[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ चतुर्विंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण तात्कालिकैः शकुनै राक्षसानां विनाशं स्वविजयं च सम्भाव्य सीतासहितस्य लक्ष्मणस्य पर्वतगुफायां प्रेषणम् -
श्रीरामांनी तात्कालिक शकुनांच्या द्वारे राक्षसांचा विनाश आणि आपल्या विजयाची संभावना करून सीतेसहित लक्ष्मणास पर्वताच्या गुहेत धाडणे आणि युद्धासाठी उद्दत होणे -
आश्रमं प्रतियाते तु खरे खरपराक्रमे ।
तानेवौत्पातिकान् रामः सह भ्रात्रा ददर्श ह ॥ १ ॥
प्रचण्ड पराक्रमी खर जेव्हा श्रीरामांच्या आश्रमाकडे निघाला तेव्हा भावासह श्रीरामांनी ही त्या उत्पातसूचक लक्षणांना पाहिले. ॥१॥
तानुत्पातान् महाघोरान् रामो दृष्ट्‍वात्यमर्षणः ।
प्रजानामहितान् दृष्ट्‍वा वाक्यं लक्ष्मणमब्रवीत् ॥ २ ॥
प्रजेच्या अहिताची सूचना देणार्‍या त्या महाभयंकर उत्पातांना पाहून श्रीराम राक्षसांच्या उपद्रवाचा विचार करून अत्यंत अमर्षाने भरून गेले आणि लक्ष्मणाला या प्रकारे बोलले- ॥२॥
इमान् पश्य महाबाहो सर्वभूतापहारिणः ।
समुत्थितान् महोत्पातान् संहर्तुं सर्वराक्षसान् ॥ ३ ॥
’महाबाहो ! हे जे मोठ मोठे उत्पात प्रकट होत आहेत त्यांच्याकडे जरा दृष्टीपात करा. समस्त भूतांच्या संहाराची सूचना देणारे हे महान उत्पात यावेळी या सार्‍या राक्षसांचा संहार करण्यासाठी उत्पन्न झाले आहेत.’ ॥३॥
अमी रुधिरधारास्तु विसृजन्ते खरस्वनाः ।
व्योम्नि मेघा विवर्तन्ते परुषा गर्दभारुणाः ॥ ४ ॥
’आकाशात जे गाढवाप्रमाणे धूसर वर्णाचे ढग इकडे-तिकडे विचरत आहेत ते प्रचण्ड गर्जना करून रक्ताच्या धारांचा वर्षाव करीत आहेत. ॥४॥
सधूमाश्च शराः सर्वे मम युद्धाभिनन्दिताः ।
रुक्मपृष्ठानि चापानि विवेष्टन्ते विचक्षण ॥ ५ ॥
’युद्धकुशल लक्ष्मणा ! माझे सर्व बाण उत्पातवश उठणार्‍या धुराशी संबद्ध होऊन युद्धासाठी जणु आनंदित होत आहेत तसेच ज्यांच्या पृष्ठभागी सुवर्ण मढविलेले आहे ते माझे धनुष्यही प्रत्यंचेशी जुळण्यासाठी जणु स्वतःच प्रयत्‍नशील होत आहे असे भासत आहे. ॥५॥
यादृशा इह कूजन्ति पक्षिणो वनचारिणः ।
अग्रतो नोऽभयं प्राप्तं संशयो जीवितस्य च ॥ ६ ॥
’येथे जसे जसे वनचारी पक्षी बोलत आहेत त्यावरून आपल्यासाठी भविष्यात अभयाची आणि राक्षसांसाठी प्राणसंकटाची प्राप्ती सूचित होत आहे.’ ॥६॥
सम्प्रहारस्तु सुमहान् भविष्यति न सशंयः ।
अयमाख्यानि मे बाहुः स्फुरमाणो मुहुर्मुहुः ॥ ७ ॥
’माझी ही उजवी भुजा वारंवार स्पुरण पावून या गोष्टीची सूचना देत आहे की थोड्याच वेळात फार मोठे युद्ध होईल यात शंका नाही.’ ॥७॥
संनिकर्षे तु नः शूर जयं शत्रोः पराजयम् ।
सुप्रभं च प्रसन्नं च तव वक्त्रं हि लक्ष्यते ॥ ८ ॥
’शूरवीर लक्ष्मणा ! परंतु निकट भविष्यातच आपला विजय आणि शत्रूंचा पराजय होईल कारण तुझे मुख कांतीमान आणि प्रसन्न दिसून येत आहे.’ ॥८॥
उद्यतानां हि युद्धार्थं येषां भवति लक्ष्मण ।
निष्प्रभं वदनं तेषां भवत्यायुः परिक्षयः ॥ ९ ॥
’लक्ष्मणा ! युद्धासाठी उद्यत झाल्यावर ज्याचे मुख प्रभाहीन (उदास) होऊन जाते त्याचे आयुष्य नष्ट होऊन जात असते.’ ॥९॥
रक्षसां नर्दतां घोरः श्रूयतेऽयं महाध्वनिः ।
आहतानां च भेरीणां राक्षसैः क्रूरकर्मभिः ॥ १० ॥
’गर्जना करणार्‍या राक्षसांचा हा घोर नाद ऐकू येत आहे, तसेच क्रूरकर्मा राक्षसांच्या द्वारा वाजविल्या गेलेल्या भेरींचा हा महाभयंकर ध्वनी कानावर पडत आहे.’ ॥१०॥
अनागतविधानं तु कर्तव्यं शुभमिच्छता ।
आपदं शङ्‌कमानेन पुरुषेण विपश्चिता ॥ ११ ॥
’आपले कल्याण इच्छिणार्‍या विद्वान पुरुषांना हे उचित आहे की आपत्तीची आशंका उत्पन्न झाल्यवर प्रथमच तिच्यापासून वाचण्याचा उपाय करावा. ॥११॥
तस्माद् गृहीत्वा वैदेहीं शरपाणिर्धनुर्धरः ।
गुहामाश्रय शैलस्य दुर्गां पादपसंकुलाम् ॥ १२ ॥
’म्हणून तू धनुष्य-बाण धारण करून वैदेही सीतेला बरोबर घेऊन पर्वताच्या वृक्षांनी आच्छादित असलेल्या त्या गुहेत निघून जा.’ ॥१२॥
प्रतिकूलितुमिच्छामि नहि वाक्यमिदं त्वया ।
शापितो मम पादाभ्यां गम्यतां वत्स मा चिरम् ॥ १३ ॥
’वत्स ! तू माझ्या या वचनाच्या प्रतिकूल काही बोलावेस अथवा करावेस हे मी इच्छित नाही. आपल्या चरणांची शपथ घेऊन सांगतो की शीघ्र निघून जा’ ॥१३॥
त्वं हि शूरश्च बलवान् हन्यां एतान् न संशयः ।
स्वयं निहन्तुमिच्छामि सर्वानेव निशाचरान् ॥ १४ ॥
’यांत संदेह नाही की तू ही बलवान आणि शूरवीर आहेस तसेच या राक्षसांचा वध करू शकतोस, तथापी मी स्वतःच या निशाचरांचा संहार करू इच्छितो.(म्हणून तू माझे सांगणे मान्य करून सीतेला सुरक्षित ठेवण्यासाठी हिला गुहेत घेऊन जा.)’ ॥१४॥
एवमुक्तस्तु रामेण लक्ष्मणः सह सीतया ।
शरानादाय चापं च गुहां दुर्गां समाश्रयत् ॥ १५ ॥
श्रीरामचंद्रांनी असे सांगितल्यावर लक्ष्मण धनुष्य-बाण घेऊन सीतेसह पर्वताच्या दुर्गम गुहेत निघून गेले. ॥१५॥
तस्मिन् प्रविष्टे तु गुहां लक्ष्मणे सह सीतया ।
हन्त निर्युक्तमित्युक्त्वा रामः कवचमाविशत् ॥ १६ ॥
सीतेसहित लक्ष्मण गुहेत निघून गेल्यावर श्रीरामचंद्रांनी ’हर्षाची गोष्ट आहे की लक्ष्मणाने तात्काळ माझे मान्य केले आणि सीतेच्या रक्षणाची समुचित व्यवस्था होऊन गेली’ असे म्हणून कवच धारण केले. ॥१६॥
स तेनाग्निनिकाशेन कवचेन विभूषितः ।
बभूव रामस्तिमिरे महानग्निरिवोत्थितः ॥ १७ ॥
प्रज्वलित अग्निसमान प्रकाशित होणार्‍या त्या कवचाने विभूषित होऊन श्रीराम अंधःकारात प्रकट झालेल्या महान अग्निदेवा प्रमाणे शोभू लागले. ॥१७॥
स चापमुद्यम्य महच्छरानादाय वीर्यवान् ।
सम्बभूवास्थितस्तत्र ज्यास्वनैः पूरयन् दिशः ॥ १८ ॥
पराक्रमी श्रीराम महान धनुष्य आणि बाण हातात घेऊन युद्धासाठी खिळून उभे राहिले आणि प्रत्यंचेच्या टंणकाराने संपूर्ण दिशा भरून टाकू लागले. ॥१८॥
ततो देवाः सगन्धर्वाः सिद्धाश्च सह चारणैः ।
समेयुश्च महात्मानो युद्धदर्शनकाङ्‌क्षया ॥ १९ ॥
त्यानंतर श्रीराम आणि राक्षसांचे युद्ध पहाण्याच्या इच्छेने देवता, गंधर्व, सिद्ध आणि चारण आदि महात्मे तेथे एकत्र होते. ॥१९॥
ऋषयश्च महात्मानो लोके ब्रह्मर्षिसत्तमाः ।
समेत्य चोचुः सहितास्तेऽन्योन्यं पुण्यकर्मणः ॥ २० ॥

स्वस्ति गोब्राह्मणानां च लोकानां चेति संस्थिताः ।
जयतां राघवो युद्धे पौलस्त्यान् रजनीचरान् ॥ २१ ॥

चक्रहस्तो यथा युद्धे सर्वानसुरपुंगवान् ।
या शिवाय जे तिन्ही लोकात प्रसिद्ध ब्रह्मर्षि शिरोमणी पुण्यकर्मा महात्मा ऋषि आहेत, ते सर्व तेथे एकत्रित आले आणि एकत्र उभे राहून ते परस्परास भेटून असे म्हणू लागले- ’गायी, ब्राह्मण आणि समस्त लोकांचे कल्याण होवो ज्याप्रमाणे चक्रधारी भगवान विष्णु युद्धात समस्त असुरांना परास्त करून टाकतात त्याप्रमाणे या संग्रामात श्रीरामचंद्र पुलस्त्यवंशी निशाचरांच्यावर विजय प्राप्त करोत.’ ॥२०-२१ १/२॥
एवमुक्त्वा पुनः प्रोचुरालोक्य च परस्परम् ॥ २२ ॥

चतुर्दश सहस्त्राणि रक्षसां भीमकर्मणाम् ।
एकश्च रामो धर्मात्मा कथं युद्धं भविष्यति ॥ २३ ॥
असे म्हणून ते पुन्हा एक दुसर्‍यांकडे पहात म्हणाले- ’एका बाजूस भयंकर कर्म करणारे चौदा हजार राक्षस आहेत आणि दुसरीकडे एकटे धर्मात्मा श्रीराम आहेत मग हे युद्ध कसे होईल ?’ ॥२२-२३॥
इति राजर्षयः सिद्धाः सगणाश्च द्विजर्षभाः ।
जातकौतूहलास्तस्थुर्विमानस्थाश्च देवताः ॥ २४ ॥
अशा गोष्टी करीत राजर्षि, सिद्ध, विद्याधर आदि देवयोनि गणासहित श्रेष्ठ ब्रह्मर्षि तसेच विमानावर स्थित झालेल्या देवता कुतूहलवश तेथे उभे राहिल्या. ॥२४॥
आविष्टं तेजसा रामं संग्रामशिरसि स्थितम् ।
दृष्ट्‍वा सर्वाणि भूतानि भयाद् विव्यथिरे तदा ॥ २५ ॥
युद्धाच्या तोंडावरच वैष्णव तेजाने आविष्ट झालेल्या श्रीरामांना पाहून त्यावेळी सर्व प्राणी (त्यांचा प्रभाव जाणत नसल्याने) भयाने व्यथित झाले. ॥२५॥
रूपमप्रतिमं तस्य रामस्याक्लिष्टकर्मणः ।
बभूव रूपं क्रुद्धस्य रुद्रस्येव महात्मनः ॥ २६ ॥
अनायासेच महान कर्म करणारे तसेच रोषाने क्रोधाविष्ट झालेले महात्मा श्रीरामांचे ते रूप कुपित झालेल्या रूद्रदेवा समान अप्रतिम प्रतीत होत होते. ॥२६॥
इति सम्भाष्यमाणे तु देवगन्धर्वचारणैः ।
ततो गम्भीरनिर्ह्रादं घोरवर्मायुधध्वजम् ॥ २७ ॥

अनीकं यातुधानानां समन्तात् प्रत्यपद्यत ।
ज्यावेळी देवता, गंधर्व आणि चारण पूर्वोक्त रूपाने श्रीरामांची मंगलकामना करीत होते, त्याच समयी भयंकर ढाळ-तलवार आदि आयुधे आणि ध्वजांनी उपलक्षित होणारी निशाचरांची ती सेना गंभीर गर्जना करीत चारी बाजूनी श्रीरामांच्या जवळ येऊन पोहोंचली. ॥२७ १/२॥
वीरालापान् विसृजतामन्योन्यमभिगच्छताम् ॥ २८ ॥

चापानि विस्फारयतां जृम्भतां चाप्यभीक्ष्णशः ।
विप्रघुष्टस्वनानां च दुन्दुभींश्चापि निघ्नताम् ॥ २९ ॥
ते राक्षस-सैनिक वीरोचित वार्तालाप करीत, युद्धाचा ढंग सांगण्यासाठी एक दुसर्‍याच्या समोर जात होते, धनुष्ये खेंचून त्यांचा टणकार करीत होते. वारंवार मदमस्त होऊन उड्या मारमारून जोरजोराने गर्जना करीत होते, आणि नगाडे वाजवीत होते. त्यांचा तो अत्यंत तुमुल नाद त्या वनांत सर्व बाजूस घुमू लागला. ॥२८-२९॥
तेषां सुतुमुलः शब्दः पूरयामास तद् वनम् ।
तेन शब्देन वित्रस्ताः श्वापदा वनचारिणः ॥ ३० ॥
त्या शब्दांनी घाबरलेले वनचारी हिंस्त्र जंतु, ज्या वनांत कुठल्याही प्रकारचा कोलाहल ऐकू येत नव्हता त्या वनात निघून गेले. ते वनजंतु भयामुळे मागे वळूनही पहात नव्हते. ॥३०॥
दुद्रुवुर्यत्र निःशब्दं पृष्ठतो नावलोकयन् ।
तच्चानीकं महावेगं रामं समनुवर्तत ॥ ३१ ॥

धृतनानाप्रहरणं गम्भीरं सागरोपमम् ।
ती सेना अत्यंत वेगाने श्रीरामांच्या कडे निघाली. तिच्यात नाना प्रकारची आयुधे धारण करणारे सैनिक होते. ती समुद्राप्रमाणे गंभीर दिसत होती. ॥३१ १/२॥
रामोऽपि चारयंश्चक्षुः सर्वतो रणपण्डितः ॥ ३२ ॥

ददर्श खरसैन्यं तद् युद्धायाभिमुखो गतः ।
युद्धकलेत पण्डित श्रीरामचंद्रांनी ही चारी बाजूस दृष्टीपात करून खराच्या सेनेचे निरीक्षण केले आणि ते युद्धासाठी त्यांच्या समोर चालू लागले. ॥३२ १/२॥
वितत्य च धनुर्भीमं तूण्याश्चोद्धृत्य सायकान् ॥ ३३ ॥

क्रोधमाहारयत् तीव्रं वधार्थं सर्वरक्षसाम् ।
दुष्प्रेक्ष्यश्चाभवत् क्रुद्धो युगान्ताग्निरिव ज्वलन् ॥ ३४ ॥
नंतर त्यांनी भात्यांतून अनेक बाण काढले आणि आपले भयंकर धनुष्य खेचून संपूर्ण राक्षसांचा वध करण्यासाठी तीव्र क्रोध प्रकट केला. कुपित झाल्यावर ते प्रलयकालीन अग्निसमान प्रज्वलित होऊ लागले. त्या समयी त्यांच्याकडे पहाणे ही कठीण झाले होते. ॥३३-३४॥
तं दृष्ट्‍वा तेजसाविष्टं प्राव्यथन् वनदेवताः ।
तस्य रुष्टस्य रूपं तु रामस्य ददृशे तदा ।
दक्षस्येव क्रतुं हन्तुमुद्यतस्य पिनाकिनः ॥ ३५ ॥
तेजाने आविष्ट झालेल्या श्रीरामांना पाहून वनातील देवता व्यथित झाल्या. त्या समयी रोषाने भरलेल्या श्रीरामांचे रूप दक्षयज्ञाचा विनाश करण्यासाठी उद्यत झालेल्या पिनाकधारी महादेवां प्रमाणे दिसून येत होते. ॥३५॥
तत्कार्मुकैराभरणै रथैश्च
तद्‌वर्मभिश्चाग्निसमानवर्णैः ।
बभूव सैन्यं पिशिताशनानां
सूर्योदये नीलमिवाभ्रजालम् ॥ ३६ ॥
धनुष्ये, आभूषणे, रथ आणि अग्निसमान कांती असलेल्या चमकणार्‍या कवचांनी युक्त ती पिशाच्चांची सेना सूर्योदय काळीच्या नील मेघांच्या समुदयाप्रमाणे प्रतीत होत होती. ॥३६॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे चतुर्विंशः सर्गः ॥ २४ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा चौविसावा सर्ग पूरा झाला. ॥२४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP