सुग्रीवस्य सिंहनादं आकर्ण्य वालिनो युद्ध्याय निर्गमनं, तारया तं अवरुद्ध्य सुग्रीवेण श्रीरामेण च सह मैत्री कर्तुं तस्य प्रबोधनं च -
|
सुग्रीवाची गर्जना ऐकून वालीचे युद्धासाठी निघणे आणि तारेने त्यास अडवून सुग्रीव आणि श्रीरामांशी मैत्री करण्यासाठी समजाविणे -
|
अथ तस्य निनादं तु सुग्रीवस्य महात्मनः । शुश्रावांतःपुरगतो वाली भ्रातुरमर्षणः ॥ १ ॥
|
त्यावेळी अमर्षशील वाली अंतःपुरात होता. त्याने आपला भाऊ महात्मा सुग्रीव याचा सिंहनाद तेथूनच ऐकला. ॥१॥
|
श्रुत्वा तु तस्य निनदं सर्वभूतप्रकंपनम् । मदश्चैकपदे नष्टः क्रोधश्चापतितो महान् ॥ २ ॥
|
समस्त प्राण्यांना कंपित करणारी त्याची ही गर्जना ऐकून त्याचा मद एकाएकी उतरून गेला आणि त्याला अत्यंत क्रोध आला. ॥२॥
|
स तु रोषपरीताङ्गो वाली संध्यातपप्रभः । उपरक्त इवादित्यः सद्यो निष्प्रभतां गतः ॥ ३ ॥
|
नंतर तर त्या सुवर्णासमान पीत वर्णाच्या वालीचे सर्व शरीर क्रोधाने थरथरू लागले. तो राहूग्रस्त सूर्याप्रमाणे तात्काळ श्रीहीन दिसू लागला. ॥३॥
|
वाली दंष्ट्राकरालस्तु क्रोधाद्दीप्ताग्निसंनिभः । भात्युत्पतितमद्माभः समृणाल इव ह्रदः ॥ ४ ॥
|
वालीच्या दाढा विकराळ होत्या, नेत्र क्रोधामुळे प्रज्वलित अग्निप्रमाणे उद्दीप्त होत होते. ज्या तलावातील कमलपुष्पांची शोभा नष्ट होऊन केवळ मृणाल (कमलाचे देठ) शिल्लक राहिलेले असावे अशा तलावाप्रमाणे तो श्रीहीन दिसू लागला. ॥४॥
|
शब्दं दुर्मर्षणं श्रुत्वा निष्पपात ततो हरिः । वेगेन चरणन्यासैर्दारयन्निव मेदिनीम् ॥ ५ ॥
|
तो दुःसह शब्द ऐकून वाली आपल्या पायाच्या आघाताने पृथ्वीला जणु विदीर्ण करीत अत्यंत वेगाने निघाला. ॥५॥
|
तं तु तारा परिष्वज्य स्नेहाद्दर्शितसौहृदा । उवाच त्रस्तसंभ्रांता हितोदर्कमिदं वचः ॥ ६ ॥
|
त्यासमयी वालीची पत्नी तारा भयभीत होऊन घाबरून गेली. तिने वालीला आपल्या दोन्ही भुजामध्ये आवळून धरले आणि स्नेहाने सौहार्दाचा परिचय देत परिणामी हित करणारी ही गोष्ट सांगितली. ॥६॥
|
साधु क्रोधमिमं वीर नदीवेगमिवागतम् । शयनादुत्थितः काल्यं त्यज भुक्तामिव स्रजम् ॥ ७ ॥
|
’वीरा ! मी जी चांगली गोष्ट सांगत आहे ती ऐका आणि एकाएकी आलेल्या नदीच्यावेगा प्रमाणे वाढलेल्या क्रोधाचा त्याग करा. ज्याप्रमाणे प्रातःकाळी शय्येवरून उठणारा पुरुष रात्री उपभोग घेतलेल्या पुष्पमालेचा त्याग करतो, त्या प्रमाणे या क्रोधाचा परित्याग करावा. ॥७॥
|
काल्यमेतेन संग्रामं करिष्यसि च वानर । वीर ते शत्रुबाहुल्यं फल्गुता वा न विद्यते ॥ ८ ॥
सहसा तव निष्क्रामो मम तावन्न रोचते । श्रूयतां चाभिधास्यामि यन्निमित्तं निवार्यसे ॥ ९ ॥
|
’वानरवीर ! उद्या प्रातःकाळी सुग्रीवा बरोबर युद्ध करावे. या समयी थांबावे. जरी युद्धात कोणीही शत्रु आपल्याहून श्रेष्ठ नाही आणि आपण कुणापेक्षाही कमी नाही तथापि यावेळी एकाएकी घरांतून बाहेर पडणे मला ठीक वाटत नाही. आपल्याला अडविण्याचे एक विशेष कारणही आहे, ते सांगते, आपण ऐकावे. ॥८-९॥
|
पूर्वमापतितः क्रोधात्स त्वामाह्वयते युधि । निष्पत्य च निरस्तस्ते हन्यमानो दिशो गतः ॥ १० ॥
|
सुग्रीव आधीही येथे आले होते आणि त्यांनी क्रोधपूर्वक आपल्याला युद्धासाठी ललकारले होते (आव्हानही दिले होते). त्यावेळी आपण नगरांतून त्यांना परास्त केले होते आणि आपला मार खाऊन ते सर्वत्र पळत जाऊन मतंग वनात निघून गेले होते. ॥१०॥
|
त्वया तस्य निरस्तस्य पीडितस्य विशेषतः । इहैत्य पुनराह्वानं शङ्कां् जनयतीव मे ॥ ११ ॥
|
’याप्रकारे आपल्या द्वारा पराजित आणि विशेष पीडित होऊनही ते पुन्हा येथे येऊन आपल्याला युद्धासाठी ललकारत आहेत. त्यांचे हे पुनरागमन माझ्या मनात शंका उत्पन्न करीत आहे. ॥११॥
|
दर्पश्च व्यवसायश्च यादृशस्तस्य नर्दतः । निनादश्चापि संरंभो नैतदल्पं हि कारणम् ॥ १२ ॥
|
’या समयी गर्जत असता सुग्रीवाचा दर्प आणि उद्योग जसा दिसून येत आहे, तसेच त्यांच्या गर्जनेत जी उत्तेजना जाणवत आहे त्यास काही ना काही लहान कारण असू शकत नाही. ॥१२॥
|
नासहायमहं मन्ये सुग्रीवं तमिहागतम् । अवष्टब्धसहायश्च यमाश्रित्यैष गर्जति ॥ १३ ॥
|
’मी समजते आहे की सुग्रीव कुणा प्रबल सहायकाशिवाय आत्ता या वेळी येथे आलेले नाहीत. कुणा सहायकाला बरोबर घेऊनच आले आहेत, ज्यांच्या बलावरच हे या प्रकारे गर्जना करीत आहेत. ॥१३॥
|
प्रकृत्या निपुणश्चैव बुद्धिमांश्चैव वानरः । अपरीक्षितवीर्येण सुग्रीवः सह नेष्यति ॥ १४ ॥
|
’वानर सुग्रीव स्वभावानेच कार्यकुशल आणि बुद्धिमान् आहेत. ते कुणा अशा पुरुषाबरोबर मैत्री करणार नाहीत की ज्याच्या बल आणि पराक्रमाची उत्तम प्रकारे पारख केली गेली नसेल. ॥१४॥
|
पूर्वमेव मया वीर श्रुतं कथयतो वचः । अङ्ग्दस्य कुमारस्य वक्ष्यामि त्वा हितं वचः ॥ १५ ॥
|
’वीर ! मी पूर्वीच कुमार अंगदाच्या मुखाने ही गोष्ट ऐकली आहे, म्हणून आज मी आपल्या हिताची गोष्ट सांगत आहे. ॥१५॥
|
अङ्गवदस्तु कुमारऽ ऽयं वनांतमुपनिर्गतः । प्रवृत्तिस्तेन कथिता चारैराप्तैर्निवेदिता ॥ १६ ॥
|
’एक दिवस कुमार अंगद वनांत गेले होते. तेथे गुप्तचरांनी त्यांना एक समाचार सांगितला, जो त्यांनी येथे येऊन मलाही सांगितला होता. ॥१६॥
|
अयोध्याधिपतेः पुत्रौ शूरौ समरदुर्जयौ । इक्ष्वाकूणां कुले जातौ प्रथितौ रामलक्ष्मणौ ॥ १७ ॥
|
’तो समाचार या प्रकारे आहे- अयोध्या नरेशांचे दोन शूरवीर पुत्र, ज्यांना युद्धात जिंकणे अत्यंत कठीण आहे, ज्यांचा जन्म इक्ष्वाकुकुलात झालेला आहे, तसेच जे राम व लक्ष्मण नांवाने प्रसिद्ध आहेत, येथे ते वनात आलेले आहेत. ॥१७॥
|
सुग्रीवप्रियकामार्थं प्राप्तौ तत्र दुरासदौ । तव भ्रातुर्हि विख्यातः सहायो रणकर्कशः ॥ १८ ॥
रामः परबलामर्दी युगांताग्निरिवोत्थितः । निवासवृक्षः साधूनामापन्नानां परा गतिः ॥ १९ ॥
|
’ते दोघे दुर्जय वीर सुग्रीवांचे प्रिय करण्यासाठी त्यांच्याजवळ पोहोंचले आहेत. त्या दोघांपैकी जे आपल्या भावाला युद्धकर्मात सहायक सांगितले गेले आहेत, ते श्रीराम शत्रु सैन्याचा संहार करणारे आणि प्रलयकालच्या प्रज्वलित झालेल्या अग्निप्रमाणे तेजस्वी आहेत. ते साधु पुरुषांचे आश्रयदाता कल्पवृक्ष आहेत आणि संकटात पडलेल्या प्राण्यांसाठी सर्वात मोठा आश्रय आहेत. ॥१८-१९॥
|
आर्तानां संश्रयश्चैव यशसश्चैकभाजनम् । ज्ञानविज्ञानसंपन्नो निदेशे निरतः पितुः ॥ २० ॥
|
आर्त पुरुषांचा आश्रय, यशाचे एकमात्र भाजन, ज्ञानविज्ञानानी संपन्न तसेच पित्याच्या आज्ञेमध्ये स्थित राहाणारे आहेत. ॥२०॥
|
धातूनामिव शैलेंद्रो गुणानामाकरो महान् । तत्क्षमं न विरोधस्ते सह तेन महात्मना ॥ २१ ॥
दुर्जयेनाप्रमेयेन रामेण रणकर्मसु ।
|
’ज्याप्रमाणे गिरिराज हिमालय नाना धातुंची खाण आहेत, त्या प्रकारेच राम उत्तम गुणांचे मोठे भांडार आहेत, म्हणून त्या महात्मा रामांच्या बरोबर आपले विरोध करणे कदापि उचित नाही, कारण त्यांच्यावर विजय मिळविणे अत्यंत कठीण आहे. ॥२१ १/२॥
|
शूर वक्ष्यामि ते किञ्चिन्न चेच्छाम्यभ्यसूयितुम् ॥ २२ ॥
श्रूयतां क्रियतां चैव तव वक्ष्यामि यद्धितम् ।
|
’शूरवीर ! मी आपल्या गुणांमध्ये दोष पाहू इच्छित नाही; म्हणून आपल्याला काही सांगत आहे. आपल्यासाठी जे हितकर आहे तेच मी सांगत आहे. आपण ते ऐकावे, आणि तेच करावे. ॥२२ १/२॥
|
यौवराज्येन सुग्रीवं तूर्णं साध्वभिषेचय ॥ २३ ॥
विग्रहं मा कृथा वीर भ्रात्रा राजन् बलीयसा ।
|
’आपण शीघ्र सुग्रीवाचा युवराजपदावर अभिषेक करावा हेच चांगले होईल. वीर वानरराज ! सुग्रीव आपले लहान भाऊ आहेत, त्यांच्या बरोबर युद्ध करू नये. ॥२३ १/२॥
|
अहं हि ते क्षमं मन्ये तेन रामेण सौहृदम् ॥ २४ ॥
सुग्रीवेण च संप्रीतिं वैरमुत्सृज्य दूरतः ।
|
’मी आपल्यासाठी हेच उचित समजते आहे की आपण वैरभाव दूर सारून श्रीरामांशी सौहार्द आणि सुग्रीवाशी प्रेमाचा संबंध स्थापित करावा. ॥२४ १/२॥
|
लालनीयो हि ते भ्राता यवीयानेष वानरः ॥ २५ ॥
तत्र वा संनिहस्थो वा सर्वथा बंधुरेव ते । न हि तेन समं बंधुं भुवि पश्यामि कञ्चन ॥ २६ ॥
|
’वानर सुग्रीव आपले लहान बंधु आहेत. म्हणून आपले प्रेम-लाड प्राप्त करण्यास योग्य आहेत. ते ऋष्यमूकवर राहोत अथवा किष्किंधामध्ये राहोत, सर्वथा आपले बंधुच आहेत. मी या पृथ्वीतलावर त्यांच्या समान बंधु दुसर्या कोणास पाहात नाही. ॥२५-२६॥
|
दानमानादिसत्कारैः कुरुष्व प्रत्यनंतरम् । वैरमेतत्समुत्सृज्य तव पार्श्वे स तिष्ठतु ॥ २७ ॥
|
आपण दान-मान आदि सत्कारांच्या द्वारा त्यांना आपले अत्यंत अंतरंग बनवावे; ज्यायोगे ते आपला वैरभाव सोडून आपल्याजवळ राहू शकतील. ॥२७॥
|
सुग्रीवो विपुलग्रीवस्तव बंधुः सदा मतः । भ्रातुः सौहृदमालंब्य नान्या गितिरिहास्ति ते ॥ २८ ॥
|
’पुष्ट ग्रीवा असलेले सुग्रीव आपले अत्यंत प्रेमी बंधु आहेत असे माझे मत आहे. यासमयी भ्रातृप्रेमाचा आधार घेण्याशिवाय आपल्यासाठी येथे दुसरी कुठलीही गति नाही. ॥२८॥
|
यदि ते मत् प्रियं कार्यं यदि चावैषि मां हिताम् । याच्यमानः प्रयत्नेतन साधु वाक्यं कुरुष्व मे ॥ २९ ॥
|
’जर आपल्याला माझे प्रिय करावयाचे असेल तसेच आपण मला आपली हितकारिणी समजत असाल तर मी प्रेमपूर्वक याचना करीत आहे, आपण माझा हा प्रामाणिक सल्ला मानावा. ॥२९॥
|
प्रसीद पथ्यं शृणु जल्पितं हि मे न रोषमेवानुविधातुमर्हसि । क्षमो हि ते कोसलराजसूनुना न विग्रहः शक्रसमानतेजसा ॥ ३० ॥
|
’स्वामी ! आपण प्रसन्न व्हावे. मी आपल्या हिताची गोष्ट सांगत आहे. आपण ही लक्ष देऊन ऐकावी. केवळ रोषाचे अनुसरण करू नये. कोसल राजकुमार श्रीराम इंद्राप्रमाणे तेजस्वी आहेत. त्यांच्याशी वैर धरणे वा युद्ध करणे आपल्यासाठी कदापिही उचित नाही. ॥३०॥
|
तदा हि तारा हितमेव वाक्यं तं वालिनं पथ्यमिदं बभाषे । न रोचते तद्वचनं हि तस्य कालाभिपन्नस्य विनाशकाले ॥ ३१ ॥
|
त्यासमयी तारेने वालीला त्याच्या हिताचीच गोष्ट सांगितली होती, आणि ती लाभदायकही होती. परंतु तिची गोष्ट त्याला रूचली नाही; कारण की त्याच्या विनाशाचा समय निकट होता आणि तो कालाच्या पाशात बद्ध होऊन चुकला होता. ॥३१॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे पञ्चदशः सर्गः ॥ १५ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा पंधरावा सर्ग पूरा झाला. ॥१५॥
|