श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ चत्वारिंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सुग्रीवरावणयोर्मल्लयुद्धम् - सुग्रीव आणि रावणाचे मल्लयुद्ध -
ततो रामः सुवेलाग्रं योजनद्वयमण्डलम् ।
आरुरोह ससुग्रीवो हरियूथैः समन्वितः ॥ १ ॥
नंतर वानरयूथांनी युक्त सुग्रीवासहित श्रीराम सुवेल पर्वताच्या सर्वांत उंच शिखरांवर चढले ज्याचा विस्तार दोन योजनाचा होता. ॥१॥
स्थित्वा मूहूर्तं तत्रैव दिशो दश विलोकयन् ।
त्रिकूटशिखरे रम्ये निर्मितां विश्वकर्मणा ॥ २ ॥

ददर्श लङ्‌कां सुन्यस्तां रम्यकाननशोभिताम् ।
तेथे एक मुहूर्तभर थांबून दाही दिशांकडे दृष्टिपात करीत श्रीरामांनी त्रिकूट पर्वताच्या रमणीय शिखरांवर सुंदर रीतीने बसलेल्या विश्वकर्माद्वारा निर्मित लंकापुरीला पाहिले, जी मनोहर काननांनी सुशोभित झालेली होती. ॥२ १/२॥
तस्य गोपुरशृङ्‌गस्थं राक्षसेन्द्रं दुरासदम् ॥ ३ ॥

श्वेतचामरपर्यन्तं विजयच्छत्रशोभितम् ।
रक्तचंदनसंलिप्तं रत्‍ना्भरणभूषितम् ॥ ४ ॥
त्या नगराच्या गोपुराच्या छतावर त्यांना दुर्जय राक्षसराज रावण बसलेला दिसून आला. त्याच्या दोन्ही बाजूस चवर्‍या ढाळल्या जात होत्या आणि शिरावर विजय-छत्र शोभत होते. रावणाचे सारे शरीर रक्तचंदनाने चर्चित होते. त्याचे अंग लाल रंगाच्या आभूषणांनी विभूषित होते. ॥३-४॥
नीलजीमूतसंकाशं हेमसंछादितांबरम् ।
ऐरावतविषाणाग्रैः उत्कृष्टकिणवक्षसम् ॥ ५ ॥
तो काळ्या मेघासमान भासत होता. त्याच्या वस्त्रांवर सोन्याने काम केलेले होते. ऐरावत हत्तीच्या दाताच्या अग्रभागाने आहत झाल्यामुळे त्याच्या वक्ष:स्थळावर आघातचिन्हे उमटलेली होती. ॥५॥
शशलोहितरागेण संवीतं रक्तवाससा ।
सन्ध्यातपेन संछन्नं मेघराशिमिवांबम्बरे ॥ ६ ॥
सशाच्या रक्तासमान लाल रंगाने रंगविलेल्या वस्त्रांनी आच्छादित होऊन तो आकाशात संध्याकालीन उन्हाने आच्छादित झालेल्या मेघराशीप्रमाणे दिसत होता. ॥६॥
पश्यतां वानरेन्द्राणां राघवस्यापि पश्यतः ।
दर्शनाद् राक्षसेन्द्रस्य सुग्रीवः सहसोत्थितः ॥ ७ ॥
मुख्य मुख्य वानर तसेच राघवाच्या समोरच राक्षसराज रावणावर दृष्टि पडताच सुग्रीव एकाएकी उभा राहिला. ॥७॥
क्रोधवेगेन संयुक्तः सत्त्वेन च बलेन च ।
अचलाग्रादथोत्थाय पुप्लुवे गोपुरस्थले ॥ ८ ॥
तो क्रोधाच्या वेगाने युक्त आणि शारिरीक तसेच मानसिक बलाने प्रेरित होऊन सुवेलाच्या शिखरावरून उडून त्याने गोपुराच्या छतावर उडी मारली. ॥८॥
स्थित्वा मुहूर्तं संप्रेक्ष्य निर्भयेनान्तरात्मना ।
तृणीकृत्य च तद् रक्षः सोऽब्रवीत् परुषं वचः ॥ ९ ॥
तेथे उभा राहून ते काही वेळ पर्यंत रावणाकडे पहात राहिले. नंतर निर्भय चित्ताने त्या राक्षसाला गवताच्या काडीप्रमाणे (तृणवत) समजून ते कठोर वाणीने म्हणाले - ॥९॥
लोकनाथस्य रामस्य सखा दासोऽस्मि राक्षस ।
न मया मोक्ष्यसेऽद्य त्वं पार्थिवेन्द्रस्य तेजसा ॥ १० ॥
राक्षसा ! मी लोकनाथ भगवान्‌ श्रीरामांचा सखा आणि दास आहे. महाराज श्रीरामांच्या तेजाने आज तू माझ्या हातातून सुटू शकणार नाहीस. ॥१०॥
इत्युक्त्वा सहसोत्पत्य पुप्लुवे तस्य चोपरि ।
आकृष्य मुकुटं चित्रं पातयामास तद्‌ भुवि ॥ ११ ॥
असे म्हणून ते अकस्मात्‌ उडी मारून रावणावर कोसळले. आणि त्याच्या विचित्र मुकुटाला खेचून त्यांनी पृथ्वीवर फेकून दिले. ॥११॥
समीक्ष्य तूर्णमायान्तं बभाषे तं निशाचरः ।
सुग्रीवस्त्वं परोक्षं मे हीनग्रीवो भविष्यसि ॥ १२ ॥
त्यांना याप्रकारे तीव्र गतीने आपल्यावर आक्रमण करतांना पाहून रावणाने म्हटले- अरे ! जोपर्यंत तू माझ्या समोर आला नव्हतास तोपर्यंत सुग्रीव (सुंदर कंठानी युक्त) होतास. आता तर तू आपल्या या ग्रीवेच्या रहित होऊन जाशील. ॥१२॥
इत्युक्त्वोत्थाय तं क्षिप्रं बाहुभ्यामाक्षिपत् तले ।
कन्तुवत् स समुत्थाय बाहुभ्यामाक्षिपद् हरिः ॥ १३ ॥
असे म्हणून रावणाने आपल्या दोन्ही भुजांच्या द्वारा त्याला लगेचच उचलून त्या छताच्या फर्शीवर आपटले. नंतर वानरराज सुग्रीवांनी ही चेंडूप्रमाणे उसळी घेऊन रावणाला दोन्ही भुजांनी उचलले आणि त्याच फर्शीवर आपटले. ॥१३॥
परस्परं स्वेदविदिग्धगात्रौ
परस्परं शोणितरक्तदेहौ ।
परस्परं श्लिष्टनिरुद्धचेष्टौ
परस्परं शाल्मलिकिंशुकाविव ॥ १४ ॥
नंतर तर ते दोघे आपसात एकमेकाशी भिडले. दोघांची शरीरे घामाने थबथबून गेली आणि रक्ताने माखून गेली. तसेच दोघेही एकमेकाच्या पकडीत आल्यामुळे निश्चेष्ट होऊन शाल्मली आणि पलाश नामक वृक्षांप्रमाणे दिसू लागले. ॥१४॥
मुष्टिप्रहारैश्च तलप्रहारैः
अरत्‍निंघातैश्च कराग्रघातैः ।
तौ चक्रतुर्युद्धमसह्यरूपं
महाबलौ वानरराक्षसवानरेन्द्रौ ॥ १५ ॥
राक्षसराज रावण आणि वानरराज सुग्रीव दोघेही फार बलवान्‌ होते म्हणून दोघेही गुद्दे, थपडा, हातांचे कोपर आणि पंजे यांनी एकमेकास मारून असह्य युद्ध करू लागले. ॥१५॥
कृत्वा नियुद्धं भृशमुग्रवेगौ
कालं चिरं गोपुरवेदिमध्ये ।
उत्क्षिप्य चाक्षिप्य विनम्य देहौ
पादक्रमाद्‌ गोपुरवेदिलग्रौ ॥ १६ ॥
गोपुराच्या चबूतर्‍यावर बर्‍याच काळपर्यंत भारी मल्लयुद्ध करून ते भयानक वेगवान्‌ दोन्ही वीर वारंवार एक दुसर्‍याला वर उचलत आणि खाली वाकवत, पायांच्या विशेष डावपेंचासह चालत चालत त्या चबूतर्‍याला जाऊन भिडले. ॥१६॥
अन्योन्यमापीड्य विलग्नदेहौ
तौ पेततुः सालनिखातमध्ये ।
उत्पेततुर्भूमितलं स्पृशन्तौ
स्थित्वा मुहूर्तं त्वभिनिःश्वसन्तौ ॥ १७ ॥
एक दुसर्‍याला दाबून धरीत परस्परांशी शरीर भिडवून ते दोन्ही योद्धे किल्ल्याची तटबंदी आणि खंदक यांच्यामध्ये जाऊन पडले. तेथे धापा टाकत एक मुहूर्तपर्यंत पृथ्वीचे आलिंगन करत पडून राहिले. तत्पश्चात्‌ परत उसळी मारून उभे राहिले. ॥१७॥
आलिंग्य चालिंग्य च बाहुयोक्त्रैः
संयोजयामासतुराहवे तौ ।
संरम्भशिक्षाबलसंप्रयुक्तौ
सुचेरतुः संप्रम्प्रतियुद्धमार्गैः ॥ १८ ॥
नंतर ते एक दुसर्‍याला वारंवार आलिंगन देत त्याला बाहुपाशात जखडू लागले. दोघेही क्रोध, शिक्षण (मल्लयुद्ध विषयक अभ्यास) तसे शारिरीक बळाने संपन्न होते, म्हणून त्या युद्धस्थळी कुस्तीचे अनेक डाव पेच दाखवीत भ्रमण करू लागले. ॥१८॥
शार्दूलसिंहाविव जातदंष्ट्रौ
गजेन्द्रपोताविव संप्रम्प्रयुक्तौ ।
संहत्य संवेद्य च तौ कराभ्यां
तौ पेततुत्वै युगपद् धरायाम् ॥ १९ ॥
ज्यांना नवीन नवीन दात निघाले आहेत अशा वाघ आणि सिंहाची पिल्ले तसेच परस्परात लढणार्‍या गजराजांच्या छोट्‍या पिल्लांप्रमाणे ते दोन्ही वीर आपल्या वक्ष:स्थळांनी एक दुसर्‍याला दाबून धरत आणि हातांनी परस्परांचे बळ अजमावित एकाच वेळी पृथ्वीवर कोसळून पडले. ॥१९॥
उद्यम्य चान्योन्यमधिक्षिपन्तौ
संचक्रमाते बहु युद्धमार्गैः ।
व्यायामशिक्षाबलसंप्रयुक्तौ
क्लमं न तौ जग्मतुराशु वीरौ ॥ २० ॥
दोघेही व्यायामपटु युवक होते आणि युद्धाचे शिक्षण आणि बलाने संपन्न होते. म्हणून युद्ध जिंकण्यासाठी उद्यमशील होऊन एक दुसर्‍यावर आक्षेप करत युद्धमार्गावर अनेक प्रकारे विचरण करत होते तथापि त्या वीरांना लवकर थकवा येत नव्हता. ॥२०॥
बाहूत्तमैर्वारणवारणाभैः
निवारयन्तौ परवारणाभौ ।
चिरेण कालेन भृशं प्रयुद्धौ
संचेरतुर्मण्डलमार्गमाशु ॥ २१ ॥
मदमत्त हत्तींच्या प्रमाणे सुग्रीव आणि रावण गजराजाच्या शुण्ड-दंडा प्रमाणे (सोंडे प्रमाणे) मोठ्‍या आणि बलिष्ठ बाहुदंडाद्वारा एक दुसर्‍याचा डाव रोखून धरत बराच काळपर्यंत अत्यंत आवेशाने युद्ध करत होते आणि शीघ्रतापूर्वक पवित्रे बदलत होते. ॥२१॥
तौ परस्परमासाद्य यत्तावन्योन्यसूदने ।
मार्जाराविव भक्षार्थे वितस्थाते मुहुर्मुहुः ॥ २२ ॥
ते परस्परांना भिडून एक दुसर्‍याला मारुन टाकण्याचा प्रयत्‍न करत होते. जसे दोन बोके कुठल्यातरी भक्ष्य वस्तुसाठी क्रोधपूर्वक स्थित होऊन परस्परांकडे दृष्टिपात करून वारंवार गुरगुरत राहातात, त्याच प्रकारे रावण आणि सुग्रीव ही लढत होते. ॥२२॥
मण्डलानि विचित्राणि स्थानानि विविधानि च ।
गोमूत्रिकाणि चित्राणि गतप्रत्यागतानि च ॥ २३ ॥
विचित्र मंडल(*१) आणि निरनिराळ्या प्रकारच्या स्थानांचे(*२) प्रदर्शन करीत गोमूत्राच्या रेखेसमान कुटिल गतिने चालत आणि विचित्र रीतिने कधी पुढे सरकत होते तर कधी मागे येत होते. ॥२३॥
(*१ : भरतांनी मल्लयुद्धात चार प्रकारची मंडले सांगितली आहेत. यांची नावे आहेत- चारिमंडल, करणमंडल, खंदमंडल आणि महामंडल. यांची लक्षणे याप्रकारे आहेत - एका पायाने पुढे सरकून चकरा मारता मारता शत्रुवर आक्रमण करणे चारिमंडल म्हटले जाते- दोन्ही पायांनी मंडलाकार फिरून आक्रमण करणे करणमंडल म्हटले गेले आहे. अनेक करणमंडलांचा संयोग होण्याने खंदमंडल होत असते आणि तीन अथवा चार खंदमंडलांच्या संयोगास महामंडल म्हटले जाते.)
(*२: भरतमुनिनी मल्लयुद्धात सहा स्थानांचा उल्लेख केला आहे- वैष्णव, समपाद, वैशाख, मंदल, प्रत्यालीढ आणि अनालीढ. पाय पुढे मागे, या बाजूला त्या बाजूला चालवीत विशेष प्रकाराने त्यांना यथास्थान स्थापित करणे यास स्थान म्हटले जाते. कोणी कोणी वाघ, सिंह आदि जंतुप्रमाणे उभे राहण्याच्या रीतिलाही स्थान म्हणतात.)
तिरश्चीनगतान्येव तथा वक्रगतानि च ।
परिमोक्षं प्रहाराणां वर्जनं परिधावनम् ॥ २४ ॥

अभिद्रवणमाप्लावं अवस्थानं सविग्रहम् ।
परावृत्तमपावृत्तमं अपद्रुतमवप्लुतम् ॥ २५ ॥

उपन्यस्तं अपन्यस्तं युद्धमार्गविशारदौ ।
तौ सञ्चेरतुरन्योन्यं वानरेन्द्रश्च रावणः ॥ २६ ॥
ते कधी तिरक्या चालीने चालत होते कधी वक्रगतीने डाव्या उजव्या बाजूस वळत होते, कधी आपल्या स्थानापासून सरकून शत्रूच्या प्रहारास व्यर्थ करीत होते, कधी बदल्यात स्वत:ही डावपेचाचा प्रयोग करून शत्रुच्या आक्रमणापासून स्वत:चा बचाव करीत होते; कधी एक उभा राहतो तर दुसरा त्याच्या चारी बाजूस धावत राहातो. कधी दोघे एकमेकाच्या सन्मुख शीघ्रतापूर्वक धावत आक्रमण करतात, कधी वाकून किंवा बेडकाप्रमाणे हळूच उड्‍या मारून चालत होते तर कधी लढत असता एकाच जागी स्थिर रहात होते, कधी मागच्या बाजूस परतत होते, कधी समोर उभे राहूनच मागे सरकत होते, कधी विपक्षीयाला पकडण्याच्या इच्छेने आपल्या शरीराचा संकोच करून अथवा वाकून त्याकडे धावत होते, कधी प्रतिद्वंद्‍यावर पायांनी प्रहार करण्यसाठी खाली तोंड करून त्याच्यावर तुटून पडत होते, कधी प्रतिपक्षी योध्याचा हात पकडण्यासाठी आपले बाहु पसरत होते आणि कधी विरोधकाच्या पकडीतून वाचण्यासाठी आपले बाहु मागे खेचून घेत होते. याप्रकारे मल्लयुद्धाच्या कलेत परम प्रवीण वानरराज सुग्रीव तसेच रावण एकदुसर्‍यावर आघात करण्यासाठी मंडलाकार फिरत राहिले होते. ॥२४-२६॥
एतस्मिन्नन्तरे रक्षो मायाबलमथात्मनः ।
आरब्धमुपसंपेदे ज्ञात्वा तं वानराधिपः ॥ २७ ॥

उत्पपात तदाऽऽकाशं जितकाशी जितक्लमः ।
रावणः स्थित एवात्र हरिराजेन वञ्चितः ॥ २८ ॥
या मध्येच राक्षस रावणाने आपल्या मायाशक्तीची मदत घेण्याचा विचार केला. वानरराज सुग्रीवांनी ही गोष्ट ताडली (जाणली) म्हणून एकाएकी आकाशात उडी मारली. ते विजयोल्हासाने सुशोभित होत होते आणि थकव्याला जिंकून चुकले होते. वानरराज, रावणाला याप्रमाणे चकवून निघून गेले आणि तो उभ्या उभ्या पहातच राहिला. ॥२७-२८॥
अथ हरिवरनाथः प्राप्य संग्रामकीर्तिः
निशिचरपतिमाजौ योजयित्वा श्रमेण ।
गगनमतिविशालं लङ्‌घयित्वाऽर्कसूनुः
हरिगणबलमध्ये रामपार्श्वं जगाम ॥ २९ ॥
ज्यांना संग्रामात कीर्ती प्राप्त झाली होती ते वानरराज सूर्यपुत्र सुग्रीव निशाचरपति रावणाला युद्धात दमवून अत्यंत विशाल आकाशमार्गाचे उल्लंघन करून वानरांच्या सेनेमध्ये श्रीरामचंद्रांजवळ येऊन पोहोचले. ॥२९॥
इति स सवितृसूनुस्तत्र तत्कर्म कृत्वा
पवनगतिरनीकं प्राविशत् संप्रम्प्रहृष्टः ।
रघुवरनृपसूनोर्वर्धयन् युद्धहर्षं
तरुमृगगणमुख्यैः पूज्यमानो हरीन्द्रः ॥ ३० ॥
याप्रकारे तेथे अद्‌भुत कर्म करून वायुप्रमाणे शीघ्रगामी सूर्यपुत्र सुग्रीवांनी दशरथराजकुमार श्रीरामांचा युद्धविषयक उत्साह वाढवीत मोठ्‍या हर्षाने वानरसेनेमध्ये प्रवेश केला. त्यासमयी प्रधान-प्रधान वानरांनी वानरराजांचे अभिनंदन केले. ॥३०॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे चत्वारिंशः सर्गः ॥ ४० ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा चाळीसावा सर्ग पूर्ण झाला. ॥४०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP