुलांनी लगडलेले वृक्ष होते, त्यांच्यावरील सर्व फुले त्या पर्वताच्या कंपनामुळे खाली पडली (झडून गेली.) ॥१२॥
तेन पादपमुक्तेन पुष्पौघेण सुगन्धिना ।
सर्वतः संवृतः शैलो बभौ पुष्पमयो यथा ॥ १३ ॥
या प्रमाणे वृक्षावरील सुगन्धित पुष्पांच्या राशी वार्‍याने सर्वत्र पसरल्याने आणि सर्व बाजूने पुष्पांच्या योगे व्याप्त होऊन तो पर्वत पुष्पमयच दिसू लागला. ॥१३॥
तेन चोत्तमवीर्येण पीड्यमानः स पर्वतः ।
सलिलं सम्प्रसुस्राव मदमत्त इव द्विपः ॥ १४ ॥
महापराक्रमी हनुमतांच्या योगे तो पर्वत दबू लागला आणि मदोन्मत हत्तीच्या गंडस्थलातून ज्याप्रमाणे मदाचा स्त्राव होऊ लागतो त्या प्रमाणे त्या (महेन्द्र) पर्वतातून जलस्त्रोत वाहू लागले. ॥१४॥
पीड्यमानस्तु बलिना महेन्द्रस्तेन पर्वतः ।
रीतिर्निर्वर्तयामास काञ्चनाञ्जनराजतीः ॥ १५ ॥
त्या बलाढ्‍य हनुमानाच्या योगे तो पर्वत जेव्हा दडपून जाऊ लागला तेव्हा सोनेरी, रूपेरी आणि कृष्ण वर्णाचे जलस्त्रोत त्यातून निघू लागले. ॥१५॥
मुमोच च शिलाः शैलो विशालाः समनःशिलाः ।
मध्यमेनार्चिषा जुष्टो धूमराजीरिवानलः ॥ १६ ॥
(एवढेच नव्हे तर) हनुमानाच्या दडपणामुळे पीडित होऊ लागलेल्या त्या पर्वतापासून मनः ( ? ? ? = सल्फर) शिलेसह मोठमोठ्‍या विस्तीर्ण शिला खाली पडू लागल्या आणि मध्यभागी ज्वालेने युक्त असलेल्या अग्नीच्या व धुराच्या लोटासारखा तो (पर्वत) दिसू लागला. ॥१६॥
हरिणा पीड्यमानेन पीड्यमानानि सर्वतः ।
गुहाविष्टानि सत्त्वानि विनेदुर्विकृतैः स्वरैः ॥ १७ ॥
या प्रकारे त्या पर्वताच्या पीडेमुळे त्या पर्वतावरील समस्त जीवही पीडीत होऊन गुहेत घुसले आणि तेही कठोर शब्द करून ओरडू लागले. ॥१७॥
स महान् सत्त्वसन्नादः शैलपीडानिमित्तजः ।
पृथिवीं पूरयामास दिशश्च उपवनानि च ॥ १८ ॥
या प्रमाणे पर्वताला पीडा होऊ लागल्यामुळे तेथील श्वापदांनीही एकाएकी प्रचंड गर्जना केली आणि त्या ध्वनीने कोलाहल होऊन दिशा, उपवने यासह सर्व पृथ्वी दुमदुमून गेली. ॥१८॥
शिरोभिः पृथुभिर्नागा व्यक्तस्वस्तिकलक्षणैः ।
वमन्तः पावकं घोरं ददंशुर्दशनैः शिलाः ॥ १९॥
ज्यावरील स्वस्तिक(*+) चिह्न स्पष्ट दिसून येत होते अशा विशाल फणान्तून विषाची भयंकर आग बाहेर टाकीत सर्प आपल्या दातांनी शिलांना दंश करू लागले. ॥१९॥
(*+ सर्पाच्या फणीवर दिसून येणार्‍या नील रेखेला स्वस्तिक म्हणतात)
तास्तदा सविषैर्दष्टाः कुपितैस्तैर्महाशिलाः ।
जज्वलुः पावकोद्दीप्ता बिभिदुश्च सहस्रधा ॥ २० ॥
या प्रमाणे क्रुद्ध झालेल्या विषारी सर्पांनी मोठमोठ्‍या शिलांना दंश केला असता त्या शिलाही अग्निच्या योगाने प्रदीप्त होऊन जळू लागल्या आणि त्या सर्वांचे हजारो हजारो तुकडे उडाले. ॥२०॥
यानि त्वौषधजालानि तस्मिञ्जातानि पर्वते ।
विषघ्नान्यपि नागानां न शेकुः शमितुं विषम् ॥ २१ ॥
त्या पर्वतावर उगवलेल्या अनेक विषघ्न वनस्पतीही त्या नागांचे विष शमविण्यास समर्थ झाल्या नाहीत. ॥२१॥
भिद्यतेऽयं गिरिर्भूतैरिति मत्वा तपस्विनः ।
त्रस्ता विद्याधरास्तस्मादुत्पेतुः स्त्रीगणैः सह ॥ २२ ॥
त्यावेळी महाभूतेच या पर्वताचे तुकडे तुकडे उडवीत आहेत असे समजून (तेथील) तपस्वी त्रस्त झाले आणि भयभीत होऊन विद्याधरही आपल्या स्त्रियांसह त्या पर्वतावरून निघून अन्तरिक्षात चालते झाले. ॥२२॥
पानभूमिगतं हित्वा हैममासवभाजनम् ।
पात्राणि च महार्हाणि करकांश्च हिरण्मयान् ॥ २३ ॥

लेह्यान् उच्चावचान् भक्ष्यान् मांसानि विविधानि च ।
आर्षभाणि च चर्माणि खड्गांश्च कनकत्सरून् ॥ २४ ॥

कृतकण्ठगुणाः क्षीबा रक्तमाल्यानुलेपनाः ।
रक्ताक्षाः पुष्कराक्षाश्च गगनं प्रतिपेदिरे ॥ २५ ॥
पानभूमीवर ठेवलेली सुवर्णाची मद्यपात्रे, सुवर्णाची भोजनपात्रे आणि इतर ठिकाणी असलेली मोठमोठी मूल्यवान्‌ भांडी, सोन्याची उदकपात्रे, नाना प्रकारचे लेह्य आणि भक्ष्य पदार्थ, नाना प्रकारचे फळांचे रस, वृषभचर्माच्या तयार केलेल्या ढाळी आणि सुवर्णजडीत मुठीच्या तलवारी, ही सर्व टाकून, कंठामध्ये माला धारण केलेले, रंगीबेरंगी फुले आणि उट्‍या शरीरावर धारण केलेले आणि कमलाप्रमाणे प्रफुल्ल सुन्दर आणि (मदिरेने) आरक्त नेत्र असलेले बलवान्‌ विद्याधर भयभीत होऊन आकाशात चालते झाले. ॥२३-२५॥
हारनूपुरकेयूरपारिहार्यधराः स्त्रियः ।
विस्मिताः सस्मितास्तस्थुराकाशे रमणैः सह ॥ २६ ॥
गळ्यात चन्द्रहार, पायात नुपूर, भुजांवर बाजूबन्द आणि हातात पाटल्या-बांगड्‍या वगैरे अलङ्‌कार धारण केलेल्या स्मित हास्य करणार्‍या विद्याधर स्त्रियाही एकाएकी आश्चर्यचकित झाल्या आणि आकाशात आपापल्या पतीशेजारी जाऊन उभ्या राहिल्या. ॥२६॥
दर्शयन्तो महाविद्यां विद्याधरमहर्षयः ।
सहितास्तस्थुराकाशे वीक्षांचक्रुश्च पर्वतम् ॥ २७ ॥
विद्याधर आणि महर्षि आपल्या महाविद्येचा (आकाशात निराधार उभे राहण्याच्या शक्तीचा) परिचय करून देत अन्तरिक्षात एकत्रितपणे उभे राहिले आणि त्या पर्वताकडे पाहू लागले. ॥२७॥
शुश्रुवुश्च तदा शब्दमृषीणां भावितात्मनाम् ।
चारणानां च सिद्धानां स्थितानां विमलेऽम्बरे ॥ २८ ॥
त्या वेळी त्यांनी निर्मळ आकाशात उभे असलेल्या पवित्र अन्तःकरणाच्या महर्षि, चारण आणि सिद्धांच्या या (पुढील) गोष्टी ऐकल्या- ॥२८॥
एष पर्वतसंकाशो हनूमान् मारुतात्मजः ।
तितीर्षति महावेगः समुद्रं वरुणालयम् ॥ २९ ॥
अहा ! हे महावेगवान्‌ आणि पर्वतप्राय (शरीराचे) वायुपुत्र हनुमान वरूणालय (वरूणाचे निवासस्थान) असलेल्या समुद्रास उल्लंघून जाण्यास प्रवृत्त झाले आहेत. ॥२९॥
रामार्थं वानरार्थं च चिकीर्षन् कर्म दुष्करम् ।
समुद्रस्य परं पारं दुष्प्रापं प्राप्तुमिच्छति ॥ ३० ॥
(सारांश) श्रीरामाकरिता आणि वानरांकरिता, दुष्कर कर्म करण्यास तयार झालेले हे हनुमान्‌ जेथे जाणें अत्यन्त कठीण आहे अशा समुद्राच्या पलिकडील तीराला जाण्याची इच्छा करीत आहेत. ॥३०॥
इति विद्याधराः वाचः श्रुत्वा तेषां तपस्विनाम् ।
तमप्रमेयं ददृशुः पर्वते वानरर्षभम् ॥ ३१ ॥
अशा प्रकारची आकाशामध्ये संचार करणार्‍या तपस्व्यांची भाषणे ऐकून विद्याधर खाली पाहू लागले तेव्हा त्या पर्वतावर असणारे ते अतर्क्य देह धारण करणारे (अतुल बलशाली) वानरश्रेष्ठ त्यांच्या दृष्टीस पडले. ॥३१॥
दुधुवे च स रोमाणि चकम्पे चानलोपमः ।
ननाद च महानादं सुमहानिव तोयदः ॥ ३२ ॥
त्यावेळी अग्निप्रमाणे तेजःपुञ्ज असलेल्या त्या हनुमानांनी आपले अंग हालवून रोम हलविले आणि महान्‌ मेघाप्रमाणे मोठमोठ्‍याने गर्जनाही केली. ॥३२॥
आनुपूर्व्या च वृत्तं तल्लाङ्‌गूलं रोमभिश्चितम् ।
उत्पतिष्यन् विचिक्षेप पक्षिराज इवोरगम् ॥ ३३ ॥
(हनुमान्‌ आता आकाशात झेप घेण्याची इच्छा करीत होते) म्हणून आरंभापासून एकसारखे गोलाकार असलेले आणि रोमावलीने व्याप्त असलेले आपले शेपूट, पक्षिराज गरूड ज्याप्रमाणे सर्पाला वरचेवर उचलून खाली टाकीत असतो, त्याप्रमाणे वारंवार उचलून भूमीवर आपटू लागले. ॥३३॥
तस्य लाङ्‌गूलमाविद्धमतिवेगस्य पृष्ठतः ।
ददृशे गरुडेनेव ह्रियमाणो महोरगः ॥ ३४ ॥
या प्रमाणे हनुमानांचे पृष्ठभागी असलेले ते अत्यन्त भयंकर शेपूट जेव्हा भूमीवर वारंवार आदळू लागले तेव्हा ते गरूडाच्या तावडीत सापडलेल्या मोठ्‍या भुजंगा प्रमाणे दिसू लागले. ॥३४॥
बाहू संस्तम्भयामास महापरिघसंनिभौ ।
आससाद कपिः कट्यां चरणौ संचुकोच च ॥ ३५ ॥

संहृत्य च भुजौ श्रीमान् तथैव च शिरोधराम् ।
तेजः सत्त्वं तथा वीर्यमाविवेश स वीर्यवान् ॥ ३६ ॥
अशा तर्‍हेने शेपूट खाली वर केल्यावर त्या हनुमान वानराने विशाल परिघाप्रमाणे असलेले आपले हात पर्वतावर ठेवले आणि वर अवसान घेतल्यामुळे कटिप्रदेशाचे ठिकाणी कृश बनून त्यांनी आपले दोन्ही पाय संकुचित केले (आखडून घेतले). नन्तर तेजस्वी आणि पराक्रमी हनुमानाने आपल्या दोन्ही भुजा संकुचित करून कंठप्रदेशाच्या ठिकाणी मानही संकुचित केली आणि त्या समयी त्यांच्या ठिकाणी तेज, शरीरबल आणि पराक्रम - या सर्वांचा आवेश उत्पन्न झाला. ॥३५-३६॥
मार्गमालोकयन् दूरादूर्ध्वप्रणिहितेक्षणः ।
रुरोध हृदये प्राणानाकाशमवलोकयन् ॥ ३७ ॥
नन्तर दूरचा मार्ग अवलोकन करण्यासाठी त्यांनी आपली दृष्टी थोडी वर केली आणि आकाशाकडे पहात पहात हृदयामध्ये प्राणवायूचा निरोध केला. ॥३७॥
पद्‌भ्यां दृढमवस्थानं कृत्वा स कपिकुञ्जरः ।
निकुञ्च्य कर्णौ हनुमानुत्पतिष्यन् महाबलः ॥ ३८ ॥

वानरान् वानरश्रेष्ठ इदं वचनमब्रवीत् ।
नन्तर पर्वतावर पाय घट्‍ट रोवून आणि कान संकुचित करून उड्‍डाण करण्यास तयार झालेले ते महाबलाढ्‍य कपिश्रेष्ठ अन्य वानरांना म्हणाले- ॥३८ १/२॥
यथा राघवनिर्मुक्तः शरः श्वसनविक्रमः ॥ ३९॥

गच्छेत् तद्वद् गमिष्यामि लङ्‌‌कां रावणपालिताम् ।
"ज्याप्रमाणे श्रीरामाने सोडालेला बाण वायुवेगाने जाईल, त्याप्रमाणे मी रावणाने संरक्षण केलेल्या लङ्‌का नगरीमध्ये जाईन. ॥३९ १/२॥ "
नहि द्रक्ष्यामि यदि तां लङ्‌‌कायां जनकात्मजाम् ॥ ४०॥

अनेनैव हि वेगेन गमिष्यामि सुरालयम् ।
"आणि जर लंकेमध्ये ती जनककन्या सीता माझ्या दृष्टीस पडली नाही तर त्याच वेगाने मी स्वर्गलोकाला चालता होईन. ॥४० १/२॥ "
यदि वा त्रिदिवे सीतां न द्रक्ष्यामि कृतश्रमः ॥ ४१ ॥

बद्ध्वा राक्षसराजानमानयिष्यामि रावणम् ।
"परन्तु असे परिश्रम करून जर स्वर्गात ही सीता माझ्या दृष्टीस पडली नाही तर राक्षसराज रावणाला मी बान्धून आणीन. ॥४१ १/२॥ "
सर्वथा कृतकार्योऽहमेष्यामि सह सीतया ॥ ४२ ॥

आनयिष्यामि वा लङ्‌‌कां समुत्पाट्य सरावणाम् ।
आणि सर्वथा कृतकृत्य होऊन मी सीतेसह परत येईन अथवा रावणासह लंकेलाच उपटून घेऊन येईन. ॥४२ १/२॥
एवमुक्त्वा तु हनुमान् वानरान् वानरोत्तमः ॥ ४३॥

उत्पपाताथ वेगेन वेगवानविचारयन् ।
सुपर्णमिव चात्मानं मेने स कपिकुञ्जरः ॥ ४४॥
या प्रमाणे वानरांशी बोलून हनुमान, ते वानरश्रेष्ठ अन्य विघ्न-बाधांचा मनामध्ये काही एक विचार न करता वेगाने वर उड्‍डाण करते झाले. तेव्हा ते कपिकुञ्जर (वानरश्रेष्ठ) स्वतःला उड्‍डाण करण्यात श्रेष्ठ अशा साक्षात गरूडाप्रमाणे मानू लागले. ॥४३-४४॥
समुत्पतति वेगात् तु वेगात् ते नगरोहिणः ।
संहृत्य विटपान् सर्वान् समुत्पेतुः समन्ततः ॥ ४५॥
हनुमान वेगाने उड्‍डाण करू लागताच त्यांच्या वेगाने आकृष्ट होऊन त्या पर्वतावरील वृक्ष ही आपापल्या सर्व शाखा एकत्र करून सर्व बाजूनी उड्‍डाण करू लागले. ॥४५॥
स मत्तकोयष्टिभकान् पादपान् पुष्पशालिनः ।
उद्वहनुरुवेगेन जगाम विमलेऽम्बरे ॥ ४६॥
याप्रमाणे मत्त टिट्टिभ पक्ष्यांनी युक्त असलेले फुलांनी डंवरलेले वृक्ष आपल्या प्रचंड वेगाने आपल्या बरोबर नेत नेत निर्मल अशा आकाशात हनुमान पुढे जाऊ लागले. ॥४६॥
उरुवेगोत्थिता वृक्षा मुहूर्तं कपिमन्वयुः ।
प्रस्थितं दीर्घमध्वानं स्वबन्धुमिव बान्धवाः ॥ ४७॥
हनुमानाच्या मांड्‍यांच्या वेगामुळे जमीन उखडून बाहेर निघालेले वृक्ष एक मुहूर्तपर्यन्त, दूर देशाला निघालेल्या आपल्या बन्धूंच्या मागोमाग ज्या प्रमाणे बान्धव जात असतात त्यांच्या मागोमाग गेले. ॥४७॥
तमूरुवेगोन्मथिताः सालाश्चान्ये नगोत्तमाः ।
अनुजग्मुर्हनूमन्तं सैन्या इव महीपतिम् ॥ ४८॥
अथवा राजा यांना पोहोंचविण्यास मागे ज्या प्रमाणे सैन्य (सैनिक) जातात त्या प्रमाणे मांड्‍यांच्या वेगामुळे उपटून बाहेर आलेले साल आणि इतरही मोठमोठे वृक्ष त्या हनुमानाच्या मागोमाग चालते झाले. ॥४८॥
सुपुष्पिताग्रैर्बहुभिः पादपैरन्वितः कपिः ।
हनुमान् पर्वताकारो बभूवाद्‌भुतदर्शनः ॥ ४९॥
या प्रमाणे ज्यांच्या अग्रशाखा उत्कृष्ट रीतीने फुलांनी डंवरलेल्या होत्या, असे असंख्य वृक्ष हनुमानाच्या बरोबर जाऊ लागल्याने पर्वताकार हनुमान अद्‍भुत शोभेने संपन्न होऊन शोभू लागले. ॥४९॥
सारवन्तोऽथ ये वृक्षा न्यमज्जल्लवणाम्भसि ।
भयादिव महेन्द्रस्य पर्वता वरुणालये ॥ ५०॥
त्या वृक्षांमध्ये जड जड वृक्ष होते ते तेवढे शेवट पर्यन्त बरोबर न जाता इन्द्राच्या भयाने पंखधारी पर्वत जसे समुद्रात बुडून गेले त्याप्रमाणे जाता जाता वरूणालय रूपी समुद्रात बुडून गेले. ॥५०॥
स नानाकुसुमैः कीर्णः कपिः साङ्‌कुरकोरकैः ।
शुशुभे मेघसंकाशः खद्योतैरिव पर्वतः ॥ ५१॥
आपल्या बरोबर खेचून आणलेल्या वृक्षांच्या कळ्या, किंचित उमळलेली फुले आणि पूर्ण विकसित झालेली फुले यांनी व्याप्त झालेले मेघतुल्य हनुमान काजव्यांनी झगमगणार्‍या पर्वतासारखे शोभू लागले. ॥५१॥
विमुक्तास्तस्य वेगेन मुक्त्वा पुष्पाणि ते द्रुमाः ।
व्यवशीर्यन्त सलिले निवृत्ताः सुहृदो यथा ॥ ५२॥
त्यांच्या वेगाच्या तडाख्यातून सुटलेले प्रफुल्लित वृक्ष , मित्राला पोचविण्याकरिता बरोबर गेलेले इतर मित्र ज्याप्रमाणे मध्ये जलप्रवाह आला असता परत फिरतात त्याप्रमाणे समुद्राचे उदक मध्ये आल्यावर आपली फुले टाकून देऊन उदकामध्ये गडप झाले. ॥५२॥
लघुत्वेनोपपन्नं तद् विचित्रं सागरेऽपतत् ।
द्रुमाणां विविधं पुष्पं कपिवायुसमीरितम् ।
ताराचितं इवाकाशं प्रबभौ स महार्णवः ॥ ५३॥
हनुमानाच्या शरीरामुळे उत्पन्न झालेल्या वायुवेगामुळे वृक्षापासून सुटलेली नाना प्रकारची अद्‍भुत फुले फारच हलकी असल्याने समुद्रात पडली तरी ती तरंगत राहिली होती. (बुडली नाहीत). त्यामुळे त्यांची विचित्र शोभा दिसत होती आणि त्या फुलांच्यामुळे तो महासागर तार्‍यांच्यामुळे सुशोभित अशा आकाशाप्रमाणे शोभत होता. ॥५३॥
पुष्पौघेण सुगन्धेन नानावर्णेन वानरः ।
बभौ मेघ इवोद्यन् वै विद्युद्‌गणविभूषितः ॥ ५४॥
तो उड्‍डाण करणारा हनुमान नाना प्रकारच्या पुष्पसमुदायामुळे विद्युत गणांनी विभूषित मेघाप्रमाणे दिसत होता. ॥५४॥
तस्य वेगसमुद्‌भूतैः पुष्पैस्तोयमदृश्यत ।
ताराभिरिव रामाभिरुदिताभिरिवाम्बरम् ॥ ५५॥
त्याच्या वेगामुळे वृक्षावरून पडलेल्या पुष्पांनी आच्छादित झालेले ते समुद्राचे उदक, उगवलेल्या रमणीय तारकांमुळे आकाश जसे शोभते तसे शोभू लागले. ॥५५॥
तस्याम्बरगतौ बाहू ददृशाते प्रसारितौ ।
पर्वताग्राद् विनिष्क्रान्तौ पञ्चास्याविव पन्नगौ ॥ ५६॥
हनुमानाने उड्‍डाण केल्यावर आकाशात पसरलेल्या त्याच्या दोन्ही भुजा आणि बोटे पसरलेले हात, पर्वत शिखरापासून निघालेल्या पाच फणांच्या, दोन नागाप्रमाणे दिसू लागले. ॥५६॥
पिबन्निव बभौ चापि सोर्मिजालं महार्णवम् ।
पिपासुरिव चाकाशं ददृशे स महाकपिः ॥ ५७॥
अन्तरिक्षामध्ये गेलेले ते हनुमान अधोमुख झाले असतां तरंगासहित महासागरासच पिऊन टाकण्यास प्रवृत्त झाल्या सारखे वाटे तर उर्ध्वमुख झाले असता आकाशासच पिण्याची इच्छा करीत आहेत असे वाटे. ॥५७॥
तस्य विद्युत्प्रभाकारे वायुमार्गानुसारिणः ।
नयने विप्रकाशेते पर्वतस्थाविवानलौ ॥ ५८॥
वायुच्या मार्गाचे अनुसरण करणार्‍या हनुमानाचे विजेप्रमाणे तेजस्वी असलेले नेत्र म्हणजे पर्वतावर दोन ठिकाणी लागलेल्या वणव्याप्रमाणेच भासत चमकत होते. ॥५८॥
पिङ्‌‌गे पिङ्‌‌गाक्षमुख्यस्य बृहती परिमण्डले ।
चक्षुषी सम्प्रकाशेते चन्द्रसूर्याविव स्थितौ ॥ ५९॥
आस-पास प्रभामंडलाने युक्त असलेले त्या कपिश्रेष्ठ हनुमानाचे पिंगट वर्णाचे मोठ मोठे तेजस्वी डोळे आकाशान्त जणु चन्द्र आणि सूर्यच आहेत की काय असे दिसू लागले. ॥५९॥
मुखं नासिकया तस्य ताम्रया ताम्रमाबभौ ।
सन्ध्यया समभिस्पृष्टं यथा तत्सूर्यमण्डलम् ॥ ६० ॥
सन्ध्याकालीन आकाशामुळे सूर्यमंडल ज्याप्रमाणे लाल दिसू लागले त्यामुळे लाल-लाल नासिकेमुळे हनुमानाचे मुखमंडळही ताम्रवर्ण दिसू लागले. ॥६०॥
लाङ्‌गूलं च समाविद्धं प्लवमानस्य शोभते ।
अंबरे वायुपुत्रस्य शक्रध्वज इवोच्छ्रितम् ॥ ६१ ॥
ते वायुपुत्र हनुमान आकाशात उड्‍डाण करीत असतांना अग्रभागी आकडी वळून उभारलेले त्यांचे पुच्छ अन्तरिक्षात उभारलेल्या इंन्द्राच्या ध्वजेप्रमाणे दिसत होते. ॥६१॥
लाङ्‌गूलचक्रो हनुमान् शुक्लदंष्ट्रोऽनिलात्मजः ।
व्यरोचत महाप्राज्ञः परिवेषीव भास्करः ॥ ६२॥
महाबुद्धिमान्‌ हनुमानाचे दात पांढरे शुभ्र होते आणि पुच्छ गोलाकार वळलेले होते त्यामुळे परिघांनी वेढलेल्या सूर्यासारखे तेजस्वी दिसूं लागले. ॥६२॥
स्फिग्देशेनातिताम्रेण रराज स महाकपिः ।
महता दारितेनेव गिरिर्गैरिकधातुना ॥ ६३॥
त्यांच्या कमरेचा खालचा भाग अत्यन्त लाल होता, त्यामुळे ते महाकपि खाणीतून काढलेल्या गैरिक धातूच्या शिलेने एखादा पर्वत शोभतो त्याप्रमाणे शोभू लागले. ॥६३॥
तस्य वानरसिंहस्य प्लवमानस्य सागरम् ।
कक्षान्तरगतो वायुः जीमूत इव गर्जति ॥ ६४॥
वानरश्रेष्ठ हनुमान समुद्र उल्लंघन करू लागले तेव्हा त्यांच्या काखेंमधून वाहणारा वायु मेघाप्रमाणे गर्जना करू लागला. ॥६४॥
खे यथा निपतत्युल्का उत्तरान्ताद् विनिःसृता ।
दृश्यते सानुबन्धा च तथा स कपिकुञ्जरः ॥ ६५॥
आकाशात उत्तर दिशेकडून निघालेली आणि अन्य लहान लहान उल्कांनी व्याप्त झाल्याने पुच्छयुक्त वाटणारी उल्का, ज्याप्रमाणे पडता-पडता दृष्टीस पडते, त्याप्रमाणे आपल्या पुच्छामुळे, ते दिसू लागले. ॥६५॥
पतत्पतङ्‌‌गसंकाशो व्यायतः शुशुभे कपिः ।
प्रवृद्ध इव मातङ्‌‌गः कक्ष्यया बद्ध्यमानया ॥ ६६॥
आकाशातून गमन करणार्‍या सूर्याप्रमाणे ते विशाल शरीराचे कपि, पूर्ण वाढ झालेला गज मध्यभागी दोरीने बान्धल्यामुळे जसा शोभतो, तसे कटिप्रदेशाला गुंडाळलेल्या वस्त्राच्या योगे शोभू लागले. ॥६६॥
उपरिष्टाच्छरीरेण च्छायया चावगाढया ।
सागरे मारुताविष्टा नौरिवासीत् तदा कपिः ॥ ६७॥
हनुमानाचे शरीर समुद्राच्या ऊर्ध्वभागी होते आणि अधोभागी सागरामध्ये त्यांचे स्वतःचे प्रतिबिंब पडलेले होते, त्यामुळे ते कपि हनुमान्‌ त्यावेळी समुद्रात असलेल्या नौकेप्रमाणे, जिचा वरील (शीड वगैरे) भाग वायूने परिवेष्टीत आहे आणि खालील भाग समुद्रातील जलास टेकलेला आहे, असे दिसत होते. ॥६७॥
यं यं देशं समुद्रस्य जगाम स महाकपिः ।
स तु तस्याङ्‌‌गवेगेन सोन्माद इव लक्ष्यते ॥ ६८॥
समुद्रावरील ज्या ज्या प्रदेशांवरून तो महाकपि गेला तो तो भाग त्यांच्या मांड्‍याच्या वेगाने प्रक्षुब्ध झाल्यासारखा दिसू लागला. ॥६८॥
सागरस्योर्मिजालानां उरसा शैलवर्ष्मणाम् ।
अभिघ्नंस्तु महावेगः पुप्लुवे स महाकपिः ॥ ६९॥
अत्यन्त वेगवान्‌ महाकपि हनुमान आपल्या विशाल छातीच्या योगे महासागराच्या पर्वताप्रमाणे उंच अशा तरंग मालांना तोडीत (त्यांचा चुरा करीत) पुढे जाऊ लागले. ॥६९॥
कपिवातश्च बलवान् मेघवातश्च निर्गतः ।
सागरं भीमनिर्ह्रादं कम्पयामासतुर्भृशम् ॥ ७०॥
त्या कपिने, आपल्या गतीने निर्माण केलेला प्रचंड वायु आणि मेघमंडलातून बाहेर पडलेला वायु या दोन्ही मुळे भयंकर गर्जना करणार्‍या सागरात अतिशय खळबळ माजली. ॥७०॥
विकर्षनूर्मिजालानि बृहन्ति लवणाम्भसि ।
पुप्लुवे कपिशार्दूलो विकिरन्निव रोदसी ॥ ७१॥
अशा रीतीने आपल्या प्रचंड वेगाने समुद्रात मोठमोठ्‍या लाटा अधिकच उंच उंच होण्यास कारणीभूत होणारे ते कपिकेसरी पृथ्वी आणि आकाश आहेत त्यापेक्षा ही जास्त पृथक करीतच की काय, असे (समुद्र) उल्लंघून जाऊ लागले. ॥७१॥
मेरुमन्दरसंकाशानुद्‌गतान् सुमहार्णवे ।
अत्यक्रामन्महावेगस्तरङ्‌‌गान् गणयन्निव ॥ ७२॥
ते महावेगवान्‌ हनुमान त्या महासागरात मेरू आणि मन्दार पर्वताप्रमाणे उंच उसळणार्‍या प्रचंड लाटांची जणु काय गणना करीत करीतच पुढे जात राहिले. ॥७२॥
तस्य वेगसमुद्‌घुष्टं जलं सजलदं तदा ।
अंबरस्थं विबभ्राजे शरदभ्रमिवाततम् ॥ ७३॥
त्यावेळी त्या हनुमानाच्या वेगाने समुद्रातून उसळलेले आणि मेघमंडलापर्यन्त उंच गेलेले जल आकाशात असतांना शरद-ऋतूतील विशाल मेघाप्रमाणे भासू लागले. ॥७३॥
तिमिनक्रझषाः कूर्मा दृश्यन्ते विवृतास्तदा ।
वस्त्रापकर्षणेनेव शरीराणि शरीरिणाम् ॥ ७४॥
तसेच वस्त्र दूर केले असता देहधारी प्राण्यांची शरीरे जशी उघडी पडतात त्याप्रमाणे हनुमानाच्या उड्‍डाणाच्या वेगाने पाणी बाजूला झाल्याने त्या सागरात राहाणारे तिमि नावाचे मोठे मासे, तसेच मगरी, सुसरी, मासे आणि कासवे हे समुद्राच्या पृष्ठभागी दिसू लागले. ॥७४॥
क्रममाणं समीक्ष्याथ भुजङ्‌‌गाः सागरंगमाः ।
व्योम्नि तं कपिशार्दूलं सुपर्णमिव मेनिरे ॥ ७५॥
आकाशातून जाणार्‍या त्या कपिश्रेष्ठ हनुमानास पाहून समुद्रातील भुजंगांना हा गरूडच जात आहे की काय, असे वाटू लागले. ॥७५॥
दशयोजनविस्तीर्णा त्रिंशद्योजनमायता ।
छाया वानरसिंहस्य जवे चारुतराभवत् ॥ ७६॥
दहा योजने रून्द आणि तीस योजने लांब असलेली त्या कपिकेसरी हनुमानाची छाया, त्याच्या वेगामुळे अत्यन्त रमणीय (मनोहर) दिसत होती. ॥७६॥
श्वेताभ्रघनराजीव वायुपुत्रानुगामिनी ।
तस्य सा शुशुभे छाया पतिता लवणाम्भसि ॥ ७७॥
पवनपुत्र हनुमान आकाशातून जाऊ लागले असतां त्यांचे अनुसरण करणारी त्यांची, खार्‍या पाण्याच्या समुद्रात पडलेली ती छाया, श्वेतवर्णाच्या मेघांच्या पंक्तींप्रमाणे शोभत होती. ॥७७॥
शुशुभे स महातेजा महाकायो महाकपिः ।
वायुमार्गे निरालम्बे पक्षवानिव पर्वतः ॥ ७८॥
ते परम तेजस्वी आणि धिप्पाड महाकपि हनुमान, निराधार आकाशातून चालले असतांना, एखादा पंखाने युक्त पर्वतच की काय, असे शोभू लागले. ॥७८॥
येनासौ याति बलवान् वेगेन कपिकुञ्जरः ।
तेन मार्गेण सहसा द्रोणाकृत इवार्णवः ॥ ७९॥
ज्या मार्गाने ते बलाढ्‍य कपिश्रेष्ठ हनुमान जात होते त्या मार्गाने जे समुद्र मेघांना त्यांचे धक्के बसत असल्यामुळे त्यांच्या पासून होणारा जलस्त्राव, एखाद्या कृत्रिम पर्जन्य यन्त्रातून पडणार्‍या जलधारांनी युक्त असल्यासारखा दिसत होता (*+). ॥७९॥(*+- राजे-रजवाड्‍यांच्या बागान्तून नाना प्रकारची क्रीडास्थाने केलेली असतात आणि या अनेक क्रीडास्थानांच्या मध्ये, ज्यात वरच्या बाजूस हजारे बसविलेल्या पाण्याच्या नळ्या नेल्या असून इच्छेस येईल तेव्हा कृत्रिम पर्जन्य पाडता येण्याची व्यवस्था केलेली असते, त्या यन्त्राचा हा उल्लेख आहे)
आपाते पक्षिसङ्‌‍घानां पक्षिराज इव व्रजन् ।
हनुमान् मेघजालानि प्रकर्षन् मारुतो यथा ॥ ८०॥
आकाशातून पक्षीगणांच्या मार्गाने, पक्षिराज गरूडाप्रमाणे जाणारे हनुमान वायुप्रमाणे आपल्याबरोबर मेघसमुदायांनाही ओढत नेऊ लागले. ॥८०॥
पाण्डुरारुणवर्णानि नीलमाञ्जिष्ठकानि च ।
कपिनाऽऽकृष्यमाणानि महाभ्राणि चकाशिरे ॥ ८१ ॥
हनुमानाच्या द्वारा खेंचले जाणारे ते श्वेत, आरक्त, नील आणि पाटल वर्णाचे मोठ मोठे मेघ, तेथे फारच शोभून दिसत होते. ॥८१॥
प्रविशन्नभ्रजालानि निष्पतंश्च पुनः पुनः ।
प्रच्छन्नस्य प्रकाशश्च चन्द्रमा इव दृश्यते ॥ ८२॥
वारंवार मेघसमुदायात शिरून, वारंवार त्यान्तून बाहेर पडणारे हनुमान, हे वरचेवर मेघांनी आच्छादित होणार्‍या आणि वारंवार त्यान्तून बाहेर पडणार्‍या चन्द्राप्रमाणे दिसत होते. ॥८२॥
प्लवमानं तु तं दृष्ट्‍वा प्लवङ्‌‌गं त्वरितं तदा ।
ववृषुस्तत्र पुष्पाणि देवगधर्वचारणाः ॥ ८३॥
त्यावेळी आकाशमार्गाने तीव्र गतीने उड्‍डाण करणार्‍या त्या वानरवीराला पाहून देवता, गन्धर्व आणि चारण यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. ॥८३॥
तताप न हि तं सूर्यः प्लवन्तं वानरेश्वरम् ।
सिषेवे च तदा वायू रामकार्यार्थसिद्धये ॥ ८४॥
हनुमान, श्रीरामचन्द्राचे कार्य करण्याकरिता जात असल्याने आकाशगमन करणार्‍या त्या वानराधिपतिला सूर्याने ताप दिला नाही आणि वायूने ही त्यांचा श्रमपरिहार होण्याकरिता त्यांची सेवाच केली. ॥८४॥
ऋषयस्तुष्टुवुश्चैनं प्लवमानं विहायसा ।
जगुश्च देवगन्धर्वाः प्रशंसन्तो वनौकसम् ॥ ८५॥
आकाशमार्गाने उड्‍डाण करून जात असलेल्या त्या अत्यन्त तेजस्वी हनुमानांची ऋषि स्तुति करू लागले. देव आणि गन्धर्वही त्यांची प्रशंसा करण्यासाठी गीत गाऊ लागले. ॥८५॥
नागाश्च तुष्टुवुर्यक्षा रक्षांसि विविधानि च ।
प्रेक्ष्य सर्वे कपिवरं सहसा विगतक्लमम् ॥ ८६॥
त्या कपिश्रेष्ठ हनुमानांना जराही थकवा न येतां पुढे जातांना पाहून नाग, यक्ष आणि नाना प्रकारचे राक्षस, सर्व त्यांची एकदम स्तुति करू लागले. ॥८६॥
तस्मिन् प्लवगशार्दूले प्लवमाने हनूमति ।
इक्ष्वाकुकुलमानार्थी चिन्तयामास सागरः ॥ ८७॥
ते कपिकेसरी हनुमान आकाशामध्ये उड्‍डाण करून जात असता इक्ष्वाकु कुळाचा सत्कार करण्याची इच्छा करणारा सागर आपल्याशी विचार करू लागला- ॥८७॥
साहाय्यं वानरेन्द्रस्य यदि नाहं हनूमतः ।
करिष्यामि भविष्यामि सर्ववाच्यो विवक्षताम् ॥ ८८॥
मी जर वानरराज हनुमन्ताला सहाय्य केले नाही तर ज्यांना वाणी आहे त्या सर्व प्राण्यांच्या दृष्टीने मी सर्वथा निन्देस पात्र होईन. ॥८८॥
अहमिक्ष्वाकुनाथेन सगरेण विवर्द्धितः ।
इक्ष्वाकुसचिवश्चायं तन्नार्हत्यवसादितुम् ॥ ८९॥
इक्ष्वाकुकुलाधिपति महाराज सगर यांनी मला वाढविले आहे. आणि या समयी हे हनुमान इक्ष्वाकुवंशराजा रामचन्द्रास मदत करीत आहेत; या करिता हे थकून जाता उपयोगी नाही (या यात्रेत त्यांना कुठल्याही प्रकारचे कष्ट होता कामा नयेत) ॥८९॥
तथा मया विधातव्यं विश्रमेत यथा कपिः ।
शेषं च मयि विश्रान्तः सुखी सोऽतितरिष्यति ॥ ९०॥
म्हणून मला असा काही उपाय केला पाहिजे की ज्यायोगे या वानरवीरास थोडी विश्रान्ती घेता येईल, माझ्या ठिकाणी यांनी विश्रान्ती घेतली तर शिल्लक राहिलेला मार्ग हे सहज आक्रमू शकतील. ॥९०॥
इति कृत्वा मतिं साध्वीं समुद्रश्छन्नमम्भसि ।
हिरण्यनाभं मैनाकमुवाच गिरिसत्तमम् ॥ ९१॥
असा उत्कृष्ट विचार करून तो समुद्र आपल्या उदकाने आच्छादित होऊन राहिलेल्या सुवर्णमय पर्वतश्रेष्ठ मैनाकाला म्हणाला की - ॥९१॥
त्वं इहासुरसङ्‌‌घानां देवराज्ञा महात्मना ।
पातालनिलयानां हि परिघः संनिवेशितः ॥ ९२॥
हे गिरिश्रेष्ठा ! देवराज इन्द्राने तुला या ठिकाणी पातालनिवासी असुरांचा मार्ग अडविण्यासाठी अडसर (पतिघ) म्हणून ठेवला आहे. ॥९२॥
त्वमेषां ज्ञातवीर्याणां पुनरेवोत्पतिष्यताम् ।
पातालस्याप्रमेयस्य द्वारं आवृत्य तिष्ठसि ॥ ९३॥
ते उपजत पराक्रमी असुर फिरून फिरून वर येण्याची इच्छा करीत असतात, म्हणून त्या असुरांचे अतर्क्य असे जे पातालस्थान, त्याच्या द्वाराचा निरोध, तू करून राहिला आहेस. ॥९३॥
तिर्यगूर्ध्वमधश्चैव शक्तिस्ते शैल वर्धितुम् ।
तस्मात् संचोदयामि त्वामुत्तिष्ठ गिरिसत्तम ॥ ९४॥
हे पर्वता ! बाजूला, उर्ध्वभागी आणि अधोभागी सर्वबाजूस वाढण्याचे सामर्थ्य तुझ्या अंगी आहे. म्हणून हे गिरिश्रेष्ठा ! मी तुला आज्ञा देत आहे की तू वर ये. ॥९४॥
स एष कपिशार्दूलस्त्वामुपर्येति वीर्यवान् ।
हनूमान् रामकार्यार्थी भीमकर्मा खमाप्लुतः ॥ ९५॥
पहा ! हे पराक्रमी कपिकेसरी तुझ्यावरून उड्‍डाण करून जात आहेत. हे अचाट कर्मे करणारे हनुमान रामकार्य करण्याचा उद्देश्य मनात धरून आकाशामार्गे उड्‍डाण करीत चालले आहेत. ॥९५॥
अस्य साह्यं मया कार्यमिक्ष्वाकुकुलवर्तिनः ।
मम इक्ष्वाकवः पूज्याः परं पूज्यतमास्तव ॥ ९६॥
हे इक्ष्वाकुवंशी रामाचे सेवक आहेत म्हणून मला त्यांस सहाय्य केले पाहिजे. इक्ष्वाकुवंशाचे लोक मला पूजनीय आहेत आणि तुझ्यासाठी तर ते परम पूजनीय आहेत. ॥९६॥
कुरु साचिव्यमस्माकं न नः कार्यमतिक्रमेत् ।
कर्तव्यमकृतं कार्यं सतां मन्युमुदीरयेत् ॥ ९७॥
म्हणून तू मला सहाय्य कर म्हणजे आपले कर्तव्य-कर्म करण्याची (हनुमानाच्या सत्काररूपी कार्य करण्याची) सन्धी आपल्या हातून सुटणार नाही. जर कर्तव्याचे पालन केले गेले नाही तर ते सत्पुरूषांचा क्रोध जागृत करण्यास कारणीभूत होते. ॥९७॥
सलिलादूर्ध्वमुत्तिष्ठ तिष्ठत्वेष कपिस्त्वयि ।
अस्माकमतिथिश्चैव पूज्यश्च प्लवतां वरः ॥ ९८॥
म्हणून तू पाण्यातून वर ये म्हणजे उड्‍डाण करण्यात प्रवीण असे हे श्रेष्ठ कपि हनुमान तुझ्यावर काही काळ विश्रान्ती घेतील. ते आपले पूजनीय अतिथिही आहेत. ॥९८॥
चामीकरमहानाभ देवगन्धर्वसेवित ।
हनुमांस्त्वयि विश्रान्तः ततः शेषं गमिष्यति ॥ ९९॥
देवता आणि गन्धर्व ज्यांची सेवा करतात आणि; सुवर्णमय असणार्‍या हे मैनाका ! तुझ्यावर विश्रान्ती घेतल्या नन्तर हनुमान ऊर्वरीत मार्ग सुखाने पार करून जातील. वर यावेस, हे बरे ! ॥९९॥
काकुत्स्थस्यानृशंस्यं च मैथिल्याश्च विवासनम् ।
श्रमं च प्लवगेन्द्रस्य समीक्ष्योत्थातुमर्हसि ॥ १०० ॥
काकुस्थवंशी श्रीरामचन्द्रांची दयाद्रता, मिथिलेश कुमारी सीतेला विवश होऊन परदेशात वास्तव्य करावे लागणे आणि वानरराज हनुमानाचे परिश्रम, हे सर्व पाहून तू वर येणे अत्यन्त आवश्यक आहे. ॥१००॥
हिरण्यनाभो मैनाको निशम्य लवणाम्भसः ।
उत्पपात जलात् तूर्णं महाद्रुमलतावृतः ॥ १०१ ॥
हे ऐकून मोठमोठ्‍या वृक्षांनी आणि लतांनी व्याप्त असलेला, सुवर्णमय मैनाक पर्वत त्वरित खार्‍या समुद्राच्या जलातून वर आला. ॥१०१॥
स सागरजलं भित्त्वा बभूवात्युच्छ्रितस्तदा ।
यथा जलधरं भित्त्वा दीप्तरश्मिर्दिवाकरः ॥ १०२॥
महासागराचे उदक भेदून तो पर्वत अतिशय उंच झाला तेव्हां तो मेघांचा भेद करून बाहेर पडणार्‍या तेजस्वी किरणांच्या सूर्याप्रमाणे दिसू लागला. ॥१०२॥
स महात्मा मुहूर्तेन पर्वतः सलिलावृतः ।
दर्शयामास शृङ्‌‌गाणि सागरेण नियोजितः ॥ १०३॥
थोडक्यात सागराने आज्ञा केल्यानन्तर जलाने आच्छादित त्या विशाल (मैनाक) पर्वताने एका मुहूर्तामध्ये (दोन घटिकांमध्ये) आपली सर्व शिखरे प्रगट केली. (आपल्या सर्व शिखरांचे दर्शन घडविले) ॥१०३॥
शातकुम्भमयैः शृङ्‌‌गैः सकिन्नरमहोरगैः ।
आदित्योदयसंकाशैरुलिखद्‌भिरिवाम्बरम् ॥ १०४॥
त्या पर्वताची ती शिखरे सुवर्णमय होती. त्यांच्यावर किन्नर आणि मोठ मोठे नाग निवास करीत होते. ती शिखरे उदयाचलाप्रमाणे गगनचुंबित होती, त्यामुळे असे वाटत होते की ती जणु काही आकाशात रेखाच काढीत आहेत. ॥१०४॥
तप्तजाम्बूनदैः शृङ्‌‌गैः पर्वतस्य समुत्थितैः ।
आकाशं शस्त्रसंकाशमभवत् काञ्चनप्रभम् ॥ १०५॥
त्या पर्वताच्या वर आलेल्या सुवर्णमय शिखरामुळे, शस्त्रासारख्या नील वर्णाचे आकाश, सुवर्णासारखे तेजस्वी दिसू लागले. ॥१०५॥
जातरूपमयैः शृङ्‌‌गैर्भ्राजमानैमहाप्रभैः ।
आदित्यशतसंकाशः सोऽभवद् गिरिसत्तमः ॥ १०६॥
त्या परम कान्तिमान आणि तेजस्वी सुवर्णमय शिखरांमुळे तो श्रेष्ठ पर्वतही शेकडो सूर्यांसारखा तेजस्वी दिसू लागला. ॥१०६॥
तमुत्थितमसङ्‌‌गेन हनुमानग्रतः स्थितम् ।
मध्ये लवणतोयस्य विघ्नोऽयमिति निश्चितः ॥ १०७॥
याप्रमाणे खार्‍या समुद्रामध्ये एकाएकी वर उद्‍भवलेल्या मैनाक पर्वताला पाहून हे एक विघ्नच उपस्थित झाले आहे असा हनुमानाचा पक्का निश्चय झाला. ॥१०७॥
स तमुच्छ्रितमत्यर्थं महावेगो महाकपिः ।
उरसा पातयामास जीमूतमिव मारुतः ॥ १०८॥
म्हणून वायु जसा मेघाला उडवून लावतो त्याप्रमाणे त्या अत्यन्त वेगवान्‌ महाकपिने समुद्रातून अतिशय वर आलेल्या त्या मैनाक पर्वताला आपल्या छातीचा तडाखा देऊन खाली पाडले. ॥१०८॥
स तदासातितस्तेन कपिना पर्वतोत्तमः ।
बुद्ध्वा तस्य हरेर्वेगं जहर्ष च ननाद च ॥ १०९॥
या प्रमाणे त्या कपिने पर्वतश्रेष्ठ मैनाकाला खाली पाडले असतां त्याच्या महान वेगाचा अनुभव आल्याने, तो मैनाक पर्वत हर्षयुक्त होऊन, प्रसन्न होऊन गर्जना करू लागला. ॥१०९॥
तमाकाशगतं वीरमाकाशे समुपस्थितः ।
प्रीतो हृष्टमना वाक्यमब्रवीत् पर्वतः कपिम् ॥ ११० ॥

मानुषं धारयन् रूपमात्मनः शिखरे स्थितः ।
इतकेच नव्हे तर त्या आकाशात स्थित झालेल्या पर्वताने आकाशमार्गाने जाणार्‍या त्या वानरवीरावर प्रसन्न होऊन मनुष्यरूप धारण केले आणि आपल्याच शिखरावर स्थित होऊन अन्तरिक्षामध्ये असलेल्या हनुमानाला म्हणाला - ॥११० १/२॥
दुष्करं कृतवान् कर्म त्वमिदं वानरोत्तम ॥ १११ ॥

निपत्य मम शृङ्‌‌गेषु सुखं विश्रम्य गम्यताम् ।
हे वानरश्रेष्ठा ! तुम्ही हे (फारच) दुष्कर कर्म केले आहे; या करिता तुम्ही आता माझ्या या शिखरावर उतरून खुशाल विश्रान्ति घ्या आणि मग पुढे जावे. ॥१११ १/२॥
राघवस्य कुले जातैरुदधिः परिवर्धितः ॥ ११२ ॥

स त्वां रामहिते युक्तं प्रत्यर्चयति सागरः ।
राघवांच्या पूर्वजांनी समुद्राची वृद्धि केली होती (सगरांनी समुद्राला वाढविले होते) आणि म्हणून तो सागर श्रीरामाच्या हितासाठी प्रवृत्त झालेल्या तुमचा आदर-सत्कार करू इच्छित आहे. ॥११२ १/२॥
कृते च प्रतिकर्तव्यं एष धर्मः सनातनः ॥ ११३॥

सोऽयं त्वत्प्रतिकारार्थी त्वत्तः सम्मानमर्हति ।
त्वन्निमित्तमनेनाहं बहुमानात्प्रचोदितः ॥ ११४॥

योजनानां शतं चापि कपिरेष खमाप्लुतः ।
तव सानुषु विश्रान्तः शेषं प्रक्रमतामिति ॥ ११५ ॥
कारण एखाद्याने आपल्यावर उपकार केला असता त्याच्यावर आपणही उपकार करावा, हा सनातन धर्म आहे. या दृष्टीने प्रत्युपकार करण्याची इच्छा करणारा सागर तुमच्या द्वारे सन्मान मिळण्यास योग्य आहे (तू त्याचा सत्कार ग्रहण कर म्हणजे एवढ्‍यानेही त्याचा सन्मान होईल) तुझ्या सत्कारासाठी समुद्राने मोठ्‍या आदराने मला नियुक्त केले आहे. शंभर योजने उल्लंघून जाण्याच्या उद्देशाने या कपिने आकाशात उड्‍डाण केले आहे म्हणून तुझ्या शिखरावर विश्रान्ती घेतल्यानन्तर त्याने राहिलेला मार्ग आक्रमण करावा असे समुद्राने सांगितले आहे. ॥११३-११५॥
तिष्ठ त्वं हरिशार्दूल मयि विश्रम्य गम्यताम् ।
तदिदं गन्धवत् स्वादु कन्दमूलफलं बहु ॥ ११६॥

तदास्वाद्य हरि श्रेष्ठ विश्रान्तोऽथ गमिष्यसि ।
म्हणून ही सुगन्धी आणि स्वादिष्ट असलेली अनेक प्रकारची मुळे, कन्द आणि फळे तुम्ही खा आणि विश्रान्ती घेतल्यानन्तर, हे वानरश्रेष्ठा ! तुम्ही पुढे जा. ॥११६ १/२॥
अस्माकमपि सम्बन्धः कपिमुख्य त्वयास्ति वै ।
प्रख्यातस्त्रिषु लोकेषु महागुणपरिग्रहः ॥ ११७॥
हे कपिश्रेष्ठा ! तुमच्याशीही आमचा संबन्ध आहे. तुमच्या अंगी महान्‌ गुणांचा संग्रह असल्याने तुम्ही त्रैलोक्यात प्रसिद्ध आहात. ॥११७॥
वेगवन्तः प्लवन्तो ये प्लवगा मारुतात्मज ।
तेषां मुख्यतमं मन्ये त्वामहं कपिकुञ्जर ॥ ११८॥
हे वायुपुत्रा ! हे वानरश्रेष्ठा ! जे जे वेगवान्‌ आणि उड्‍डाण करणारे वानर आहेत त्या सर्वांमध्ये तुम्हीच श्रेष्ठ आहात असे मी समजतो. ॥११८॥
अतिथिः किल पूजार्हः प्राकृतोऽपि विजानता ॥
धर्मं जिज्ञासमानेन किं पुनर्यादृशो महान् ॥ ११९॥
धर्माची जिज्ञासा असणार्‍या विचारी पुरूषाला साधारण अतिथीही खरोखर पूज्य आहे मग तुमच्या सारख्या असाधारण शौर्य संपन्न पुरूषांबद्दल इकाय सांगावे ? ॥११९॥
त्वं हि देववरिष्ठस्य मारुतस्य महात्मनः ॥
पुत्रस्तस्यैव वेगेन सदृशः कपिकुञ्जर ॥ १२० ॥
************************
हे कपिश्रेष्ठा ! तुम्ही देवांमध्ये वरिष्ठ आणि महात्मा अशा वायूचे पुत्र आहात आणि वेगातही त्यांच्या सारखेच आहात. ॥१२०॥
पूजिते त्वयि धर्मज्ञे पूजां प्राप्नोति मारुतः ।
तस्मात् त्वं पूजनीयो मे शृणु चाप्यत्र कारणम् ॥ १२१ ॥
तुम्ही धर्माचे ज्ञाते आहात. तुमची पूजा झाली असता साक्षात वायुदेवाचीच पूजा घडेल म्हणून तुम्ही मला अवश्य पूजनीय आहात. या साठी आणखीही एक कारण आहे, ते ऐका- ॥१२१॥
पूर्वं कृतयुगे तात पर्वताः पक्षिणोऽभवन् ।
ते हि जग्मुर्दिशः सर्वा गरुडा इव वेगिनः ॥ १२२॥
हे तात ! पूर्वी कृतयुगामध्ये पर्वतांना पंख होते आणि ते वेगवान्‌ गरूड पक्ष्याप्रमाणे सर्व दिशांस उडत जात असत. ॥१२२॥
ततस्तेषु प्रयातेषु देवसङ्‌‌घाः सहर्षिभिः ।
भूतानि च भयं जग्मुः तेषां पतनशङ्‌‌कया ॥ १२३॥
त्यांच्या या प्रकारे वेगपूर्वक उडण्यामुळे आणि येण्या-जाण्यामुळे देवता, ऋषि आणि समस्त प्राणी यांना त्यांच्या पडण्याची शंका येऊन भय उत्पन्न झाले. ॥१२३॥
ततः क्रुद्धः सहस्राक्षः पर्वतानां शतक्रतुः ।
पक्षांश्चिच्छेद वज्रेण ततः शतसहस्रशः ॥ १२४॥
यामुळे सहस्त्रनयन इन्द्र रागावला आणि त्याने वज्राच्या योगाने पर्वतांच्या पंखांचे लक्षावधी तुकडे करून टाकले. ॥१२४॥
स मामुपगतः क्रुद्धो वज्रमुद्यम्य देवराट् ।
ततोऽहं सहसा क्षिप्तः श्वसनेन महात्मना ॥ १२५॥
त्यावेळी तो क्रुद्ध झालेला इन्द्र वज्र उगारून माझ्याकडेही आला असता महात्मा वायूने मला एकाएकी या समुद्रात ढकलून दिले. ॥१२५॥
अस्मिँल्लवणतोये च प्रक्षिप्तः प्लवगोत्तम ।
गुप्तपक्षः समग्रश्च तव पित्राभिरक्षितः ॥ १२६॥
हे वानरश्रेष्ठा ! अशा रीतीने तुझ्या पित्याने संपूर्ण शरीर आणि पंख यासह माझे संरक्षण केले. ॥१२६॥
ततोऽहं मानयामि त्वां मान्योऽसि मम मारुते ।
त्वया ममैष सम्बन्धः कपिमुख्य महागुणः ॥ १२७॥
हे वायुपुत्रा ! हे कपिश्रेष्ठा ! म्हणून तुम्ही मला आदरणीय आहात, मी तुमचा सन्मान करतो. तुमच्याशी असलेला हा माझा संबन्ध फारच महत्वाचा आहे (महान गुणांनी युक्त आहे). ॥१२७॥
अस्मिन्नेवंगते कार्ये सागरस्य ममैव च ।
प्रीतिं प्रीतमनाः कर्तुं त्वमर्हसि महामते ॥ १२८॥
एवढ्‍याकरिताच हे महाबुद्धिमान्‌ हनुमाना, दीर्घकाळानन्तर हे जे प्रत्युपकाररूप कार्य (तुमच्या पित्याच्या उपकारातून उऋण होण्याची सन्धी) प्राप्त झाले आहे, त्यासंबन्धी तुम्ही प्रसन्नचित्ताने समुद्राचा आणि माझा मनोरथ पूर्ण करा. (आमचे आतिथ्य स्वीकारून आम्हांला सन्तुष्ट करा.) ॥१२८॥
श्रमं मोक्षय पूजां च गृहाण हरिसत्तम ।
प्रीतिं च मम मान्यस्य प्रीतोऽस्मि तव दर्शनात् ॥ १२९॥
हे वानरश्रेष्ठा ! श्रमपरिहार करून तुम्ही या माझ्या सत्काराचा स्वीकार करा आणि माझ्या प्रेमाचाही स्वीकार करा. तुमच्या सारख्या माननीय पुरूषाच्या दर्शनाने मी अत्यन्त प्रसन्न झालो आहे. ॥१२९॥
एवमुक्तः कपिश्रेष्ठः तं नगोत्तममब्रवीत् ।
प्रीतोऽस्मि कृतमातिथ्यं मन्युरेषोऽपनीयताम् ॥ १३० ॥
मैनाकाने असे म्हटल्यावर कपिश्रेष्ठ हनुमान त्या उत्तम पर्वतास म्हणाले- मैनाक ! मलाही तुझी भेट झाल्याने मीही प्रसन्न झालो आहे. माझे आतिथ्य झाले आहे. आता तू तुझ्या मनान्तून हे दुःख अथवा चिन्ता काढून टाक की याने माझी पूजा स्वीकारली नाही. ॥१३०॥
त्वरते कार्यकालो मे अहश्चाप्यतिवर्तते ।
प्रतिज्ञा च मया दत्ता न स्थातव्यमिहान्तरा ॥ १३१ ॥
मला कार्य करायला वेळ थोडाच आहे. दिवस ही सरत चालला आहे. मी वानराञ्जवळ अशी प्रतिज्ञा केली आहे की येथे मध्यन्तरी कोठे ही थांबावयाचे नाही. ॥१३१॥
इत्युक्त्वा पाणिना शैलमालभ्य हरिपुङ्‌‌गवः ।
जगामाकाशमाविश्य वीर्यवान् प्रहसन्निव ॥ १३२॥
असे म्हणून त्या वानरश्रेष्ठ हनुमानांनी हसत हसत त्या मैनाक पर्वताला स्पर्श केला आणि पुन्हा आकाशमार्गाचे अवलंबन करून ते वीर्यवान पुढे चालते झाले. ॥१३२॥
स पर्वतसमुद्राभ्यां बहुमानादवेक्षितः ।
पूजितश्चोपपन्नाभिराशीर्भिरभिनन्दितः ॥ १३३॥
त्यावेळी पर्वत आणि समुद्र यांनी अत्यन्त आदराने त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांचा सत्कार करून यथोचित आशीर्वादाने त्या वायुपुत्राचे अभिनन्दन केले. ॥१३३॥
अथोर्ध्वं दूरमागत्य हित्वा शैलमहार्णवौ ।
पितुः पन्थानमासाद्य जगाम विमलेऽम्बरे ॥ १३४॥
त्यानन्तर पर्वत आणि महासागर यांना सोडून त्या हनुमानाने उंच उड्‍डाण केले आणि आपल्या पित्याच्या मार्गाचा अवलंब करून ते निर्मळ आकाशातून जाऊ लागले. ॥१३४॥
भूयश्चोर्ध्वं गतिं प्राप्य गिरिं तमवलोकयन् ।
वायुसूनुर्निरालम्बो जगाम कपिकुञ्जरः ॥ १३५॥
नन्तर पहिल्यापेक्षाही उंच उड्‍डाण करून, त्या पर्वताकडे पहात पहात ते कपिश्रेष्ठ वायुपुत्र हनुमान कुठल्याही आधाराशिवाय त्या निर्मळ आकाशात पुढे जाऊ लागले. ॥१३५॥
तद् द्वितीयं हनुमतो दृष्ट्‍वा कर्म सुदुष्करम् ।
प्रशशंसुः सुराः सर्वे सिद्धाश्च परमर्षयः ॥ १३६॥
हनुमानांचे हे दुसरे अत्यन्त दुष्कर कर्म पाहून सर्व देवता, सिद्ध आणि महर्षि त्यांची प्रशंसा करू लागले. ॥१३६॥
देवताश्चाभवन् हृष्टास्तत्रस्थास्तस्य कर्मणा ।
काञ्चनस्य सुनाभस्य सहस्राक्षश्च वासवः ॥ १३७॥
मध्यभागी मनोहर असलेल्या त्या सुवर्णमय मैनाक पर्वताचे ते वर येण्याचे कार्य पाहून तेथे आकाशात स्थित असलेले सहस्त्रनयन इन्द्रासह सर्व देवही अत्यन्त प्रसन्न झाले. ॥१३७॥
उवाच वचनं धीमान् परितोषात् सगद्‌गदम् ।
सुनाभं पर्वतश्रेष्ठं स्वयमेव शचीपतिः ॥ १३८॥
त्यावेळी तो बुद्धिमान्‌ शचीपती इन्द्र अत्यन्त सन्तुष्ट होऊन पर्वतश्रेष्ठ सुनाभ पर्वतास सद्‍गदित वाणीने म्हणाला- ॥१३८॥
हिरण्यनाभ शैलेन्द्र परितुष्टोऽस्मि ते भृशम् ।
अभयं ते प्रयच्छामि गच्छ सौम्य यथासुखम् ॥ १३९॥
हे सुवर्णमय पर्वतराजा ! मी तुझ्यावर अत्यन्त प्रसन्न आहे. हे सौम्या ! मी तुला अभयदान देतो. हे विनयसंपन्ना ! तू खुशाल तुझी इच्छा असेल तिकडे जा. ॥१३९॥
साह्यं कृतं ते सुमहद् विश्रान्तस्य हनूमतः ।
क्रमतो योजनशतं निर्भयस्य भये सति ॥ १४०॥
शंभर योजनेपर्यन्त आकाशमार्गाने जाण्यास उद्यत झालेले आणि जाता-जाता श्रमलेले हनुमान स्वतः निर्भय असताही, त्यांना काही होईल की काय या शंकेने आमच्या हृदयात भय उत्पन्न झाले असतां, त्या हनुमानाला विश्रामाची सन्धी देऊन तू त्यांस मोठेच सहाय्य केले आहेस. ॥१४०॥
रामस्यैष हितायैव याति दाशरथेः कपिः ।
सत्क्रियां कुर्वता शक्त्या तोषितोऽस्मि दृढं त्वया ॥ १४१॥
हे वानरश्रेष्ठ हनुमान दाशरथी रामाचे दूत म्हणून जात आहेत. तू यथाशक्ती त्यांचा सत्कार करून मलाही अतिशय सन्तुष्ट केले आहेस. ॥१४१॥
स तत् प्रहर्षमलभद् विपुलं पर्वतोत्तमः ।
देवतानां पतिं दृष्ट्‍वा परितुष्टं शतक्रतुम् ॥ १४२॥
देवराज इन्द्र सन्तुष्ट झाला आहे हे पाहून पर्वतश्रेष्ठ मैनाकलाही अत्यन्त हर्ष झाला. ॥१४२॥
स वै दत्तवरः शैलो बभूवावस्थितस्तदा ।
हनुमांश्च मुहूर्तेन व्यतिचक्राम सागरम् ॥ १४३॥
इन्द्राने अभयदानाचा वर दिल्याने तो मैनाकही पूर्ववत जलामध्ये स्थित झाला आणि हनुमानही त्याच्याशी बोलण्याकरिता क्षणभर थांबून आकाशाचे उल्लंघन करीत पुढे चालले. ॥१४३॥
ततो देवाः सगन्धर्वाः सिद्धाश्च परमर्षयः ।
अब्रुवन् सूर्यसंकाशां सुरसां नागमातरम् ॥ १४४॥
त्यानन्तर देवता, गन्धर्व, सिद्ध आणि महर्षि, तेजाने सूर्यतुल्य असलेल्या नागमाता सुरसेला म्हणाले- ॥१४४॥
अयं वातात्मजः श्रीमान् प्लवते सागरोपरि ।
हनुमान् नाम तस्य त्वं मुहूर्तं विघ्नमाचर ॥ १४५॥
हा वायुपुत्र श्रीमान्‌ हनुमान समुद्रावरून जात आहे. त्याच्या मार्गात तू दोन घटका साठी विघ्न उत्पन्न कर. ॥१४५॥
राक्षसं रूपमास्थाय सुघोरं पर्वतोपमम् ।
दंष्ट्राकरालं पिङ्‌‌गाक्षं वक्त्रं कृत्वा नभःस्पृशम् ॥ १४६॥
तू पर्वताकार अत्यन्त भयंकर अशा राक्षसीचे रूप धारण कर. विकराळ दाढा, पिंगट वर्णाचे नेत्र, विशाल आकाशासारखे मुख धारण कर. ( आणि तू त्याला विघ्न कर) ॥१४६॥
बलमिच्छामहे ज्ञातुं भूयश्चास्य पराक्रमम् ।
त्वां विजेष्यत्युपायेन विषादं वा गमिष्यति ॥ १४७॥
आम्ही परत या हनुमानाचे बळ आणि पराक्रम यांची परीक्षा घेऊ इच्छितो. एकतर काही युक्ती योजून तो तुला जिंकेल अथवा तोच जेरीस येईल. (यायोगे त्याच्या बळाचे ज्ञान आपल्याला होईल.) ॥१४७॥
एवमुक्ता तु सा देवी दैवतैरभिसत्कृता ।
समुद्रमध्ये सुरसा बिभ्रती राक्षसं वपुः ॥ १४८॥
या प्रमाणे देवांनी तिला सत्कारपूर्वक विनन्ती केली असतां त्या सुरसादेवीने समुद्रामध्ये राक्षसीचे रूप धारण केले. ॥१४८॥
विकृतं च विरूपं च सर्वस्य च भयावहम् ।
प्लवमानं हनूमन्तमावृत्येदमुवाच ह ॥ १४९॥
तिचे ते रूप विकट, विकृत, आणि सर्वांना भयानक भासणारे होते. आकाशामार्गाने जाणार्‍या हनुमानाचा मार्ग अडवून धरून ती त्याला म्हणाली - ॥१४९॥
मम भक्ष्यः प्रदिष्टस्त्वमीश्वरैर्वानरर्षभ ।
अहं त्वां भक्षयिष्यामि प्रविशेदं ममाननम् ॥ १५० ॥
हे कपिश्रेष्ठा ! देवेश्वरांनी तुला माझे भक्ष्य म्हणून अर्पण केले आहे, म्हणून मी तुला भक्षण करीन. तरी तू या माझ्या मुखामध्ये प्रवेश कर. ॥१५०॥
वर एष पुरा दत्तो मम धात्रेति सत्वराः ।
व्यादाय वक्त्रं विपुलं स्थिता सा मरुतेः पुरः ॥ १५१ ॥
पूर्वीच मला ब्रह्मदेवाने वर दिला आहे असे म्हणून ताबडतोब आपले विशाल मुख पसरून ती हनुमानासमोर उभी राहिली. ॥१५१॥
एवमुक्तः सुरसया प्रहृष्टवदनोऽब्रवीत् ।
रामो दाशरथिर्नाम प्रविष्टो दण्डकावनम् ।
लक्ष्मणेन सह भ्रात्रा वैदेह्या चापि भार्यया ॥ १५२॥
सुरसेने असे म्हटलावर तो वानरश्रेष्ठ श्रीमान्‌ हनुमान हात जोडून प्रसन्न वदनाने तिल या प्रमाणे म्हणाला - देवी ! दशरथनन्दन श्रीराम आपल्या बन्धु लक्ष्मण आणि धर्मपत्‍नी सीता (वैदेही) याच्यासह दण्डकारण्यात आले होते. ॥१५२॥
अन्यकार्यविषक्तस्य बद्धवैरस्य राक्षसैः ।
तस्य सीता हृता भार्या रावणेन यशस्विनी ॥ १५३॥
तेथे परहित साधण्यात मग्न असणार्‍या श्रीरामांचे राक्षसांशी वैर उत्पन्न झाले. म्हणून रावणाने रामाची यशस्विनी भार्या सीता हिचे हरण केले. ॥१५३॥
तस्याः सकाशं दूतोऽहं गमिष्ये रामशासनात् ।
कर्तुमर्हसि रामस्य साह्यं विषयवासिनी ॥ १५४॥
मी त्या रामांच्या आज्ञेने त्यांचा दूत बनून सीतेकडे जात आहे. तूही श्रीरामांच्या राज्यात निवास करीत आहेस, म्हणून तू मला सहाय्य केले पाहिजेस. ॥१५४॥
अथवा मैथिलीं दृष्ट्‍वा रामं चाक्लिष्टकारिणम् ।
आगमिष्यामि ते वक्त्रं सत्यं प्रतिशृणोमि ते ॥ १५५॥
अथवा (जर तू मला खाण्याची इच्छा करीत असशील तर) मी सीतेचे दर्शन करून, अनायास महान कार्य करणार्‍या श्रीरामास जेव्हा भेटेन, तेव्हा परत येऊन तुझ्या मुखान्त प्रवेश करीन - हे मी तुला प्रतिज्ञापूर्वक सत्य सांगत आहे. ॥१५५॥
एवमुक्ता हनुमता सुरसा कामरूपिणी ।
अब्रवीत् नातिवर्तेन्मां कश्चिदेष वरो मम ॥ १५६॥
या प्रमाणे हनुमानाने विनन्ति केली असता इच्छेनुसार हवे ते रुप धारण करणारी ती सुरसा त्यांस म्हणाली - मला असा वर मिळालेला आहे की माझ्या तावडीतून सुटून कोणीही जाऊ शकणार नाही. ॥१५६॥
तं प्रयान्तं समुद्‌विक्ष्य सुरसा वाक्यमब्रवीत् ।
बलं जिज्ञासमाना सा नागमाता हनूमतः ॥ १५७ ॥
असे सुरसा सांगत असतांनाही जेव्हा हनुमान तसाच पुढे जाऊ लागला तेव्हा त्याचे बळ किती आहे हे पाहण्याची इच्छा धरून ती नागमाता सुरसा त्याच्याकडे पाहून म्हणाली - ॥१५७॥
निविश्य वदनं मेऽद्य गन्तव्यं वानरोत्तम ।
वर एष पुरा दत्तो मम धात्रेति सत्वरा ॥ १५८ ॥

व्यादाय विपुलं वक्त्रं स्थिता सा मारुतेः पुरः ।
हे वानरश्रेष्ठा ! आता माझ्या मुखात प्रवेश कर आणि नन्तरच तू पुढे जा कारण विधात्याने पूर्वीच मला असा वर दिलेला आहे. असे म्हणून लगेच ती सुरसा आपले विशाल मुख पसरून मारूतीपुढे उभी राहिली. ॥१५८ १/२॥
एवमुक्तः सुरसया क्रुद्धो वानरपुंगवः ॥ १५९ ॥

अब्रवीत् कुरु वै वक्त्रं येन मां विषहिष्यसि ।
इत्युक्त्वा सुरसां क्रुद्धो दशयोजनमायताम् ॥ १६० ॥

दशयोजनविस्तारो हनूमानभवत् तदा ।
तं दृष्ट्‍वा मेघसंकाशं दशयोजनमायतम् ।
चकार सुरसाप्यास्यं विंशद् योजनमायतम् ॥ १६१ ॥
पण सुरसा त्याला हे सांगत असतानाच तो वानरश्रेष्ठ हनुमान क्रुद्ध होऊन तिला म्हणाला - तर मग तू आपले मुख इतके मोठे कर की ज्यायोगे तू माझा भार सहन करू शकशील. असे म्हणून हनुमान जेव्हा मौन झाला तेव्हा सुरसेने आपले मुख दहा योजने विस्तृत बनविले. ते पाहून क्रोधित होऊन हनुमानही तात्काळ दहा योजने विशाल बनला. तेव्हा मेघाप्रमाणे दहा योजन विस्तृत हनुमानास सुरसेने पाहिले आणि सुरसेने आपले मुख वीस योजना एवढे विशाल केले. ॥१५९-१६१॥
हनूमांस्तु ततः क्रुद्धस्त्रिंशत् योजनमायतः ।
चकार सुरसा वक्त्रं चत्वारिंशत् तथोच्छ्रितम् ॥ १६२ ॥
तेव्हां त्या विस्तृत मुख असलेल्या तिला (सुरसेला) पाहून तो अत्यन्त बुद्धिमान्‌ वायुपुत्र क्रुद्ध झाला आणि त्याने आपले शरीर तीस योजने इतके विशाल केले. तेव्हा तर सुरसेने ही आपले मुख चाळीस योजने विस्तृत केले. ॥१६२॥
बभूव हनुमान् वीरः पञ्चाशद् योजनाच्छ्रितः ।
चकार सुरसा वक्त्रं षष्टिं योजनमुच्छ्रितम् ॥ १६३ ॥
हे पाहून हनुमान पन्नास योजने उंच झाले, तेव्हा सुरसेने आपले मुख साठ योजने विस्तृत पसरले. ॥१६३॥
तदैव हनुमान् वीरः सप्ततिं योजनोच्छ्रितः ।
चकार सुरसा वक्त्रं अशीतिः योजनोच्छ्रितम् ॥ १६४ ॥
तेव्हा ते वीर हनुमान तत्‌ क्षणी सत्तर योजन उंच झाले आता सुरसेने आपले मुख ऐंशी योजने विस्तृत बनविले. ॥१६४॥
हनुमाननलप्रख्यो नवतिं योजनोच्छ्रितः ।
चकार सुरसा वक्त्रं शतयोजनमायतम् ॥ १६५ ॥
त्यानन्तर अग्निप्रमाणे तेजस्वी हनुमानाने आपले शरीर नव्वद योजन उंचीचे धारण केले. हे पाहून सुरसेनेही आपल्या मुखाचा विस्तार शत योजने केला. ॥१६५॥
तद्दृष्ट्‍वा व्यादितं त्वास्यं वायुपुत्रः स बुद्धिमान् ।
दीर्घजिह्वं सुरसया सुभीमं नरकोपमम् ॥ १६६ ॥

स संक्षिप्यात्मनः कायं जीमूत इव मारुतिः ।
तस्मिन् मुहूर्ते हनुमान् बभूवाङ्‌‌गुष्ठमात्रकः ॥ १६७ ॥
सुरसेने पसरलेले ते विशाल जिव्हेने युक्त आणि नरकाप्रमाणे अत्यन्त घोर असे मुख पाहून बुद्धिमान्‌ वायुपुत्र हनुमानाने आपले शरीर अत्यन्त संकुचित केले आणि ते अगदी अंगठ्‍या एवढे लहान झाले. ॥१६६-१६७॥
सोऽभिपद्याथ तद्वक्त्रं निष्पत्य च महाबलः ।
अन्तरिक्षे स्थितः श्रीमानिदं वचनमब्रवीत् ॥ १६८॥
नन्तर ते महाबलाढ्‍य श्रीमान्‌ हनुमान्‌ तिच्या मुखात प्रविष्ट झाले आणि त्वरित अत्यन्त वेगाने बाहेर पडले आणि अन्तरिक्षात उभे राहून (तिला) म्हणाले- ॥१६८॥
प्रविष्टोऽस्मि हि ते वक्त्रं दाक्षायणि नमोऽस्तु ते ।
गमिष्ये यत्र वैदेही सत्यश्चासीद् वरस्तव ॥ १६९॥
हे दाक्षायणी ! (दक्षकुमारी) नमो नमः (तुला नमस्कार असो) तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी तुझ्या मुखात प्रविष्ट झालो होतो. (पहा तुझा वर ही सत्य ठरला आहे) आता मी जिकडे विदेह राजकन्या सीता आहे तिकडे जात आहे. ॥१६९॥
तं दृष्वा वदनान्मुक्तं चन्द्रं राहुमुखादिव ।
अब्रवीत् सुरसा देवी स्वेन रूपेण वानरम् ॥ १७०॥
या प्रमाणे राहू मुखातून बाहेर पडणार्‍या चन्द्राप्रमाणे आपल्या मुखातून बाहेर आलेल्या त्या वानराला अवलोकन करून सुरसादेवी आपले स्वतःचे (खरे) रूप धारण करून (त्याला) म्हणाली- ॥१७०॥
अर्थसिद्ध्यै हरिश्रेष्ठ गच्छ सौम्य यथासुखम् ।
समानय च वैदेहीं राघवेण महात्मना ॥ १७१॥
हे कपिश्रेष्ठा ! तू भगवान श्रीरामाच्या कार्यसिद्धिसाठी आता सुखपूर्वक जा. हे सौम्या ! महात्मा रामाला विदेहनन्दिनी सीता प्राप्त करून दे. (त्वरित त्यांची भेट घडवून आण) ॥१७१॥
तत् तृतीयं हनुमतो दृष्ट्‍वा कर्म सुदुष्करम् ।
साधु साध्विति भूतानि प्रशशंसुस्तदा हरिम् ॥ १७२॥
कपिश्रेष्ठ हनुमानाचे हे तिसरे अत्यन्त दुष्कर कार्य पाहून साधु, साधु (शाबास ! शाबास !) असे म्हणून सर्व प्राण्यांनी त्यांची प्रशंसा केली. ॥१७२॥
स सागरमनाधृष्यमभ्येत्य वरुणालयम् ।
जगामाकाशमाविश्य वेगेन गरुडोपमः ॥ १७३॥
या प्रमाणे वरूणाचे निवासस्थान अशा अलंघ्य सागरांपाशी आल्यानन्तर ते गरूडतुल्य हनुमान आकाशात वेगाने उड्‍डाण करून पुढे जाऊ लागले. ॥१७३॥
सेविते वारिधाराभिः पतगैश्च निषेविते ।
चरिते कैशिकाचार्यैरैरावतनिषेविते ॥ १७४॥
जो जलधारांनी सेवित, पक्ष्यांनी संयुक्त, गानविद्येचे आचार्य तुम्बरू आदि गन्धर्वांच्या विचरणाचे स्थान असून, ऐरावताच्या येण्याजाण्याचा मार्ग आहे, ॥१७४॥
सिंहकुञ्जरशार्दूलपतगोरगवाहनैः ।
विमानैः संपतद्‌भिश्च विमलैः समलङ्‌कृते ॥ १७५॥
सिंह, हत्ती, वाघ, पक्षी आणि सर्प आदि वाहनें जोडलेली आणि उडणार्‍या निर्मळ विमानांनी ज्याची शोभा वाढलेली आहे, ॥१७५॥
वज्राशनिसमस्पर्शैः पावकैरिव शोभिते ।
कृतपुण्यैर्महाभागैः स्वर्गजिद्‌भिरधिष्ठिते ॥ १७६॥
ज्याचा स्पर्श वज्र आणि विद्युल्लताच्या प्रमाणे दुःसह आहे आणि तेज अग्निसमान शोभत असून जे पुण्यवान आणि महाभाग्यवान अशा स्वर्गलोकांवर विजय मिळविळलेल्या पुरूषांचे निवासस्थान आहे,॥१७६॥
वहता हव्यमत्यन्त सेविते चित्रभानुना ।
ग्रहनक्षत्रचन्द्रार्कतारागणविभूषिते ॥ १७७॥
देवांकडे एकसारखे ह्व्य अधिक मात्रांमध्ये वाहून नेणारा अग्नि ज्याचे सदा सेवन करतो आणि ग्रह, नक्षत्र, चन्द्र, सूर्य आणि तारे अलङ्‌काराप्रमाणे ज्याला विभूषित करतात, ॥१७७॥
महर्षिगणगन्धर्वनागयक्षसमाकुले ।
विविक्ते विमले विश्वे विश्वावसुनिषेविते ॥ १७८॥
महर्षिगण, गन्धर्व, नाग आणि यक्ष यांनी जे व्याप्त आहे, जे वेगळे, निर्मळ आणि विश्वाला आश्रयभूत आहे, विश्ववसु गन्धर्वराज जेथे निवास करतो, ॥१७८॥
देवराजगजाक्रान्ते चन्द्रसूर्यपथे शिवे ।
विताने जीवलोकस्य वितते ब्रह्मनिर्मिते ॥ १७९॥
आणि देवराज इन्द्राचा हत्ती जेथे फिरत असतो आणि जो चन्द्र आणि सूर्याचाही मंगलमय मार्ग आहे, या जीवलोकावर परमात्म्याने ज्याची निर्मिती केली आहे असे जे विमळ छत (वितान) आहे, ॥१७९॥
बहुशः सेविते वीरैर्विद्याधरगणैर्वृते ।
जगाम वायुमार्गे तु गरुत्मानिव मारुतिः ॥ १८० ॥
अशा अनेक वीरांशी सेवित आणि विद्याधरगणांनी व्याप्त वायुमार्गरूप आकाशातून ते वायुपुत्र हनुमान, गरूडा सारखे जाऊ लागले. ॥१८०॥
हनुमान मेघजालानि प्रकर्षन् मारुतो यथा ।
कालागुरुसवर्णानि रक्तपीतसितानि च ॥ १८१ ॥
वायुपुत्र हनुमान, काळे आणि लाल, पिवळे आणि पांढरे मेघसमुदायास आकर्षित करित पुढे जाऊ लागले. ॥१८१॥
कपिना कृष्यमाणानि महाभ्राणि चकाशिरे ।
प्रविशनभ्रजालानि निष्पतंश्च पुनः पुनः ॥ १८२ ॥

प्रावृषीन्दुरिवाभाति निष्पतन् प्रविशंस्तदा ।
त्यांच्या द्वारे आकर्षित मेघसमुदाय अद्‍भुत शोभा प्राप्त करत होता. ते वारंवार मेघसमुदायात प्रविष्ट होत होते आणि वारंवार बाहेर पडत होते. तेव्हा ते ढगांशी लपंडाव खेळणार्‍या वर्षाऋतुच्या चन्द्रम्यासारखे भासत होते. ॥१८२ १/२॥
प्रदृश्यमानः सर्वत्र हनुमान् मारुतात्मजः ॥ १८३ ॥

भेजेऽम्बरं निरालम्बं पक्षयुक्त इवाद्रिराट् ।
सर्व ठिकाणांवरून दृष्टीस पडणारा तो पवनपुत्र हनुमान पंख असलेला जणु पर्वतराजच आहे, असा निराधार आकाशाचा आश्रय करून पुढे जात होता. ॥१८३ १/२॥
प्लवमानं तु तं दृष्ट्‍वा सिंहिका नाम राक्षसी ॥ १८४ ॥

मनसा चिन्तयामास प्रवृद्धा कामरूपिणी ।
अशा प्रकारे जाणार्‍या त्या हनुमानाला इच्छेनुसार रूप धारण करणार्‍या विशाल शरीराच्या सिंहिका नामक राक्षसीने पाहिले. पाहिल्यावर ती वृद्ध राक्षसी मनामध्ये विचार करू लागली की- ॥१८४ १/२॥
अद्य दीर्घस्य कालस्य भविष्याम्यहमाशिता ॥ १८५ ॥

इदं हि मे महासत्त्वं चिरस्य वशमागतम् ।
दीर्घ काळ लोटल्यानन्तर आज हा विशाल प्राणी माझ्या तावडीत सापडला आहे. याला खाल्यानन्तर आज मला पोटभर जेवण मिळणार आहे. (माझी अनेक दिवसांची भूक यामुळे शमणार आहे.) ॥१८५ १/२॥
इति संचिन्त्य मनसा छायामस्य समाक्षिपत् ॥ १८६ ॥

छायायां गृह्यमाणायां चिन्तयामास वानरः ।
समाक्षिप्तोऽस्मि सहसा पङ्‌गूकृतपराक्रमः ॥ १८७ ॥

प्रतिलोमेन वातेन महानौरिव सागरे ।
मनामध्ये असा विचार करून त्या राक्षसीने हनुमानाची छाया पकडली. छाया ओढली जाऊ लागली तेव्हा वानरवीर हनुमान मनामध्ये विचार करू लागले- अहो ! मला एकाएकी ओढ लागली असून त्यामुळे माझा पराक्रम एकदम पंगु झाला आहे. ज्याप्रमाणे प्रतिकूल वारा वाहू लागल्यावर समुद्रात नौकेची गति अवरूद्ध होते, त्याप्रमाणे आज माझी स्थिति झाली आहे. ॥१८६-१८७ १/२॥
तिर्यग् ऊर्ध्वमधश्चैव वीक्षमाणस्तदा कपिः ॥ १८८ ॥

ददर्श स महत्सत्त्वमुत्थितं लवणाम्भसि ।
असा विचार करून ते कपि आजूबाजूला आणि खाली वर पाहू लागले. तेव्हा समुद्राच्या जलान्तून वर आलेला एक विशालकाय प्राणी त्यांच्या दृष्टीस पडला.॥१८८ १/२॥
तद्‌ दृष्ट्‍वा चिन्तयामास मारुतिर्विकृताननाम् ॥ १८९ ॥

कपिराज्ञा यथाख्यातं सत्त्वमद्‌भुतदर्शनम् ।
छायाग्राहि महावीर्यं तदिदं नात्र संशयः ॥ १९० ॥

स तां बुद्ध्वार्थतत्त्वेन सिंहिकां मतिमान् कपिः ।
व्यवर्धत महाकायः प्रावृषीव बलाहकः ॥ १९१ ॥

तस्य सा कायमुद्वीक्ष्य वर्धमानं महाकपेः ।
वक्त्रं प्रसारयामास पातालान्तरसंनिभम् ॥ १९२॥
त्या विक्राळ मुख असलेल्या राक्षसीला पाहून हनुमान मनात म्हणाले वानरराज सुग्रीवाने ज्या अद्‍भुत जीवाबद्दल सांगितले होते, तो महापराक्रमी छायाग्राही जीव निःसन्देह हाच आहे या प्रमाणे (छायाकर्षणाचा अनुभव असल्यामुळे) त्या बुद्धिमान्‌ हनुमानाने त्या सिंहिकेला ओळखले आणि वर्षाकालीन मेघाप्रमाणे तो महाकाय कपि हनुमान अधिकच वृद्धिंगत होऊ लागला. त्या महाकपिचे शरीर वाढत आहे, हे पाहून सिंहिकेनेही पाताळ आणि अन्तरिक्षातील, दोन्ही मधील भागाप्रमाणे असलेले आपले मुख पसरले आणि मेघपंक्ती प्रमाणे गर्जना करीत करीत ती त्या वानराकडे धावली. ॥१८९-१९२॥
घनराजीव गर्जन्ती वानरं समभिद्रवत् ।
स ददर्श ततस्तस्या विवृतं सुमहन्मुखम् ॥ १९३ ॥

कायमात्रं च मेधावी मर्माणि च महाकपिः ।
हनुमानाने तिचे ते आक्राळ-विक्राळ आणि अजस्त्र मुख पाहिले आणि त्याला ते मुख स्वतःचा शरीरा एवढेच दिसले. त्यावेळी बुद्धिमान्‌ महाकपि हनुमानाने सिंहिकेचा मर्मस्थानांना आपले लक्ष्य बनविले. ॥१९३ १/२॥
स तस्या विकृते वक्त्रे वज्रसंहननः कपिः ॥ १९४ ॥

संक्षिप्य मुहुरात्मानं निष्पपात महाकपिः ।
त्यानन्तर त्या वज्राप्रमाणे शरीर असलेल्या महाकपि हनुमानाने आपला देह अत्यन्त संकुचित करून तिच्या आक्राळ विक्राळ मुखामध्ये उडी घातली. ॥१९४ १/२॥
आस्ये तस्या निमज्जन्तं ददृशुः सिद्धचारणाः ॥ १९५ ॥

ग्रस्यमानं यथा चन्द्रं पूर्णं पर्वणि राहुणा ।
याप्रमाणे तिच्या मुखामध्ये निमग्न होणार्‍या कपिला जेव्हा सिद्ध, चारणांनी पाहिले तेव्हा त्यांना पौर्णिमेच्या रात्री पूर्ण चन्द्र जणु काय राहूचा ग्रास बनत आहे, असे भासले. ॥१९५ १/२॥
ततस्तस्या नखैस्तीक्ष्णैः मर्माण्युत्कृत्य वानरः ॥ १९६ ॥

उत्पपाताथ वेगेन मनःसम्पातविक्रमः ।
तिच्या मुखामध्ये प्रवेश केल्यानन्तर त्या वानरवीराने आपल्या तीक्ष्ण नखांनी त्या राक्षसीच्या मर्मस्थळांना विदीर्ण करून टाकले आणि नन्तर आपल्या गतीने मनाच्या गतीची बरोबरी करीत अत्यन्त वेगाने उडी मारून तो बाहेर पडला. ॥१९६ १/२॥
तां तु दिष्ट्या च धृत्या च दाक्षिण्येन निपात्य च ॥ १९७ ॥

कपिप्रवरो वेगेन ववृधे पुनरात्मवान् ।
या प्रमाणे दैवाचा अनुग्रह (अनुकूलता), स्वाभाविक धैर्य आणि प्रसंगावधान यांच्या योगाने त्या राक्षसीचा वध करून तो जितेंन्द्रिय कपिश्रेष्ठ पुनः अत्यन्त वेगाने वृद्धिंगत झाला. ॥१९७ १/२॥
हृतहृत्सा हनुमता पपात विधुराम्भसि ।
स्वयंभुवैव हनुमान् सृष्टतस्या निपातने ॥ १९८ ॥
हनुमताने प्राणांचा आधार असलेले तिचे हृसयच विदिर्ण करून टाकले, त्यामुळे ती (सिंहिका) चित्कार करीत (शोकाकुल होऊन) पाण्यात पडली. विधात्याने तिला मारून टाकण्यासाठी हनुमानास निमित्त बनविले होते. ॥१९८॥
तां हतां वानरेणाशु पतितां वीक्ष्य सिंहिकाम् ।
भूतान्याकाशचारीणि तमूचुः प्लवगोत्तमम् ॥ १९९॥
त्या वानरवीराकडून मारली गेलेली, जळात पडलेल्या सिंहिकेस पाहून, आकाशात विचरण करणारे प्राणी त्या कपिश्रेष्ठास म्हणाले - ॥१९९॥
भीममद्य कृतं कर्म महत्सत्त्वं त्वया हतम् ।
साधयार्थमभिप्रेतंमरिष्टं प्लवतां वर ॥ २००॥
हे उड्‍डाण करणार्‍यांमध्ये श्रेष्ठ हनुमाना, तू आज या मोठ्‍या राक्षसीचा वध केलास, हे फारच मोठे प्रचण्ड कृत्य केले आहेस. आता तू आपला मनोरथ निर्विघ्नपणे सिद्धिस ने. ॥२००॥
यस्य त्वेतानि चत्वारि वानरेन्द्र यथा तव ।
धृतिर्दृष्टिर्मतिर्दाक्ष्यं स कर्मसु न सीदति ॥ २०१॥
हे वानराधिपते ! ज्या पुरूषाच्या ठिकाणी तुझ्यासारखे धैर्य, प्रसंगावधान, बुद्धि आणि दक्षता (कौशल्य) हे चार गुण असतात, तो आपल्या कार्यात कधीही अयशस्वी होत नाही. ॥२०१॥
स तैः सम्पूजितः पूज्यः प्रतिपन्नप्रयोजनैः ।
जगामाकाशमाविश्य पन्नगाशनवत् कपिः ॥ २०२॥
या प्रकारे आपले प्रयोजन सिद्ध झाल्यामुळे त्या आकाशचारी प्राण्यांनी हनुमन्ताचा मोठा सत्कार केला. त्यानन्तर कपि हनुमान आकाशमार्गानेच अवलंबन करून गरूडाप्रमाणे वेगाने पुढे निघाले. ॥२०२॥
प्राप्तभूयिष्ठपारस्तु सर्वतः परिलोकयन् ।
योजनानां शतस्यान्ते वनराजिं ददर्श सः ॥ २०३॥
शत योजने पार करून ते जेव्हा जवळ जवळ समुद्राच्या पलिकडील तीराला पोहोंचले तेव्हा त्यांनी सर्वत्र दृष्टी टाकली आणि त्यांना एक हिरवीगार वनराजी दिसली. ॥२०३॥
ददर्श च पतन्नेव विविधद्रुमभूषितम् ।
द्वीपं शाखामृगश्रेष्ठो मलयोपवनानि च ॥ २०४ ॥
आकाशामध्ये उडत असतानाच, वानरांमध्ये श्रेष्ठ हनुमानांनी नाना प्रकारच्या वृक्षांनी सुशोभित लङ्‌का नामक द्वीप बेट पाहिले. उत्तर तटाप्रमाणेच समुद्राच्या दक्षिण तटावरही मलय नावाचा पर्वत आणि त्यावरील उपवने दिसून येत होती. ॥२०४॥
सागरं सागरानूपान् सागरानूपजान् द्रुमान् ।
सागरस्य च पत्‍नीनां मुखान्यपि विलोकयत् ॥ २०५॥
समुद्र, समुद्रातीरावरील प्रदेश, त्या प्रदेशावरील वृक्ष आणि सागर पत्‍नी सरितांची मुखेही त्यांनी पाहिली. ॥२०५॥
स महामेघसंकाशं समीक्ष्यात्मानमात्मवान् ।
निरुन्धन्तमिवाकाशं चकार मतिमान् मतिम् ॥ २०६॥
त्यानन्तर मोठ्‍या मेघासारखे अर्थात जणु काय आकाशाला व्याप्त करणारे असे आपले विशाल शरीर अवलोकन करून ते जितेन्द्रिय आणि बुद्धिमान हनुमान मनातल्या मनात विचार करू लागले- ॥२०६॥
कायवृद्धिं प्रवेगं च मम दृष्ट्‍वैव राक्षसाः ।
मयि कौतूहलं कुर्युरिति मेने महामतिः ॥ २०७॥
अहो ! माझे हे विशाल शरीर आणि तीव्र वेग पाहिल्यावर राक्षसांच्या मनान्त कुतूहल उत्पन्न होईल - ते माझा भेद जाणण्यास उत्सुक होतील. परम बुद्धिमान हनुमन्तांच्या मनात ही धारणा पक्की झाली. ॥२०७॥
ततः शरीरं संक्षिप्य तन्महीधरसंनिभम् ।
पुनः प्रकृतिमापेदे वीतमोह इवात्मवान् ॥ २०८॥
म्हणून मनास वश ठेवणारा मोहरहित योगीपुरूष ज्याप्रमाणे आपल्या मूळ स्वरूपात स्थित होतो, त्याप्रमाणे मनस्वी हनुमतांनी आपल्या पर्वताकार शरीराचा संकोच केला आणि ते आपल्या वास्तविक स्वरूपात स्थित झाले. ॥२०८॥
तद्‌रूपमतिसंक्षिप्य हनुमान् प्रकृतौ स्थितः ।
त्रीन् क्रमानिव विक्रम्य बलिवीर्यहरो हरिः ॥ २०९॥
ज्याप्रमाणे बळीच्या पराक्रमासंबन्धी अभिमान हरण करणार्‍या श्रीहरीने विराटरूपाने तीन पावलात तीन्ही लोक पादाक्रान्त केल्यानन्तर आपले विराट स्वरूप आवरून घेतले त्याप्रमाणेच हनुमानांनी समुद्र उल्लंघन केल्यानन्तर आपल्या विशाल स्वरूपाचा संकोच करून ते आपल्या वास्तविक स्वरूपात स्थित झाले. ॥२०९॥
स चारुनानाविधरूपधारी
परं समासाद्य समुद्रतीरम् ।
परैरशक्यः प्रतिपन्नरूपः
समीक्षितात्मा समवेक्षितार्थः ॥ २१०॥
हनुमान अत्यन्त सुन्दर आणि नाना प्रकारची रूपे धारण करीत असत. त्यांनी समुद्राच्या दुसर्‍या तटावर, जेथे दुसरा कुणी पोहोचणे असंभव होते तेथे पोहोचल्यावर आपल्या विशाल शरीराकडे दृष्टिपात केला आणि आपल्या कर्तव्याचा विचार करून छोटेसे लहान रूप धारण केले. ॥२१०॥
ततः स लम्बस्य गिरेः समृद्धे
विचित्रकूटे निपपात कूटे ।
सकेतकोद्‌दालकनारिकेले
महाभ्रकूटप्रतिमो महात्मा ॥ २११॥
महान मेघसमूहाप्रमाणे शरीर असणार्‍या महात्मा हनुमानांनी, केवडे, भोकरी आणि नारळ हे वृक्ष आणि इतर लहान लहान शिखरे असलेल्या लंब या नावाच्या त्रिकूटाचळाच्या समृद्ध शिखरावर उडी मारली. ॥२११॥
ततस्तु संप्राप्य समुद्रतीरं
समीक्ष्य लङ्‌‌कां गिरिवर्यमूर्ध्नि ।
कपिस्तु तस्मिन् निपपात पर्वते
विधूय रूपं व्यथयन् मृगद्विजान् ॥ २१२॥
समुद्रतीराला जाऊन पोचल्यावर, त्या श्रेष्ठ पर्वताच्या शिखरावर वसलेली लङ्‌का पाहून घेतली आणि आपले अति प्रचंड रूप सोडून देऊन ते वानरवीर तेथील पशुपक्ष्यांना त्रास देत त्या पर्वतावर येऊन उतरले. ॥२१२॥
स सागरं दानवपन्नगायुतं
बलेन विक्रम्य महोर्मिमालिनम् ।
निपत्य तीरे च महोदधेस्तदा
ददर्श लङ्‌‌काममरावतीमिव ॥ २१३॥
या प्रकारे दानवांनी आणि सर्पांनी भरलेल्या तसेच मोठ-मोठ्‍या उत्तुंग तरंग माळांनी अलंकृत अशा महासागराला बलपूर्वक उल्लंघून हनुमान त्या सागराच्या तटावर उतरले आणि अमरावतीप्रमाणे सुशोभित लङ्‌कापुरीची शोभा पाहू लागले. ॥२१३॥
॥ इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे प्रथमः सर्गः ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा पहिला सर्ग पूरा झाला. ॥१॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP