श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ एकसप्ततितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

अतिकायस्य घोरं युद्धं लक्ष्मणेन तस्य वधश्च -
अतिकायाचे भयंकर युद्ध आणि लक्ष्मण द्वारा त्याचा वध -
स्वबलं व्यथितं दृष्ट्‍वा तुमुलं लोमहर्षणम् ।
भ्रातॄंश्च निहतान् दृष्ट्‍वा शक्रतुल्यपराक्रमान् ॥ १ ॥

पितृव्यौ चापि संदृश्य समरे संनिपातितौ ।
युद्धोन्मत्तं च मत्तं च भ्रातरौ राक्षसर्षभौ ॥ २ ॥

चुकोप च महातेजा ब्रह्मदत्तवरो युधि ।
अतिकायोऽद्रिसंकाशो देवदानवदर्पहा ॥ ३ ॥
अतिकायाने पाहिले की शत्रूंच्या अंगावर काटा आणणारी माझी भयंकर सेना व्यथित झाली आहे, इंद्रतुल्य पराक्रमी माझ्या भावांचा संहार झाला आहे, तसेच माझे काका - दोघे भाऊ युद्धोन्मत्त (महोदर) आणि मत्त (महापार्श्व) ही समरांगणात मारले गेले आहेत. तेव्हा त्या महातेजस्वी निशाचराला फार क्रोध आला. त्याला ब्रह्मदेवांकडून वरदान प्राप्त झाले होते. अतिकाय पर्वतासमान विशालकाय तसेच देवता आणि दानवांच्या दर्पाचे दलन करणारा होता. ॥१-३॥
स भास्करसहस्रस्य संघातमिव भास्वरम् ।
रथमारुह्य शक्रारिः अभिदुद्राव वानरान् ॥ ४ ॥
तो इंद्राचा शत्रु होता. त्याने हजारो सूर्य समूहांप्रमाणे देदिप्यमान तेजस्वी रथावर आरूढ होऊन वानरांवर हल्ला केला. ॥४॥
स विस्फार्य तदा चापं किरीटी मृष्टकुण्डलः ।
नाम संश्रावयामास ननाद च महास्वनम् ॥ ५ ॥
त्याच्या मस्तकावर किरीट आणि कानात शुद्ध सुवर्णाची बनलेली कुण्डले झगमगत होती. त्याने धनुष्याचा टणत्कार करून आपले नाम ऐकविले आणि फार मोठ्याने गर्जना केली. ॥५॥
तेन सिंहप्रणादेन नामविश्रावणेन च ।
ज्याशब्देन च भीमेन त्रासयामास वानरान् ॥ ६ ॥
त्या सिंहनादाने, आपल्या नामाच्या घोषणेने आणि प्रत्येञ्चेच्या भयानक टणत्काराने त्याने वानरसेनेला भयभीत करून टाकले. ॥६॥
ते दृष्ट्‍वा देहमाहात्म्यं कुंभकर्णोऽयमुत्थितः ।
भयार्ता वानराः सर्वे संश्रयन्ते परस्परम् ॥ ७ ॥
त्याच्या शरीराची विशालता पाहून ते वानर असे मानू लागले की हा कुंभकर्णच परत उठून उभा राहिला आहे. असा विचार करून सर्व वानर भयाने पीडित होऊन एक दुसर्‍याचा आश्रय घेऊ लागले. ॥७॥
ते तस्य रूपमालोक्य यथा विष्णोस्त्रिविक्रमे ।
भयाद् वानरयोधास्ते विद्रवन्ति ततस्ततः ॥ ८ ॥
त्रिविक्रम अवताराच्या वेळी वाढलेल्या भगवान् विष्णुंच्या विराट रूपाप्रमाणे त्याचे शरीर पाहून ते वानर सैनिक भयाने इकडे-तिकडे पळू लागले. ॥८॥
तेऽतिकायं समासाद्य वानरा मूढचेतसः ।
शरण्यं शरणं जग्मुः लक्ष्मणाग्रजमाहवे ॥ ९ ॥
अतिकायाच्या जवळ जाताच वानरांच्या चित्तात भय उत्पन्न झाले. ते युद्धस्थळी लक्ष्मणाचे मोठे भाऊ शरणागतवत्सल भगवान् श्रीरामांना शरण गेले. ॥९॥
ततोऽतिकायं काकुत्स्थो रथस्थं पर्वतोपमम् ।
ददर्श धन्विनं दूराद्‌ गर्जन्तं कालमेघवत् ॥ १० ॥
रथावर बसलेल्या पर्वताकार अतिकायाला काकुत्स्थ श्रीरामांनीही पाहिले. हातात धनुष्य घेऊन तो काही अंतरावर प्रलयकाळच्या मेघाप्रमाणे गर्जना करत होता. ॥१०॥
स तं दृष्ट्‍वा महाकायं राघवस्तु सुविस्मितः ।
वानरान् सान्त्वयित्वा च विभीषणमुवाच ह ॥ ११ ॥
त्या महाकाय निशाचराला पाहून श्रीरामचंद्रांनाही फार विस्मय वाटला. त्यांनी वानरांना सांत्वना देऊन विभिषणास विचारले - ॥११॥
कोऽसौ पर्वतसंकाशो धनुष्मान् हरिलोचनः ।
युक्ते हयसहस्रेण विशाले स्यन्दने स्थितः ॥ १२ ॥
विभीषणा ! हजार घोडे जुंपलेल्या विशाल रथावर बसलेला तो पर्वताकार निशाचर कोण आहे ? त्याच्या हातात धनुष्य आहे आणि डोळे सिंहासमान तेजस्वी दिसत आहेत. ॥१२॥
य एष निशितैः शूलैः सुतीक्ष्णैः प्रासतोमरैः ।
अर्चिष्मद्‌भिर्वृतो भाति भूतैरिव महेश्वरः ॥ १३ ॥
तो भूतांनी घेरलेल्या भूतनाथ महादेवांसमान तीक्ष्ण शूल तसेच अत्यंत तेजधार असणार्‍या तेजस्वी प्रासांनी आणि तोमरांनी घेरून अद्‍भुत शोभा प्राप्त करत आहे. ॥१३॥
कालजिह्वाप्रकाशाभिः य एषोऽभिविराजते ।
आवृतो रथशक्तीभिः विद्युद्‌भिरिव तोयदः ॥ १४ ॥
इतकेच नव्हे तर काळाच्या जिव्हेसमान प्रकाशित होणार्‍या रथशक्तिंनी घेरलेला तो वीर निशाचर विद्युन्मालांनी आवृत्त मेघासमान प्रकाशित होत आहे. ॥१४॥
धनूंषि चास्य सज्जानि हेमपृष्ठानि सर्वशः ।
शोभयन्ति रथश्रेष्ठं शक्रचापमिवाम्बरम् ॥ १५ ॥
ज्यांच्या पृष्ठभागात सोने मढविलेले आहे अशी अनेकानेक सुसज्जित धनुष्ये त्याच्या श्रेष्ठ रथाला सर्व बाजूनी, जसे इंद्रधनुष्य आकाशाला सुशोभित करते, त्याप्रमाणे सुशोभित करत आहेत. ॥१५॥
य एष रक्षःशार्दूलो रणभूमिं विराजयन् ।
अभ्येति रथिनां श्रेष्ठो रथेनादित्यवर्चसा ॥ १६ ॥
हा राक्षसांमध्ये सिंहासमान पराक्रमी आणि रथींमध्ये श्रेष्ठ वीर आपल्या सूर्यतुल्य तेजस्वी रथाद्वारा रणभूमीची शोभा वाढवीत माझ्या समोर येत आहे. ॥१६॥
ध्वजशृङ्‌गप्रतिष्ठेन राहुणाभिविराजते ।
सूर्यरश्मिनिभैर्बाणैः दिशो दश विराजयन् ॥ १७ ॥
याच्या ध्वजाच्या शिखरावर पताकेमध्ये राहुचे चिह्न अंकित आहे ज्यायोगे रथाची फार शोभा होत आहे. हा सूर्याच्या किरणांसमान चमकणार्‍या बाणांनी दाही दिशांना प्रकाशित करत आहे. ॥१७॥
त्रिनतं मेघनिर्ह्रादं हेमपृष्ठमलंकृतम् ।
शतक्रतुधनुःप्रख्यं धनुश्चास्य विराजते ॥ १८ ॥
याच्या धनुष्याचा पृष्ठभाग सोन्याने मढविलेला आहे तसेच पुष्प आदिंनी अलंकृत आहे. ते आदि, मध्य आणि अंती तीन्ही स्थानामध्ये वाकलेले आहे. त्याच्या प्रत्यञ्चेमध्ये मेघांच्या गर्जनेप्रमाणे टणत्कार ध्वनी प्रकट होत आहे. या निशाचराचे धनुष्य इंद्रधनुष्यासमान शोभा प्राप्त करत आहे. ॥१८॥
सध्वजः सपताकश्च सानुकर्षो महारथः ।
चतुःसादिसमायुक्तो मेघस्तनितनिःस्वनः ॥ १९ ॥
याचा विशाल रथ ध्वजा, पताका आणि अनुकर्ष (रथाच्या खालच्या बाजूला लावलेले आधारभूत काष्ठ) यांनी युक्त, चार सारथ्यांच्या द्वारा नियंत्रित आणि मेघाच्या गर्जनेप्रमाणे घडघडाट उत्पन्न करणारा आहे. ॥१९॥
विंशतिर्दश चाष्टौ च तूणास्य रथमास्थिताः ।
कार्मुकाणि च भौमानि ज्याश्च काञ्चनपिङ्‌गलाः ॥ २० ॥
याच्या रथावर वीस तरकस (भाते) व भयंकर धनुष्य आणि आठ सोनेरी आणि पिंगलवर्णाच्या प्रत्यञ्चा ठेवलेल्या आहेत. ॥२०॥
द्वौ च खड्गौ पार्श्वस्थौ प्रदीप्तौ पार्श्वशोभितौ ।
चतुर्हस्तत्सरुचितौ व्यक्तहस्तदशायतौ ॥ २१ ॥
दोन्ही बाजूला दोन चमकणार्‍या तलवारी शोभत आहेत; ज्यांच्या मुठी चार हाताच्या आणि त्यांची लांबी दहा हाताची आहे. ॥२१॥
रक्तकण्ठगुणो धीरो महापर्वतसंनिभः ।
कालः कालमहावक्त्रो मेघस्थ इव भास्करः ॥ २२ ॥
गळ्यात लाल रंगाची माळा धारण करून महान् पर्वतासमान आकाराचा हा धीरवीर निशाचर काळ्या रंगाचा दिसून येत आहे. याचे विशाल मुख काळाच्या मुखासमान भयंकर आहे तसेच हा ढगांच्या आड स्थित असलेल्या सूर्यासमान प्रकाशित होत आहे. ॥२२॥
काञ्चनाङ्‌गदनद्धाभ्यां भुजाभ्यामेष शोभते ।
शृङ्‌गाभ्यामिव तुङ्‌गाभ्यां हिमवान् पर्वतोत्तमः ॥ २३ ॥
याच्या बाहूवर सोन्याचे बाजूबंद बांधलेले आहेत. त्या भुजांच्या द्वारा हा विशालकाय निशाचर दोन उंच शिखरांनी युक्त गिरिराज हिमालयासमान शोभा प्राप्त करत आहे. ॥२३॥
कुण्डलाभ्यां उभाभ्यां च भाति वक्त्रं शुभीषणम् ।
पुनर्वस्वन्तरगतं परिपूर्णो निशाकरः ॥ २४ ॥
याचे अत्यंत भीषण मुखमण्डल दोन्ही कुण्डलांनी मंडित होऊन पुनर्वसु नामक दोन नक्षत्रांच्या मध्ये स्थित झालेल्या परिपूर्ण चंद्रम्याप्रमाणे सुशोभित झाले आहे. ॥२४॥
आचक्ष्व मे महाबाहो त्वमेनं राक्षसोत्तमम् ।
यं दृष्ट्‍वा वानराः सर्वे भयार्ता विद्रुता दिशः ॥ २५ ॥
महाबाहो ! तू मला या श्रेष्ठ राक्षसाचा परिचय करून दे; ज्याला पाहूनच सर्व वानर भयभीत होऊन संपूर्ण दिशांमध्ये पळून जात आहेत. ॥२५॥
स पृष्टो राजपुत्रेण रामेणामिततेजसा ।
आचचक्षे महातेजा राघवाय विभीषणः ॥ २६ ॥
अमित तेजस्वी राजकुमार श्रीरामांनी याप्रकारे विचारल्यावर महातेजस्वी विभीषणांनी राघवास याप्रकारे सांगितले - ॥२६॥
दशग्रीवो महातेजा राजा वैश्रवणानुजः ।
भीमकर्मा महात्मा हि रावणो राक्षसेश्वरः ॥ २७ ॥

तस्यासीद् वीर्यवान् पुत्रो रावणप्रतिमो बले ।
वृद्धसेवी श्रुतिधरः सर्वास्त्रविदुषां वरः ॥ २८ ॥
भगवन् ! जो कुबेराचा लहान भाऊ असून महातेजस्वी, महाकाय, भयानक कर्मे करणारा तसेच राक्षसांचा स्वामी दशमुख राजा रावण आहे, त्याचा एक फार पराक्रमी पुत्र उत्पन्न झाला जो बलामध्ये रावणासारखाच आहे. तो वृद्ध पुरूषांची सेवा करणारा, वेद-शास्त्रांचा ज्ञाता, तसेच संपूर्ण अस्त्रवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ आहे. ॥२७-२८॥
अश्वपृष्ठे नागपृष्ठे खड्गे धनुषि कर्षणे ।
भेदे सान्त्वे च दाने च नये मंत्रे च संमतः ॥ २९ ॥
हत्ती, घोड्यांवर स्वार होणे, तलवार चालविणे, धनुष्यावरून बाणांचे संधान करणे, प्रत्यञ्चा खेचणे, लक्ष्य वेधणे, साम आणि दानाचा प्रयोग करणे तसेच न्याययुक्त वर्तन तसेच मंत्रणा देणे यात तो सर्वांच्या द्वारा सन्मानित आहे. ॥२९॥
यस्य बाहुं समाश्रित्य लङ्‌का भवति निर्भया ।
तनयं धान्यमालिन्या अतिकायमिमं विदुः ॥ ३० ॥
त्याच्याच बाहुबळाचा आश्रय घेऊन लंकापुरी सदा निर्भय राहात आली आहे. तोच हा वीर निशाचर आहे. हा रावणाची दुसरी पत्‍नी धान्यमालिनीचा पुत्र आहे. याला लोक अतिकाय या नावाने जाणतात. ॥३०॥
एतेनाराधितो ब्रह्मा तपसा भावितात्मना ।
अस्त्राणि चाप्यवाप्तानि रिपवश्च पराजिताः ॥ ३१ ॥
तपस्येने विशुद्ध अंतःकरण झालेल्या या अतिकायाने दीर्घकाळपर्यंत ब्रह्मदेवांची आराधना केली होती. याने ब्रह्मदेवांकडून अनेक दिव्यास्त्रे प्राप्त केली आहेत आणि त्यांच्या द्वारा बर्‍याचशा शत्रूंना पराजित केले आहे. ॥३१॥
सुरासुरैरवध्यत्वं दत्तमस्मै स्वयंभुवा ।
एतच्च कवचं दिव्यं रथश्चैषोऽर्कभास्वरः ॥ ३२ ॥
ब्रह्मदेवांनी याला देवता आणि असुरांकडून न मारले जाण्याचे वरदान दिले आहे. हे दिव्य कवच आणि सूर्यासमान तेजस्वी रथही त्यांनीच दिलेले आहेत. ॥३२॥
एतेन शतशो देवा दानवाश्च पराजिताः ।
रक्षितानि च रक्षांसि यक्षाश्चापि निषूदिताः ॥ ३३ ॥
याने देवता आणि दानवांना शेकडो वेळा पराजित केले आहे, राक्षसांचे रक्षण केले आहे आणि यक्षांना मारून पळवून लावले आहे. ॥३३॥
वज्रं विष्टम्भितं येन बाणैरिन्द्रस्य धीमता ।
पाशः सलिलराजस्य रणे प्रतिहतस्तथा ॥ ३४ ॥
या बुद्धिमान् राक्षसाने आपल्या बाणांच्या द्वारा इंद्राच्या वज्रालाही कुण्ठित केले आहे. तसेच युद्धात जलाची स्वामी वरूण यांच्या पाशालाही सफळ होऊ दिले नाही. ॥३४॥
एषोऽतिकायो बलवान् राक्षसानामथर्षभः ।
स रावणसुतो धीमान् देवदानवदर्पहा ॥ ३५ ॥
राक्षसात श्रेष्ठ हा बुद्धिमान् रावणकुमार अतिकाय फार बलवान् तसेच देवता आणि दानवांच्या दर्पाचे दलन करणारा आहे. ॥३५॥
तदस्मिन् क्रियतां यत्‍नःा क्षिप्रं पुरुषपुङ्‌गव ।
पुरा वानरसैन्यानि क्षयं नयति सायकैः ॥ ३६ ॥
पुरूषोत्तमा ! आपल्या सायकांनी हा सार्‍या वानर सेनेचा संहार करण्यापूर्वीच आपण या राक्षसाला परास्त करण्याचा शीघ्र प्रयत्‍न करावा. ॥३६॥
ततोऽतिकायो बलवान् प्रविश्य हरिवाहिनीम् ।
विस्फारयामास धनुः ननाद च पुनःपुनः ॥ ३७ ॥
विभीषण आणि भगवान् श्रीराम यांच्या मध्ये या प्रकारे गोष्टी चालूच होत्या की बलवान् अतिकाय वानरांच्या सेनेत घुसला आणि वारंवार गर्जना करत आपल्या धनुष्याचा टणत्कार करू लागला. ॥३७॥
तं भीमवपुषं दृष्ट्‍वा रथस्थं रथिनां वरम् ।
अभिपेतुर्महात्मानः प्रधाना ये वनौकसः ॥ ३८ ॥

कुमुदो द्विविदो मैन्दो नीलः शरभ एव च ।
पादपैर्गिरिशृङ्‌गैश्च युगपत् समभिद्रवन् ॥ ३९ ॥
रथिंच्या मध्ये श्रेष्ठ आणि भयंकर शरीराच्या त्या राक्षसाला रथात बसून येतांना पाहून कुमुद, द्विविद, मैंद, नील आणि शरभ आदि जे मुख्य मुख्य महामनस्वी वानर होते, ते वृक्ष तसेच पर्वतशिखरे धारण करून एकाच वेळी त्याच्यावर तुटून पडले. ॥३८-३९॥
तेषां वृक्षांश्च शैलांश्च शरैः कनकभूषणैः ।
अतिकायो महातेजाः चिच्छेदास्त्रविदां वरः ॥ ४० ॥
परंतु अस्त्रवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ महातेजस्वी अतिकायाने आपल्या सुवर्णभूषित बाणांनी फेकले गेलेले वृक्ष आणि पर्वतशिखरांना तोडून टाकले. ॥४०॥
तांश्चैव सर्वान् स हरीन् शरैः सर्वायसैर्बली ।
विव्याधाभिमुखान् संख्ये भीमकायो निशाचरः ॥ ४१ ॥
त्याच बरोबर त्या बलवान् आणि भीमकाय निशाचराने युद्धस्थळी समोर आलेल्या त्या समस्त वानरांना लोखंडाच्या बाणांनी बांधून टाकले. ॥४१॥
तेऽर्दिता बाणवर्षेण भग्नगात्राः पराजिताः ।
न शेकुरतिकायस्य प्रतिकर्तुं महाहवे ॥ ४२ ॥
त्याच्या बाणवृष्टिने आहत होऊन सर्वांची शरीरे क्षत-विक्षत झाली. सर्वांनी हार मानली आणि कोणीही त्या महासमरात अतिकायचा सामना करण्यास समर्थ होऊ शकला नाही. ॥४२॥
तत् सैन्यं हरिवीराणां त्रासयामास राक्षसः ।
मृगयूथमिव क्रुद्धो हरिर्यौवनदर्पितः ॥ ४३ ॥
ज्याप्रमाणे तारूण्याच्या मदाने भरलेला कुपित सिंह मृगांच्या झुंडीला भयभीत करून टाकतो त्याचप्रकारे तो राक्षस वानरवीरांच्या त्या सेनेला त्रास देऊ लागला. ॥४३॥
स राक्षसेन्द्रो हरिसैन्यमध्ये
नायुध्यमानं निजघान कञ्चित् ।
उपेत्य रामं स धनुःकलापी
सगर्वितं वाक्यमिदं बभाषे ॥ ४४ ॥
वानरांच्या झुंडीमध्ये विचरत असता राक्षसराज अतिकायाने कुणाही अशा योद्धाला मारले नाही जो त्याच्याशी युद्ध करत नव्हता. धनुष्य आणि तरकस धारण केलेला तो राक्षस उडी मारून श्रीरामांजवळ आला तसेच मोठ्या गर्वाने याप्रकारे बोलला - ॥४४॥
रथे स्थितोऽहं शरचापपाणिः
न प्राकृतं कञ्चन योधयामि ।
यस्यास्ति शक्तिर्व्यवसाययुक्तो
ददातु मे क्षिप्रमिहाद्य युद्धम् ॥ ४५ ॥
मी धनुष्य आणि बाण घेऊन रथावर बसलो आहे. कुणा साधारण प्राण्याशी युद्ध करण्याचा माझा विचार नाही. ज्याच्यात शक्ती असेल, साहस आणि उत्साह असेल त्याने शीघ्र येऊन मला युद्धाची संधि द्यावी. ॥४५॥
तत् तस्य वाक्यं ब्रुवतो निशम्य
चुकोप सौमित्रिरमित्रहन्ता ।
अमृष्यमाणश्च समुत्पपात
जग्राह चापं च ततः स्मयित्वा ॥ ४६ ॥
त्याचे हे अहंकारपूर्ण वचन ऐकून शत्रुहंता सौमित्र लक्ष्मणास फार क्रोध आला. त्याचे बोलणे सहन न करू शकल्याने ते पुढे झाले आणि किंचित हसून त्यांनी आपले धनुष्य उचलले. ॥४६॥
क्रुद्धः सौमित्रिरुत्पत्य तूणादाक्षिप्य सायकम् ।
पुरस्तादतिकायस्य विचकर्ष महद्धनुः ॥ ४७ ॥
कुपित झालेले लक्ष्मण उडी मारून पुढे आले आणि भात्यातून बाण खेंचून अतिकायच्या समोर येऊन आपल्या विशाल धनुष्यास खेचू लागले. ॥४७॥
पूरयन् स महीं सर्वां आकाशं सागरं दिशः ।
ज्याशब्दो लक्ष्मणस्योग्रः त्रासयन् रजनीचरान् ॥ ४८ ॥
लक्ष्मणांच्या धनुष्याच्या प्रत्येञ्चेचा तो शब्द फार भयंकर होता. तो सारी पृथ्वी, आकाश, समुद्र तसेच संपूर्ण दिशामध्ये घुमला आणि निशाचरांना त्रास देऊ लागला. ॥४८॥
सौमित्रेश्चापनिर्घोषं श्रुत्वा प्रतिभयं तदा ।
विसिस्मिये महातेजा राक्षसेन्द्रात्मजो बली ॥ ४९ ॥
सौमित्राच्या धनुष्याचा तो भयानक टणत्कार ऐकून त्यासमयी महातेजस्वी बलवान् राक्षसराजकुमार अतिकायाला फार विस्मय वाटला. ॥४९॥
तदातिकायः कुपितो दृष्ट्‍वा लक्ष्मणमुत्थितम् ।
आदाय निशितं बाणं इदं वचनमब्रवीत् ॥ ५० ॥
लक्ष्मणाला आपला सामना करण्यास उठलेले पाहून अतिकाय रोषाने भरून गेला आणि तीक्ष्ण बाण हातात घेऊन याप्रकारे बोलला - ॥५०॥
बालस्त्वमसि सौमित्रे विक्रमेष्वविचक्षणः ।
गच्छ किं कालसंकाशं मां योधयितुमिच्छसि ॥ ५१ ॥
सौमित्रा ! तू अजून बालक आहेस. पराक्रम करण्यात कुशल नाही आहेस, म्हणून परत जा. मी तुझ्यासाठी काळाप्रमाणे आहे. माझ्याशी झुंजण्याची इच्छा का करत आहेस ? ॥५१॥
नहि मद्‌बाहुसृष्टानां बाणाणां हिमवानपि ।
सोढुमुत्सहते वेगं अन्तरिक्षमथो मही ॥ ५२ ॥
माझ्या हातून सुटलेल्या बाणांचा वेग गिरिराज हिमालयही सहन करू शकत नाही. पृथ्वी आणि आकाशही तो सहन करू शकत नाहीत. ॥५२॥
सुखप्रसुप्तं कालाग्निं निबोधयितुमिच्छसि ।
न्यस्य चापं निवर्तस्व प्राणान् न जहि मद्‌गतः ॥ ५३ ॥
तू सुखाने शांत झालेल्या प्रलयाग्निला का जागे करू इच्छितोस ? धनुष्य येथेच टाकून परत जा. माझ्याशी भिडून आपल्या प्राणांचा परित्याग करू नकोस. ॥५३॥
अथवा त्वं प्रतिस्तब्धो न निवर्तितुमिच्छसि ।
तिष्ठ प्राणान् परित्यज्य गमिष्यसि यमक्षयम् ॥ ५४ ॥
अथवा तू फार अहंकारी आहेस म्हणून परत जाऊ इच्छित नाहीस. ठीक आहे, उभा रहा. आत्ता आपले प्राण गमावून यमलोकाची यात्रा करशील. ॥५४॥
पश्य मे निशितान् बाणान् रिपुदर्पनिषूदनान् ।
ईश्वरायुधसंकाशान् तप्तकाञ्चनभूषणान् ॥ ५५ ॥
शत्रूंचा दर्प चूर्ण करणारे माझे हे तीक्ष्ण बाण पहा, जे तापविलेल्या सुवर्णानी भूषित आहेत, हे भगवान् शंकरांच्या त्रिशूलाची बरोबरी करतात. ॥५५॥
एष ते सर्पसंकाशो बाणः पास्यति शोणितम् ।
मृगराज इव क्रुद्धो नागराजस्य शोणितम् ।
इत्येवमुक्त्वा संक्रुद्धः शरं धनुषि संदधे ॥ ५६ ॥
ज्याप्रमाणे कुपित झालेला सिंह गजराजाचे रक्त पितो, त्याप्रकारे हा सर्पासमान भयंकर बाण तुझ्या रक्ताचे पान करील. असे म्हणून अतिकायाने अत्यंत कुपित होऊन आपल्या धनुष्यावर बाणाचे संधान केले. ॥५६॥
श्रुत्वाऽतिकायस्य वचः सरोषं
सगर्वितं संयति राजपुत्रः ।
स संचुकोपातिबलो मनस्वी
उवाच वाक्यं च ततो महार्थम् ॥ ५७ ॥
युद्धस्थळी अतिकायाचे रोष आणि गर्वाने भरलेले हे वचन ऐकून अत्यंत बलशाली आणि मनस्वी राजकुमार लक्ष्मणांना फार क्रोध आला. ते हे महान् अर्थाने युक्त वचन बोलले- ॥५७॥
न वाक्यमात्रेण भवान् प्रधानो
न कत्थनात् सत्पुरुषा भवन्ति ।
मयि स्थिते धन्विनि बाणपाणौ
निदर्शय स्वात्मबलं दुरात्मन् ॥ ५८ ॥
दुरात्मन् ! केवळ बढाया मारून तू महान् होऊ शकत नाहीस. केवळ वल्गना करून कोणी पुरूष श्रेष्ठ बनत नाही. मी हातात धनुष्य आणि बाण घेऊन तुझ्या समोर उभा आहे. तू आपले सारे बळ मला दाखव. ॥५८॥
कर्मणा सूचयात्मानं न विकत्थितुमर्हसि ।
पौरुषेण तु यो युक्तः स तु शूर इति स्मृतः ॥ ५९ ॥
पराक्रम द्वारा आपल्या वीरतेचा परिचय दे. खोट्या बढाया मारणे तुझ्यासाठी उचित नाही. ज्याच्यात पुरूषार्थ असेल त्यालाच शूर मानले जाते. ॥५९॥
सर्वायुधसमायुक्तो धन्वी त्वं रथमास्थितः ।
शरैर्वा यदि वाप्यस्त्रैः दर्शयस्व पराक्रमम् ॥ ६० ॥
तुझ्यापाशी सर्व तर्हेची हत्यारे विद्यमान आहेत. तू धनुष्य घेऊन रथावर बसलेला आहेस, म्हणून बाण अथवा अन्य अस्त्र-शस्त्रांच्या द्वारा प्रथम आपला पराक्रम दाखव. ॥६०॥
ततः शिरस्ते निशितैः पातयिष्याम्यहं शरैः ।
मारुतः कालसंपक्वं वृन्तात् तालफलं यथा ॥ ६१ ॥
त्यानंतर मी आपल्या तीक्ष्ण बाणांनी तुझे मस्तक, जसे वायु कालक्रमाने पिकलेल्या ताडाच्या फळाला त्याच्या देठा पासून खाली पाडतो त्याप्रमाणे कापून खाली पाडीन. ॥६१॥
अद्य ते मामका बाणाः तप्तकाञ्चनभूषणाः ।
पास्यन्ति रुधिरं गात्राद् बाणशल्यान्तरोत्थितम् ॥ ६२ ॥
आज तापलेल्या सुवर्णाने विभूषित माझे बाण आपल्या अग्रभागाने केल्या गेलेल्या छिद्रातून निघालेल्या तुझ्या शरीरातील रक्ताचे पान करतील. ॥६२॥
बालोऽयमिति विज्ञाय न चावज्ञातुमर्हसि ।
बालो वा यदि वा वृद्धो मृत्युं जानीहि संयुगे ॥ ६३ ॥
तू मला बालक समजून माझी अवहेलना करू नकोस. मी बालक असेन अथवा वृद्ध, संग्रामामध्ये तर तू मला आपला काळच समज. ॥६३॥
बालेन विष्णुना लोकाः त्रयः क्रान्तास्त्रिविक्रमैः ।
लक्ष्मणस्य वचः श्रुत्वा हेतुमत् परमार्थवत् ।
अतिकायः प्रचुक्रोध बाणं चोत्तममाददे ॥ ६४ ॥
वामनरूपधारी भगवान् विष्णु दिसावयाला बालकच होते परंतु आपल्या तीनच पावलांनी त्यांनी समस्त त्रैलोक्य व्यापून टाकले. लक्ष्मणांचे हे परम सत्य आणि युक्तियुक्त वचन ऐकून अतिकायाच्या क्रोधाला सीमा राहिली नाही. त्याने एक उत्तम बाण आपल्या हातात घेतला. ॥६४॥
ततो विद्याधरा भूता देवा दैत्या महर्षयः ।
गुह्यकाश्च महात्मानः तद् युद्धं द्रष्टुमागमन् ॥ ६५ ॥
त्यानंतर विद्याधर, भूत, देवता, दैत्य, महर्षि तसेच महामना गुह्यकगण ते युद्ध पहाण्यासाठी तेथे आले. ॥६५॥
ततोऽतिकायः कुपितः चापमारोप्य सायकम् ।
लक्ष्मणाय प्रचिक्षेप सङ्‌क्षिपन्निव चाम्बरम् ॥ ६६ ॥
त्यासमयी अतिकायाने कुपित होऊन धनुष्यावर तो उत्तम बाण चढवला आणि आकाशाला आपला ग्रास बनवून तो लक्ष्मणावर सोडला. ॥६६॥
तमापतन्तं निशितं शरमाशीविषोपमम् ।
अर्धचन्द्रेण चिच्छेद लक्ष्मणः परवीरहा ॥ ६७ ॥
परंतु शत्रुवीरांचा संहार करणार्‍या लक्ष्मणांनी एक अर्धचंद्राकार बाणाच्या द्वारे आपल्याकडे येणार्‍या त्या विषधर सर्पतुल्य भयंकर आणि तीक्ष्ण बाणाला छाटून टाकले. ॥६७॥
तं निकृत्तं शरं दृष्ट्‍वा कृत्तभोगमिवोरगम् ।
अतिकायो भृशं क्रुद्धः पञ्च बाणान् समादधे ॥ ६८ ॥
जसे सर्पाची फणा काटली जावी त्याप्रकारे तो बाण खण्डित झालेला पाहून अत्यंत कुपित झालेल्या अतिकायाने पाच बाण धनुष्यावर ठेवले. ॥६८॥
तान् शरान् संप्रचिक्षेप लक्ष्मणाय निशाचरः ।
तानप्राप्तान् शितैर्बाणैः चिच्छेद भरतानुजः ॥ ६९ ॥
नंतर त्या निशाचराने लक्ष्मणावरच ते पाच बाण सोडले. ते बाण त्यांच्या जवळ अद्याप आले नव्हते की लक्ष्मणांनी तीक्ष्ण सायकांनी त्यांचे तुकडे तुकडे करून टाकले. ॥६९॥
स ताञ्छित्त्वा शरैस्तीक्ष्णैः लक्ष्मणः परवीरहा ।
आददे निशितं बाणं ज्वलन्तमिव तेजसा ॥ ७० ॥
शत्रूवीरांच्या संहार करणार्‍या लक्ष्मणांनी आपल्या तीक्ष्ण सायकांनी त्या बाणांचे खंडन करून नंतर एक तेज बाण हातात घेतला, जो आपल्या तेजाने जणु प्रज्वलित होत होता. ॥७०॥
तमादाय धनुःश्रेष्ठे योजयामास लक्ष्मणः ।
विचकर्ष च वेगेन विससर्ज च सायकम् ॥ ७१ ॥
तो घेऊन लक्ष्मणांनी आपल्या श्रेष्ठ धनुष्यावर ठेवला, त्याची प्रत्यञ्चा खेचली आणि अत्यंत वेगाने तो सायक अतिकायावर सोडला. ॥७१॥
पूर्णायतविसृष्टेन शरेण नतपर्वणा ।
ललाटे राक्षसश्रेष्ठं आजघान स वीर्यवान् ॥ ७२ ॥
धनुष्याला पूर्णरूपाने खेचून सोडलेल्या आणि वाकलेली गाठ असणार्‍या त्या बाणाच्या द्वारे पराक्रमी लक्ष्मणांनी राक्षसश्रेष्ठ अतिकायाच्या ललाटावर जबरदस्त आघात केला. ॥७२॥
स ललाटे शरो मग्नः तस्य भीमस्य रक्षसः ।
ददृशे शोणितेनाक्तः पन्नगेन्द्र इवाचले ॥ ७३ ॥
तो बाण त्या भयानक राक्षसाच्या ललाटात घुसला आणि रक्तानी भिजून पर्वतास चिकटलेल्या एखाद्या नागराजासमान दिसू लागला. ॥७३॥
राक्षसः प्रचक्रम्पेऽथ लक्ष्मणेषुप्रपीडितः ।
रुद्रबाणहतं घोरं यथा त्रिपुरगोपुरम् ॥ ७४ ॥

चिन्तयामास चाश्वास्य विमृश्य च महाबलः ।
लक्ष्मणांच्या बाणाने अत्यंत पीडित होऊन तो राक्षस कापू लागला. जसे भगवान् रूद्राच्या बाणांनी आहत होऊन त्रिपुराचे भयंकर गोपुर हलू लागले होते त्याप्रमाणेच. नंतर थोड्या वेळानेच स्वतःस सावरून महाबली अतिकाय फार चिंतेत पडला आणि काही विचार करून बोलला - ॥७४ १/२॥
साधु बाणनिपातेन श्लाघनीयोऽसि मे रिपुः ॥ ७५ ॥

विधायैवं विदार्यास्यं विनम्य च महाभुजौ ।
स रथोपस्थमास्थाय रथे च प्रचचार ह ॥ ७६ ॥
शाबास ! या प्रकारे अमोघ बाणाचा प्रयोग केल्यामुळे तू माझा स्पृहणीय शत्रु आहेस. तोंड पसरून असे बोलल्यानंतर अतिकाय आपल्या दोन्ही विशाल भुजांना काबूमध्ये ठेवून रथाच्या मागल्या भागात बसून त्या रथाच्या द्वाराच पुढे निघाला. ॥७५-७६॥
एकं त्रीन् पञ्च सप्तेति सायकान् राक्षसर्षभः ।
आददे संदधे चापि विचकर्षोत्ससर्ज च ॥ ७७ ॥
त्या राक्षस शिरोमणी वीराने क्रमशः एक, तीन, पांच आणि सात सायक घेऊन त्यांना धनुष्यावर चढविले आणि वेगपूर्वक खेंचून सोडून दिले. ॥७७॥
ते बाणाः कालसंकाशा राक्षसेन्द्रधनुश्च्युताः ।
हेमपुङ्‌खा रविप्रख्याः चक्रुर्दीप्तमिवाम्बरम् ॥ ७८ ॥
त्या राक्षसराजाच्या धनुष्यातून सुटलेले ते सुवर्णभूषित, सूर्यतुल्य तेजस्वी तसेच काळासमान भयंकर बाणांनी आकाशाला प्रकाशाने पूर्णसे करून टाकले. ॥७८॥
ततस्तान् राक्षसोत्सृष्टान् शरौघान् राघवानुजः ।
असंभ्रान्तः प्रचिच्छेद निशितैर्बहुभिः शरैः ॥ ७९ ॥
परंतु राघवांचे लहान भाऊ लक्ष्मणांनी जराही न घाबरता त्या निशाचरद्वारा सोडल्या गेलेल्या त्या बाण समूहास तीक्ष्ण धार असणार्‍या बहुसंख्य सायकांच्या द्वारा तोडून टाकले. ॥७९॥
तान् शरान् युधि संप्रेक्ष्य निकृत्तान् रावणात्मजः ।
चुकोप त्रिदशेन्द्रारिः जग्राह निशितं शरम् ॥ ८० ॥
ते बाण तोडले गेलेले पाहून इंद्रद्रोही रावणकुमाराला फारच क्रोध आला आणि त्याने एक तीक्ष्ण बाण हातात घेतला. ॥८०॥
स सन्धाय महातेजाः तं बाणं सहसोत्सृजत् ।
ततः सौमित्रिमायान्तं आजघान स्तनान्तरे ॥ ८१ ॥
त्याला धनुष्यावर ठेवून त्या महातेजस्वी वीराने एकाएकी सोडला आणि त्याच्या द्वारा समोरून येणार्‍या सौमित्राच्या छातीवर आघात केला. ॥८१॥
अतिकायेन सौमित्रिः ताडितो युधि वक्षसि ।
सुस्राव रुधिरं तीव्रं मदं मत्त इव द्विपः ॥ ८२ ॥
अतिकायाच्या त्या बाणाचा आघात होताच युद्धस्थळी सौमित्राच्या वक्षःस्थळातून तीव्रगतिने रक्त वाहू लागले जणु कोणी मस्त हत्ती मस्तकातून मदाची वृष्टि करत होता. ॥८२॥
स चकार तदाऽत्मानं विशल्यं सहसा विभुः ।
जग्राह च शरं तीक्ष्णं अस्त्रेणापि समाददे ॥ ८३ ॥
नंतर सामर्थ्यशाली लक्ष्मणांनी एकाएकी आपल्या छातीतून तो काढला आणि एक तीक्ष्ण सायक हातात घेऊन त्याला दिव्यास्त्राने संयोजित केले. ॥८३॥
आग्नेयेन तदाऽस्त्रेण योजयामास सायकम् ।
स जज्वाल तदा बाणो धनुष्यस्य महात्मनः ॥ ८४ ॥
त्यासमयी आपल्या त्या सायकाला त्यांनी आग्नेयास्त्राने अभिमंत्रित केले. अभिमंत्रित होताच महात्मा लक्ष्मणाच्या धनुष्यावर ठेवलेला तो बाण तात्काळ प्रज्वलित झाला. ॥८४॥
अतिकायोऽति तेजस्वी सौरमस्त्रं समाददे ।
तेन बाणं भुजङ्‌गाभं हेमपुङ्‌खमयोजयत् ॥ ८५ ॥
तिकडे अत्यंत तेजस्वी अतिकायानेही एक सुवर्णमय पंखाचा विषधर सर्पाप्रमाणे बाण हातात घेतला आणि तो धनुष्यावर ठेवला. ॥८५॥
तदस्त्रं ज्वलितं घोरं लक्ष्मणः शरमाहितम् ।
अतिकायाय चिक्षेप कालदण्डमिवान्तकः ॥ ८६ ॥
इतक्यात लक्ष्मणांनी दिव्यास्त्राच्या शक्तिने संपन्न तो प्रज्वलित आणि भयंकर बाण अतिकायावर सोडला; जणु यमराजाने आपल्या कालदण्डाचा प्रयोग केला असावा. ॥८६॥
आग्नेयेनाभिसंयुक्तं दृष्ट्‍वा बाणं निशाचरः ।
उत्ससर्ज तदा बाणं दीप्तं सूर्यास्त्रयोजितम् ॥ ८७ ॥
आग्नेयस्त्राने अभिमंत्रित झालेला बाण आपल्याकडे येत आहे हे पाहून निशाचर अतिकायाने तात्काळच आपल्या भयंकर बाणाला सूर्यास्त्राने अभिमंत्रित करून सोडला. ॥८७॥
तावुभावम्बरे बाणौ अन्योन्यमभिजघ्नतुः ।
तेजसा संप्रदीप्ताग्रौ क्रुद्धाविव भूजङ्‌गमौ ॥ ८८ ॥

तावन्योन्यं विनिर्दह्य पेततुः पृथिवीतले ॥ ८९ ॥
त्या दोन्ही सायकांचे अग्रभाग तेजाने प्रज्वलित होत होते. आकाशात पोहोचून ते दोन्ही (बाण) कुपित झालेल्या दोन सर्पांप्रमाणे आपसात टक्करले आणि एक दुसर्‍याला दग्ध करून पृथ्वीवर पडले. ॥८८-८९॥
निरर्चिषौ भस्मकृतौ न भ्राजेते शरोत्तमौ ।
तावुभौ दीप्यमानौ स्म न भ्राजेते महीतले ॥ ९० ॥
ते दोन्ही बाण उत्तम कोटीचे होते आणि आपल्या दीप्तिने प्रकाशित होत होते, तथापि एक दुसर्‍याच्या तेजाने भस्म होऊन आपापले तेज हरवून बसले, म्हणून भूतलावर निष्प्रभ झाल्यामुळे त्यांची शोभा दिसून येत नव्हती. ॥९०॥
ततोऽतिकायः संक्रुद्धः त्वाष्ट्रमैषीकमुत्सृजत् ।
तत् प्रचिच्छेद सौमित्रिः अस्त्रमैन्द्रेण वीर्यवान् ॥ ९१ ॥
त्यानंतर अतिकायाने अत्यंत कुपित होऊन त्वष्टा देवतेच्या मंत्राने अभिमंत्रित करून एक गवताच्या काडीचा बाण सोडला; परंतु पराक्रमी सौमित्राने त्या अस्त्राला ऐन्द्रास्त्राने छेदून टाकले. ॥९१॥
ऐषीकं निहतं दृष्ट्‍वा कुमारो रावणात्मजः ।
याम्येनास्त्रेण संक्रुद्धो योजयामास सायकम् ॥ ९२ ॥

ततस्तदस्त्रं चिक्षेप लक्ष्मणाय निशाचरः ।
वायव्येन तदस्त्रेण निजघान स लक्ष्मणः ॥ ९३ ॥
गवताच्या काडीचा बाण नष्ट झालेला पाहून रावणपुत्र कुमार अतिकायाच्या क्रोधाची सीमा राहिली नाही. त्या राक्षसाने एका सायकाला याम्यास्त्राने अभिमंत्रित केले आणि तो लक्ष्मणाला लक्ष्य करून सोडला, परंतु लक्ष्मणांनी वायव्यास्त्राच्या द्वारा त्याला ही नष्ट केले. ॥९२-९३॥
अथैनं शरधाराभिः धाराभिरिव तोयदः ।
अभ्यवर्षत संक्रुद्धो लक्ष्मणो रावणात्मजम् ॥ ९४ ॥
तत्पश्चात् मेघ जसा जलधारांची वृष्टि करतो त्याप्रमाणे अत्यंत कुपित झालेल्या लक्ष्मणांनी रावणकुमार अतिकायवर बाणधारांची वृष्टि करण्यास आरंभ केला. ॥९४॥
तेऽतिकायं समासाद्य कवचे वज्रभूषिते ।
भग्नाग्रशल्याः सहसा पेतुर्बाणा महीतले ॥ ९५ ॥
अतिकायाने एक दिव्य कवच बांधून ठेवलेले होते; ज्याच्यात हिरे जडविलेले होते. लक्ष्मणांचे बाण अतिकायापर्यंत पोहोचून त्याच्या कवचावर आदळत आणि अग्रभाग तुटल्यामुळे एकाएकी पृथ्वीवर पडून जात होते. ॥९५॥
तान् मोघानभिसंप्रेक्ष्य लक्ष्मणः परवीरहा ।
अभ्यवर्षत बाणाणां सहस्रेण महायशाः ॥ ९६ ॥
ते बाण असफल झालेले पाहून शत्रूवीरांचा संहार करणार्‍या महायशस्वी लक्ष्मणांनी पुन्हा हजारो बाणांची वृष्टि केली. ॥९६॥
स वृष्यमाणो बाणौघैः अतिकायो महाबलः ।
अवध्यकवचः संख्ये राक्षसो नैव विव्यथे ॥ ९७ ॥
महाबली अतिकायचे कवच अभेद्य होते म्हणून युद्धस्थळी बाण-समूहांची वृष्टि होऊनही तो राक्षस व्यथित होत नव्हता. ॥९७॥
शरं चाशीविषाकारं लक्ष्मणाय व्यपासृजत् ।
स तेन विद्ध सौमित्रिः मर्मदेशे शरेण ह ॥ ९८ ॥
त्याने लक्ष्मणांवर विषधर सर्पासमान भयंकर बाण सोडला. त्या बाणाने सौमित्राच्या मर्मस्थळी आघात झाला. ॥९८॥
मुहूर्तमात्रं निःसंज्ञो ह्यभवच्छत्रुतापनः ।
ततः संज्ञामुपालभ्य चतुर्भिः सायकोत्तमैः ॥ ९९ ॥

निजघान हयान् संख्ये सारथिं च महाबलः ।
ध्वजस्योन्मथनं कृत्वा शरवर्षैररिंदमः ॥ १०० ॥
म्हणून शत्रुंना संताप देणारे लक्ष्मण एक मुहूर्तापर्यंत अचेत अवस्थेत पडून राहिले. नंतर शुद्धिवर आल्यावर त्या महाबली शत्रुदमन वीराने बाणांची वृष्टि करून शत्रुच्या रथाची ध्वजा नष्ट केली आणि चार उत्तम सायकांनी रणभूमीमध्ये त्याचे घोडे तसेच सारथ्याला यमलोकात पोहोचविले. ॥९९-१००॥
असंभ्रांतः स सौमित्रिः तान् शरान् अभिलक्षितान् ।
मुमोच लक्ष्मणो बाणान् वधार्थं तस्य रक्षसः ॥ १०१ ॥

न शशाक रुजं कर्तुं युधि तस्य शरोत्तमः ।
तत्पश्चात् संभ्रमरहित नरश्रेष्ठ सौमित्र लक्ष्मणांनी त्या राक्षसाच्या वधासाठी नीट तपासलेले निवडक बरेचसे अमोघ बाण सोडले तथापि ते समरांगणावर त्या निशाचराच्या शरीरास विंधू शकले नाहीत. ॥१०१ १/२॥
अथैनमभ्युपागम्य वायुर्वाक्यमुवाच ह ॥ १०२ ॥

ब्रह्मदत्तवरो ह्येष अवध्यकवचावृतः ।
ब्राह्मेणास्त्रेण भिन्ध्येनं एष वध्यो हि नान्यथा ।
अवध्य एष ह्यन्येषां अस्त्राणां कवची बली ॥ १०३ ॥
त्यानंतर वायुदेवतेने त्यांच्या जवळ येऊन म्हटले - सौमित्र ! या राक्षसाला ब्रह्मदेवांकडून वरदान प्राप्त झालेले आहे. हा अभेद्य कवचाने आवृत्त आहे, म्हणून याला ब्रह्मास्त्राने विदीर्ण करून टाक, अन्यथा हा मारला जाऊ शकत नाही. हा कवचधारी बलवान् निशाचर अन्य अस्त्रांनी अवध्य आहे. ॥१०२-१०३॥
ततस्तु वायोर्वचनं निशम्य
सौमित्रिरिन्द्रप्रतिमानवीर्यः ।
समादधे बाणमथोग्रवेगं
तद् ब्राह्ममस्त्रं सहसा नियुज्य ॥ १०४ ॥
लक्ष्मण इंद्रासमान पराक्रमी होते. त्यांनी वायुदेवतेचे उपर्युक्त वचन ऐकून एका भयंकर वेगवान् बाणाला ब्रह्मास्त्राने अभिमंत्रित करून धनुष्यावर ठेवले. ॥१०४॥
तस्मिन् वरास्त्रे तु नियुज्यमाने
सौमित्रिणा बाणवरे शिताग्रे ।
विशश्च चन्द्रार्कमहाग्रहाश्च
नभश्च तत्रास चचाल चोर्वी ॥ १०५ ॥
सौमित्र लक्ष्मणांच्या द्वारा तीक्ष्ण धार असणारा तो श्रेष्ठ बाण ब्रह्मास्त्रांनी संयोजित केला गेल्यावर त्या समयी संपूर्ण दिशा, चंद्रमा आणि सूर्य आणि मोठमोठे ग्रह तसेच अंतरिक्षातल्या प्राण्यांचा थरकाप उडाला आणि भूमंडलात महान् कोलाहल माजला. ॥१०५॥
तं ब्रह्मणोऽस्त्रेण नियोज्य चापे
शरं सुपुङ्‌खं यमदूतकल्पम् ।
सौमित्रिरिन्द्रारिसुतस्य तस्य
ससर्ज बाणं युधि वज्रकल्पम् ॥ १०६ ॥
सौमित्राने धनुष्यावर ठेवलेला तो सुंदर पंख असलेला बाण जेव्हा ब्रह्मास्त्राने अभिमंत्रित केला तेव्हा तो यमदूतासमान भयंकर आणि वज्रासमान अमोघ झाला. त्यांनी युद्धस्थळी त्या बाणाला इंद्रद्रोही रावणाचा मुलगा अतिकाय याला लक्ष्य बनवून सोडून दिला. ॥१०६॥
तं लक्ष्मणोत्सृष्टममोघवेगं
समापतन्तं श्वसनोग्रवेगम् ।
सुवर्णवज्रात्तमचित्रपुङ्‌खं
तदातिकायः समरे ददर्श ॥ १०७ ॥
लक्ष्मणांनी सोडलेल्या त्या बाणाचा वेग फारच वाढलेला होता. त्याचे पंख गरूडासमान होते आणि त्यामध्ये हिरे जडविलेले होते म्हणून त्याची विचित्र शोभा होती. अतिकायाने समरांगणात त्या बाणाला त्या समयी वायुसमान भयंकर वेगाने आपल्याकडे येतांना पाहिले. ॥१०७॥
तं प्रेक्षमाणः सहसाऽतिकायो
जघान बाणैर्निशितैरनेकैः ।
स सायकस्तस्य सुपर्णवेगः
तथातिवेगेन जगाम पार्श्वम् ॥ १०८ ॥
त्याला पाहून अतिकायने एकाएकी त्यावर बरेचसे तीक्ष्ण बाण सोडले तरीही तो गरूडासमान वेगशाली सायक अत्यंत वेगाने त्याच्या जवळ जाऊन पोहोचला. ॥१०८॥
तमागतं प्रेक्ष्य तदाऽतिकायो
बाणं प्रदीप्तान्तककालकल्पम् ।
जघान शक्त्यृष्टिगदाकुठारैः
शूलै शरैश्चाप्यविपन्नचेष्टः ॥ १०९ ॥
प्रलयंकर काळासमान प्रज्वलित झालेला तो बाण अत्यंत निकट आलेला पाहून अतिकायचे युद्धविषयक प्रयत्‍न नष्ट झाले नाहीत. त्याने शक्ति, ऋष्टि, गदा, कुठार, शूल तसेच बाणांच्या द्वारा त्याला नष्ट करण्याचा प्रयत्‍न केला. ॥१०९॥
तान्यायुधान्यद्‌भुतविग्रहाणि
मोघानि कृत्वा स शरोऽग्निदीप्तः ।
प्रगृह्य तस्यैव किरीटजुष्टं
तदातिकायस्य शिरो जहार ॥ ११० ॥
परंतु अग्निसमान प्रज्वलित झालेल्या त्या बाणाने त्या अद्‍भुत अस्त्रांना व्यर्थ करून अतिकायच्या मुकुटमण्डित मस्तकास धडापासून अलग केले. ॥११०॥
तच्छिरः सशिरस्त्राणां लक्ष्मणेषुप्रमर्दितम् ।
पपात सहसा भूमौ शृंगं हिमवतो यथा ॥ १११ ॥
लक्ष्मणाच्या बाणाने छेदून टाकलेले राक्षसाचे ते शिरस्त्राण सहित मस्तक हिमालयाच्या शिखराप्रमाणे एकाएकी पृथ्वीवर जाऊन पडले. ॥१११॥
तं भूमौ पतितं दृष्ट्‍वा विक्षिप्तांबरभूषणम् ।
बभूवुर्व्यथिताः सर्वे हतशेषा निशाचराः ॥ ११२ ॥
त्याची वस्त्रे आणि आभूषणे सर्वस्त्र विखरून गेली. त्याला जमिनीवर पडलेला पाहून मरतांना वाचलेले समस्त निशाचर व्यथित होऊन गेले. ॥११२॥
ते विषण्णमुखा दीनाः प्रहारजनितश्रमाः ।
विनेदुरुच्चैर्बहवः सहसा विस्वरैः स्वरैः ॥ ११३ ॥
त्यांच्या मुखांवर विषाद पसरला. त्यांच्यावर जो मार पडला होता त्याने थकून गेल्याने ते अधिकच दुःखी झाले. म्हणून ते बहुसंख्य राक्षस एकाएकी विकृत स्वरात जोरजोराने रडू - ओरडू लागले. ॥११३॥
ततस्तत्परितं याता निरपेक्षा निशाचराः ।
पुरीमभिमुखा भीता द्रवन्तो नायके हते ॥ ११४ ॥
सेनानायक मारला गेल्याने निशाचरांचा युद्धविषयक उत्साह नष्ट झाला, म्हणून ते भयभीत होऊन तात्काळच लंकापुरीकडे पळून चालले. ॥११४॥
प्रहर्षयुक्ता बहवस्तु वानराः
प्रबुद्धपद्मप्रतिमाननास्तदा ।
अपूजयन् लक्ष्मणमिष्टभागिनं
हते रिपौ भीमबले दुरासदे ॥ ११५ ॥
इकडे तो भयंकर बळशाली दुर्जय शत्रू मारला गेल्यावर बहुसंख्य वानर हर्ष आणि उत्साहाने भरून गेले. त्यांची तोंडे प्रफुल्ल कमलाप्रमाणे फुलून गेली आणि ते अभिष्ट विजयाचा भागी वीरवर लक्ष्मणांची भूरि भूरि प्रशंसा करू लागले. ॥११५॥
अतिबलमतिकायमभ्रकल्पं
युधि विनिपात्य स लक्ष्मणः प्रहृष्टः ।
त्वरितमथ तदा स रामपार्श्वं
कपिनिवहैश्च सुपूजितो जगाम ॥ ११६ ॥
युद्धस्थळी अत्यंत बलशाली आणि मेघासमान विशाल अतिकायाला धराशायी करून लक्ष्मण अत्यंत प्रसन्न झाले. ते त्या समयी वानरसमूहांकडून सन्मानित होऊन तात्काळ श्रीरामचंद्रांपाशी गेले. ॥११६॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे एकसप्ततितमः सर्गः ॥ ७१ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकाहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP