॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ युद्धकाण्ड ॥

॥ त्रयोदशः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



देव भगवान रामांची स्तुती करतात, सीतेसह अग्निदेव प्रगट होतो आणि अयोध्येकडे प्रस्थान होते.


श्रीमहादेव उवाच
ततः शक्रः सहस्राक्षो यमश्च वरुणस्तथा ।
कुबेरश्च महातेजाः पिनाकी वृषवाहनः ॥ १ ॥
ब्रह्मा ब्रह्मविदां श्रेष्ठो मुनिभिः सिद्धचारणैः ।
ऋषयः पितरः साध्या गन्धर्वाप्सरसोरगाः ॥ २ ॥
एते चान्ये विमानाग्र्यैः आजग्मुर्यत्र राघवः ।
अब्रुवन् परमात्मानं रामं प्राञ्जलयश्च ते ॥ ३ ॥
श्रीमहादेव म्हणाले - हे पार्वती, त्यानंतर सहस्रनयन इंद्र, यम, वरुण, कुबेर, वृषभवाहन महातेजस्वी शंकर, मुनी, सिद्ध व चारण यांच्यासह ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ असणारे ब्रह्मदेव, पितर, ऋषी, साध्य, गंधर्व, अप्सरा आणि नाग हे सर्व आणि इतर पुष्कळ जण हे उत्कृष्ट विमानांत बसून आले व हात जोडून परमात्म्या रामांची स्तुती करू लागले. (१-३)

कर्ता त्वं सर्वलोकानां साक्षी विज्ञानविग्रहः ।
वसूनामष्टमोऽसि त्वं रुद्राणां शङ्‌करो भवान् ॥ ४ ॥
"हे रामा, तुम्ही सर्व लोकांचे कर्ता, सर्वांचे साक्षी, केवळ विज्ञानस्वरूप आहात. वस्तूंमधील आठवे वसू आणि रुद्रांमधील भगवान शंकर आहात. (४)

आदिकर्तासि लोकानां ब्रह्मा त्वं चतुराननः ।
अश्विनौ घ्राणभूतौ ते चक्षुषी चन्द्रभास्करौ ॥ ५ ॥
तुम्हीच सर्व लोकांचे आदिकर्ता चतुर्मुख ब्रह्मदेव आहात. दोन अश्विनीकुमार हे तुमच्या नाकपुड्या आहेत आणि सूर्य व चंद्र हे तुमचे दोन नेत्र आहेत. ५)

लोकानां आदिरन्तोऽसि नित्य एकः सदोदितः ।
सदा शुद्धः सदा बुद्धः सदा मुक्तोऽगुणोऽद्वयः ॥ ६ ॥
सर्व लोकांचे आदी (उत्पत्तिस्थान) आणि अंत (लयस्थान) तुम्ही आहात. तुम्ही नित्य, एकमेव आणि सदोदित (म्हणजे आविर्भाव व तिरोभाव यांनी रहित नित्य प्रकाशस्वरूप), नित्य शुद्ध, नित्य बुद्ध, नित्यमुक्त, निर्गुण आणि द्वैतरहित आहात. (६)

त्वन्मायासंवृतानां त्वं भासि मानुषविग्रहः ।
त्वन्नाम स्मरतां राम सदा भासि चिदात्मकः ॥ ७ ॥
हे रामा, जे लोक तुमच्या मायेने आच्छादित झालेले असतात, त्यांना तुम्ही मनुष्यरूप वाटता. याउलट जे लोक सदा तुमचे नामस्मरण करतात त्यांना तुम्ही सदा चैतन्य२स्वरूप भासता. (७)

रावणेन हृतं स्थानं अस्माकं तेजसा सह ।
त्वयाद्य निहतो दुष्टः पुनः प्राप्तं पदं स्वकम् ॥ ८ ॥
आमच्या तेजासह आमचे स्थान रावणाने हरण केले होते. तो दुष्ट रावण आज तुमच्याकडून मारला गेला आहे. त्यामुळेआमचे स्थान आम्हाला पुनः प्राप्त झाले आहे." (८)

एवं स्तुवत्सु देवेषु ब्रह्मा साक्षात् पितामहः ।
अब्रवीत् प्रणतो भूत्वा रामं सत्यपथे स्थितम् ॥ ९ ॥
अशा प्रकारे देव स्तुती करीत असताना, प्रत्यक्ष पितामह ब्रह्मदेव नम्र होऊन, सत्याच्या मार्गावर राहाणाऱ्या रामांना म्हणाले. (९)

ब्रह्मोवाच
वन्दे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं
    त्वामध्यात्मज्ञानिभिः अन्तर्हृदि भाव्यम् ।
हेयाहेयद्वन्द्वविहिनं परमेकं
    सत्तामात्रं सर्वहृदिस्थं दृशिरूपम् ॥ १० ॥
ब्रह्मदेव म्हणाले- "हे रामा, चराचराच्या स्थितीचे कारण, अध्यात्मज्ञानी लोकांकडून नेहमी हृदयांत ध्यान केले जाणारे, त्याज्य व ग्राह्य या द्वंद्वांनी रहित, सर्वांच्या पलीकडे असणारे, एकमेव, अद्वितीय, अस्तित्वरूप, सर्वांच्या हृदयांत असणारे आणि साक्षिस्वरूप असे तुम्ही विष्णूदेव आहात. तुम्हांला मी वंदन करतो. १०

प्राणापानौ निश्चयबुद्ध्या हृदि रुद्‍ध्वा
    छित्वा सर्वं संशयबन्धं विषयौघान् ।
पश्यन्तीशं यं गतमोहा यतयस्तं
    वन्दे रामं रत्‍नकिरीटं रविभासम् ॥ ११ ॥
मायातीतं माधवमाद्यं जगदादिं
    मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यम् ।
योगिध्येयं योगविधानं परिपूर्णं ।
    वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयम् ॥ १२ ॥
भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यैः
    योगासक्तैः अर्चितपादाम्बुजयुग्मम् ।
नित्यं शुद्धं बुद्धमनन्तं प्रणवाख्यं
    वन्दे रामं वीरमशेषसुरदावम् ॥ १३ ॥
त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी
    मानातीतो माधवरूपोऽखिलधारी ।
भक्त्या गम्यो भावितरूपो भवहारी
    योगाभ्यासैः भावितचेतःसहचारी ॥ १४ ॥
त्वां आद्यन्तं लोकततीनां परमीशं
    लोकानां नो लौकिकमानैः अधिगम्यम् ।
भक्तिश्रद्धाभावसमेतैः भजनीयं
    वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलम् ॥ १५ ॥
निश्चयात्मक बुद्धीने प्राण आणि अपान यांचा हृदयामध्ये निरोध करून, आणि संशयाचे सर्व बंध आणि विषय वासनांचा समूह तोडू न टाकून, जे मोहरहित संन्यासी लोक ज्या ईश्वराला पाहातात, अशा त्या रत्न-किरीटधारी आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा रामा, तुम्हांला मी वंदन करतो. मायेच्या अतीत, लक्ष्मीचे पती, सर्वाचे आदिकारण, जे जगाचे उत्पत्तिरथान, प्रमाणांच्या पलीकडे, मोहाचा नाश करणारे, मुनींना वंदनीय, योगी लोकांच्या ध्यानाचे ध्येय, योग-मार्गाचे प्रवर्तक, परिपूर्ण, लोकांना आनंदित करणारे, आणि जे सुंदर आहेत, अशा रामांना मी वंदन करतो. जे भाव म्हणजे अस्तिरूप आणि अभाव म्हणजे नास्तिरूप अशा दोन्ही प्रकारच्या प्रतीतींनी रहित आहेत, शंकर इत्यादी योगपरायण लोक ज्यांच्या पदकमल-युगलाचे पूजन करतात, जे नित्य, शुद्ध, बुद्ध व अनंत आहेत, ज्यांना ॐकार हे नाव दिले जाते आणि जे सर्व असुरांना दावानलाप्रमाणे आहेत, अशा वीर रामांना मी वंदन करतो. हे रामा, तुम्ही माझे स्वामी आहात. माझ्या प्रार्थनेप्रमाणे सर्व कार्य करणारे आहात. तुम्ही देशकाल इत्यादी परिमाणांनी रहित आहात. तुम्ही लक्ष्मीपती माधवस्वरूप आहात. सर्व विश्वाला धारण करणारे तुम्ही आहात. तुम्ही भक्तीने प्राप्त होणारे आहात. तुमच्या रूपाचे ध्यान केले असता तुम्ही संसाराचा नाश करता आणि योगाच्या अभ्यासाने शुद्ध झालेल्या चित्तात तु म्ही विहार करता. लोकसमूहांचे तुम्ही आदी (उत्पत्तिस्थान) आणि अंत (लस्थान) आहात. तुम्ही सर्व लोकांचे परम ईश्वर आहात. लौकिक प्रमाणांनी तुम्ही कळून येणारे नाहीत. भक्ती, श्रद्धा आणि भाव यांनी युक्त असणाऱ्या माणसाकडूनच तुम्ही भजन करण्यास योग्य आहात. तुम्ही नीलकमलाप्रमाणे श्यामवर्णी आहात; अशा तुम्हाला, सुंदर रामांना मी वंदन करतो. (११-१५)

को वा ज्ञातु त्वामतिमानं गतमानं
    मायासक्तो माधव शक्तो मुनिमान्यम् ।
वृन्दारण्ये वन्दितवृन्दारकवृन्दं
    वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दम् ॥ १६ ॥
हे लक्ष्मीपते, तुम्ही प्रत्यक्ष इत्यादी प्रमाणांच्या पलीकडचे व मानरहित आहात. मायेत आसक्त असणारा कोणता पुरुष तुम्हांला जाणण्यास समर्थ होईल ? तुम्ही मुनी लोकांना पूज्य आहात. कृष्ण-अवताराच्या वेळी वृंदावनात तुम्ही सर्व देवसमूहाला वंदन केले होते. तरी शंकर इत्यादी देवांना तुम्ही वंदनीय आहात. तुम्ही सुखाचा कंद आहात. अशा रामा, तुम्हांला मी वंदन करतो. (१६)

नानाशस्त्रैवेदकदम्बैः प्रतिपाद्यं
    नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिम् ।
मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं
    वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशम् ॥ १७ ॥
नाना प्रकारची शास्त्रे आणि वेद यांचे समूह ज्याचे प्रतिपादन करतात, जो नित्य आनंदस्वरूप आहे, जो निर्विषय ज्ञानस्वरूप आणि अनादी आहे, असे तुम्ही आहात. माझे कार्य करण्यासाठी तुम्ही मनुष्यरूप धारण केले आहे. पाचूप्रमाणे श्यामल वर्ण असणाऱ्या आणि मथुरेचा स्वामी असणाऱ्या रामांना मी वंदन करतो." (१७)

श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं
    ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुवि मर्त्यः ।
रामं श्यामं कामितकामप्रदमीशं
    ध्यात्वा ध्याता पातकजालैर्विगतः स्यात् ॥ १८ ॥
भक्तांच्या इच्छित कामना पूर्ण करणारे, ब्रह्मज्ञानपूर्ण असे ब्रह्मदेवांनी केलेले हे आदिस्तोत्र जो कोणी श्रद्धासंपन्न माणूस या पृथ्वीवर पठण करतो आणि श्यामवर्ण राम या ईश्वराचे ध्यान करतो, तो ध्यान करणारा सर्व पातकांतून मुक्त होऊन जातो. (१८)

श्रुत्वा स्तुतिं लोकगुरोर्विभावसुः
    स्वाङ्‍के समादाय विदेहपुत्रिकाम् ।
विभ्राजमानां विमलारुणद्युतिं
    रक्ताम्बरां दिव्यविभूषणान्विताम् ॥ १९ ॥
लोकगुरू अशा ब्रह्मदेवांनी केलेली ही स्तुती ऐकल्यावर, जानकीला घेऊन, साक्षात अग्नी प्रकट झाला. ती सीता तेजःपुंज होती. तिची कांती निर्मळ आणि अरुणाप्रमाणे तांबूस होती. तिने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले होते आणि ती दिव्य अलंकारांनी विभूषित झालेली होती. (१९)

प्रोवाच साक्षी जगतां रघूत्तमं
    प्रसन्नसर्वार्तिहरं हुताशनः ।
गृहाण देवीं रघुनाथ जानकीं
    पुरा त्वया मय्यवरोपितां वने ॥ २० ॥
सर्व जगाचा साक्षी असणारा अग्निदेव शरणागताची सर्व दुःखे हरण करणाऱ्या रघूत्तमांना म्हणाला, "हे रघुनाथा, पूर्वी तुम्ही तपोवनात माझ्या स्वाधीन केलेल्या या देवी जानकीचा आता स्वीकार करा. (२०)

विधाय मायाजनकात्मजां हरे
    दशाननप्राणविनाशनाय च ।
हतो दशास्यः सह पूत्रबान्धवैः -
    निराकृतोऽनेन भरो भुवः प्रभो ॥ २१ ॥
हे हरी, रावणाचा विनाश करण्यासाठी तुम्ही मायामय सीता निर्माण करून, रावणाला त्याच्या पुत्रबांधवासह ठार केले आणि अशा प्रकारे, हे प्रभो, या योगाने तुम्ही भूमीचा भार दूर केला. (२१)

तिरोहिता सा प्रतिबिम्बरूपिणी
    कृता यदर्थं कृतकृत्यतां गता ।
ततोऽतिहृष्टां परिगृह्य जानकीं
    रामः प्रहृष्टः प्रतिपूज्य पावकम् ॥ २२ ॥
ज्या कार्यासाठी ती प्रतिबिंबरूपी सीता निर्माण केली गेली होती, ते कार्य पूर्ण करून व कृतकृत्य होऊन ती आता अंतर्धान पावली आहे." अग्नीचे हे भाषण ऐकल्यानंतर अतिशय आनंदित झालेल्या रामांनी अग्नीची पूजा करून, प्रसन्न झालेल्या सीतेचा स्वीकार केला. (२२)

स्वाङ्‍के समावेश्य सदानपायिनीं
    श्रियं त्रिलोकीजननीं श्रियः पतिः ।
दृष्ट्वाथ रामं जनकात्मजायुतं
    श्रिया स्फुरन्तं सुरनायको मुदा ।
भक्त्या गिरा गद्‍गदया समेत्य
    कृताञ्जलिः स्तोतुमथोपचक्रमे ॥ २३ ॥
आपल्यापासून कधीही वियुक्त न होणाऱ्या, त्रैलोक्य जननी अशा लक्ष्मीला-सीतेला- लक्ष्मीपती रामांनी आपल्या मांडीवर बसविले. त्यानंतर आपल्या तेजाने शोभणाऱ्या आणि सीतेसह असणाऱ्या रामांना पाहिल्यावर, इंद्र हा त्यांच्याजवळ आला, त्याने हात जोडले, आणि आनंदपूर्वक भक्तीने गद्‌गद झालेल्या वाणीने त्याने स्तुती करण्यास प्रारंभ केला. (२३)

इन्द्र उवाच
भजेऽहं सदा राममिन्दीवराभं
    भवारण्यदावानलाभाभिधानम् ।
भवानीहृदा भावितानन्दरूपं
    भवाभावहेतुं भवादिप्रपन्नम् ॥ २४ ॥
इंद्र म्हणाला-"ज्यांची प्रभा नीलकमलाप्रमाणे आहे, ज्यांचे नाव हे संसाररूपी अरण्याला दावानलाप्रमाणे जाळून टाकणारे आहे, ज्यांच्या आनंदस्वरूपांचे ध्यान पार्वती आपल्या हृदयात करते, जे संसारातून सोडविणारे आहेत आणि शंकर इत्यादी देव ज्यांना शरण येतात, अशा श्रीरामांचे मी भजन करतो. (२४)

सुरानीकदुःखौघनाशैकहेतुं
    नराकारदेहं निराकारमीड्यम् ।
परेशं परानन्दरूपं वरेण्यं
    हरिं राममीशं भजे भारनाशम् ॥ २५ ॥
देवांच्या असंख्य दुःखाचा नाश करण्याचे जे एकमेव कारण आहेत, ज्यांनी मानवदेह धारण केला आहे, जे निराकार आहेत, जे स्तुती करण्यास योग्य आहेत, जे परमेश्वर आहेत, जे परमानंद स्वरूप आहेत, जे श्रेष्ठ आहेत, आणि ज्यांनी भूमीचा भार नष्ट केला आहे अशा विष्णूरूप ईश्वर श्रीरामांना मी भजतो. (२५)

प्रपन्नाखिलानन्ददोहं प्रपन्नं
    प्रपन्नार्तिनिःशेषनाशाभिधानम् ।
तपोयोगयोगीशभावाभिभाव्यं
    कपीशादिमित्रं भजे राममित्रम् ॥ २६ ॥
सदा भोगभाजां सुदूरे विभान्तं
    सदा योगभाजां अदूरे विभान्तम् ।
चिदानन्दकन्दं सदा राघवेशं
    विदेहात्मजानन्दरूपं प्रपद्ये ॥ २७ ॥
महायोगमायाविषेशानुयुक्तो
    विभासीश लीलानराकारवृत्तिः ।
त्वदानन्दलीला कथा पूर्णकर्णाः
    सदानन्दरूपा भवन्तीह लोके ॥ २८ ॥
जे शरण आलेल्यांना सर्व प्रकारचा आनंद देणारे आहेत व त्यांना आधार असणारे आहेत, ज्यांचे नाव हे शरण आलेल्यांच्या संपूर्ण दुःखाचा नाश करते, तप, योग तसेच योगीश्वरांच्या भावना यांच्याद्वारा ज्यांचे चिंतन केले जाते, जे सुग्रीव इत्यादींचा मित्र आहेत, अशा सूर्यसदृश रामांना मी भजतो. भोग भोगणाऱ्या लोकांपासून जे नेहमी अतिशय दूरच असतात, योगाचा अभ्यास करणाऱ्यांच्याजवळ जे प्रकाशित असतात जे चैतन्य व आनंद यांचा कंद आहेत, जे रघुकुळातील लोकांत श्रेष्ठ आहेत आणि विदेह कन्येला-सीतेला जे सदा आनंद देतात, अशा रामांना मी शरण जातो. हे ईश्वर रामा, तुम्ही आपल्या महान योग मायेच्या गुणधर्मांनी युक्त होऊन, लीलेने मानवरूप धारण करून, माणसाप्रमाणे आचरण करता, असे दिसते. तुमच्या आनंदमय लीलांच्या कथांनी ज्यांचे कान पूर्ण भरून गेले आहेत, ते लोक या जगात नित्य आनंदरूप होऊन जातात. (२६-२८)

अहं मानपानाभिमत्तप्रमत्तो
    न वेदाखिलेशाभिमानाभिमानः ।
इदानीं भवत्पादपद्मप्रसादात्
    त्रिलोकाधिपत्याभिमानो विनष्टः ॥ २९ ॥
हे ईश्वरा, आजपर्यंत मी वैभवाचा अभिमान, सोमपान यांच्या योगाने धुंद झालो होतो आणि मीच सर्वांचा स्वामी आहे, या अभिमानाने गर्विष्ठ झालो होतो. म्हणून मी तुम्हांला व अन्य कुणालाही मानत नव्हतो. परंतु आता मात्र तुमच्या चरणकमळाच्या प्रसादामुळे मी तिन्ही लोकांचा अधिपती आहे, हा माझा अभिमान नष्ट झाला आहे. (२९)

स्फुरद्‌रत्‍नकेयूरहाराभिरामं
    धराभारभूतासुरानीकदावम् ।
शरच्चन्द्रवक्‍त्रं लसत्पद्मनेत्रं
    दुरावारपारं भजे राघवेशम् ॥ ३० ॥
चमकणाऱ्या रत्नांनी जडित अशी बाहुभूषणे व हार यांनी जे सुशोभित आहेत, भूमीला भारभूत झालेल्या असुरांच्या सैन्याला जे दावानलाप्रमाणे वाटत आहेत, शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे ज्यांचे मुख आहे, ज्यांचे नेत्रकमल मनोहर आहेत, ज्यांचा आदी व अंत यांचा थांग लागणे हे अत्यंत कठीण आहे, अशा राघवेंद्रांना मी भजतो. (३०)

सुराधीशनीलाभ्रनीलाङ्‌गकान्तिं
    विराधादिरक्षोवधाल्लोकशान्तिम् ।
किरीटादिशोभं पुरारातिलाभं
    भजे रामचन्द्रं रघूणामधीशम् ॥ ३१ ॥
इंद्रनील मण्याप्रमाणे किंवा नीलवर्ण मेघाप्रमाणे ज्यांची अंगकांती श्याम आहे, विराध इत्यादी राक्षसांचा वध केल्यामुळे ज्यांनी लोकांमध्ये निर्भयता स्थापन केली आहे, ज्यांना किरीट इत्यादींनी शोभा आली आहे आणि शंकरांना जे परमधन वाटतात, व जे रस्कृळाचे अधीश्वर आहेत, अशा रामचंद्रांना मी भजतो. (३१)

लसत्चन्द्रकोटिप्रकाशादिपीठे
    समासीनमङ्‌के समाधाय सीताम् ।
स्फुरद् हेमवर्णां तडित्पुञ्जभासं
    भजे रामचन्द्रं निवृत्तार्तितन्द्रम् ॥ ३२ ॥
चमकणाऱ्या कोटि-चंद्राप्रमाणे प्रकाशमान असणाऱ्या सिंहासनावर, तेजोमय सुवर्णाप्रमाणे वर्ण असणाऱ्या, विजेच्या पुंजाप्रमाणे देदीप्यमान असणाऱ्या अशा सीतेला मांडीवर घेऊन जे समाधानाने बसले आहेत, अशा आनंदस्वरूप रामचंद्रांचे मी भजन करतो. (३२)

ततः प्रोवाच भगवान् भवान्या सहितो भवः ।
रामं कमलपत्राक्षं विमानस्थो नभःस्थले ॥ ३३ ॥
आकाशातील विमानात पार्वतीसहित बसलेल्या भगवान शंकरांनी कमलनेत्र रामांना म्हटले. (३३)

आगमिष्याम्ययोध्यायां द्रष्टुं त्वां राज्यसत्कृतम् ।
इदानीं पश्य पितरं अस्य देहस्य राघवः ॥ ३४ ॥
ततोऽपश्यद् विमानस्थं रामो दशरथं पुरः ।
ननाम शिरसा पादौ मुदा भक्त्या सहानुजः ॥ ३५ ॥
आलिङ्‌ग्य मूर्ध्न्यवघ्राय रामं दशरथोऽब्रवीत् ।
तारितोऽस्मि त्वया वत्स संसारद्दुःखसागरात् ॥ ३६ ॥
इत्युक्‍त्वा पुनरालिङ्‌ग्य ययौ रामेण पूजितः ।
रामोऽपि देवराजं तं दृष्ट्वा प्राह कृताञ्जलिम् ॥ ३७ ॥
मत्कृते निहतान् सङ्‍ख्ये वानरान् पतितान् भुवि ।
जीवयाशु सुधावृष्ट्या सहस्राक्ष ममाज्ञया ॥ ३८ ॥
"हे राघवा, अयोध्येमध्ये तुमच्यावर राज्याभिषेक सोहळा होत असताना तो पाहाण्यास मी येईन. तत्पूर्वी आत्ता तुम्ही तुमच्या या देहाचे जनक जे दशरथ आहेत, त्यांचे तुम्ही दर्शन घ्या." तेव्हा रामांनी आपल्यापुढे विमानात बसलेल्या दशरथांना पाहिले. तेव्हा लक्ष्मण व रामांनी आनंदपूर्वक त्यांना भक्तीने शिरसाष्टांग नमस्कार केला. त्या वेळी रामांना आलिंगन देऊन व त्यांच्या मस्तकाचे अवघाण करून दशरथ रामांना म्हणाले, "हे बाळा रामा, संसाररूपी दुःखसागरातून तू मला तारून नेले आहेस." असे बोलून दशरथांनी रामांना पुनः आलिंगन दिले. त्यानंतर रामांनी पूजा केल्यावर ते निघून गेले. इकडे हात जोडून उभ्या असणाऱ्या त्या देवराज इंद्राला पाहून रामांनीसुद्धा म्हटले. "हे इंद्रा, माझ्या आज्ञेवरून तू माझ्यासाठी युद्धात येथे जमिनीवर मरून पडलेल्या वानरांना अमृताची वृष्टी करून ताबडतोब जिवंत कर." (३४-३८)

तथेत्यमृतवृष्ट्या तान् जीवयामास वानरान् ।
ये ये मृता मृधे पूर्वं ते ते सुप्तोत्थिता एव ।
पूर्ववद्‌बलिनो हृष्टा रामपार्श्वमुपाययुः ॥ ३९ ॥
"ठीक आहे", असे बोलून इंद्राने अमृताचा वर्षाव करून त्या वानरांना जिवंत केले. पूर्वी युद्धात जे वानर मेले होते ते झोपेतून जागे व्हावे, त्या प्रमाणे पूर्वीप्रमाणेच बलवान दिसत होते; ते आनंदित होऊन रामांजवळ आले. (३९)

नोत्थिता राक्षसास्तत्र पीयूषस्पर्शनादपि ।
विभीषणस्तु साष्टाङ्‌गं प्रणिपत्याब्रवीद्वचः ॥ ४० ॥
तथापि अमृताचा स्पर्श होऊनसुद्धा तेथे रणभूमीवर मरून पडलेले राक्षस मात्र जिवंत होऊन उठले नाहीत. मग बिभीषण रामांना साष्टांग प्रणिपात करून म्हणाला. (४०)

देव मामनुगृह्णीष्व मयि भक्तिर्यदा तव ।
मङ्‌गलस्नानमद्य त्वं कुरु सीतासमन्वितः ॥ ४१ ॥
"हे देवा, माझ्यावर अनुग्रह करा. ज्या अर्थी तुमची माझ्यावर प्रीती आहे, त्या अर्थी तुम्ही आज सीतेसह मंगल स्नान करावे, अशी माझी इच्छा आहे. (४१)

अलङ्‌कृत्य सह भ्राता श्वो गमिष्यामहे वयम् ।
विभीषणवचः श्रुत्वा प्रत्युवाच रघुत्तमः ॥ ४२ ॥
मग उद्या लक्ष्मणासह अलंकृत होऊन सर्वजण अयोध्येकडे जाऊया." बिभीषणाचे वचन ऐकल्यावर, रघुनाथांनी त्याला प्रत्युत्तर दिले. (४२)

सुकुमारोऽतिभक्तो मे भरतो मामवेक्षते ।
जटावल्कलधारी स शब्दब्रह्मसमाहितः ॥ ४३ ॥
"माझा भाऊ भरत हा अतिशय सुकुमार आहे आणि माझा परम भक्त आहे. जटा आणि वल्कले धारण करून, शब्दब्रह्मात ध्यान लावून तो माझी वाट पाहात आहे. (४३)

कथं तेन विना स्नानं अलङ्‌कारादिकं मम ।
अतः सुग्रीवमुख्यान् त्वं पूजयाशु विशेषतः ॥ ४४ ॥
तेव्हा त्याला भेटल्याशिवाय मी कसे बरे अभ्यंग स्नान करून अलंकार इत्यादी धारण करू ? म्हणून तू आता प्रथम सुग्रीव इत्यादी मुख्य वानरांचा विशेषे करून लवकर सत्कार कर. (४४)

पूजितेषु कपीन्द्रेषु पूजितोऽहं न संशयः ।
इत्युक्तो राघवेणाशु स्वर्णरत्‍नाम्बराणि च ॥ ४५ ॥
ववर्ष राक्षसश्रेष्ठो यथाकामं यथारुचि ।
ततस्तान् पूजितान् दृष्ट्वा रामो रत्‍नैश्च यूथपान् ॥ ४६ ॥
अभिनन्द्य यथान्यायं विससर्ज हरीश्वरान् ।
विभीषणसमानीतं पुष्पकं सूर्यवर्चसम् ॥ ४७ ॥
आरुरोह ततो रामः तद्विमानं अनुत्तमम् ।
अङ्‍के निधाय वैदेहीं लज्जमानां यशस्विनीम् ॥ ४८ ॥
लक्ष्मणेन सह भ्राता विक्रान्तेन धनुष्मता ।
अब्रवीच्च विमानस्थः श्रीरामः सर्ववानरान् ॥ ४९ ॥
सुग्रीवं हरिराजं च अङ्‌गदं च विभीषणम् ।
मित्रकार्यं कृतं सर्वं भवद्‌भिः सह वानरैः ॥ ५० ॥
या वानराचा सत्कार कंेला असता, तो माझाच सत्कार होईल यात संशय नाही." असे राघवांनी सांगितल्यावर, बिभीषणाने तत्काळ त्या वानरांच्या इच्छेप्रमाणे आणि आवडीप्रमाणे त्यांच्यावर सोने, रत्ने आणि वस्त्रे यांचा वर्षाव केला. वानरांचे समूहनायक हे त्याप्रमाणे रत्ने इत्यादींनी सन्मानिले गेले आहेत, हे पाहिल्यावर रामांनी त्यांचे यथायोग्य अभिनंदन केले आणि त्या वानरश्रेष्ठांना जाण्यासाठी रीतसर निरोप दिला. त्यानंतर बिभीषणाने आणलेल्या आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या त्या अत्युत्तम पुष्पक नावाच्या विमानात राम चढले. लाजणाऱ्या आणि यशस्विनी वैदेहीला त्यांनी आपल्या मांडीवर घेतले. महापराक्रमी आणि धनुष्य धारण करणारा लक्ष्मण हासुद्धा त्यांच्या बरोबर विमानात होता. विमानात बसलेले श्रीराम सर्व वानर, वानरराज सुग्रीव अंगद आणि बिभीषण यांना म्हणाले, "वानरासह तुम्ही सर्वांनी उत्तमप्रकारे मित्रकार्य केले आहे. (४५-५०)

अनुज्ञाता मया सर्वे यथेष्टं गन्तुमर्हथ ।
सुग्रीव प्रतियाह्याशु किष्किन्धां सर्वसैनिकैः ॥ ५१ ॥
आता माझ्या अनुज्ञेने तुम्ही सर्व जणांनी आपापल्या इष्टस्थानी जावे. अरे सुग्रीवा, तू सर्व वानर-सैनिकांसह त्वरित किष्किंधा नगरीला परत जा. (५१)

स्वराज्ये वस लङ्‌कायां मम भक्तो विभीषण ।
न त्वां धर्षयितुं शक्ताः सेन्द्रा अपि दिवौकसः ॥ ५२ ॥
हे बिभीषणा, तू माझा भक्त आहेस. तू लंकेमध्ये स्वतः च्या राज्यात राहा. इंद्रासकट सारे देवसुद्धा तुझ्यावर आक्रमण करण्यास समर्थ होणार नाहीत. (५२)

अयोध्यां गन्तुमिच्छामि राजधानीं पितुर्मम ।
एवमुक्तास्तु रामेण वानरास्ते महाबलाः ॥ ५३ ॥
ऊचुः प्राञ्जलयं सर्वे राक्षसश्च विभीषणः ।
अयोध्यां गन्तुमिच्छामः त्वया सह रघुत्तम ॥ ५४ ॥
आता मी माझ्या पित्याच्या अयोध्या राजधानीप्रत जाऊ इच्छित आहे." रामांनी त्यांना असे सांगितल्यावर ते सर्व महाबलवान वानर आणि राक्षसराज बिभीषण हे सर्व हात जोडून रामांना म्हणाले, "हे रघूत्तमा, तुमच्याबरोबर आम्हीसुद्धा अयोध्या नगरीस येऊ इच्छितो. (५३-५४)

दृष्ट्वा त्वामभिषिक्तं तु कौसल्यां अभिवाद्य च ।
पश्चाद्‍वृणीमहे राज्यं अनुज्ञां देहि नः प्रभो ॥ ५५ ॥
हे प्रभो, तुमच्यावर राज्याभिषेक झालेला पाहून आणि कौसल्येला वंदन करून, नंतर आम्ही आपापल्या राज्यात जाऊ. कृपया तुम्ही अनुज्ञा द्या." (५५)

रामस्तथेति सुग्रीव वानरैः सविभीषणः ।
पुष्पकं स-हनूमांश्च शीघ्रमारोह साम्प्रतम् ॥ ५६ ॥
"ठीक आहे", असे सांगून रामांनी म्हटले, "अरे सुग्रीवा, सर्व वानर, बिभीषण आणि हनुमान यांना बरोबर घेऊन, तू आता लगेच या पुष्पक विमानात आरोहण कर." (५६)

ततस्तु पुष्पकं दिव्यं सुग्रीवः सह सेनया ।
विभीषणश्च सामात्यः सर्वे चारुरुहुः द्रुतम् ॥ ५७ ॥
तेव्हा वानसेनेसह सुगीव आणि अमात्यांसह बिभीषण असे ते सर्व जण झटपट त्या दिव्य विमानात चढून बसले. (५७)

तेष्वारूढेषु सर्वेषु कौबेरं परमासनम् ।
राघवेणाभ्यनुज्ञातं उत्पपात विहायसा ॥ ५८ ॥
ते सर्व आरूढ झाल्यावर आणि रामांनी अनुज्ञा दिल्यावर, ते कुबेराचे उत्तम विमान उड्डाण करून आकाशमार्गाने निघाले. (५८)

बभौ तेन विमानेन हंसयुक्तेन भास्वता ।
प्रहृष्टश्च तदा रामः चतुर्मुख इवापरः ॥ ५९ ॥
त्या तेजस्वी विमानामध्ये आनंदपूर्वक बसलेले राम हंसावरून जाणाऱ्या ब्रह्मदेवाप्रमाणे शोभू लागले. (५९)

ततो बभौ भास्करबिम्बतुल्यं
    कुबेरयानं तपसानुलब्धम् ।
रामेण शोभां नितरां प्रपेदे
    सीतासमेतेन सहानुजेन ॥ ६० ॥
त्यानंतर तपश्चर्येच्या योगाने प्राप्त झालेले आणि सूर्यबिंबाप्रमाणे देदीप्यमान असणारे ते कुबेराचे विमान अगोदरच शोभून दिसत होते. त्यातच लक्ष्मण आणि सीता बरोबर असणाऱ्या रामांमुळे ते अधिकच शोभू लागले. (६०)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
युद्धकाण्डे त्रयोदशः सर्गः ॥ १३ ॥
इति श्रीमद्‌अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे त्रयोदशः सर्गः ॥ १३ ॥


GO TOP