॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय तेहतिसावा ॥
रामलक्ष्मणांची शरबंधनांतून सुटका
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
ब्रह्मवरदानाच्या पालनाकरिता रामलक्ष्मण शरबंधनात पडले :
प्रतिपाळावया ब्रह्मवरदान । श्रीराम आणि लक्ष्मण ।
शरबंधी पडोनि आपण। विसंज्ञपण दाविती ॥ १ ॥
बहुरुपी प्रेताचें सोंग धरी । आपण सावध अंतरीं ।
रामसौमित्र तयापरी । शरपंजरी सावध ॥ २ ॥
शरबंधी बांधले दोघे जण । विकळ दिसती रामलक्ष्मण ।
परी ते सबाह्य सावधान । प्रतापे पूर्ण पुरुषार्थी ॥ ३ ॥
ब्रह्मयाचे वरदें देख । येतां शरबंधासंमुख ।
इंद्रजित अथवा दशमुख । छेदील मस्तक श्रीराम ॥ ४ ॥
यालागीं शरबंधासमोर । कोणी न येती निशाचर ।
करित विजयाचा गजर । गेले समग्र लंकेसीं ॥ ५ ॥
लागतां शरबंधाचे बाण । वानरांचा जावा प्राण ।
करितां रामनामस्मरण । अवघे जण वांचले ॥ ६ ॥
शरबंधी रामलक्ष्मण । शरबंधी वानरगण ।
तें देंखोनि बिभीषण । आला आपण साक्षेपें ॥ ७ ॥
बिभीषण सुग्रीवापाशी जातो :
शरबंधी वानरसैन्य । बाणी पाडिलें खिळोन ।
शरबंधी रामलक्ष्मण । दोघे विसंज्ञ महावीर ॥ ८ ॥
ऐसें देखोनि शरबंधन । स्वयें आला बिभीषण ।
बाणीं खिळिलें वानरगण । सावधान नाहीं कोणी ॥ ९ ॥
कपट बुद्धि राक्षसाधमा । रणीं बांधिलें रघूत्तमा ।
बिभीषण धार्मिक धर्मात्मा । शुद्ध सत्वात्मा सात्विक ॥ १० ॥
वानरराजा सुग्रीव जाण । त्यापासीं येवोनि बिभीषण ।
त्यासी करी सावधान । युक्तवचन अनुवादे ॥ ११ ॥
ब्रह्मशापाचें वरदान । स्वयें पाळी रघुनंदन ।
त्यासी बाधी शरबंधन । सावधान शरबंधीं ॥ १२ ॥
नाहीं भयाचा संकेत । विषाद सांडावा समस्त ।
शरबंधी श्रीरघुनाथ । सावचित्त स्वानंदे ॥ १३ ॥
ब्रह्मदत्तवरदान । तें हें ब्रह्मास्त्र दारुण ।
ब्रह्मवरदा मिथ्यापण । रघुनंदन येऊं नेदी ॥ १४ ॥
हृदयीं साहोनियां लात । श्रीवत्सलांछन मिरवित ।
तो हा स्वयें श्रीरघुनाथ । मिथ्या वरदार्थ होऊं नेदी ॥ १५ ॥
ऐसिया वरदानपरी । वानरवीरांचिया हारी ।
खिळोनि पाडिल्या शरपंजरीं । नाहीं त्यां तरी जीव भय ॥ १६ ॥
ब्रह्मस्त्रा देवोनि मान । शरबंधी रामलक्ष्मण ।
तैसाच हनुमंत आपण । तो देत सन्मान ब्रह्मास्त्रा ॥ १७ ॥
हनुमंता न बाधी शरबंधन । तोही ब्रह्मास्त्रा देतसे मान ।
ऐकोनि बिभीषणवचन । मारुति आपण बोलत ॥ १८ ॥
बिभीषणवचः श्रुत्वा हनुमानिदमब्रवीत् ।
अस्मिन्शस्त्रहते सैन्ये वानराणां मनस्विनाम् ॥१॥
यो यो धारयति प्राणांस्तमाश्वासयावहे ।
तावुभौ युगपाद्वीरौ वायुपुत्रबिभीषणौ ॥२॥
उल्काहस्तौ तदा रात्रौ रणशीर्षे विचेरतुः॥३॥
बिभीषण हनुमंतासह वानरसैन्याची पाहाणी करतो :
ऐकोनि बिभीषणवाक्यासी । हांसूं आलें हनुमंतासी ।
ब्रह्मास्त्र न बाधी आम्हांसी । हें तूं जाणसी कैसेनि ॥ १९ ॥
अशोकवनीं ब्रह्मपाश । ब्रह्मयानें घालितां सावकाश ।
तवं तूंवश न होसी त्यास । मग ब्रह्मास्त्रास केंवी होसी ॥ २० ॥
ऐकोनि बिभीषणाचें वचन । हनुमान जाला सुखसंपन्न ।
पडलें देखोनि वानरसैन्य । काय आपण बोलत ॥ २१ ॥
वानरवीर पडिले क्षितीं । कोणाची कैसी गती ।
दोघे चुडी घेऊनी हातीं । शोधूं निश्चितीं रणभुमी ॥ २२ ॥
ऐसे बोलतांचि जाण । संतोषला बिभीषण ।
चुडी उजळोनि देदीप्यमान । दोघे जण निघाले ॥ २३ ॥
वानरवीरांचिया श्रेणी । खिळोनि पाडिल्या शरबंधनी ।
अशुद्ध वाहत धरणीं । होत चिडाणी मेदमांसा ॥ २४ ॥
वानरवीरांच्या वडवाळी । खिळोनी पाडिल्या भूतळीं ।
मुख्य धुरा आतुर्बळी । त्यासी शरजाळीं पाडिल्या ॥ २५ ॥
सुग्रीव अंगदादि जुत्पती । जे पूर्वप्रसंगी लिहिले आहाती ।
तेचि वीरवानर क्षितीं । पडिलें मारुति स्वयें खेदे ॥ २६ ॥
असंख्य वानर पडिले क्षितीं । संख्या न करुं शकला मारुती ।
तेही संख्योक्ती अवधारा ॥ २७ ॥
पावत पावतां दीनांत । वानर पडिले रणाआंत ।
त्यांची संख्या हनुमंत । बिभीषण युक्त सांगत ॥ २८ ॥
अस्त पावतां दिनकर । सदुसष्ट कोटी वानर ।
रणीं पाडिले महाशूर । विधोनि शर ब्रह्मास्त्रें ॥ २९ ॥
न मे भक्तः प्रणश्यति । हे रामाची अगाध कीर्ती ।
वानर सर्वथा न मरती । केली युक्ती हनुमंतें ॥ ३० ॥
वानर सदुसष्ट कोटी । पडिले देखोनि रणसंकटीं ।
हनुमंत कृपादृष्टीं । कानीं गोष्टी अनुवादे ॥ ३१ ॥
कानीं सांगतां श्रीरघुनाथ । वानर व्यथेसी निर्मुक्त ।
ब्रह्मवरदानें गोंविले तेथ । उठो न शकत निजबळें ॥ ३२ ॥
रामनामस्मरणेंकरीं । वानर सावध शरपंजरीं ।
तिळभरी व्यथा नाहीं शरीरीं । न सुटवे तरी शरबंधी ॥ ३३ ॥
धन्य ब्राह्मणाचें महिमान । उल्लंघीना रघुनंदन ।
स्वयें शरबंधी पहुडोन । ब्राह्मणवचन प्रतिपाळी ॥ ३४ ॥
ऐसी वरदानाची ख्याती । तेथें वानर ते किती ।
कैसेनि शरबंधी सुटती । ब्रह्मवरदोक्तीं बांधले ॥ ३५ ॥
बाप कृपाळू हनुमंत । कानीं जपोनि श्रीरघुनाथ ।
शरबंधी सावचित्त । केले समस्त वानर ॥ ३६ ॥
वानर शरबंधी समस्त । देखोनि बिभीषण हनुमंत ।
शोधावया जांबवंत । स्वये निघत साक्षेपें ॥ ३७ ॥
अति वृद्ध जांबवंत । अतिशयेंसीं बुद्धिमंत ।
वानर व्हावया निर्मुक्त । उपायार्थ सांगेल ॥ ३८ ॥
अत्यंत जर्जरित जरा । बाणीं खिळिलें शरीरा ।
देखोनि जांबवंतवीरा । आला पुढारां बिभीषण ॥ ३९ ॥
तयासी पुसे बिभीषण । सर्वांगी खडतरले बाण ।
तुझे वांचले कैसेनि प्राण । तें संपूर्ण मज सांग ॥ ४० ॥
जांबवंत सांगे आपण । अंगी खडतरतां बाण ।
तेव्हांचि माझा जावा प्राण । वांचलों जाण रामस्मरणें ॥ ४१ ॥
बिभीषणवचः श्रुत्वा जांबवानृक्षपुंगवः ।
कृच्छ्रेण धारयन्प्राणानिदं वचनमब्रवीत् ॥४॥
नैऋतेंद्र महावीर्य स्वरेण त्वाभिलक्षये ।
विद्धगात्रः शितैर्बाणैर्न त्वां पश्यामि चक्षुषा ॥५॥
अंजना सुप्रजा येन मातरिश्वा च निर्वृतः ।
क्वचिद्धारयति प्राणान्हनूमान्प्लवगर्षभः ॥६॥
जांबवंत हनुमंताची चौकशी करितो :
ऐकोनि बिभीषणाची मात । बाणीं खिळिला विव्हळित ।
अति प्रयासें जांबवंत । असे बोलत तें ऐका ॥ ४२ ॥
ओळखूनियां शब्दज्ञान । तुज मी जाणें बिभीषण ।
बाणधारा विकळ पूर्ण । डोळे उघडोन पाहवेना ॥ ४३ ॥
असो हे विकळतेची मात । अंजनीपुत्र अति विख्यात ।
तो स्वस्थ आहे की हनुमंत । त्याचा वृत्तांत मज सांग ॥ ४४ ॥
धन्य हनुमंताचें भजन । धन्य हनुमंताचें आचरण ।
धन्य हनुमंताची आंगवण । लंकाकंदन जेणे केलें ॥ ४५ ॥
चौदा सहस्र बनकर । ऐशीं सहस्र किंकर ।
जंबुमाळी प्रधानपुत्र । अखयाकुमार मारिला ॥ ४६ ॥
ससैन्य गांजिला इंद्रजित । लंके गांजिला लंकानाथ ।
परम पराक्रमी हनुमंत । त्याचा वृत्तांत मज सांगा ॥ ४७ ॥
ऐसें बोलतां जांबवंत । बिभीषण अति विस्मित ।
सांडून श्रीरामाची मात । पुसे हनुमंत साक्षेपें ॥ ४८ ॥
तेंचि त्याचें मनोगत । समूळ शोधावया भावार्थ ।
बिभीषण असें पुसत । तोचि श्लोकार्थ अवधारा ॥ ४९ ॥
कोठें आहे हनुमंत । ऐसें पुसतां जांबवंत ।
त्याचा पहावया भावार्थ । वाक्य वदत बिभीषण ॥ ५० ॥
बांधोनि सेतुबंधासी । ज्यांलागीं आलों लंकेसी ।
सांडून त्या रामलक्ष्मणांसी । हनुमान पुससी किमर्थ ॥ ५१ ॥
सुग्रीव राजा वानरनाथ । अंगद युवराज विख्यात ।
सांडून जुत्पतीवृत्तांत । कां पां हनुमंत पूससी ॥ ५२ ॥
सांडून ज्येष्ठ बंधू धूम्रासी । सांडुन श्रेष्ठां वानरांसी ।
हनुमान साक्षेपें पुससी । कोण अर्थांसीं सांग पां ॥ ५३ ॥
सांडुन श्रीरामाची भक्ती । नाहीं सुग्रीव आसक्ती ।
हनुमंती अति प्रीती । कोण अर्थी तें सांग ॥ ५४ ॥
बिभीषणवचः शृत्वा जांबवानिदमब्रवीत् ।
शृणु नैर्ऋत शार्दूल यन्मां पृच्छसि मारुतिम् ॥७॥
तस्मिन्जीवति वीरे हि हतमप्यहतं बलम् ।
हनूमति हते सर्वे जीवंतोऽपि हता वयम् ॥८॥
एतच्छ्रत्वा शुभं वाक्यं प्रत्युवाच बिभीषणः ।
ध्रियते मारुतिस्तात मारुतप्रतिमो जवे ॥९॥
वैश्वानरसमं तेजो धारयन्प्लवगर्षभः ।
त्वामेव मार्गणायातो मयैवाद्य सह प्रभो ॥१०॥
बिभीषण जांबवंताला हनुमंताच्या चौकशीचे कारण विचारतो :
कां पुसिला हनुमंत । ऐसें बिभीषण पुसत ।
त्यापुढें जांबवंत । प्रताप सांगत हनुमंताचा ॥ ५५ ॥
जीत असतां हनुमंत । मेले वानर समस्त जीत ।
ऐसा मारुति प्रतापवंत । जीवन निश्चित कपिसैन्या ॥ ५६ ॥
जरी तो निमाला हनुमंत । तरी आम्ही मेलों जीव जीत ।
कोण करील सावचित्त । शरबंधी समस्त वानर ॥ ५७ ॥
लागतां सूर्योदयीचे किरण । शरबंधी वानरगण ।
आदी करोनि रामलक्ष्मण । अवघ्यांचे प्राण जातील ॥ ५८ ॥
जीत असलिया हनुमंत । आणोनि द्रोणाद्री पर्वत ।
वानर वांचवील समस्त । यालागीं हनुमंत पूसिला ॥ ५९ ॥
जांबवंताचें गोड वचन । ऐकोनियां बिभीषण ।
संतोषोनियां आपण । हनुमंत लक्षण सांगत ॥ ६० ॥
हनुमंत वज्रदेही आपण । याच्या अंगी न रुपती बाण ।
त्यासी बांधीना शरबंधन । सावधान साटोपें ॥ ६१ ॥
तो महावीर हनुमंत । मजसवें तुज गिवसित ।
स्वयें आला असे येथ । जाण निश्चित ऋक्षराजा ॥ ६२ ॥
प्रळयतेजें विराजमान । वायुबळेंसी समान ।
हनुमान आलासे आपण । तुझें दर्शन घ्यावया ॥ ६३ ॥
ऐसें बोलतां बिभीषण । हनुमंते घातलें लोटांगण ।
जांबवंत करितां नमन । येरे अलिंगन दीधलें ॥ ६४ ॥
ततोऽब्रवीन्महातेजा हनूमंतं स जांबवान् ।
आगच्छ हरिशार्दूल वानरांस्त्रातुमर्हसि ॥११॥
भवन्विक्रमसंपन्नस्त्वमेषां परमा गतिः ।
त्वत्पराक्रमलालोऽयं नान्य पश्यामि कंचन ॥१२॥
ऋक्षवानरवीराणामनीकानि प्रहर्षय ।
विशल्यौ कुरु चाप्येती भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥१३॥
जांबवंत हनुमंताला दिव्यौषधी आणण्यास पाठवितो :
आलो जाणोनि हनुमंत । आम्ही वाचलों समस्त ।
पुनर्जन्म जाला प्राप्त । ऐसा हर्षित जांबवंत ॥ ६५ ॥
आलिंगोनि हनुमंतासी । जांबवंत बोले त्यासी ।
वांचवावया कपिसैन्यासी । दिसे तुजपासीं पराक्रम ॥ ६६ ॥
शरबंधी रामलक्ष्मण । त्यांची करावया सोडवण ।
तुझ्या अंगीं आंगवण । न दिसे आन तिहीं लोकीं ॥ ६७ ॥
वानरसैन्याची मांदी । पडली आहे शरबंधी ।
ते तूं वांचवी त्रिशुद्धी । दिव्यौषधी आणोनी ॥ ६८ ॥
शरबंधीं वानर सकळ । पाडिले आहेत अति विकळ ।
आजि तुझा प्रतापकाळ । तूं प्रबळबळपुरुषार्थीं ॥ ६९ ॥
तुझ्या बळाची अगाध थोरी । दिव्यौषधी आणोनि हारीं ।
उठवीं कपिसेना सभारीं । होईं उपकारी श्रीरामा ॥ ७० ॥
आमच्या भाग्यास्तव जाण । शरबंधी तूं सावधान ।
वांचवावया वानरगण । आंगवण तुजपासीं ॥ ७१ ॥
औषधी प्राप्तीचे ठिकाण हनुमंताला जांबवंत सांगतो :
कोठोनि आणूं औषधींसी । ऐसें काहीं पुसों पाहसी ।
त्याही सांगेन स्थळासी । अति वेगेंसी निघावें ॥ ७२ ॥
विलंब न साहे व्यवधान । लागतांचि सूर्यकिरण ।
नियती श्रीरामलक्ष्मण । वानरगणसमवेत ॥ ७३ ॥
यालागीं नुगवतां गभस्ती । शीघ्र जावोनि रातोरातीं ।
आणावें दिव्यौषधींप्रती । श्रीरघुपतिनिजसेवा ॥ ७४ ॥
ऐकोनि जांबवंतवचन । आलें हनुमंता स्फुरण ।
शीघ्र करावया उड्डाण । औषधिस्थान पूसत ॥ ७५ ॥
आदरें पुसतां हनुमंत । दिव्यौषधींचा पर्वत ।
हर्षे सांगे जांबवंत । तोचि श्लोकार्थ अवधारा ॥ ७६ ॥
ऐका दिव्यौषधींचें स्थान । सागरावरौतें जाण ।
लंघून महागगन । विजनवन टाकावें ॥ ७७ ॥
तेथें हिमाचल पर्वत । ठाकून जावें निणित ।
त्याच्या हेमशिखरांआंत । द्रोणाद्रि त्वरित पावसी ॥ ७८ ॥
ऐकें तो चतुष्कोण विस्तृत । दिव्यौषधीं लखलखित ।
तेजें दशदिशा दीप्तिमंत । तेज नभाआंत न समाये ॥ ७९ ॥
दिव्यौषधी वर्णन :
ऐसा निजतेजें विराजमान । त्या औषधी कोण कोण ।
उपयोगी गुणलक्षण । विशद व्याख्यान अवधारीं ॥ ८० ॥
मेले वांचवी वायुस्पर्शनीं । तीस नांव अमृतसंजीवनी ।
हृदयींचें शल्य जाय विरोनी । विशल्यकरणी ते दुजी ॥ ८१ ॥
घायीं तुटले दुधड वण । जिचेनि जाती पैं बुजोन ।
अंगी घाव न दिसे वण । सुवर्णाकरिणी ते जाण ॥ ८२ ॥
तुटलीं हडीं छिन्नभिन्न । पूर्विलीऐसीं जाती सांधून ।
सर्वाथा न दिसे तुटलेपण । संधिनी जाण ते चवथी ॥ ८३ ॥
चौऔषधींसमवेत । शिघ्रयावें रातोरात ।
वानर वाचवी समस्त । श्रीरघुनाथ संतोषा ॥ ८४ ॥
ऐकतां जांबवंतवचन । आलें हनुमंता स्फुरण ।
जेंवी चंद्रोदयीं जाण । भरे संपूर्ण क्षीराब्धी ॥ ८५ ॥
जांबवंतवाक्यें जाण । औषधी आणावया आपण ।
हनुमंतें मांडिलें उड्डाण । तेंही लक्षण अवधारा ॥ ८६ ॥
हनुमंताची गर्जना व लंकेमध्ये घबराट :
हनुमान अंगें आतुर्बळी । साटोपें देतां आरोळी ।
लंकेमाजी बैसली टाळी । दांतखिळी राक्षसां ॥ ८७ ॥
अंगें गर्जला हनुमंत । इंद्रजित धाके लंकानाथ ।
राक्षसांसीं अति आकांत । प्रळयावर्त लंकेसी ॥ ८८ ॥
रामकटकींचा वृत्तांत । पाहूं येतां राक्षस भीत ।
अवघे दडाले लंकेआंत । साशकित कपिभयें ॥ ८९ ॥
हनुमंताचे उड्डाण व पर्वतावर आगमन :
पायें दडपोनि लंकागिरी । वानर उडतां अंबरी ।
माड्या गोपुरें लंकापुरी । पडती सागरीं अंगवातें ॥ ९० ॥
मुख आरक्त अति विक्राळ । थरकत सूर्यप्राय लांगूळ ।
टंवकरोनि कर्णयुगळ । कपि प्रबळ उडतसे ॥ ९१ ॥
खालावोनि निजपृष्ठी । भ्रूभंगा देवोनि गांठी ।
पर्वत लक्षोनियां दृष्टीं । उठाउठीं उडाला ॥ ९२ ॥
पर्वत दडपतां तळीं । सर्प गजबजतीं पाताळीं ।
वृक्ष उपडती निराळीं । जेंवी वाहुटळीं तृणपर्णें ॥ ९३ ॥
उचंबळलें समुद्रजळ । सरिता उचंबळल्या तत्काळ ।
तेणें तिंबले ध्रुवमंडळ । कपीचें प्रबळ उड्डाण ॥ ९४ ॥
करोनि प्रदक्षिणा उड्डाण । इंद्रचंद्रादिग्रहस्थान ।
सूर्यवरुणादि यमसदन । उल्लंघून चालिला ॥ ९५ ॥
शोधावया सूर्याची गती । पूर्वे उडाला मारुती ।
तेंवी देखोनियां अपार राती । उत्तरपंथी उडाला ॥ ९६ ॥
जनोलोक तपोलोक । ओलांडोनि सत्यलोक ।
टाकिलें मेरुमस्तक । एकाएक हनुमंतें ॥ ९७ ॥
सन्निध कैलासाद्री । येथें देखिला हेमाद्री ।
द्रोणाद्री तो त्यामाझारी । जयावरी दिव्यौषधि ॥ ९८ ॥
दिव्यौषधि दीप्तिमंत । तेजें नभ लखलखित ।
तें देखोनि हनुमंत । अति विस्मित स्वयें जाला ॥ ९९ ॥
कैलासमुग्रं हिमवच्छिलाश्च तं वै वृषं कांचनशैलमग्यम्।
प्रदीप्तसर्वौषधिसंप्रदीप्तं ददर्श सर्वोषधिपर्वतेंद्रम्॥१४॥
कैलासानिकत हेमाद्री । द्रोणाद्रि तो त्यामाझारीं ।
दिव्यौषधि त्यावरी । निजतेजेंकरी लखलखित ॥ १०० ॥
वायु रुद्राचा निजदूत । मारुति त्याचा निजसुत ।
वेगें उडोनि हनुमंत । औषधी आणूं स्वयें आला ॥ १ ॥
दिव्यौषधींची अदृश्यता पाहून हनुमंत रागाने पर्वतच उपटून आणतो :
दिव्यौषधी पर्वतीं । कपि नेऊं आला निश्चितीं ।
तेणें त्या ठेल्या अदृश्यगती । वेढा मारुती लाविला ॥ २ ॥
पुढां औषधी लखलखिती । तेथें सवेग जाय मारुती ।
घेवों जातां हातो हातीं । त्याही होती अदृश्य ॥ ३ ॥
पुढां औषधी दिसती । हनुमान धांवे तयांप्रती ।
तंव त्या मागें आभासती । त्याही होती अदृश्य ॥ ४ ॥
औषधी न लागतीच हातीं । तेणें क्षोभला मारुती ।
गर्जोनि कोपानुवृत्तीं । पर्वतापती बोलिला ॥ ५ ॥
मी श्रीरामाचा निजदूत । शरबंधी पडला श्रीरघुनाथ ।
विशल्य करावया निश्चित । औषधार्थ मी आलों ॥ ६ ॥
तुवां औषधि केलिया गुप्त । आतां पाहूं तुझा पुरुषार्थ ।
पुच्छे कवळोनि पर्वत । औषधीं सहित उपडिला ॥ ७ ॥
कपिशक्ति अति वाड । पर्वत उपडिला कडाड ।
स्वर्गीं सुरावरां हडबड । कांपती प्रौढ दिग्गज ॥ ८ ॥
देखोनि कपीची आंगवण । सुरासुरांचा दचके प्राण ।
विद्याधर सिद्धचारण । कंपायमान धराधर ॥ ९ ॥
दिव्यौषधीं समवेत । उपडोनि तो पर्वत ।
सवेग हनुमान असे येत । जेंवी भास्वत प्राचीसी ॥ ११० ॥
संस्तूयमानः सुरसिद्धसंघैर्जगाम वेगादतिचंडवेगः ।
स तेन शैलेन भृशं रराज शैलोपमो गंधवहस्य सूनुः ॥१५॥
स तं गृहीत्वा निपपात तस्मिन् शैलोत्तमं वानरसैन्यमध्ये ।
हर्युत्तमैस्तैरभिशस्यमानो बिभीषणेनापि च शस्यमानः ॥१६॥
ततस्तु तौ मानुषराजपुत्रौ तं गंधमाघाय महौषधीनाम् ।
बभूवतूस्तत्र तदा विशल्यौ संरुढसर्वव्रणनष्टशोकौ ॥१७॥
उपडोनि द्रोणाद्रि पर्वत । घेवोनि जातां हनुमंत ।
सुर सिद्ध स्तुतिवाद करीत । श्रीरामभक्त कपिमुख्य ॥ ११ ॥
स्वामी करावया सावधान । सगळा पर्वत उपडोन ।
घेंऊन आला वायुनंदन । आंगवण अतुळित ॥ १२ ॥
निवारावया स्वामिसंकट । पर्वत उपटिला उद्भट ।
आंगवण अति श्रेष्ठ । वीर वरिष्ठ हनुमंत ॥ १३ ॥
विष्णुचक्र सवेग जात । त्याहून वेगें हनुमंत ।
औषधींसहित पर्वत । स्वामिकार्यार्थ आणिला ॥ १४ ॥
पर्वत घेवोनि हनुमंत । कैसिया शोभा शोभत ।
जैसा विष्णु चक्रयुक्त । तैसा दिसत महावीर ॥ १५ ॥
औषधींच्या वासानेच वानर सैन्याला शुद्धी येते :
पर्वत जया औषधी वरी । आनितांचि वानरभारीं ।
त्या वायुस्पर्शें वानरहारी । शरपंजरीं सुटल्या ॥ १६ ॥
रामलक्ष्मण दोघे बंधु । येतां दिव्यौषधिगंधु ।
विरोनि गेला शरबंधु । निर्मुक्त बोध पावले ॥ १७ ॥
वानरांअंगीं घाय दारुण । बुजोनि गेले पैं संपूर्ण ।
अंगीचें कानपले वण । अस्थि संपूर्ण सांधिल्या ॥ १८ ॥
घाय बुजती हें नवल कोण । वानरांच्या अस्थि शतचूर्ण ।
त्याही अस्थिबंधें सांधून । सावधान उठवील ॥ १९ ॥
श्रीराम हनुमंताचा सन्मान करितात :
श्रीरामें सन्मानिला हनुमंत । सुग्रीव अंगद जांबवंत ।
बिभीषण सन्मानित । स्तुति वदत स्वानंदें ॥ २० ॥
वानरसैन्या विश्रांती । देतां जाला स्वयें मारुती ।
अवघे जण अभिवंदिती । सन्मानिती स्तुतिवादें ॥ २१ ॥
शरबंधी सुटला रामचंद्र । वानर करिती जयजयकार ।
रामनामाचा गजर । नामें अंबर कोंदलें ॥ २२ ॥
बाप बळियाढा हनुमंत । उचलोनि औषधिपर्वत ।
जेथील तेथें ठेवोनि स्वस्थ । आला त्वरित स्वामीपासीं ॥ २३ ॥
एका जनार्दना शरण । झालें शरबंधमोचन ।
पुढील कथा गोड गहन । सावधान अवधारा ॥ १२४ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां शरबंधमोचनं नाम त्रयस्त्रिंशत्तमोऽध्यायः ॥ ३३ ॥
ओव्या ॥ १२४ ॥ श्लोक ॥ १७ ॥ एवं ॥ १४१ ॥
GO TOP
|