रामायणकाव्यस्य उपक्रमः - तमसातटे क्रौञ्चवधात् संतप्तस्य
वाल्मीकेः शोकस्य श्लोकरूपतया प्रकटनं ब्रह्मणस्तं प्रति रामचरितमयकाव्यनिर्माणार्थं आदेशः |
रामायणकाव्याचा उपक्रम - तमसेच्या तटावर क्रौञ्चवधाने संतप्त झालेल्या महर्षि वाल्मीकिच्या शोकाचे श्लोकरूपात प्रकट होणे; आणि ब्रह्मदेवांनी त्यांना रामचरित्रमय काव्य निर्माण करण्याचा आदेश देणे -
|
नारदस्य तु तद्वाक्यं श्रुत्वा वाक्यविशारदः ।
पूजयामास धर्मात्मा सहशिष्यो महामुनिम् ॥ १ ॥ |
देवर्षि नारदांचे उपर्युक्त वचन ऐकून वाणीविशारद धर्मात्मा ऋषि वाल्मीकिंनी आपल्या शिष्यांसहित त्या महामुनिंचे पूजन केले ॥ १ ॥
|
यथावत् पूजितस्तेन देवर्षिrनारदस्तथा ।
आपृछ्यैवाभ्यनुज्ञातः स जगाम विहायसम् ॥ २ ॥
|
वाल्मीकिंच्याकडून यथावत् सन्मान झाल्यावर देवर्षि नारदांनी त्यांची जाण्यासाठी आज्ञा मागितली आणि त्यांची अनुमति मिळाल्यावर ते आकाश मार्गाने निघून गेले. ॥ २ ॥ |
स मुहूर्तं गते तस्मिन् देवलोकं मुनिस्तदा ।
जगाम तमसातीरं जाह्नव्यास्त्वविदूरतः ॥ ३ ॥
|
ते देवलोकाला निघून गेल्यावर दोनच घटकानंतर वाल्मीकि तमसा नदीच्या तटावर गेले. ते स्थान गंगेपासून फारसे दूर नव्हते. ॥ ३ ॥ |
स तु तीरं समासाद्य तमसाया मुनिस्तदा ।
शिष्यमाह स्थितं पार्श्वे दृष्ट्वा तीर्थमकर्दमम् ॥ ४ ॥
|
तमसेच्या तटावर पोहोंचून तेथील घाटावर चिखल नाही असे स्थान पाहून मुनि आपल्या जवळ उभ्या असलेल्या शिष्यास म्हणाले - ॥ ४ ॥ |
अकर्दममिदं तीर्थं भरद्वाज निशामय ।
रमणीयं प्रसन्नाम्बु सन्मनुष्यमनो यथा ॥ ५ ॥
|
'भरद्वाज ! पहा बरे इथला घाट किती सुंदर आहे. यात चिखलाचे नावही नाही. सत्पुरुषाचे मन जसे स्वच्छ असते तसे येथील पाणी किती स्वच्छ आहे.
॥ ५ ॥ |
न्यस्यतां कलशस्तात दीयतां वल्कलं मम ।
इदमेवावगाहिष्ये तमसातीर्थमुत्तमम् ॥ ६ ॥
|
'तात ! येथे कलश ठेवून दे, आणि माझी वल्कले दे. मी तमसेच्या या उत्तम तीर्थामध्ये स्नान करीन. ॥ ६ ॥ |
एवमुक्तो भरद्वाजो वाल्मीकेन महात्मना ।
प्रायच्छत मुनेस्तस्य वल्कलं नियतो गुरोः ॥ ७ ॥
|
महात्मा वाल्मीकिंनी असे सांगितल्यावर नियम परायण शिष्य भरद्वाजांनी आपले गुरु मुनिवर वाल्मीकि यांना वस्त्र दिले. ॥ ७ ॥ |
स शिष्यहस्तादादाय वल्कलं नियतेन्द्रियः ।
विचचार ह पश्यंस्तत् सर्वतो विपुलं वनम् ॥ ८ ॥
|
शिष्याच्या हातातून वल्क घेऊन ते जितेंद्रिय मुनि तेथील विशाल वनाची शोभा पहात सर्वत्र विचरू लागले. ॥ ८ ॥ |
तस्याभ्याशे तु मिथुनं चरन्तमनपायिनम् ।
ददर्श भगवांस्तत्र क्रौञ्चयोश्चारुनिःस्वनम् ॥ ९ ॥
|
त्यांच्याजवळच कधी एकमेकांपासून विलग न होणारे एक क्रौञ्च पक्ष्यांचे जोडपे विचरत होते. ते दोन्ही पक्षी अत्यंत मधुर बोली बोलत होते. भगवान् वाल्मीकिंनी पक्ष्यांच्या जोडप्यास पाहिले. ॥ ९ ॥ |
तस्मात् तु मिथुनादेकं पुमांसं पापनिश्चयः ।
जघान वैरनिलयो निषादस्तस्य पश्यतः ॥ १० ॥
|
मुनि असे पहात असतांना, त्याचवेळी पापपूर्ण विचाराने युक्त असलेल्या आणि समस्त जंतूशी अकारण वैर करणार्या एका निषादाने तेथे येऊन त्या पक्ष्यांपैकी एकाला, जो नर होता, एका बाणाने मारून टाकले. ॥ १० ॥ |
तं शोणितपरीताङ्गं वेष्टमानं महीतले ।
भार्या तु निहतं दृष्ट्वा रुराव करुणां गिरम् ॥ ११ ॥
|
तो पक्षी रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडला आणि पंख फडफडवीत तडफडू लागला. आपल्या पतीची हत्या झालेली पाहून त्याची भार्या क्रौञ्ची करुणाजनक आर्तस्वराने चीत्कार करू लागली. ॥ ११ ॥ |
वियुक्ता पतिना तेन द्विजेन सहचारिणा ।
ताम्रशीर्षेण मत्तेन पत्त्रिणा सहितेन वै ॥ १२ ॥
|
उत्तम पंखांनी युक्त असलेला तो पक्षी सदा आपल्या पत्नीबरोबर हिंडत असे. त्याच्या मस्तकाचा रंग तांब्याप्रमाणे लाल होता; आणि तो कामाने मत्त झालेला होता. अशा पतिचा वियोग झाल्याने ती क्रौञ्ची अत्यंत दुःखाने रडत होती. ॥ १२ ॥ |
तथाविधं द्विजं दृष्ट्वा निषादेन निपातितम् ।
ऋषेर्धर्मात्मनस्तस्य कारुण्यं समपद्यत ॥ १३ ॥
|
निषादाने ज्याला बाण मारून पाडले होते त्या नरपक्ष्याची दुर्दशा पाहून त्या धर्मात्मा ऋषिंना त्याची फार दया आली. ॥ १३ ॥ |
ततः करुणवेदित्वादधर्मोऽयमिति द्विजः ।
निशाम्य रुदतीं क्रौञ्चीमिदं वचनमब्रवीत् ॥ १४ ॥
|
स्वभावतः करुणेचा आश्रय असलेल्या ब्रह्मर्षिंनी 'हा अधर्म झाला आहे' अशा निश्चयाने त्या रडणार्या क्रौञ्चीकडे पाहून निषादास म्हणाले - ॥ १४ ॥ |
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः ।
यत् क्रौञ्चमिथुनादेकमवधीः काममोहितम् ॥ १५ ॥
|
'निषादा ! तुला नित्य निरंतर कधीही शांति मिळणार नाही; कारण तू या क्रौंचाच्या जोडीमधील कामाने मोहित झालेल्या अशा एकाची, त्याचा काहीही अपराध नसताना तू हत्या केली आहेस.' ॥ १५ ॥ |
तस्यैवं ब्रुवतश्चिंता बभूव हृदि वीक्षतः ।
शोकार्तेनास्य शकुनेः किमिदं व्याहृतं मया ॥ १६ ॥
|
असे म्हणून जेव्हा त्यांनी याच्यावर विचार केला तेव्हां त्यांच्या मनात अशी चिंता उत्पन्न झाली की, 'अरे ! या पक्ष्याच्या शोकाने पीडित होऊन मी हे काय बोलून गेलो !' ॥ १६ ॥ |
चिंतयन् स महाप्राज्ञश्चकार मतिमान्मतिम् ।
शिष्यं चैवाब्रवीद् वाक्यं इदं स मुनिपुङ्गवः ॥ १७ ॥
|
असा विचार करीत महाज्ञानी आणि परम बुद्धिमान मुनिवर वाल्मीकि हे एका निश्चयावर येऊन पोहोचले आणि आपल्या शिष्याला या प्रकारे बोलले - ॥ १७ ॥ |
पादबद्धोऽक्षरसमस्तन्त्रीलयसमन्वितः ।
शोकार्तस्य प्रवृत्तो मे श्लोको भवतु नान्यथा ॥ १८ ॥
|
"तात ! शोकाने पीडित होऊन माझ्या मुखातून जे वाक्य बाहेर पडले
आहे ते चार चरणांनी आबद्ध आहे. प्रत्येक चरणात बरोबर (म्हणजे आठ आठ) अक्षरे
आहेत आणि ते वीणेवरही गायले जाणे शक्य आहे. म्हणून हे वचन श्लोकरूप (अर्थात्
श्लोक नामक छंदात आबद्ध काव्यरूप अथवा यशःस्वरूप) व्हावयास हवे, अन्यथा नाही.
॥ १८ ॥ |
शिष्यस्तु तस्य ब्रुवतो मुनेर्वाक्यमनुत्तमम् ।
प्रतिजग्राह संतुष्टस्तस्य तुष्टोऽभवन्मुनिः ॥ १९ ॥
|
मुनिंचे हे बोलणे ऐकून त्यांचे शिष्य भरद्वाज यांना फार प्रसन्नता वाटली आणि त्यांनी त्यांचे समर्थ करीत म्हटले, "हो, आपले हे वाक्य श्लोकरूपच झाले पाहिजे." शिष्याच्या या कथनाने मुनिंना विशेष संतोष झाला. ॥ १९ ॥ |
सोऽभिषेकं ततः कृत्वा तीर्थे तस्मिन् यथाविधि ।
तमेव चिन्तयन्नर्थमुपावर्तत वै मुनिः ॥ २० ॥
|
त्यानंतर त्यांनी उत्तम तीर्थात विधिपूरक स्नान केले आणि त्याच विषयाचा विचार करीत ते आश्रमाकडे परत निघाले. ॥ २० ॥ |
भरद्वाजस्ततः शिष्यो विनीतः श्रुतवान् गुरोः ।
कलशं पूर्णमादाय पृष्ठतोऽनुजगाम ह ॥ २१ ॥
|
नंतर तो विनीत आणि शास्त्रज्ञ शिष्य भरद्वाज जलाने भरलेला कलश घेऊन आपल्या गुरुजींच्या मागोमाग निघाला. ॥ २१ ॥ |
स प्रविश्याश्रमपदं शिष्येण सह धर्मवित् ।
उपविष्टः कथाश्चान्याश्चकार ध्यानमास्थितः ॥ २२ ॥
|
शिष्याबरोबर आश्रमात पोहोचून धर्मज्ञ ऋषि वाल्मीकि आसनावर बसले आणि इतर गोष्टी बोलत होते, तरीही त्यांचे सर्व लक्ष्य त्या श्लोकाकडेच लागले होते. ॥ २२ ॥ |
आजगाम ततो ब्रह्मा लोककर्त्ता स्वयं प्रभुः ।
चतुर्मुखो महातेजा द्रष्टुं तं मुनिपुङ्गवम् ॥ २३ ॥
|
इतक्यात अखिल विश्वाची उत्पत्ति करणारे, सर्वसमर्थ, महातेजस्वी, चतुर्मुख ब्रह्मदेव मुनिवर वाल्मीकिंना भेटण्यासाठी स्वतः त्यांच्या आश्रमात आहे. ॥ २३ ॥ |
वाल्मीकिरथ तं दृष्ट्वा सहसोत्थाय वाग्यतः ।
प्राञ्जलिः प्रयतो भूत्वा तस्थौ परमविस्मितः ॥ २४ ॥
|
त्यांना पाहताच महर्षि वाल्मीकि तत्परतेने उठून उभे राहिले. ते मन आणि इंद्रियांना ताब्यात ठेवून अत्यंत विस्मित होऊन हात जोडून, काही वेळ काहीच बोलू न शकल्यामुळे गुपचूप उभे राहिले. ॥ २४ ॥ |
पूजयामास तं देवं पाद्यार्घ्यासनवन्दनैः ।
प्रणम्य विधिवच्चैनं पृष्ट्वा चैव निरामयम् ॥ २५ ॥
|
विस्मय ओसरल्यावर भानावर येऊन त्यांनी पाद्य, अर्घ्य, आसन आणि स्तुति आदिंच्या द्वारा भगवान ब्रह्मदेवांचे यथोचित पूजन केले; आणि त्यांच्या चरणी विधिवत प्रणाम करून त्यांचा कुशल समाचार विचारला. ॥ २५ ॥ |
अथोपविश्य भगवानासने परमार्चिते ।
वाल्मीकये च ऋषये संदिदेशासनं ततः ॥ २६ ॥
|
भगवान ब्रह्मदेव एका परम उत्तम आसनावर विराजमान झाले आणि वाल्मीकि मुनिंनाही त्यांनी आसन ग्रहण करण्याची आज्ञा दिली. ॥ २६ ॥ |
ब्रह्मणा समनुज्ञातः सोऽप्युपाविशदासने ।
उपविष्टे तदा तस्मिन् साक्षाल्लोकपितामहे ॥ २७ ॥
तद्गतेनैव मनसा वाल्मीकिर्ध्यानमास्थितः ।
पापात्मना कृतं कष्टं वैरग्रहणबुद्धिना ॥ २८ ॥
यत् तादृशं चारुरवं क्रौञ्चं हन्यादकारणात् ।
|
ब्रह्मदेवांची आज्ञा होताच तेही आसनावर बसले. परंतु त्यावेळी साक्षात् लोकपितामह ब्रह्मदेव समोर बसलेले असूनही वाल्मीकिंचे मन क्रौञ्चासंबंधीच्या घटनेकडे लागलेले होते. ते त्या संबंधीच्या विचारातच मग्न होते. 'ओह ! ज्याची बुद्धी सदा वैरभाव ग्रहण करण्यातच लागलेली असते त्या पापात्मा व्याधाने काहीही अपराध नसता त्या मनोहर कलरव करणार्या क्रौञ्च पक्ष्याचे प्राण घेतले आहेत.' ॥ २७-२८ १/२ ॥ |
शोचन्नेव मुहुः क्रौञ्चीमुपश्लोकमिमं जगौ ॥ २९ ॥
पुनरन्तर्गतमना भूत्वा शोकपरायणः ।
|
अशा विचारात असता त्यांनी क्रौञ्चीचा आर्तनाद ऐकून निषादाला लक्ष्य करून जो श्लोक म्हटला होता, तो त्यांनी ब्रह्मदेवांच्या समक्ष परत म्हटला. त्याचे पुनः पठण करताच परत त्यांच्या मनात आपण दिलेल्या शापाच्या अनौचित्या संबंधी विचार आला. तेव्हां ते शोक आणि चिंता यात बुडून गेले. ॥ २९ १/२ ॥ |
तमुवाच ततो ब्रह्मा प्रहसन् मुनिपुङ्गवम् ॥ ३० ॥
श्लोक एवास्त्वयं बद्धो नात्र कार्या विचारणा ।
मच्छंदादेव ते ब्रह्मन् प्रवृत्तेयं सरस्वती ॥ ३१ ॥
रामस्य चरितं कृत्स्नं कुरु त्वं ऋषिसत्तम ।
|
ब्रह्मदेवांनी त्यांची मनःस्थिती जाणली आणि ते हसू लागले, आणि मुनि वाल्मीकिंना या प्रकारे बोलले. "ब्रह्मन् ! तुमच्या मुखातून निघालेले हे छंदोबद्ध वाक्य श्लोकरूपच होईल. या विषयात तुम्ही दुसरा कुठलाही विचार करता कामा नये. माझ्या संकल्पाने अथवा प्रेरणेनेच तुमच्या मुखातून अशी वाणी निघाली आहे. ॥ ३०-३१ १/२ ॥ |
धर्मात्मनो भगवतो लोके रामस्य धीमतः ॥ ३२ ॥
वृत्तं कथय धीरस्य यथा ते नारदाच्छ्रुतम् ।
|
'मुनिश्रेष्ठ ! तुम्ही श्रीरामाच्या संपूर्ण चरित्राचे वर्णन करा. परम बुद्धिमान भगवान श्रीराम, संसारात सर्वात श्रेष्ठ धर्मात्मा आणि धीर पुरुष आहेत. तुम्ही नारदांच्या मुखाने जसे ऐकले आहे त्यास अनुसरून त्यांच्या चरित्राचे चित्रण करा. ॥ ३२ १/२ ॥ |
रहस्यं च प्रकाशं च यद् वृत्तं तस्य धीमतः ॥ ३३ ॥
रामस्य सहसौमित्रे राक्षसानां च सर्वशः ।
वैदेह्याश्चैव यद् वृत्तं प्रकाशं यदि वा रहः ॥ ३४ ॥
तच्चाप्यविदितं सर्वं विदितं ते भविष्यति ।
|
'बुद्धिमान श्रीरामाचा जो गुप्त अथवा प्रकट वृत्तांत आहे; तसेच लक्ष्मण, सीता आणि राक्षसांचे जे संपूर्ण गुप्त अथवा प्रकट चरित्र आहे, ते सर्व अज्ञात असूनही तुला ज्ञात होईल. ॥ ३३-३४ १/२ ॥ |
न ते वागनृता काव्ये काचिदत्र भविष्यति ॥ ३५ ॥
कुरु रामकथां पुण्यां श्लोकबद्धां मनोरमाम् ।
|
'या काव्यात अंकित झालेली तुझी कुठलीही गोष्ट खोटी होणार नाही. म्हणून तू श्रीरामचंद्रांची परम पवित्र आणि मनोरम कथा श्लोकबद्ध करून लिही. ॥ ३५ १/२ ॥ |
यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले ॥ ३६ ॥
तावद् रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति ।
|
'या पृथ्वीवर जोपर्यंत नद्या आणि पर्वतांची सत्ता राहील, तो
पर्यंत या संसारात रामायण कथेचा प्रचार होत राहील. ॥ ३६ १/२ ॥ |
यावद् रामस्य च कथा त्वत्कृता प्रचरिष्यति ॥ ३७ ॥
तावदूर्ध्वमधश्च त्वं मल्लोकेषु निवत्स्यसि ।
|
'जो पर्यंत तू रचलेल्या श्रीरामकथेचा लोकात प्रचार होत राहील, तो पर्यंत तू इच्छेनुसार वर, खाली तसेच माझ्या लोकात निवास करशील." ॥ ३७ १/२ ॥ |
इत्युक्त्वा भगवान् ब्रह्मा तत्रैवान्तरधीयत ।
ततः सशिष्यो भगवान् मुनिर्विस्मयमाययौ ॥ ३८ ॥
|
असे म्हणून भगवान ब्रह्मदेव तेथेच अंतर्धान पावले. त्यांच्या अशा प्रकारे अंतर्ध्यान होण्याने शिष्यांसह भगवान वाल्मीकि मुनींना फार विस्मय वाटला. ॥ ३८ ॥ |
तस्य शिष्यास्ततः सर्वे जगुः श्लोकमिमं पुनः ।
मुहुर्मुहुः प्रीयमाणाः प्राहुश्च भृशविस्मिताः ॥ ३९ ॥
|
त्यानंतर त्यांचे सर्व शिष्य अत्यंत प्रसन्न होऊन वारंवार त्या श्लोकाचे गान करू लागले आणि परम विस्मीत होऊन परस्परास म्हणू लागले - ॥ ३९ ॥ |
समाक्षरैश्चतुर्भिर्यः पादैर्गीतो महर्षिणा ।
सोऽनुव्याहरणाद् भूयः श्लोकः श्लोकत्वमागतः ॥ ४० ॥
|
"आपल्या गुरुदेवा महर्षिंनी क्रौञ्च पक्ष्यांच्या दुःखाने दुःखी होऊन ज्या समान अक्षरे असणार्या चार चरणांनी युक्त काव्याचे गान केले होते, तो तर त्यांच्या हृदयांतील शोक होता, परंतु त्यांच्या वाणीद्वारा उच्चारीत होऊन श्लोकरूप झाला. ॥ ४० ॥ |
तस्य बुद्धिरियं जाता महर्षेर्भावितात्मनः ।
कृत्स्नं रामायणं काव्यमीदृशैः करवाण्यहम् ॥ ४१ ॥
|
इकडे शुद्ध अंतःकरणाच्या महर्षि वाल्मीकिंच्या मनात असा विचार
आला की मी अशा श्लोकांतच संपूर्ण रामायण काव्याची रचना करीन. ॥ ४१ ॥
|
उदारवृत्तार्थपदैर्मनोरमै-
स्तदास्य रामस्य चकार कीर्तिमान् ।
समाक्षरैः श्लोकशतैर्यशस्विनो
यशस्करं काव्यमुदारदर्शनः ॥ ४२ ॥
|
असा विचार करून उदार दृष्टीच्या त्या यशस्वी महर्षिंनी भगवान श्रीरामचंद्रांच्या चरित्रास धरून हजारो श्लोकांनी युक्त महाकाव्याची रचना केली, जी त्यांचे यश वाढविणारी आहे. यात श्रीरामांच्या उदार चरित्रांचे प्रतिपादन करणार्या मनोहर पदांचा प्रयोग केला गेला आहे. ॥ ४२ ॥ |
तदुपगतसमाससंधियोगं
सममधुरोपनतार्थवाक्यबद्धम् ।
रघुवरचरितं मुनिप्रणीतं
दशशिरसश्च वधं निशामयध्वम् ॥ ४३ ॥
|
महर्षि वाल्मीकि रचित या महाकाव्यात तत्पुरुष आदि समास, दीर्घ-गुण आदि संधि आणि प्रकृति प्रत्ययाच्या संबंधाचा यथायोग्य निर्वाह झाला आहे. याच्या रचनेत समता (पतत् प्रकर्ष आदि दोषांचा अभाव) आहे. पदांत माधुर्य आहे आणि अर्थांत प्रसाद गुणाची अधिकता आहे. भाविक जनहो ! या प्रकारे
शास्त्रीय पद्धतीच्या अनुकूल रचले गेलेल्या या रघुवीर चरित्र आणि रावण वधाच्या प्रसंगाला ध्यान देऊन ऐका. ॥ ४३ ॥ |
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे द्वितीयः सर्गः ॥ २ ॥ |
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील बालकाण्डाचा दुसरा सर्ग समाप्त झाला. ॥ २ ॥
|