विश्वामित्रेण श्रीरामं प्रति सिद्धाश्रमसम्बन्धिपूर्ववृत्तवर्णनं ताभ्यां राघवाभ्यां सह स्वाश्रममुपेत्य विश्वामित्रस्य तत्रत्यैर्मुनिभिः पूजनम् -
|
विश्वामित्रांनी श्रीरामास सिद्धाश्रमाच पूर्ववृत्तांत सांगणे आणि त्या दोघा भावांसह आपल्या आश्रमात पोहोचून पूजित होणे -
|
अथ तस्याप्रमेयस्य वचनं परिपृच्छतः ।
विश्वामित्रो महातेजा व्याख्यातुमुपचक्रमे ॥ १ ॥
|
अपरिमित प्रभावशाली भगवान् श्रीरामांचे वचन ऐकून महातेजस्वी विश्वामित्रांनी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास आरंभ केला - ॥ १ ॥
|
इह राम महाबाहो विष्णुर्देवनमस्कृतः ।
वर्षाणि सुबहूनीह तथा युगशतानि च ॥ २ ॥
तपश्चरणयोगार्थमुवास सुमहातपाः ।
एष पूर्वाश्रमो राम वामनस्य महात्मनः ॥ ३ ॥
|
'महाबाहु श्रीराम ! पूर्वकाली येथे देववंदित भगवान विष्णुंनी बरीच वर्षे आणि शंभर युगेपर्यंत तपस्येसाठी निवास केला होता. त्यांनी येथे फार मोठी तपस्या केली होती. हे स्थान, महात्मा वामनाचा अवतार धारण करण्यास उद्यत झालेल्या श्रीविष्णुंनी अवतार ग्रहण करण्यापूर्वी त्यांच्या आश्रमाचे होय. ॥ २-३ ॥
|
सिद्धाश्रम इति ख्यातः सिद्धो ह्यत्र महातपाः ।
एतस्मिन्नेव काले तु राजा वैरोचनिर्बलिः ॥ ४ ॥
निर्जित्य दैवतगणान् सेन्द्रान् सहमरुद्गणान् ।
कारयामास तद्राज्यं त्रिषु लोकेषु विश्रुतः ॥ ५ ॥
|
हे स्थान सिद्धाश्रम नावाने प्रसिद्ध होते. कारण येथेच महातपस्वी विष्णुंना सिद्धि प्राप्त झाली होती. ज्यावेळी ते तपस्या करीत होते त्याचवेळी विरोचनकुमार राजा बलिने इंद्र आणि मरुद्गणांसहित समस्त देवांना पराजित करून त्यांचे राज्य आपल्या अधिकाराखाली करून घेतले होते. ते तिन्ही लोकात विख्यात झाले होते. ॥ ४-५ ॥
|
यज्ञं चकार सुमहानसुरेन्द्रो महाबलः ।
बलेस्तु यजमानस्य देवाः साग्निपुरोगमाः ।
समागम्य स्वयं चैव विष्णुमूचुरिहाश्रमे ॥ ६ ॥
|
त्या महाबली महान् असुरराजाने एका यज्ञाचे आयोजन केले होते. तिकडे बलि यज्ञ करण्यात गुंतला होता त्यावेळी इकडे अग्नि आदि देवता स्वयं या आश्रमात येऊन भगवान् विष्णुंना म्हणाल्या -॥ ६ ॥
|
बलिर्वैरोचनिर्विष्णो यजते यज्ञमुत्तमम् ।
असमाप्तव्रते तस्मिन् स्वकार्यमभिपद्यताम् ॥ ७ ॥
|
"सर्वव्यापी परमेश्वर ! विरोचनकुमार बलि एका उत्तम यज्ञाचे अनुष्ठान करीत आहे. त्याचे हे यज्ञसंबंधी कार्य पूर्ण होण्याआधीच आपल्याला आपले कार्य सिद्ध करून घेतले पाहिजे. ॥ ७ ॥
|
ये चैनमभिवर्तन्ते याचितार इतस्ततः ।
यच्च यत्र यथावच्च सर्वं तेभ्यः प्रयच्छति ॥ ८ ॥
|
या वेळी इकडून तिकडून येणारे येणारे सर्व याचक त्याच्यापाशी याचना करण्यास उपस्थित होत आहेत. ते गो, भूमि आणि सुवर्ण आदि संपत्तिपैकी ज्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा करतील त्यांना त्या सर्व वस्तु राजा बलि यथावत् रूपाने अर्पित करीत आहे. ॥ ८ ॥
|
स त्वं सुरहितार्थाय मायायोगमुपाश्रितः ।
वामनत्वं गतो विष्णो कुरु कल्याणमुत्तमम् ॥ ९ ॥
|
म्हणून विष्णो ! आपण देवतांच्या हितासाठी आपल्या योगमायेचा आश्रय करून वामनरूप धारण करून त्याच्या यज्ञात जावे आणि आमचे उत्तम कल्याण साधावे. ॥ ९ ॥
|
एतस्मिन्नन्तरे राम कश्यपोऽग्निसमप्रभः ।
अदित्या सहितो राम दीप्यमान इवौजसा ॥ १० ॥
देवीसहायो भगवान् दिव्यं वर्षसहस्रकम् ।
व्रतं समाप्य वरदं तुष्टाव मधुसूदनम् ॥ ११ ॥
|
"श्रीरामा ! त्याचवेळी अग्निसमान तेजस्वी महर्षि कश्यप धर्मपत्नी अदितिबरोबर आपल्या तेजाने प्रकाशित होत तेथे आले. ते एक सहस्र दिव्य वर्षपर्यंत चालू राहणार्या महान् व्रतास अदितिदेवी बरोबरच समाप्त करून तेथे आले होते. त्यांनी वरदायक भगवान् मधुसूदनाची या प्रकारे स्तुति केली. ॥ १०-११ ॥
|
तपोमयं तपोराशिं तपोमूर्तिं तपात्मकम् ।
तपसा त्वां सुतप्तेन पश्यामि पुरुषोत्तमम् ॥ १२ ॥
|
"भगवन् ! आपण तपोमय आहात. तपस्येची राशी आहात. तप आपले स्वरूप आहे. आपण ज्ञानस्वरूप आहात. मी उत्तम प्रकारे तपस्या करून तिच्या प्रभावाने आपले - पुरुषोत्तमाचे दर्शन करीत आहे. ॥ १२ ॥
|
शरीरे तव पश्यामि जगत् सर्वमिदं प्रभो ।
त्वमनादिरनिर्देश्यस्त्वामहं शरणं गतः ॥ १३ ॥
|
'प्रभो ! मी या सार्या जगतास आपल्या शरीरात स्थित पहात आहे. आपण अनादि आहात. देश, काल आणि वस्तु यांच्या सीमेच्या अतीत असल्याने आपला इदमित्थं रूपाने निर्देश केला जाऊ शकत नाही. मी आपणास शरण आलो आहे.' ॥ १३ ॥
|
तमुवाच हरिः प्रीतः कश्यपं गतकल्मषम् ।
वरं वरय भद्रं ते वरार्होऽसि मतो मम ॥ १४ ॥
|
कश्यपांचे सारे पाप धुतले गेले होते. भगवान् श्रीहरिने अत्यंत प्रसन्न होऊन त्यांना म्हटले - "महर्षि ! तुमचे कल्याण असो ! तुम्ही आपल्या इच्छेनुसार कुठलाही वर मागा. कारण माझ्या विचाराने तुम्ही वर प्राप्त करण्यास योग्य आहात.' ॥ १४ ॥
|
तच्छ्रुत्वा वचनं तस्य मारीचः कश्यपोऽब्रवीत् ।
अदित्या देवतानां च मम चैवानुयाचितम् ॥ १५ ॥
वरं वरद सुप्रीतो दातुमर्हसि सुव्रत ।
पुत्रत्वं गच्छ भगवन्नदित्या मम चानघ ॥ १६ ॥
|
भगवंताचे हे वचन ऐकून मरीचिनंदन कश्यपांनी म्हटले - "उत्तम व्रताचे पालन करणार्या वरदायक परमेश्वरा ! सर्व देवतांची, अदितिची आणि माझीही आपल्याला एकाच गोष्टीसाठी वारंवार याचना आहे. आपण अत्यंत प्रसन्न होऊन मला तोच एक वर प्रदान करावा. भगवन् ! निष्पाप नारायणदेवा ! आपण माझे आणि अदितिचे पुत्र होऊन यावे.' ॥ १५-१६ ॥
|
भ्राता भव यवीयांस्त्वं शक्रस्यासुरसूदन ।
शोकार्त्तानां तु देवानां साहाय्यं कर्तुमर्हसि ॥ १७ ॥
|
'असुरसूदन ! आपण इंद्राचे लहान भाऊ बनून शोकांनी पीडित झालेल्या या देवतांची सहायता करावी. ॥ १७ ॥
|
अयं सिद्धाश्रमो नाम प्रसादात् ते भविष्यति ।
सिद्धे कर्मणि देवेश उत्तिष्ठ भगवन्नितः ॥ १८ ॥
|
'देवेश्वर ! भगवन् ! आपल्या कृपेने हे स्थान सिद्धाश्रम नावाने विख्यात होईल. आता आपले तपरूपी कार्य सिद्ध झाले आहे, म्हणून आता उठावे." ॥ १८ ॥
|
अथ विष्णुर्महातेजा अदित्यां समजायत ।
वामनं रूपमास्थाय वैरोचनिमुपागमत् ॥ १९ ॥
|
तदनंतर महातेजस्वी भगवान् विष्णु अदितिदेवीच्या गर्भातून प्रकट झाले आणि वामनरूप धारण करून विरोचनकुमार बलिजवळ गेले. ॥ १९ ॥
|
त्रीन् पदानथ भिक्षित्वा प्रतिगृह्य च मेदिनीम् ।
आक्रम्य लोकाँल्लोकार्थी सर्वलोकहिते रतः ॥ २० ॥
महेन्द्राय पुनः प्रादान्नियम्य बलिमोजसा ।
त्रैलोक्यं स महातेजाश्चक्रे शक्रवशं पुनः ॥ २१ ॥
|
'सर्व लोकांच्या हितात तत्पर राहणारे भगवान् विष्णु बलिच्या अधिकारातून त्रैलोक्याचे राज्य काढून घेऊ इच्छित होते; म्हणून त्यांनी तीन पावले भूमिची याचना करून त्याच्यापासून भूमिदान ग्रहण केले आणि तिन्ही लोकांना आक्रांत करून ते पुनः देवराज इंद्रास परत दिले. महातेजस्वी श्रीहरिने आपल्या शक्तिने बलिचा निग्रह करून त्रैलोक्यास पुन्हा इंद्राचे अधीन केले. ॥ २०-२१ ॥
|
तेनैव पूर्वमाक्रान्त आश्रमः श्रमनाशनः ।
मयापि भक्त्या तस्यैव वामनस्योपभुज्यते ॥ २२ ॥
|
याच भगवंतानी पूर्वकाली येथे निवास केला होता म्हणून हा आश्रम सर्व प्रकारच्या श्रमांचा (दुःख, शोक आदि) नाश करणारा आहे. त्याच भगवान वामनांच्या ठिकाणी भक्ति असल्यामुळे मीही या स्थानास आपल्या उपयोगात आणीत असतो. ॥ २२ ॥
|
एनमाश्रममायान्ति राक्षसा विघ्नकारिणः ।
अत्रैव पुरुषव्याघ्र हन्तव्या दुष्टचारिणः ॥ २३ ॥
|
'याच आश्रमावर माझ्या यज्ञात विघ्न आणणारे राक्षस येत असतात. पुरुषसिंह ! येथेच तुम्हाला त्या दुराचार्यांचा वध करायचा आहे. ॥ २३ ॥
|
अद्य गच्छामहे राम सिद्धाश्रममनुत्तमम् ।
तदाश्रमपदं तात तवाप्येतद् यथा मम ॥ २४ ॥
|
'श्रीराम ! आता आपण त्या परम उत्तम सिद्धाश्रमात पोहोचत आहोत. तात ! तो आश्रम जसा माझा आहे तसाच तुमचाही आहे.' ॥ २४ ॥
|
इत्युक्त्वा परमप्रीतो गृह्य रामं सलक्ष्मणम् ।
प्रविशन्नाश्रमपदं व्यरोचत महामुनिः ।
शशीव गतनीहारः पुनर्वसुसमन्वितः ॥ २५ ॥
|
असे म्हणून महामुनिंनी अत्यंत प्रेमाने श्रीराम आणि लक्ष्मणाचे हात धरले आणि त्या दोघांसह आश्रमात प्रवेश केला. त्या समयी पुनर्वसु नामक दोन नक्षत्रांच्या मध्ये स्थित तुषाररहित चंद्रम्याप्रमाणे त्यांची शोभा दिसत होती. ॥ २५ ॥
|
तं दृष्ट्वा मुनयः सर्वे सिद्धाश्रमनिवासिनः ।
उत्पत्योत्पत्य सहसा विश्वामित्रमपूजयन् ॥ २६ ॥
यथार्हं चक्रिरे पूजां विश्वामित्राय धीमते ।
तथैव राजपुत्राभ्यामकुर्वन्नतिथिक्रियाम् ॥ २७ ॥
|
विश्वामित्रांना पाहून सिद्धाश्रमात राहणारे सर्व तपस्वी धावत, उड्या मारत सहसा त्यांच्याजवळ आले आणि त्या सर्वांनी मिळून बुद्धिमान विश्वामित्रांची यथोचित पूजा केली. याचप्रकारे त्यांनी त्या दोघा राजकुमारांचाही अतिथि सत्कार केला. ॥ २६-२७ ॥
|
मुहूर्तमथ विश्रान्तौ राजपुत्रावरिन्दमौ ।
प्राञ्जली मुनिशार्दूलमूचतू रघुनन्दनौ ॥ २८ ॥
|
दोन घटका विश्राम केल्यानंतर रघुकुलाला आनंद देणारे शत्रुदमन राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मण हात जोडून मुनिवर विश्वामित्रांना म्हणाले - ॥ २८ ॥
|
अद्यैव दीक्षां प्रविश भद्रं ते मुनिपुङ्गव ।
सिद्धाश्रमोऽयं सिद्धः स्यात् सत्यमस्तु वचस्तव ॥ २९ ॥
|
"मुनिश्रेष्ठ ! आपण आजच यज्ञाची दीक्षा ग्रहण करावी. आपले कल्याण होवो. हा सिद्धाश्रम वास्तविक यथा नाम तथा गुण सिद्ध व्हावा, आणि राक्षसांच्या वधाविषयी आपण सांगितलेली गोष्ट सत्य होवो." ॥२९ ॥
|
एवमुक्तो महातेजा विश्वामित्रो महानृषिः ।
प्रविवेश ततो दीक्षां नियतो नियतेंद्रियः ॥ ३० ॥
कुमारावपि तां रात्रिमुषित्वा सुसमाहितौ ।
प्रभातकाले चोत्थाय पूर्वां संध्यामुपास्य च ॥ ३१ ॥
प्रशुची परमं जाप्यं समाप्य नियमेन च ।
हुताग्निहोत्रमासीनं विश्वामित्रमवन्दताम् ॥ ३२ ॥
|
त्यांनी असे म्हटल्यावर महातेजस्वी महर्षि विश्वामित्र जितेंद्रिय भावाने नियमपूर्वक यज्ञाच्या दीक्षेत प्रविष्ट झाले. ते दोन्ही राजकुमारही सावधान होऊन रात्र घालविल्यावर सकाळी उठले आणि स्नानादिने शुद्ध होऊन प्रातःकालची संध्योपासना तथा नियमपूर्वक सर्वश्रेष्ठ गायत्री मंत्राचा जप करू लागले. जप पुरा झाल्यावर त्यांनी अग्निहोत्र करून बसलेल्या विश्वामित्रांच्या चरणी वंदन केले. ॥ ३०-३२ ॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे एकोनत्रिंशः सर्गः ॥ २९ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा एकोणतीसावा सर्ग समाप्त झाला. ॥ २९ ॥
|