श्रीमद् वाल्मिकीय रामायण माहात्म्यम् । पञ्चमोऽध्यायः । ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ | |||||||||
रामायणस्य नवाहश्रवणविधेर्माहात्मस्य फलस्य च वर्णनम् -
|
रामायणाच्या नवाह्न श्रवणाचा विधि, महिमा आणि फलाचे वर्णन -
| ||||||||
सूत उवाच - रामायणस्य माहात्म्यं श्रुत्वा प्रीतो मुनीश्वरः । सनत्कुमारः पप्रच्छ नारदं मुनिसत्तमम् ॥ १ |
सूत म्हणाले -
"रामायणचे हे माहात्म्य ऐकून मुनिश्वर सनत्कुमार फार प्रसन्न झाले. त्यांनी मुनिश्रेष्ठ नारदांना पुन्हा जिज्ञासा केली. ॥ १ ॥
| ||||||||
सनत्कुमार उवाच - रामायणस्य माहात्म्यं कथितं वै मुनिश्वर । इदानीं श्रोतुमिच्छामि विधिं रामायणस्य च ॥ २ |
सनत्कुमार म्हणाले -
"मुनीश्वर ! आपण रामायणाचे माहात्म्य सांगितले. आता मी त्याचा विधि ऐकण्याची इच्छा करीत आहे. ॥ २ ॥
| ||||||||
एतच्चापि महाभाग मुने तत्त्वार्थकोविद । कृपया परयाविष्टो यथावद् वक्तुमर्हसि ॥ ३ |
'महाभाग मुने ! आपण तत्त्वार्थ ज्ञानात कुशल आहात, म्हणून अत्यंत कृपापूर्वक या विषयासंबंधी यथार्थ रूपाने सर्व सांगावे. " ॥ ३ ॥
| ||||||||
नारद उवाच - रामायणविधिं चैव श्रृणुध्वं सुसमाहिताः । सर्वलोकेषु विख्यातं स्वर्गमोक्षविवर्धनम् ॥ ४ |
नारद म्हणाले -
"महर्षिंनो ! तुम्ही एकाग्र चित्त होऊन रामायणाचा विधि ऐका, जो संपूर्ण जगात विख्यात आहे. तो स्वर्ग तथा मोक्ष संपत्तिंची वृद्धि करणारा आहे. ॥ ४ ॥
| ||||||||
विधानं तस्य वक्ष्यामि श्रृणुध्वं गदतो मम । रामायणकथां कुर्वन् भक्तिभावेन भावितः ॥ ५ |
'मी रामायण कथेचे विधान सांगत आहे, तुम्ही सर्वांनी ते ऐकावे. रामायण कथेचे अनुष्ठान करणार्या वक्त्याने आणि श्रोत्यांनी भक्तिभावाने संपन्न होऊन या विधानाचे पालन केले पाहिजे. ॥ ५ ॥
| ||||||||
येन चीर्येण पापानां कोटिकोटिः प्रणश्यति । चैत्रे माघे कार्त्तिके च पञ्चम्यां अथवाऽऽरभेत् ॥ ६ |
या विधिचे पालन करण्याने कोटी पापे नष्ट होतात. चैत्र, माघ आणि कार्तिक मासाच्या शुक्लपक्षातील पंचमी तिथीला कथा आरंभ करावी. ॥ ६ ॥
| ||||||||
संकल्पं तु ततः कुर्यात् स्वस्तिवाचनपूर्वकम् । अहोभिर्नवभिः श्राव्यं रामायण कथामृतमम् ॥ ७ |
प्रथम स्वस्तिवाचन करून नंतर हा संकल्प करावा की आम्ही नऊ दिवसापर्यंत रामायणाची अमृतमयी कथा ऐकू. ॥ ७ ॥
| ||||||||
अद्य प्रभृत्यहं राम श्रृणोमि त्वत्कथामृतम् । प्रत्यहं पूर्णतामेतु तव राम प्रसादतः ॥ ८ |
नंतर भगवंतची प्रार्थना करावी - 'हे श्रीराम ! आजपासून दररोज मी आपली अमृतमयी कथा ऐकेन. हे आपल्या कृपाप्रसादाने परिपूर्ण होवो. ॥ ८ ॥
| ||||||||
प्रत्यहं दन्तशुद्धिं च अपामार्गस्य शाखया । कृत्वा स्नायीत विधिवत् रामभक्तिपरायणः ॥ ९ |
नित्यप्रति अपमार्गच्या शाखेने दंतशुद्धि करून रामभक्तीत तत्पर होऊन विधिपूर्वक स्नान करावे. ॥ ९ ॥
| ||||||||
स्वयं च बन्धुभिः सार्द्धं श्रृणुयात् प्रयतेन्द्रियः । स्नानं कृत्वा यथाचारं दन्तधावनपूर्वकम् ॥ १० शुक्लाम्बरधरः शुद्धो गृहमागत्य वाग्यतः । प्रक्षाल्य पादौ आचम्य स्मरेन्नारायणं प्रभुम् ॥ ११ |
आपली इंद्रिये संयमित करून बंधु-बांधवांसहित स्वतः कथा ऐकावी. प्रथम आपल्या कुलाचारास अनुसरून दंतधावनपूर्वक स्नान करून श्वेत वस्त्र धारण करावे आणि शुद्ध होऊन घरी येऊन दोन्ही पाय धुवून नंतर आचमन करावे आणि भगवान नाराअयणाचे स्मरण करावे. ॥ १०-११ ॥
| ||||||||
नित्यं देवार्चनं कृत्वा पश्चात् संकल्पपूर्वकम् । रामायणपुस्तकं च अर्चयेत् भक्तिभावतः ॥ १२ |
नंतर प्रतिदिनी देवपूजन करून संकल्पपूर्वक भक्तिभावाने रामायणग्रंथाची पूजा करावी. ॥ १२ ॥
| ||||||||
आवाहन आसनाद्यैश्च गन्धपुष्पादिभिर्व्रती । ॐ नमो नारायणायेति पूजयेत् भक्तितत्परः ॥ १३ |
व्रती पुरुषाने आवाहन, आसन, गंध, पुष्प आदिच्या द्वारा 'ॐ नमो नारायणाय' या मंत्राने भक्तिपरायण होऊन पूजन करावे. ॥ १३ ॥
| ||||||||
एकवारं द्विवारं वा त्रिवारं वापि शक्तितः । होमं कुर्यात् प्रयत्नेन सर्वपापनिवृत्तये ॥ १४ |
संपूर्ण पापांच्या निवृत्तिसाठी आपल्या शक्तिस अनुसरून एक, दोन अथवा तीन वेळा प्रयत्नपूर्वक होम करावा. ॥ १४ ॥
| ||||||||
एवं यः प्रयतः कुर्याद् रामायणविधिं तथा । स याति विष्णुभवनं पुनरावृत्तिदुर्लभम् ॥ १५ |
या प्रकारे जो मन आणि इंद्रिये संयमित करून रामायणाच्या विधिचे अनुष्ठान करतो, तो भगवान विष्णुंच्या धामाला जातो, जेथे गेल्यावर तो परत या संसारात येत नाही. ॥ १५ ॥
| ||||||||
रामायणव्रतधरो धर्मकारी च सत्तमः । चाण्डालं पतितं वापि वस्त्रान्नेनापि नार्चयेत् ॥ १६ |
ज्याने रामायण संबंधी व्रत धारण केले असेल आणि जो धर्मात्मा असेल त्या श्रेष्ठ पुरुषाने चाण्डाल तसेच पतित मनुष्याचा वस्त्र आणि अन्नानेही सत्कार करू नये. ॥ १६ ॥
| ||||||||
नास्तिकान् भिन्नमर्यादान् निन्दकान् पिशुनानपि । रामायणव्रतपरो वाङ्मात्रेणापि नार्चयेत् ॥ १७ |
जो नास्तिक, धर्ममर्यादेचे उल्लंघन करणारा, परनिंदक आणि चहाडखोर आहे त्याचा रामायणव्रतधारी पुरुषाने वाणीने देखील आदर करू नये. ॥ १७ ॥
| ||||||||
कुण्डाशिनं गायकं च तथा देवलकाशनम् । भिषजं काव्यकर्तारं देवद्विज विरोधिनम् ॥ १८ परान्नलोलुपं चैव परस्त्रीनिरतं तथा । रामायणव्रतपरो वाङ्मात्रेणापि नार्चयेत् ॥ १९ |
जो पति जीवित असताही परपुरुषाच्या समागमाने मातेच्या द्वारा उत्पन्न केला जातो त्या जारज पुत्राला 'कुण्ड' म्हणतात. अशा कुण्डाच्या घरी जो भोजन करतो, जो गीत गाऊन जीविका चालवितो, देवतांना अर्पण केलेल्या वस्तूंचा उपभोग करणार्या मनुष्याचे अन्न खातो, जो वैद्य आहे, जो लोकांची मिथ्या प्रशंसा करण्याकरिता कविता लिहितो, जो देवतांचा आणि ब्राह्मणांचा विरोध करतो, परान्नाचा लोभी असतो, आणि परस्त्रीमध्ये आसक्त राहतो, अशा मनुष्याचा रामायणव्रती पुरुषाने केवळ वाणीने सुद्धा आदर करू नये. ॥ १८-१९ ॥
| ||||||||
इत्येवमादिभिः शुद्धो वशी सर्वहिते रतः । रामायणपरो भूत्वा परां सिद्धिं गमिष्यति ॥ २० |
या प्रकारे दोषापासून दूर राहून आणि शुद्ध होऊन जितेंद्रिय आणि सर्वांच्या हितात तत्पर राहून जो रामायणाचा आश्रय घेतो तो परमसिद्धिला प्राप्त होतो. ॥ २० ॥
| ||||||||
नास्ति गङ्गासमं तीर्थं नास्ति मातृसमो गुरुः । नास्ति विष्णुसमो देवो नास्ति रामायणात् परम् ॥ २१ |
गंगेसमान तीर्थ, मातेच्या तुल्य गुरु, भगवान विष्णुच्या सह देवता आणि रामायणाहून कुठलीही वस्तु श्रेष्ठ वा उत्तम नाही आहे. ॥ २१ ॥
| ||||||||
नास्ति वेदसमं शास्त्रं नास्ति शान्तिसमं सुखम् । नास्ति शान्तिपरं ज्योतिः नास्ति रामायणात् परम् ॥ २२ |
वेदासमान शास्त्र नाही, शांतिसारखे सुख नाही, शांतिहून श्रेष्ठ ज्योति तथा रामायणाहून उत्कृष्ट कोणतेही काव्य नाही. ॥ २२ ॥
| ||||||||
नास्ति क्षमासमं सारं नास्ति कीर्तिसमं धनम् । नास्ति ज्ञानसमो लाभो नास्ति रामायणात् परम् ॥ २३ |
क्षमेच्या सहश बल, कीर्ति समान धन, ज्ञानाच्या सहश लाभ आणि रामायणाहून कोणताही ग्रंथ श्रेष्ठ वा उत्तम नाही. ॥ २३ ॥
| ||||||||
तदन्ते वेदविदुषे गां दद्याच्च सदक्षिणाम् । रामायणं पुस्तकं च वस्त्रालंकरणादिकम् ॥ २४ |
रामायण कथेच्या शेवटी वेदज्ञ वाचकाला दक्षिणेसहित गोदान द्यावे. त्यास रामायणाचे पुस्तक, वस्त्र आणि आभूषण आदि द्यावे. ॥ २४ ॥
| ||||||||
रामायणपुस्तकं यो वाचकाय प्रयच्छति । स यति विष्णुभवनं यत्र गत्वा न शोचति ॥ २५ |
जो वाचकाला रामायणाचे पुस्तक देतो तो जेथे गेल्यावर कधीही शोक करवा लागत नाही अशा भगवान विष्णुच्या धामाला जातो. ॥ २५ ॥
| ||||||||
नवाहजफलं कर्तुः श्रृणु धर्मविदां वर । पञ्चम्यां तु समारभ्य रामायण कथामृतम् ॥ २६ कथाश्रवणमात्रेण सर्वपापैः प्रमुच्यते । |
धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ सनत्कुमारा ! रामायणाची नवाह्न कथा ऐकल्याने यजमानास जे फल प्राप्त होते ते ऐक. पंचमी तिथीला रामायणाच्या अमृतमयी कथेला आरंभ करून त्याच्या श्रवणमात्रे करून मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो. ॥ २६ १/२ ॥
| ||||||||
यदि द्वयं कृतं तस्य पुण्डरीकफलं लभेत् ॥ २७ व्रतधारी तु श्रवणं यः कुर्यात् स जितेन्द्रियः । अश्वमेधस्य यज्ञस्य द्विगुणं फलमश्नुते ॥ २८ चतुःकृत्वः श्रुतं येन कथितं मुनिसत्तमाः । स लभेत् परमं पुण्यं अग्निष्टोमाष्टसम्भवम् ॥ २९ |
जो दोन वेळा ही कथा श्रवण करतो त्या श्रोत्याला पुण्डरीक यज्ञाचे फल मिळते. जो जितेंद्रिय पुरुष व्रतधारण पूर्वक रामायण कथेला श्रवण करतो तो दोन अश्वमेध यज्ञांचे फल प्राप्त करतो. मुनिवर हो ! ज्याने चार वेळा या कथेचे श्रवण केले असेल तो आठ अग्निष्टोमाच्या परम पुण्यलाभाचा भागी होतो. ॥ २७-२९ ॥
| ||||||||
पञ्चकृत्वो व्रतमिदं कृतं येन महात्मना । अत्यग्निष्टोमजं पुण्यं द्विगुणं प्राप्नुयान्नरः ॥ ३० |
ज्या महा मनस्वी पुरुषाने पाच वेळा रामायण कथा श्रवणाचे व्रत पुरे केले असेल तो अत्याग्निष्टोम यज्ञाच्या द्विगुणित पुण्यफलाचा भागी होतो. ॥ ३० ॥
| ||||||||
एवं व्रतं च षड्वारं कुर्याद् यस्तु समाहितः । अग्निष्टोमस्य यज्ञस्य फलमष्टगुणं लभेत् ॥ ३१ |
जो एकग्रचित्त होऊन या प्रकारे सहा वेळा रामायण कथेच्या व्रताचे अनुष्ठान पूर्ण करतो तो अग्निष्टोम यज्ञाच्या आठपट फलाचा भागी होतो. ॥ ३१ ॥
| ||||||||
नारी वा पुरुषः कुर्याद् अष्टकृत्वो मुनीश्वराः । नरमेधस्य यज्ञस्य फलं पञ्चगुणं लभेत् ॥ ३२ |
मुनीश्वरांनो ! स्त्री असो वा पुरुष, जो आठ वेळा रामायण कथा श्रवण करतो तो नरमेध यज्ञाच्या पाचपट फळ प्राप्त करतो. ॥ ३२ ॥
| ||||||||
नरो वाप्यथ नारी वा नववारं समाचरेत् । गोमेधसवजं पुण्यं स लभेत् त्रिगुणं नरः ॥ ३३ |
जी स्त्री अथवा जो पुरुष नऊ वेळा या व्रताचे आचरण करतो त्याला तीन गोमेध यज्ञांचे पुण्यफल प्राप्त होते. ॥ ३३ ॥
| ||||||||
रामायणं तु यः कुर्यात् शान्तात्मा प्रयतेन्द्रियः । स याति परमानन्दं यत्र गत्वा न शोचति ॥ ३४ |
जो पुरुष शांतचित्त आणि जितेंद्रिय होऊन रामायण यज्ञाचे अनुष्ठान करतो त्याला जेथे जाऊन कधीही शोक करावा लागत नाही अशा परमानंदमय धामामध्ये जातो. ॥ ३४ ॥
| ||||||||
रामायणपरो नित्यं गङ्गास्नानपरायणः । धर्ममार्ग प्रवक्तारो मुक्ता एवं न संशयः ॥ ३५ |
जे प्रतिदिन रामायणाचा पाठ अथवा श्रवण करतात, गंगास्नान करतात, आणि धर्ममार्गाचा उपदेश देतात असे लोक संसार सागरातून मुक्तच आहेत यात काही संशय नाही. ॥ ३५ ॥
| ||||||||
यतीनां ब्रह्मचारीणां प्रवीराणां च सतमाः । नवाह्ना किल श्रोतव्या कथा रामायणस्य च ॥ ३६ |
महात्म्यांनो ! यतिने, ब्रह्मचार्याने आणि प्रवीराने ही रामायणाची नवाह्न कथा ऐकली पाहिजे. ॥ ३६ ॥
| ||||||||
श्रुत्वा नरो रामकथां अतिदीप्तोऽति भक्तितः । ब्रह्मणः पदमासाद्य तत्रैव परिमोदते ॥ ३७ |
रामकथेला अत्यंत भक्तिपूर्वक ऐकून मनुष्य महान् तेजाने उद्दीप्त होऊन जातो आणि ब्रह्मलोकात जाऊन तेथे आनंदाचा अनुभव करतो. ॥ ३७ ॥
| ||||||||
तस्मात् श्रृणुध्वं विप्रेन्द्रा रामायण कथामृतम् । श्रोतॄणां च परं श्राव्यं पवित्राणां अनुत्तमम् ॥ ३८ |
म्हणून विप्रेंद्रगण हो ! आपण रामायणाची अमृतमयी कथा ऐका. श्रोत्यांसाठी ही सर्वोत्तम श्रवणीय वस्तु आहे आणि पावित्र्यातही परम उत्तम आहे. ॥ ३८ ॥
| ||||||||
दुःस्वप्नप्रनाशनं धन्यं श्रोतव्यं च प्रयत्नतः । नरोऽत्र श्रद्धया युक्तः श्लोकं श्लोकार्द्धमेव च ॥ ३९ पठते मुच्यते सद्यो हि उपपातककोटिभिः । सतामेव प्रयोक्तव्यं गुह्याद् गुह्यतमं तु यत् ॥ ४० |
दुःस्वप्नांचा नाश करणारी ही कथा धन्य आहे. त्याचे प्रयत्नपूर्वक ऐकणे आवश्यक आहे. जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन या कथेचा एक श्लोक अथवा अर्धा श्लोकही वाचेल, तो तात्काळ कोटी उपपातकांतून मुक्त होतो. ही गुह्याहूनही गुह्यतम वस्तु आहे. सत्पुरुषांनाच ती ऐकवली गेली पाहिजे. ॥ ३९-४० ॥
| ||||||||
वाचयेत् रामभवने पुण्यक्षेत्रे च संसदि । ब्रह्मद्वेषरतानां च दम्भाचार रतात्मनाम् ॥ ४१ लोकवञ्चक वृत्तीनां न ब्रूयाद् इदमुत्तमम् । |
भगवान् श्रीरामाच्या मंदिरात अथवा एखाद्या पुण्यक्षेत्रात सत्पुरुषांच्या सभेत रामायण कथेवर प्रवचन केले पाहिजे. जो ब्रह्मद्रोही, पाखण्डपूर्ण आचारात तत्पर आणि लोकांना ठकविण्याच्या वृत्तीनी युक्त असेल त्यालाही परम उत्तम कथा ऐकवितां उपयोगी नाही. ॥ ४१ १/२ ॥
| ||||||||
त्यक्त कामादिदोषाणां रामभक्ति रतात्मनाम् ॥ ४२ गुरुभक्तिरतानां च वक्तव्यं मोक्षसाधनम् । |
ज्याने काम आदि दोषांचा त्याग केला आहे, ज्याचे मन रामभक्तीत अनुरक्त राहात असते, आणि जो गुरुजनांच्या सेवेत तत्पर असतो, त्याच्या समक्ष ही मोक्षाला साधनभूत कथा वाचली पाहिजे. ॥ ४२ १/२ ॥
| ||||||||
सर्वदेवमयो रामः स्मृतश्चार्त्तिप्रणाशनः ॥ ४३ सद्भक्तवत्सलो देवो भक्त्या तुष्यति नान्यथा । |
श्रीराम सर्वदेवमय मानले गेले आहेत. ते आर्त प्राण्यांच्या पीडेचा नाश करणारे आहेत, आणि श्रेष्ठ भक्तांवर सदा स्नेह करीत असतात. ते भगवान भक्तिनेच संतुष्ट होतात, दुसर्या कोणत्याही उपायाने नाही. ॥ ४३ १/२ ॥
| ||||||||
अवशेनापि यन्नाम्नि कीर्तिते वा स्मृतेऽपि वा ॥ ४४ विमुक्तपातकः सोऽपि परमं पदमश्नुते । |
मनुष्याने विवश होऊनही त्यांच्या नामाचे कीर्तन अथवा स्मरण केले, तरी तो समस्त पातकांपासून मुक्त होऊन परमपदाचा भागी होतो. ॥ ४४ १/२ ॥
| ||||||||
संसारघोरकान्तार दावाग्निर्मधुसूदनः ॥ ४५ स्मर्तॄणां सर्वपापानि नाशयत्याशु सत्तमाः । |
महात्मांनो ! भगवान् मधुसूदन संसाररूपी भयंकर आणि दुर्गम वनाला भस्म करणार्या दावानलाप्रमाणे आहेत. ते आपले स्मरण करणार्या मनुष्याच्या समस्त पापांचा शीघ्रच नाश करतात. ॥ ४५ १/२ ॥
| ||||||||
तदर्थकमिदं पुण्यं काव्यं श्राव्यं अनुत्तमम् ॥ ४६ श्रवणाद् पठनाद् वापि सर्वपापविनाशकृत् |
या पवित्र काव्याचा प्रतिपाद्य विषय तेच आहेत, म्हणून हे परम उत्तम काव्य सदाच श्रवण करण्यायोग्य आहे. याचे श्रवण अथवा पाठ करण्याने, ते समस्त पापांचा नाश करणारे आहे. ॥ ४६ १/२ ॥
| ||||||||
यस्य रामरसे प्रीतिः वर्तते भक्तिसंयुता ॥ ४७ स एव कृतकृत्यश्च सर्व शास्त्रार्थकोविदः । |
ज्याची श्रीराम रसात प्रीति आणि भक्ति आहे तोच संपूर्ण शास्त्रांच्या ज्ञानात निपुण आणि कृतकृत्य आहे. ॥ ४७ १/२ ॥
| ||||||||
तदर्जितं तपः पुण्यं तत्सत्यं सफलं द्विजाः ॥ ४८ यदर्थश्रवणे प्रीतिः अन्यथा न हि वर्तते । |
ब्राह्मणांनो ! त्याची उपार्जित केलेली तपस्या, सत्य आणि सफल आहे. कारण राम रसात प्रीति असल्याशिवाय रामायणाच्या -श्रवणात प्रेम वाटत नाही. ॥ ४८ १/२ ॥
| ||||||||
रामायणपरा ये तु रामनामपरायणाः ॥ ४९ त एव कृतकृत्याश्च घोरे कलियुगे द्विजाः । |
जे द्विज या भयंकर कलिकालात रामायण तथा श्रीरामनामाचा आश्रय घेतात तेच कृतकृत्य आहेत. ॥ ४९ १/२ ॥
| ||||||||
नवाह्ना किल श्रोतव्यं रामायण कथामृतमम् ॥ ५० ते कृतज्ञा महात्मानः तेभ्यो नित्यं नमो नमः । |
रामायाणाच्या या अमृतमयी कथेचे नवाह्न श्रवण केले पाहिजे. जे महात्मे असे करतात ते कृतज्ञ आहेत. त्यांना प्रतिदिन माझा नमस्कार असो. ॥ ५० १/२ ॥
| ||||||||
रामनामैव नामैव नामैव मम जीवनम् ॥ ५१ कलौ नास्त्येव नास्त्येव नास्त्येव गतिरन्यथा । |
श्रीरामाचे नाव, केवळ श्रीरामनामच माझे जीवन आहे. कलियुगात दुसर्या कुठल्याही उपायाने जीवांना सद्गति मिळत नाही. ॥ ५१ १/२ ॥
| ||||||||
सूत उवाच -
एवं सनत्कुमारस्तु नारदेन महात्मना ॥ ५२ सम्यक् प्रबोधितः सद्यः परां निर्वृतिमाप ह । |
सूत म्हणतात, महात्मा नारदांकडून या प्रकारे ज्ञानोपदेश मिळून सनत्कुमारांना तात्काळ परमानंदाची प्राप्ती झाली. ॥ ५२ १/२ ॥
| ||||||||
तस्मात् श्रृणुध्वं विप्रेन्द्रा रामायण कथामृतम् ॥ ५३ नवाह्ना किल श्रोतव्यं सर्वपापैः प्रमुच्यते । |
म्हणून विप्रवरांनो ! तुम्ही सर्व लोक रामायणाची अमृतमयी कथा ऐका. रामायण नऊ दिवसातच वाचले, ऐकले पाहिजे. असे करण्याने मनुष्य समस्त पापांपासून मुक्त होऊन जातो. ॥ ५३ १/२ ॥
| ||||||||
श्रुत्वा चैतन्महाकाव्यं वाचकं यस्तु पूजयेत् ॥ ५४ तस्य विष्णुः प्रसन्नः स्यात् श्रिया सह द्विजोत्तमाः । |
द्विजोत्तमांनो ! या महान काव्याचे श्रवण करून जो वाचकाची पूजा करतो, त्याच्यावर लक्ष्मीसहित भगवान् श्रीविष्णु प्रसन्न होतात. ॥ ५४ १/२ ॥
| ||||||||
वाचके प्रीतिमापन्ने ब्रह्मविष्णुमहेश्वराः ॥ ५५ प्रीता भवन्ति विप्रेन्द्रा नात्र कार्या विचारणा । |
विप्रेंद्रगणहो ! वाचक प्रसन्न झाला असता ब्रह्मा, विष्णु आणि महादेवही प्रसन्न होतात. या विषयी दुसरा कोणताही अन्यथा विचार करता कामा नये. ॥ ५५ १/२ ॥
| ||||||||
रामायाणवाचकाय गावो वासांसि काञ्चनम् ॥ ५६ रामायणं पुस्तकं च दद्यात् वित्तानुसारतः । |
रामायणाच्या वाचकास आपल्या वैभवास अनुसरून गायी, वस्त्रे, सुवर्ण तथा रामायणाचे पुस्तक आदि वस्तु दिल्या पाहिजेत. ॥ ५६ १/२ ॥
| ||||||||
तस्य पुण्यफलं वक्ष्ये श्रृणुध्वं सुसमाहिताः ॥ ५७ न बाधन्ते ग्रहास्तस्य भूतवेतालकादयः । तस्यैव सर्वश्रेयांसि वर्द्धन्ते चरिते श्रुते ॥ ५८ |
त्या दानाचे पुण्यफल सांगत आहे, आपण सर्व एकाग्रचित्त करून ऐका. त्या दात्याला ग्रह तथा भूत, वेताळ आदि कधी बाधा पोहोचवत नाहीत. श्रीराम चरित्र श्रवण केल्यावर श्रोत्याच्या सर्व श्रेयाची वृद्धी होते. ॥ ५७-५८ ॥
| ||||||||
न चाग्निर्बाधते तस्य न चौरादिभयं तथा । एतज्जन्मार्जितैः पापैः सद्य एव विमुच्यते ॥ ५९ सप्तवंशसमेतस्तु देहान्ते मोक्षमाप्नुयात् । |
त्यास कधी अग्निची बाधा होत नाही, अथवा चोर आदिचे भय राहात नाही. तो या जन्मात उपार्जित केलेल्या समस्त पापातून तात्काळ मुक्त होऊन जातो. तो या शरीराचा अंत झाल्यावर आपल्या सात पिढ्यांसह मोक्षाचा भागी होतो. ॥ ५९ १/२ ॥
| ||||||||
इत्येतद्वः समाख्यातं नारदेन प्रभाषितम् ॥ ६० सनत्कुमारमुनये पृच्छते भक्तितः पुरा । |
पूर्वकालात सनत्कुमार मुनिंनी भक्तिपूर्वक विचारल्यावरून नारदांनी त्यांना जे काही सांगितले होते ते सर्व मी आपल्याला सांगितले आहे. ॥ ६० १/२ ॥
| ||||||||
रामायणं आदिकाव्यं सर्ववेदार्थ सम्मतम् ॥ ६१ सर्वपापहरं पुण्यं सर्वदुःख निबर्हणम् । समस्तपुण्यफलदं सर्वयज्ञ फलप्रदम् ॥ ६२ |
रामायण आदिकाव्य आहे. हे संपूर्ण वेदार्थाच्या संमतिला अनुकूल आहे. याच्या द्वारा समस्त पापांचे निवारण होते. हे पुण्यमय काव्य संपूर्ण दुःखांचे विनाशक तसेच समस्त पुण्यांचे आणि यज्ञांचे फल देणारे आहे. ॥ ६१-६२ ॥
| ||||||||
ये पठन्त्यत्र विबुधाः श्लोकं श्लोकार्द्धमेव च । न तेषां पापबन्धस्तु कदाचिदपि जायते ॥ ६३ |
जे विद्वन रामकथेतील एका अथवा अर्ध्या श्लोकाचाही पाठ करतात, त्यांना कधी पापाचे बंधन प्राप्त होत नाही. ॥ ६३ ॥
| ||||||||
रामार्पितं इदं पुण्यं काव्यं तु सर्वकामदम् । भक्त्य श्रृण्वन्ति विदन्ति तेषां पुणफलं श्रृणु ॥ ६४ |
श्रीरामास समर्पित केले गेलेले हे पुण्यकाव्य सर्व कामनांची सिद्धि करणारे आहे. जे लोक भक्तिपूर्वक याचे श्रवण करतात आणि समजून घेतात, त्यांना प्राप्त होणार्या पुण्यफलाचे वर्णन ऐका. ॥ ६४ ॥
| ||||||||
शतजन्मार्जितैः पापैः सद्य एव विमोचिताः । सहस्रकुलसंयुक्तैः प्रयान्ति परमं पदम् ॥ ६५ |
ते लोक शतजन्मात केले गेलेल्या पापांतून तात्काळ मुक्त होऊन आपल्या हजारो पिढ्यांबरोबर परमपदास प्राप्त होतात. ॥ ६५ ॥
| ||||||||
किं तीर्थैर्गोपदानैर्वा किं तपोधिः कमध्वरैः । अहन्यहनि रामस्य कीर्तनं परिश्रृण्वताम् ॥ ६६ |
जो प्रतिदिन श्रीरामाचे कीर्तन ऐकतो, त्याच्यासाठी तीर्थ सेवन, गोदान, तपस्या आणि यज्ञांची काय आवश्यकता आहे ? ॥ ६६ ॥
| ||||||||
चैत्रे माघे कार्तिके च रामायण कथामृतम् । नवैरहोभिः श्रोतव्यं रामायण कथामृतम् ॥ ६७ |
चैत्र, माघ आणि कार्तिकांत रामायणाच्या अमृतमयी कथेचे नवाह्न पारायण केले पाहिजे. ॥ ६७ ॥
| ||||||||
रामप्रसादजनकं रामभक्तिविवर्धनम् । सर्वपापक्षयकरं सर्वसम्पद् विवर्धनम् ॥ ६८ |
रामायण श्रीरामचंद्रांची प्रसन्नता प्राप्त करणारे, श्रीरामभक्ति वाढविणारे, समस्त पापांचे विनाशक तथा सर्व संपत्तिंची वृद्धि करणारे आहे. ॥ ६८ ॥
| ||||||||
यस्त्वेतत् श्रृणुयाद् वापि पठेद् वा सुसमाहितः । सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोकं स गच्छति ॥ ६९ |
जो एकाग्रचित्त होऊन रामायण ऐकतो अथवा वाचतो, तो सर्व पापांतून मुक्त होऊन भगवान् विष्णुंच्या लोकास जातो. ॥ ६९ ॥
| ||||||||
इति श्रीस्कंदपुराणे उत्तरखण्डे नारद-सनत्कुमार संवादे रामायणमाहात्म्ये फलानुकीर्तनं नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥
|
या प्रकारे श्रीस्कंदपुराणाच्या उत्तरखण्डातील नारद-सनत्कुमार संवादाच्या अंतर्गत रामायण माहात्म्यच्या प्रसंगातील फलाचे वर्णन नामक पाचवा अध्याय समाप्त झाला. ॥ ५ ॥
| ||||||||
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥ |