॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥ ॥ बालकाण्ड ॥ ॥ चतुर्थः सर्ग: ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] विश्वामित्रांचे आगमन, राम आणि लक्ष्मणाचे त्यांच्याबरोबर जाणे आणि त्राटिकेचा वध करणे - श्रीमहादेव उवाच कदाचित्कौशिकोऽभ्यागादयोध्यां ज्वलनप्रभः । द्रष्टुं रामं परात्मानं जातं ज्ञात्वा स्वमायया ॥ १ ॥ श्रीमहादेव म्हणाले - स्वतःव्या मायेने परमात्मा रामरूपात प्रकट झाले आहेत, हे जाणून त्यांचे दर्शन घेण्यास, अग्नीप्रमाणे तेजस्वी असणारे महर्षी विश्वामित्र एकदा अयोध्या नगरीत आले. (१) दृष्ट्वा दशरथो राजा प्रत्युत्थायाचिरेण तु । वसिष्ठेन समागम्य पूजयित्वा यथाविधि ॥ २ ॥ अभिवाद्य मुनिं राजा प्राञ्जलिर्भक्तिनम्रधीः । कृतार्थोऽस्मि मुनीन्द्राहं त्वदागमनकारणात् ॥ ३ ॥ त्यांना पाहताच महाराज दशरथ झटकन उठून उभे राहिले आणि वसिष्ठांसह पुढे येऊन त्यांनी त्यांचे स्वागत केले. नंतर यथाविधी त्यांचे पूजन आणि अभिवादन करून, भक्तीने नम्र झालेल्या चित्ताने, दशरथ राजाने दोन्ही हात जोडून मुनींना म्हटले, "हे मुनिश्रेष्ठ, तुमचे आगमन झाल्यामुळे आज मी कृतकृत्य झालो आहे. (२-३) त्वद्विधा यद्गृहं यान्ति तत्रैवायान्ति संपदः । यदर्थमागतोऽसि त्वं ब्रूहि सत्यं करोमि तत् ॥ ४ ॥ तुमच्यासारखे महानुभाव लोक ज्या घरी येतात त्या घरात सर्व संपदा आपोआप येतात. आता तुमचे शुभागमन कोणत्या कारणासाठी झाले आहे, ते मला सांगा. मी तुमच्या आज्ञेचे पालन करीन." (४) विश्वामित्रोऽपि तं प्रीतः प्रत्युवाच महीपतिः । अहं पर्वणि संप्राप्ते दृष्ट्वा यष्टुं सुरान्पितॄन् ॥ ५ ॥ यदारभे तदा दैत्या विघ्नं कुर्वन्ति नित्यशः । मारीचश्च सुबाहुश्चापरे चानुचरास्तयोः ॥ ६ ॥ तेव्हा संतुष्ट झालेले महाबुद्धिमान विश्वामित्रसुद्धा त्यांना म्हणाले, "पर्वकाळ आला असे पाहून, देवगण आणि पितृगण यांच्यासाठी यज्ञ करण्यास मी जेव्हां जेव्हां प्रारंभ करतो, तेव्हां तेव्हां मारीच, सुबाहू आणि त्या दोघांचे अन्य अनुचर असणारे दैत्य हे नेहमी त्या यज्ञात विघ्ने निर्माण करतात. (५-६) अतस्तयोर्वधार्थाय ज्येष्ठं रामं प्रयच्छ मे । लक्ष्मणेन सह भ्राता तव श्रेयो भविष्यति ॥ ७ ॥ म्हणू न त्या दोघांचा वध करण्यासाठी लक्ष्मणासह तुमचा ज्येष्ठ पुत्र श्रीराम मला द्या. तुमचे कल्याण होईल. (७) वसिष्ठेन सहामंत्र्य दीयतां यदि रोचते । पप्रच्छ गुरुमेकान्ते राजा चिन्तापरायणः ॥ ८ ॥ याबाबतीत वसिष्ठांचा सल्ला घेऊन, जर तुमची इच्छा असेल तर तुमचे दोन्ही कुमार मला द्या. "तेव्हा राजाने चिंताकुल होऊन एकांतात गुरूंना प्रश्न केला. (८) किं करोमि गुरो रामं त्यक्तुं नोत्सहते मनः । बहुवर्षसहस्रान्ते कष्टेनोत्पादिताः सुताः ॥ ९ ॥ चत्वारोऽमरतुल्यास्ते तेषां रामोऽतिवल्लभः । रामस्त्वितो गच्छति चेन्न जीवामि कथञ्चन ॥ १० ॥ "हे गुरो, हजारो वर्षे लोटल्यावर, मोठ्या कष्टाने, देवसदृश असे हे चार पुत्र उत्पन्न झाले आहेत. त्यांतील राम हा तर माझा फारच लाडका आहे. त्याला सोडण्यास माझे मन तयार नाही. कारण जर राम येथून निघून गेला तर मी कोणत्याही प्रकारे जिवंत राहू शकणार नाही. (९-१०) प्रत्याख्यातो यदि मुनिः शापं दास्यत्यसंशयः । कथं श्रेयो भवेन्मह्यमसत्यं चापि न स्पृशेत् ॥ ११ ॥ परंतु जर मी मुनींना नकार दिला, तर ते मला शाप देतील, यात संशय नाही. तेव्हा माझे हित होईल आणि असत्य बोलण्यापासून मी वाचेन, असे काहीतरी सांगा." (११) वसिष्ठ उवाच शृणु राजन् देवगुह्यं गोपनीयं प्रयत्नतः । रामो न मानुषो जातः परमात्मा सनातनः ॥ १२ ॥ वसिष्ठ म्हणाले-'हे राजा, देवांपासूनसुद्धा गुप्त ठेवण्याजोगी गोष्ट ऐका. ही गोष्ट प्रयत्नपूर्वक गुप्त ठेवावयास हवी. श्रीराम हा मानव नाही; पुराण पुरुष परमात्माच (आपल्या मायेने) या मानवरूपात जन्माला आला आहे. (१२) भूमेर्भारावताराय ब्रह्मणा प्रार्थितः पुरा । स एव जातो भवने कौसल्यायां तवानघ ॥ १३ ॥ हे पुण्यशील दशरथा, भूमीचा भार उतरविण्यासाठी ब्रह्मदेवाने पूर्वी भगवंतांची प्रार्थना केली होती. ती पूर्ण करण्यास परमात्म्यांनीच तुमच्या घरी कौसल्येच्या ठिकाणी जन्म घेतला आहे. (१३) त्वं तु प्रजापतिः पूर्वं कश्यपो ब्रह्मणः सुतः । कौसल्या चादितिर्देवमाता पूर्वं यशस्विनी । भवन्तौ तप उग्रं वै तेपाथे बहुवत्सरम् ॥ १४ ॥ अग्राम्यविषयौ विष्णुपूजाध्यानैकतत्परौ । तदा प्रसन्नो भगवान् वरदो भक्तवत्सलः ॥ १५ ॥ वृणीष्व वरमित्युक्ते त्वं मे पुत्रो भवामल । इति त्वया याचितोऽसौ भगवान्भूतभावनः ॥ १६ ॥ तथेत्युक्त्वाद्य पुत्रस्ते जातो रामः स एव हि । शेषस्तु लक्ष्मणो राजन् राममेवान्वपद्यत ॥ १७ ॥ पूर्वजन्मामध्ये तुम्ही ब्रह्मदेवाचे पुत्र प्रजापती कश्यप होता आणि यशस्विनी कौसल्या ही पूर्वीची देवमाता अदिती होती. त्या वेळी ग्राम्य विषयांचा त्याग करून एकमात्र भगवान् विष्णूची पूजा व ध्यान यांत तत्पर होऊन, तुम्ही दोघांनी पुष्कळ वर्षे, फार उग्र तप केले होते. त्यानंतर भक्तवत्सल आणि वर देणार्या अशा भगवंतांनी तुम्हा दोघांवर प्रसन्न होऊन तुम्हांला म्हटले, 'वर मागा.' तेव्हां तुम्ही भगवंतांजवळ अशी याचना केलीत, 'हे निरंजना, तू आमचा पुत्र हो.' तेव्हा भूतांना निर्माण करणार्या भगवंतांनी म्हटले की, 'ठीक आहे.' त्याप्रमाणे भगवान विष्णू आता राम-रूपाने तुमचे पुत्र झाले आहेत आणि हे राजा, (रामांची सेवा करण्यासाठी) शेष नाग हा लक्ष्मणाच्या रूपात प्रगट होऊन रामांचा सेवक झाला आहे. (१४-१७) जातौ भरतशत्रुघ्नौ शङ्खचक्रे गदाभृतः । योगमायापि सीतेति जाता जनकनन्दिनी ॥ १८ ॥ भगवान गदाधर विष्णूंचे शंख व चक्र भरत आणि शत्रुघ्न या रूपात अवतरले आहेत. तसेच (विष्णूची) योगमाया हीसुद्धा जनकाला आनंद देणारी सीता होऊन जन्माला आली आहे. (१८) विश्वामित्रोऽपि रामाय तां योजयितुमागतः । एतद्गुह्यतमं राजन्न वक्तव्यं कदाचन ॥ १९ ॥ या वेळी त्या सीतेचा श्रीरामांशी संयोग घडवून आणण्यासाठीच विश्वामित्र आले आहेत. हे राजा, हे अतिशय गुह्य आहे. हे कधीही कोणासही सांगू नका. (१९) अतः प्रीतेन मनसा पूजयित्वाथ कौशिकम् । प्रेषयस्व रमानाथं राघवं सहलक्ष्मणम् ॥ २० ॥ म्हणून आता तुम्ही प्रसन्न चित्ताने श्रीविश्वामित्रांचा सत्कार करून लक्ष्मीपती रघुनाथांना लक्ष्मणासह त्याच्याबरोबर पाठवून द्या. " (२०) वसिष्ठेनैवमुक्तस्तु राजा दशरथस्तदा । कृतकृत्यमिवात्मानं मेने प्रमुदितान्तरः ॥ २१ ॥ आहूय रामरामेति लक्ष्मणेति च सादरम् । आलिङ्ग्य मूर्ध्नवघ्राय कौशिकाय समर्पयत् ॥ २२ ॥ वसिष्ठांनी असे सांगितल्यावर, राजा दशरथांनी स्वतःला कृतकृत्य मानले आणि मग प्रसन्न चिताने आदरपूर्वक, 'अरे रामा, अरे लक्ष्मणा,' अशा हाका मारल्या. नंतर ते दोघे भाऊ आल्यावर त्यांना हृदयाशी धरून आणि त्यांच्या मस्तकाचे अवघ्राण करून, दशरथांनी त्यांना विश्वामित्रांच्या हाती सोपविले. (२१-२२) ततोऽतिहृष्टो भगवान्विश्वामित्रः प्रतापवान् । आशीर्भिरभिनन्द्याथ आगतौ रामलक्ष्मणौ ॥ २३ ॥ गृहीत्वा चापतूणीरबाणखड्गधरौ ययौ । किञ्चिद्देशमतिक्रम्य राममाहूय भक्तितः ॥ २४ ॥ ददौ बलां चातिबलां विद्ये द्वे देवनिर्मिते । ययोर्ग्रहणमात्रेण क्षुत्क्षामादि न जायते ॥ २५ ॥ त्यानंतर अतिशय प्रतापी अशा महानुभाव विश्वामित्रांनी अत्यंत प्रसन्नतापूर्वक त्यांना आशीर्वाद देऊन सन्मानित केले. धनुष्य, भाता, बाण आणि खड्ग इत्यादींनी सुसज्ज होऊन, आपल्याजवळ आलेल्या श्रीराम-लक्ष्मणांना बरोबर घेऊन विश्वामित्र तेथून निघाले. थोडेसे दूर गेल्यावर त्यांनी भक्तिपूर्वक श्रीरामांना बोलावले आणि देवांनी निर्माण केलेल्या बला आणि अतिबला नावाच्या दोन विद्या त्यांना दिल्या. त्या विद्या घेतल्यावर क्षुधा आणि अशक्तपणा इत्यादींची बाधा होत नसे. (२३-२५) तत उत्तीर्य गङ्गां ते ताटकावनमागमन् । विश्वामित्रस्तदा प्राह रामं सत्यपराक्रमम् ॥ २६ ॥ नंतर गंगानदी पार करून ते ताटका राक्षसीच्या वनात आले. तेव्हा सत्यपराक्रमी श्रीरामांना विश्वामित्र म्हणाले. (२६) अत्रास्ति ताटका नाम राक्षसी कामरूपिणी । बाधते लोकमखिलं जहि तामविचारयन् ॥ २७ ॥ "स्वतःच्या इच्छेनुसार रूप धारण करणारी ताटका नावाची राक्षसी येथे राहते. येथील सर्व लोकांना ती अतिशय त्रास देते. तेव्हां कोणताही विचार न करता तिला ठार करा, " (२७) तथेति धनुरादाय सगुणं रघुनन्दनः । टङ्कारमकरोत्तेन शब्देनापूरयद्वनम् ॥ २८ ॥ "ठीक आहे" असे बोलून, धनुष्यावर दोरी चढवून, रघुनाथांनी टणत्कार केला आणि त्यांनी त्या टणत्काराने ते संपूर्ण वन दुमदुमून टाकले. (२८) तच्छृत्वासहमाना सा ताटका घोररूपिणी । क्रोधसंमूर्च्छिता राममभिदुद्राव मेघवत् ॥ २९ ॥ तो शब्द ऐकल्यावर घोररूप असणार्या ताटकेला तो आवाज सहन झाला नाही. तेव्हा रागाने वेडीपिशी होऊन ती एखाद्या काळ्याकुट्ट मेघाप्रमाणे (विकराळ बनून) श्रीरामांकडे धावली. (२९) तामेकेन शरेणाशु ताडयामास वक्षसि । पपात विपिने घोरा वमन्ती रुधिरं बहु ॥ ३० ॥ भगवान श्रीरामांनी पटकन तिच्या वक्षःस्थलावर एक बाण सोडला. त्यामुळे खूप रक्त ओकत ती भयंकर राक्षसी त्या वनात मरून पडली. (३०) ततोऽतिसुन्दरी यक्षी सर्वाभरणभूषिता । शापात्पिशाचतां प्राप्ता मुक्ता रामप्रसादतः ॥ ३१ ॥ नत्वा रामं परिक्रम्य गता रामाज्ञया दिवम् ॥ ३२ ॥ त्यानंतर शापामुळे पिशाच बनलेली ती ताटका श्रीरामचंद्रांच्या कृपेने शापमुक्त होऊन सर्व अलंकारांनी विभूषित अशी अतिशय सुंदर यक्षिणी झाली. तिने श्रीरामांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांना प्रणाम करून ती त्यांच्या आज्ञेने दिव्यलोकात निघून गेली. (३१-३२) ततोऽतिहृष्टः परिरभ्य रामं मूर्धन्यवघ्राय विचिन्त्य किञ्चित् । सर्वास्त्रजालं सरहस्यमंत्रं प्रीत्याभिरामाय ददौ मुनीन्द्रः ॥ ३३ ॥ तेव्हा अतिशय आनंदित होऊन विश्वामित्रांनी रामांना आलिंगन दिले आणि त्यांच्या मस्तकाचे अवघ्राण केले. त्या वेळी अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव त्यांना आला. आपले परम भाग्य समजून त्यांनी रहस्य व मंत्र इत्यादींसह सर्व शस्त्रास्त्रे प्रीतिपूर्वक सौदर्यसंपन्न अशा श्रीरामांना दिली. (३३) इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे बालकाण्डे चतुर्थः सर्गः ॥ ४ ॥ चतुर्थ सर्गः समाप्तः ॥ ४ ॥ |