सेनया सह भरतस्य रथेन यात्रामार्गे विविधानि स्थानानि समुल्लङ्घ्य तस्योज्जिहानायां नगर्यामेकस्मिन्नुद्याने प्रवेशस्तत्र सेनां शनैः शनैरागन्तुमादिश्य स्वयं रथेन तीव्रवेगात् पुरःसृत्य सालवनमतिक्रम्यायोध्यानिकटे गमनं ततश्च अयोध्याया दुरवस्थां दर्शं दर्शमग्रे सरणं सारथिं प्रति स्वीयं दुःखपूर्णमुद्गारं प्रकटय्य राजभवने प्रवेशश्च -
|
रथ आणि सैन्य यांसह भरताची यात्रा, विभिन्न स्थानांना पार करीत त्यांचे उज्जिहाना नगरीच्या उद्यानात पोहोचणे, आणि सेनेला सावकाश येण्याची आज्ञा देऊन स्वतः रथाद्वारे तीव्र वेगाने पुढे जात सालवनाला पार करून अयोध्याच्या निकट जाणे, तेथून अयोध्येची दुरावस्था पहात पुढे जाणे आणि सारथ्या जवळ आपले दुःखपूर्ण उद्गार प्रकट करीत राजभवनात प्रवेश करणे -
|
स प्राङ्मुखो राजगृहादभिनिर्याय राघवः।
ततः सुदामां द्युतिमान् संतीर्यावेक्ष्य तां नदीम् ॥ १ ॥
ह्रादिनीं दूरपारां च प्रत्यंक्स्त्रोतस्तरङ्गिणीम्।
शतद्रुमतरच्छ्रीमान् नदीमिक्ष्वाकुनन्दनः ॥ २ ॥
|
राजगृहांतून निघून पराक्रमी भरत पूर्व दिशेकडे निघाले. अयोध्येतून जे पाच दूत निघाले होते ते सरळ रस्त्याने राजगृहात आले होते. म्हणून त्यांच्या मार्गात जी जी स्थाने लागली होती, ती भरताच्या मार्गात लागली नाहीत. भरतांच्या बरोबर रथ आणि चतुरङ्गिणी सेना होती म्हणून तिच्या निर्वाहास अनुकूल मार्गाने येऊन ते अयोध्येस पोहोंचले होते, म्हणून त्यांच्या मार्गात सर्वथा नवीन गावे आणि स्थांनाचा उल्लेख मिळतो. त्या तेजस्वी राजकुमारांनी मार्गात सुदामा नदीचे दर्शन करून तिला पार केले. त्यानंतर इक्ष्वाकु कुलनंदन श्रीमान भरतांनी जिचा कालवा दूरवर पसरलेला होता त्या ह्रादिनी नदीला ओलांडून पश्चिमाभिमुख वहाणार्या शतद्रु नदीला (सतलजला) ही पार केले. ॥ १-२ ॥
|
ऐलधाने नदीं तीर्त्वा प्राप्य चापरपर्वतान् ।
शिलामाकुर्वतीं तीर्त्वा आग्नेयं शल्यकर्षणम् ॥ ३ ॥
|
तेथून ऐलधान नामक गावात जाऊन तेथे वहाणार्या नदीला पार केले. तत्पश्चात ते अपरपर्वत नामक जनपदात गेले. तेथे शिला नावाची नदी वाहत होती, जी आपल्यात पडलेल्या वस्तूला शिलास्वरूप बनवीत होती . तिला पार करून भरत तेथून आग्नेय कोनात स्थित शल्यकर्षण नामक देशात गेले जेथे शरीरातून कांटे काढून टाकण्यास सहायता करणारी औषधी उपलब्ध होत होती. ॥ ३ ॥
|
सत्यसन्धः शुचिर्भूत्वा प्रेक्षमाणः शिलावहाम् ।
अभ्यगात् स महाशैलान् वनं चैत्ररथं प्रति ॥ ४ ॥
|
त्यानंतर सत्यप्रतिज्ञ भरताने पवित्र होऊन शिलावहा नामक नदीचे दर्शन केले (जी आपल्या प्रखर धारेने शिलाखंण्डाना - मोठ मोठ्या खडकांनाही वाहून नेण्यामुळे या नावाने प्रसिद्ध होती.) त्या नदीचे दर्शन करून ते पुढे निघाले आणि मोठ्मोठ्या पर्वतांना ओलांडून चैत्ररथ नामक वनात जाऊन पोहोचले. ॥ ४ ॥
|
सरस्वतीं च गङ्गां च युग्मेन प्रत्यपद्य च ।
उत्तरान् वीरमत्स्यानां भारुण्डं प्राविशद् वनम् ॥ ५ ॥
|
तत्पश्चात पश्चिमवाहिनी सरस्वती आणि गङ्गेच्या विशिष्ट धारेच्या संगमावरून पुढे जाऊन त्यांनी वीरभास्य देशाच्या उत्तवर्ती देशांमध्ये पदार्पण केले आणि तेथून पुढे जाऊन ते भारूण्ड वनाच्या मध्यभागी गेले. ॥ ५ ॥
|
वेगिनीं च कुलिङ्गाख्यां ह्रादिनीं पर्वतावृताम् ।
यमुनां प्राप्य संतीर्णो बलमाश्वासयत् तदा ॥ ६ ॥
|
नंतर अत्यंत वेगाने वाहणार्या आणि पर्वतांनी वेढलेली असल्याने आपल्या प्रखर प्रवाहाच्या द्वारा कलकल नाद करणार्या कुलिङ्गा नदीला पार करून यमुनेच्या तटावर पोहोचल्यावर त्यांनी सेनेला विश्राम करविला. ॥ ६ ॥
|
शीतीकृत्य तु गात्राणि क्लान्तानाश्वास्य वाजिनः।
तत्र स्नात्वा च पीत्वा च प्रायादादाय चोदकम् ॥ ७ ॥
राजपुत्रो महारण्यमनभीक्ष्णोपसेवितम् ।
भद्रो भद्रेण यानेन मारुतः खमिवात्ययात् ॥ ८ ॥
|
थकलेल्या घोड्यांना आंघोळ घालून त्यांच्या अङ्गांना शीतलता प्रदान करून त्यांना सावलीत (गवत) चारा आदि देऊन विश्रांती घेण्यासाठी वेळ दिला. राजकुमार भरतही स्वतः स्नान आणि जलपान करून आणि वाटेत पिण्यासाठी जल बरोबर घेऊन पुढे निघाले. मंगलाचारांनी युक्त होऊन माङ्गलिक रथाच्या द्वारा, त्यांनी ज्यामध्ये माणसांचे येणे जाणे अथवा राहाणे होत नव्हते त्या विशाल वनाला, वायु जसा आकाशाला ओलांडून वेगाने पुढे जातो त्याप्रमाणे वेगपूर्वक पार केले. ॥ ७-८ ॥
|
भागीरथीं दुष्प्रतरां सोंऽशुधाने महानदीम् ।
उपायाद् राघवस्तूर्णं प्राग्वटे विश्रुते पुरे ॥ ९ ॥
|
तत्पश्चात अंशुमान नामक गावाजवळ महानदी भागीरथी गङ्गेला दुस्तर (पार जाण्यास कठीण ) जाणून राघव भरत तात्काळच प्राग्वट नामाने विख्यात असलेल्या नगरीत आले. ॥ ९ ॥
|
स गङ्गां प्राग्वटे तीर्त्वा समायात् कुटिकोष्ठिकाम् ।
सबलस्तां स तीर्त्वाथ समागाद् धर्मवर्धनम् ॥ १० ॥
|
प्राग्वट नगरात गङ्गा पार करून ते कुटिकोष्टिका नावाच्या नदीच्या तटावर आले आणि सेनेसहित ती नदीही पार करुन धर्मवर्धन नावाच्या गावात जाऊन पोहोचले. ॥ १० ॥
|
तोरणं दक्षिणार्धेन जम्बूप्रस्थं समागमत् ।
वरूथं च ययौ रम्यं ग्रामं दशरथात्मजः ॥ ११ ॥
|
तेथून तोरण ग्रामाच्या दक्षिणार्ध भागांतून जाऊन जम्बूप्रस्थ मध्ये गेले त्यानंतर दशरथकुमार भरत एका रमणीय ग्रामात आले जे वरूथ नावाने प्रसिद्ध होते. ॥ ११ ॥
|
तत्र रम्ये वने वासं कृत्वासौ प्राङ्मुखो ययौ ।
उद्यानमुज्जिहानायाः प्रियका यत्र पादपाः ॥ १२ ॥
|
तेथे एका रमणीय वनात निवास करून ते प्रातःकाळी पूर्व दिशेकडे गेले. जाता जाता उज्जिहाना नगरीच्या उद्यानात पोहोचले जेथे कदम्ब नावाचे विपुल वृक्ष होते. ॥ १२ ॥
|
स तांस्तु प्रियकान् प्राप्य शीघ्रानास्थाय वाजिनः ।
अनुज्ञाप्याथ भरतो वाहिनीं त्वरितो ययौ ॥ १३ ॥
|
त्या कदंबाच्या उद्यानात पोहोचल्यावर आपल्या रथाला शीघ्रगामी घोडे जुंपून ते, सेनेला सावकाश (हळूहळू) येण्याची आज्ञा देऊन भरत तीव्रगतीने तेथून निघाले. ॥ १३ ॥
|
वासं कृत्वा सर्वतीर्थे तीर्त्वा चोत्तानिकां नदीम् ।
अन्या नदीश्च विविधैः पार्वतीयैस्तुरङ्गमैः ॥ १४ ॥
हस्तिपृष्ठकमासाद्य कुटिकामप्यवर्तत ।
ततार च नरव्याघ्रो लोहित्ये स कपीवतीम् ॥ १५ ॥
|
त्यानंतर सर्वतिर्थ नावाच्या गावात एक रात्र राहून उत्तानिका नदी तसेच अन्य नद्यांनाही नाना प्रकारच्या पर्वतीय घोडे जुंपलेल्या रथाने पार करून नरश्रेष्ठ भरत हस्तिपृष्ठक नावाच्या ग्रामात जाऊन पोहोचले. तेथून पुढे गेल्यावर त्यांनी कुटिका नदी पार केली. नंतर लोहित्य नामक ग्रामात पोहोचून कपीवती नामक नदीला पार केले.॥ १४-१५ ॥
|
एकसाले स्थाणुमतीं विनते गोमतीं नदीम् ।
कलिङ्गनगरे चापि प्राप्य सालवनं तदा ॥ १६ ॥
|
नंतर एकसाल नगराजवळ स्थाणुमती आणि विनत ग्रामाजवळ गोमती नदीला पार करुन ते तात्काळ कलिङ्ग नगराजवळ सालवनात जाऊन पोहोचले.॥ १६॥
|
भरतः क्षिप्रमागच्छत् सुपरिश्रान्तवाहनः ।
वनं च समतीत्याशु शर्वर्यामरुणोदये ॥ १७ ॥
अयोध्यां मनुना राज्ञा निर्मितां स ददर्श ह ।
तां पुरीं पुरुषव्याघ्रः सप्तरात्रोषितः पथि ॥ १८ ॥
|
तेथे जाता जाता भरतांचे घोडे थकून गेले. तेव्हा त्यांना विश्राम देऊन ते रातो-रात लवकरच सालवन ओलांडून गेले आणि अरूणोदय काळी राजा मनुने वसविलेल्या अयोध्यापुरीचे दर्शन त्यांनी केले. पुरूषसिंह भरत मार्गात सात रात्री व्यतीत करून आठव्या दिवशी अयोध्यापुरीचे दर्शन करू शकले होते.॥ १७-१८ ॥
|
अयोध्यामग्रतो दृष्ट्वा सारथिं चेदमब्रवीत् ।
एषा नातिप्रतीता मे पुण्योद्याना यशस्विनी ॥ १९ ॥
अयोध्या दृश्यते दूरात् सारथे पाण्डुमृत्तिका ।
यज्विभिर्गुणसम्पन्नैर्ब्राह्मणैर्वेदपारगैः ॥ २० ॥
|
समोर अयोध्यापुरीला पाहून ते आपल्या सारथ्याला याप्रमाणे बोलले- ’सूत ! पवित्र उद्यानांनी सुशोभित ही यशस्विनी नगरी आज मला अधिक प्रसन्न दिसून येत नाही. ही तीच नगरी आहे जेथे यज्ञ-याग करणारे गुणवान आणि वेदांत पारङ्गत विद्वान ब्राह्मण निवास करतात, जेथे अनेक धनिकांची ही वस्ती आहे तसेच राजर्षिंमध्ये श्रेष्ठ महाराज जिचे पालन करतात तीच अयोध्या या समयी दुरून पांढर्या मातीच्या ढीगासारखी (टेकाडासारखी) दिसत आहे. ॥ १९-२० ॥
|
भूयिष्ठमृद्धैराकीर्णा राजर्षिपरिपालिता ।
अयोध्यायां पुरा शब्दः श्रूयते तुमुलो महान् ॥ २१ ॥
|
’पूर्वी अयोध्येत चारी बाजूस पुरूष आणि स्त्रियांचा महान तुमुलनाद ऐकू येत असे परंतु आज मला तो ऐकू येत नाही आहे.॥ २१ ॥
|
समन्तान्नरनारीणां तमद्य न शृणोम्यहम् ।
उद्यानानि हि सायाह्ने क्रीडित्वोपरतैर्नरैः ॥ २२ ॥
समन्ताद् विप्रधावद्भिः प्रकाशन्ते ममान्यथा ।
तान्यद्यानुरुदन्तीव परित्यक्तानि कामिभिः ॥ २३ ॥
|
’सायंकाळच्या वेळी लोक उद्यानात प्रवेश करून तेथे क्रीडा करीत असत आणि त्या क्रीडेतून निवृत्त होऊन सर्व बाजूनी आपल्या घराकडे धावत जात असत म्हणून त्या समयी उद्यानांची अपूर्व शोभा दिसत असत असे, परंतु आज हे मला काही वेगळ्याच प्रकारचे दिसून येत आहे. तीच उद्याने आज कामीजनांनी परित्यक्त होऊन जणु रडत आहेत असे भासत आहे.॥ २२-२३ ॥
|
अरण्यभूतेव पुरी सारथे प्रतिभाति माम् ।
नह्यत्र यानैर्दृश्यन्ते न गजैर्न च वाजिभिः ।
निर्यान्तो वाभियान्तो वा नरमुख्या यथा पुरा ॥ २४ ॥
|
’सारथे ! ही पुरी मला जंगलासारखी वाटत आहे. आता येथे पूर्वीप्रमाणे हत्ती, घोडे आणि दुसर्या वाहनांतून येणारे जाणारे श्रेष्ठ लोक दिसून येत नाही आहेत.॥ २४ ॥
|
उद्यानानि पुरा भान्ति मत्तप्रमुदितानि च ।
जनानां रतिसंयोगेष्वत्यन्तगुणवन्ति च ॥ २५ ॥
तान्येतान्यद्य पश्यामि निरानन्दानि सर्वशः ।
स्रस्तपर्णैरनुपथं विक्रोशद्भिरिव द्रुमैः ॥ २६ ॥
|
जी उद्याने पूर्वी मदमस्त आणि आनंदमग्न भ्रमरांनी, कोकिळांनी आणि नर-नारींनी भरलेली प्रतीत होत असत आणि लोकांच्या प्रेम-मिलनासाठी अत्यंत गुणकारी (अनुकूल सुविधांनी (सोयीनी सम्पन्न) होती, त्यांना मी आज सर्वथा आनंदशून्य पहात आहे. तेथे मार्गावर झाडांची जी पाने गळून पडत आहेत त्यांच्या द्वारा जणु ते वृक्ष करुण- क्रन्दन करीत आहेत. (आणि त्यांनी उपलक्षित झाल्यामुळे ती उद्याने आनंदहीन प्रतीत होत आहेत.) ॥ २५-२६॥
|
नाद्यापि श्रूयते शब्दो मत्तानां मृगपक्षिणाम् ।
संरक्तां मधुरां वाणीं कलं व्याहरतां बहु ॥ २७ ॥
|
’रागयुक्त मधुर कलरव करणारे मृग आणि पक्षी यांचा तुमुल शब्द अद्याप ऐकू येत नाही आहे.॥ २७ ॥
|
चन्दनागरुसम्पृक्तो धूपसम्मूर्च्छितोऽमलः ।
प्रवाति पवनः श्रीमान् किंनु नाद्य यथापुरा ॥ २८ ॥
|
’चन्दन आणि अगुरू यांच्या सुगंधानी मिश्रित आणि धूपाच्या मनोहर गंधाने व्याप्त निर्मल मनोरम समीर आज पूर्वाप्रमाणे का होत नाही आहे ? ॥ २८ ॥
|
भेरीमृदङ्गवीणानां कोणसङ्घऽट्टितः पुनः ।
किमद्य शब्दो विरतः सदादीनगतिः पुरा ॥ २९ ॥
|
’वादनदण्ड द्वारा वाजविल्या जाणार्या भेरी, मृदुङ्ग आणि वीणांचा जो आघातजनिक शब्द (आवाज) होत असतो तो पूर्वी अयोध्येत सदा होत रहात असे, कधी त्याची गति अवरूद्ध होत नव्हती, परंतु आज तो आवाज न जाणो का बंद झाला आहे ? ॥ २९ ॥
|
अनिष्टानि च पापानि पश्यामि विविधानि च ।
निमित्तान्यमनोज्ञानि तेन सीदति मे मनः ॥ ३० ॥
|
’मला अनेक प्रकारचे अनिष्टकारी, क्रूर आणि अशुभ सूचक अपशकुन दिसून येत आहेत, ज्यामुळे माझे मन खिन्न होऊन राहिले आहे. ॥ ३० ॥
|
सर्वथा कुशलं सूत दुर्लभं मम बन्धुषु ।
तथा ह्यसति सम्मोहे हृदयं सीदतीव मे ॥ ३१ ॥
|
’सारथी ! यावरून असे प्रतीत होत आहे की या समयी माझ्या बांधवांचे कुशल-मङ्गल सर्वथा दुर्लभ आहे. म्हणून तर मोहाचे काही कारण नसूनही माझे ह्रदय खचून जात आहे. ॥ ३१ ॥
|
विषण्णः श्रान्तहृदयस्त्रस्तः संलुलितेन्द्रियः ।
भरतः प्रविवेशाशु पुरीमिक्ष्वाकुपालिताम् ॥ ३२ ॥
|
भरत मनांतल्या मनात अत्यंत खिन्न झाले होते. त्यांचे हृदय शिथिल होत होते. ते घाबरले होते आणि त्यांची सारी इन्द्रिये क्षुब्ध झाली होती. याच अवस्थेमध्ये त्यांनी जलदगतीने इक्ष्वाकुवंशी राजांच्याद्वारा पालित अयोध्यापुरीत प्रवेश केला.॥ ३२ ॥
|
द्वारेण वैजयन्तेन प्राविशच्छ्रान्तवाहनः ।
द्वाःस्थैरुत्थाय विजयमुक्तस्तैः सहितो ययौ ॥ ३३ ॥
|
पुरीच्या द्वारावर सदा वैजयंती पताका फडकत असे म्हणून त्या द्वाराचे नाव वैजयंत ठेवले गेले होते. ( हे पुरीच्या पश्चिम भागात होते.) त्या वैजयंत द्वाराने भरत पुरीमध्ये प्रविष्ट झाले. त्या समयी त्यांच्या रथाचे घोडे फारच थकलेले होते. द्वारपालांनी उठून म्हटले- ’महाराजांचा जय असो’. नंतर ते त्यांच्या बरोबर पुढे जाऊ लागले. ॥ ३३ ॥
|
स त्वनेकाग्रहृदयो द्वाःस्थं प्रत्यर्च्य तं जनम् ।
सूतमश्वपतेः क्लान्तमब्रवीत् तत्र राघवः ॥ ३४ ॥
|
भरतांचे हृदय एकाग्र नव्हते- ते घाबरलेले होते. म्हणून त्या राघवाने- भरताने बरोबर आलेल्या द्वारपालांना सत्कारपूर्वक परत धाडले आणि केकयराज अश्वपतिच्या थकलेल्या - भागलेल्या सारथ्याला तेथे याप्रमाणे म्हटले- ॥ ३४ ॥
|
किमहं त्वरयाऽऽनीतः कारणेन विनानघ ।
अशुभाशङ्कि हृदयं शीलं च पततीव मे ॥ ३५ ॥
|
’निष्पाप सूता ! मला विनाकारण इतक्या उतावळेपणाने का बोलावले गेले आहे ? या गोष्टीचा विचार करून माझ्या हृदयात अशुभाची आशङ्का होत आहे. माझा दीनतारहित स्वभावही आपल्या स्थितीपासून भ्रष्ट झाल्या सारखा होत आहे.॥ ३५ ॥
|
श्रुता नु यादृशाः पूर्वं नृपतीनां विनाशने ।
आकारांस्तानहं सर्वानिह पश्यामि सारथे ॥ ३६ ॥
|
’ सारथे ! आजच्या पूर्वी मी राजांच्या विनाशाची जशी जशी लक्षणे ऐकून ठेवलेली होती, ती सर्व लक्षणे आज मी येथे पहात आहे.॥ ३६ ॥
|
सम्मार्जनविहीनानि परुषाण्युपलक्षये ।
असंयतकवाटानि श्रीविहीनानि सर्वशः ॥ ३७ ॥
बलिकर्मविहीनानि धूपसम्मोदनेन च ।
अनाशितकुटुम्बानि प्रभाहीनजनानि च ॥ ३८ ॥
अलक्ष्मीकानि पश्यामि कुटुम्बिभवनान्यहम् ।
|
’ मी पहात आहे की गृहस्थांची घरे झाडलेली नाहीत. ती वाळलेली आणि श्रीहीन दिसत आहेत. त्यांची दारे उघडी आहेत. या घरातून बलिवैश्वदेव कर्म होत नाही आहे. ती धूपाच्या सुगंधापासून वञ्चित आहेत. यात राहाणार्या कुटुंबीजनांना भोजन प्राप्त झालेले नाही तसेच ही सारी घरे प्रभाहीन (उदास) दिसून येत आहेत. कळून येत आहे की- यांच्यात लक्ष्मीचा निवास नाही आहे.॥ ३७- ३८ १/२ ॥
|
अपेतमाल्यशोभानि असम्मृष्टाजिराणि च ॥ ३९ ॥
देवागाराणि शून्यानि न भान्तीह यथापुरा ।
|
देवमंदिरे फुलांनी सजविलेली दिसून येत नाहीत. त्यांची अंगणे झाडलेली स्वच्छ केलेली नाहीत. ती माणसाशिवाय शून्य (ओसाड) झाली आहेत, त्यामुळे ती पूर्वीसारखी सुशोभित दिसत नाहीत.॥ ३९ १/२ ॥
|
देवतार्चाः प्रविद्धाश्च यज्ञ गोष्ठास्तथैव च ॥ ४० ॥
माल्यापणेषु राजन्ते नाद्य पण्यानि वा तथा ।
दृश्यन्ते वणिजोऽप्यद्य न यथापूर्वमत्र वै ॥ ४१ ॥
ध्यानसंविग्नहृदया नष्टव्यापारयन्त्रिताः ।
|
’देवप्रतिमांची पूजा बंद झालेली आहे. यज्ञशाळांतून यज्ञ होत नाही आहे. फुले आणि माळांच्या बाजारात आज विकण्याच्या काहीही वस्तु शोभून दिसत नाहीत. येथे पूर्वीप्रमाणे व्यापारी (वाणि) ही आज दिसून येत नाहीत. चिंतेने त्यांचे हृदय उद्विग्न झाल्याचे कळून येत आहे आणि आपला व्यापार नष्ट झाल्यामुळे हे संकोचित झाले आहेत.॥ ४०-४१ १/२ ॥
|
देवायतनचैत्येषु दीनाः पक्षिमृगास्तथा ॥ ४२ ॥
मलिनं चाश्रुपूर्णाक्षं दीनं ध्यानपरं कृशम् ।
सस्त्रीपुंसं च पश्यामि जनमुत्कण्ठितं पुरे ॥ ४३ ॥
|
’देवालये आणि चैत्य (देव) वृक्षांवर ज्यांचा निवास आहे ते पशु-पक्षी दीन दिसून येत आहेत. मी पहात आहे की नगरांतील सर्व स्त्रीपुरूषांची मुखे मलीन आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रु भरलेले आहेत आणि सर्वच्या सर्व दीन, चिंतित, दुर्बळ आणि उत्कंठित आहेत.॥ ४२-४३ ॥
|
इत्येवमुक्त्वा भरतः सूतं तं दीनमानसः ।
तान्यनिष्टान्ययोध्यायां प्रेक्ष्य राजगृहं ययौ ॥ ४४ ॥
|
सारथ्याला असे म्हणून अयोध्येत होण्यार्या त्या अनिष्टसूचक चिन्हांना पहात भरत मनांतल्या मनात दुःखी होऊन राजमहालात गेले. ॥ ४४ ॥
|
तां शून्यशृङ्गाटकवेश्मरथ्यां
रजोरुणद्वारकपाटयन्त्राम् ।
दृष्ट्वा पुरीमिन्द्रपुरीप्रकाशां
दुःखेन सम्पूर्णतरो बभूव ॥ ४५ ॥
|
जी अयोध्यापुरी कधी देवराज इन्द्राच्या नगरीप्रमाणे शोभत होती, तिचेच चौक, घरे आणि रस्ते आज ओसाड दिसून येत होते तसेच दरवाजांची दारे धुळीने धूसर झाली होती, त्यांची अशी दुर्दशा पाहून भरत पूर्णतः दुःखात निमग्न होऊन गेले.॥ ४५ ॥
|
बभूव पश्यन् मनसोऽप्रियाणि
यान्यन्यदा नास्य पुरे बभूवुः ।
अवाक्छिरा दीनमना न हृष्टः
पितुर्महात्मा प्रविवेश वेश्म ॥ ४६ ॥
|
त्या नगरात ज्या पूर्वी कधीही घडलेल्या नव्हता अशा अप्रिय गोष्टींना पाहून महात्मा भरतांनी आपले मस्तक खाली नमविले, त्यांचा हर्ष हिरावून घेतला गेला होता आणि त्यांनी दीन हृदयांनी पित्याच्या भवनात प्रवेश केला.॥ ४६ ॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे एकसप्ततितमः सर्गः ॥ ७१ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकाहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥ ७१ ॥
|