श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ एकाधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामस्य विलापो हनुमदाहृतयौषध्या सुषेणप्रयुक्तया लक्ष्मणस्य संज्ञालाभः -
विलाप आणि हनुमानांनी आणलेल्या औषधीच्या सुषेण द्वारा केल्या गेलेल्या प्रयोगाने लक्ष्मणांचे सचेत होऊन उठणे -
शक्त्या निपातितं दृष्ट्‍वा रावणेन बलीयसा ।
लक्ष्मणं समरे शूरं शोणितौघपरिप्लुतम् ।। १ ।।

स दत्त्वा तुमुलं युद्धं रावणस्य दुरात्मनः ।
विसृजन्नेव बाणौघान् सुषेणं इदमब्रवीत् ।। २ ।।
महाबली रावणाने शूरवीर लक्ष्मणांना आपल्या शक्तिने युद्धात धराशायी केले होते. ते रक्ताच्या प्रवाहाने न्हाऊन गेले होते. हे पाहून भगवान्‌ श्रीरामांनी दुरात्मा रावणाबरोबर घोर युद्ध करून बाणसमूहांची वृष्टि करतच सुषेणास याप्रकारे सांगितले- ॥१-२॥
एष रावणवीर्येण लक्ष्मणः पतितः भुवि ।
सर्पवच्चेष्टते वीरो मम शोकमुदीरयन् ।। ३ ।।
हे वीर, लक्ष्मण रावणाच्या पराक्रमाने घायाळ होऊन पृथ्वीवर पडले आहेत आणि जख्मी झालेल्या सर्पाप्रमाणे तळमळत आहेत. या अवस्थेत त्यांना पाहून माझा शोक वाढत चालला आहे. ॥३॥
शोणितार्द्रमिमं वीरं प्राणैरिष्टतमं मम ।
पश्यतो मम का शक्तिः योद्धुं पर्याकुलात्मनः ।। ४ ।।
हे वीर ! सौमित्र मला प्राणांहूनही अधिक प्रिय आहेत. यांना रक्तात न्हालेले पाहून माझे मन व्याकुळ होत आहे, अशा दशेमध्ये माझ्या ठिकाणी युद्ध करण्याची शक्ति काय असणार आहे ? ॥४॥
अयं स समरश्लाघी भ्राता मे शुभलक्षणः ।
यदि पञ्चत्वमापन्नः प्राणैर्मे किं सुखेन च ।। ५ ।।
हे माझे शुभलक्षणसंपन्न भाऊ, जे सदा युद्धाची इच्छा करत होते, जर मरून गेले तर मला माझे हे प्राण ठेवण्यात आणि सुख भोगण्यात काय प्रयोजन आहे ? ॥५॥
लज्जतीव हि मे वीर्यं भ्रश्यतीव कराद् धनुः ।
सायका व्यवसीदन्ति दृष्टिर्बाष्पवशं गता ।। ६ ।।
यासमयी माझा पराक्रम लज्जित झाल्यासारखा झाला आहे. हातांतून धनुष्य घसरत आहे, माझे सायक शिथिल होत आहेत आणि नेत्रात अश्रु दाटून आले आहेत. ॥६॥
अवसीदन्ति गात्राणि स्वप्नयाने नृणामिव ।
चिन्ता मे वर्धते तीव्रा मुमूर्षा चोपजायते ।। ७ ।।
भ्रातरं निहतं दृष्ट्‍वा रावणेन दुरात्मना ।
विष्टनन्तं तु दुःखार्थं मर्मण्यभिहतं भृशम् ।। ८ ।।
ज्याप्रमाणे स्वप्नात मनुष्याचे शरीर शिथिल होऊन जाते, तीच दशा माझ्या या अंगांची झाली आहे. माझी तीव्र चिंता वाढत चालली आहे आणि दुरात्मा रावणाच्या द्वारा घायाळ होऊन मर्मी आघाताने अत्यंत पीडित आणि दुःखातुर झालेल्या भाऊ लक्ष्मणास कण्हताना पाहून मला मरून जाण्याची इच्छा होत आहे. ॥७-८॥
राघवो भ्रातरं दृष्ट्‍वा प्रियं प्राणं बहिश्चरम् ।
दुःखेन महताऽऽविष्टो ध्यानशोकपरायणः ।। ९ ।।
राघव आपले बहिश्वर प्राणांसमान असलेल्या आपले प्रिय भाऊ लक्ष्मणांना या अवस्थेत पाहून महान्‌ दुःखाने व्याकुळ झाले आणि चिंता व शोक यात बुडून गेले. ॥९॥
परं विषादमापन्नो विललापाकुलेन्द्रियः ।
भ्रातरं निहतं दृष्ट्‍वा लक्ष्मणं रणपांसुषु ।। १० ।।
त्यांच्या मनांत फार विषाद वाटला. इंद्रियात व्याकुळता पसरली आणि ते रणभूमीमध्ये धूळीमध्ये घायाळ होऊन पडलेल्या भावाकडे - लक्ष्मणाकडे पाहून विलाप करू लागले - ॥१०॥
विजयोऽपि हि मे शूर न प्रियायोपकल्पते ।
आचक्षुः विषयश्चंद्रः कां प्रीतिं जनयिष्यति ॥ ११ ॥
शूरवीरा ! आता युद्धात विजय जरी मिळाला तरी मला प्रसन्नता वाटणार नाही. आंधळ्यासमोर चंद्रम्याने आपले चांदणे पसरले तरीही ते त्याच्या मनांत कुठला आल्हाद उत्पन्न करू शकणार आहे ? ॥११॥
किं मे युद्धेन किं प्राणैः युद्धकार्यं न विद्यते ।
यत्रायं निहतः शेते रणमूर्धनि लक्ष्मणः ।। १२ ।।
आतां या युद्धाशी अथवा प्राणांच्या रक्षणाशी मला काय प्रयोजन आहे ? आतां लढण्याची किंवा परस्परांशी भिडण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. जर संग्रामाच्या तोंडावरच मारले जाऊन लक्ष्मण कायमचे झोपी गेले असतील तर युद्ध जिंकण्याने काय लाभ होणार आहे ? ॥१२॥
यथैव मां वनं यान्तं अनुयाति महाद्युतिः ।
अहमप्यनुयास्यामि तथैवैनं यमक्षयम् ॥ १३ ॥
वनात येते वेळी जसे महातेजस्वी लक्ष्मण माझ्या पाठोपाठ चालत आले होते त्याच प्रकारे यमलोकात जाते समयी मीही त्यांच्या पाठोपाठ जाईन. ॥१३॥
इष्टबन्धुजनो नित्यं मां स नित्यमनुव्रतः ।
इमामवस्थां गमितो रक्षसैः कूटयोधिभिः ॥ १४ ॥
हाय ! जे सदा माझ्या ठिकाणी अनुराग ठेवणारे माझे प्रिय बंधुजन होते, छलाने युद्ध करणार्‍या निशाचरांनी आज त्यांची ही दशा केली आहे. ॥१४॥
देशे देशे कलत्राणि देशे देशे च बान्धवाः ।
तं तु देशं न पश्यामि यत्र भ्राता सहोदरः ।। १५ ।।
प्रत्येक देशात स्त्रिया मिळू शकतात, देशात देशात बांधवही उपलब्ध होऊ शकतात परंतु असा कुठलाही देश मला दिसून येत नाही जेथे सहोदर भाऊ मिळू शकेल. ॥१५॥
किं नु राज्येन दुर्धर्ष लक्ष्मणेन विना मम ।
कथं वख्यामहं त्वम्बां सुमित्रां पुत्रवत्सलाम् ॥ १६ ॥
दुर्धर्ष वीर लक्ष्मणाशिवाय मी राज्य घेऊन काय करूं ? पुत्रवत्सला माता सुमित्रेशी मी कसा बोलू शकेन बरे ? ॥१६॥
उपालम्भं न शक्ष्यामि सोढुं दत्तं सुमित्रया ।
किं नु वक्ष्यामि कौसल्यां मातरं किं नु कैकेयीम् ॥ १७ ॥
माता सुमित्रेने दिलेले टोमणे मी कसे सहन करू शकेन ? माता कौसल्या आणि कैकेयीला मी काय उत्तर देऊ ? ॥१७॥
भरतं किं नु वक्ष्यामि शत्रुघ्नं च महाबलम् ।
सह तेन वनं यातो विना तेनागतः कथम् ॥ १८ ॥
भरत आणि महाबली शत्रूघ्न जेव्हा विचारतील की आपण लक्ष्मणासह वनात गेला होता, मग त्यांच्या शिवाय कसे परत आलात तर त्यांना मी काय उत्तर देऊ ? ॥१८॥
इहैव मरणं श्रेयो न तु बन्धुविगर्हणम् ।
किं मया दुष्कृतं कर्म कृतमन्यत्र जन्मनि ॥ १९ ॥

येन मे धार्मिको भ्राता निहतश्चाग्रतः स्थितः ।
म्हणून माझ्यासाठी येथेच मरून जाणे चांगले आहे. बंधु-बांधवात जाऊन त्यांनी बोललेली खोटी-खरी वचने ऐकणे चांगले नाही. मी पूर्वजन्मात कोठले दुष्कृत केले होते की ज्यामुळे माझ्यासमोर उभा असलेला माझा धर्मात्मा भाऊ मारला गेला आहे. ॥१९ १/२॥
हा भ्रातर्मनुजश्रेष्ठ शूराणां प्रवर प्रभो ॥ २० ॥

एकाकी कीं नु मां त्यक्त्वा परलोकस्य गच्छसि ।
हा बंधो, नरश्रेष्ठ लक्ष्मणा ! हा प्रभावशाली शूरप्रवर ! तू मला सोडून एकटा का परलोकात जात आहेस ? ॥२० १/२॥
विलपन्तं च मां भ्रातः किमर्थं नावभाषसे ॥ २१ ॥

उत्तिष्ठ पश्य किं शेषे दीनं मां पश्य चक्षुषा ।
हे बंधो ! मी तुझ्यासाठी विलाप करीत आहे, तू माझ्याशी का बरे बोलत नाहीस ? प्रिय बंधु ! उठ, डोळे उघडून पहा. का झोपून राहिला आहेस ? मी फार दुःखी आहे. माझ्याकडे दृष्टिपात कर. ॥२१ १/२॥
शोकार्तस्य प्रमत्तस्य पर्वतेषु वनेषु च ॥ २२ ॥

विषण्णस्य महाबाहो समाश्वासयिता मम ।
महाबाहो ! पर्वत आणि वनांमध्ये जेव्हा मी शोकाने पीडित होऊन प्रमत्त आणि विषादग्रस्त होऊन जात होतो तेव्हा तूच मला धीर देत होतास. (मग यासमयी माझे सांत्वन का बरे करीत नाहीस ? ) ॥२२ १/२॥
राममेवं ब्रुवाणं तु शोकव्याकुलितेन्द्रियम् ॥ २३ ॥

आश्वासयन् उवाचेदं सुषेणः परमं वचः ।
याप्रकारे विलाप करणार्‍या भगवान्‌ श्रीरामांची सारी इंद्रिये शोकाने व्याकुळ होऊन गेली. त्या समयी सुषेणाने त्यांना आश्वासन देऊन, ही उत्तम गोष्ट सांगितली - ॥२३ १/२॥
त्यजेमां नरशार्दूल बुद्धिं वैक्लव्यकारिणीम् ॥ २४ ॥

शोकसंजननीं चिन्तां तुल्यां बाणैश्चमूमुखे ।
पुरूषसिंह ! व्याकुळता उत्पन्न करणार्‍या या चिंतायुक्त बुद्धिचा परित्याग करावा, कारण युद्धाच्या तोंडावरच केली गेलेली चिंता बाणांप्रमाणे असते आणि केवळ शोकाला जन्म देत असते. ॥२४ १/२॥
नैव पञ्चत्वमापन्नो लक्ष्मणो लक्ष्मिवर्धनः ॥ २५ ॥

नह्यस्य विकृतं वक्त्रं न च श्यामत्वमागतम् ।
सुप्रभं च प्रसन्नं च मुखमस्य निरीक्ष्यताम् ॥ २६ ॥
आपले बंधु शोभावर्द्धक लक्ष्मण मेलेले नाहीत. पहा, त्यांच्या मुखाची आकृति अद्याप बिघडलेली नाही, किंवा त्यांच्या चेहर्‍यावर काळेपणाही आलेला नाही. यांचे मुख प्रसन्न आणि कांतिमान्‌ दिसून येत आहे. ॥२५-२६॥
पद्मपत्रतलौ हस्तौ सुप्रसन्ने च लोचने ।
नेदृशं दृश्यते रूपं गतासूनां विशाम्पते ॥ २७ ॥
यांची हातांची बोटे कमलाप्रमाणे कोमल आहेत, डोळेही सुप्रसन्न आहेत. प्रजानाथ ! मेलेल्या प्राण्यांचे रूप असे दिसून येत नाही. ॥२७॥
विषादं मा कृथा वीर सप्राणोऽयमरिंदम ।
आख्याति तु प्रसुप्तस्य स्त्रस्तगात्रस्य भूतले ॥ २८ ॥

सोच्छ्वासं हृदयं वीर कम्पमानं मुहुर्मुहुः ।
शत्रूंचे दमन करणार्‍या वीरा ! आपण विषाद करू नये. यांच्या शरीरात प्राण आहेत. वीरा ! हे झोपी गेलेले आहेत. यांचे शरीर शिथिल होऊन पृथ्वीवर पडलेले आहे. श्वास चालू आहे आणि हृदय वारंवार कंपित होत आहे - त्याची गति बंद झालेली नाही. हे लक्षण यांचे जीवित असण्याची सूचना देत आहेत. ॥२८ १/२॥
एवमुक्त्वा महाप्राज्ञः सुषेणो राघवं वचः ॥ २९ ॥

समीपस्थमुवाचेदं हनूमन्तं महाकपीम् ।
राघवांना असे सांगून परम बुद्धिमान्‌ सुषेणांनी जवळच उभे असलेल्या महाकपि हनुमानाला म्हटले - ॥२९ १/२॥
सौम्य शीघ्रमितो गत्वा पर्वतं हि महोदयम् ॥ ३० ॥

पूर्वं ते कथितो योऽसौ वीर जाम्बवता शुभः ।
दक्षिणे शिखरे जातां महौषधिमिहानय ॥ ३१ ॥

विशल्यकरणीं नाम्ना सावर्ण्यकरणीं तथा ।
संजीवकरणीं वीर संधानीं च महौषधीम् ॥ ३२ ॥

सञ्जीवनार्थं वीरस्य लक्ष्मणस्य त्वमानय ।
सौम्य ! तुम्ही शीघ्रच येथून महोदय पर्वतावर, ज्याचा पत्ता पूर्वी जांबवानांनी सांगितलेला आहे, तेथे जा आणि त्याच्या दक्षिण शिखरावर उगवलेली विशल्यकरणी(१), सावर्ण्यकरणी(२), संजीवकरणी(३) आणि संधानी(४) नामाने प्रसिद्ध महाऔषधींना घेऊन या. वीरा ! त्यांच्या योगेच वीरवर लक्ष्मणाच्या जीवनाचे रक्षण होईल. ॥३० -३२ १/२॥
(१) शरीरात घुसलेले बाण आदिंना काढून घाव भरणारी आणि पीडा दूर करणारी) (२) शरीरात पूर्वीप्रमाणे रंगत आणणारी) (३) मूर्च्छा दूर करून चेतना प्रदान करणारी) (४) तुटलेली हाडे जोडणारी)
इत्येवमुक्तो हनुमान् गत्वा चौषधिपर्वतम् ।
चिन्तामभ्यगमच्छ्रीमान् अजानंस्ता महौषधिम् ।। ३३ ।।
त्यांनी असे सांगितल्यावर हनुमान्‌ औषधिपर्वतावर (महोदय-गिरी) गेले परंतु त्या महौषधींना ओळखू न शकल्यामुळे ते चिंतेत पडले. ॥३३॥
तस्य बुद्धिः समुत्पन्ना मारुतेरमितौजसः ।
इदमेव गमिष्यामि गृहीत्वा शिखरं गिरेः ॥ ३४ ॥
याच वेळी अमित तेजस्वी हनुमानांच्या हृदयात असा विचार उत्पन्न झाला की मी पर्वताच्या या शिखरालाच घेऊन जाईन. ॥३४॥
अस्मिन् हि शिखरे जातां ओषधीं तां सुखावहाम् ।
प्रतर्केणावगच्छामि सुषेणो ह्येवमब्रवीत् ।। ३५ ।।
याच शिखरावर ती सुखदायिनी औषधी उत्पन्न होत असेल, असे मला अनुमानतः ज्ञात होत आहे कारण की सुषेणाने असेच सांगितले होते. ॥३५॥
अगृह्य यदि गच्छामि विशल्यकरणीमहम् ।
कालात्ययेन दोषः स्याद् वैक्लव्यं च महद् भवेत् ।। ३६ ।।
जर विशल्यकरणी न घेताच परत गेलो तर अधिक समय निघून गेल्याने दोषाची संभावना आहे आणि त्यामुळे फार मोठी हानी उत्पन्न होऊ शकते. ॥३६॥
इति सञ्चिन्त्य हनुमान् गत्वा क्षिप्रं महाबलः ।
आसाद्य पर्वतश्रेष्ठं त्रिः प्रकम्प्य गिरेः शिरः ।। ३७ ।।

फुल्लनानातरुगणं समुत्पाट्य महाबलः ।
गृहीत्वा हरिशार्दूलो हस्ताभ्यां समतोलयत् ।। ३८ ।।
असा विचार करून महाबली हनुमान्‌ तात्काळ त्या श्रेष्ठ पर्वताजवळ जाऊन पोहोचले आणि त्याच्या शिखराला तीन वेळा हलवून त्याला उपटून घेतले. त्याच्यावर नाना प्रकारचे वृक्ष फुललेले होते. वानरश्रेष्ठ महाबली हनुमानांनी त्याला दोन्ही हातांनी उचलून तोलून धरले. ॥३७-३८॥
स नीलमिव जीमूतं तोयपूर्णं नभस्थलात् ।
उत्पपात गृहीत्वा तु हनुमान् शिखरं गिरेः ।। ३९ ।।
जलाने भरलेल्या नील मेघासमान त्या पर्वतशिखराला घेऊन हनुमानांनी वरील बाजूस उसळी घेतली. ॥३९॥
समागम्य महावेगः सन्न्यस्य शिखरं गिरेः ।
विश्रम्य किञ्चिद्धनुमान् सुषेणमिदमब्रवीत् ।। ४० ।।
त्यांचा वेग महान्‌ होता. त्या शिखराला सुषेणाजवळ पोहोचवून त्यांनी पृथ्वीवर ठेवून दिले आणि थोडा वेळ विश्राम करून हनुमान्‌ सुषेणास या प्रकारे म्हणाले - ॥४०॥
ओषधिर्नावगच्छामि ता अहं हरिपुङ्‌गव ।
तदिदं शिखरं कृत्स्नं गिरेस्तस्याहृतं मया ।। ४१ ।।
कपिश्रेष्ठ ! मी त्या औषधींना ओळखू शकत नाही म्हणून त्या पर्वताचे सर्व शिखरच घेऊन आलो आहे. ॥४१॥
एवं कथयमानं तं प्रशस्य पवनात्मजम् ।
सुषेणो वानरश्रेष्ठो जग्राहोत्पाट्य चौषधीः ।। ४२ ।।
असे सांगणार्‍या हनुमानांची भूरि-भूरि प्रशंसा करून वानरश्रेष्ठ सुषेणांनी त्या औषधींना उपटून घेतले. ॥४२॥
विस्मितास्तु बभूवुस्ते रणे वानरपुंगवाः ।
दृष्ट्‍वा हनुमत्कर्म सुरैरपि सुदुष्करम् ।। ४३ ।।
हनुमानांचे ते कर्म देवतांसाठीही अत्यंत दुष्कर होते. ते पाहून समस्त वानरयूथपति फारच विस्मित झाले. ॥४३॥
ततः संक्षोदयित्वा तां ओषधीं वानरोत्तमः ।
लक्ष्मणस्य ददौ नस्तः सुषेणः सुमहाद्युतेः ।। ४४ ।।
महातेजस्वी कपिश्रेष्ठ सुषेणांनी त्या औषधीला कुटून वाटून लक्ष्मणांच्या नाकांत रस घातला. ॥४४॥
सशल्यस्तां समाघ्राय लक्ष्मणः परवीरहा ।
विशल्यो विरुजः शीघ्रं उदतिष्ठन्महीतलात् ।। ४५ ।।
शत्रूंचा संहार करणार्‍या लक्ष्मणांच्या सार्‍या शरीरात बाण घुसलेले होते. त्या अवस्थेमध्ये त्या औषधीला हुंगताच त्यांच्या शरीरांतून बाण बाहेर पडले आणि ते निरोगी होऊन शीघ्रच भूतलावर उठून उभे राहिले. ॥४५॥
तमुत्थितं ते हरयो भूतलात् प्रेक्ष्य लक्ष्मणम् ।
साधु साध्विति सुप्रीताः सुषेणं प्रत्यपूजयन् ।। ४६ ।।
लक्ष्मणांना भूतलावरून उठून उभे राहिलेले पाहून ते वानर अत्यंत प्रसन्न होऊन साधु, साधु म्हणून त्यांची वारंवार प्रशंसा करू लागले. ॥४६॥
एह्येहीत्यब्रवीद् रामो लक्ष्मणं परवीरहा ।
सस्वजे गाढमालिंग्य बाष्पपर्याकुलेक्षणः ।। ४७ ।।
तेव्हा शूरवीरांचा संहार करणारे भगवान्‌ श्रीराम लक्ष्मणांना म्हणाले -ये, ये आणि असे म्हणून त्यांनी त्यांना दोन्ही भुजांनी कवळले आणि गाढ आलिंगन देऊन हृदयाशी धरले. त्यावेळी त्यांच्या नेत्रांतून अश्रु झरत होते. ॥४७॥
अब्रवीच्च परिष्वज्य सौमित्रिं राघवस्तदा ।
दिष्ट्या त्वां वीर पश्यामि मरणात् पुनरागतम् ।। ४८ ।।
सौमित्राला हृदयाशी धरून राघव म्हणाले - वीरा ! फार सौभाग्याची गोष्ट आहे की मी तुला मृत्यु मुखांतून परत आलेला पहात आहे. ॥४८॥
न हि मे जीवितेनार्थः सीतया च जयेन वा ।
को हि मे विजयेनार्थस्त्वयि पञ्चत्वमागते ।। ४९ ।।
तुझ्या शिवाय मला जीवनाची सुरक्षा, सीता अथवा विजय यांच्याशी काहीही साधायचे नाही. जर तूच राहिला नाहीस तर मी या जीवनांस ठेवून काय करू ? ॥४९॥
इत्येवं ब्रुवतस्तस्य राघवस्य महात्मनः ।
खिन्नः शिथिलया वाचा लक्ष्मणो वाक्यमब्रवीत् ।। ५० ।।
महात्मा राघवांनी असे म्हटल्यावर लक्ष्मण खिन्न होऊन शिथिल वाणीने हळू हळू म्हणाले - ॥५०॥
तां प्रतिज्ञां प्रतिज्ञाय पुरा सत्यपराक्रम ।
लघुः कश्चिदिवासत्त्वो नैवं त्वं वक्तुमर्हसि ।। ५१ ।।
आर्य ! आपण सत्यपराक्रमी आहात. आपण प्रथमच रावणाचा वध करून विभीषणाला लंकेचे राज्य देण्याची प्रतिज्ञा केली होती. तशी प्रतिज्ञा करून आता एखाद्या क्षुद्र आणि निर्बल मनुष्याप्रमाणे आपण अशा गोष्टी बोलता कामा नयेत. ॥५१॥
न हि प्रतिज्ञां कुर्वन्ति वितथां सत्यवादिनः ।
लक्षणं हि महत्त्वस्य प्रतिज्ञापरिपालनम् ।। ५२ ।।

नैराश्यमुपगन्तुं ते तदलं मत्कृतेऽनघ ।
वधेन रावणस्याद्य प्रतिज्ञां अनुपालय ।। ५३ ।।
सत्यवादी पुरूष खोटी प्रतिज्ञा करत नाहीत. प्रतिज्ञेचे पालन हेच मोठेपणाचे लक्षण आहे. निष्पाप रघुवीरा ! माझ्यासाठी आपणास इतके निराश होता कामा नये. आज रावणाचा वध करून आपण आपली प्रतिज्ञा पूरी करावी. ॥५२-५३॥
न जीवन् यास्यते शत्रुः तव बाणपथं गतः ।
नर्दतस्तीक्ष्णदंष्ट्रस्य सिंहस्येव महागजः ।। ५४ ।।
आपल्या बाणांचे लक्ष्य बनून शत्रू जिवंत परत जाऊ शकत नाही. ज्या प्रमाणे गर्जना करणार्‍या तीक्ष्ण दाढा असणार्‍या सिंहासमोर येऊन महान्‌ गजराज जिवंत राहू शकत नाही अगदी त्याप्रमाणेच. ॥५४॥
अहं तु वधमिच्छामि शीघ्रमस्य दुरात्मनः ।
यावदस्तं न यात्येष कृतकर्मा दिवाकरः ।। ५५ ।।
हे सूर्यदेव आपले दिवसभराचे भ्रमणकार्य पुरे करून जोपर्यंत अस्ताचलाला निघून जात नाहीत (त्यापूर्वीच) तो पर्यंतच जितके शीघ्र संभव असेल तितक्या लवकर मी त्या दुरात्मा रावणाचा वध पाहू इच्छितो. ॥५५॥
यदि वधमिच्छसि रावणस्य सङ्‌ख्ये
यदि च कृतां हि तवेच्छसि प्रतिज्ञाम् ।
यदि तव राजसुताभिलाष आर्य
कुरु च वचो मम शीघ्रमद्य वीर ।। ५६ ।।
आर्य ! वीरवर ! जर आपण युद्धात रावणाचा वध करू इच्छित असाल, जर आपल्या मनात आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची इच्छा आहे तसेच जर आपण राजकुमारी सीतेला प्राप्त करण्याची अभिलाषा बाळगत असाल तर आज शीघ्रच रावणाला मारून माझी प्रार्थना सफल करावी. ॥५६॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे एकाधिकशततमः सर्गः ।। १०१ ।।
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशे-एकावा सर्व पूरा झाला. ॥१०१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP