[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। एकनवतितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भरद्वाजेन ससैन्यस्य भरतस्य दिव्यः सत्कारः -
भरद्वाज मुनिंच्या द्वारा सेने सहित भरताचा दिव्य सत्कार -
कृतबुद्धिं निवासाय तत्रैव स मुनिस्तदा ।
भरतं कैकयीपुत्रमातिथ्येन न्यमन्त्रयत् ॥ १ ॥
जेव्हा भरतांनी त्या आश्रमांतच निवास करण्याचा दृढ निश्चय केला तेव्हा मुनींनी कैकेयीकुमार भरताला आपले आतिथ्य ग्रहण करण्यासाठी आमंत्रण दिले. ॥१॥
अब्रवीद्‌ भरतस्त्वेनं नन्विदं भवता कृतम् ।
पाद्यमर्घ्यमथातिथ्यं वने यदुपपद्यते ॥ २ ॥
हे ऐकून भरतांनी त्यांना म्हटले - ’ मुने ! वनात जसा आतिथ्य-सत्कार करणे सम्भव आहे तसा तर आपण पाद्य, अर्ध्य आणि फल-मूल आदि देऊन करून चुकला आहात. ’ ॥२॥
अथोवाच भरद्वाजो भरतं प्रहसन्निव ।
जाने त्वां प्रीतिसंयुक्तं तुष्येस्त्वं येन केनचित् ॥ ३ ॥
त्यांनी असे म्हटलावर भरद्वाज हसत हसत भरतांना म्हणाले- ’भरत ! मी जाणतो आहे की माझ्या प्रति तुमचे प्रेम आहे. म्हणून मी जे काही तुम्हाला देईन तेवढ्याने तुम्ही संतुष्ट होऊन जाल. ॥३॥
सेनायास्तु तवैवास्याः कर्तुमिच्छामि भोजनम् ।
मम प्रीतिर्यथारूपा त्वमर्हो मनुजर्षभ ॥ ४ ॥
’परन्तु या समयी मी तुमच्या सेनेला भोजन करवू इच्छितो. नरश्रेष्ठ ! यामुळे मला प्रसन्नता होईल आणि ज्यायोगे मला प्रसन्नता वाटेल ते कार्य तुम्ही अवश्य केले पाहिजे. ॥४॥
किमर्थं चापि निक्षिप्य दूरे बलमिहागतः ।
कस्मान्नेहोपयातोऽसि सबलः पुरुषर्षभ ॥ ५ ॥
’पुरूषप्रवर ! तुम्ही आपल्या सेनेला इतक्या दूर का सोडून येथे आला आहात, सेनेसहित येथे का आला नाहीत ?’ ॥५॥
भरतः प्रत्युवाचेदं प्राञ्जलिस्तं तपोधनम् ।
न सैन्येनोपयातोऽस्मि भगवन् भगवद्‌भयात् ॥ ६ ॥
तेव्हा भरतांनी हात जोडून त्या तपोधन मुनिना उत्तर दिले- ’भगवन ! मी आपल्याच भयाने सेनेला बरोबर घेऊन येथे आलो नाही. ॥६॥
राज्ञा च भगवन् नित्यं राजपुत्रेण वा तथा ।
यत्‍नतः परिहर्तव्या विषयेषु तपस्विनः ॥ ७ ॥
’प्रभो ! राजा आणि राजपुत्र यांनी सर्व देशात प्रयत्‍नपूर्वक तपस्वी जनांना दूर सोडून राहावयास हवे. (कारण त्यांच्या द्वारा तपस्वी जनांना कष्ट पोहोंचण्याची संभावना असते.) ॥७॥
वाजिमुख्या मनुष्याश्च मत्ताश्च वरवारणाः ।
प्रच्छाद्य भगवन् भूमिं महतीमनुयान्ति माम् ॥ ८ ॥
’भगवन ! माझ्या बरोबर बरेचसे उत्तम उत्तम घोडे, मनुष्य, मत्त गजराज आहेत; ते सर्व बर्‍याच मोठ्या भूभागाला व्यापून (आच्छादून) माझ्या मागोमाग येत आहेत. ॥८॥
ते वृक्षानुदकं भूमिमाश्रमेषूटजांस्तथा ।
न हिंस्युरिति तेनाहमेक एवागतस्ततः ॥ ९ ॥
’त्यांनी आश्रमांतील वृक्ष, जल, भूमी आणि पर्णशाला यांना हानी पोहोचवू नये म्हणून मी येथे एकटाच आलो आहे’. ॥९॥
आनीयतामितः सेनेत्याज्ञप्तः परमर्षिणा ।
तथानुचक्रे भरतः सेनायाः समुपागमम् ॥ १० ॥
त्यानंतर त्या महर्षिंनी आज्ञा दिली की ’सैन्याला येथेच घेऊन या’ तेव्हा भरतांनी सेनेला तेथे बोलावून घेतले. ॥१०॥
अग्निशालां प्रविश्याथ पीत्वापः परिमृज्य च ।
आतिथ्यस्य क्रियाहेतोर्विश्वकर्माणमाह्वयत् ॥ ११ ॥
यानंतर मुनिवर भरद्वाजांनी अग्निशालेत प्रवेश करून जलाचे आचमन केले आणि ओठ पुसून भरताच्या आतिथ्य-सत्कारासाठी विश्वकर्मा आदिंचे आवाहन केले. ॥११॥
आह्वये विश्वकर्माणमहं त्वष्टारमेव च ।
आतिथ्यं कर्तुमिच्छामि तत्र मे संविधीयताम् ॥ १२ ॥
ते म्हणाले, ’मी विश्वकर्मा त्वष्टा देवतेचे आवाहन करीत आहे. माझ्या मनात सेनेसहित भरताचा आतिथ्य-सत्कार करण्याची इच्छा झाली आहे. यात माझ्या साठी त्यांनी आवश्यक प्रबन्ध करावा. ॥१२॥
आह्वये लोकपालांस्त्रीन् देवाञ्शक्रपुरोगमान् ।
आतिथ्यं कर्तुमिच्छामि तत्र मे संविधीयताम् ॥ १३ ॥
’ज्यांचे पुढारी इन्द्र आहेत, त्या तीन लोकपालांचे (अर्थात इन्द्रासहित यम, वरूण आणि कुबेर नामक देवतांचे) मी आवाहन करीत आहे. या समयी मी भरताचा आतिथ्य- सत्कार करू इच्छितो, यात माझ्याकरिता या लोकांनी आवश्यक ती व्यवस्था करावी. ॥१३॥
प्राक्स्रोतसश्च या नद्यस्तिर्यक्स्रोतस एव च ।
पृथिव्यामन्तरिक्षे च समायान्त्वद्य सर्वशः ॥ १४ ॥
’पृथ्वी आणि आकाशात ज्या पूर्व तसेच पश्चिमेकडे प्रवाहित होणार्‍या नद्या आहेत, त्यांचेही मी आवाहन करीत आहे, त्या सर्वांनीही आज येथे यावे. ॥१४॥
अन्याः स्रवन्तु मैरेयं सुरामन्याः सुनिष्ठिताम् ।
अपराश्चोदकं शीतमिक्षुकाण्डरसोपमम् ॥ १५ ॥
’काही नद्यांनी मैरेय प्रस्तुत करावे, दुसर्‍या काहीनी उत्तम प्रकारे तैयार केलेली सुरा घेऊन यावे तसेच अन्य नद्यांनी ऊसाच्या कांडात होणार्‍या रसाप्रमाणे मधुर आणि शीतल जल तयार करून ठेवावे. ॥१५॥
आह्वये देवगन्धर्वान् विश्वावसुहहाहुहून् ।
तथैवाप्सरसो देवगन्धर्वैश्चापि सर्वशः ॥ १६ ॥
’मी विश्वावसु, हाहा आणि हुहू आदि देव गन्धर्वांचे तसेच त्यांच्या बरोबर समस्त अप्सरांचे ही आवाहन करतो. ॥१६॥
घृताचीमथ विश्वाचीं मिश्रकेशीमलम्बुषाम् ।
नागदत्तां च हेमां च सोमामद्रिकृतस्थलीम् ॥ १७ ॥
’घृताची, विश्वाची, मिश्रकेशी, अलम्बुषा, नागदत्ता, हेमा, सोमा तसेच अद्रिकृतस्थली (अथवा पर्वतावर निवास करणारी सोमा) यांचे ही मी आवाहन करतो. ॥१७॥
शक्रं याश्चोपतिष्ठन्ति ब्रह्माणं याश्च भामिनीः ।
सर्वास्तुम्बुरुणा सार्द्धमाह्वये सपरिच्छदाः ॥ १८ ॥
’ज्या अप्सरा इन्द्राच्या सभेमध्ये उपस्थित होतात, तसेच ज्या देवाङ्‌‍गना ब्रह्मदेवांच्या सेवेत जात असतात, त्या सर्वांचे मी तुम्बरू सह आवाहन करतो. त्यांनी अलङ्‌‍कार तसेच नृत्यागीतासाठी अपेक्षित अन्यान्य उपकरणांसह येथे यावे. ॥१८॥
वनं कुरुषु यद् दिव्यं वासोभूषणपत्रवत् ।
दिव्यनारीफलं शश्वत् तत्कौबेरमिहैव तु ॥ १९ ॥
’उत्तर कुरूवर्षामध्ये जे दिव्य चैत्ररथ नामक वन आहे, ज्याच्यात दिव्यवस्त्रे आणि आभूषणे ही वृक्षांची पाने आहेत आणि दिव्य नारी हीच फळे आहेत, कुबेराचे ते सनातन दिव्य वन ही येथे येवो. ॥१९॥
इह मे भगवान् सोमो विधत्तामन्नमुत्तमम् ।
भक्ष्यं भोज्यं च चोष्यं च लेह्यं च विविधं बहु ॥ २० ॥
’येथे भगवान सोम माझ्या अतिथिंसाठी उत्तम अन्न, नानाप्रकारचे भक्ष्य, भोज्य, लेह्य आणि चोष्य पदार्थांची प्रचुर मात्रेत व्यवस्था करोत. ॥२०॥
विचित्राणि च माल्यानि पादपप्रच्युतानि च ।
सुरादीनि च पेयानि मांसानि विविधानि च ॥ २१ ॥
’वृक्षापासून तात्काळ निवडलेली नानाप्रकारची पुष्पे, मधु आदि पेय पदार्थ तसे नाना प्रकारच्या फळांचे गरही भगवान सोम येथे प्रस्तुत करोत.’ ॥२१॥
एवं समाधिना युक्तः तेजसाऽप्रतिमेन च ।
शीक्षास्वरसमायुक्तं सुव्रतश्चाब्रवीन्मुनिः ॥ २२ ॥
याप्रकारे उत्तम व्रताचे पालन करणार्‍या भरद्वाज मुनिंनी एकाग्रचित्त आणि अनुपम तेजांनी सम्पन्न होऊन शिक्षा (शिक्षा शास्त्रात सांगितला जाणारी उच्चारण विधी) आणि व्याकरण (शास्त्रोक्त प्रकृती - प्रत्यय) सम्बन्धी स्वराने युक्त वाणिमध्ये या सर्वांचे आवाहन केले. ॥२२॥
मनसा ध्यायतस्तस्य प्राङ्‌मुखस्य कृताञ्जलेः ।
आजग्मुस्तानि सर्वाणि दैवतानि पृथक् पृथक् ॥ २३ ॥
याप्रकारे आवाहन करून मुनि पुर्वाभिमुख होऊन हात जोडून मनातल्या मनात ध्यान करू लागले. त्यांनी स्मरण करताच त्या सर्व देवता एकेक करून तेथे येऊन पोहोंचल्या. ॥२३॥
मलयं दर्दुरं चैव ततः स्वेदनुदोऽनिलः ।
उपस्पृश्य ववौ युक्त्या सुप्रियात्मा सुखः शिवः ॥ २४ ॥
मग तर तेथे मलय आणि दर्दुर नामक पर्वतांचा स्पर्श करून वाहणारा अत्यन्त प्रिय आणि सुखदायक वारा मंद मंद वाहू लागला ज्याच्या केवळ स्पर्शाने शरीरावरील घाम सुकून जात होता. ॥२४॥
ततोऽभ्यवर्षन्त घना दिव्याः कुसुमवृष्टयः ।
दिव्यदुन्दुभिघोषश्च दिक्षु सर्वासु शुश्रुवे ॥ २५ ॥
तत्पश्चात मेघगण दिव्य पुष्पांची वृष्टी करू लागले. संपूर्ण दिशांमध्ये देवतांच्या दुंदुभिचा मधुर शब्द ऐकू येऊ लागला. ॥२५॥
प्रववुश्चोत्तमा वाता ननृतुश्चाप्सरोगणाः ।
प्रजगुर्देवगन्धर्वा वीणाः प्रमुमुचुः स्वरान् ॥ २६ ॥
उत्तम वारा वाहू लागला. अप्सरांच्या समुदायांचे नृत्य होऊ लागले. देव गन्धर्व गाऊ लागले आणि सर्वत्र वीणांच्या स्वरलहरी पसरू लागल्या. ॥२६॥
स शब्दो द्यां च भूमिं च प्राणिनां श्रवणानि च ।
विवेशोच्चावचः श्लक्ष्णः समो लयगुणान्वितः ॥ २७ ॥
संगीताचा तो शब्द पृथ्वी, आकाश आणि प्राण्यांच्या कानांत गुंजत राहिला. आरोह- अवरोहने युक्त तो शब्द कोमल आणि मधुर होता, समतालाने विशिष्ट आणि लयगुणाने सम्पन्न होता. ॥२७॥
तस्मिन्नेवंगते शब्दे दिव्ये श्रोत्रसुखे नृणाम् ।
ददर्श भारतं सैन्यं विधानं विश्वकर्मणः ॥ २८ ॥
याप्रकारे मनुष्याच्या कानांना सुख देणारा तो दिव्य शब्द होतच होता की इतक्यात भरताच्या सैन्याला विश्वकर्माचे निर्माण कौशल्य दिसून आले. ॥२८॥
बभूव हि समा भूमिः समन्तात् पञ्चयोजनम् ।
शाद्वलैर्बहुभिश्छन्ना नीलवैदूर्यसन्निभैः ॥ २९ ॥
चारी बाजूस पाच योजनेपर्यंतची भूमी समतल होऊन गेली. तिच्यावर नीलम आणि वैडूर्य मण्याप्रमाणे नाना प्रकारचे घनदाट गवत सर्वत्र पसरले होते. ॥२९॥
तस्मिन् बिल्वाः कपित्थाश्च पनसा बीजपूरकाः ।
आमलक्यो बभूवुश्च चूताश्च फलभूषिताः ॥ ३० ॥
जागोजागी बेल, कैत्थ, फणस, आवळा, चून आणि आंब्याचे वृक्ष लागलेले होते जे फलांनी सुशोभित होते. ॥३०॥
उत्तरेभ्यः कुरुभ्यश्च वनं दिव्योपभोगवत् ।
आजगाम नदी सौम्या तीरजैर्बहुभिर्वृता ॥ ३१ ॥
उत्तर कुरूवर्षातून दिव्य भोगसामग्रीनी संपन्न चैत्ररथ नामक वन तेथे आले. त्याच बरोबर तेथील रमणीय नद्याही ज्या बहुसंख्य तटवर्ती वृक्षांनी घेरलेल्या होत्या त्याही तेथे येऊन पोहोचल्या. ॥३१॥
चतुःशालानि शुभ्राणि शालाश्च गजवाजिनाम् ।
हर्म्यप्रासादसंयुक्ततोरणानि शुभानि च ॥ ३२ ॥
उज्ज्वल, चार चार खोल्यानी युक्त गृहे (अथवा गृहयुक्त चबुतरे) तैयार झाली. हत्ती आणि घोडे राहण्यासाठी शाळा (पागा) तयार झाल्या. अट्टालिका तसेच सातमजली महालांनी युक्त सुंदर नगरद्वारही निर्माण झाले. ॥३२॥
सितमेघनिभं चापि राजवेश्म सुतोरणम् ।
दिव्यमाल्यकृताकारं दिव्यगन्धसमुक्षितम् ॥ ३३ ॥
राजपरिवारासाठी बनविलेले सुंदर द्वारांनी युक्त भवन श्वेत मेघाप्रमाणे शोभत होते. त्याला पांढर्‍या फुलांच्या माळांनी सजविलेले होते आणि दिव्य सुगन्धित जलाचे सिंचन केलेले होते. ॥३३॥
चतुरस्रमसम्बाधं शयनासनयानवत् ।
दिव्यैः सर्वरसैर्युक्तं दिव्यभोजनवस्त्रवत् ॥ ३४ ॥
तो महाल चौकोनी आणि खूपच मोठा होता - त्यात कुठेही संकीर्णतेचा अनुभव येत नव्हता. त्यात झोपण्यासाठी, बसण्यासाठी आणि वाहनांना राहण्यासाठी वेगवेगळी स्थाने होती. तेथे सर्व प्रकारचे दिव्य रस, दिव्य भोजन आणि दिव्य वस्त्रे प्रस्तुत होती. ॥३४॥
उपकल्पितसर्वान्नं धौतनिर्मलभाजनम् ।
क्लृप्तसर्वासनं श्रीमत्स्वास्तीर्णशयनोत्तमम् ॥ ३५ ॥
सर्व प्रकारचे अन्न आणि धुतलेली स्वच्छ पात्रे ठेवलेली होती. त्या सुंदर भवनात काही ठिकाणी बसण्यासाठी सर्व प्रकारची आसने उपस्थित होती आणि काही ठिकाणी झोपण्यासाठी सुंदर शय्या पसरलेल्या होत्या. ॥३५॥
प्रविवेश महाबाहुरनुज्ञातो महर्षिणा ।
वेश्म तद्‌ रत्‍नसम्पूर्णं भरतः कैकयीसुतः ॥ ३६ ॥

अनुजग्मुश्च ते सर्वे मन्त्रिणः सपुरोहिताः ।
बभूवुश्च मुदा युक्तास्तं दृष्ट्‍वा वेश्मसंविधिम् ॥ ३७ ॥
महर्षि भरद्वाजांच्या आज्ञेने कैकेयीपुत्र महाबाहु भरतांनी नाना प्रकारच्या रत्‍नांनी भरलेल्या त्या महालात प्रवेश केला. त्यांच्या बरोबरच पुरोहित आणि मन्त्री ही त्यात गेले. त्या भवनाचे निर्माण कौशल्य पाहून त्या सर्व लोकांना फार प्रसन्नता वाटली. ॥३६-३७॥
तत्र राजासनं दिव्यं व्यजनं छत्रमेव च ।
भरतो मन्त्रिभिः सार्धमभ्यवर्तत राजवत् ॥ ३८ ॥
त्या भवनात भरतांनी दिव्य राजसिंहासन, चवरी आणि छ्त्र पाहिले. तसेच तेथे राजा श्रीरामांची भावना करुन मंत्र्यांसह त्यांनी त्या समस्त राजभोग्य वस्तूंची परिक्रमा केली. ॥३८॥
आसनं पूजयामास रामायाभिप्रणम्य च ।
वालव्यजनमादाय न्यषीदत् सचिवासने ॥ ३९ ॥
सिंहासनावर श्रीरामचन्द्र महाराज विराजमान आहेत अशी धारणा बनवून त्यांनी श्रीरामांना प्रणाम केला आणि त्या सिंहासनाची पूजाही केली. नंतर आपल्या हातात चवरी घेऊन ते मन्त्राच्या आसनावर जाऊन बसले. ॥३९॥
आनुपूर्व्यान्निषेदुश्च सर्वे मन्त्रिपुरोहिताः ।
ततः सेनापतिः पश्चात् प्रशास्ता च न्यषीदत ॥ ४० ॥
त्यानंतर पुरोहित आणि मन्त्रीही क्रमश: आपल्या योग्य आसनावर बसले, नंतर सेनापती आणि प्रशास्ता (छावणीचे रक्षण करणारे) ही बसून गेले. ॥४०॥
ततस्तत्र मुहूर्तेन नद्यः पायसकर्दमाः ।
उपातिष्ठन्त भरतं भरद्वाजस्य शासनात् ॥ ४१ ॥
त्यानंतर मुहूर्तभरातच भरद्वाज मुनींच्या आज्ञेने भरतांच्या सेवेत नद्या उपस्थित झाल्या, ज्यांच्यामध्ये चिखलाच्या जागी खीर भरलेली होती. ॥४१॥
आसामुभयतःकूलं पाण्डुमृत्तिकलेपनाः ।
रम्याश्चावसथा दिव्या ब्राह्मणस्य प्रसादजाः ॥ ४२ ॥
त्या नद्यांच्या दोन्ही तटावर ब्रह्मर्षि भरद्वाजांच्या कृपेने दिव्य आणि रमणीय भवने प्रकट झाली जी चुन्यांनी लिंपलेली होती. ॥४२॥
तेनैव च मुहूर्तेन दिव्याभरणभूषिताः ।
आगुर्विंशतिसाहस्राः ब्रह्मणा प्रहिताः स्त्रियः ॥ ४३ ॥
त्याच मुहूर्तामध्ये ब्रह्मदैवांनी पाठवलेल्या दिव्य आभूषणांनी विभूषित वीस हजार दिव्याङ्‌‍गना तेथे आल्या. ॥४३॥
सुवर्णमणिमुक्तेन प्रवालेन च शोभिताः ।
आगुर्विंशतिसाहस्राः कुबेरप्रहिताः स्त्रियः ॥ ४४ ॥

याभिर्गृहीतः पुरुषः सोन्माद इव लक्ष्यते ।
याच प्रकारे सुवर्ण, मणि, मुक्ता आणि पोवळ्यांच्या आभूषणांनी सुशोभित कुबेरांनी पाठवलेल्या वीस हजार दिव्य महिला तेथे उपस्थित झाल्या, ज्यांचा स्पर्श होताच पुरूष उन्मादग्रस्त झाल्याप्रमाणे दिसू लागतो. ॥४४-१/२॥
आगुर्विंशतिसाहस्रा नन्दनादप्सरोगणाः ॥ ४५ ॥

नारदस्तुम्बुरुर्गोपः प्रवराः सूर्यवर्चसः ।
एते गन्धर्वराजानो भरतस्याग्रतो जगुः ॥ ४६ ॥
त्याशिवाय नन्दन वनातून वीस हजार अप्सराही आल्या. नारद, तुंबरू आणि गोप आपल्या कान्तीने सूर्याप्रमाणे प्रकाशीत होत होते. हे तीन्ही गन्धर्व राज भरतासमोर गीत गाऊ लागले. ॥४५-४६॥
अलम्बुषा मिश्रकेशी पुण्डरीकाथ वामना ।
उपानृत्यन्त भरतं भरद्वाजस्य शासनात् ॥ ४७ ॥
अलम्बुषा, मिश्रकेशी, पुण्डरिका आणि वामनार्‍या या चार अप्सरा भरद्वाज मुनींच्या आज्ञेने भरताच्या समीप नृत्य करू लागल्या. ॥४७॥
यानि माल्यानि देवेषु यानि चैत्ररथे वने ।
प्रयागे तान्यदृश्यन्त भरद्वाजस्य तेजसा ॥ ४८ ॥
जी फुले देवतांच्या उद्यानात आणि जी चैत्ररथ वनात असतात ती महर्षि भरद्वाजांच्या प्रतापाने प्रयागात दिसून येऊ लागली. ॥४८॥
बिल्वा मार्दङ्‌गिका आसञ्शम्याग्राहा बिभीतकाः ।
अश्वत्था नर्तकाश्चासन् भरद्वाजस्य तेजसा ॥ ४९ ॥
भरद्वाज मुनींच्या तेजाने बेलाचे वृक्ष मृदङ्‌‍ग वाजवू लागले, बेहेड्याचे वृक्ष शम्या नामक ताल देऊ लागले आणि पिंपळाचे वृक्ष तेथे नृत्य करीत होते. ॥४९॥
ततः सरलतालाश्च तिलका सतमालकाः ।
प्रहृष्टास्तत्र सम्पेतुः कुब्जा भूत्वाथ वामनाः ॥ ५० ॥
तद्‌नंतर देवदार, ताल, तिलक आणि तमाल नामक वृक्ष कुबडे आणि ठेंगू बनून मोठ्या हर्षाने भरताच्या सेवेत उपस्थित झाले. ॥५०॥
शिंशपाऽऽमलकी जम्बूर्याश्चान्याः कानने लताः ।
मालती मल्लिका जातिर्याश्चान्याः कानने लताः ।
प्रमदाविग्रहं कृत्वा भरद्वाजाश्रमेऽवसन् ॥ ५१ ॥
शिंशपा, आमलकी आणि जम्बू आदि स्त्रीलिंगी वृक्ष तसेच मालती, मल्लिका आणि जाति आदि वनाच्या लता नारीचे रूप धारण करून भरद्वाज मुनिंच्या आश्रमात आल्या. ॥५१॥
सुरां सुरापाः पिबत पायसं च बुभुक्षिताः ।
मांसानि च सुमेध्यानि भक्ष्यन्तां यो यदिच्छति ॥ ५२ ॥
(त्या भरताच्या सैनिकांना हाका मारून मारून म्हणू लागल्या- ) ’मधुचे पान करण्यार्‍या लोकांनो ! घ्या घ्या मधुचे पान करा ! तुमच्यापैकी ज्यांना भूक लागली असेल ते सर्व लोकही खीर खा आणि परम पवित्र फळांचा गरही प्रस्तुत आहे, त्यांचे आस्वादन करा. ज्यांची जी इच्छा असेल त्यांनी त्याप्रमाणे भोजन करावे.’ ॥५२॥
उच्छोद्य स्नापयन्ति स्म नदीतीरेषु वल्गुषु ।
अप्येकमेकं पुरुषं प्रमदाः सप्त चाष्ट च ॥ ५३ ॥
सात- आठ तरूण स्त्रिया मिळून एकेका पुरूषाला नदीच्या मनोहर तटावर उटणी लावून लावून न्हाऊ घालीत होत्या. ॥५३॥
संवाहन्त्यः समापेतुर्नार्यो विपुललोचनाः ।
परिमृज्य तथान्योन्यं पाययन्ति वराङ्‌ग्नाः ॥ ५४ ॥
मोठे मोठे नेत्र असलेल्या सुन्दर रमणी अतिथिंचे पाय चेपून देण्यासाठी आलेल्या होत्या. त्या त्यांची भिजलेली अङ्‌‍गे वस्त्रांनी पुसून त्यांना शुद्ध वस्त्रे धारण करवून त्यांना स्वादिष्ट पेये (दूध आदि) पाजत होत्या. ॥५४॥
हयान् गजान् खरानुष्ट्रांस्तथैव सुरभेः सुतान् ।
अभोजयन् वाहनपास्तेषां भोज्यं यथाविधि ॥ ५५ ॥
त्यानंतर भिन्न भिन्न वाहनांचे रक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या मनुष्यांनी हत्ती, घोडे, ऊंट आणि बैल यांना उत्तम प्रकारे दाणा गवत चारा आदिंचे भोजन करविले. ॥५५॥
इक्षूंश्च मधुलाजांश्च भोजयन्ति स्म वाहनान् ।
इक्ष्वाकुवरयोधानां चोदयन्तो महाबलाः ॥ ५६ ॥
इक्ष्वाकु कुलातील श्रेष्ठ योद्ध्यांच्या स्वारीसाठी उपयोग येणार्‍या वाहनांना ते महाबली वाहन-रक्षक (ज्यांना महर्षिंनी सेवेसाठी नियुक्त केलेले होते) प्रेरणा देऊन देऊन त्यांना ऊसाचे तुकडे आणि मधुमिश्रित लाह्या खाऊ घालत होते. ॥५६॥
नाश्वबन्धोऽश्वमाजानान्न गजं कुञ्जरग्रहः ।
मत्तप्रमत्तमुदिता सा चमूस्तत्र सम्बभौ ॥ ५७ ॥
घोडे बांधणार्‍या मोतद्दारांना आपल्या घोड्यांचा आणि हत्तीवाल्यांना आपल्या हत्तींचा काही पत्ताच नव्हता. सर्व सेना तेथे मत्त-प्रमत्त आणि आनन्दमग्न झालेली प्रतीत होत होती. ॥५७॥
तर्पिताः सर्वकामैश्च रक्तचन्दनरूषिताः ।
अप्सरोगणसंयुक्ताः सैन्या वाचमुदीरयन् ॥ ५८ ॥
सम्पूर्ण मनोवाञ्छित पदार्थांनी तृप्त होऊन लाल चन्दनांनी चर्चित झालेले सैनिक अप्सरांचा संयोग प्राप्त झाल्याने पुढील प्रमाणे बोलू लागले - ॥५८॥
नैवायोध्यां गमिष्यामो न गमिष्याम दण्डकान् ।
कुशलं भरतस्यास्तु रामस्यास्तु तथा सुखम् ॥ ५९ ॥
’आता आम्ही अयोध्येत जाणार नाही, दण्डकारण्यात ही जाणार नाही. भरत सकुशल राहो ! (ज्याच्यामुळे आम्हांला या भूतलावर स्वर्गाचे सुख मिळाले आहे) तसेच श्रीरामचन्द्रही सुखी राहोत.’ (ज्यांच्या दर्शनासाठी आल्यावर आम्हाला या दिव्य सुखाची प्राप्ती झाली आहे.) ॥५९॥
इति पादातयोधाश्च हस्त्यश्वारोहबन्धकाः ।
अनाथास्तं विधिं लब्ध्वा वाचमेतामुदीरयन् ॥ ६० ॥
याप्रकारे पायदळांतील सैनिक तसेच ह्त्तीस्वार आणि घोडेस्वार (गजदळ आणि घोडदळातील सैनिक) आणि मोतद्दार आणि माहूत आदि सर्व तो सत्कार प्राप्त झाल्याने स्वच्छन्द होऊन याप्रमाणे गोष्टी बोलू लागले. ॥६०॥
सम्प्रहृष्टा विनेदुस्ते नरास्तत्र सहस्रशः ।
भरतस्यानुयातारः स्वर्गोऽयमिति चाब्रुवन् ॥ ६१ ॥
भरता बरोबर आलेले हजारो लोक तेथील वैभव पाहून हर्षाने जणु भान विसरले आणि जोर जोराने म्हणू लागले - ’हे स्थान स्वर्ग(च) आहे.’ ॥६१॥
नृत्यन्तश्च हसन्तश्च गायन्त्यश्चैव सैनिकाः ।
समन्तात् परिधावन्तो माल्योपेताः सहस्रशः ॥ ६२ ॥
हजारो सैनिक फुलांचे हार घालून नाचू लागले, हसू लागले आणि गात गात सर्वत्र धावू लागले, हिंडू लागले. ॥६२॥
ततो भुक्तवतां तेषां तदन्नममृतोपमम् ।
दिव्यानुद्वीक्ष्य भक्ष्यांस्तानभवद्‌ भक्षणे मतिः ॥ ६३ ॥
त्या अमृतासमान स्वादिष्ट अन्नाचे भोजन करून चुकल्यावरही त्या दिव्य भक्ष्य पदार्थांना पाहून त्यांना पुन्हा भोजन करण्याची इच्छा होत होती. ॥६३॥
प्रेष्याश्चेष्ट्यश्च वध्वश्च बलस्थाश्चापि सर्वशः ।
बभूवुस्ते भृशं प्रीताः सर्वे चाहतवाससः ॥ ६४ ॥
दास, दासी, सैनिकांच्या स्त्रिया आणि सैनिक सर्वच्या सर्व नूतन वस्त्रे धारण करून सर्व प्रकारे अत्यन्त प्रसन्न होऊन गेले होते. ॥६४॥
कुञ्जराश्च खरोष्ट्राश्च गोऽश्वाश्च मृगपक्षिणः ।
बभूवुः सुभृतास्तत्र नातो ह्यन्यमकल्पयत् ॥ ६५ ॥
हत्ती, घोडे, गाढवे, ऊंट, बैल, मृग तसेच पक्षीही तेथे पूर्ण तृप्त होऊन गेले होते, म्हणून कुणीही दुसर्‍या कुठल्याही गोष्टीची इच्छा करीत नव्हते. ॥६५॥
नाशुक्लवासास्तत्रासीत् क्षुधितो मलिनोऽपि वा ।
रजसा ध्वस्तकेशो वा नरः कश्चिददृश्यत ॥ ६६ ॥
त्यासमयी तेथे कुणी ही मनुष्य असा दिसून येत नव्हता की ज्याचे कपडे सफेद नाहीत, किंवा जो भुकेला आहे अथवा मलिन राहून गेला आहे अथवा ज्याचे केस धुळीने धुसरित झालेले आहेत. ॥६६॥
आजैश्चापि च वाराहैर्निष्ठानवरसञ्चयैः ।
फलनिर्यूहसंसिद्धैः सूपैर्गन्धरसान्वितैः ॥ ६७ ॥

पुष्पध्वजवतीः पूर्णाः शुक्लस्यान्नस्य चाभितः ।
ददृशुर्विस्मितास्तत्र नरा लौहीः सहस्रशः ॥ ६८ ॥
अजवाइन मिसळून बनविले गेलेल्या, वराही कंदापासून तयार केलेल्या, तसेच आंबा आदि फळांच्या गरम केलेल्या रसात शिजविलेल्या उत्तम व्यंजनांचे संग्रह, सुगंधयुक्त रसयुक्त डाळी, आणि श्वेत वर्णाच्या भातांनी भरलेली हजारो सुवर्णादि पात्रे तेथे सर्व बाजूस ठेवलेली होती, ज्यांना फुलांच्या ध्वजांनी सजविले गेले होते. भरतांच्या बरोबर आलेल्या सर्व लोकांनी त्या पात्रांना आश्चर्यचकित होऊन पाहिले. ॥ ६७-६८ ॥
बभूवुर्वनपार्श्वेषु कूपाः पायसकर्दमाः ।
ताश्च कामदुघा गावो द्रुमाश्चासन् मधुच्युतः ॥ ६९ ॥
वनाच्या आसपास जितक्या विहिरी होत्या त्या सर्वांत उत्तम स्वादिष्ट खीर भरलेली होती. तेथील गायी कामधेनु (सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करणार्‍या) झालेल्या होत्या, आणि त्या दिव्य वनातील वृक्ष मधाची वृष्टि करीत होते ॥ ६९॥
वाप्यो मैरेयपूर्णाश्च मृष्टमांसचयैर्वृताः ।
प्रतप्तपिठरैश्चापि मार्गमायूरकौक्कुटैः ॥ ७० ॥
भरताच्या सैन्यात आलेल्या निषाद आणि निम्नवर्गातील लोकांच्या तृप्तीसाठी तेथे मधुने भरलेल्या विहिरी प्रकट झाल्या तसेच त्यांच्या तटावर तापलेल्या पिठरात (कुण्डात) शिजविलेले मृग, मोर आणि कोंबड्यांच्या स्वच्छ मांसाचेही ढीगच्या ढीग ठेवले गेले होते ॥ ७० ॥
पात्रीणां च सहस्राणि स्थालीनां नियुतानि च ।
न्यर्बुदानि च पात्राणि शातकुम्भमयानि च ॥ ७१ ॥
तेथे हजारो सोन्याची अन्नपात्रे, लाखो व्यञ्जन पात्रे आणि जवळ जवळ एक अब्ज थाळ्यांचा संग्रह केलेला होता. ॥ ७१ ॥
स्थाल्यः कुम्भ्यः करम्भ्यश्च दधिपूर्णाः सुसंस्कृताः ।
यौवनस्थस्य गौरस्य कपित्थस्य सुगन्धिनः ॥ ७२ ॥

ह्रदाः पूर्णा रसालस्य दध्नः श्वेतस्य चापरे ।
बभूवुः पायसस्यान्ये शर्करायाश्च सञ्चयाः ॥ ७३ ॥
पिठर (कुण्ड) , लहान लहान घडे तसे मटके दह्यांनी भरलेले होते आणि त्यात दह्याला सुस्वादु बनविण्यासाठी सुंठ आणि मसाले घातलेले होते. एका प्रहरापूर्वीच तयार केलेले केशर मिश्रित पीत वर्णाचे सुगंधित ताकाचे काही तलाव भरलेले होते. जिरे आदि मिसळलेले रसाळ तक्र, सफेद दही तसेच दुधाचीही काही कुण्डे पृथक पृथक भरलेली होती. साखरेचे कित्येक ढीग लागलेले होते. ॥ ७२-७३ ॥
कल्कांश्चूर्णकषायांश्च स्नानानि विविधानि च ।
ददृशुर्भाजनस्थानि तीर्थेषु सरितां नराः ॥ ७४ ॥
स्नान करणार्‍या मनुष्यांना नदीच्या तटावर भिन्न भिन्न पात्रात वाटलेले आवळे, सुगंधित चूर्ण तसेच आणखी ही नाना प्रकारचे स्नानोपयोगी पदार्थ दिसून येत होते. ॥ ७४ ॥
शुक्लानंशुमतश्चापि दन्तधावनसञ्चयान् ।
शुक्लांश्चन्दनकल्कांश्च समुद्रेष्ववतिष्ठतः ॥ ७५ ॥
त्याबरोबरच दातवणांचे ढीगच्या ढीग, जे सफेद कूंचे असणारे होते, तेथे ठेवलेले होते. संपुटात उगाळलेले सफेद चंदन विद्यमान होते. या सर्व वस्तूंना लोकांनी पाहिले. ॥ ७५ ॥
दर्पणान् परिमृष्टांश्च वाससां चापि सञ्चयान् ।
पादुकोपानहं चैव युग्मान्यत्र सहस्रशः ॥ ७६ ॥
इतकेच नव्हे तर तेथे बरेचसे दर्पण, वस्त्रांचे ढीगच्या ढीग आणि हजारो खडावांचे जोड आणि (चपलाही) जोडेही दिसून येत होते. ॥ ७६ ॥
आञ्जनीः कङ्‌तान् कूर्चांश्छस्त्राणि च धनूंषि च ।
मर्मत्राणानि चित्राणि शयनान्यासनानि च ॥ ७७ ॥
काजळांसहित काजळाच्या डब्या, कंगवे, कूर्च (ब्रश), छत्र, धनुष्ये, मर्मस्थानांचे रक्षण करणारी कवचे (चिलखते) आदि तसेच विचित्र शय्या आणि आसने ही तेथे दृष्टिगोचर होत होती. ॥ ७७ ॥
प्रतिपानह्रदान् पूर्णान् खरोष्ट्रगजवाजिनाम् ।
अवगाह्यसुतीर्थांश्च ह्रदान् सोत्पलपुष्करान् ।
आकाशवर्णप्रतिमान् स्वच्छतोयान् सुखोप्लवान् ॥ ७८ ॥
गाढवे, ऊंट, हत्ती आणि घोडे यांना पाणी पिण्यासाठी काही जलाशय भरलेले होते, ज्यांचे घाट खूप सुंदर होते आणि सुखपूर्वक उतरण्यास योग्य होते. त्या जलाशयात कमळे आणि उत्पले शोभून दिसत होती. त्यांचे जल आकाशाप्रमाणे स्वच्छ होते तसेच त्यात सुखपूर्वक पोहता येणे शक्य होते. ॥ ७८ ॥
नीलवैदूर्यवर्णांश्च मृदून् यवससञ्चयान् ।
निर्वापार्थं पशूनां ते ददृशुस्तत्र सर्वशः ॥ ७९ ॥
पशुंना खाण्यासाठी तेथे सर्व बाजूस वैडूर्य मण्याच्या रंगाचे हिरवेगार आणि कोमल गवताचे ढीगच्या ढीग लागलेले होते. त्या सर्व लोकांनी त्या सर्व वस्तु पाहिल्या. ॥ ७९ ॥
व्यस्मयन्त मनुष्यास्ते स्वप्नकल्पं तदद्‌भुतम् ।
दृष्ट्‍वाऽऽतिथ्यं कृतं तादृक् भरतस्य महर्षिणा ॥ ८० ॥
महर्षि भरद्वाजांच्या द्वारे सेनेसहित भरताचे केले गेलेले ते अनिर्वचनीय आतिथ्य-सत्कार अद्‌भूत आणि स्वप्नासमान होते. तो पाहून ती सर्व माणसे आश्चर्यचकित होऊन गेली. ॥ ८० ॥
इत्येवं रममाणानां देवानामिव नन्दने ।
भरद्वाजाश्रमे रम्ये सा रात्रिर्व्यत्यवर्तत ॥ ८१ ॥
ज्या प्रमाणे देवता नंदनवनात विहार करतात त्याप्रमाणे भरद्वाज मुनिंच्या रमणीय आश्रमात यथेष्ट क्रीडा-विहार करीत त्या लोकांची ती रात्र फार सुखात गेली. ॥ ८१ ॥
प्रतिजग्मुश्च ता नद्यो गन्धर्वाश्च यथागतम् ।
भरद्वाजमनुज्ञाप्य ताश्च सर्वा वराङ्‌गनाः ॥ ८२ ॥
तत्पश्चात नद्या, गंधर्व आणि समस्त सुंदर अप्सरा भरद्वाजांची आज्ञा घेऊन जशा आल्या होत्या त्याप्रकारेच सर्व परत गेल्या. ॥ ८२ ॥
तथैव मत्ता मदिरोत्कटा नरा-
    स्तथैव दिव्यागुरुचन्दनोक्षिताः ।
तथैव दिव्या विविधाः स्रगुत्तमाः
    पृथग्विकीर्णा मनुजैः प्रमर्दिताः ॥ ८३ ॥
सकाळ झाल्यावरही लोक त्याचप्रकारे मधुपानाने मत्त आणि उन्मत्त दिसून येत होते. त्यांच्या अंगावर दिव्य अगुरयुक्त चंदनाचा लेप जसाच्या तसाच दृष्टिगोचर होत होता. मनुष्यांनी उपभोगात आणले गेलेले नाना प्रकारचे दिव्य पुष्पहारही त्याच अवस्थेत पृथक पृथक विखरून पडलेले होते. ॥ ८३ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे एकनवतितमः सर्गः ॥ ९१ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यंतील अयोध्या काण्डाचा एक्याण्णवावा सर्ग पूरा झाला ॥ ९१ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP