इन्द्रप्रहितं रथमारूढस्य रामस्य रावणेन सह युद्धम् -
|
इंद्रांनी धाडलेल्या रथावर बसून श्रीरामांनी रावणाबरोबर युद्ध करणे -
|
लक्ष्मणेन तु तद् वाक्यं उक्तं श्रुत्वा स राघवः । सन्दधे परवीरघ्नो धनुरादाय वीर्यवान् ।। १ ।।
|
लक्ष्मणांनी सांगितलेली ती गोष्ट ऐकून शत्रूवीरांचा संहार करणार्या पराक्रमी राघवांनी धनुष्य घेऊन त्यावर बाणांचे संधान केले. ॥१॥
|
रावणाय शरान् घोरान् विससर्ज चमूमुखे । अथान्यं रथमास्थाय रावणो राक्षसाधिपः ।। २ ।।
अभ्यधावत काकुत्स्थं स्वर्भानुरिव भास्करम् ।
|
त्यांनी सेनेच्या तोंडाशी असलेल्या रावणाला लक्ष्य करून ते भयंकर बाण सोडावयास आरंभ केला. इतक्यात राक्षसराज रावणही दुसर्या रथावर स्वार होऊन जसा राहू सूर्यावर आक्रमण करतो तसा काकुत्स्थ श्रीरामांवर चढाई करून आला. ॥२ १/२॥
|
दशग्रीवो रथस्थस्तु रामं वज्रोपमैः शरैः । आजघान महाघोरैः धाराभिरिव तोयदः ।। ३ ।।
|
दशमुख रावण रथावर बसलेला होता. तो आपल्या वज्रोपम बाणांच्या द्वारा जसे मेघ एखाद्या महान् पर्वतावर जलाची धारावाहिक वृष्टि करतो त्याप्रमाणे श्रीरामांवर बाणांची वृष्टि करून त्यांना विंधू लागला. ॥३॥
|
दीप्तपावक सङ्काशैः शरैः काञ्चनभूषणैः । अभ्यवर्षद् रणे रामो दशग्रीवं समाहितः ।। ४ ।।
|
श्रीरामही एकाग्रचित्त होऊन रणभूमीवर दशमुख रावणावर प्रज्वलित अग्निसमान तेजस्वी सुवर्णभूषित बाणांची वृष्टि करू लागले. ॥४॥
|
भूमौ स्थितस्य रामस्य रथस्थस्य च रक्षसः । न समं युद्धमित्याहुः देवगन्धर्वकिंनराः ।। ५ ।।
|
श्रीराम भूमिवर उभे आहेत आणि तो राक्षस रथावर बसलेला आहे अशा स्थितिमध्ये त्या दोघांचे युद्ध होणे बरोबर नाही. याप्रकारे तेथे आकाशांत उभे असलेल्या देवता, गंधर्व आणि किन्नर बोलू लागले. ॥५॥
|
ततो देववरः श्रीमान् श्रुत्वा तेषां वचनोऽमृतम् । आहूय मातलिं शक्रो वचनं चेदमब्रवीत् ॥ ६ ॥
|
त्यांची ती अमृताप्रमाणे मधुर बोलणी ऐकून तेजस्वी देवराज इंद्रांनी मातलिला बोलावून सांगितले - ॥६॥
|
रथेन मम भूमिष्ठं शीघ्रं याहि रघूत्तमम् । आहूय भूतलं यातः कुरु देवहितं महत् ॥ ७ ॥
|
सारथे ! रघूत्तम राम भूमिवर उभे आहेत. माझा रथ घेऊन तू शीघ्र त्यांच्या जवळ जा. भूतलावर पोहोंचून श्रीरामांना बोलावून सांग की - हा रथ देवराजांनी आपल्या सेवेसाठी धाडला आहे. याप्रकारे त्यांना रथावर बसवून तू देवतांच्या हिताचे महान् कार्य सिद्ध कर. ॥७॥
|
इत्युक्तो देवराजेन मातलिर्देवसारथिः । प्रणम्य शिरसा देवं ततो वचनमब्रवीत् ॥ ८ ॥
|
देवराजांनी याप्रकारे सांगितल्यावर देव-सारथि मातलिने त्यांना मस्तक नमवून प्रणाम केला आणि असे म्हटले - ॥८॥
|
शीघ्रं यास्यामि देवेन्द्र सारथ्यं च करोम्यहम् । ततो हयैश्च संयोज्य हरितैः स्यन्दनोत्तमम् ॥ ९ ॥
|
देवेंद्र ! मी शीघ्रच आपल्या उत्तम रथास उत्तम घोडे जुंपून तो बरोबर घेऊन जाईन आणि श्रीरामांच्या सारथ्याचे कार्यही करीन. ॥९॥
|
ततः काञ्चनचित्राङ्गः किङ्किणीशतभूषितः । तरुणादित्यसङ्काशो वैदूर्यमयकूबरः । सदश्वैः काञ्चनापीडैः युक्तः श्वेतप्रकीर्णकैः ।। १० ।।
हरिभिः सूर्यसङ्काशैः हेमजालविभूषितैः । रुक्मवेणुध्वजः श्रीमान् देवराजरथो वरः ।। ११ ।।
देवराजेन सन्दिष्टो रथमारुह्य मातलिः । अभ्यवर्तत काकुत्स्थं अवतीर्य त्रिविष्टपात् ।। १२ ।।
|
त्यानंतर देवराज इंद्रांचा जो शोभाशाली श्रेष्ठ रथ आहे, ज्याचे सर्व अवयव सुवर्णमय असल्याने विचित्र शोभा धारण करीत आहे, ज्याला शेकडो घुंगुरांनी विभूषित केले गेले आहे, ज्याची कांति प्रातःकालच्या सूर्याप्रमाणे अरूण आहे, ज्याच्या कूबरांत वैडूर्यमणि जडविलेले आहेत, ज्याला सूर्यतुल्य तेजस्वी, हिरव्या रंगाचे, सुवर्णजालांनी विभूषित तसेच सोन्याच्या साजांनी सजलेले, उत्तम घोडे जुंपलेले असून त्या घोड्यांना श्वेत चामरादिंनी अलंकृत केले गेले आहे तसेच ज्याच्या ध्वजाचा दंड सोन्याचा बनविलेला आहे, त्या रथावर आरूढ होऊन देवराजांचा संदेश घेऊन मातलि स्वर्गातून भूतलावर उतरून श्रीरामचंद्रांसमोर उभा राहिला. ॥१०-१२॥
|
अब्रवीच्च तदा रामं सप्रतोदो रथे स्थितः । प्राञ्जलिर्मातलिर्वाक्यं सहस्राक्षस्य सारथिः ।। १३ ।।
|
सहस्त्रलोचन इंद्राचा सारथि मातलि चाबुक घेऊन रथावर बसलेला हात जोडून श्रीरामचंद्रांना म्हणाला - ॥१३॥
|
सहस्राक्षेण काकुत्स्थ रथोऽयं विजयाय ते । दत्तस्तव महासत्त्व श्रीमन् शत्रुनिबर्हण ।। १४ ।।
|
महाबली शत्रूसूदन श्रीमान् काकुत्स्थ ! सहस्त्र नेत्रधारी इंद्रांनी विजयासाठी आपल्याला हा रथ समर्पित केला आहे. ॥१४॥
|
इदमैन्द्रं महच्चापं कवचं चाग्निसन्निभम् । शराश्चादित्यसङ्काशाः शक्तिश्च विमला शिवा ।। १५ ।।
|
हे इंद्राचे विशाल धनुष्य आहे. हे अग्निसमान तेजस्वी कवच आहे. हे सूर्यसदृश्य प्रकाशमान बाण आहेत तसेच ही कल्याणमयी निर्मल शक्ति आहे. ॥१५॥
|
आरुह्येमं रथं वीर राक्षसं जहि रावणम् । मया सारथिना देव महेन्द्र इव दानवान् ।। १६ ।।
|
वीरवर महाराज ! आपण या रथावर आरूढ होऊन (माझ्या) सारथ्याच्या सहाय्याने राक्षसराज रावणाचा, जसे महेंद्र दानवांचा संहार करतात त्याप्रमाणे वध करावा. ॥१६॥
|
इत्युक्तः सम्परिक्रम्य रथं तमभिवाद्य च । आरुरोह तदा रामो लोकान् लक्ष्म्या विराजयन् ।। १७ ।।
|
मातलिने असे म्हटल्यावर श्रीरामांनी त्या रथाची परिक्रमा केली आणि त्याला प्रणाम करून ते त्यावर आरूढ झाले. त्यासमयी आपल्या शोभेने ते समस्त लोकांना प्रकाशित करू लागले. ॥१७॥
|
तद् बभौ चाद्भुयतं युद्धं द्वैरथं रोमहर्षणम् । रामस्य च महाबाहो रावणस्य च रक्षसः ।। १८ ।।
|
तत्पश्चात् महाबाहु श्रीराम आणि राक्षस रावण यांच्यामध्ये द्वैरथ युद्ध आरंभ झाले, जे फारच अद्भुत आणि रोमांचकारी होते. ॥१८॥
|
स गान्धर्वेण गान्धर्वं दैवं दैवेन राघवः । अस्त्रं राक्षसराजस्य जघान परमास्त्रवित् ।। १९ ।।
|
श्री राघव उत्तम अस्त्रांचे ज्ञाते होते. त्यांनी राक्षसराजाने सोडलेल्या गांधर्व अस्त्राला गांधर्व-अस्त्राने आणि दैव अस्त्राला दैव अस्त्राने नष्ट करून टाकले. ॥१९॥
|
अस्त्रं तु परमं घोरं राक्षसं राक्षसाधिपः । ससर्ज परमक्रुद्धः पुनरेव निशाचरः ।। २० ।।
|
तेव्हा राक्षसांचा राजा रावण याने अत्यंत कुपित होऊन पुन्हा परम भयानक राक्षसास्त्राचा प्रयोग केला. ॥२०॥
|
ते रावणधनुर्मुक्ताः शराः काञ्चनभूषणाः । अभ्यवर्तन्त काकुत्स्थं सर्पा भूत्वा महाविषाः ।। २१ ।।
|
नंतर तर रावणाच्या धनुष्यातून सुटलेले सुवर्णभूषित बाण अत्यंत विषारी सर्प होऊन काकुत्स्थ रामांजवळ पोहोचू लागले. ॥२१॥
|
ते दीप्तवदना दीप्तं वमन्तो ज्वलनं मुखैः । राममेवाभ्यवर्तन्त व्यादितास्या भयानकाः ।। २२ ।।
|
त्या सर्पांचे मुख आगीप्रमाणे प्रज्वलित होत होते. ते आपल्या मुखांतून जळती आग ओकत होते आणि मुख पसरत असल्यामुळे फार भयंकर दिसत होते. ते सर्वच्या सर्व श्रीरामांच्याच समोर येऊ लागले. ॥२२॥
|
तैर्वासुकिसमस्पर्शैः दीप्तभोगैः महाविषैः । दिशश्च सन्तताः सर्वाः विदिशश्च समावृताः ।। २३ ।।
|
त्यांचा स्पर्श वासुकि नागासमान असह्य होता. त्यांच्या फणा प्रज्वलित होत होत्या आणि ते महान् विषाने भरलेले होते. त्या सर्पाकार बाणांनी व्याप्त होऊन संपूर्ण दिशा आणि विदिशा आच्छादित झाल्या. ॥२३॥
|
तान् दृष्ट्वा पन्नगान् रामः समापतत आहवे । अस्त्रं गारुत्मतं घोरं प्रादुश्चके भयावहम् ।। २४ ।।
|
युद्धस्थळी त्या सर्पांना येतांना पाहून भगवान् श्रीरामांनी अत्यंत भयंकर गारूडास्त्र प्रकट केले. ॥२४॥
|
ते राघवधनुर्मुक्ता रुक्मपुङ्खाः शिखिप्रभाः । सुपर्णाः काञ्चना भूत्वा विचेरुः सर्पशत्रवः ।। २५ ।।
|
नंतर तर राघवांच्या धनुष्यांतून सुटलेले सोनेरी पंखाचे अग्नितुल्य तेजस्वी बाण सर्पांच्या शत्रूभूत सुवर्णमय गरूड बनून सर्वत्र विचरण करू लागले. ॥२५॥
|
ते तान् सर्वान् शरान् जघ्नुः सर्परूपान् महाजवान् । सुपर्णरूपा रामस्य विशिखाः कामरूपिणः ।। २६ ।।
|
श्रीरामांच्या इच्छेनुसार रूप धारण करणार्या त्या गरूडाकार बाणांनी रावणाच्या महान् वेगशाली त्या समस्त सर्पाकार सायकांचा संहार करून टाकला. ॥२६॥
|
अस्त्रे प्रतिहते क्रुद्धो रावणो राक्षसाधिपः । अभ्यवर्षत् तदा रामं घोराभिः शरवृष्टिभिः ।। २७ ।।
|
याप्रकारे आपल्या अस्त्राला प्रतिहत झाल्याचे पाहून राक्षसराज रावण क्रोधाने जळू लागला आणि त्या समयी श्रीरामांवर भयंकर बाणांची वृष्टि करू लागला. ॥२७॥
|
ततः शरसहस्रेण राममक्लिष्टकारिणम् । अर्दयित्वा शरौघेण मातलिं प्रत्यविध्यत ।। २८ ।।
|
अनायासेच महान् कर्म करणार्या श्रीरामांना हजारो बाणांनी पीडित करून त्याने मातलिलाही आपल्या बाणसमूहांनी घायाळ करून टाकले. ॥२८॥
|
चिच्छेद केतुमुद्दिश्य शरेणैकेन रावणः । पातयित्वा रथोपस्थे रथात् केतुं च काञ्चनम् ॥ २९ ॥ ऐन्द्रानपि जघानाश्वान् शरजालेन रावणः ।
|
त्यानंतर रावणाने इंद्राच्या रथाच्या ध्वजेला लक्ष्य करून एक बाण मारला आणि त्याने त्या ध्वजेला छेदून टाकले. ती फाटलेली सुवर्णमय ध्वजा रथावरून रथाच्या खालील भागात पाडून रावणाने आपल्या बाणांच्या जाळ्याने इंद्राच्या घोड्यांनाही क्षत-विक्षत करून टाकले. ॥२९ १/२॥
|
विषेदुर्देवगन्धर्व चारणा दानवैः सह ।। ३० ।।
राममार्तं तदा दृष्ट्वा सिद्धाश्च परमर्षयः । व्यथिता वानरेन्द्राश्च बभूवुः सविभीषणाः ।। ३१ ।।
|
हे पाहून देवता, गंधर्व, चारण तसेच दानव विषादात बुडून गेले. श्रीरामांना पीडित पाहून सिद्ध आणि महर्षि यांच्याही मनांत फार व्यथा उत्पन्न झाली. विभीषणासहित सारे वानर-यूथपतिही फार दुःखी झाले. ॥३०-३१॥
|
रामचन्द्रमसं दृष्ट्वा ग्रस्तं रावणराहुणा । प्राजापत्यं च नक्षत्रं रोहिणीं शशिनः प्रियाम् ।। ३२ ।।
समाक्रम्य बुधस्तस्थौ प्रजानामहितावहः ।
|
श्रीरामरूपी चंद्रम्याला रावणरूपी राहुने ग्रस्त झालेला पाहून बुध नामक ग्रह ज्याची देवता प्रजापति आहेत, त्या चंद्र-प्रिया रोहिणी नामक नक्षत्रावर आक्रमण करून प्रजावर्गासाठी अहितकारक झाला. ॥३२ १/२॥
|
सधूमपरिवृत्तोर्मिः प्रज्वलन्निव सागरः ॥ ३३ ॥
उत्पपात तदा क्रुद्धः स्पृशन्निव दिवाकरम् ।
|
समुद्र जणु प्रज्वलित होऊ लागला. त्याच्या लहरींतून जणु धूर निघू लागला आणि तो कुपित झाल्यासारखा होऊन वरील बाजूस जणु सूर्यदेवाला स्पर्श करू इच्छित असल्याप्रमाणे वाढू लागला. ॥३३ १/२॥
|
शस्त्रवर्णः सुपरुषो मन्दरश्मिर्दिवाकरः ।। ३४ ।।
अदृश्यत कबन्धाङ्कः संसक्तो धूमकेतुना ।
|
सूर्याचे किरण मंद होऊ लागले. त्यांची कांति तलवारी प्रमाणे काळी पडू लागली. तो अत्यंत प्रखर कबंधाच्या चिन्हाने युक्त आणि धूमकेतु नामक उत्पात ग्रहाने संयुक्त दिसून येऊ लागला. ॥३४ १/२॥
|
कोसलानां च नक्षत्रं व्यक्तमिन्द्राग्निदैवतम् ।। ३५ ।।
आहत्याङ्गारकस्तस्थौ विशाखामपि चाम्बरे ।
|
आकाशात इक्ष्वाकुवंशीयांचे नक्षत्र विशाखावर, ज्याची देवता इंद्र आणि अग्नि आहे आक्रमण करून मंगळ जाऊन बसला. ॥३५ १/२॥
|
दशास्यो विंशतिभुजः प्रगृहीतशरासनः ।। ३६ ।।
अदृश्यत दशग्रीवो मैनाक इव पर्वतः ।
|
त्या समयी दहा मस्तके आणि वीस भुजांनी युक्त दशग्रीव रावण हातात धनुष्य घेऊन मैनाक पर्वताप्रमाणे दिसत होता. ॥३६ १/२॥
|
निरस्यमानो रामस्तु दशग्रीवेण रक्षसा ॥ ३७ ॥ नाशक्नोदभिसन्धातुं सायकान् रणमूर्धनि ।
|
राक्षस रावणाच्या बाणांनी वारंवार निरस्त (आहत) होण्यामुळे भगवान् श्रीराम युद्धाच्या तोंडावर आपल्या सायकांचे संधान करू शकत नव्हते. ॥३७ १/२॥
|
स कृत्वा भ्रुकुटिं क्रुद्धः किञ्चित् संरक्तलोचन ॥ ३८ ॥
जगाम सुमहाक्रोधं निर्दहन्निव राक्षसान् ।
|
त्यानंतर श्रीरघुनाथांनी क्रोधाचा भाव प्रकट केला. त्यांच्या भुवया वक्र झाल्या, नेत्र काहीसे लाल झाले आणि त्यांना असा महान् क्रोध आला की त्यावरून ते समस्त राक्षसांना भस्म करून टाकतील असे वाटत होते. ॥३८ १/२॥
|
तस्य क्रुद्धस्य वदनं दृष्ट्वा रामस्य धीमतः । सर्वभूतानि वित्रेसुः प्राकम्पत च मेदिनी ।। ३९ ।।
|
त्या समयी कुपित झालेल्या बुद्धिमान् श्रीरामांच्या मुखाकडे पाहून समस्त प्राण्यांचा भयाने थरकांप उडाला आणि पृथ्वी कापू लागली. ॥३९॥
|
सिंहशार्दूलवान् शैलः सञ्चचाल चलद् द्रुमः । बभूव चापि क्षुभितः समुद्रः सरितां पतिः ।। ४० ।।
|
सिंह आणि व्याघ्रांनी भरलेला पर्वत हलू लागला. त्याच्यावरील वृक्ष डोलू लागले आणि सरितांचे स्वामी समुद्र यांच्यामध्ये भरती आली. ॥४०॥
|
खगाश्च खरनिर्घोषा गगने परुषा घनाः । औत्पातिकानि नर्दन्तः समन्तात् परिचक्रमुः ।।४१ ।।
|
आकाशात सर्व बाजूस उत्पातसूचक गर्दभाकार प्रचंड गर्जना करणारे कोरडे ढग गर्जना करून गोल गोल फिरू लागले. ॥४१॥
|
रामं दृष्ट्वा सुसङ्क्रुद्धं उत्पातांश्चैव दारुणान् । वित्रेसुः सर्वभूतानि रावणस्याभवद् भयम् ।। ४२ ।।
|
श्रीरामांना अत्यंत रागावलेले पाहून आणि दारूण उत्पातांचे प्राकट्य पाहून समस्त प्राणी भयभीत झाले तसेच रावणाच्या ठिकाणीही भय उत्पन्न झाले. ॥४२॥
|
विमानस्थास्तदा देवा गन्धर्वाश्च महोरगाः । ऋषिदानवदैत्याश्च गरुत्मन्तश्च खेचराः ।। ४३ ।।
ददृशुस्ते तदा युद्धं लोकसंवर्तसंस्थितम् । नानाप्रहरणैर्भीमैः शूरयोः सम्प्रयुद्ध्यतोः ।। ४४ ।।
|
त्यासमयी विमानात बसलेल्या देवता, गंधर्व, मोठ मोठे नाग, ऋषि, दानव, दैत्य तसेच गरूड - हे सर्व आकाशात स्थित होऊन युद्धपरायण शूरवीर राम आणि रावणाचे समस्त लोकांना प्रलयाप्रमाणे उपस्थित झालेल्या नाना प्रकारच्या भयानक प्रहारांनी युक्त असे त्या युद्धाचे दृश्य पाहू लागले. ॥४३-४४॥
|
ऊचुः सुरासुराः सर्वे तदा विग्रहमागताः । प्रेक्षमाणा महद्युद्धं वाक्यं भक्त्या प्रहृष्टवत् ।। ४५ ।।
|
त्यावेळी युद्ध पहाण्यासाठी आलेल्या समस्त देवता आणि असुर त्या महासमराला पाहून भक्तिभावाने हर्षपूर्वक बोलू लागले - ॥४५॥
|
दशग्रीवं जयेत्याहुः असुराः समवस्थिताः । देवा राममथोचुस्ते त्वं जयेति पुनः पुनः ।। ४६ ।।
|
तेथे उभे असलेले असुर दशग्रीवाला संबोधित करून म्हणाले - रावणा ! तुझा जय होवो ! तिकडे देवता श्रीरामांना हाका मारून वारंवार म्हणू लागल्या - रघुनंदना ! आपला जय होवो, जय होवो. ॥४६॥
|
एतस्मिन्नन्तरे क्रोधाद् राघवस्य स रावणः । प्रहर्तुकामो दुष्टात्मा स्पृशन् प्रहरणं महत् ।। ४७ ।।
|
याच समयी दुष्टात्मा रावणाने क्रोधाविष्ट होऊन वारंवार प्रहार करण्याच्या इच्छेने एक फार मोठे ह्त्यार उचलले. ॥४७॥
|
वज्रसारं महानादं सर्वशत्रुनिबर्हणम् । शैलशृङ्गनिभैः कूटैः चितं दृष्टिभयावहम् ।। ४८ ।।
सधूममिव तीक्ष्णाग्रं युगान्ताग्निचयोपमम् । अतिरौद्रमनासाद्यं कालेनापि दुरासदम् ।। ४९ ।।
|
ते वज्रासमान शक्तिशाली, महान् शब्द करणारे तसेच संपूर्ण शत्रूंचे संहारक होते. त्याच्या शिखा शैल-शिखरांप्रमाणे होत्या. ते मन आणि नेत्रांनाही भयभीत करणारे होते. त्याचे अग्रभाग फार तीक्ष्ण होते. ते प्रलयकाळच्या धूमयुक्त अग्निराशिप्रमाणे अत्यंत भयंकर भासत होते. ते प्राप्त करणे अथवा नष्ट करणे काळालाही कठीण आणि असंभव होते. ॥४८-४९॥
|
त्रासनं सर्वभूतानां दारणं भेदनं तदा । प्रदीप्तमिव रोषेण शूलं जग्राह रावणः ।। ५० ।।
|
त्याचे नाम शूल होते. ते समस्त भूतांना छिन्न-भिन्न करून त्यांना भयभीत करणारे होते. रोषाने उद्दीप्त झालेल्या रावणाने तो शूल हातात घेतला. ॥५०॥
|
तच्छूलं परमक्रुद्धो जग्राह युधि वीर्यवान् । अनीकैः समरे शूरै राक्षसैः परिवारितः ।। ५१ ।।
|
समरभूमीमध्ये अनेक सेनांमध्ये विभक्त शूरवीर राक्षसांनी घेरलेल्या त्या पराक्रमी निशाचराने फार क्रोधाने तो शूल ग्रहण केला होता. ॥५१॥
|
समुद्यम्य महाकायो ननाद युधि भैरवम् । संरक्तनयनो रोषात् स्वसैन्यमभिहर्षयन् ।। ५२ ।।
|
त्याला वर उचलून त्या विशालकाय राक्षसाने युद्धस्थळी फार भयानक गर्जना केली. त्यासमयी त्याचे नेत्र रोषाने लाल होत होते आणि तो आपल्या सेनेचा हर्ष वाढवीत होता. ॥५२॥
|
पृथिवीं चान्तरिक्षं च दिशश्च प्रदिशस्तथा । प्राकम्पयत् तदा शब्दो राक्षसेन्द्रस्य दारुणः ।। ५३ ।।
|
राक्षसराज रावणाच्या त्या भयंकर सिंहनादाने त्यासमयी पृथ्वी, आकाश, दिशा आणि विदिशा यांना कंपित करून टाकले. ॥५३॥
|
अतिनादस्य नादेन तेन तस्य दुरात्मनः । सर्वभूतानि वित्रेसुः सागरश्च प्रचुक्षुभे ।। ५४ ।।
|
त्या महाकाय दुरात्मा निशाचराच्या भैरवनादाने संपूर्ण प्राण्यांचा थरकाप उडाला आणि सागरही विक्षुब्ध झाला. ॥५४॥
|
स गृहीत्वा महावीर्यः शूलं तद् रावणो महत् । विनद्य सुमहानादं रामं परुषमब्रवीत् ।। ५५ ।।
|
तो विशाल शूल हातात घेऊन महापराक्रमी रावणाने फार जोराने गर्जना करून श्रीरामांना कठोर वाणीने म्हटले - ॥५५॥
|
शूलोऽयं वज्रसारस्ते राम रोषान्मयोद्यतः । तव भ्रातृसहायस्य सद्यः प्राणान् हरिष्यति ।। ५६ ।।
|
रामा ! हा शूल वज्रासमान शक्तिशाली आहे. मी रोषपूर्वक याला आपल्या हातात घेतला आहे. हा भावासह तुमचे प्राण तात्काळ हरण करून घेईल. ॥५६॥
|
रक्षसामद्य शूराणां निहतानां चमूमुखे । त्वां निहत्य रणश्लाघिन् करोमि तरसा समम् ॥ ५७ ॥
|
युद्धाची इच्छा करणार्या राघवा ! आज तुमचा वध करून सेनेच्या तोंडावरच जे शूरवीर राक्षस मारले गेले आहेत, त्यांच्या सारख्याच अवस्थेला मी तुम्हालाही पोहोचवून देईन. ॥५७॥
|
तिष्ठेदानीं निहन्मि त्वां एष शूलेन राघव । एवमुक्त्वा स चिक्षेप तच्छूलं राक्षसाधिपः ।। ५८ ।।
|
राघवा ! थांब, आत्ता या शूलाच्या द्वारा तुला मृत्युच्या स्वाधीन करतो. असे म्हणून राक्षसराज रावणाने राघवावर तो शूल फेकून मारला. ॥५८॥
|
तद् रावण करान्मुक्तं विद्युन्मालासमाकुलम् । अष्टघण्टं महानादं वियद्गपतमशोभत ।। ५९ ।।
|
रावणाच्या हातांतून सुटताच तो शूल आकाशात येऊन चमकू लागला. तो विद्युन्माळांनी व्याप्त असल्याप्रमाणे वाटत होता. आठ घंटांनी युक्त असल्याने त्याच्यातून गंभीर घोष प्रकट होत होता. ॥५९॥
|
तच्छूलं राघवो दृष्ट्वा ज्वलन्तं घोरदर्शनम् । ससर्ज विशिखान् रामः चापमायम्य वीर्यवान् ।। ६० ।।
|
परम पराक्रमी राघव श्रीरामांनी त्या भयंकर तसेच प्रज्वलित शूलास आपल्याकडे येतांना पाहिले आणि धनुष्य खेचून बाणांची वृष्टि करण्यास आरंभ केला. ॥६०॥
|
आपतन्तं शरौघेण वारयामास राघवः । उत्पतन्तं युगान्ताग्निं जलौघैरिव वासवः ।। ६१ ।।
|
राघवांनी बाणसमूहांच्या द्वारे त्या शूलाला जसे देवराज इंद्र वर उफाळणार्या प्रलयाग्निला संवर्तक मेघांकडून वर्षले जाणार्या जलप्रवाहाच्या द्वारे शांत करण्याचा प्रयत्न करतात त्याप्रमाणे रोखण्याचा प्रयत्न केला. ॥६१॥
|
निर्ददाह स तान् बाणान् रामकार्मुकनिःसृतान् । रावणस्य महाञ्शूलः पतङ्गानिव पावकः ।। ६२ ।।
|
परंतु जशी आग पतंगांना जाळून टाकते त्याच प्रकारे रावणाच्या त्या महान् शूलाने श्रीरामांच्या धनुष्यांतून सुटलेल्या समस्त बाणांना जाळून भस्म करून टाकले. ॥६२॥
|
तान् दृष्ट्वा भस्मसाद्भूणतान् शूल संस्पर्शचूर्णितान् । सायकान् अंतरिक्षस्थान् राघवः क्रोधमाहरत् ।। ६३ ।।
|
राघवांनी जेव्हा पाहिले की माझे सायक अंतरिक्षात त्या शूलाचा स्पर्श होताच चूर चूर होऊन राखेचा ढीग बनून गेले आहेत तेव्हा त्यांना फार क्रोध आला. ॥६३॥
|
स तां मातलिना नीतां शक्तिं वासवसम्मताम् । जग्राह परमक्रुद्धो राघवो रघुनन्दनः ।। ६४ ।।
|
अत्यंत क्रोधाविष्ट होऊन रघुनंदन राघवांनी मातलीने देवेंद्र द्वारा सन्मानित शक्ति हातात घेतली. ॥६४॥
|
सा तोलिता बलवता शक्तिर्घण्टाकृतस्वना । नभः प्रज्वालयामास युगान्तोल्केव सप्रभा ।। ६५ ।।
|
बलवान् श्रीरामांच्या द्वारा उचलली गेलेली ती शक्ति प्रलयकाली प्रज्वलित होणार्या उल्केसमान प्रकाशमान होती. तिने आपल्या प्रभेने समस्त आकाशाला उद्भासित करून टाकले तसेच तिच्यातून घंटानाद प्रकट होऊ लागला. ॥६५॥
|
सा क्षिप्ता राक्षसेन्द्रस्य तस्मिन् शूले पपात ह । भिन्नः शक्त्या महान् शूलो निपपात गतद्युतिः ।। ६६ ।।
|
श्रीरामांनी जेव्हा ती शक्ति सोडली तेव्हा ती राक्षसराजाच्या त्या शूलावरच पडली. तिच्या प्रहाराने तुकडे तुकडे होऊन आणि निस्तेज होऊन तो महान् शूल पृथ्वीवर पडला. ॥६६॥
|
निर्बिभेद ततो बाणैः हयानस्य महाजवान् । रामस्तीक्ष्णैर्महावेगैः वज्रकल्पैरजिह्मगैः ॥ ६७ ॥
|
यानंतर श्रीरामांनी सरळ जाणार्या महावेगवान् वज्रतुल्य तीक्ष्ण बाणांच्या द्वारा रावणाच्या अत्यंत वेगशाली घोड्यांना घायाळ केले. ॥६७॥
|
निर्बिभेदोरसि तदा रावणं निशितैः शरैः । राघवः परमायत्तो ललाटे पत्रिभिस्त्रिभिः ।। ६८ ।।
|
नंतर अत्यंत सावधान होऊन त्यांनी तीन तीक्ष्ण तीरांनी रावणाची छाती भेदून टाकली आणि तीन पंख असलेल्या बाणांनी त्याच्या ललाटावर प्रहार केला. ॥६८॥
|
स शरैर्भिन्नसर्वाङ्गो गात्रप्रस्रुतशोणितः । राक्षसेन्द्रः समूहस्थः फुल्लाशोक इवाबभौ ।। ६९ ।।
|
त्या बाणांच्या माराने रावणाचे सारे अंग क्षत-विक्षत झाले. त्याच्या सार्या शरीरातून रक्ताची धार वाहू लागली. त्यासमयी आपल्या सेना समूहात उभा असलेला राक्षसराज रावण फुलांनी लगडलेल्या अशोकवृक्षाप्रमाणे शोभू लागला. ॥६९॥
|
स रामबाणैरतिविद्धगात्रो निशाचरेन्द्रः क्षतजार्द्रगात्रः । जगाम खेदं च समाजमध्ये क्रोधं च चक्रे सुभृशं तदानीम् ।। ७० ।।
|
श्रीरामांच्या बाणांनी जेव्हा सारे शरीर अत्यंत घायाळ होऊन रक्ताने न्हाऊन निघाले तेव्हा निशाचरराज रावणाला त्या रणभूमीमध्ये फार खेद झाला. त्याच बरोबर त्याने त्या समयी फारच मोठा क्रोध प्रकट केला. ॥७०॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे त्र्यधिकशततमः सर्गः ।। १०२ ।।
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेदोनावा सर्ग पूरा झाला. ॥१०२॥
|