श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ प्रथमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

हनुमंतंप्रशस्य श्रीरामकर्तृकस्य परिष्वंगः समुद्रतरणार्थं तस्य चिंताकरणं च -
हनुमानांची प्रशंसा करून श्रीरामांनी त्यांना हृदयाशी धरणे आणि समुद्रास पार करण्यासाठी चिंतित होणे -
श्रुत्वा हनुमतो वाक्यं यथावद् अभिभाषितम् ।
रामः प्रीतिसमायुक्तो वाक्यमुत्तरमब्रवीत् ॥ १ ॥
हनुमान्‌ द्वारा यथावत सांगितलेली ही वचने ऐकून भगवान श्रीराम फार प्रसन्न झाले आणि या प्रकारचे उत्तम वचन बोलले- ॥१॥
कृतं हनुमता कार्यं सुमहद् भुवि दुर्लभम् ।
मनसाऽपि यदन्येन न शक्यं धरणीतले ॥ २ ॥
हनुमानांनी फार मोठे कार्य केले आहे. भूतलावर असे कार्य होणे कठीण आहे. या भूमंडळात दुसरा कोणी तर असे कार्य करण्याची गोष्ट मनाच्या द्वारे ही विचारात आणू शकत नाही. ॥२॥
न हि तं परिपश्यामि यस्तरेत महोदधीम् ।
अन्यत्र गरुडाद् वायोः अन्यत्र च हनूमतः ॥ ३ ॥
गरूड, वायु आणि हनुमान यांना वगळून दुसर्‍या कुणालाही हा महासागर ओलांडता येईल असे मी पाहू शकत नाही. ॥३॥
देवदानवयक्षाणां गंधर्वोरगरक्षसाम् ।
अप्रधृष्यां पुरीं लङ्‌कां रावणेन सुरक्षिताम् ॥ ४ ॥

प्रविष्टः सत्त्वमाश्रित्य जीवन् को नाम निष्क्रमेत् ।
देवता, दानव, यक्ष, गंधर्व, नाग आणि राक्षस यापैकी कुणालाही जिच्यावर आक्रमण करणे असंभव आहे तसेच जी रावण द्वारा उत्तम प्रकारे सुरक्षित आहे, त्या लंकापुरीत आपल्या बळाच्या भरवशावर प्रवेश करून कोण तेथून जिवंत बाहेर पडू शकतो ? ॥४ १/२॥
को विशेत् सुदुराधर्षां राक्षसैश्च सुरक्षिताम् ॥ ५ ॥

यो वीर्यबलसंपन्नो न समः स्याद् हनूमतः ।
जो हनुमंतासारखा बल-पराक्रमाने संपन्न नसेल, असा कोण पुरूष राक्षसांच्या द्वारा सुरक्षित अत्यंत दुर्जय लंकेत प्रवेश करू शकतो ? ॥५ १/२॥
भृत्यकार्यं हनुमता सुग्रीवस्य कृतं महत् ।
स्वयं विधाय स्वबलं सदृशं विक्रमस्य च ॥ ६ ॥
हनुमानांनी समुद्र-उल्लंघन आदि कार्यांच्या द्वारा आपल्या पराक्रमास अनुरूप बळ प्रकट करून एका खर्‍या सेवकास योग्य असे सुग्रीवाचे फार मोठे कार्य संपन्न केले आहे. ॥६॥
यो हि भृत्यो नियुक्तः सन् भर्त्रा कर्मणि दुष्करे ।
कुर्यात् तदनुरागेण तमाहुः पुरुषोत्तमम् ॥ ७ ॥
जो सेवक स्वामी द्वारा एखाद्या दुष्कर कार्यासाठी संपन्न केला गेला असता ते कार्य पूर्ण करून तदनुरूप दुसरे कार्य ही (जर ते मुख्य कार्यास विरोधी नसेल तर) संपन्न करतो, तो सेवकात उत्तम म्हटला जातो. ॥७॥
यो नियुक्तः परं कार्यं न कुर्यान्नृपतेः प्रियम् ।
भृत्यो युक्तः समर्थश्च तमाहुर्मध्यमं नरम् ॥ ८ ॥
जो एका कार्यासाठी नियुक्त होऊन योग्यता आणि सामर्थ्य असूनही स्वामीच्या दुसर्‍या प्रिय कार्यास करत नाही (स्वामीनी जितके सांगितले असेल, तेवढेच करून परत येतो) त्यास मध्यम श्रेणीचा सेवक म्हटले गेले आहे. ॥८॥
नियुक्तो नृपतेः कार्यं न कुर्याद् यः समाहितः ।
भृत्यो युक्तः समर्थश्च तमाहुः पुरुषाधमम् ॥ ९ ॥
जो सेवक स्वामीच्या एखाद्या कार्यासाठी नियुक्त होऊनही आपल्या ठिकाणी योग्यता आणि सामर्थ्य असूनही ते सावधानतेने पूर्ण करत नाही, तो अधम श्रेणीचा म्हटला जातो. ॥९॥
तन्नियोगे नियुक्तेन कृतं कृत्यं हनूमता ।
न चात्मा लघुतां नीतः सुग्रीवश्चापि तोषितः ॥ १० ॥
हनुमानांनी स्वामीच्या एका कार्यासाठी नियुक्त होऊनही त्याच बरोबर दुसर्‍या महत्वपूर्ण कार्यांनाही पूर्ण केले आहे, आपल्या गौरवात उणेपणा येऊ दिला नाही. आपण स्वत:ला दुसर्‍यांच्या दृष्टीमध्ये हीन (तुच्छ) बनू दिले नाही आणि सुग्रीवालाही पूर्ण संतुष्ट केले आहे. ॥१०॥
अहं च रघुवंशश्च लक्ष्मणश्च महाबलः ।
वैदेह्या दर्शनेनाद्य धर्मतः परिरक्षिताः ॥ ११ ॥
आज हनुमानाने वैदेही सीतेचा पत्ता लावून- तिला आपल्या डोळ्यांनी पाहून धर्मास अनुसरून माझे, समस्त रघुवंशाचे आणि महाबली लक्ष्मणाचेही रक्षण केले आहे. ॥११॥
इदं तु मम दीनस्य मनो भूयः प्रकर्षति ।
यदिहास्य प्रियाख्यातुः न कुर्मि सदृशं प्रियम् ॥ १२ ॥
आज माझ्या जवळ पुरस्कार देण्यायोग्य वस्तुचा अभाव आहे, ही गोष्ट माझ्या मनास फार सलत आहे की येथे ज्याने मला असा प्रिय संवाद ऐकविला, त्याचे मी तत्सम कुठलेही प्रिय कार्य करू शकत नाही. ॥१२॥
एष सर्वस्वभूतस्तु परिष्वङ्‌गो हनूमतः ।
मया कालमिमं प्राप्य दत्तस्तस्य महात्मनः ॥ १३ ॥
या समयी या महात्मा हनुमानास मी केवळ आपले प्रगाढ आलिंगन प्रदान करतो, कारण की हेच माझे सर्वस्व आहे. ॥१३॥
इत्युक्त्वा प्रीतिहृष्टाङ्‌गो रामस्तं परिषस्वजे ।
हनूमन्तं कृतात्मानं कृतकार्यमुपागतम् ॥ १४ ॥
असे म्हणता म्हणता श्रीरामांचे अंग-प्रत्यंग प्रेमाने पुलकित होऊन गेले आणि त्यांनी आपल्या आज्ञापालनात सफलता प्राप्त करून परत आलेल्या पवित्रात्मा हनुमानास हृदयाशी धरले. ॥१४॥
ध्यात्वा पुनरुवाचेदं वचनं रघुसत्तमः ।
हरीणां ईश्वरस्यापि सुग्रीवस्योपशृण्वतः ॥ १५ ॥
नंतर थोडा वेळपर्यंत विचार करून रघुवंशी शिरोमणी रामांनी वानरराज सुग्रीवास ही गोष्ट ऐकविली- ॥१५॥
सर्वथा सुकृतं तावत् सीतायाः परिमार्गणम् ।
सागरं तु समासाद्य पुनर्नष्टं मनो मम ॥ १६ ॥
बंधुंनो ! सीतेच्या शोधाचे काम तर सुचारू रूपाने संपन्न झाले आहे. परंतु समुद्रापर्यंतची दुस्तरता विचारात घेऊन माझ्या मनाचा उत्साह परत नष्ट झाला आहे. ॥१६॥
कथं नाम समुद्रस्य दुष्पारस्य महाम्भसः ।
हरयो दक्षिणं पारं गमिष्यन्ति समाहिताः ॥ १७ ॥
महान जलराशीने परिपूर्ण समुद्रास पार करणे तर फारच कठीण काम आहे. येथे एकत्र जमलेले हे वानर समुद्राच्या दक्षिण तटावर कसे पोहोचतील ? ॥१७॥
यद्यप्येषु तु वृत्तान्तो वैदेह्या गदितो मम ।
समुद्रपारगमने हरीणां किमिवोत्तरम् ॥ १८ ॥
माझ्या सीतेनेही हा संदेह प्रकट केला होता, ज्याचा वृत्तांत आत्ता आत्ताच मला सांगण्यात आला आहे. या वानरांच्या समुद्र पार जाण्याविषयी जो हा प्रश्न उभा राहिला आहे, त्यावर वास्तविक उपाय काय आहे ? ॥१८॥
इत्युक्त्वा शोकसंभ्रांतो रामः शत्रुनिबर्हणः ।
हनुमंतं महाबाहुः ततो ध्यानमुपागमत् ॥ १९ ॥
हनुमानांना असे म्हणून शत्रुसूदन महाबाहु श्रीराम शोकाकुल होऊन मोठ्‍याच चिंतेत पडले. ॥१९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे प्रथमः सर्गः ॥ १ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा पहिला सर्ग पूर्ण झाला. ॥१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP