माणिभद्रकुबेरयोः पराजयो रावणेन पुष्पकस्यापहरणं च -
|
माणिभद्र तसेच कुबेराचा पराजय आणि रावण द्वारा पुष्पक विमानाचे अपहरण -
|
ततस्ताँल्लक्ष्य वित्रस्तान् यक्षेन्द्रांश्च सहस्रशः । धनाध्यक्षो महायक्षं माणिचारमथाब्रवीत् ॥ १ ॥
|
(अगस्त्य म्हणतात - रघुनंदना !) धनाध्यक्षांनी पाहिले, हजारो यक्षप्रवर भयभीत होऊन पळून जात आहेत, तेव्हा त्यांनी माणिभद्र नामक एका महायक्षाला म्हटले - ॥१॥
|
रावणं जहि यक्षेन्द्र दुर्वृत्तं पापचेतसम् । शरणं भव वीराणां यक्षाणां युद्धशालिनाम् ॥ २ ॥
|
यक्षप्रवर ! रावण पापात्मा आणि दुराचारी आहे, तू त्याला मारून टाक आणि युद्धात शोभा प्राप्त करणार्या वीर यक्षांना आश्रय द्या - त्यांचे रक्षण करा. ॥२॥
|
एवमुक्तो महाबाहुः माणिभद्रः सुदुर्जयः । वृतो यक्षसहस्रैस्तु चतुर्भिः समयोधयत् ॥ ३ ॥
|
महाबाहु माणिभद्र अत्यंत दुर्जय वीर होता. कुबेरांची ही आज्ञा मिळताच तो चार हजार यक्षांची सेना बरोबर घेऊन फाटकावर गेला आणि राक्षसांशी युद्ध करू लागला. ॥३॥
|
ते गदामुसलप्रासैः शक्तितोमरमुद्गरैः । अभिघ्नन्तस्तदा यक्षा राक्षसान् समुपाद्रवन् ॥ ४ ॥
|
त्या समयी यक्षांच्या मधील योद्धे गदा, मुसळे, प्रास, शक्ति, तोमर तसेच मुद्गरांचा प्रहार करत राक्षसांवर तुटून पडले. ॥४॥
|
कुर्वन्तस्तुमुलं युद्धं चरन्तः श्येनवल्लघु । बाढं प्रयच्छन्नेच्छामि दीयतामिति भाषिणः ॥ ५ ॥
|
ते घोर युद्ध करीत ससाण्याप्रमाणे तीव्र गतीने सर्व बाजूस विचरण करू लागले. कोणी म्हणू लागला मला युद्धाचा अवसर द्या. दुसरा बोलला - मी येथून मागे सरू इच्छित नाही. नंतर तिसरा म्हणतो आहे की मला आपले हत्यार द्या. ॥५॥
|
ततो देवाः सगन्धर्वा ऋषयो ब्रह्मवादिनः । दृष्ट्वा तत् तुमुलं युद्धं परं विस्मयमागमन् ॥ ६ ॥
|
ते तुमुल युद्ध पाहून देवता, गंधर्व तसेच ब्रह्मचारी ऋषिही फार संभ्रमात पडले होते. ॥६॥
|
यक्षाणां तु प्रहस्तेन सहस्रं निहतं रणे । महोदरेण चानिन्द्यं सहस्रमपरं हतम् ॥ ७ ॥
|
त्या रणभूमीमध्ये प्रहस्ताने एक हजार यक्षांचा संहार करून टाकला. नंतर महोदराने दुसर्या एक सहस्त्र प्रशंसनीय यक्षांचा विनाश केला. ॥७॥
|
क्रुद्धेन च तदा राजन् मारीचेन युयुत्सुना । निमेषान्तरमात्रेण द्वे सहस्रे निपातिते ॥ ८ ॥
|
राजन् ! त्या समयी कुपित झालेल्या रणोत्सुक मारीचाने डोळ्याचे पाते लवते न लवते तोच शेष दोन हजार यक्षांना धराशायी केले. ॥८॥
|
क्व च यक्षार्जवं युद्धं क्व च मायाबलाश्रयम् । रक्षसां पुरुषव्याघ्र तेन तेऽभ्यधिका युधि ॥ ९ ॥
|
पुरुषसिंह ! कोठे यक्षांचे सरलतापूर्वक युद्ध ? आणि कोठे राक्षसांचा मायामय संग्राम ? ते आपल्या मायाबलामुळेच (त्याच्या आश्रयानेच ) यक्षांपेक्षा अधिक शक्तिशाली सिद्ध झाले. ॥९॥
|
धूम्राक्षेण समागम्य माणिभद्रो महारणे । मुसलेनोरसि क्रोधात् ताडितो न च कम्पितः ॥ १० ॥
|
त्या महासमरात धूम्राक्षाने येऊन क्रोधपूर्वक मणिभद्राच्या छातीवर मुसळाचा प्रहार केला, परंतु त्यामुळे ते विचलित झाले नाहीत. ॥१०॥
|
ततो गदां समाविध्य माणिभद्रेण राक्षसः । धूम्राक्षस्ताडितो मूर्ध्नि विह्वलः स पपात ह ॥ ११ ॥
|
नंतर मणिभद्रानेही गदा फिरवून त्या राक्षस धूम्राक्षाच्या मस्तकावर फेकून मारली, तिच्या आघाताने व्याकुळ होऊन धूम्राक्ष जमिनीवर कोसळला. ॥११॥
|
धूम्राक्षं ताडितं दृष्ट्वा पतितं शोणितोक्षितम् । अभ्यधावत संग्रामे माणिभद्रं दशाननः ॥ १२ ॥
|
धूम्राक्षाला गदेच्या प्रहाराने घायाळ आणि रक्तबंबाळ होऊन पृथ्वीवर पडलेला पाहून रावणाने रणभूमिमध्ये मणिभद्रावर हल्ला केला. ॥१२॥
|
तं क्रुद्धमभिधावन्तं माणिभद्रो दशाननम् । शक्तिभिस्ताडयामास तिसृभिर्यक्षपुङ्गवः ॥ १३ ॥
|
दशाननाला क्रोधाने भरून हल्ला करतांना पाहून यक्षप्रवर मणिभद्राने त्याच्यावर तीन शक्तिंच्या द्वारा प्रहार केला. ॥१३॥
|
ताडितो माणिभद्रस्य मुकुटे प्राहरद् रणे । तस्य तेन प्रहारेम मुकुटं पार्श्वमागतम् ॥ १४ ॥
|
आघात सोसून रावणाने रणभूमिमध्ये मणिभद्राच्या मुकुटावर वार केला. त्याच्या त्या प्रहाराने त्यांचा मुकुट घसरून बगलेत आला. ॥१४॥
|
ततःप्रभृति यक्षोऽसौ पार्श्वमौलिरभूत् किल । तस्मिंस्तु विमुखीभूते माणिभद्रे महात्मनि । सन्नादः सुमहान् राजन् तस्मिन् शैले व्यवर्धत ॥ १५ ॥
|
तेव्हा पासून मणिभद्र यक्ष पार्श्वमौलि नावाने प्रसिद्ध झाले. महामना मणिभद्र यक्ष युद्धातून पळून चालले. राजन् ! ते युद्धापासून विमुख होताच त्या पर्वतावर राक्षसांचा महान् सिंहनाद सर्व बाजूस पसरला. ॥१५॥
|
ततो दूरात् प्रददृशे धनाध्यक्षो गदाधरः । शुक्रप्रौष्ठपदाभ्यां च पद्मशङ्खसमावृतः ॥ १६ ॥
|
त्यासमयी धनाचे स्वामी गदाधारी कुबेर दुरून येतांना दिसून येऊ लागले. त्यांच्या बरोबर शुक्र आणि प्रौष्ठपद नामक मंत्री तसेच शंख आणि पद्मनाभ धनाच्या अधिष्ठाता देवता हीहोत्या. ॥१६॥
|
स दृष्ट्वा भ्रातरं संख्ये शापाद् विभ्रष्टगौरवम् । उवाच वचनं धीमान् युक्तं पैतामहे कुले ॥ १७ ॥
|
विश्रवा मुनिच्या शापाने क्रूर प्रकृति झाल्याने जो गुरूजनांप्रति प्रणाम आदि व्यवहारही करू शकत नव्हता - गुरूजनोचित शिष्टाचारापासून जो वंचित होता, त्या आपला भाऊ रावण यास युद्धामध्ये बुद्धिमान् कुबेरांनी ब्रह्मदेवांच्या कुळात उत्पन्न झालेल्या पुरुषास योग्य असे वचन उच्चारले - ॥१७॥
|
यन्मया वार्यमाणस्त्वं नावगच्छसि दुर्मते । पश्चादस्य फलं प्राप्य ज्ञास्यसे निरयं गतः ॥ १८ ॥
|
दुर्बुद्धि दशग्रीवा ! मी नको म्हणत असतांही या समयी तू समजत नाहीस. परंतु पुढे जेव्हा या कुकर्माचे फळ प्राप्त होईल आणि नरकात पडशील, त्यावेळी माझे बोलणे तुला समजून येईल. ॥१८॥
|
यो हि मोहाद् विषं पीत्वा नावगच्छति दुर्मतिः । स तस्य परिणामान्ते जानीते कर्मणः फलम् ॥ १९ ॥
|
जो खोटी बुद्धि असणारा पुरुष मोहवश विष पिऊनही त्याला विष समजत नाही, त्याला त्याचा परिणाम प्राप्त झाल्यावर आपल्या केले गेलेल्या त्या कर्माच्या फळाचे ज्ञान होते. ॥१९॥
|
देवतानि न नन्दन्ति धर्मयुक्तेन केनचित् । येन त्वमीदृशं भावं नीतस्तच्च न बुद्ध्यसे ॥ २० ॥
|
तुझ्या कुठल्याही व्यवहाराने, मग तो तुझ्या मान्यतेस अनुसरून धर्मयुक्त का असेना, देवता प्रसन्न होत नाहीत, म्हणून तू अशा क्रूर भावाला प्राप्त झाला आहेस, परंतु ही गोष्ट तुला समजत नाही. ॥२०॥
|
मातरं पितरं यो हि आचार्यं चावमन्यते । स पश्यति फलं तस्य प्रेतराजवशं गतः ॥ २१ ॥
|
जो माता, पिता, ब्राह्मण आणि आचार्यांचा अपमान करतो तो यमराजाच्या आधीन होऊन त्या पापाचे फळ भोगतो. ॥२१॥
|
अध्रुवे हि शरीरे यो न करोति तपोर्जनम् । स पश्चात् तप्यते मूढो मृतो गत्वाऽऽत्मनो गतिम् ॥ २२ ॥
|
हे शरीर क्षणभंगुर आहे. हे प्राप्त झाले असता जो तपाचे उपार्जन करत नाही तो मूर्ख मेल्यानंतर जेव्हा आपल्या कुकर्मांचे फळ प्राप्त करतो तेव्हा पश्चात्ताप करु लागतो. ॥२२॥
|
धर्माद् राज्यं धनं सौख्यं अधर्माद् दुःखमेव च । तस्माद् धर्मं सुखार्थाय कुर्यात् पापं विसर्जयेत् ॥ २३ ॥
|
धर्माने राज्य, धन आणि सुखाची प्राप्ति होते. अधर्माने केवळ दुःखच भोगावे लागते. म्हणून सुखासाठी धर्माचे आचरण करावे, पापाचा सर्वथा त्याग करावा. ॥२३॥
|
पापस्य हि फलं दुःखं तद्भोक्तव्यमिहात्मना । तस्माद् आत्मापघातार्थं मूढः पापं करिष्यति ॥ २४ ॥
|
पापाचे फळ केवळ दुःख आहे आणि ते स्वतःच येथे भोगावे लागते. म्हणून जो मूढ पाप करील तो जणु स्वतःच आपला वध करील. ॥२४॥
|
कस्यचिन्न हि दुर्बुद्धेः छन्दतो जायते मतिः । यादृशं कुरुते कर्म तादृशं फलमश्नुते ॥ २५ ॥
|
कुठल्याही दुर्बुद्धि पुरुषाला (शुभकर्माचे अनुष्ठान आणि गुरूजनांची सेवा केल्याशिवाय) स्वेच्छामात्रे करून उत्तम बुद्धिची प्राप्ति होत नाही. तो जसे कर्म करतो तसेच फळ भोगतो. ॥२५॥
|
ऋद्धिं रूपं बलं पुत्रान् वित्तं शूरत्वमेव च । प्राप्नुवन्ति नरा लोके निर्जितं पुण्यकर्मभिः ॥ २६ ॥
|
संसारातील पुरुषांना समृद्धि, सुंदर रूप, बल, वैभव, वीरता तसेच पुत्र आदिंची प्राप्ति पुण्यकर्मांच्या अनुष्ठानानेच होते. ॥२६॥
|
एवं निरयगामी त्वं यस्य ते मतिरीदृशी । न त्वां समभिभाषिष्ये सद्वृत्तेष्वेव निर्णयः ॥ २७ ॥
|
याप्रकारे आपल्या दुष्कर्मांच्या कारणाने तुलाही नरकात जावे लागेल, कारण तुझी बुद्धि अशी पापाचारी होत आहे. दुराचारींशी बोलताही कामा नये, हाच शास्त्रांचा निर्णय आहे, म्हणून मी ही आता तुझ्याशी काही बोलणार नाही. ॥२७॥
|
एवमुक्तास्ततस्तेन तस्यामात्याः समाहताः । मारीचप्रमुखाः सर्वे विमुखा विप्रदुद्रुवुः ॥ २८ ॥
|
त्याच प्रकारची गोष्ट त्यांनी रावणाच्या मंत्र्यांनाही सांगितली. नंतर त्यांच्यावर शस्त्रप्रहार केला. यामुळे आहत होऊन ते मारीच आदि राक्षस युद्धापासून तोंड फिरवून पळून गेले. ॥२८॥
|
ततस्तेन दशग्रीवो यक्षेन्द्रेण महात्मना । गदयाभिहतो मूर्ध्नि न च स्थानात् प्रकम्पितः ॥ २९ ॥
|
त्यानंतर महामना यक्षराजा कुबेरांनी आपल्या गदेने रावणाच्या मस्तकावर प्रहार केला. त्याने आहत होऊनही तो आपल्या स्थानापासून विचलित झाला नाही. ॥२९॥
|
ततस्तौ राम निघ्नन्तौ तदान्योन्यं महामृधे । न विह्वलौ न च श्रान्तौ तावुभौ यक्षराक्षसौ ॥ ३० ॥
|
श्रीरामा ! त्यानंतर ते दोन्ही यक्ष आणि राक्षस - कुबेर आणि रावण दोन्ही त्या महासमरांत एक दुसर्यावर प्रहार करु लागले परंतु दोन्हीपैकी कोणीही कधी घाबरत नव्हते अथवा थकतही नव्हते. ॥३०॥
|
आग्नेयमस्त्रं तस्मै स मुमोच धनदस्तदा । राक्षसेन्द्रो वारुणेन तदस्त्रं प्रत्यवारयत् ॥ ३१ ॥
|
त्यासमयी कुबेराने रावणावर आग्नेयास्त्राचा प्रयोग केला परंतु राक्षसराज रावणाने वरुणास्त्राच्या द्वारा त्यांच्या त्या अस्त्राला शांत करून टाकले. ॥३१॥
|
ततो मायां प्रविष्टोऽसौ राक्षसीं राक्षसेश्वरः । रूपाणां शतसाहस्रं विनाशाय चकार च ॥ ३२ ॥
|
त्यानंतर त्या राक्षसराजाने राक्षसी मायेचा आश्रय घेतला आणि कुबेरांच्या विनाशासाठी लाखो रूपे धारण केली. ॥३२॥
|
व्याघ्रो वराहो जीमूतः पर्वतः सागरो द्रुमः । यक्षो दैत्यस्वरूपी च सोऽदृश्यत दशाननः ॥ ३३ ॥
|
त्यासमयी दशमुख रावण वाघ, डुक्कर, मेघ, पर्वत, समुद्र, वृक्ष, यक्ष आणि दैत्य सर्व रूपामध्ये दिसून येऊ लागला. ॥३३॥
|
बहूनि च करोति स्म दृश्यन्ते न त्वसौ ततः । प्रतिगृह्य ततो राम महदस्त्रं दशाननः ॥ ३४ ॥ जघान मूर्ध्नि धनदं व्याविद्ध्य महतीं गदाम् ।
|
याप्रकारे तो बर्याचशा रूपांत प्रकट होत होता. ती रूपेच दिसत होती. तो स्वतः दृष्टिगोचर होतच नव्हता. श्रीरामा ! त्यानंतर दशमुखाने एक फार मोठी गदा हातात घेतली आणि ती फिरवून कुबेरांच्या मस्तकावर फेकून मारली. ॥३४ १/२॥
|
एवं स तेनाभिहतो विह्वलः शोणितोक्षितः ॥ ३५ ॥ कृत्तमूल इवाशोको निपपात धनाधिपः ।
|
याप्रकारे रावणद्वारा आहत होऊन धनाचे स्वामी कुबेर रक्ताने न्हाऊन निघाले आणि व्याकुळ होऊन मूळापासून उपटून टाकलेल्या अशोकाप्रमाणे पृथ्वीवर कोसळले. ॥३५ १/२॥
|
ततः पद्मादिभिस्तत्र निधिभिः स तदा वृतः ॥ ३६ ॥ धनदोच्छ्वासितस्तैस्तु वनमानीय नन्दनम् ।
|
त्यानंतर पद्म आदि निधिंच्या अधिष्ठाता देवतांनी त्यांना घेरून उचलले आणि नंदनवनात घेऊन जाऊन सावध केले. ॥३६ १/२॥
|
निर्जित्य राक्षसेन्द्रस्तं धनदं हृष्टमानसः ॥ ३७ ॥ पुष्पकं तस्य जग्राह विमानं जयलक्षणम् ।
|
याप्रमाणे कुबेराला जिंकून राक्षसराज रावण आपल्या मनांत खूप प्रसन्न झाला आणि विजयाचे चिह्न या रूपाने त्याने त्यांचे पुष्पक विमान आपल्या ताब्यात घेतले. ॥३७ १/२॥
|
काञ्चनस्तम्भसंवीतं वैदूर्यमणितोरणम् ॥ ३८ ॥ मुक्ताजालप्रतिच्छन्नं सर्वकामफलद्रुमम् ।
|
त्या विमानात सोन्याचे खांब आणि वैडूर्यमण्यांची तोरणे लागलेली होती. ते सर्व बाजूने मोत्यांच्या जाळ्यांनी झाकलेले होते. त्याच्या आत असे वृक्ष लागलेले होते की जे सर्व ऋतुंमध्ये फळ देणारे होते. ॥३८ १/२॥
|
मनोजवं कामगमं कामरूपं विहंगमम् ॥ ३९ ॥ मणिकाञ्चनसोपानं तप्तकाञ्चनवेदिकम् ।
|
त्याचा वेग मनासारखा तीव्र होता. ते आपल्यावर बसलेल्या लोकांच्या इच्छेनुसार सर्व जागी जाऊ शकत होते. तसेच चालक जशी इच्छा करेल त्याप्रमाणे लहान अथवा मोठे रूप धारण करत होते. त्या आकाशचारी विमानात मणि आणि सुवर्णाच्या पायर्या आणि तापवलेल्या सोन्याच्या वेदी बनविलेल्या होत्या. ॥३९ १/२॥
|
देवोपवाह्यमक्षय्यं सदादृष्टिमनःसुखम् ॥ ४० ॥ बह्वाश्चर्यं भक्तिचित्रं ब्रह्मणा परिनिर्मितम् ।
|
ते देवतांचेच वाहन होते आणि तुटणारे - फुटणारे नव्हते. सदा दिसण्यांत सुंदर आणि चित्ताला प्रसन्न करणारे होते. त्यात अनेक प्रकारची आश्चर्यजनक चित्रे होते. त्याच्या भिंतीवर तर्हेतर्हेची वेलबुट्टी बनविलेली होती, जिच्यामुळे त्याची विचित्र शोभा होत होती. ब्रह्मा (विश्वकर्मा) याने त्याची निर्मिती केली होती. ॥४० १/२॥
|
निर्मितं सर्वकामैस्तु मनोहरमनुत्तमम् ॥ ४१ ॥ न तु शीतं न चोष्णं च सर्वर्तुसुखदं शुभम् । स तं राजा समारुह्य कामगं वीर्यनिर्जितम् ॥ ४२ ॥ जितं त्रिभुवनं मेने दर्पोत्सेकात् सुदुर्मतिः । जित्वा वैश्रवणं देवं कैलासात् समवातरत् ॥ ४३ ॥
|
ते सर्व प्रकारच्या मनोवांछित वस्तुंनी संपन्न, मनोहर आणि परम उत्तम होते. ते अती शीत नव्हते वा अधिक उष्णही नव्हते. सर्व ऋतुंमध्ये आराम देणारे तसेच मंगलकारी होते. आपल्या पराक्रमाने जिंकलेल्या त्या इच्छेनुसार चालणार्या विमानावर आरूढ होऊन अत्यंत खोटी बुद्धि असलेला राजा रावण अहंकाराच्या मदाने असे मानू लागला की जणु मी तीन्ही लोक जिंकले आहेत. याप्रकारे वैश्रवण देवाला पराजित करून तो कैलासावरून खाली उतरला. ॥४१-४३॥
|
स तेजसा विपुलमवाप्य तं जयं प्रतापवान् विमलकिरीटहारवान् । रराज वै परमविमानमास्थितो निशाचरः सदसि गतो यथानलः ॥ ४४ ॥
|
निर्मल किरीट आणि हारांनी विभूषित तो प्रतापी निशाचर आपल्या तेजाने तो महान् विजय मिळवून त्या उत्तम विमानावर आरूढ होऊन अग्निदेवाप्रमाणे शोभा प्राप्त करू लागला. ॥४४॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे पञ्चदशः सर्गः ॥ १५ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा पंधरावा सर्ग पूरा झाला. ॥१५॥
|