श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ विंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
नारदेन रावणस्य प्रबोधनं, तस्य प्रेरणया रावणस्य युद्धार्थं यमलोके गमनं, नारदस्य तद्विषये विचारश्च -
नारदांनी रावणास समजाविणे, त्यांच्या सांगण्यावरून रावणाने युद्धासाठी यमलोकास जाणे तसेच नारदांचे या युद्धाविषयी विचार करणे -
ततो वित्रासयन् मर्त्यान् पृथिव्यां राक्षसाधिपः ।
आससाद घने तस्मिन् नारदं मुनिपुङ्‌गवम् ॥ १ ॥
(अगस्त्य म्हणतात - रघुनंदना !) यानंतर राक्षसराज रावण मनुष्यांना भयभीत करीत पृथ्वीवर विचरण करू लागला. एक दिवस पुष्पक विमानांतून यात्रा करतांना त्याला ढगांच्या मध्ये देवर्षि नारद भेटले. ॥१॥
तस्याभिवादनं कृत्वा दशग्रीवो निशाचरः ।
अब्रवीत् कुशलं पृष्ट्‍वा हेतुं आगमनस्य च ॥ २ ॥
निशाचर दशग्रीवाने त्यांना अभिवादन करून कुशल-समाचाराची जिज्ञासा व्यक्त केली आणि त्यांच्या आगमनाचा हेतु विचारला - ॥२॥
नारदस्तु महातेजा देवर्षिः अमितप्रभः ।
अब्रवीन् मेघपृष्ठस्थो रावणं पुष्पके स्थितम् ॥ ३ ॥
तेव्हा मेघांच्या पाठीवर उभे असलेल्या अमित कांतिमान्‌ महातेजस्वी देवर्षि नारदांनी पुष्पक विमानावर बसलेल्या रावणाला म्हटले - ॥३॥
राक्षसाधिपते सौम्य तिष्ठ विश्रवसः सुत ।
प्रीतोऽस्मि अभिजनोपेत विक्रमैरूर्जितैस्तव ॥ ४ ॥
उत्तम कुळांत उत्पन्न वैश्रवणकुमार राक्षसराज रावण ! सौम्या ! थांब. मी तुझ्या वाढलेल्या बल-विक्रमामुळे फार प्रसन्न झालो आहे. ॥४॥
विष्णुना दैत्यघातैश्च गन्धर्वोरगधर्षणैः ।
त्वया समं विमर्दैश्च भृशं हि परितोषितः ॥ ५ ॥
दैत्यांचा विनाश करणार्‍या अनेक संग्राम करणार्‍या भगवान्‌ विष्णुंनी तसेच गंधर्व आणि नागांना पददलित करणार्‍या युद्धांच्या द्वारा तू, (दोघांनी) मला समानरूपाने संतुष्ट केले आहे. ॥५॥
किंचिद् वक्ष्यामि तावत् तु श्रोतव्यं श्रोष्यसे यदि ।
तन्मे निगदतस्तात समाधिं श्रवणे कुरु ॥ ६ ॥
यासमयी जर तू ऐकणार असशील तर मी तुला काही ऐकण्यासारख्या गोष्टी सांगेन. तात ! माझ्या तोंडून निघणारी ही गोष्ट ऐकण्यासाठी तू आपले चित्त एकाग्र कर. ॥६॥
किमयं वध्यते तात त्वयाऽवध्येन दैवतैः ।
हत एव ह्ययं लोको यदा मृत्युवशं गतः ॥ ७ ॥
तात ! तू देवतांसाठी अवध्य होऊन या भूलोकनिवासी लोकांचा वध का करत आहेस ? येथील प्राणी तर मृत्युच्या अधीन असल्याने स्वतःच मेलेले आहेत. मग तूही या मेलेल्यांनाच का मारत आहेस ? ॥७॥
देवदानवदैत्यानां यक्षगन्धर्वरक्षसाम् ।
अवध्येन त्वया लोकः क्लेष्टुं योग्यो न मानुषः ॥ ८ ॥
देवता, दानव, दैत्य, यक्ष, गंधर्व आणि राक्षसही ज्याला मारू शकत नाहीत, असा विख्यात वीर होऊनही तू या मनुष्यलोकाला क्लेश देत आहेस, हे कदापि तुला योग्य नाही. ॥८॥
नित्यं श्रेयसि सम्मूढं महद्‌भिर्व्यसनैर्वृतम् ।
हन्यात् कस्तादृशं लोकं जराव्याधिशतैर्युतम् ॥ ९ ॥
जे सदा आपल्या कल्याण-साधनात मूढ आहेत, मोठ मोठ्‍या विपत्तिने घेरलेले आहेत आणि म्हातारपण आणि शेकडो रोगांनी ग्रस्त आहेत, अशा लोकांना कोणीही वीर पुरुष कसा मारू शकतो ? ॥९॥
तैस्तैरनिष्टोपगमैः अजस्रं यत्र कुत्र कः ।
मतिमान् मानुषे लोके युद्धेन प्रणयी भवेत् ॥ १० ॥
जे नाना प्रकारच्या अनिष्टांच्या प्राप्तिने जेथे तेथे पीडित आहेत, त्या मनुष्यलोकात येऊन कोणता वीर पुरुष युद्धाच्या द्वारा मनुष्यांच्या वधांमध्ये अनुरक्त होईल ? ॥१०॥
क्षीयमाणं दैवहतं श्रुत्पिपासाजरादिभिः ।
विषादशोकसम्मूढं लोकं त्वं क्षपयस्व मा ॥ ११ ॥
हा लोक तर तसाही भूक, तहान आणि जरा आदिनी क्षीण होत आहे तसेच विषाद आणि शोकात बुडून आपली विवेक शक्ति गमावून बसला आहे. दैवाने मारलेल्या या मर्त्यलोकाचा तू विनाश करू नकोस. ॥११॥
पश्य तावन् महाबाहो राक्षसेश्वर मानुषम् ।
मूढमेवं विचित्रार्थं यस्य न ज्ञायते गतिः ॥ १२ ॥
महाबाहु राक्षसराज ! पहा तर खरे ! हा मनुष्यलोक ज्ञानशून्य होण्यामुळे मूढ होऊनही कशा प्रकारे नाना प्रकारच्या क्षुद्र पुरुषार्थांत आसक्त आहे ? याला कधी दुःख आणि सुख भोगण्याचा अवसर येईल ह्या गोष्टीचाही पत्ता नाही. ॥१२॥
क्वचिद् वादित्रनृत्यादि सेव्यते मुदितैर्जनैः ।
रुद्यते चापरैरार्तैः धाराश्रु नयनाननैः ॥ १३ ॥
येथे तर काही माणसे आनंदमग्न होऊन वाद्य-संगीत-नृत्य आदिचे सेवन करतात - त्याच्या द्वारा आपले मनोरंजन करतात तसेच कित्येक लोग तर दुःखांनी पीडित होऊन नेत्रांतून अश्रु ढाळीत रडत राहातात. ॥१३॥
मातापितृसुतस्नेह भार्याबन्धुमनोरमैः ।
मोहितोऽयं जनो ध्वस्तः क्लेशं स्वं नावबुध्यते ॥ १४ ॥
माता, पिता तसेच पुत्राच्या स्नेहाने तसेच पत्‍नी, बंधु यांच्या संबंधी नाना प्रकारचे मनोरथ करीत राहाण्यामुळे हा मनुष्य लोक मोहवश होऊन परमार्थापासून भ्रष्ट होऊन राहिला आहे. याला आपल्या बंधनजनित क्लेशांचा अनुभवच होत नाही आहे. ॥१४॥
तत् किमेवं परिक्लिश्य लोकं मोहनिराकृतम् ।
जित एव त्वया सौम्य मर्त्यलोको न संशयः ॥ १५ ॥
याप्रकारे मोहामुळे, अज्ञानामुळे जे परम पुरुषार्थापासून वंचित झालेले आहेत, अशा मनुष्य-लोकास क्लेश देऊन तुला काय मिळणार आहे ? सौम्य ! तू मनुष्यलोकाला तर जिंकलेस आहेस या बद्दल काहीही संशय नाही आहे. ॥१५॥
अवश्यमेभिः सर्वैश्च गन्तव्यं यमसादनम् ।
तन् निगृह्णीष्व पौलस्त्य यमं परपुरञ्जय ॥ १६ ॥

तस्मिन् जिते जितं सर्वं भवत्येव न संशयः ।
शत्रुनगरीवर विजय प्राप्त करणार्‍या पुलस्त्यनंदना ! या सर्व मनुष्यांना यमलोकात अवश्य जावेच लागते. म्हणून जर शक्ति असेल तर तू यमराजांना आपल्या ताब्यात घे. त्यांना जिंकल्यावर तू सर्वांना जिंकू शकशील यांत संशय नाही. ॥१६ १/२॥
एवमुक्तस्तु लङ्‌केशो दीप्यमानं स्वतेजसा ॥ १७ ॥

अब्रवीन् नारदं तत्र सम्प्रहस्याभिवाद्य च ।
नारदांनी असे म्हटल्यावर लंकापति रावण आपल्या तेजाने उद्दीप्त होणार्‍या त्या देवर्षिला प्रणाम करून हसत हसत बोलला - ॥१७ १/२॥
महर्षे देवगन्धर्व विहार समरप्रिय ॥ १८ ॥

अहं समुद्यतो गन्तुं विजयार्थं रसातलम् ।
महर्षे ! आपण देवता आणि गंधर्वांच्या लोकात विहार करणारे आहात. युद्धाचे दृश्य पहाणे आपल्याला फार प्रिय आहे. मी यासमयी दिग्विजयासाठी रसातलात जाण्यासाठी उद्यत आहे. ॥१८ १/२॥
ततो लोकत्रयं जित्वा स्थाप्य नागान् सुरान् वशे ॥ १९ ॥

समुद्रं अमृतार्थं च मथिष्यामि रसालयम् ।
नंतर तिन्ही लोकांना जिंकून नाग आणि देवतांना आपल्या अधीन करून घेऊन अमृताच्या प्राप्तिसाठी रसनिधि समुद्राचे मंथन करीन. ॥१९ १/२॥
अथाब्रवीद् दशग्रीवं नारदो भगवान् ऋषिः ॥ २० ॥

क्व खल्विदानीं मार्गेण त्वयेहान्येन गम्यते ।
अयं खलु सुदुर्गम्यः प्रेतराजपुरं प्रति ॥ २१ ॥

मार्गो गच्छति दुर्धर्षो यमस्यामित्रकर्शन ।
हे ऐकून देवर्षि भगवान्‌ नारदांनी म्हटले - शत्रुसूदन ! जर तू रसातलास जाऊ इच्छित असशील तर यासमयी त्याचा मार्ग सोडून दुसर्‍या रस्त्याने कोठे जात आहेस ? दुर्धर्ष वीरा ! रसातलाचा हा मार्ग अत्यंत दुर्गम आहे आणि यमराजांच्या पुरीवरूनच जात आहे. ॥२०-२१ १/२॥
स तु शारदमेघाभं हासं मुक्त्वा दशाननः ॥ २२ ॥

उवाच कृतमित्येव वचनं चेदमब्रवीत् ।
नारदांनी असे म्हटल्यावर, शरदऋतुतील मेघांप्रमाणे आपले उज्ज्वल हास्य पसरवीत दशमुख रावण म्हणाला - देवर्षे ! मी आपल्या गोष्टीचा स्वीकार केला आहे. यानंतर त्याने असे म्हटले - ॥२२ १/२॥
तस्माद् एवमहं ब्रह्मन् वैवस्वतवधोद्यतः ॥ २३ ॥

गच्छामि दक्षिणामाशां यत्र सूर्यात्मजो नृपः ।
ब्रह्मन्‌ ! आता यमराजाचा वध करण्यासाठी उद्यत होऊन मी त्या दक्षिण दिशेला जातो जेथे सूर्यपुत्र राजा यम निवास करीत आहेत. ॥२३ १/२॥
मया हि भगवन् क्रोधात् प्रतिज्ञातं रणार्थिना ॥ २४ ॥

अवजेष्यामि चतुरो लोकपालानिति प्रभो ।
प्रभो ! भगवन्‌ ! मी युद्धाच्या इच्छेने क्रोधपूर्वक प्रतिज्ञा केली आहे की चारी लोकपालांना परास्त करीन. ॥२४ १/२॥
तदिह प्रस्थितोऽहं वै पितृराजपुरं प्रति ॥ २५ ॥

प्राणिसङ्‌क्लेशकर्तारं योजयिष्यामि मृत्युना ।
म्हणून मी येथून यमपुरीला प्रस्थान करीत आहे. संसारातील प्राण्यांना मरणाचे कष्ट देणार्‍या सूर्यपुत्र यमास स्वतःच मी मृत्युशी संयुक्त करून टाकीन. ॥२५ १/२॥
एवमुक्त्वा दशग्रीवो मुनिं तमभिवाद्य च ॥ २६ ॥

प्रययौ दक्षिणामाशां प्रविष्टः सह मन्त्रिभिः ।
असे म्हणून दशग्रीवाने मुनींना प्रणाम केला आणि मंत्र्यांसह तो दक्षिण दिशेकडे चालू लागला. ॥२६ १/२॥
नारदस्तु महातेजा मुहूर्तं ध्यानमास्थितः ॥ २७ ॥

चिन्तयामास विप्रेन्द्रो विधूम इव पावकः ।
तो निघून गेल्यावर धूमरहित अग्निसमान महातेजस्वी विप्रवर नारद एक मुहूर्तपर्यंत ध्यानमग्न होऊन याप्रकारे विचार करू लागले. ॥२७ १/२॥
येन लोकास्त्रयः सेन्द्राः क्लिश्यन्ते सचराचराः ॥ २८ ॥

क्षीणे चायुषि धर्मेण स कालो जेष्यते कथम् ।
आयुष्य क्षीण झाल्यावर ज्यांच्या द्वारा धर्मपूर्वक इंद्रासहित तीन्ही लोकातील चराचर प्राणी क्लेशात पाडले जातात - पिडीत होतात, ते काळस्वरूप यमराज या रावणाच्या द्वारा कसे जिंकले जातील ? ॥२८ १/२॥
स्वदत्तकृतसाक्षी यो द्वितीय इव पावकः ॥ २९ ॥

लब्धसञ्ज्ञा विजेष्यन्ते लोका यस्य महात्मनः ।
यस्य नित्यं त्रयो लोका विद्रवन्ति भयार्दिताः ॥ ३० ॥

तं कथं राक्षसेन्द्रोऽसौ स्वयमेव गमिष्यति ।
जे जीवांच्या दानाचे आणि कर्माचे साक्षी आहेत, ज्यांचे तेज द्वितीय अग्निसमान आहे, ज्या महात्म्यांपासून चेतना मिळून संपूर्ण जीव नाना प्रकारच्या क्रिया करतात, ज्यांच्या भयाने पीडित होऊन तीन्ही लोकांतील प्राणी त्यांच्यापासून दूर पळून जातात, त्यांच्या जवळ हा राक्षसराज स्वतःच कसा जाईल ? ॥२९-३० १/२॥
यो विधाता च धाता च सुकृतं दुष्कृतं तथा ॥ ३१ ॥

त्रैलोक्यं विजितं येन तं कथं विजयिष्यते ।
अपरं किन्तु कृत्वैवं विधानं संविधास्यति ॥ ३२ ॥
जे त्रैलोक्याचे धारण -पोषण करणारे तसेच पुण्य आणि पापाचे फळ देणारे आहेत आणि ज्यांनी तीन्ही लोकावर विजय प्राप्त केला आहे, त्या कालदेवांना हा राक्षस कसा जिंकेल ? काळच सर्वांचे साधन आहे. हा राक्षस काळाच्या अतिरिक्त दुसर्‍या कुठल्या साधनाचे संपादन करून त्या काळावर विजय प्राप्त करेल ? ॥३१-३२॥
कौतूहलं समुत्पन्नो यास्यामि यमसादनम् ।
विमर्दं द्रष्टुमनयोः यमराक्षसयोः स्वयम् ॥ ३३ ॥
आता तर माझ्या मनात फार कौतूहल उत्पन्न झाले आहे. म्हणून या यमराज आणि राक्षसराजाचे युद्ध पहाण्यासाठी मी स्वतःही यमलोकास जाईन. ॥३३॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे विंशः सर्गः ॥ २० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा विसावा सर्ग पूरा झाला. ॥२०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP