श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। पञ्चचत्वारिंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
देवैर्दैत्यैश्च क्षीरसागरस्य मन्थनं, रुद्रेण हालाहलविषस्य पानं, भगवतो विष्णोः साहाय्येन मन्दराचलस्य पातालतः समुद्धारस्तेन सागरस्य मन्थनं, धन्वन्तरेरप्सरसां वारुण्या उच्चैःश्रवसः कौस्तुभस्यामृतस्य च ततः प्रादुर्भावः, देवासुरसंग्रामे दैत्यानां संहारश्च - देवता आणि दैत्यांच्या द्वारा क्षीर समुद्र-मंथन, भगवान् रुद्रद्वारा हालाहल विषाचे पान, भगवान् विष्णुंच्या सहयोगाने मंदराचलाचा पाताळातून उद्धार आणि त्याच्या द्वारा मंथन, धन्वंतरी, अप्सरा, वारुणि, उच्चैःश्रवा, कौस्तुभ तथा अमृताची उत्पत्ति आणि देवासुर संग्रामात दैत्यांचा संहार -
विश्वामित्रवचः श्रुत्वा राघवः सहलक्ष्मणः ।
विस्मयं परमं गत्वा विश्वामित्रमथाब्रवीत् ॥ १ ॥
विश्वामित्रांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून लक्ष्मणासहित श्रीरामचंद्रांना फार विस्मय वाटला. ते मुनिंना म्हणाले - ॥ १ ॥
अत्यद्‍भुतमिदं ब्रह्मन् कथितं परमं त्वया ।
गङ्‍गावतरणं पुण्यं सागरस्यापि पूरणम् ॥ २ ॥
'ब्रह्मन् ! आपण ही गंगेची स्वर्गातून उतरविण्याची आणि समुद्राच्या भरण्याची (सगरपुत्रांनी खणून ठेवलेल्या भागाची) फार उत्तम आणि अद्‌भुत कथा ऐकविली आहे. ॥ २ ॥
क्षणभूतेव नौ रात्रिः संवृत्तेयं परंतप ।
इमां चिन्तयतोः सर्वां निखिलेन कथां तव ॥ ३ ॥
'कामक्रोधादि शत्रूंना संताप देणार्‍या महर्षे ! आपण सांगितलेल्या या संपूर्ण कथेवर पूर्णरूपाने विचार करीत असता आम्हा दोघांनाही ही रात्र एका क्षणासारखी निघून गेली आहे. ॥ ३ ॥
तस्य सा शर्वरी सर्वा सह सौमित्रिणा सह ।
जगाम चिन्तयानस्य विश्वामित्र कथां शुभाम् ॥ ४ ॥
'विश्वामित्र महाराज ! लक्ष्मणाबरोबर या शुभ कथेवर विचार करीत असताच माझी ही सारी रात्र निघून गेली आहे.' ॥ ४ ॥
ततः प्रभाते विमले विश्वामित्रं तपोधनम् ।
उवाच राघवो वाक्यं कृताह्निनकमरिंदमः ॥ ५ ॥
तत्पश्चात् निर्मल प्रभातकाल उपस्थित झाल्यावर तपोधन विश्वामित्र जेव्हां नित्यकर्मातून निवृत्त झाले तेव्हां शत्रुदमन श्रीरामचंद्रांनी त्यांच्याजवळ जाऊन म्हटले - ॥ ५ ॥
गता भगवती रात्रिः श्रोतव्यं परमं श्रुतम् ।
तराम सरितां श्रेष्ठां पुण्यां त्रिपथगां नदीम् ॥ ६ ॥
'मुने ! ही पूजनीय रात्र निघून गेली. ऐकण्यास योग्य अशी सर्वोत्तम कथा मी ऐकली आहे. आता आपण सरितांमध्ये श्रेष्ठ पुण्यसलिला त्रिपथगामिनी नदी गंगा, तिच्या पार जाऊ या. ॥ ६ ॥
नौरेषा हि सुखास्तीर्णा ऋषीणां पुण्यकर्मणाम् ।
भगवन्तमिह प्राप्तं ज्ञात्वा त्वरितमागता ॥ ७ ॥
'सदा पुण्यकर्मात तत्पर राहणार्‍या ऋषिंची ही नाव उपस्थित आहे. तिच्यावर सुखद आसन पसरलेले आहे. आपण परम पूज्य महर्षि येथे उपस्थित आहात हे जाणून ऋषिंनी धाडलेली ही नाव अत्यंत तीव्र गतीने येथे आली आहे. ॥ ७ ॥
तस्य तद् वचनं श्रुत्वा राघवस्य महात्मनः ।
संतारं कारयामास सर्षिसङ्‍घस्य कौशिकः ॥ ८ ॥
महात्मा राघवाचे हे वचन ऐकून विश्वामित्रांनी प्रथम ऋषिंच्यासहित श्रीराम लक्ष्मणांना पार केले. ॥ ८ ॥
उत्तरं तीरमासाद्य सम्पूज्यर्षिगणं ततः ।
गङ्‍गाकूले निविष्टास्ते विशालां ददृशुः पुरीम् ॥ ९ ॥
तत्पश्चात् स्वतःही उत्तर तटावर पोहोंचून त्यांनी तेथे राहणार्‍या ऋषिंचा सत्कार केला. नंतर सर्व लोक गंगेच्या किनार्‍यावर थांबून विशाला नामक पुरीची शोभा पाहू लागले. ॥ ९ ॥
ततो मुनिवरस्तूर्णं जगाम सहराघवः ।
विशालां नगरीं रम्यां दिव्यां स्वर्गोपमां तदा ॥ १० ॥
त्यानंतर श्रीराम लक्ष्मणांना बरोबर घेऊन मुनिवर विश्वामित्र ताबडतोब त्या दिव्य आणि रमणीय विशाला नगरीकडे चालू लागले; जी आपल्या सुंदर शोभेने स्वर्गासारखी वाटत होती. ॥ १० ॥
अथ रामो महाप्राज्ञो विश्वामित्रं महामुनिम् ।
पप्रच्छ प्राञ्जलिर्भूत्वा विशालामुत्तमां पुरीम् ॥ ११ ॥
त्या समयी परम बुद्धिमान् श्रीरामांनी हात जोडून त्या उत्तम विशाला पुरीच्या विषयी महामुनि विश्वामित्रांना विचारले - ॥ ११ ॥
कतरो राजवंशोऽयं विशालायां महामुने ।
श्रोतुमिच्छामि भद्रं ते परं कौतूहलं हि मे ॥ १२ ॥
'महामुने ! आपले कल्याण होवो. मी हे ऐकू इच्छितो की विशालामध्ये कोणता राजवंश राज्य करीत आहे. यासाठी मला फार मोठी उत्कंठा आहे.' ॥ १२ ॥
तस्य तद् वचनं श्रुत्वा रामस्य मुनिपुङ्‍गवः ।
आख्यातुं तत्समारेभे विशालायाः पुरातनम् ॥ १३ ॥
श्रीरामांचे हे वचन ऐकून मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांनी विशाला पुरीच्या प्राचीन इतिहासाचे वर्णन करण्यास प्रारंभ केला - ॥ १३ ॥
श्रूयतां राम शक्रस्य कथां कथयतः श्रुताम् ।
अस्मिन् देशे हि यद् वृत्तं शृणु तत्त्वेन राघव ॥ १४ ॥
'रघुनन्दन श्रीरामा ! मी इंद्राच्या मुखाने विशाला पुरीच्या वैभवाचे प्रतिपादन करणारी जी कथा ऐकली आहे ती सांगतो. ऐक. या देशात जो वृत्तांत घडला तो यथार्थरूपाने श्रवण कर. ॥ १४ ॥
पूर्वं कृतयुगे राम दितेः पुत्रा महाबलाः ।
अदितेश्च महाभागा वीर्यवन्तः सुधार्मिकाः ॥ १५ ॥
श्रीरामा ! प्रथम सत्ययुगात दितिचे पुत्र दैत्य अत्यंत बलवान होते आणि अदितिचे परम धर्मात्मा पुत्र महाभाग्यशाली देवही फार शक्तिशाली होते. ॥ १५ ॥
ततस्तेषां नरव्याघ्र बुद्धिरासीन्महात्मनाम् ।
अमरा विजराश्चैव कथं स्यामो निरामयाः ॥ १६ ॥
'पुरुषसिंह ! त्या महामना दैत्यांच्या आणि देवतांच्या मनात असा विचार आला की आम्ही अजर-अमर आणि निरोगी कसे होऊ ! ॥ १६ ॥
तेषां चिन्तयतां तत्र बुद्धिरासीत् विपश्चिताम् ।
क्षीरोदमथनं कृत्वा रसं प्राप्स्याम तत्र वै ॥ १७ ॥
या प्रकारे चिंतन करीत असता त्या विचारशील देवतांच्या आणि दैत्यांच्या बुद्धित ही गोष्ट आली की आपण जर क्षीरसागराचे मंथन केले तर त्यांतून निश्चितच अमृतमय रस प्राप्त करून घेऊ. ॥ १७ ॥
ततो निश्चित्य मथनं योक्त्रं कृत्वा च वासुकिम् ।
मंथानं मन्दरं कृत्वा ममन्थुरमितौजसः ॥ १८ ॥
समुद्रमंथनाचा निश्चय करून त्या अमित तेजस्वी देवतांनी आणि दैत्यांनी वासुकि नागाचा दोरखंड बनवून आणि मंदराचलाची रवी बनवून क्षीरसागरास घुसळण्यास आरंभ केला. ॥ १८ ॥
अथ वर्षसहस्रेण योक्त्रसर्पशिरांसि च ।
वमंतोऽतिविषं तत्र ददंशुर्दशनैः शिलाः ॥ १९ ॥
त्यानंतर एक हजार वर्षे लोटल्यानंतर दोरखंड बनविलेल्या सर्पाची अनेक मुखे अत्यंत जहाल विष ओकत मंदराचलाच्या शिळांना आपल्या दातांनी दंश करू कागली. ॥ १९ ॥
उत्पाताग्निसंकाशं हालाहलमहाविषम् ।
तेन दग्धं जगत् सर्वं सदेवासुरमानुषम् ॥ २० ॥
म्हणून तेथे अग्निसमान दाहक हालाहल नामक महाभयंकर विष वर उसळून आले. त्याने देवता, असुर आणि मनुष्यांसहित संपूर्ण जगतास दग्ध करण्यास आरंभ केला. ॥ २० ॥
अथ देवा महादेवं शङ्‍करं शरणार्थिनः ।
जग्मुः पशुपतिं रुद्रं त्राहि त्राहीति तुष्टुवुः ॥ २१ ॥
हे पाहून सर्व देवता शरणार्थी होऊन सर्वांचे कल्याण करणार्‍या महान देवांना - पशुपति रुद्रांना शरण गेल्या आणि 'त्राहि त्राहि' असे म्हणून धावा करून त्यांची स्तुति करू लागल्या. ॥ २१ ॥
एवमुक्तस्ततो देवैर्देवदेवेश्वरः प्रभुः ।
प्रादुरासीत् ततोऽत्रैव शङ्‍खचक्रधरो हरिः ॥ २२ ॥
देवतांनी या प्रकारे धावा केल्यावर देवदेवेश्वर भगवान् शिव तेथे प्रकट झाले. नंतर शंख-चक्रधारी भगवान् श्रीहरिही तेथे उपस्थित झाले. ॥ २२ ॥
उवाचैनं स्मितं कृत्वा रुद्रं शूलधरं हरिः ।
देवतैर्मथ्यमाने तु यत्पूर्वं समुपस्थितम् ॥ २३ ॥

तत् त्वदीयं सुरश्रेष्ठ सुराणामग्रतो हि यत् ।
अग्रपूजामिह स्थित्वा गृहाणेदं विषं प्रभो ॥ २४ ॥

श्रीहरिंनी त्रिशूलधारी भगवान् रुद्रांना म्हटले - 'सुरश्रेष्ठ ! देवतांनी समुद्रमंथन केल्यावर जी वस्तु सर्व प्रथम प्राप्त झाली आहे ती आपला भाग आहे. कारण आपण सर्व देवतांमध्ये अग्रगण्य आहात. हे प्रभो ! अग्रपूजेच्या रूपात प्राप्त झालेल्या विषाला आपण येथेच ग्रहण करावे.' ॥ २३-२४ ॥
इत्युक्त्वा च सुरश्रेष्ठस्तत्रैवान्तरधीयत ।
देवतानां भयं दृष्ट्‍वा श्रुत्वा वाक्यं तु शाङ्‌र्गिणः ॥ २५ ॥

हालाहलं विषं घोरं संजग्राहामृतोपमम् ।
देवान् विसृज्य देवेशो जगाम भगवान् हरः ॥ २६ ॥
असे म्हणून देवशिरोमणि विष्णु तेथून अंतर्धान पावले. देवतांचे भय पाहून आणि भगवान् विष्णुंची पूर्वोक्त गोष्ट ऐकून देवेश्वर भगवान् रुद्रांनी त्या घोर हालाहल विषाला अमृतासमान मानून आपल्या कंठात धारण केले आणि देवतांचा निरोप घेऊन आपल्या स्थानास निघून गेले. ॥ २५-२६ ॥
ततो देवासुराः सर्वे ममन्थू रघुनन्दन ।
प्रविवेशाथ पातालं मन्थानः पर्वतोपमः ॥ २७ ॥
रघुनन्दना ! तत्पश्चात देवता आणि असुर सर्व मिळून क्षीर सागराचे मन्थन करू लागले. त्यावेळी रवी बनलेला उत्तम पर्वत मन्दार पाताळात घुसला. ॥ २७ ॥
ततो देवाः सगन्धर्वास्तुष्टुवुर्मधुसूदनम् ।
त्वं गतिः सर्वभूतानां विशेषेण दिवौकसाम् ॥ २८ ॥

पालयास्मान् महाबाहो गिरिमुद्धर्तुमर्हसि ।
तेव्हां देवता आणि गंधर्व भगवान मधुसूदनाची स्तुति करू लागले - 'महाबाहो ! आपणच सर्व प्राणिमात्रांची गति आहात. विशेषतः देवांचे आलंबन तर आपणच आहात. आपण आमचे रक्षण करावे आणि या पर्वतास उचलावे. ॥ २८ १/२ ॥
इति श्रुत्वा हृषीकेशः कामठं रूपमास्थितः ॥ २९ ॥

पर्वतं पृष्ठतः कृत्वा शिश्ये तत्रोदधौ हरिः ।
हे ऐकून भगवान् हृषीकेशाने कच्छपाचे रूप धारण केले आणि त्या पर्वताला आपल्या पाठीवर घेऊन श्रीहरि समुद्रात झोपले. ॥ २९ १/२ ॥
पर्वताग्रं तु लोकात्मा हस्तेनाक्रम्य केशवः ॥३० ॥

देवानां मध्यतः स्थित्वा ममन्थ पुरुषोत्तमः ।
नंतर विश्वात्मा पुरुषोत्तम भगवान केशव पर्वताच्या शिखराला हाताने पकडून देवांच्या मध्ये उभे राहून स्वतःही समुद्राचे मंथन करू लागले. ॥ ३० १/२ ॥
अथ वर्षसहस्रेण आयुर्वेदमयः पुमान् ॥ ३१ ॥

उदतिष्ठत् सुधर्मात्मा सदण्डः सकमण्डलुः ।
पूर्वं धन्वन्तरिर्नाम अप्सराश्च सुवर्चसः ॥ ३२ ॥
त्यानंतर एक हजार वर्षे गेल्यावर त्या क्षीरसागरातून एक आयुर्वेदमय धर्मात्मा पुरुष प्रकट झाला. त्याच्या एका हातात दण्ड आणि दुसर्‍या हातात कमण्डलु होता. त्याचे नाव धन्वंतरी होते. त्याच्या प्राकट्यानंतर सागरांतून सुंदर कांति असलेल्या अनेक अप्सरा प्रकट झाल्या. ॥ ३१-३२ ॥
अप्सु निर्मथनादेव रसत् तस्माद् वरस्त्रियः ।
उत्पेतुर्मनुजश्रेष्ठ तस्मादप्सरसोऽभवन् ॥ ३३ ॥
नरश्रेष्ठ ! मन्थन करण्याने अप् (जल), अपांतूनच - त्याच्या रसापासून त्या सुंदर स्त्रिया उत्पन्न झाल्या म्हणून त्यांना अप्सरा म्हटले गेले. ॥ ३३ ॥
षष्टिः कोट्योऽभवंस्तासामप्सराणां सुवर्चसाम् ।
असङ्‍ख्येयास्तु काकुत्स्थ यास्तासां परिचारिकाः ॥ ३४ ॥
काकुत्स्थ ! त्या सुंदर कांतिच्या अप्सरांची संख्या साठ कोटी होती आणि त्यांच्या ज्या परिचारिका होत्या त्यांची तर गणनाच करणे शक्य नव्हते. त्या असंख्य होत्या. ॥ ३४ ॥
न ताः स्म प्रतिगृह्णन्ति सर्वे ते देवदानवाः ।
अप्रतिग्रहणादेव ता वै साधारणाः स्मृताः ॥ ३५ ॥
त्या अप्सरांना समस्त देवता आणि दानव कोणीही आपली 'पत्‍नी' या रूपाने ग्रहण करू शकले नाही, म्हणून त्या साधारणा (सामान्य) मानल्या गेल्या. ॥ ३५ ॥
वरुणस्य ततः कन्या वारुणी रघुनन्दन ।
उत्पपात महाभागा मार्गमाणा परिग्रहम् ॥ ३६ ॥
'रघुनन्दना ! तद्‍नंतर वरुणाची कन्या वारुणी, जी सुरेची अभिमानिनी देवी होती, प्रकट झाली, आणि आपल्याला स्वीकारणार्‍या पुरुषाचा शोध घेऊ लागली. ॥ ३६ ॥
दितेः पुत्रा न तां राम जगृहुर्वरुणात्मजाम् ।
अदितेस्तु सुता वीर जगृहुस्तामनिन्दिताम् ॥ ३७ ॥
'वीर श्रीरामा ! दैत्यांनी त्या वरुणकन्या सुरेला ग्रहण केले नाही. परंतु अदितिच्या पुत्रांनी (देवतांनी) त्या अनिंद्य सुंदरीला ग्रहण केले. ॥ ३७ ॥
असुरास्तेन दैतेयाः सुरास्तेनादितेः सुताः ।
हृष्टाः प्रमुदिताश्चासन् वारुणीग्रहणात् सुराः ॥ ३८ ॥
'सुरा रहित असल्यानेच दैत्य 'असुर' म्हटले जातात आणि सुरा सेवनामुळेच अदितिच्या पुत्रांना सुर संज्ञा प्राप्त झाली. वारुणीला ग्रहण करून देवता हर्षाने उत्फुल्ल आणि आनन्दमग्न झाल्या. ॥ ३८ ॥
उच्चैःश्रवा हयश्रेष्ठो मणिरत्‍नं च कौस्तुभम् ।
उदतिष्ठन्नरश्रेष्ठ तथैवामृतमुत्तमम् ॥ ३९ ॥
'नरश्रेष्ठ ! तद्‌नंतर घोड्यामध्ये उत्तम उच्चैःश्रवा, मणिरत्‍न कौस्तुभ आणि परम उत्तम अमृताचे प्राकट्य झाले. ॥ ३९ ॥
अथ तस्य कृते राम महानासीत् कुलक्षयः ।
अदितेस्तु ततः पुत्रा दितिपुत्रानयोधयन् ॥ ४० ॥
'श्रीरामा ! त्या अमृतासाठी देवता आणि असुरांच्या कुलांचा महान् संहार झाला. अदितिचे पुत्र दितिच्या पुत्रांबरोबर युद्ध करू लागले. ॥ ४० ॥
एकतामगमन् सर्वे असुरा राक्षसैः सह ।
युद्धमासीन्महाघोरं वीर त्रैलोक्यमोहनम् ॥ ४१ ॥
समस्त असुर राक्षसांच्या बरोबर एकत्र झाले. वीरा ! देवतांबरोबर त्यांचा घनघोर संग्राम होऊ लागला, जो तिन्ही लोकांना मोहात पाडणारा होता. ॥ ४१ ॥
यदा क्षयं गतं सर्वं तदा विष्णुर्महाबलः ।
अमृतं सोऽहरत् तूर्णं मायामास्थाय मोहिनीम् ॥ ४२ ॥
जेव्हां देवता आणि असुरांचा सारा समूह क्षीण होऊ लागला, तेव्हां महाबली भगवान् विष्णुंनी मोहिनी मायेचा आश्रय घेऊन तात्काळच अमृताचे अपहरण केले. ॥ ४२ ॥
ये गताभिमुखं विष्णुमक्षरं पुरुषोत्तमम् ।
सम्पिष्टास्ते तदा युद्धे विष्णुना प्रभविष्णुना ॥ ४३ ॥
जे दैत्य बलपूर्वक अमृत हिसकावून घेण्यासाठी अविनाशी पुरुषोत्तम भगवान् विष्णुच्या समोर गेले त्यांना प्रभावशाली भगवान् विष्णुने त्या समयी युद्धात भरडून टाकले. ॥ ४३ ॥
अदितेरात्मजा वीरा दितेः पुत्रान् निजघ्निरे ।
अस्मिन् युद्धे महायुद्धे दैतेयादित्ययोर्भृशम् ॥ ४४ ॥
देवता आणि दैत्यांच्या त्या घोर महायुद्धात अदितिच्या वीर पुत्रांनी दितिच्या पुत्रांचा विशेष संहार केला. ॥ ४४ ॥
निहत्य दितिपुत्रांस्तु राज्यं प्राप्य पुरंदरः ।
शशास मुदितो लोकान् सर्षिसङ्‍घान् सचारणान् ॥ ४५ ॥
दैत्यांचा वध केल्यावर त्रैलोक्याचे राज्य प्राप्त झाल्याने देवराज इंद्र अत्यंत प्रसन्न झाले आणि ऋषि आणि चारणांसहित समस्त लोकांचे शासन करू लागले.' ॥ ४५ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे पञ्चचत्वारिंशः सर्गः ॥ ४५ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा पंचेचाळीसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ४५ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP