सीतकर्तृकवल्कलधारणस्यानौचित्यं प्रतिपाद्य राज्ञा कैकेय्या भर्त्सनं श्रीरामस्य राजानं प्रति कौसल्यायां कृपादृष्टिं कर्तुमनुरोधश्च -
|
राजा दशरथांनी सीतेला वल्कल धारण करावयास लावणे अनुचित असे सांगून कैकेयीला फटकारणे आणि श्रीरामांनी त्यांना कौसल्येवर कृपा-दृष्टी ठेवण्यासाठी अनुरोध करणे -
|
तस्यां चीरं वसानायां नाथवत्यामनाथवत् ।
प्रचुक्रोश जनः सर्वो धिक् त्वां दशरथं त्विति ॥ १ ॥
|
सीता ज्यावेळी सनाथ असूनही अनाथाप्रमाणे चीरवस्त्र धारण करू लागली, तेव्हा सर्व लोक आक्रोश करून म्हणू लागले -'राजा दशरथा ! तुझा धिक्कार असो !' ॥१॥
|
तेन तत्र प्रणादेन दुःखितः स महीपतिः ।
चिच्छेद जीविते श्रद्धां धर्मे यशसि चात्मनः ॥ २ ॥
स निःश्वस्योष्णमैक्ष्वाकस्तां भार्यामिदमब्रवीत् ।
कैकेयि कुशचीरेण न सीता गन्तुमर्हति ॥ ३ ॥
|
तेथे होणार्या त्या कोलाहलाने दुःखी होऊन इक्ष्वाकुवंशी राजा दशरथांनी आपले जीवन, धर्म आणि यशाच्या उत्कट इच्छेचा त्याग केला. नंतर ते उष्ण दीर्घ श्वास घेऊन आपली भार्या कैकेयीला या प्रकारे म्हणाले- 'कैकेयी ! सीता कुश-चीर (वल्कल) नेसून वनात जाण्यास योग्य नाही. ॥२-३॥
|
सुकुमारी च बाला च सततं च सुखोचिता ।
नेयं वनस्य योग्येति सत्यमाह गुरुर्मम ॥ ४ ॥
|
'ही सुकुमारी आहे, बालिका आहे आणि सदा सुखात वाढलेली आहे. माझे गुरुजी ठीकच सांगत आहेत की ही सीता वनात जाण्यास योग्य नाही. ॥४॥
|
इयं हि कस्यापि करोति किञ्चित्
तपस्विनी राजवरस्य पुत्री ।
या चीरमासाद्य जनस्य मध्ये
स्थिता विसंज्ञा श्रमणीव काचित् ॥ ५ ॥
|
'राजांमध्ये श्रेष्ठ जनकांची ही तपस्विनी कन्या कुणाचे काय बिघडवित आहे ! की ज्यामुळे या प्रकारे जनसमुदायामध्ये कोणा किंकर्तव्यमूढ भिक्षुकसमान चीर धारण करून उभी आहे ? ॥५॥
|
चीराण्यपास्याज्जनकस्य कन्या
नेयं प्रतिज्ञा मम दत्तपूर्वा ।
यथासुखं गच्छतु राजपुत्री
वनं समग्रा सह सर्वरत्नैः ॥ ६ ॥
|
'जनकनंदिनीने आपली चीर-वस्त्रे उतरवावी. 'ही या रूपात वनात जावी' अशी कुठलीही प्रतिज्ञा मी प्रथम केलेली नाही; आणि कुणाला तसे वचनही दिलेले नाही. म्हणून राजकुमारी सीता संपूर्ण वस्त्रालंकारांनी संपन्न होऊन सर्व प्रकारच्या रत्नांसह, ज्याप्रकारे ती सुखी राहू शकेल, अशा प्रकारे वनात जाऊ शकते. ॥६॥
|
अजीवनार्हेण मया नृशंसा
कृता प्रतिज्ञा नियमेन तावत् ।
त्वया हि बाल्यात् प्रतिपन्नमेतत्
तन्मा दहेद् वेणुमिवात्मपुष्पम् ॥ ७ ॥
|
'मी जीवित राहण्यास योग्य नाही. मी एक तर तुझ्या वचनांमध्ये बांधला जाऊन ही नियम (शपथ) पूर्वक मोठी क्रूर प्रतिज्ञा केली आहे, दुसरे तूही आपल्या मूर्खपणामुळे सीतेला या प्रकारे चीर वस्त्र नेसविण्यास प्रारम्भ केलास. ज्याप्रमाणे वेणु (कळका) चे फूल त्यालाच सुकवून टाकते, त्याप्रकारे मी केलेली प्रतिज्ञा मलाच भस्म करून टाकीत आहे. ॥७॥
|
रामेण यदि ते पापे किञ्चित्कृतमशोभनम् ।
अपकारः क इह ते वैदेह्या दर्शितोऽधमे ॥ ८ ॥
|
'नीच पापिणी ! जर रामांनी तुझा काही अपराध केला असेल तर त्यांना तर तू वनवास देऊन चुकली आहेस, वैदेहीने असा दण्ड मिळण्यासारखा असा तुझा कोणता अपराध केला आहे ? ॥८॥
|
मृगीवोत्फुल्लनयना मृदुशीला तपस्विनी ।
अपकारं कमिव ते करोति जनकात्मजा ॥ ९ ॥
|
'जिचे नेत्र हरिणीच्या नेत्रांप्रमाणे उत्फुल्ल आहेत, जिचा स्वभाव अत्यंत कोमल आणि मधुर आहे, ती मनस्विनी जनकनंदिनी तुझा असा कोणता अपराध करीत आहे ? ॥९॥
|
ननु पर्याप्तमेवं ते पापे रामविवासनम् ।
किमेभिः कृपणैर्भूयः पातकैरपि ते कृतैः ॥ १० ॥
|
'पापिणी ! तू रामाला वनवास देऊन तर पूरे पाप कमविले आहेसच. आता सीतेलाही वनात धाडून आणि वल्कल नेसविणे आदि अत्यंत दुःखद कार्य करून तू आणखी किती पातके गोळा करीत आहेस ? ॥१०॥
|
प्रतिज्ञातं मया तावत् त्वयोक्तं देवि शृण्वता ।
रामं यदभिषेकाय त्वमिहागतमब्रवीः ॥ ११ ॥
|
'देवी ! राम जेव्हा अभिषेकासाठी येथे आले होते तेव्हा त्या समयी तू त्यांना जे काही सांगितले होतेस, ते ऐकून मी तेवढ्या पुरतीच प्रतिज्ञा केली होती. ॥११॥
|
तत्त्वेतत् समतिक्रम्य निरयं गन्तुमिच्छसि ।
मैथिलीमपि या हि त्वमीक्षसे चीरवासिनीम् ॥ १२ ॥
|
'त्याचे उल्लंघन करून तू जी मैथिलीलाही वल्कल वस्त्रे नेसलेली पाहू इच्छित आहेस त्यावरून तुला नरकात जाण्यचीच इच्छा होत आहे हे स्पष्ट कळून येत आहे.' ॥१२॥
|
एवं ब्रुवन्तं पितरं रामः सम्प्रस्थितो वनम् ।
अवाक्शिरसमासीनमिदं वचनमब्रवीत् ॥ १३ ॥
|
राजा दशरथ खाली मान घालून ज्यावेळी याप्रमाणे बोलत होते त्या समयी वनात जाण्यास निघालेल्या रामांनी त्यांना याप्रकारे म्हटले- ॥१३॥
|
इयं धार्मिक कौसल्या मम माता यशस्विनी ।
वृद्धा चाक्षुद्रशीला च न च त्वां देव गर्हते ॥ १४ ॥
मया विहीनां वरद प्रपन्नां शोकसागरम् ।
अदृष्टपूर्वव्यसनां भूयः सम्मन्तुमर्हसि ॥ १५ ॥
|
'धर्मात्मन् ! ही माझी मनस्विनी माता कौसल्या आता वृद्ध होऊ लागली आहे. हिचा स्वभाव फारच उच्च आणि उदार आहे. ती आपली कधीही निंदा करीत नाही. यापूर्वी तिने असे भारी संकटही पाहिलेले नाही. वरदायक नरेश ! मी येथे नसल्याने ती शोक समुद्रात बुडून जाईल. म्हणून आपण सदा हिचा अधिक सन्मान करीत रहावे.' ॥१४-१५॥
|
पुत्रशोकं यथा नर्च्छेत् त्वया पूज्येन पूजिता ।
मां हि सञ्चिन्तयन्ती सा त्वयि जीवेत् तपस्विनी ॥ १६ ॥
|
'आपणाकडून -पूज्यतम पतिद्वारा सन्मानित होऊन ज्या प्रकारे ती पुत्रशोकाचा अनुभव करू शकणार नाही आणि माझे चिंतन करीतच आपल्या आश्रयाखाली ही माझी तपस्विनी माता जीवन धारण करील असा प्रयत्न आपण करावयास पाहिजे. ॥१६॥
|
इमां महेन्द्रोपम जातगर्धिनीं
तथा विधातु जननीं ममार्हसि ।
यथा वनस्थे मयि शोककर्शिता
न जीवितं न्यस्य यमक्षयं व्रजेत् ॥ १७ ॥
|
'इंद्रासमान तेजस्वी महाराज ! ही निरंतर आपल्या दुरावलेल्या पुत्राला पहाण्यासाठी उत्सुक असेल. असे न व्हावे की मी वनात रहात असता ही शोकाने कातर होऊन आपल्या प्राणांचा त्याग करून यमलोकास निघून जाईल. म्हणून आपण माझ्या मातेला सदा अशा परिस्थितिमध्ये ठेवावी की ज्यायोगे याप्रमाणे आशंकेला कुठल्याही प्रकारे अवसर राहू नये.' ॥१७॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे ऽष्टत्रिंशः सर्गः ॥ ३८ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा अडतीसावा सर्ग पूरा झाला. ॥३८॥
|