[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। षोडशाधिकशततमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
वृद्धेन कुलपतिना सह बहूनां मुनीनां चित्रकूटं त्यक्त्वान्यस्मिन्नाश्रमे गमनम् -
वृद्ध कुलपतिसहित बर्‍याचशा ऋषिंचे चित्रकूट सोडून दुसर्‍या आश्रमात जाणे -
प्रतियाते तु भरते वसन् रामस्तदा वने ।
लक्षयामास सोद्वेगमथौत्सुक्यं तपस्विनाम् ॥ १ ॥
भरत परत गेल्यावर श्रीराम जेव्हां त्या काळात वनात निवास करू लागले तेव्हां त्यांनी पाहिले की तेथील तपस्वी उद्विग्न होऊन तेथून अन्यत्र निघून जाण्यासाठी उत्सुक आहेत. ॥ १ ॥
ये तत्र चित्रकूटस्य पुरस्तात् तापसाश्रमे ।
राममाश्रित्य निरतास्तानलक्षयदुत्सुकान् ॥ २ ॥
प्रथम चित्रकूटातील त्या आश्रमात जे तपस्वी श्रीरामांचा आश्रय घेऊन सदा आनंदमग्न राहात असत, त्यांनाच रामांनी उत्कंठीत झालेले पाहिले ( जणु ते कुठे अन्यत्र जाण्याविषयी काही सांगू इच्छित होते). ॥ २ ॥
नयनैर्भुकुटीभिश्च रामं निर्दिश्य शंकिताः ।
अन्योन्यमुपजल्पन्तः शनैश्चक्रुर्मिथः कथाः ॥ ३ ॥
डोळ्यांनी, भुवया वाकड्या करून, श्रीरामाकडे संकेत करून, मनांतल्या मनांत शंकित होऊन आपापसात काही सल्लामसलत करीत ते तपस्वी मुनि हळूहळू परस्परात वार्तालाप करीत राहिले होते. ॥ ३ ॥
तेषामौत्सुक्यमालक्ष्य रामस्त्वात्मनि शंकितः ।
कृताञ्जलिरुवाचेदमृषिं कुलपतिं ततः ॥ ४ ॥
त्यांची उत्कण्ठा पाहून श्रीरामचंद्रांच्या मनांत ही शंका उत्पन्न झाली की माझ्याकडून काही अपराध तर घडला नाही ना ? तेव्हां हात जोडून तेथील कुलपतिंना ते या प्रकारे म्हणाले - ॥ ४ ॥
न कच्चिद् भगवन् किञ्चित् पूर्ववृत्तमिदं मयि ।
दृश्यते विकृतं येन विक्रियन्ते तपस्विनः ॥ ५ ॥
भगवन् ! काय माझ्या ठिकाणी पूर्ववर्ती राजांच्या सारखे काही आचरण दिसून येत नाही ? अथवा माझ्यामध्ये काही विकृत भाव दृष्टिगोचर होत आहे, ज्यामुळे येथील तपस्वी मुनि विकाराला प्राप्त होत आहेत ? ॥ ५ ॥
प्रमादाच्चरितं किंचित् कच्चिन्नावरजस्य मे ।
लक्ष्मणस्यर्षिभिर्दृष्टं नानुरूपं महात्मनः ॥ ६ ॥
’काय माझा लहान भाऊ महात्मा लक्ष्मण याने प्रमादवश केलेले कुठले असे आचरण ऋषिंनी पाहिले आहे जे त्याच्या योग्य नाही ? ॥ ६ ॥
कच्चिच्छुश्रूषमाणा वः शुश्रूषणपरा मयि ।
प्रमदाभ्युचितां वृत्तिं सीता युक्तं न वर्तते ॥ ७ ॥
अथवा जी अर्घ्य पाद्य आदिंच्या द्वारा सदा आपली सेवा करीत राहात होती ती सीता या समयी माझ्या सेवेत गुंतल्याकारणाने एका गृहस्थाच्या सती नारीला ऋषिंना अनुरूप अशी समुचित सेवा करणे जमत नाही असे आहे का ? ॥ ७ ॥
अथर्षिर्जरया वृद्धस्तपसा च जरां गतः ।
वेपमान इवोवाच रामं भूतदयापरम् ॥ ८ ॥

कुतः कल्याणसत्त्वायाः कल्याणाभिरतेः सदा ।
चलनं तात वैदेह्यास्तपस्विषु विशेषतः ॥ ९ ॥
श्रीरामांनी अशा प्रकारे विचारल्यावर एक महर्षि, जे जरावस्थेमुळे तर वृद्ध होतेच, पण तपस्येमुळे दुर्बल झालेले होते, समस्त ऋषिंच्यावर दया करणार्‍या श्रीरामांना कांपत कांपत म्हणाले, "तात ! जी स्वभावतःच कल्याणमयी आहे आणि सदा सर्वांच्या कल्याणातच रत राहात असते, ती वैदेही सीता विशेषतः तपस्वी जनांच्या प्रति आचरण करते समयी आपल्या कल्याणमयी स्वभावापासून विचलित होऊन जाईल हे कसे शक्य आहे ? ॥ ८-९ ॥
त्वन्निमित्तमिदं तावत् तापसान् प्रति वर्तते ।
रक्षोभ्यस्तेन संविग्नाः कथयन्ति मिथः कथाः ॥ १० ॥
आपल्याच कारणाने तापसांवर हे राक्षसांकडून भय उपस्थित होणार आहे, त्यामुळे उद्विग्न होऊन ऋषि आपसांत काही बोलत वा कानगोष्टी करतांना दिसत आहेत. ॥ १० ॥
रावणावरजः कश्चित् खरो नामेह राक्षसः ।
उत्पाट्य तापसान् सर्वान् जनस्थाननिवासिनः ॥ ११ ॥

धृष्टश्च जितकाशी च नृशंसः पुरुषादकः ।
अवलिप्तश्च पापश्च त्वां च तात न मृष्यते ॥ १२ ॥
’तात ! येथे वनप्रांतात रावणाचा लहान भाऊ खर नामक राक्षस आहे, ज्याने जनस्थानात राहणार्‍या समस्त तापसांना उचलून फेकून दिले आहे. तो फारच धीट, विजयोन्मत्त, क्रूर, नरभक्षी आणि घमेंडखोर आहे. तो आपल्याला सहन करू शकत नाही. ॥ ११-१२ ॥
त्वं यदाप्रभृति ह्यस्मिन्नाश्रमे तात वर्तसे ।
तदाप्रभृति रक्षांसि विप्रकुर्वन्ति तापसान् ॥ १३ ॥
’तात ! जेव्हांपासून आपण या आश्रमात राहू लागला आहात, तेव्हांपासून सर्व राक्षस तापसांना विशेष रूपाने सतावू लागले आहेत. ॥ १३ ॥
दर्शयन्ति हि बीभत्सैः क्रूरैर्भीषणकैरपि ।
नानारूपैर्विरूपैश्च रूपैरसुखदर्शनैः ॥ १४ ॥

अप्रशस्तैरशुचिभिः सम्प्रयुज्य च तापसान् ।
प्रतिघ्नन्त्यपरान् क्षिप्रमनार्याः पुरतः स्थितान् ॥ १५ ॥
’ते अनार्य राक्षस बीभत्स (घृणित), क्रूर, भीषण, नाना प्रकारची विकृत आणि दिसण्यात दुःखदायक रूपे धारण करून समोर येतात आणि पापजनक अपवित्र पदार्थांनी तपस्व्यांना स्पर्श करवून आपल्या समोर उभे असलेल्या ऋषिंनाही पीडा देत आहेत. ॥ १४-१५ ॥
तेषु तेष्वाश्रमस्थानेष्वबुद्धमवलीय च ।
रमन्ते तापसांस्तत्र नाशयन्तोऽल्पचेतसः ॥ १६ ॥
’ते या आश्रमात अज्ञातरूपाने येऊन लपून बसतात आणि अल्पज्ञ अथवा असावधान तापसांचा विनाश करीत तेथे आनंदाने विचरत राहतात. ॥ १६ ॥
अवक्षिपन्ति स्रुग्भाण्डानग्नीन् सिञ्चन्ति वारिणा ।
कलशांश्च प्रमर्दन्ति हवने समुपस्थिते ॥ १७ ॥
होमकर्माचा आरंभ झाला की ते स्त्रुक् स्रुवा आदि यज्ञसामुग्रीला इकडे तिकडे फेकून देतात. प्रज्वलित अग्निमध्ये पाणी टाकतात आणि कलश फोडून टाकतात. ॥ १७ ॥
तैर्दुरात्मभिराविष्टानाश्रमान् प्रजिहासवः ।
गमनायान्यदेशस्य चोदयन्त्यृषयोऽद्य माम् ॥ १८ ॥
त्या दुरात्मा राक्षसांकडून आविष्ट झालेल्या आश्रमांचा त्याग करण्याची इच्छा ठेवून हे ऋषिलोक आज मला येथून अन्य स्थानी चलण्यासाठी प्रेरित करीत आहेत. ॥ १८ ॥
तत्पुरा राम शारीरीमुपहिंसां तपस्विषु ।
दर्शयन्ति हि दुष्टास्ते त्यक्ष्याम इममाश्रमम् ॥ १९ ॥
श्रीरामा ! ते दुष्ट राक्षस तपस्व्यांच्या शारीरिक हिंसेचे प्रदर्शन करण्यापूर्वीच आम्ही या आश्रमाचा त्याग करू. ॥ १९ ॥
बहुमूलफलं चित्रमविदूरादितो वनम् ।
अश्वस्याश्रममेवाहं श्रयिष्ये सगणः पुनः ॥ २० ॥
’येथून थोड्याशा अंतरावर एक विचित्र वन आहे जेथे फलमूलांची विपुलता आहे. तेथेच अश्वमुनिंचा आश्रम आहे. म्हणून ऋषिंच्या समूहास बरोबर घेऊन मी पुन्हा त्याच आश्रमाचा आश्रय घेईन. ॥ २० ॥
खरस्त्वय्यपि चायुक्तं पुरा तात प्रवर्तते ।
सहास्माभिरितो गच्छ यदि बुद्धिः प्रवर्तते ॥ २१ ॥
श्रीरामा ! खर आपल्या प्रतिही काही अनुचित वर्तन करेल. त्यापूर्वीच जर आपला विचार असेल तर आमच्याबरोबर आपण निघून यावे. ॥ २१ ॥
सकलत्रस्य संदेहो नित्यं युक्तस्य राघव ।
समर्थस्यापि हि सतो वासो दुःखमिहाद्य ते ॥ २२ ॥
’राघव (राम) ! जरी आपण सदा सावधान राहाणारे तसेच राक्षसांचे दमन करण्यास समर्थ आहात, तथापि पत्‍नी सह आजकाल त्या आश्रमात आपले राहणे संदेहजनक एवं दुःखदायक आहे." ॥ २२ ॥
इत्युक्तवन्तं रामस्तं राजपुत्रस्तपस्विनम् ।
न शशाकोत्तरैर्वाक्यैरवबद्धुं समुत्सुकम् ॥ २३ ॥
असे म्हणून अन्यत्र जाण्यासाठी उत्कंठित झालेल्या त्या तपस्वी मुनींना राजकुमार श्रीराम सांत्वनाजनक उत्तर वाक्यांच्या द्वारे तेथे रोखू शकले नाहीत. ॥ २३ ॥
अभिनन्द्य समापृच्छ्य समाधाय च राघवम् ।
स जगामाश्रमं त्यक्त्वा कुलैः कुलपतिः सह ॥ २४ ॥
तत्पश्चात ते कुलपति महर्षि श्रीरामचंद्रांचे अभिनंदन करून त्यांना विचारून आणि त्यांना सांत्वना देऊन या आश्रमास सोडून तेथून आपल्या दलाच्या ऋषिंच्या समवेत निघून गेले. ॥ २४ ॥
रामः संसाध्य ऋषिगणमनुगमनाद्
     देशात् तस्मात् कुलपतिमभिवाद्य ऋषिम् ।
सम्यक्प्रीतैस्तैरनुमत उपदिष्टार्थः
     पुण्यं वासाय स्वनिलयमुपसम्पेदे ॥ २५ ॥
श्रीरामचंद्रांनी तेथून जाणार्‍या ऋषींच्या मागोमाग जाऊन त्यांना निरोप देऊन, कुलपति ऋषींना प्रणाम करून परम प्रसन्न झालेल्या त्या ऋषिंची अनुमती घेऊन, त्यांनी दिलेला कर्तव्यविषयक उपदेश ऐकून परतले आणि निवास करण्यासाठी आपल्या पवित्र आश्रमात आले. ॥ २५ ॥
आश्रमं ऋषिविरहितं प्रभुः
     क्षणमपि न जहौ स राघवः ।
राघवं हि सततमनुगता-
     स्तापसाश्चार्षचरिते धृतगुणाः ॥ २६ ॥
त्या ऋषिंच्या रहित झालेल्या आश्रमाला भगवान् राघवांनी एक क्षणासाठी ही सोडले नाही. ज्यांचे ऋषिंच्या समानच चरित्र होते त्या श्रीरामचंद्रांच्या ठिकाणी निश्चितच ऋषिंचे रक्षणाच्या शक्तिरूप गुण विद्यमान आहेत असा विश्वास बाळगणारे काही तपस्वी जनांनी सदा श्रीरामांचेच अनुसरण केले, ते दुसर्‍या कुठल्या आश्रमात गेले नाहीत. ॥ २६ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे षोडशाधिकशततमः सर्गः ॥ ११६ ॥
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकशे सोळावा सर्ग पूरा झाला ॥ ११६ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP